Saturday, 18 February 2017

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन





शिवाजी  चौकात  छत्रपती  शिवाजी  महाराजांच्या  पुतळयास  पुष्पहार  अर्पण  करून  जिल्हाधिकाऱ्यांनी  केले  अभिवादन
उस्मानाबाद,दि.19: उस्मानाबाद शहरातील मुख्य चौकातील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास  पुष्पहार अर्पण  करून  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत  नारनवरे  यांनी  अभिवादन  केले.
यावेळी त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, नगराध्यक्ष मकरंदराजे  निंबाळकर  आदी  मान्यवर  उपस्थित  होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
उस्मानाबाद,दि.19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
           नायब तहसिलदार (सा. प्र) ए.जे. पठाण यांच्या हस्ते  छत्रपती  शिवाजी  महाराज  यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करून  अभिवादन  करण्यात  आले. यावेळी  रवि  मोहिते, बजरंग केंद्रे, एम.जे. शेख, के.एस. गायकवाड, दत्ता पवार, एस. एस. चव्हाण, एस. टी.  सुरवसे, श्रीमती  एस. के. भलेराव  आदीसह  जिल्हाधिकारी  कार्यालयातील अधिकारी  व  कर्मचारी  यावेळी  उपस्थित  होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा माहिती  कार्यालयात अभिवादन
उस्मानाबाद,दि. 19:- छत्रपती  शिवाजी  महाराज  यांच्या  जयंतीनिमित्त  जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन  करण्यात आले. जिल्हा  माहिती  अधिकारी  मनोज  शिवाजी  सान यांच्या  हस्ते  प्रतिमेस  पुष्पहार  अर्पण  करून  अभिवादन  करण्यात  आले.

यावेळी  भिमा पडवळ, श्रीमती  आशा  बंडगर, दिलीप वाठोरे, सिध्देश्वर  कोंपले  हे   उपस्थित होते.                                      *****

जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील सर्व वैध उमेदवारांनी 20 फेंब्रुवारी रोजी महसूल भवन येथे उपस्थित राहावे



उस्मानाबाद,दि.18:- जिल्हा  परिषद  पंचायत  समिती  सार्वत्रिक  निवडणूक  2017 साठी मतमोजणी  दिनांक  23 फेंबुवारी  रोजी  असून  या  मतमोजणी  प्रशिक्षणासाठी  गटातील व गणातील  सर्व  वैद्य  उमेदवार  यांनी  मतमोजणीच्या  पूर्व  तयारीसाठी  दि. 20 फेंब्रुवारी रोजी  सकाळी  11 -00  वाजता  महसूल  भवन, तहसिल कार्यालय,उस्मानबाद  येथे  उपस्थित  राहावे, असे आवाहन  निवडणूक  निर्णय  अधिकारी  यांनी  केले आहे.

आरटीई अंतर्गत गरीबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेशप्रक्रिया सुरू


उस्मानाबाद,दि.18:-बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणांतर्गत दुर्बल आणि वंचित घटकांना विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान 25 टक्के प्रवेश कोटयाची तरतूद आहे.
        पालकांनी आपल्या नजिकच्या  शाळेमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. वंचित ( एस.सी.एस.टी व विकलांग ) दुर्बल घटक ( ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन रुपये 1 लाखापर्यंत आहे. अशा खुल्या  प्रवर्गासह,विमुक्त व भटक्या जाती,इतर मागास, विशेष मागास व धार्मिक अल्पसंख्यांक मुस्लिम, बौध्द,खिश्चन,पारसी,जैन,व शीख) यांच्यासाठी राखीव 25 टक्के आहेत.ही प्रक्रिया सुरू झालेली आहे.प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेतला असता.बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये नर्सरी/पहिली च्या वर्गासाठी राखीव असलेल्या  जागा बऱ्याच रिक्त असलेल्या निदर्शनास आले आहे.

        तरी पालकांनी student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दि.25 फेंब्रुवारी 2017 पर्यंत ऑनलाईल अर्ज भरावेत,जास्तीत जास्त पालकांनी या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. सचिन जगताप यांनी  केले  आहे.

परिक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर फौजदारी - जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे


उस्मानबाद,दि.18:- माध्यमिक  व उच्च माध्यमिक परिक्षेसाठी जिल्हा  दक्षता समितीची बैठक  जिल्हाधिकरी  कार्यलय  ये‍थे जिल्हाधिकरी डॉ. प्रशांत नारनवरे  यांच्या अध्यक्षतेखाली   घेण्यात आली.
यावेळी  मुख्य कार्यकारी  अधिकारी आनंद रायते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवसी  उपजिल्हाधिकारी  सुनिल यादव, शिक्षणाधिकारी  माध्यमिक औदुंबर  उकिरडे, जिल्हा माहिती  अधिकारी  मनोज  सानप, शिक्षणाधिकारी  प्राथमिक  सचिन  जगताप, कोषागार  अधिकारी  विशाल  पवार, उमेदचे शेख   उपस्थित  होते. 
जिल्हाधिकारी  यांनी प्रथमच  जिल्हयातील  इयत्ता 10 वी व 12 परीक्षेसाठी  पर्यवेक्षाकामध्ये बदल केला आहे. ज्या  शाळेमध्ये  परीक्षा केंद्र  आहे. त्या शाळेतील शिक्षक परीक्षेसाठी घेण्यात येणार नाहीत तर दुसऱ्या शाळेतील शिक्षकाची  पर्यवेक्षक  म्हणून नेमणूक  करण्यात   येईल  असेही   जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी सांगितले.
            बारावीची  परीक्षा  दिनांक 28 फेब्रुवारी पासून सुरू होत असून या परीक्षेचे जिल्ह्यात 37 केंद्र असून 17 हजार 200  विद्यार्थी  परीक्षा  देणार आहेत. दहावीची  परीक्षा दिनांक 7 मार्च पासून  सुरू  होत असून 79 केंद्रांवरून 24 हजार 892  विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या केंद्रांवर  गैरप्रकार टाळण्यासाठी  तसेच कॅापीमुक्त  वातावरणात  परीक्षा पार पाडण्यासाठी प्रत्येक केद्रांवर बैठे पथक, भरारी  8 पथक  तसेच  परीक्षा केंद्रवार  मोबाईल सोबत  ठेवण्यास सक्त मनाई असून परीक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परिसरात फौजदारी  प्रक्रिया संहिता  144 कलम  लागू करण्यात येईल.
केंद्रावर   जिल्हाधिकाऱ्यांच्या  अचानक  भेटी

       केंद्रावर गैरप्रकाराला आळा घालण्यासोबतच चांगल्या वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  परीक्षा  केंद्रांना अचानक  भेटी  देणार आहेत. त्यांच्यासोबतच  मुख्य  कार्यकारी  अधिकारी, पोलीस अधीक्षक सुध्दा  भेटी  देतील. केंद्राच्या  ठिकाणी  परीक्षेसह  इतर  व्यवस्था  सुरळीतपणे  आहे  का  याची  पाहणी  ते अचानक  भेटीत  करणार  आहेत.

Wednesday, 15 February 2017

सर्व नगरपालिकांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी व 100 टक्के कर वसुलीबाबत प्रयत्न करावेत -जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे


उस्मानाबाद,दि.15:-नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या आढावा बैठकीत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी व करांच्या 100 टक्के वसुलीबाबत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली.
            या बैठकीत डॉ. नारनवरे यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करुन जिल्हयातील नागरी क्षेत्र मार्च 2017 अखेर हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना केल्या. जिल्हयातील सर्व नगर परिषद,नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी यांनी हे अभियान 100 टक्के यशस्वी करण्याची ग्वाही बैठकीत दिली, अभियानांतर्गत मुरुम नगरपरिषदेने उघडयावरील शौचालयाच्या ठिकाणी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन त्यांचा आदर्श इतर नगर परिषदांनी घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याबाबतच्या सूचना केल्या.
            तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घरोघरी शौचालयाची सक्ती केली जात असताना उघड्यावर शौचास बसल्याचे पुरावे आढळले तर संबंधितांचे रेशनकार्ड /मतदान ओळखपत्र रदृ होणार आहे. याबरोबर निवडणुकीस अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. तेव्हा उघडयावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगाण्याबाबतचे निर्देश मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सरकारला दिले आहेत. ही बाब विचारात घेऊन अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही डॉ. नारनवरे यांनी  केले.
        या नगरपरिषदांच्या विविध करांच्या वसुलीचा आढावा घेताना नगर विकास विभागाच्या दि.1 फेब्रुवारी, 2017 च्या शासन निर्णयानुसार नगर परिषद , नगर पंचायती आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून 1 फेबु्वारी  ते 31 मार्च, 2017 या कालावधीत विशेष वसूली मोहीम राबवून नगरपरिषद करांच्या शंभर टक्के वसूलीबाबत कसोशीने प्रयत्न करण्याच्या सूचना देवून या कालावधीत कालबध्द कार्यक्रम आखून थकबाकीदारांना स्मरण देणे, अधिनियमाचे कलम 152 ते 155 च्या तरतुदीनुसार  कार्यवाही  करण्यात व तद्नंतरही थकबाकी वसूली न झाल्यास  अशा थकबाकीदारांविरुध्द  कलम 156 नुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले. उपस्थित सर्व नगरपरिषद, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील  नगरपरिषद करांची 100 टक्के वसूली मार्च अखेर  पूर्ण करण्याची हमी यावेळी दिली .
            तसेच नगर परिषद स्तरावर  राबविल्या  जाणाऱ्या  वैशिष्ट्यपूर्ण, नागरी  दलितवस्ती सुधार योजना , नागरी  दलितत्तेर वस्ती सुधार इत्यादी योजनांतर्गत केलेल्या कामाच्या सविस्तर अहवालासह योजनानिहाय  पुढील पाच वर्षांत हाती घ्यावयाच्या कामाचा कृती आराखडा 5 मार्चपूर्वी  सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नगरपरिषद स्तरावरील  प्रलंबित  लेखा परीक्षण आक्षेपाची पूर्तता  करण्याच्या दृष्टीने कार्यशाळा  आयोजित करुन  अनुपालन सादर करण्याच्या सूचना दिल्या.

            या बैठकीस जिल्हा प्रशासन अधिकारी  श्री. राजीव बुबणे , समाज कल्याण विभागाचे  श्री.एस.एस. शेळके, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे  श्री. ढाके, तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद , नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर


उस्मानाबाद,दि.15:-राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान गुरुवार दि.16 फेब्रूवारी 2017 रोजी होत असल्याने मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता,जिल्हयातील विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक, उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या,शॉपिंग सेंटर्स,मॉल्स,रिटेलर्स,दत्यादी आस्थापना  यांना निवडणूकीच्या दिवशी मतदाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना स्थानिक सुट्टी जाहीर  करीत  आहे तसेच गुरुवार दि.16 फेब्रूवारी 2017 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे तसेच इतर सर्व आस्थापना व बँक (ज्यांना जिल्हाधिकारी यांनी दिलेली  स्थानिक  सुटटी  लागू  होत नाही) त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांना मतदानाचा अधिकार बजावता यावा याकरीता कामाच्या तासामधून दोन तासाची सवलत देण्यात येत आहे, असे  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत  नारनवरे यांनी  कळविले  आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मोफत निदान व उपचार शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा


            उस्मानाबाद , दि. 15 :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गतआयुष विभाग, जिल्हा रुग्णालय उस्मानाबादच्या वतीने सोमवार दि20 फेब्रुवारी 2017 रोजी आयुष मोफत निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
            जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले व सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी डॉ.पल्लवी कोथळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक, होमिओपॅथी व युनानी तज्ञ डॉक्टर्स शिबिरातील रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करणार आहेत.

            या शिबिरात आम्लपित्त,मूळव्याध,सोरायसिस,मधुमेह या आजारांवर आयुर्वेदिक तर श्वसनविकार, पचनाचे आजार, ॲलर्जी या आजारावर होमिओपॅथी आणि स्त्रीरोग,संधी विकार , मूत्रविकार या आजारावर युनानी उपचार करण्यात येणार आहेत. तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार असून अधिकाधिक गरजूंनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले व आयुष विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी एकत्र येवून शेतीतील इंद्रधनुष्य क्रांती करावी -डॉ. उमाकांत दांगट









उस्मानाबाद,दि.15:- आकाशवाणी केंद्र उस्मानाबाद, कृषी विभाग , आत्मा प्रकल्प व जिल्हा सीड फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेडिओ किसान दिनानिमित्त आकाशवाणी किसान पुरस्कार 2017 वितरण सोहळा  आज  दि.15 फेब्रुवारी 2017 रोजी सारोळा (बु) ता. उस्मानाबाद  पार पडला .
 शेती म्हणजे समग्र व सर्वंकष  कृषी विकास होय , शेतकऱ्यांनी फक्त शेती उत्पादनावर  अवलंबून न राहता प्रक्रिया व मार्केटींगकडेही लक्ष द्यावे , शेतकरी व ग्राहक मूल्यवर्धित साखळी निर्माण करावी , सीड चैन निर्माण  करावी तसेच  पॉली हाऊस प्रमाणेच नर्सरीचीही निर्मिती करावी , यातून  हरित क्रांती , नील क्रांती , श्वेत क्रांती ह्या क्रांती आता काळाच्या आड गेल्या आहेत . आता शेतीतील इंद्रधनुष्य क्रांती करावी  अशी आशा या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष तथा निवृत्त विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केली.
या पुरस्कार वितरण  सोहळ्यास निवृत्त विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.शिरीष जमदाडे, उर्जा विकासचे महाव्यवस्थापक श्री. विजयानंद काळे, क्रीडा विभागाचे संचालक श्री. जनक टेकाळे,  प्रकल्प संचालक (आत्मा) श्री.व्ही.एम. हिरेमठ ,  जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप, उपसंचालक (आत्मा)  श्री. सुभाष चोले, उर्जा विकासचे विभागीय अधिकारी  श्री. निर्मळ, श्री. के.व्ही. देशमुख, श्री. तानाजी शिनगारे, जिल्हा सीड फेडरेशनचे एम. डी. ॲड अमोल रणदिवे, आदी उपस्थित होते .
या  पुरस्कार सोहळ्याची सुरुवात  भोळी भाबडी माणसं, लय पुण्यवान माती,  संत-महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची या गीताने करण्यात आली .हे गीत आकाशवाणीच्या कलाकार वृंदानी सादर केले.
तसेच  या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित शेतकऱ्यांना  श्री. के.ही.देशमुख , ॲड. अमोल रणदिवे , श्री. सुभाष चोले,  उर्जा विकासचे महाव्यवस्थापक  श्री. विजयानंद काळे , महाउर्जाचे विभागीय अधिकारी श्री. मधुकर निर्मळ यांनी सीड हब स्थापित करणे ,  औजारे बँक स्थापित करणे व गरजू शेतकऱ्यांना औजारे भाड्याने देणे , सेंद्रीय शेतीमुळे उत्पादनामध्ये वाढ होते आणि पर्यावरणाचा, जमिनीचा व आरोग्याचा ऱ्हास होत नाही , रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे दुष्परिणाम होत आहेत त्याऐवजी दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क ही जैविक खते वापरावीत, खते कमी प्रमाणात वापरल्याने जमीनीचा पोत सुधारतो, सौरपंपाच्या वापराचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना दाखविले .शेतकऱ्यांना 95 टक्के एवढ्या सबसिडीवर महाउर्जाकडून सौरपंप वितरीत करण्यात येतात . तर नाबार्डमार्फत 40 टक्के सबसिडीवर सौरपंप शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिला जातो असे मार्गदर्शन या सर्वांनी केले.
या पुरस्कार सोहळ्यात आकाशवाणी किसान लक्ष्मी पुरस्कार 2017 -श्रीमती प्रतिभा काळे,श्रीमती सविता माळी, श्रीमती गुणाबाई  राठोड,  श्री. वंदना  ननवरे,श्रीमती प्रमोदिनी शिंदे, श्रीमती स्वाती रणनवरे,  श्रीमती सुनंदा नवटाके , श्रीमती मनिषा टेकाळे  यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपटे , स्मृतीचिन्ह, पुष्प , सन्मानपत्र  व रोख बक्षीस ही यावेळी प्रदान करण्यात आले .
आकाशवाणी किसान पुरस्कार 2017- श्री. धनंजय घोटाळे, श्री. लक्ष्मण सावंत,श्री.विलास  गपाट,श्री. बालाजी पवार,  श्री. नवनाथ शेवाळे , श्री. रामलिंग मुळे , श्री. कैलास   केसरे, श्री. सचिन पाटील  यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपटे , स्मृतीचिन्ह, पुष्प , सन्मानपत्र  व रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.


--2--
आकाशवाणी किसान मित्र पुरस्कार-2017-श्री. विनायक हेगाणा आणि  दैनिक दिव्य मराठीचे ब्युरो चिफ श्री. चंद्रसेन  देशमुख यांना प्रदान करण्यात आला .
विशेष पुरस्कार : प्रथम पुरस्कार- कळंब येथील दुध उत्पादक मराठवाडा ॲग्रो प्रोसेस कंपनी,  द्वितीय पुरस्कार श्री तुळजाभवानी शेतकरी गट , शेळगाव धानोरा तर तृतीय पुरस्कार रॉयल फार्मर्स बिजोत्पादन कंपनी , गुंजोटी या शेतकरी कंपन्यांचाही विशेष सत्कार  यावेळी करण्यात आला .
विविध जाहिरात संस्था– मे . संकल्प पब्लीसिटी – श्री. संजय मैंदरगे, मे. रिलायबल ॲडव्हर्टायझिंग एजन्सी- श्री. संजय पाटोळे आणि मे . वेदांत ॲडव्हर्टायझिंग एजन्सी – श्री. देविदास पाठक यांचाही  यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
विशेष सहकार्य पुरस्कार : श्री. कलाध्यापक श्री. शेषनाथ  वाघ आणि प्रा. भालचंद्र जाधव . आणि जिल्हा  कृषी अधीक्षक  श्री. शिरीष जमदाडे , प्रकल्प संचालक (आत्मा) श्री. हिरेमठ ,  उपसंचालक (आत्मा) श्री. चोले आणि श्री. संजय बरीदे  यांचाही परीक्षक म्हणून यावेळी सत्कार करण्यात आला .
या पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक  आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी संजय बरीदे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये श्री .बरीदे यांनी  कार्यकमाची थोडक्यात माहिती सांगितली आणि या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दौलत निपाणीकर आणि  श्रीमती शिवलीला तुगावे यांनी केले तर आभार आकाशवाणीचे प्रसारण  अधिकारी  कृष्णा शिंदे  यांनी केले . 

Tuesday, 14 February 2017

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज


उस्मानाबाद.दि.14:-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 च्या जिल्हयात गुरूवार दि.16 फेब्रुवार 2017 रोजी होणाऱ्या 55 जिल्हा परिषद गट व 110 पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून 8 हजार 770 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्हयात 1 हजार 139 केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.त्यातील 70 केंद्र हे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून त्या ठिकाणी पोलीसांची विशेष निगराणी राहणार आहे.

जिल्हयात दि.16 फेब्रुवार 2017 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हयात एकूण 10 लाख 13 हजार 323 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात 4 लाख 66 हजार 932 महिलांचा समावेश आहे तर 5 लाख 46 हजार 384 पुरूषांचा समावेश आहे. जिल्हयात प्रत्येक गावातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 1 हजार 139 केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तालुकानिहाय मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वाधिक मतदारांची संख्या ही उस्मानाबाद तालुक्यात 2 लाख 16 हजार 400 इतकी आहे. तुळजापूर तालुक्यात 1 लाख 71 हजार 367, उमरगा तालुक्यात 1 लाख 55 हजार 646, कळंब तालुक्यात 1 लाख 30 हजार 470, परंडा तालुक्यात 98 हजार 853, भूम तालुक्यात 94 हजार 28 इतकी, लोहारा तालुक्यात 81 हजार 756 तर वाशी तालुक्यात 64 हजार 803 मतदारांची संख्या आहे.

 जिल्हयात या निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक विभागाकडून मागील महिनाभरापासून तयारी करण्यात येत होती ही तयारी दि. 10 फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हयात तालुकानिहाय मतदानांची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्राची उभारणी केली आहे. त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक मतदारांची संख्या आहे. त्यामुळे उस्मानाबाद तालुक्यात 228 केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यात 189 केंद्र, उमरगा तालुक्यात 165, लोहारा तालुक्यात 87 केंद्र, कळंब तालुक्यात 161 केंद्र, भूम तालुक्यात 106 केंद्र, परंडा तालुक्यात 124 केंद्र तर वाशी तालुक्यात 79 केंद्र उभारण्यात आली आहेत. उस्मानाबाद जिल्हयात 1 हजार 139 केंद्रापैकी 70 केंद्र ही संवेदनशील म्हणून पोलिसांनी घोषित केले आहेत. त्यामुळे याठिकाणी विशेष पोलिस ठेवण्यात आले असून या संवेदनशील केंद्रावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक विभागाचेही विशेष लक्ष राहणार आहे.


निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाकडून प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, चार कर्मचारी, एक शिपाई, एक पोलिस कर्मचारी असे सात कर्मचारी काम पाहणार आहेत. याशिवाय 140 पथकांची विशेष निगराणी राहणार आहे.त्यात 46 व्हीडीओग्राफी,46 भरारी पथके राहणार आहेत.

आंतरराष्ट्रीय व भारतीय खोखे संघाच्या कर्णधार कु.सारिका काळे व कु. सुप्रिया गाढवे यांचा लोकराज्य स्पर्धा परिक्षा विशेषांक देवून सत्कार



उस्मानाबाद दि.14:- भारताच्या  खोखो  संघाच्या  कर्णधार  तथा  भारताला  सवर्णपद  मिळवून देण्यात यशस्वी  भूमिका  बजावण्याचा  उस्मानाबाद  तालुक्यातील रुईभर  येथील  कु. सारिका सुधाकर  काळे  व एशियन चॅम्पियनशिप  खोखो  क्रीडा  स्पर्धेत  पदक  विजेत्या  खोखो  संघाची सदस्य  उस्मानाबाद येथील कु. सुप्रिया  भालचंद्र  गाढवे  यांचा जिल्हा माहिती  अधिकारी  मनोज शिवाजी  सानप  यांच्या  हस्ते  कार्यालयात माहे फेब्रुवारी 2017 चा  लोकराज्य  करियरच्या  संधी  हा  विशेषांक  देवून  सत्कार  करण्यात  आला. 

या छोटयाशा सत्कार संमारंभास कु. सारिका  व  कु.  सुप्रियाचे  प्रशिक्षक  प्रा.चंद्रजित भालचंद्र  जाधव, स्टेट  बॅक ग्रामीण  स्वयंरोजगार  प्रशिक्षण संस्थेचे श्री. कलीम शेख सार्वजनिक  बांधकाम  विभागाचे  श्री. लष्‍करे तसेच  कार्यालयातील  कर्मचारी  उपस्थित  होते. 

आठवडी बाजाराच्या ठिकाणी पथनाट्य सादर करून मतदान जनजागृती



उस्मानाबाद,दि.14:-  जिल्हा  परिषद  पंचायत  समिती  सार्वत्रिक  निवडणूक -2017  च्या अनुषंगाने  मतदार  जनजागृती  कक्षांच्या पुढाकाराने दिनांक  13 व 14  फेब्रुवारी रोजी मतदानाची टक्क्केवारी वाढविण्याच्या दष्टाकोनातून आठवडी बाजार असलेल्या  बेंबळी, तेर, येडशी, समुद्रवाणी, ढोकी  व  कसबे  तडवळे  तसेच गर्दीच्या ठिकाणी  पथनाट्य  सादर करण्यात  आले.  या  सर्व  गावात  मतदार  उपस्थित  होते.

आज  दि. 14 फेब्रुवारी  2017 रोजी सकाळी 11-00 वाजता तहसिल  कार्यालयाच्या  प्रांगणात  कलापथकाद्वारे  पथनाट्य  सादर  करण्यात  आले.


या मतदान जनजागृती  अभियानात उपजिल्हाधिकारी  तथा निवडणूक निर्णय अधिकारी  अरविंद  लाटकर, सहाय्यक निवडणूक  निर्णय अधिकारी  शिरीष  बनसोडे, नायब  तहसिलदार  राजेश  जाधव, कक्ष  प्रमुख  सविता भोसले  यांच्यासह उपस्थित होते.

ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराची प्रेरणा


उस्मानाबाद,दि.14:-  शहरी भागाच्या तुलनेत  ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी असल्याने ग्रामीण भागातील तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. शहराबरोबर ग्रामीण भागाचा विकास व्हावा, यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देऊन बेरोजगारीवर मात करुन त्यांचे जीवनमान उंचावेल यासाठी शासनाने बेरोजगारीच्या प्रश्नावर तोडगा म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,उस्मानाबाद चालू केली आहे.
          केवळ शहरी भागाचा विकास होऊन चालणार नाही, तर खेडयाचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास ही मदत होईल व देशाच्या विकासात त्यांचे योगदान राहील.  ग्रामविकासाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे स्वप्न मूर्त स्वरुपात साकारायचे असेल तर ग्रामीण भागात उदयोग व्यवसायाला चालना देण्याची गरज आहे, यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी  स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, उस्मानाबादच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.
            ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील बेरोजगार तरुणांना निवडून प्रशिक्षण देणे व स्वयंरोजगार उभारणीसाठी मार्गदर्शन करणे,ग्रामिण भागाच्या विकासाठी तरुणांना प्रशिक्षण देणे, ग्रामीण भागात व्यवसाय विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे, दारिद्रयरेषेच्यावर आणण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देणे हे संस्थेचे मुख्य उद्देश आहेत.
                ग्रामीण भागातील तरुणांसाठी या संस्थेचे 14 प्रकारचे प्रशिक्षणाचे कार्यक्रमाचे राबविले जातात, टेलरिंग व डिझायनिंग, ब्युटी पार्लर मॅनेजमेंट, शेळी पालन व मेंढीपालन, ग्रामिण उद्योजकता विकास कार्यक्रम, कॉम्प्युटर बेसिक, बेसिक फोटोग्राफी व व्हीडीओग्राफी, कुक्कुटपालन, मोटार ड्रायविंग, मोबाईल रिपेरिंग, कॉम्प्युटर टॅली, शोभंच्या वस्तू बनविणे, दुचाकी दुरुस्ती, इलेक्ट्रीक मोटार दुरुस्ती, रंगकाम आदींचा समावेश आहे.
          ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे. लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी  असावा, लाभार्थीचे वय 18 वर्षे ते 45 वर्षांपर्यंत असावे, लाभार्थी दारिद्रयरेषेखालील असावा, कमीत कमी इयत्ता 4 थी पास/ नापास असणे आवश्यक आहे,
                    निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींसाठी संपूर्ण प्रशिक्षण मोफत असून, चहा, नाष्टा, भोजन विनामूल्य आहे, उत्तम व अनुभवी शिक्षकामार्फत प्रशिक्षण, योग प्रशिक्षण, अद्यावत मशिनरी, सॉप्टवेअर, भरपूर प्रात्याक्षिके व सराव, उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षण, बँक कर्ज प्रस्ताव याबाबत मार्गदर्शन केले जाते.
            प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत - शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड/ रहिवाशी पुरावा, दारिद्रयरेषेखाली असल्याचा पुरावा, ओळखपत्र आधार कार्ड/ मतदान कार्ड, पासपोर्ट साईज 5 फोटो आदींची कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
          ग्रामीण भागातील  बेरोजगार तरुणांना या संस्थेमुळे स्वयंपूर्ण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. तरी गरजू बेरोजगार तरुण-तरुणींनी या संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन, संस्थेचे संचालक श्री. मिलिंद सावंत यांनी केले आहे.

उस्मानाबाद येथे दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


उस्मानाबाद दि.14:-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद आयोजित सुशिक्षीत बेरोजगारांसाठी दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 18 फेब्रुवारी ते 1 मार्च  2017  या  कालावधीत  आयोजित  करण्यात  आला  आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण दुग्ध व्यवसायाचे महत्व, गायींच्या जाती, चाऱ्याचे नियोजन, लसीकरण, पॅकिंग, दूध विक्री तसेच शेळीपालन, उस्मानाबादी  शेळीचे महत्व, करडयांची  निगा, शेळीचे लसीकरण, शेळीचे आहार व आजारांविषयी  माहिती, अर्ध बंदिस्त  व  बंदिस्त  शेडची माहिती, शेळीच्या वेगवेगळया  जातीची  माहिती  व कुक्कुटपालनामध्ये  गावरान व बॉयलर याविषयी सविस्तर माहिती, त्याच्या खाद्याची व शेडची माहिती, विमा, आजाराविषयी माहिती, व उद्योजकीय अभ्यासक्रम या विषयी दररोज तज्ञ डॉ. व्यक्तींचे  मार्गदर्शन  व  यशस्वी  उद्योजकांचे  मार्गदर्शन  करण्यात  येणार आहे.

          उद्योजकीय माहितीमध्ये संभाषण कौशल्य, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, बँक अधिकाऱ्यांचे मागदर्शन, शासकीय कर्ज प्रस्तावाची सविस्तर माहिती, अहिल्याबाई होळकर महामंडळाची सविस्तर माहिती तसेच नाबार्ड विषयी माहिती दिली जाणार आहे. तरी इच्छूक युवक-युवतींनी अधिक माहिती व अर्जासाठी श्री.प्रकाश पवार, कार्यक्रम समन्वयक, मो.9604143488 यांच्याशी एम.सी.ई.डी., जिल्हा उद्योग केंद्र ,उस्मानाबाद येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी जिल्हा  उद्योग केंद्र श्री. पांडुरंग मोरे यांनी  केले  आहे.

कार्यक्रम समन्वयक पदाकरीता प्रशिक्षणाचे आयोजन


उस्मानबाद,दि.14:-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,उस्मानाबाद द्वारे आयेजित कार्यक्रम समन्वयक या पदाकरीता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयेजन जिल्हा उद्योग केद्र येथे करण्यात आले आहे.
          दि.2 ते 3 मार्च 2017 या कालावधीमध्ये  घेण्यात  येणार  असून  यामध्ये  नावीन्यपूर्ण उपक्रम  घेतले  जाणार  आहेत. यामध्ये कार्यक्रम  आयोजकांच्या  कामाचे  महत्त्व  सिध्द  करण्यात येईल, व्यक्तीमत्तव  विकास, संवाद  कौशल्य, देहबोल, सुसूत्रता, सूत्रसंचलन, इव्हेन्ट  मॅनेजमेंट, व्सासपीठ  सजावट, कात्रणसेवा  डाक्यूमेंटेशन , व्यवसाय  मार्गदर्शन,  कार्यक्रमाचे  नियोजन, उद्योगाचे व्यवस्थापन,अकाउन्ट, आभार प्रदर्शन  इत्यादी विषयावर तज्ञ  व  अधिकारी  वर्गाकडून  मार्गदर्शन  करण्यात  येणार  आहे.

          या  प्रशिक्षणासाठी  शैक्षणिक  पात्रता  कोणत्याही  शाखेचा पदवीधर,एम. बी. ए. , एम. एस. डब्लू, वयोमर्यांदा 18  ते 35 वर्ष  असून, अधिक  माहिती  व  प्रवेश अर्जासाठी कार्यक्रमाचे  आयोजक  श्री.  प्रकाश  पवार मो. नं. 9604143488 यांच्याशी जिल्हा उद्योग  केंद्र, येथे  संपर्क साधावा, असे  आवाहन   प्रकल्प   अधिकारी  श्री. पांडुरंग  मोरे  यांनी  केले  आहे. 

अहमदनगर येथे सैन्य भरती मेळावा


          उस्मानाबाद,दि.14:-  जिल्हयातील  सर्व होतकरु सुशिक्षीत तरुणासाठी  पोलीस परेड मैदान, अहमदनगर  येथे दिनांक 7  एप्रिल 2017  ते  22  एप्रिल 2017  या कालावधी मध्ये  सैन्य भरती  मेळाव्याचे आयोजन  करण्यात  आले आहे. सोल्जर जीडी, सोल्जर टेक्नीकल, सोल्जर कर्ल्क/स्टोअरकिपर आणि ट्रेडसमन या ट्रेडसाठी भरती करण्यात येणार आहे.या भरतीसाठी दिनांक 6 फेब्रुवारी 2017 पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु आहे. 

तरी  भारतीय  सैन्य  दलामध्ये  भरती  होवू  इच्छिणा-या  जिल्हयातील पात्र उमेदवारांनी  WWW.JOININDIANARMY.NIC.IN यासंकेतस्थळाला भेट देवून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे,असे  आवाहन जिल्हा सैनिक कल्याण  अधिकारी  माजी  कॅप्टन  सु. मो. गोडबोले  यांनी  केलेले आहे. 

“आकाशवाणी किसान पुरस्कार-2017” चे बुधवारी वितरण

        
उस्मानाबाद,दि.14:- आकाशवाणी केंद्र उस्मानाबाद, कृषी विभाग,आत्मा, उस्मानाबाद व जिल्हा सीड फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेडिओ किसान दिनानिमित्त आकाशवाणी किसान पुरस्कार 2017 चे वितरण  कार्यक्रम बुधवार दि.15 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता सारोळा (बु) ता. उस्मानाबाद येथे होणार आहे.
           जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार असून  अध्यक्षस्थानी निवृत्त विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट हे राहणार आहेत.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंद रायते, कृषी विस्तार तथा कृषी विभाग संचालक श्री.एस. एल. जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.शिरीष जमदाडे, प्रकल्प संचालक,आत्मा श्री.व्ही.एम. हिरेमठ, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.के. बी. खोत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर श्री.सचिन सूर्यवंशी, ओडीएसएफचे एम. डी. श्री. ॲड अमोल रणदिवे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
               या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून कृषी विस्तार तथा प्रशिक्षण विभागाचे  सेवा निवृत्त संचालक श्री. के. व्ही. देशमुख, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र उर्जा विकास एजन्सी औरंगाबाद श्री. मधुकर निर्मळ, प्रकल्प उपसंचालक, आत्मा श्री.सुभाष चोले, डॉ. दिनेश पवार हे उपस्थित राहणार आहेत.

               या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आकाशवाणी  केंद्र उस्मानाबाद  चे  कार्यक्रम  अधिकारी संजय बरिदे व अभियांत्रिकी विभाग  प्रमुख  तानाजी  शिनगारे  यांनी  केले  आहे. 

Monday, 13 February 2017

राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद 1170 प्रकरणे निकाली तर 11 कोटी 19 लाख 31 हजार रुपयांची वसूली




उस्मानाबाद,दि.13:- जिल्हयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी 7 हजार 75 न्यायप्रविष्ठ आणि 1 हजार 226 वादपूर्व प्रकरणे लोकअदालतीमध्ये सामोपचाराने मिटविण्याकरीता ठेवण्यात आले होते, पैकी 1 हजार 120 न्यायप्रविष्ठ तर 50 वादपूर्व अशा मोठया संख्येने प्रकरणे मिटविण्यात आली आहेत.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्याकडून देशभरात एकाच दिवशी दि.11 फेब्रुवारी 2017 रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले हेाते. यामध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. आर.आर. देशमुख, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या  मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये मोटार अपघात/ कामगार नुकसान भरपाईचे 38 प्रकरणे निकाली निघून रुपये 1 कोटी 79 लाख 88 हजार 361 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. भु-संपादनाच्या 159 प्रकरणांमध्ये पक्षकार व भू-संपादन अधिकारी  तसेच कार्यकारी अभियंता यांचे सहकार्य व प्रतिसादामुळे 9 कोटी 8 लाख 59 हजार 180 इतक्या  मावेजाचे  वाटप करण्यात आले. धनादेशाची 48 प्रकरणे निकाली निघून रुपये 11 लाख 17 हजार 936 रक्कमेची तडजोड करण्यात आली. वैवाहीक वादाची 19 प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली यामध्ये 6 लाख रुपये आपशी समझोत्याने देण्यात आले. तडजोड पात्र फौजदारी   86 प्रकरणात तडजोड होवून रुपये 5 हजार 400 इतका दंड करण्यात आला. बँकाची 4 दावे निकाली निघून   13 हजार 179 रक्कमेचा भरणा करण्यात आला व उर्वरित रक्कमेस हप्ते पाडून देण्यात आले. दिवाणी स्वरूपाचे  741 प्रकरणे व 25 वसूलीच्या  दरखास्ती निकाली काढण्यात आल्या.
वादपूर्व प्रकरणांमध्ये नगर परिषदेचे थकीत पाणीपट्टी 15 प्रकरणे मिटवून रुपये  10 लाख 59 हजार 410 रुपयांचा भरणा करण्यात आला. बँकांचे थकीत कर्ज आणि धनादेश अनादराची 35 प्रकरणे मिटून रुपये 2 लाख 87 हजार 600 रुपयाचा भरणा करण्यात आला.

पक्षकार संबधित विधीज्ञ, महसूल अधिकारी, संपादन मंडळ, विमा कंपनीचे अधिकारी, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी,नगर परिषदेचे अधिकारी,बँकाचे व्यवस्थापक आदींचा या लोक अदालतीमध्ये मोठया संख्येने प्रकरणे मिटविण्यात सक्रीय सहभाग होता. सर्व तालुका विधीज्ञ मंडळ आणि अध्यक्ष विधीज्ञ मंडळ श्री. अजित खोत व इतर पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर )श्री. एस.आर. पडवळ यांनी लोकअदालतीचे आयोजन केले. प्रमुख जिल्हा  न्यायाधीश श्री. आर.आर. देशमुख यांच्या  मार्गदर्शनाखाली आणि सर्व न्यायिक अधिकारी यांच्या सहकार्याने राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोठया संख्येने प्रकरणे निकाली काढण्यात आली, असे  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे .

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडाप्रबोधिनींमध्ये सन 2017-18 करीता नवीन प्रवेश देण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन


उस्मानाबाद,दि.13: महाराष्ट्रात शारिरीक शिक्षण व क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचविण्यासाठी आणि राज्यातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी  वैज्ञानिक पध्दती, अद्ययावत उपकरणे आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक प्रमाणात  भर देण्याची  गरज आहे. या उद्देशाने राज्यातील खेळ, परंपरा, आंतर्सामर्थ्य व खेळ सुविधा लक्षात घेऊन राज्यात पुणे येथे शिवछत्रपती क्रीडापीठाची स्थापना केलेली आहे. सध्या क्रीडापीठांतर्गत राज्यात विविध ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यात आलेल्या आहेत. या क्रीडा प्रबोधिनीमध्ये  8 ते 14 वयोगटातील मुला-मुलींची भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या बॅटरी ऑफ टेस्टद्वारे निवड करुन त्यांना विविध खेळांचे तंत्रशुध्द प्रशिक्षण तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाद्वारे दिले जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे या क्रीडापीठाच्या उद्देशाच्या पूर्तीकरीता क्रीडाप्रबोधिनीमार्फत वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब करुन खेळाची अद्ययावत उपकरणे व प्रशिक्षण यावर अधिकाधिक प्रमाणात लक्ष केंद्रीत करुन प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षणासोबतच मराठी व इंग्रजी माध्यमाची शालेय शिक्षणाची सोय, निवासव्यवस्था, भोजनव्यवस्था वैद्यकीय सुविधा, मनोरंजन सुविधा, संगणक प्रशिक्षण, शैक्षणिक सहली, विमा संरक्षण, गणवेष, तंत्रशुध्द आंतरराष्ट्रीय दर्जाचे  क्रीडा मार्गदर्शनांसह  विविध  सुविधा दिल्या जातात.
यासाठी  जिल्ह्यातील प्रत्येक गावातील / शाळेतील/ शाळेत जात नसलेल्या परंतु उत्कृष्ट शारिरिक क्षमता असलेल्या,  8 ते 14 वर्ष वयोगटातील मुले/ मुलींच्या नैपुण्य चाचण्या पुढीलप्रमाणे आयोजित केल्या आहेत-एकूण 9 चाचण्या  (प्रत्येकी कमाल  3 गुण) आयोजित करावयाच्या आहेत-  वजन,   उंची ,  30 मी. भरधाव धावणे, 800 मी. धावणे, 6 X 10 मी. शटल रन,उभे राहून लांब उडी, उभे राहून उंच उडी, मेडिसीन  बॉल  थ्रो    लवचिकता  अशा एकूण 27 गुणांच्या चाचण्यांचे आयोजन करुन यात किमान 17 गुण प्राप्त  करणारे मुले/मुली  पुढील तालुकास्तरावरील चाचणीसाठी पात्र राहतील. तसेच या चाचण्यांचा अहवाल शाळा प्रमुखांनी संबंधित तालुका क्रीडा  संयोजकांकडे  दि.  17  फेब्रुवारी  2017 पर्यंत सादर करावा.
तालुकास्तरावर वरीलप्रमाणे एकूण 9 चाचण्या आयोजित करुन त्यात 17 किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या मुला-मुलींना जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी उपस्थित राहता येईल. तालुकास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्या दिनांक 15 ते 21 फेब्रुवारी 2017 पर्यंत सकाळी 8.00 वाजता संबंधित तालुका संयोजकांनी  घोषीत केलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात येतील. तालुकास्तरावरील चाचण्यांचा अहवाल संबंधित तालुका संयोजकांनी दिनांक 23  फेब्रुवारी 2017  पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर  करावयाचा आहे.
जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे दिनांक 28  फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी 8.00 वाजता श्री. तुळजाभवानी जिल्हा  स्टेडियम येथे  आयोजन केले आहे. या  निवड  चाचण्यांसाठी  तालुका  संयोजक  पुढील  प्रमाणे  राहतील - उस्मानाबाद- जि.प. प्रशाला काजळा श्री.बिभीषण पाटील मो. नं  9922660397, कळंब- शहीद भगत  सिंग  प्रशाला श्री. एल. एम.मोहिते मो. नं. 9423718902, परंडा- न्यू हायस्कूल अनाळा  श्री. सचिन  पाटील  मो.नं .9921699863, तुळजापूर- श्री. विष्णू दळवी, तालुका क्रीडा  संकूल मो.नं.  9270917700, उमरगा- सखुबाई  माध्यमिक आश्रमशाळा, बलसूर श्री. राजू  सोलनकर मो.नं. 9665315110, भूम- न्यू  हायस्कूल, ईट श्री. बाघुंबरे व्ही.बी मो.नं  9923518577, लोहारा- आष्टा हायस्कूल आष्टा कासार श्री. मुकेश  सोमवंशी,  मो.नं  9767777176 , वाशी- श्री. अभय  वाघोलीकर मो.नं. 9405750149.

तरी  जिल्ह्यातील  8 ते 14 वर्ष वयोगटातील  जास्तीत  जास्त  मुला-मुलींनी  या निवड  चाचण्यांत सहभाग घ्यावा व अधिक माहितीसाठी  जिल्हा क्रीडा  अधिकारी  कार्यालय श्री. तुळजाभवानी  जिल्हा  स्टेडियम  येथे मुख्य क्रीडा  मार्गदर्शक  श्री. एम. झेड शेख मो.नं 9850351717  यांच्याशी संपर्क साधावा, असे  आवाहन  जिल्हा  क्रीडा  अधिकारी श्री. संजय  महाडिकयांनी  केले आहे.

पोलीस भरर्तीपूर्व प्रशिक्षणसाठी दि. 25 फेब्रुवारी 2017 पर्यंत अर्ज करावेत -समाज कल्याण आयुक्त श्री. शिवाजी शेळके


उस्मानाबाद,दि.13:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक-युवतींसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत सन 2016-17 या वर्षासाठी प्रशिक्षणार्थी यांच्या उद्दिष्टाप्रमाणे 70 टक्के पुरूष व  30 टक्के महिलाची निवड करावयाची आहे. तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द  प्रवर्गातील इयत्ता 12 वी उत्तीर्ण असलेल्या वय 18 ते 25 युवक-युवतींनी पुढीलप्रमाणे कागदपत्रांसह सहाय्यक आयुकत्‍  समाज कल्याण  यांच्याकडे  अर्ज करावेत.
उमेदवार  हा  महाराष्ट्राचा रहिवाशी  असावा, अनुसूचित  जाती व नवबौध्द घटकातील असावा, इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा, उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास प्रशिक्षणार्थी  यांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल, उमेदवारांची  उंची  पुरूष-165 सें.मी. असावी, छाती -79 से.मी.व फुगवून -84 से.मी., तसेच महिला उमेदवारांसाठी उंची -155 सें.मी. असावी,उमेदवारांकडे सर्व शैक्षणिक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.निवड  केलेल्या युवक-युवतींना प्रशिक्षणासाठी श्री. हनुमान प्रसारक मंडळ, अमरावती  येथे  तीन महिन्यांच्या मोफत  प्रशिक्षणासाठी  पाठविण्यात  येईल.
तरी जिल्ह्यातील अनुसूचित  जाती  व नवबौध्द  संवर्गातील इच्छूक उमेदवारांनी अर्ज दि.25 फेब्रुवारी 2017 पर्यंत   अर्ज सादर करावेत,असे आवाहन  सहाय्यक  आयुक्त  समाज  कल्याण  शिवाजी  शेळके  यांनी केले  आहे. 

वाहतुकीचे नियंत्रण व नियमन


उस्मानाबाद.दि.13:-  जिल्ह्यात दिनांक 19 फेब्रुवारी  रोजी शिवजयंती उत्सव  साजरा होणार आहे . हा उत्सव शांततेत पार पडावा  व मिरवणुकांदरम्यान वाहतुकीचे  नियंत्रण  व नियमन करणे आवश्यक आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता  कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी , या उत्सवा दरम्यान तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ मात करता यावी .

 तसेच सडकांवरील  किंवा सडकेने जाणाऱ्या  मिरवणुकीतील किंवा जमावातील  लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची  वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे, मिरवणुका कोणत्या मार्गाने  जाव्यात ते मार्ग विहित करणे, प्रतिमा पुजनाच्या वेळी  किंवा लोकांच्या  एकत्र जमण्याच्या  जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण  होण्याची शक्यता  असेल अशा ठिकाणी अडथळा होऊ न देणे , सार्वजनिक ठिकाणी  कर्कश वाद्य वाजविणे यावर नियंत्रण ठेवणे  यासाठी  महाराष्ट्र पोलीस  अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे जिल्ह्यातील  सर्व पोलीस उपनिरीक्षक  व त्यापेक्षा वरिष्ठ  दर्जाचे अधिकाऱ्यांना  दिनांक 18 ते 20 फेब्रुवारी 2017 पर्यंत पूर्ण अधिकार प्रदान केले असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कळविले आहे .

तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या शिक्षकांनी अर्ज करण्याचे आवाहन


उस्मानाबाद.दि.13:-  उच्च माध्यमिक शिक्षकांची सेवा 12 वर्षे व त्याहून अधिक झालेली असेल अशा उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी  वरिष्ठ वेतनश्रेणी विषयनिहाय  10 दिवसांचे  प्रत्यक्ष  प्रशिक्षण व संबंधितांचे 11 दिवसांचे  गृहकार्य  पूर्ण करणे  याचे आयोजन मंडळामार्फत करण्यात येते .
ज्या उच्च माध्यमिक शिक्षकांची सेवा 24 वर्षे पूर्ण झालेली आहे व ज्यांनी एम.एड अथवा एम.फिल अथवा पी.एचडी, एमएसएसीआयटी या संगणक  अभ्यासक्रमाची शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेली आहे . अशा अर्हताप्राप्त शिक्षकांसाठी  निवडश्रेणी विषयनिहाय 5 दिवसांचे प्रत्यक्ष  प्रशिक्षण व 11 दिवसांचे  गृहकार्य पूर्ण करणे याचे आयोजन मंडळामार्फत करण्यात येते , या दोन्ही प्रशिक्षणाचे आयोजन माहे मे- जून 2017 मध्ये  विभागीय मंडळनिहाय  करण्यात येणार आहे . या प्रत्यक्ष प्रशिक्षणापूर्वी  तज्ञ मार्गदर्शकांसाठी  2/3 दिवसांचे  राज्यस्तरीय प्रशिक्षण एप्रिल 2017 मध्ये आयोजित करण्यात येईल. या प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्याची इच्छा  असलेल्या शिक्षकांनी  आपली माहिती खाली दिलेल्या  पात्रतेच्या  निकषानुसार  वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या तज्ञ मार्गदर्शकांसाठी  दिलेला फॉर्म http://training.mh-hsc.ac.in   या लिंकवर ऑनलाईन भरावा. या निवेदन मंडळाची वेबसाईट www.mahahsscboard.maharashtra.gov.in  वरही उपलब्ध  करुन दिलेले आहे .
तज्ञ मार्गदर्शक पदासाठी  अर्हता / पात्रता :- वरिष्ठश्रेणी  व निवड  श्रेणी प्रशिक्षणासाठी  तज्ञांची  समान  आवश्यक पात्रता-वरिष्ठ  महाविद्यालयीन शिक्षक, विद्यापीठ स्तरावरील शिक्षक,  शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील  शिक्षक,  कनिष्ठ  महाविद्यालयातील शिक्षक ,  वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण तज्ञांसाठी अर्हता-कनिष्ठ  महाविद्यालयातील शिक्षकांचा  शैक्षणिक अनुभव किमान 12 वर्षे सेवा पूर्ण  झालेला असावा,कनिष्ठ  महाविद्यालयातील  शिक्षकांचे  स्वत:चे वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण  पूर्ण झालेले असावे, वरिष्ठ महाविद्यालय/ शिक्षणशास्त्र महाविद्यालय/ विद्यापीठ स्तरावरील  शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव  किमान 15 वर्षांचा असावा .निवड श्रेणी प्रशिक्षण तज्ञांसाठी अर्हता-कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव किमान 24 वर्षे सेवा पूर्ण  झालेला असावा,कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे  स्वत:चे निवडश्रेणी  प्रशिक्षण  पूर्ण झालेले असावे,वरिष्ठ महाविद्यालय/ शिक्षणशास्त्र  महाविद्यालय / विद्यापीठ स्तरावरील  शिक्षकांचा शैक्षणिक  अनुभव  किमान 15 वर्षांचा  असावा.  या भरलेल्या  फॉर्मची प्रिंट काढून आपल्या कनिष्ठ  महाविद्यालयाच्या  प्राचार्यांमार्फत दिनांक 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत राज्य मंडळ  कार्यालयास  सादर करावायाचा आहे . प्राप्त  अर्जांमधून  पात्र  तज्ञ मार्गदर्शकांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल , असे  राज्य मंडळाचे सचिव  कृष्ण कुमार यांनी कळविले आहे .