Friday, 9 October 2026
*सेवा संकल्पाचा जागर ; सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य,पर्यावरण संवर्धनाचा संदेश* जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दाखवला हिरवा झेंडा
*सेवा संकल्पाचा जागर ; सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य,पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दाखवला हिरवा झेंडा
धाराशिव,दि.८ ऑक्टोबर (जिमाका) नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ,पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध करून देण्याचा संदेश देतानाच आरोग्यदायी जीवनशैली,पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी धाराशिव शहरात सेवा संकल्प अभियानांतर्गत सायकल व ई-बाईक रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले.जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय,बसवेश्वर चौक ते बार्शी रोड मार्गे निघून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे रॅलीचा समारोप झाला.विविध शाळांमधील सुमारे ४०० विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सेवा,आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
जिल्हा प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७.३० वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले.सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करणे, शासकीय सेवांविषयी जनजागृती करणे तसेच युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमामागील व्यापक उद्देश होता.
रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार,निवासी उपजिल्हाधिकारी श्री.विद्याचरण कडवकर,जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे,श्रीपतराव भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नावरे,शाळेतील सर्व क्रीडा शिक्षक,आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू अश्विनी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे,नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये अनावश्यक फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या प्रश्नांची संवेदनशीलतेने दखल घेतली जावी,ही लोकाभिमुख प्रशासनाची खरी ओळख आहे.सेवा संकल्प अभियान याच भावनेला बळ देणारे आहे.प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे,सेवा वितरणात गतिमानता आणणे आणि शासनाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणे,या बाबींना अभियानाच्या माध्यमातून महत्त्व देण्यात येत आहे.
*चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग ; नव्या पिढीकडून सामाजिक बांधिलकीचा संदेश*
या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्ह्यातील विविध शाळांमधील जवळपास ४०० विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग होता.विद्यार्थ्यांचा उत्साह, युवकांची ऊर्जा आणि उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सहभाग यामुळे रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला.
शालेय जीवनातच आरोग्य,पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत.त्यामुळे अशा उपक्रमांतून त्यांना केवळ सायकल चालविण्याचा आनंद मिळत नाही,तर सार्वजनिक हितासाठी एकत्र येण्याची प्रेरणाही मिळते.
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि निरोगी समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा छोटासा प्रयत्नही महत्त्वाचा असतो. सायकलचा वापर,पर्यावरणपूरक वाहतुकीला प्राधान्य आणि शासकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग या बाबींचे महत्त्व या रॅलीच्या निमित्ताने दिसून आले.
या अभियानांतर्गत आयोजित सायकल व ई-बाईक रॅलीने शासकीय सेवा,सामाजिक सहभाग आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणला.नागरिकांना सेवा देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकी आहे,हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या सायकल व ई-बाईक रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे,अक्षय बिरादार,क्रीडा मार्गदर्शक शुभांगी रोकडे,विश्वास खंदारे,डिंपल ठाकरे,जान्हवी पेठे,संपदा मोरे,किशोर भोकरे आणि सुरेश कळमकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सेवेचा संकल्प,आरोग्याचा जागर आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार या तिन्ही बाबींचा संदेश देणारी ही रॅली विद्यार्थी व युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे लक्षवेधी ठरली.प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्र येऊन समाजहितासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित झाले.
००००००००००००
Thursday, 8 October 2026
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात जिल्हा राज्यात अव्वल *७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे व २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे राष्ट्रीय स्तरावरील पथकाकडून यशस्वी मूल्यांकन*
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात जिल्हा राज्यात अव्वल
*७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे व २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे राष्ट्रीय स्तरावरील पथकाकडून यशस्वी मूल्यांकन*
धाराशिव, दि.८ ऑक्टोबर (जिमाका) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.राष्ट्रीय गुणवता आश्वासन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून जिल्ह्यातील एकूण ७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे आणि २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे,अशा एकूण १०१ आरोग्य संस्थांचे राज्य स्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पथकाद्वारे मूल्यांकन होऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत.
जिल्हाधिकारी किर्ती कीरण पूजार व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने आरोग्य विभागाने हि महत्वाची व मोलाची कामगिरी केली आहे, अशी कामगिरी करणारा धाराशिव हा राज्यात एकमेव जिल्हा आहे. या कामगिरीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांचे योग्य नियोजन व त्यासाठीचा पाठपुरावा आहे.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे,रुग्णांना सुरक्षित व प्रभावी आरोग्य सेवा मिळवून देणे, तसेच आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ,औषधसाठा, उपकरणे, स्वच्छता,संसर्ग प्रतिबंध व विविध आजारावर नियंत्रण आणून रुग्णाभिमुख सेवा यांची गुणवत्ता सुनिश्चित करणे हा आहे.
या कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थांची विविध निकषांच्या आधारे काटेकोर तपासणी व मूल्यांकन करण्यात येते.यामध्ये जिल्हा स्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय पातळीवरील अधिकारी यांच्या मार्फत तपासणी केली जाते तपासणी सूचीनुसार आरोग्य संस्थेतील पायाभूत सुविधा,उपलब्ध मनुष्यबळ, औषधे व वैद्यकीय साहित्य, प्रयोगशाळा सेवा,रुग्णसेवा, स्वच्छता व जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण,रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण, नोंदवही व अभिलेख व्यवस्थापन तसेच आरोग्य सेवांची एकूण गुणवत्ता आदी बाबींची पाहणी केली जाते.
जिल्ह्यातील संबंधित आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी राष्ट्रीय गुणवता आश्वासन कार्यक्रमाच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.आरोग्य संस्थांमधील सेवा-सुविधांमध्ये सुधारणा करण्यासोबतच आवश्यक कागदपत्रे व नोंदी अद्ययावत करणे,स्वच्छता व परिसर व्यवस्थापन,औषधे व उपकरणांची उपलब्धता,रुग्णांच्या समाधानावर आधारित सेवा आणि विविध आरोग्यविषयक सेवांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणून राष्ट्रीयस्तरावरील पथकाने संबंधित आरोग्य संस्थांचे मूल्यांकन केले.मूल्यांकनामध्ये निर्धारित गुणवत्ता निकषांची पूर्तता केल्याचे आढळून आल्याने ७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे व २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत.
राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने आरोग्य संस्थांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र मिळणे ही धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य विभागासाठी निश्चितच अभिमानाची आणि उल्लेखनीय बाब आहे.या यशामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होत आहे.
या यशामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,डॉ. कुलदीप मिटकरी,डॉ.विनयशील कुलकर्णी,डॉ.मारुती कोरे,
डॉ.सुशील चव्हाण,डॉ.पंकज शिनगारे,जीवन कुलकर्णी, किशोर गवळी,किशोर तांदळे तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी संबंधित आरोग्य संस्थांचे वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी,परिचारिका, प्रयोगशाळा कर्मचारी,आशा स्वयंसेविका तसेच इतर सर्व अधिकारी-कर्मचायांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
आरोग्य विभागाच्या विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाले आहे.राष्ट्रीय स्तरावरील मिळालेले प्रमाणपत्र व त्या सोबतच आरोग्य संस्थांना बक्षिसापोटी मिळणारा निधी यामुळे संबंधित आरोग्य संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यास मदत होईल तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आरोग्य संस्थांचे अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी अधिक झाली असून भविष्यातही या गुणवत्तेचा सातत्याने दर्जा राखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांना वेळेवर, सुलभ,सुरक्षित आणि रुग्णाभिमुख आरोग्य सेवा देणे हा आरोग्य विभागाचा केंद्रबिंदू राहणार आहे.
जिल्ह्यातील १०१ आरोग्य संस्थांना मिळालेले राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र हे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तावाढीचे द्योतक असून,गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत' पोहोचविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
00000000
*जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचे वाढते प्रमाण : नागरिकांनी काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन*
*जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचे वाढते प्रमाण : नागरिकांनी काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन*
धाराशिव,दि.८ ऑक्टोबर (जिमाका) जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.डासांची उत्पत्ती रोखणे,घरात डासांचा प्रवेश टाळणे आणि ताप आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे,या उपाययोजनांमुळे कीटकजन्य आजारांपासून बचाव करता येऊ शकतो.
पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण होते.घरातील पाण्याची भांडी,ड्रम,टाक्या तसेच परिसरातील पाणी साठे याकडे नागरिकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.पाणी वाहते करावे. गटारे नाल्या स्वच्छ कराव्यात, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात डास उत्पती होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास,अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनयशिल कुलकर्णी यांनी केले आहे.
*खिडक्यांना जाळ्या बसवा* डासांचा घरामध्ये प्रवेश होऊ नये यासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.दरवाजे व खिडक्या शक्यतो बंद ठेवून घरात डासांचा वावर कमी करण्याची काळजी घ्यावी.
*झोपताना मच्छरदाणीचा वापर करा*
रात्री झोपताना मच्छरदाणीचा नियमित वापर करावा.विशेषतः लहान मुले,वृद्ध आणि आजारी व्यक्तींना डासांपासून संरक्षण मिळेल याची दक्षता घ्यावी.
*आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा*
आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा.या दिवशी घरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी,ड्रम व टाक्या रिकाम्या करून आतून घासून स्वच्छ कराव्यात.घराच्या परिसरात कुठेही पाणी साचले असल्यास ते तातडीने काढून टाकावे.
*सेप्टिक टँकच्या पाईपला जाळी लावा*
सेप्टिक टँकच्या पाईपला योग्य प्रकारे जाळी बसवावी.या माध्यमातून डासांची उत्पत्ती होणार नाही,याची दक्षता घ्यावी. घराभोवती अनावश्यक पाणी साचणार नाही,याचीही काळजी घ्यावी.
*कोणताही ताप अंगावर काढू नका*
ताप,अंगदुखी,डोकेदुखी,थंडी वाजणे,अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.कोणताही ताप अंगावर काढू नका.वेळेत तपासणी व उपचार घेण्यासाठी जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा.
*स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका*
ताप आल्यास स्वतःच्या मनाने औषधोपचार करू नयेत.तसेच केवळ औषध दुकानातून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.तापाचे नेमके कारण समजून घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासणी व उपचार करून घ्यावेत.
*नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा*
कीटकजन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाच्या उपाययोजनांसोबत नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे.प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरात व परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही,यासाठी नियमित पाहणी करावी.पाणी साठविण्याची भांडी झाकून ठेवावीत आणि अनावश्यक पाणी साठे नष्ट करावेत.डासांची उत्पत्ती रोखा,कीटकजन्य आजार टाळा आणि निरोगी धाराशिवसाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
0000000
Subscribe to:
Posts (Atom)


