उस्मानाबाद, दि.4 :- क्रीडा व
युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा
क्रीडा कार्यालय, उस्मानाबाद तर्फे स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर व समाजसेवा शिबिर आयोजनाकरिता उस्मानाबाद जिल्हयातील
नोंदणीकृत संस्था, महिला मंडळे, क्रीडा मंडळे, बहु उद्देशीय सेवाभावी संस्था
यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.या प्रस्तावाचे विहित नमुन्यातील अर्ज
जिल्हा क्रीडा परिषद, उस्मानाबाद द्वारा
सेतू सुविधा केंद्र (तहसिल कार्यालय,उस्मानाबाद ) येथे दिनांक 6 ते 11
जानेवारी, 2017 या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहतील. त्याचे दर्शनी मूल्य
100 रुपये आहे.
विहित नमुन्यातील अर्ज मागणी
करते वेळी संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक असून
ज्या संस्थेच्या नावे अर्ज खरेदी केलेला आहे त्याच संस्थेच्या प्रस्तावासाठी अर्ज वापरणे
आवश्यक आहे. इतर संस्थेस वापरल्यास
प्रस्ताव रद्द समजण्यात येईल. मुदतीनंतर आलेले व अपूर्ण प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत
स्विकारले जाणार नाहीत. तसेच यापूर्वी जिल्हा क्रीडा कार्यालयात सादर केलेले सर्वच
प्रस्ताव रद्द करण्यात आलेले असून यापूर्वीच्या कोणत्याही प्रस्तावास अनुदान
मिळण्याबाबत दावा करता येणार नाही.
तसेच संस्थेस अनुदान आवश्यक
असल्यास नवीन मागणी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. स्वयंरोजगार शिबिर व समाजसेवा
शिबिरास स्वतंत्रपणे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.तरी उस्मानाबाद जिल्हयातील
सर्व नोंदणीकृत संस्था, क्रीडा मंडळे, सेवाभावी संस्था यांनी वरीलप्रमाणे नमूद सर्व बाबींची नोंद घेवून विहित
कालावधीत प्रस्ताव सादर करावेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडीक यांनी कळविले आहे. *****