Saturday, 22 July 2017

जिल्हयातील सर्व बँकामध्ये किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर वर 31 जुलै पर्यंत पिक विमा भरावा- जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


उस्मानाबाद, दि.22 :-  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 साठी पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतीम मुदत 31 जुलै 2017 असून बँका व्यतिरिक्त कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) केंद्रावर विमा भरता येणार असल्याची माहिती पिक कर्जासाठीच्या आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली.
            छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा व प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 साठी पिक विम्याचा हप्ता भरण्यासाठी मदत व्हावी याकरीता जिल्हयातील विविध भागात जवळपास 643 कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) असून त्यांची माहिती सर्व बँकामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी आपल्या भागातील कॉमन सर्व्हिस सेंटर  (CSC) मध्ये आधार कार्ड, सात-बारा, पिक-पेरा प्रमाणपत्र व बँक पासबुक हे कागदपत्र घेऊन ऑनलाईन पध्दतीने पिक विमा हप्ता भरावा व छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी  जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले.  
            या कार्यशाळेत महाऑनलाईनचे जिल्हा व्यवस्थापक संतोष गायकवाड यांनी उपस्थित सर्व कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) धारकांना शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेसाठी पात्र व अपात्र लाभार्थी यांच्या माहितीसह त्याबाबतचे फॉर्म ऑनलाईन कसे भरावयाचे आणि पिक विम्याचा हप्ता कशा पध्दतीने भरुन घ्यावयाचा याबाबतची माहिती उपस्थित सेंटरधारकांना कॉमन सर्व्हिस सेंटरचे प्रतिनिधी हेमंत मोटे, लक्ष्मीकांत कांबळे, वैभव मस्के यांनी दिली.
            यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हयातील कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) धारक उपस्थित होते. 

Friday, 21 July 2017

आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख घटक

लेख                                                                            दिनांक.21-07-2017                                                  
कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती, अपघात यासारख्या घटनांना आपण सामोरे जात असतो.  काही संकटांची आगावू चाहूल लागते तर काही संकटे अचानक येऊन मनुष्य जीवन उध्वस्त करुन जातात आणि आपत्ती कोणतीही असो त्यामुळे जीवित व वित्तहानी होतेच. आपत्ती काळात स्वत:चा, कुटुंबाचा, समाजाचा व गावचा बचाव करायचा असेल तर योग्य ती पूर्वतयारी, मानसिकता तयार करणे आवश्‍यक आहे.यासाठी आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख घटकांची माहिती या लेखाद्वारे जाणून घेवू या.
           
आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रतिबंध, विमोचन, सज्जता, आपत्तीचा आघात, प्रतिसाद, पूर्ववत्तता व पुनरुत्थापन अशा प्रमुख घटकांमध्ये दर्शविली आहेत.  प्रतिबंध या घटकातील सर्व कृती ह्या आपत्ती टाळण्याच्या दिशेने आखल्या जातात.  तसेच आपत्ती घडल्यास त्याचे परिणाम कमीत कमी कसे होतील या दिशेनेही नियोजन केले जाते.  विमोचन या विभागातील सर्व कृती अशा तऱ्हेने आखलेल्या असतात, की येऊन गेलेल्या आपत्तीचा कमीत कमी परिणाम देशावर व लोकांवर होईल.  सज्जता या मध्ये आखणी केली जाते की, कोणत्याही आपत्तीला त्वरीत व प्रभावी प्रतिसाद द्यायला शासन / प्रशासन, जनता व व्यक्ती तयार होतील.  आपत्तीचा आघात या चक्रातील टप्प्याचे नावच सर्व गोष्टींचा खुलासा करते.ज्या वेळेस आपत्ती कोसळते ती वेळ म्हणजेच आपत्तीचा आघात आपत्तीव्यवस्थापन चक्रातील या टप्प्याचे अस्तित्वच या गोष्टीची सतत आठवण करुन देणे की आघाताची तीव्रता प्रत्येक आपत्तीमध्ये वेगवेगळी असते व ती त्या आपत्तीच्या तीव्रतेच्या सापेक्षच असते. या टप्प्यावरच बाकीचे सर्व व्यवस्थापन अवलंबून असते.

            आघाताला प्रतिसाद द्या, आघात होण्यापूर्वी व झाल्यानंतर तात्काळ द्यावाच लागतो. फक्त मांडणीच्या सोयीसाठी या क्रमात तो आपत्तीच्या आघाताच्या टप्प्यानंतर लगेचच ठेवलेला आहे.  कारण हीच वेळ अशी असते की, झाडून साऱ्या प्रतिसाद यंत्रणा कामाला लागतात.  या टप्प्याला आपत्कालीन प्रतिसाद असेही म्हणतात.  हा टप्पा हेच दर्शवतो की, आपत्तीचे विमोचन आणि निवारण लवकरात लवकर होण्याकरिता आपत्कालीन उपाय, निवास अथवा पुनर्वसनाकरता अवलंबले जातात.  आपत्तीच्या तीव्रतेवरती प्रतिसाद अवलंबून असतो,  म्हणजेच तीव्रता अधिक असेल तर वेळप्रसंगी शासन आणीबाणी किंवा युद्धसदृश्य परिस्थिती म्हणून जाहीर करते व युद्धपातळीवर प्रतिसादात्मक उपायाचे आयोजन केले जाते.
           
पूर्ववत्तता या चक्रामध्ये आघातानंतर त्याच्या तीवृतेनुसार जनजीवन विस्कळीत होते.  काही प्रसंगात गावच्या गावे किंवा संपूर्ण शहरे उध्वस्त होतात.  अशा वेळेस जनजीवन पूर्ववत होण्यास म्हण्जेच आपत्तीपूर्व जसे होते तसे होण्यास जो काळ लागतो व पुनरुत्थापन हा टप्पा आपत्कालीन उपाययोजना आणि राष्ट्रीय प्रसंगी यांच्यातील महत्वाचा दुवा आहे.या टप्प्याने प्रयोजनास या चक्रामध्ये याच हेतूने करण्यात आलेले आहे, की आपत्तीच्या आघाताच्या राष्ट्राच्या हितासाठीच उपयोग व्हावा,जसे की, राष्ट्रीय योजनांची आखणी करतानाच आपत्तीचा व त्यातून उद्भवलेल्या बदलाचा राष्ट्रहितासाठी उपयोग करणे सुलभ व्हावे.

            सुयोग्य आपत्कालीन नियोजनाच्या आखणीमध्ये पर्यायाला पर्याय ठेवणे हे जागतिक स्तरावर मान्यता पावलेले तत्व आहे.  ज्या देशांच्या आपत्ती नियोजनाची आखणी केलेली नव्हती, अशा देशांना आपत्तीच्या आघाताची तीव्रता सर्वाधिक जाणवली, तर तिथे यासाठी सुनियोजित आखणी झालेली होती.अशा देशांना आपत्तीची तीवृता कमीतकमी जाणवली.यावरुनच आपत्ती निवारणाच्या नियोजनाच्या आखणीचे महत्व आपल्या लक्षात येते.  भविष्यकालीन आपत्तीचा वेध व त्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांचे आयोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यायी आयोजनातील आखणीतील सुसूत्रता होय.
            आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रथमोपचाराचा महत्व देवून जीवन वाचविणे, जखमी मनुष्याची स्थिती अधिक खालावण्यापासून रोखणे व स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करुन  दुखापतीपासून आराम देणे व प्रत्यक्ष वैद्यकीय मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचा प्रयत्न करणे. अशा वेळी कोणतीही व्यक्ती ज्याने अधिकृत प्रथमोपचार प्रशिक्षण केंद्राकडून प्रशिक्षण घेतले आहे असे प्रथमोपचार तज्ञाने वेगात पण शांत डोक्याने अचूकपणे आपले काम केले पाहिजे.

            प्रथमोपचार तज्ञाची निरीक्षणशक्ती चांगली असावी, स्वत:चा जीव धोक्यात न घालता परिस्थितीचे निरीक्षण करुन निर्णय घ्यायची क्षमता असावी.  आत्मविश्वासाने तणावाखाली काम करताना सुद्धा तो शांत राहू शकणारा असावा.  त्याच्याकडे नेतृत्वगुण असावे. गर्दी नियंत्रित करणे, लोकांना सूचना देणे व बघ्याकडून मदत मिळविणे अवगत व्हावे.  त्याला त्याच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव असावा.  जखमी / रुग्णाच्या स्थितीवरुन त्याला त्याचा आजार ओळखता आला पाहिजे वा त्यानुसार वेळेत प्रथमोपचार केला पाहिजे.  त्यांच्याकडे उत्तम निर्णयशक्ती असावी. लोकांशी बोलण्याची कला चांगली अवगत पाहिजे.  जखमीला, त्यांच्या काळजीत पडलेल्या नातेवाईकांना शांत करुन त्यांच्यात विश्वास जागृत करता आला पाहिजे.  जरुरी पेक्षा जास्त आत्मविश्वास न दाखविता काम करावे, स्वत:च्या मर्यादा कळल्या पाहिजेत, गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांना फाजील दिलासा देणे टाळता आले पाहिजे व आपले कौशल्य दाखवून प्रथमोपचारामध्ये नियमितपणे अचूक प्रथमोपचार पद्धती वापरता आली पाहिजे तरच आपत्कालीन नियोजनाची फलश्रुती मिळेल.

                                                                              मनोज शिवाजी सापन                                                                                                                                                  
                                                                                                                      जिल्हा माहिती अधिकारी,

                                                                                                                          उस्मानाबाद 

Thursday, 20 July 2017

अतिसार नियंत्रण पंधरवाडा प्रभावीपणे राबवावा - जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


उस्मानाबाद,दि.20:- जिल्हयातील 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना ओ.आर.एस. व झिंक गोळया देण्यात याव्यात, त्यामध्ये  विटभट्टी कामगार, झोपडपट्टया, बांधकामाची ठिकाणे व बाहेरच्या जिल्हयातून आलेल्या फिरस्ती पाली यावर विशेष लक्ष केंद्रीत करुन अतिसार नियंत्रण पंधरवाडा प्रभावीपणे राबवावा,अशा सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केल्या.
            अतिसार नियंत्रण पंधरवाडा 01 ऑगस्ट 2017 ते दि. 13 ऑगस्ट 2017 या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.यावेळी ते बोलत होते.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे, आय.एम.ए. संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजगुरु, आय.पी.ए. संघटनेचे अध्यक्ष डॉ. घोगरे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.आर. पांचाळ व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            देशात अर्भक मृत्यूदर व बालमृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 10 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि हया बालमृत्यूंचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते. यामुळे जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या दि.01 ऑगस्ट 2017 ते दि. 13 ऑगस्ट 2017 या कालावधीमधील विशेष अतिसार पंधरवाडात विटभट्टी कामगार, झोपडपट्टया, बांधकामाची ठिकाणे,ग्रामीण भागातील वाडी, वस्तीवरील सर्व ठिकानावर लक्ष केंद्रीत करुन0 ते 5 वर्षाखालील बालकांना ओ.आर.एस. व झिंक गोळया देण्यात याव्यात, असे निर्देश ही जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी दिले.    

            या मोहिमेंतर्गत जिल्हयामध्ये 0 ते 5 वर्षाखालील ग्रामीण भागात 1 लाख 31 हजार 353 व शहरी भागात 46 हजार 139 अशी एकूण 1 लाख 77 हजार 492 बालके आहेत. मोहीम यशस्वी करण्यासाठी 1 हजार 198 आशा स्वयंसेविका, 482 आरोग्य कर्मचारी, 232 आरोग्य पर्यवेक्षक, 1 हजार 890 अंगणवाडी कार्यकर्ती व 1 हजार 765 अंगणवाडी मदतनीस असे एकूण 5 हजार 567 मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक तालुक्यासाठी जिल्हास्तरीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. 0 ते 5 वर्षाखालील बालकांना ओ.आर.एस. व झिंक गोळया सर्व स्तरावर देण्यात येणार असून या मध्ये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, नगरपालीका रुग्णालय या ठिकाणी सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे व या कालावधीत सर्व शाळा व अंगणवाडयांमध्ये हात धुण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी यावेळी  बैठकीत दिली.

“आम्ही झालो लोकराज्य विद्यालय” राज्यातील या वर्षीचे पहिले “लोकराज्य विद्यालय” भाटशिरपूरा चे कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय



उस्मानाबाद,दि.20:- राज्य शासनाच्या लोकराज्य मासिकातील माहितीचा ग्रामीण भागातील जनतेला व विद्यार्थ्यांना लाभ व्हावा  यासाठी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आम्ही झालो लोकराज्य विद्यालय या  उपक्रमास प्रतिसाद देत भाटशिरपुरा येथील कै भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय या विद्यालयने राज्यातील या वर्षीचे पहिले लोकराज्य माध्यमिक विद्यालय होण्याचा बहुमान पटकाविलाआहे.
       या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, संस्थेचे अध्यक्ष बाबुराव जाधव, सचिव बाळासाहेब धस, संचालक उद्धवराव गपाट, कु.भाग्यश्री गपाट, मुख्याद्यापक श्री.एस.एन.टेकाळे उपस्थित होते.
                         विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप म्हणाले की,  लोकराज्य या मासिकामधील शासकीय लेखांविषयीच्या माहितीचा  विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षांसाठी निश्चित उपयोग होणार आहे. शालेय जीवनापासूनच  विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे.त्यामुळे लोकराज्यचे नियमित वाचन करण्याबाबत  श्री. सानप यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. या आवाहनास संस्थेचे अध्यक्ष बाबुराव जाधव व शिक्षक सहकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून आश्वासन दिले की, यापुढे  इयत्ता 8 ते 10 वी च्या प्रत्येक वर्गात‍ दररोज शाळेची प्रार्थना संपल्याबरोबर लोकराज्य मासिकातील एका लेखाचे नियमित वाचन केले जाईल.
 यावेळी कु.भाग्यश्री गपाट म्हणाल्या की , आपल्या जीवनात काय बनायचे आहे ते आताच ठरवावे व त्या दिशेने वाटचाल करावी. वाचन मोठया प्रमाणत असावे. क्रमिक पुस्तकांसोबत अवांतर वाचनही करावे यामुळे कल्पनाशक्तीचा विकास होऊन ज्ञान प्राप्ती मोठया प्रमाणावर होते. स्वच्छतेचा मंत्र नेहमी जपा त्यातून आपण निरोगी राहणार आहोत. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत स्वच्छता पाळावी, हे केल्याने आपण निरोगी राहतो,असेही त्या  म्हणाल्या.
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बाबुराव जाधव. शेवटी आभार सचिव बाळासाहेब धस  यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व संस्थेचे इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

Tuesday, 18 July 2017

जिल्हयात क्षयरुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ


उस्मानाबाद दि.18: - प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ दि.17 जुलै 2017  रोजी  जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नेताजी पाटील, जि.प. उपाघ्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.आनंद रायते यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद तालुक्यातील भगतसिंग तांडा या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हणुमंत वडगावे यांच्या हस्ते सर रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आला.
                                   यावेळी नगरसेवक शिवाजीराव गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या भराटे, डॉ. अनुराधा लोखंडे, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. दिपक पंडीत तसेच जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे  सर्व कर्मचारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामस्थ  उपस्थित होते.
                                  या प्रसंगी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी  दि. 17 ते 31 जुलै 2017 या कालावधीत समाजातील दुर्गम भागातील वंचित व जोखमी भागापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती या घरोघर भेट देऊन क्षयरुग्ण शोधण्याचे काम करणार आहेत. या मोहिमेस जनतेने सहकार्य करुन या क्षयरुग्ण शोध मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे सांगितले. 
            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी क्षयरोग ही गंभीर समस्या असून जनतेने या मोहिमेच्या माध्यमातून आपली तपासणी करुन घेवून लवकरात लवकर निदान करुन उपचार घ्यावे, याबाबत मार्गदर्शन केले. नगरसेवक शिवाजीराव गवळी यांनी जनतेने या क्षयरुग्ण शोध मोहिमेचा लाभ करुन घ्यावा आव्हान केले व दुर्गम भागातून या मोहिमेचा शुभारंभ केल्याबद्दल आरोग्य विभागाचे आभार व्यक्त केले. शेवटी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एस. फुलारी यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेने इतिहास घडविला


            उस्मानाबाद.दि.18:- जिल्हयात स्वच्छ भारत मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  जिल्हा परिषदेने सोमवार दि.17 जुलै 2017 रोजी  एका दिवसात  सकाळी 6.00 ते रात्री 12.00 या 12 तासात  10 हजार शौचलय बांधकाम करण्यासाठी खड्डे खोदण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. रात्री 12 वाजता ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त  776  जास्त खड्ड्याचे काम पूर्ण करुन उच्चांक गाठला आहे.
            यापूर्वी तेलंगणा राज्यात 8 हजार खड्डे खोदण्याचा विक्रम केला होता. उस्मानाबाद जिल्ह्याने तो मोडून काढत नवा विक्रम प्रस्थापित केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंद रायते यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक कामगिरी केली. यामध्ये वाशी तालुक्यात  एक हजार 50, भूम एक हजार 523, परंडा एक हजार 537, कळंब एक हजार 523, तुळजापूर एक हजार 801, उस्मानाबाद एक हजार 629, उमरगा एक हजार 738 असे एकूण 10 हजार 776 खड्डे खोदण्याचा विक्रम केला आहे.
यासाठी  जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते , गटविकास अधिकारी, सर्व खातेप्रमुख, तालुका समन्वयक, समूह समन्वयक, गाव स्तरावर काम करणारे सरपंच, ग्रामसेवक आणि गावातील इतर सर्व कर्मचारी यांचे यासाठी महत्वाचे सहकार्य लाभले.

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 ची प्रभावी अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे

                                 

                                           
उस्मानाबाद,दि.18:- महिलांना कामाच्या ठिकाणी सन्मान आणि सुरक्षित वातावरण मिळावं, यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 ची प्रभावी अंमलबजावणी करुन प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी, मात्र महिलांनी ही या कायद्याचा दुरुपयोग करु नये, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
                                 कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह,सामाजिक न्याय भवन येथे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक सावंत,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) श्री.बी.एस. निपाणीकर, ॲड.व्ही.पी.डोके आदीसह  सर्व विभागाचे विभाग प्रमुख व महिला अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित  होत्या.
                                 स्वातंत्र्यानंतर शिक्षण व इतर गोष्टींचा प्रचार झाला मात्र समाजात ज्याप्रमाणे महिलांच्या बाबतीत जागृती झाली पाहिजे ती झाली नाही, त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात महिला घरांच्या बाहेर पडतात तेंव्हा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 नुसार प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी, यामुळे कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक छळविरोधी कायद्यामुळे महिलांना लैंगिक शोषणारिुध्द लढा लढण्याससाठी कायदेशीर पाठबळ मिळेल, तालुकास्तरावर सर्व ठिकाणी समित्या स्थापन होतील व कार्यरत होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी  जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी केल्या.
                                 ॲड.डोके यांनी यावेळी जिथे दहा पेक्षा जास्त कर्मचारी असतील तिथे अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य आहे व जिथे दहा पेक्षा कमी कर्मचारी आहेत अशा कामाच्या ठिकाणी स्थानिक तक्रार निवारण समिती जिल्हाधिकारी स्थापन करतील,समितीमध्ये किमान 50 टक्के सदस्य महिला असल्या पाहिजेत,तक्रारदार महिलेने दिलेली तक्रार खोटी आढळून आल्यास तक्रारदार महिलेविरुध्द व साक्षीदार विरुध्द कडक कारवाई करण्यात येते, असे सांगितले.
                                 यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.सावंत यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जिल्हयात 251 कार्यालयापैकी 188 तर जिल्हास्तरावर 202 कार्यालयापैकी 85 कार्यालयात तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. रोजंदारीवरील मजूर,अंगणवाडी कार्यकर्ती यांच्यासाठी ग्रामस्तरावर समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
             महिला व बाल विकास विभागाचे श्री. शेळके यांनी ही यावेळी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निपाणीकर यांनी मानले.

Monday, 17 July 2017

आपत्ती व्यवस्थापन व पूरपरिस्थिती संघ प्रशिक्षण हातलाई येथे संपन्न



जिल्हयातील आठही तालुक्यात घेणार प्रशिक्षण
उस्मानाबाद,दि.17:- संभाव्य आपत्ती व्यवस्थापन पूरपरिस्थितीत गावकऱ्यांची सुटका कशी करायची, एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असेल तर त्या व्यक्तीला कसे वाचवायचे, याबाबतचे प्रशिक्षण दि. 14 जुलै ते दि. 28 जुलै 2017 या कालावधीत हातलाई डोंगर परिसरात सुरु आहे.
            जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्याकडून हे प्रशिक्षण  देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तलोरे, प्रशिक्षक योगेश परदेशी यांनी संपूर्ण नियोजन केले आहे.
            या प्रशिक्षण कार्यक्रमात पोलीस, होमगार्डस, अग्निशमण दल, आरोग्य हे विभागही सहभागी झाले असून विशेष म्हणजे संपूर्ण जिल्हयात आठही तालुक्यात प्रत्येकी 4 दिवस असे एकूण 32 दिवस एक पथकात किमान 25 व्यक्ती असे सर्वांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. यामध्ये पहिला दिवस पाठयक्रम अभ्यासवर्ग व उर्वरीत 3 दिवस प्रात्यक्षिक असे प्रशिक्षणाचे स्वरुप आहे. अशा रितीने आयोजित केलेले राज्यातील हे पहिलेच प्रशिक्षण आहे.
            या प्रशिक्षणात मुख्यत: पाण्याचा प्रवाह वेगात असताना व ज्या ठिकाणी बोट चालविणे अशक्य आहे अशा वेळी दोरीच्या सहाय्याने एखाद्या बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव कसा वाचवायचा, ओबीएम बोटीचा वापर कसा करायचा, जीवरक्षक साधनांचा वापर कसा करायचा, प्रथमोपचार पध्दतीचा कशा प्रकारे उपयोग करायचा या कौशल्यावर विशेष मेहनत घेण्यात येत आहे.
            या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, मुख्य प्रशिक्षक योगेश परदेशी, दिनकर कांबळे तसेच आरोग्य विभागाच्या अधिसेविका सरस्वती थोरात, परिसेविका नलिनी दलभंजन, सुलभा भट, दिपाली सेलमोकर, प्रसाद गायकवाड तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, सोलापूर या संस्थेचे प्रशिक्षक व स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली आहे. 

अपंग कल्याण राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करावेत


उस्मानाबाद,दि.17:- अपंग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाने सन 2017 च्या पुरस्कारासाठी पुढील नमूद करण्यात आलेल्या व्यक्ती, संस्था व उद्योजकाकडून अर्ज दि. 21 जुलै 2017 पर्यंत सादर करावेत असे जिल्हा परिषद, समाजकल्याण अधिकारी श्री. एस.के. मिनगिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 
            सन 2017 च्या पुरस्कारासाठी पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलेल्या व्यक्ती, संस्था व उद्योजक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  1) सर्वोत्कृष्ट अपंग कर्मचारी/स्वयंउद्योजक 2) उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी किंवा संस्था 3) अपंग व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट संस्था 4) प्रतिथयश व्यक्ती 5) अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने केलेले उत्कृष्ट संशोधन/उत्पादन/निर्मिती 6) अपंगत्व व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहित वातावरण निर्मिती करणारे कार्यालय/संस्था 7) अपंग व्यक्तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा 8) राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्य संस्था 9) उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रौढ अपंग व्यक्ती 10) उत्कृष्ट कार्य करणारे अपंग बालक 11) उत्कृष्ट ब्रेल छापखाना 12) उत्कृष्ट सहज साध्य संकेतस्थळ 13) अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहित करणारे उत्कृष्ट राज्य 14) क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य कराणारी अपंग व्यक्ती.
            या पुरस्काराकरिता पात्र अपंग व्यक्ती/संस्था/ अपंगांचे नियुक्तक यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. पुरस्काराकरिता करावयाच्या अर्जाचे नमुने www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटवर व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचे कार्यालयात दि. 20 जुलै 2017 पर्यंत उपलब्ध आहेत. विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज 3 प्रतीत भरुन योग्य त्या कागदपत्रांसह जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे दि. 21 जुलै 2017 पर्यंत सादर करावे,असे श्री. मिनगिरे यांनी कळविले आहे.