Thursday, 5 March 2026
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १’
विशेष लेख
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १’
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,गतिमान व पारदर्शक करण्याची प्रभावी मोहीम महसूल विभागाच्या सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात,ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता,शेतकरी,विद्यार्थी व महिलांचे दैनंदिन महसूलविषयक प्रश्न सत्वर निकाली निघावेत आणि प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख व्हावे,या उद्देशाने राज्य शासनाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा १)” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेले हे अभियान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तालुका व मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद/नगर पंचायतस्तरावर राबविण्यात येणार आहे.
अभियानाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे
मागील काही वर्षांत महसूल विभागामार्फत अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी आवश्यक नसणे,सनद प्रणाली संपुष्टात आणणे,एकवेळचे अधिमूल्य भरण्याची नवी सुलभ तरतूद,तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा,अभिलेख अद्ययावतीकरण आणि डिजिटल ७/१२ ला कायदेशीर वैधता देणे यांसारख्या निर्णयांमुळे प्रशासन सुलभ झाले आहे.या सुधारणांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती आणि तीव्र प्रसार मोहीम राबविणे आवश्यक असल्याने हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
कालावधी आणि शिबिरांचे वेळापत्रक
माहे मार्च ते माहे मे २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.दि. १८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत मंडळ स्तरावर पूर्वतयारी केली जाणार आहे.७ व १४ मार्च २०२६ रोजी मार्च महिन्यातील शिबिरे,१० व १७ एप्रिल २०२६ रोजी एप्रिल महिन्यातील शिबिरे, तसेच ८ व १५ मे २०२६ रोजी नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.या शिबिरांद्वारे नागरिकांना “Single Day Service Delivery”संकल्पनेनुसार एकाच दिवशी विविध महसूल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पूर्वतयारीतील महत्त्वाचे मुद्दे
शिबिरांपूर्वी भोगवटदार वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करून अद्ययावत ७/१२ वितरित करणे, ‘जिवंत ७/१२’ मोहिमेद्वारे प्रलंबित नोंदी दुरुस्त करणे,सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील अर्ज मंजूर करून आदेश तयार ठेवणे,तुकडेबंदी कायद्याविरोधातील व्यवहारांची गावनिहाय यादी तयार करणे, फेरफार प्रक्रिया पूर्ण करणे आणि शाळांमधील विद्यार्थ्यांचे दाखले ‘कॅम्प मोड’मध्ये तयार ठेवणे या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतींना देणे तसेच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत प्रलंबित पट्टे वाटप पूर्ण करणे हेही पूर्वतयारीचा भाग आहे.
शिबिरामध्ये उपलब्ध सेवा
शिबिरांमध्ये प्रलंबित व विवादग्रस्त फेरफार निकाली काढणे,अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्कद्वारे ७/१२ मधील त्रुटी दूर करणे,लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न,रहिवासी, जात,नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करणे या सेवा उपलब्ध असतील.अकृषिक (NA) रूपांतरणासंदर्भातील कलम ४२ मधील सुधारणा,सनद प्रणाली संपुष्टात येणे,एकवेळचे अधिमूल्य भरण्याची नवी टक्केवारी पद्धत (१००० चौ.मी.पर्यंत ०.१%, १००१–४००० चौ.मी.०.२५%, ४००० पेक्षा जास्त ०.५%) याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
महाभूमी पोर्टलवरून डाउनलोड केलेल्या क्यूआर कोडयुक्त डिजिटल ७/१२ ला कायदेशीर वैधता प्राप्त झाल्याची माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले जाईल.गाव दप्तर अद्ययावत करण्यावर भर.भूसंपादन व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणांत कमी-जास्त पत्रके तयार न केल्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी सर्व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन गाव नमुना ७/१२,गट नकाशे व इतर अभिलेख अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘Ease of Doing Business’ व एक खिडकी व्यवस्था : समाधान शिबिरामध्ये एक खिडकी (Single Window) प्रणाली राबविण्यात येणार असून तहसीलदार,नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी एकाच ठिकाणी उपलब्ध राहून नागरिकांना तात्काळ सेवा देतील.ई-मोजणी,अॅग्रीस्टॅक,पीएम किसान व तक्रार निवारण सेवा शिबिरात उपलब्ध असतील.
अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या
जिल्हाधिकारी यांनी शिबिरांच्या तारखा जाहीर करून सर्व विभागांचा समन्वय साधणे,संपर्क अधिकारी नेमणे आणि अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करणे. उपविभागीय अधिकारी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेऊन समन्वय साधावा.तहसीलदार यांनी मंडळस्तरावर सर्व विभागांच्या बैठका घेऊन शिबिराचे प्रभावी आयोजन करावे,लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे,महिला बचत गट व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे आणि त्याची व्यापक प्रसिद्धी करावी.
जिल्हास्तरीय समन्वय समिती :
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन/रोहयो),जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,सह जिल्हा उपनिबंधक, जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपवनसंरक्षक (प्रादेशिक),जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आदी सदस्य असतील. निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव म्हणून कार्य करतील.
अभियानाचे महत्त्व :
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १” हे केवळ शिबिर नसून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करणारी व्यापक लोकाभिमुख चळवळ आहे. महसूलविषयक गुंतागुंत कमी करून त्वरित सेवा देणे,डिजिटल सक्षमीकरण वाढविणे,पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे आणि शासन निर्णयांचा थेट लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मूलभूत हेतू आहे.हे अभियान प्रभावीपणे राबविल्यास महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि जनकेंद्रित होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय
धाराशिव
****
महिला दिनी HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी मुलींना मोफत लस
महिला दिनी HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी मुलींना मोफत लस
धाराशिव दि.६ मार्च (जिमाका) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते HPV (Human Papilloma Virus) लसीकरण मोहिमेचा देशव्यापी शुभारंभ करण्यात आला.या अनुषंगाने महाराष्ट्रातही दि.८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे- योडर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे.भारत सरकार व महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला (Cervical Cancer) प्रतिबंध करण्यासाठी ही HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर कर्करोगांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एक प्रमुख आजार असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून HPV लसीकरण प्रभावी ठरते.या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात ही मोहीम प्रारंभी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार असून त्यानंतर HPV लसीकरणाचा समावेश नियमित लसीकरण कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत वय वर्षे १४ ते १५ या वयोगटातील मुलींना HPV लस मोफत देण्यात येणार आहे. GARDASIL-4 (Quadrivalent) ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी प्रमाणित केलेली आहे.या लसीचा ०.५ मिली इतका सिंगल डोस स्नायूमध्ये (IM) डाव्या हाताच्या वरच्या भागात देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचा समावेश असून या सर्व ठिकाणी लाभार्थींना लस पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.
लाभार्थी व त्यांच्या पालकांनी लसीकरणासाठी येताना आधार कार्ड किंवा आभा आयडी कार्ड तसेच मोबाईल नंबर सोबत आणणे आवश्यक आहे.तसेच मुलींना लसीकरणासाठी आणताना पालकांनी त्यांना नाश्ता किंवा जेवण करून आणावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
लसीकरणासंदर्भातील कोणत्याही शंका किंवा माहितीकरिता १०४ हा हेल्पलाईन क्रमांक निश्चित करण्यात आलेला आहे.तथापि, काही परिस्थितीत HPV लस घेऊ नये, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
मध्यम किंवा तीव्र आजार असलेल्या मुलींनी पूर्णपणे बरे होईपर्यंत HPV लस घेऊ नये.मागील लसीकरणामुळे एलर्जी रिऍक्शन आलेली असेल किंवा यीस्ट (Yeast) ची ऍलर्जी असल्यास लस घेऊ नये. गर्भावस्था असल्यास HPV लस घेऊ नये. अपेक्षित वयोगटाबाहेरील मुलींना ही लस देण्यात येणार नाही.तसेच ज्यांना यापूर्वी HPV लस देण्यात आलेली आहे,त्यांनी पुन्हा ही लस घेऊ नये.
“गर्भाशय मुखाचा कर्करोगमुक्त भविष्यासाठी आपल्या मुलींचे वेळेवर लसीकरण करणे ही काळाची गरज आहे.पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या मोहिमेत सक्रियपणे सहभागी व्हावे,” असे आवाहन डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक,धाराशिव यांनी केले आहे.
******
मार्च ते मेदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व समाधान शिबिर जिल्ह्यात मंडळ व नगरस्तरावर व्यापक शिबिरे
मार्च ते मेदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व समाधान शिबिर
जिल्ह्यात मंडळ व नगरस्तरावर व्यापक शिबिरे
धाराशिव दि.५ मार्च (जिमाका)माहे मार्च ते मे २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान टप्पा क्र.१ ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत मार्च ते मे महिन्यात मंडळस्तरावर तसेच नगरपरिषद व नगरपंचायतस्तरावर शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विशेष जनजागृती व प्रसार अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे,अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायद्याविषयी मार्गदर्शन, अकृषक तरतुदी संदर्भात माहिती,डिजिटल ७/१२,कमी-जास्त पत्रक तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे,संजय गांधी योजना,आरोग्य शिबीर,आपले सरकार सेवा केंद्रातील विविध दाखले व प्रमाणपत्रे (रहिवासी,उत्पन्न,जात,नॉन क्रिमीलेअर,वय व अधिवास प्रमाणपत्र इ.)उपलब्ध करून देणे आदी सेवा दिल्या जाणार आहेत.
तसेच नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० (पोकरा) अंतर्गत एकात्मिक विकास कामांची माहिती,SBI व पोस्ट खातेदारांसाठी जीवन विमा योजना १०० टक्के भरणा,आयुष्यमान कार्ड,कृषी सेवा, सलोखा योजना,ऍग्रीस्टॅक नोंदणी,आधार दुरुस्ती,मतदान नोंदणी,रेशनकार्ड दुरुस्ती व नवीन रेशनकार्ड,पीएम किसान, शाळानिहाय विद्यार्थी दाखले वाटप,पाणंद रस्ते,सर्वांसाठी घरे पट्टेवाटप,किसान क्रेडिट कार्ड,पीक कर्ज नूतनीकरण आदी विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.त्यासाठी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळ व नगरपरिषद/नगरपंचायतस्तरावर खालीलप्रमाणे शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
०७ मार्च २०२६ रोजी धाराशिव -केशेगाव,तुळजापूर-सलगरा (दि.), उमरगा-बलसूर,लोहारा-घानुरी,भूम -माणकेश्वर,परंडा-आसू,कळंब- येरमाळा,वाशी-पारगाव येथे शिबिरे होतील.११ मार्च रोजी धाराशिव- बेंबळी; १४ मार्च रोजी धाराशिव-तेर,तुळजापूर- इटकळ, उमरगा-डाळींब,लोहारा-माकणी; १७ मार्च रोजी भूम-पाथरुड,परंडा- जवळा नि., कळंब-मस्सा ख.,वाशी -तेरखेडा, तसेच धाराशिव - करजखेडा व उमरगा- नारंगवाडी येथे शिबिरे पार पडतील.१८ मार्च रोजी धाराशिव - ढोकी; २४ मार्च रोजी तुळजापूर - जळकोट व धाराशिव -येडशी; २७ मार्च रोजी कळंब- शिराढोण; २८ मार्च रोजी परंडा- आनाळा येथे शिबिरे होतील.तसेच ०८ एप्रिल रोजी धाराशिव- आंबेजवळगा; १० एप्रिल रोजी धाराशिव-जागजी,तुळजापूर- तामलवाडी, उमरगा- बेडगा,लोहारा- जेवळी,भूम- वालवड,परंडा- शेलगाव कळंब- नायगाव, वाशी-पारा;१७ एप्रिल रोजी धाराशिव- पाडोळी (आ), तुळजापूर- आरळी बु.,उमरगा - मुळज,भूम-आंबी,परंडा- सोनारी,कळंब-मोहा; २४ एप्रिल रोजी तुळजापूर- मंगरूळ,भूम-ईट,कळंब- गोविंदपूर; ३० एप्रिल रोजी कळंब-ईटकूर; ६ मे रोजी तुळजापूर- सावरगाव; १५ मे रोजी धाराशिव शहर येथे शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावर ८ मे २०२६ रोजी धाराशिव ग्रामीण,तुळजापूर, उमरगा,लोहारा,भूम,परंडा,कळंब,वाशी येथे तर १५ मे २०२६ रोजी नळदुर्ग व मुरूम येथे शिबिरे होणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व खासदार,आमदार,जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्ष,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती व सदस्य, नगराध्यक्ष,नगरपरिषद सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी संबंधित मंडळनिहाय शिबिरांना उपस्थित राहून सहभाग नोंदवावा,तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकरी,शेतमजूर,विद्यार्थी व लाभार्थ्यांना माहिती देऊन लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.लाभ वाटपावेळी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे,अशीही विनंती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नमूद तपशीलानुसार आयोजित शिबिरांमध्ये उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
******
आखाती तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची अफवा ; धाराशिवमध्ये पेट्रोल-डिझेल साठा मुबलक,प्रशासनाचे आवाहन
आखाती तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची अफवा ;
धाराशिवमध्ये पेट्रोल-डिझेल साठा मुबलक,प्रशासनाचे आवाहन
धाराशिव दि.५ मार्च (जिमाका)सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे.या अफवेमुळे जिल्ह्यातील सर्वसाधारणपणे सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांकडून अतिरिक्त स्वरूपात इंधन साठवण्यासाठी गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा साठा सध्या पर्याप्त प्रमाणात उपलब्ध असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यात कार्यरत सर्व पेट्रोल पंपांवर नियमित पुरवठा होत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही.सर्व पेट्रोल पंप कंपन्यांच्या विक्री अधिकारी व प्रतिनिधींना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाण्याची गरज नसून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करणे टाळावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल,याची नोंद घ्यावी,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.तरी सर्व नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
*****
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ टप्पा-१ : जिल्ह्यात व्यापक नियोजन; महसूल सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व
समाधान शिबीर’ टप्पा-१ :
जिल्ह्यात व्यापक नियोजन; महसूल सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार
धाराशिव दि.५ मार्च (जिमाका) महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिक,शेतकरी,विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १)” राबविण्याचा निर्णय घेतला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये शासनाच्या सूचनांनुसार तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असून शिबिरांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
पूर्वतयारीसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहे.हे अभियान यशस्वी होण्यासाठी भोगवटादार वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करून अद्ययावत ७/१२ लाभार्थ्यांना देणे,‘जिवंत ७/१२’ मोहीम राबवून प्रलंबित नोंदींची दुरुस्ती पूर्ण करणे,सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून मंजुरी आदेशांचे वाटप करणे आदी कामे शिबिरापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तुकडेबंदी कायद्यांतर्गत १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्रमाण क्षेत्राचे उल्लंघन झालेल्या व्यवहारांची गावनिहाय यादी तयार करून फेरफार घ्यावेत,शाळांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांचे दाखले कॅम्प मोडमध्ये तयार करून शिबिरात वितरित करण्यात येणार आहे.पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतींना द्यावेत तसेच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत प्रलंबित पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी,असे स्पष्ट करण्यात आले आहे.शिबिरादरम्यान उपलब्ध मुख्य सेवा शिबिरात प्रलंबित व विवादग्रस्त फेरफार निकाली काढणे,अभिलेख दुरुस्ती व हेल्प डेस्कमार्फत ७/१२ वरील चुका दुरुस्त करणे,लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध प्रमाणपत्रांचे अर्ज स्वीकारणे व वितरित करणे,कमी-जास्त पत्रके तयार करून गाव नमुने अद्ययावत करणे या सेवा देण्यात येणार आहेत.
तसेच ‘Ease of Doing Business’ सुधारणा अंतर्गत एक खिडकी सुविधा, ई-मोजणी,अॅग्रीस्टॅक नोंदणी,पीएम किसान,तक्रार निवारण कक्ष (जनता दरबार),समाधान अॅप,आपले सरकार पोर्टल व पी.जी.पोर्टलवरील तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.
महसूल कायद्यातील नवीन सुधारणांची जनजागृती करण्यात येणार आहे.कलम ४२ अन्वये अकृषिक (NA) रूपांतरणासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसून विकास आराखड्याची मंजुरी हीच परवानगी मानली जाईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सनद प्रणालीतील बदल,एकवेळचे अधिमूल्य भरण्याची सुधारित व्यवस्था तसेच १० डिसेंबर २०२५ च्या अधिसूचनेनुसार महाभूमी पोर्टलवरील क्यूआर कोडयुक्त डिजिटल ७/१२ ची कायदेशीर वैधता याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असून शिबिरांमध्ये नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० (पोकरा) अंतर्गत विकास कामांची माहिती,एसबीआय व पोस्ट खातेदारांसाठी जीवन विमा योजना,आयुष्यमान कार्ड वितरण,रेशनकार्ड दुरुस्ती व नवीन रेशनकार्ड,कृषी सेवा,बँक व पोस्ट सेवा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या अभियानात लोकप्रतिनिधी व प्रशासनाची भूमिका महत्वाची राहणार आहे.अभियानासाठी खासदार,आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष,पंचायत समिती पदाधिकारी,नगराध्यक्ष,सरपंच आदी लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटून आमंत्रित करण्यात येणार असून महिला बचत गट व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
सर्व तहसीलदार यांनी आपल्या स्थानिक पातळीवर प्रत्येक शिबिराची प्रसिद्धी, व्हिडिओ क्लिप्स,अभिप्राय नोंदवही व माध्यमांद्वारे व्यापक प्रचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
जिल्हास्तरीय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर तालुकानिहाय संपर्क अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सर्वश्री श्री.संतोष राऊत (वाशी),श्री.प्रविण धरमकर (तुळजापूर), श्रीमती.अरुणा गायकवाड (लोहारा), श्री.श्रीकांत पाटील (परंडा),उपविभागीय अधिकारी धाराशिव,भूम,कळंब व उमरगा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अभियानाची अंमलबजावणी शासन निर्णयातील प्रपत्र अ-१ ते अ-८ नुसार वेळेत अहवाल सादर करून करावी,अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. अभियान प्रभावी,पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने राबविण्याची जबाबदारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सर्व विभागांना गांभीर्याने व समन्वयाने कार्यवाही करून हे अभियान यशस्वी करावे,असे निर्देश दिले आहेत.
******
पदविधर मतदारांसाठी सुवर्णसंधी ०५-औरंगाबाद विभागाची अंतिम यादी जाहीर,नोंदणी सुरूच
पदविधर मतदारांसाठी सुवर्णसंधी
०५-औरंगाबाद विभागाची अंतिम यादी जाहीर,नोंदणी सुरूच
धाराशिव दि.५ मार्च (जिमाका) भारत निवडणूक आयोगाने दि.१२ सप्टेंबर २०२५ रोजीच्या पत्रान्वये जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ०५-औरंगाबाद विभाग पदविधर मतदारसंघाची अंतिम मतदार यादी दि.१२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत संबंधित पदविधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवण्याबाबत आयोगाने निर्देश दिले आहेत.त्यानुसार ०५-औरंगाबाद विभाग पदविधर मतदारसंघासाठी अद्याप नोंदणी न झालेल्या पात्र पदविधरांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.
यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पात्र पदविधर मतदारांनी आपले अर्ज संबंधित तहसील कार्यालयात तात्काळ सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
*****
Wednesday, 4 March 2026
समाज कल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी सात राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अर्ज मागविले
समाज कल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी सात राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अर्ज मागविले
धाराशिव दि.४ मार्च (जिमाका) सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विविध राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार,पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार,संत रविदास पुरस्कार,लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार,शाहु,फुले, आंबेडकर परितोषिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या सात पुरस्कारांचा समावेश आहे.
सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांतील सात पुरस्कारांकरिता समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी या पुरस्कारांसाठी अर्ज सादर करावेत, इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज तीन प्रतीत (स्पायरल बायडिंग न करता) दिनांक १५ मार्च २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव या कार्यालयात सादर करावेत,असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री.सचिन कवले यांनी केले आहे.
****
धाराशिवमध्ये १०० विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू १० मार्चदरम्यान ऑनलाईन अर्ज मागविले
धाराशिवमध्ये १०० विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू
१० मार्चदरम्यान ऑनलाईन अर्ज मागविले
धाराशिव दि.४ मार्च (जिमाका) इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बी.ए.,बी.कॉम.,बी.एस्सी.अशा १२ वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज १० मार्च २०२६ पर्यंत मागविले आहे.गुणवत्तेनुसार निवड यादी ११ मार्च २०२६ रोजी अंतिम करून प्रसिद्ध करण्यात येणार असून, निवड यादीनुसार प्रवेश घेण्याची अंतिम मुदत दि.१२ मार्च २०२६ ते दि.२० मार्च २०२६ अशी राहील.
जिल्ह्यात मुला-मुलींसाठी १०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आले आहे.वसतिगृह,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे असून,त्यासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत.
या योजनेंतर्गत प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वरील वेळापत्रकानुसार अर्ज करावेत,असे आवाहन सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, धाराशिव यांनी केले आहे.
*****
Monday, 2 March 2026
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे आवाहन परदेशातील नागरिकांसाठी सुरक्षा सूचना व हेल्पलाईन क्रमांक जाहीर
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे आवाहन
परदेशातील नागरिकांसाठी सुरक्षा सूचना व हेल्पलाईन क्रमांक जाहीर
धाराशिव दि.२ मार्च (जिमाका) मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या सूचनांनुसार संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.
या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला),कतार (दोहा),सौदी अरेबिया (रियाध),इस्रायल (तेल अवीव),इराण (तेहरान),इराक (बगदाद), कुवैत,बाहरीन,मस्कत,जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे,अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा,अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
आपत्कालीन संपर्क तपशील
SEOC (२४X७)
राज्य आपत्कालीन परिस्थिती किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षेबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी खालील SEOC क्रमांकावर संपर्क साधावा:
टोल फ्री क्र.१०७७
फोन नं. +९१-९३२१५८७१४३
कार्यालयीन क्र.०२२-२२०२७९९०
ई-मेल आयडी: controlroom@gov.in
संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील
रामल्लाह (पॅलेस्टाईन)
फोन: +९७०५९२९१६४१८
ईमेल: repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in
दोहा (कतार)
फोन: ००९७४-५५६४७५०२
ईमेल: cons.doha@mea.gov.in
रियाध (सौदी अरेबिया)
फोन: ००-९६६-११-४८८४६९७
WhatsApp: ००-९६७-५४२१२६७४८
टोल फ्री: ८०० २४७ १२३४
ईमेल: cw.riyadh@mea.gov.in
तेल अवीव (इस्रायल)
फोन: +९७२-५४-७५२०७११ / +९७२-५४-२४२८३७८
ईमेल: conal.telaviv@mea.gov.in
तेहरान (इराण)
फोन: +९८९१२८१०९११५ / +९८९१२८१०९१०९ / +९८९१२८१०९१०२ / +९८९९३२१७९३५९
अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
टोल फ्री: ८००-४६३४२
WhatsApp: +९७१५४३०९०५७१
ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in
कुवैत
फोन: ९६५६५५०१९४६
ईमेल: community.kuwait@mea.gov.in
बाहरीन
फोन: ००९७३-३९४१८०७१
मस्कत
टोल फ्री: ८००७१२३४
WhatsApp: +९६८९८२८२२७०
ईमेल: cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in
जॉर्डन
फोन: ००९६२-७७० ४२२ २७६
बगदाद (इराक)
फोन: +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४४८९९
वेबसाइट: coibaghdad.gov.in
ईमेल: cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in असे आहेत.
परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी.भारतीय दूतावास/कॉन्सुलेटच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.आपले लोकेशन व स्थिती कुटुंबियांना सतत कळवावी.मोबाईल चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.सोशल मीडियावर अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये.स्थानिक भारतीय दूतावासाकडे नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.
जिल्ह्यातील नागरिकांसाठी सूचना
उपरोक्त देशांमध्ये आपले नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्ती अडकून पडलेले असतील तर त्यांची माहिती धाराशिव प्रशासनास खालील क्रमांकांवर संपर्क साधून द्यावी.अडकलेल्या नातेवाईकांशी संपर्क झाला असल्यास त्यांना कोणत्या मदतीची आवश्यकता आहे याबाबत जिल्हा प्रशासनास कळवावे.ज्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकत नाही, त्यांची माहिती प्रशासनास सविस्तरपणे देण्यात यावी,असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष:
०२४७२- २२४३६६, ०२४७२-२२५६१८.
टोल फ्री क्रमांक :१०७७
धाराशिव पोलीस नियंत्रण कक्ष:
०२४७२-२२२९००,
०२४७२-२२२७००
निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव: ७५८८९३८६८६
तहसीलदार तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,धाराशिव: ९४२३३३९१९२
उपविभागीय अधिकारी,धाराशिव: ७०८३६६३१३९
उपविभागीय अधिकारी,उमरगा: ९८५०८९७०४२
उपविभागीय अधिकारी,कळंब: ९९२२४४७८१२
उपविभागीय अधिकारी,भूम: ९५६६०९६६९१
तहसीलदार धाराशिव: ९६५७५७६७१४
तहसीलदार तुळजापूर : ७७७६८८९९९९
तहसीलदार उमरगा : ९४२२४६९०१३
तहसीलदार लोहारा : ७८७५२४३८३४
तहसीलदार कळंब : ९८८१७४५५७७
तहसीलदार वाशी:
९०९६२५५७३७
तहसीलदार भूम:
९८२३७२२२७४
तहसीलदार परंडा:
८२०८५१३६५६
वरील क्रमांकांवर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव यांनी दिली.
****
Sunday, 1 March 2026
विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध विभागांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी
विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध विभागांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी
धाराशिव,दि.१ मार्च (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज लेडीज क्लब, धाराशिव येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन शैलेश ब्रम्हे,न्यायमूर्ती,मुंबई उच्च न्यायालय यांच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायाधीश यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील,जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव होत्या.
महाशिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग,(वार रूम – मध्यवर्ती नियंत्रण कक्ष),जिल्हा वाहतूक शाखा पोलीस विभाग,राज्य मार्ग परिवहन महामंडळ,उपविभागीय अधिकारी कार्यालय,जिल्हा कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,आरोग्य विभागाचा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम,मोबाईल मेडिकल हॉस्पिटल,आयुष्मान भारत, अॅनिमियामुक्त भारत अभियान,रेशीम विकास विभाग,महिला आर्थिक विकास महामंडळ,जिल्हा उद्योग केंद्र,महिला व बाल विकास विभाग,महिला बालकल्याण विभाग,पशुसंवर्धन विभाग, मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान, शिक्षण विभाग,येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र (येरमाळा),अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय तसेच जिल्हा कौशल्य,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नोंदणी व मुद्रांक विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,जिल्हा रुग्णालय,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा रक्तदान शिबिर,तहसील कार्यालय,धाराशिव,जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचा राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम,व्हाइट गोल्ड चॉकी सेंटर,खामकरवाडी,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना/विकसित भारत जी राम जी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचा स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा - २,वीज वितरण कंपनीची सौर ऊर्जा योजना यांसह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते.
या सर्व स्टॉलना नागरिक,महिला व लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली.अनेक पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्टॉलवर विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले.
विधी सेवा महाशिबिराचा उद्देश सर्वसामान्यांना मोफत व त्वरित कायदेविषयक मदत उपलब्ध करून देणे,नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे,पात्रांना मोफत विधी साहाय्य देणे तसेच प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीमार्फत निकाली काढण्यास प्रोत्साहन देणे हा होता.
त्याचबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत वंचित, गरजू,महिला,ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग व इतर दुर्बल घटकांपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवून “सर्वांसाठी न्याय” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा या उपक्रमामागील मूलभूत हेतू होता.
*****
शिबिराच्या माध्यमातून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात न्या.शैलेश ब्रम्हे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा
शिबिराच्या माध्यमातून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात
न्या.शैलेश ब्रम्हे
विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा
धाराशिव दि.१ मार्च (जिमाका) विविध योजनांची अंमलबजावणी करणे हे कठीण व जिकरीची काम आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या नाही,तर त्या कागदावरच राहतात.या महाशिबिराच्या माध्यमातून विविध योजना ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात.असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती.शैलेश ब्रम्हे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज १ मार्च रोजी धाराशिव येथील लेडीज क्लब येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन न्या.श्री.ब्रम्हे यांच्या हस्ते करण्यात आले.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात न्या.श्री.ब्रम्हे बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्या.श्रीमती अभिश्री देव,प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलिस अधीक्षक श्रीमती.रितू खोखर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर यांची उपस्थिती होती.
न्या.ब्रम्हे पुढे म्हणाले की,या महाशिबिरासाठी आलेल्या नागरिकांनी येथे लावण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन संबंधित विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना,अभियान व उपक्रमांची माहिती काळजीपूर्वक जाणून घ्यावी.आपल्याला कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो त्याची माहिती घेऊन कागदपत्रांची पूर्तता करावी.केवळ स्वतःपुरत्याच या योजनांची माहिती जाणून न घेता आपल्या गावातील नागरीकांना, लाभार्थ्यांना तसेच आपल्या शेजाऱ्यांना या महामेळाव्यातून गावाला पोहोचल्यावर त्यांना योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घेण्यात प्रोत्साहित करावे.योजनांच्या लाभामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.असे न्या.ब्रम्हे यांनी सांगितले.
विधी सेवा प्राधिकरण व प्रशासनाने या महाशिबिराच्या माध्यमातून योजनांची माहिती देणे व त्याचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे सांगून न्या.श्री.ब्रम्हे म्हणाले की, भारतीय संविधानाने सामाजिक व आर्थिक न्याय सांगितला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली आहे. संविधानाचा सर्वांनाच फायदा व्हावा यासाठी हे महाशिबिर आयोजित केले आहे.समाजातील सर्व नागरिकांना व लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ झाला पाहिजे.शिबिरातून मिळणारी माहिती नागरिकांनी आपल्या गावात घरोघरी पोहोचवून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी न्या.श्री ब्रम्हे यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,नागरिकांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन वेळोवेळी करण्यात येते.शासनाच्या अनेक योजना आहेत.त्या लोकांपर्यंत पोहचविणे व त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. कायदेविषयक शिबिराची माहिती ही नागरिकांनी शेजारच्या व्यक्तीला दिली पाहिजे,असे त्यांनी यावेळी सांगितले.
न्या.श्रीमती.देव म्हणाल्या की,हा लोकशाहीचा उत्सव आहे.या उत्सवाच्या माध्यमातून विधी सेवा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. "न्याय सर्वांसाठी" हे विधी सेवा प्राधिकरणचे ब्रीद आहे.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंचावरून न्या.ब्रम्हे यांच्या हस्ते लोककल्याणकारी योजनांच्या लाभाचे वितरण काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.यामध्ये सिमरन मुजावर या दिव्यांग विद्यार्थ्याला २० हजार रुपयांचे किसान विकास पत्र,अमोल कांबळे - प्रांजली तुपे यांना ५० हजार रुपयांचा आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य या योजनेचा धनादेश,प्रवीण शिंदे याला दिव्यांग कल्याण विभागाकडून बीज भांडवल कर्ज योजनेचा १ लक्ष रुपयांचा कर्ज मंजुरी आदेश,श्रीमती.रंजना ढवळे यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची चाबी,सोनाली उघडे यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून लखपती दीदी सन्मान प्रमाणपत्र,कालिदास शेंडगे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नवीन विहिरीचा मंजुरी आदेश, नितीन कांबळे यांना पशुसंवर्धन विभागाकडून शेळी गट वाटप योजनेचे प्रमाणपत्र,सलीम शेख यांना रहिवासी प्रमाणपत्र,दादा घोडके यांना शिधापत्रिका व दिव्यांग लाभार्थी प्रमाणपत्र,सारिका भागवत यांना किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शिवणकाम व्यवसाय प्रमाणपत्र,देवांशी काकडे या तृतीयपंथी व्यक्तीला समाज कल्याण विभागाचे तृतीयपंथी ओळखपत्र व विठ्ठल पवार यांना आदिवासी विकास विभागाकडून ई-रिक्षाची चावी देण्यात आली.
न्या.श्री.ब्रम्हे व अन्य मान्यवरांनी महामेळाव्यात लावण्यात आलेल्या विविध विभागाच्या स्टॉलला भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घेतली व त्यांच्या हस्ते संबंधित स्टॉलवर देखील संबंधित विभागाच्या योजनांच्या लाभाचे व प्रमाणपत्राचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.
यावेळी विविध विभागातील अधिकारी यांनी महाशिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप सिंगुलवार,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील,कळंबचे उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे व सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती.साकळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांना भेटवस्तू,पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध न्यायालयाचे न्यायिक अधिकारी,जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी, बचतगटातील महिला लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपिकांना जल अर्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. अभिश्री देव यांनी केले.संचालन न्या.सचिन पाटील यांनी केले.आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील यांनी मानले.राष्ट्रगीत व राज्यगिताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
******
Subscribe to:
Posts (Atom)









