Wednesday, 24 April 2019

निवडणुकीतील राजकीय पक्ष व पात्र उमेदवारांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या खर्चाची माहिती केली सादर


 वृत्त क्र.247                                                 दि.24 एप्रिल 2019
निवडणुकीतील राजकीय पक्ष व पात्र उमेदवारांनी
निवडणुकीदरम्यान केलेल्या खर्चाची माहिती केली सादर
उस्मानाबाद, दि.24- मा. भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारादरम्यान झालेल्या निवडणूक खर्चाच्या लेख्याची तृतीय तपासणी निवडणूक निरीक्षक (खर्च संनियंत्रण) पी.सुधाकर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष व पात्र उमेदवार यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या खर्चाचे लेखे जिल्हा खर्च नियंत्रण कक्षात सादर करण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी कळविले आहे.
उमेदवारनिहाय निवडणूक खर्चाची माहिती पुढीलप्रमाणे-
उमेदवाराचे नाव- ओमप्रकाश भूपालसिंह पवनराजे निंबाळकर (पक्ष-शिवसेना) रु.35 लाख 63 हजार 241, राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) रु. 33 लाख 25 हजार 633, डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन (बहुजन समाज पार्टी) रु.66 हजार 940, अर्जुन सिद्राम सलगर (वंचित बहुजन आघाडी) रु.आठ लाख 66 हजार 435, अण्णासाहेब रामचंद्र राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल) रु. 93 हजार 708, दीपक महादेव ताटे (भा.प.सेना पार्टी) रु.एक लाख 34 हजार 668, विश्वनाथ सदाशिव फुलसुरे (क्रांतिकारी जय हिंद सेना) रु.1लाख 2 हजार 541, आर्यनराजे किसनराव शिंदे (अपक्ष) रु.अठरा हजार 380, नेताजी नागनाथराव गोरे (अपक्ष) रु.1 लाख 27 हजार 855, जगन्नाथ निवृत्ती मुंडे (अपक्ष) रु.1 लाख 60 हजार 235, तुकाराम दासराव गंगावणे (अपक्ष) रु.37 हजार 400, डॉ.श्री.वसंत रघुनाथ मुंडे (अपक्ष) रु.1 लाख 86 हजार 10, शंकर पांडुरंग गायकवाड (अपक्ष) रु.64 हजार 511, सय्यद सुलतान लाडखाँ (अपक्ष) रु.29 हजार 257.
या तपासणीसाठी सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक, जिल्हा खर्च नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या तपासणी बैठकीस खर्च नियंत्रण कक्षाचे नोडल ऑफिसर श्री. शेखर शेटे, सहाय्यक नोडल ऑफिसर श्री किरण घोटकर, संपर्क अधिकारी श्री. सचिन कवठे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

वृत्त क्र.248                                           दि.24 एप्रिल 2019

15 व्या आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिंपिक वर्ल्ड समर गेममध्ये
सूवर्णपदक विजेत्या आकाशचा जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते सत्कार
उस्मानाबाद,दि.24- आबुधाबी येथे दि.14 ते 21 मार्च 2019 दरम्यान पार पडलेल्या 15 व्या आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिंपिक वर्ल्ड समर गेममध्ये भारतीय टीमने  368 पदके मिळवून पदकांच्या यादीत तिसरे स्थान मिळविले. यामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील कोळेवाडी गावातील कु. आकाश तुकाराम आकोसकर या दिव्यांग (गतिमंद व मूकबधीर) खेळाडूने टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात पुरूष एकेरी सुवर्ण व पुरूष दुहेरी गटात सुवर्ण पदक अशा दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
 या कामगिरीबाबत आकाशचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे,अशीच कौतुकाची थाप नुकतीच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनीही आकाशच्या पाठीवर दिली आहे. नुकताच जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते त्याचा पुष्पगुच्छ देवून विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ- मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अगदी कठीण परिस्थितीतून आकाशने हे सूवर्णपदक मिळविल्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन केले. यातच नीट ऐकताही येत नसलेल्या गतिमंद व मतिमंद आकाश आकोसकर ने मिळविलेली ही दोन सूवर्णपदके जिल्ह्यासाठी,राज्यासाठी आणि देशासाठीही निश्चितच गौरवास्पद असल्याचे सांगितले.
या स्पर्धेत एकूण 192 देशामधून भारतीय संघात 284 स्पर्धक व 71 प्रशिक्षक हजर होते. ग्रामीण भागातील कोळेवाडी गावाच्या आकाश आकोसकर या दिव्यांग खेळाडूने टेबल टेनिस खेळात भारताची मान उंचावण्याची विशेष अशी कामगिरी केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक)डॉ. प्रताप काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक,सहाय्यक क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे,क्रीडा मार्गदर्शक मोहमद शेख,योगेश थोरबोले,जावेद शेख उपस्थित होते .

*****

25 एप्रिल जागतिक हिवताप दिवस “ZERO MALARIA STARTS WITH ME” “हिवतापाला झिरो करू, माझ्यापासून सुरुवात करू”


 विशेष लेख                                                        दिनांक 24-4-2019

25 एप्रिल जागतिक हिवताप दिवस
 “ZERO MALARIA STARTS WITH ME”
हिवतापाला झिरो करू, माझ्यापासून सुरुवात करू

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकुनगुनिया, जे ई, चंडीपुरा,लेप्टोस्पायरासीस, काला आजार इत्यादी आजारांविषयी व त्यावरील उपचारांची जनजागृती याचा अंतर्भाव होतो. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना घोषवाक्य घोषित करते, या वर्षीचे घोषवाक्य “ZERO MALARIA STARTS WITH ME हिवतापाला झिरो करू, माझ्यापासून सुरुवात करू हे असून त्यानुसार हिवतापाचे निर्मूलन करण्यासाठी जनतेने स्वतःपासून सुरुवात करून आपल्या कुटुंबाचे, समाजाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख-
हिवतापाचा प्रसार करणाऱ्या आणि ॲनाफिलीस डासाचा शोध सर रोनॉल्ड रॉस यांनी 1897 यावर्षी लावला.हिवताप या आजाराचा प्रसार ॲनाफिलीस डासाची मादीमार्फत होतो. हिवताप प्लासमोडीयम हया परोपजीवी जंतूपासून होतो. हिवतापाच्या जंतूचे प्लासमोडीयम व्हायव्हॅक्स्‍ व प्लासमोडीयम फेल्सीफेरम हे दोन प्रकार आढळून येतात.
 हिवतापाचा प्रसार कसा होतो :-
v डास हिवताप रुग्णास चावतो, त्यावेळेस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासांच्या पोटात जातात तेथे वाढ होवून ते जंतू डासांच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात.
v मनुष्याच्या शरीरात हे जंतू लिव्हरमध्ये जातात, तेथे त्यांची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला थंडी वाजून ताप येतो.
हिवतापाची लक्षणे-:
Ø थंडी वाजून ताप येणे.
Ø ताप एक दिवसाआड किंवा सतत येवू शकतो.
Ø घाम येवून अंग गार पडते, ताप आल्यानंतर डोके दुखते, बऱ्याच वेळा उलट्याही होतात.
निदान तत्पर उपचार सत्वर”:-
हिवतापाचे निदान हे आरोग्य कर्मचारी/ आरोग्य सेविका व अप्रत्यक्ष सर्वेलन्स मध्ये रुग्णांचा रकत्‍  नमुना घेवून तपासणी करून करता येते. अशा रक्त नमुन्यामध्ये हिवतापाचे जंतू आढळून येतात. रोग निदान करण्याचे प्रामुख्याने दोन पद्धती आहेत, त्यामध्ये प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाद्वारे व तात्काळ निदान पद्धती(Rapid Dignodtic Test) द्वारे करण्यात येते.
 हा हिवताप नियंत्रण कार्यक्रमाचा पाया आहे. वेळेवर रक्त नमुना घेणे, वेळेवर जो नजीकच्या प्रयोगशाळेत तपासणी व वेळेवर समूळ उपचार देणे, हे व्यवस्थापन नियंत्रण कार्यक्रमाचे प्रमुख घटक आहेत. सर्व रुग्णांना वेळेवर समूळ उपचार दिल्यास हिवतापाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होवू शकेल.
ताप आलेल्या रुग्णांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सर्वेक्षण रक्त नमुना घेण्यात येतो.संशयित हिवताप रुग्णास वयोगटानुसार तीन दिवस क्लोरोक्वीन गोळयांचा औषधोपचार देण्यात येतो, हिवताप रुग्णास समूळ उपचार पुढीलप्रमाणे देण्यात येतात- रक्त तपासणीमध्ये दूषित रक्त्‍ आढळून आल्यास जंतूच्या प्रकारानुसार व रुग्णाच्या वयोगटानुसार रुग्णास चौदा दिवस प्रायमाक्वीन व तीन दिवस क्लोरोक्वीन उपचार दिले जातात. पी एफ रुग्णास एक दिवस प्रायमाक्वीन व तीन दिवस क्लोरोक्वीन च्या गोळ्यांचे उपचार दिले जातात.
 प्रतिबंधात्मक उपाययोजना-
·        रुग्णास ताप आल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये अथवा गृह भेटीदरम्यान येणाऱ्या आरोग्य कर्मचारीमार्फत रक्त नमुना घेऊन तात्काळ तपासणी करण्याकरिता प्रयोगशाळेत पाठवावा.
·        रुग्णाच्या रक्तनमुना तपासणीत हिवतापाचे जंतू आढळून आल्यास त्वरित संपूर्ण समूळ उपचार जंतूच्या प्रकारानुसार व रुग्णाच्या वयोगटानुसार घ्यावा.
·        मच्छरदाणी व रासायनिक क्वॉईलचा वापर करावा.
·        डासोत्पत्ती स्थानांमध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत.
·        साचलेले डबके वाहाते करावेत.
·        घरातील पाणीसाठा आठवड्यातून एक दिवस कोरडा करुन कोरडा दिवस पाळावा.
·        रिकामे न करता येणाऱ्या पाणीसाठ्यामध्ये आवश्यकतेनुसार अबेट चे द्रावण टाकावे.
·        पाईपला जाळी बसवावी. नाल्या, गटारी वाहते कराव्यात किंवा त्यावर ऑइल टाकावे.     
वरील सर्व माहिती समजून घेवून त्याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्यास भविष्यात निश्चितच कीटकजन्य आरोग्याचे होणारे उद्रेक टाळता येतील.
*****

‍मनोज शिवाजी सानप
                                                                              जिल्हा माहिती अधिकारी,
                                                                              उस्मानाबाद


Tuesday, 23 April 2019

40-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये झालेल्या मतदानाची अंदाजित टक्केवारी 63 टक्के


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 


       उस्मानाबाद,दि.18- 40-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये दि.18 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची  अंदाजित टक्केवारी 63 टक्के आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्यात्मक माहिती पुढीलप्रमाणे आहे.
239-औसा-एकूण मतदार 2 लाख 79 हजार 864 (पुरुष-1 लाख 49 हजार 071 व स्त्री-1 लाख 30 हजार 793)
--------------------------------------------------------------------------------------------------
240-उमरगा-एकूण मतदार 2 लाख 95 हजार 082 (पुरुष-1 लाख 56 हजार 773 व स्त्री-1 लाख 38 हजार 307)
--------------------------------------------------------------------------------------------------
241-तुळजापूर-एकूण मतदार 3 लाख 48 हजार 838 (पुरुष-1 लाख 86 हजार 383 व स्त्री-1 लाख 62 हजार 447)
--------------------------------------------------------------------------------------------------
242-उस्मानाबाद- एकूण मतदार 3 लाख 49 हजार 365 (पुरुष-1 लाख 85 हजार 216 व स्त्री-1 लाख 64 हजार 140)
--------------------------------------------------------------------------------------------------
243-परंडा- एकूण मतदार 3 लाख 11 हजार 933 (पुरुष-1 लाख 66 हजार 182 व स्त्री-1 लाख 45 हजार 750)
--------------------------------------------------------------------------------------------------
246-बार्शी- एकूण मतदार 3 लाख 01 हजार 156 (पुरुष-1 लाख 57 हजार 273, व स्त्री-1 लाख 43 हजार 878)
40- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांची  संख्या एकूण 18 लाख 86 हजार 238 (पुरुष-10 लाख 00 हजार 898 व स्त्री-8 लाख 85 हजार 315) अशी असून जिल्हयाभरात झालेल्या मतदानाची आजची अंदाजित टक्केवारी 63 टक्के इतकी आहे.
अशा प्रकारे जिल्हयातील 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व 2 हजार 127 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळितपणे व शांततेने पार पडली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली आहे.ही संपूर्ण मतदान प्रक्रिया सुव्यस्थितपणे पार पाडल्याबददल सर्व शासकीय यंत्रणा, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, तसेच नागरिकांचेही जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी विशेष आभार मानले आहे.
****