Sunday, 1 March 2026
शिबिराच्या माध्यमातून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात न्या.शैलेश ब्रम्हे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा
शिबिराच्या माध्यमातून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात
न्या.शैलेश ब्रम्हे
विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा
धाराशिव दि.१ मार्च (जिमाका) विविध योजनांची अंमलबजावणी करणे हे कठीण व जिकरीची काम आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या नाही,तर त्या कागदावरच राहतात.या महाशिबिराच्या माध्यमातून विविध योजना ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात.असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती.शैलेश ब्रम्हे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज १ मार्च रोजी धाराशिव येथील लेडीज क्लब येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन न्या.श्री.ब्रम्हे यांच्या हस्ते करण्यात आले.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात न्या.श्री.ब्रम्हे बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्या.श्रीमती अभिश्री देव,प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलिस अधीक्षक श्रीमती.रितू खोखर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर यांची उपस्थिती होती.
न्या.ब्रम्हे पुढे म्हणाले की,या महाशिबिरासाठी आलेल्या नागरिकांनी येथे लावण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन संबंधित विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना,अभियान व उपक्रमांची माहिती काळजीपूर्वक जाणून घ्यावी.आपल्याला कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो त्याची माहिती घेऊन कागदपत्रांची पूर्तता करावी.केवळ स्वतःपुरत्याच या योजनांची माहिती जाणून न घेता आपल्या गावातील नागरीकांना, लाभार्थ्यांना तसेच आपल्या शेजाऱ्यांना या महामेळाव्यातून गावाला पोहोचल्यावर त्यांना योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घेण्यात प्रोत्साहित करावे.योजनांच्या लाभामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.असे न्या.ब्रम्हे यांनी सांगितले.
विधी सेवा प्राधिकरण व प्रशासनाने या महाशिबिराच्या माध्यमातून योजनांची माहिती देणे व त्याचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे सांगून न्या.श्री.ब्रम्हे म्हणाले की, भारतीय संविधानाने सामाजिक व आर्थिक न्याय सांगितला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली आहे. संविधानाचा सर्वांनाच फायदा व्हावा यासाठी हे महाशिबिर आयोजित केले आहे.समाजातील सर्व नागरिकांना व लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ झाला पाहिजे.शिबिरातून मिळणारी माहिती नागरिकांनी आपल्या गावात घरोघरी पोहोचवून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी न्या.श्री ब्रम्हे यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,नागरिकांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन वेळोवेळी करण्यात येते.शासनाच्या अनेक योजना आहेत.त्या लोकांपर्यंत पोहचविणे व त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. कायदेविषयक शिबिराची माहिती ही नागरिकांनी शेजारच्या व्यक्तीला दिली पाहिजे,असे त्यांनी यावेळी सांगितले.
न्या.श्रीमती.देव म्हणाल्या की,हा लोकशाहीचा उत्सव आहे.या उत्सवाच्या माध्यमातून विधी सेवा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. "न्याय सर्वांसाठी" हे विधी सेवा प्राधिकरणचे ब्रीद आहे.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंचावरून न्या.ब्रम्हे यांच्या हस्ते लोककल्याणकारी योजनांच्या लाभाचे वितरण काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.यामध्ये सिमरन मुजावर या दिव्यांग विद्यार्थ्याला २० हजार रुपयांचे किसान विकास पत्र,अमोल कांबळे - प्रांजली तुपे यांना ५० हजार रुपयांचा आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य या योजनेचा धनादेश,प्रवीण शिंदे याला दिव्यांग कल्याण विभागाकडून बीज भांडवल कर्ज योजनेचा १ लक्ष रुपयांचा कर्ज मंजुरी आदेश,श्रीमती.रंजना ढवळे यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची चाबी,सोनाली उघडे यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून लखपती दीदी सन्मान प्रमाणपत्र,कालिदास शेंडगे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नवीन विहिरीचा मंजुरी आदेश, नितीन कांबळे यांना पशुसंवर्धन विभागाकडून शेळी गट वाटप योजनेचे प्रमाणपत्र,सलीम शेख यांना रहिवासी प्रमाणपत्र,दादा घोडके यांना शिधापत्रिका व दिव्यांग लाभार्थी प्रमाणपत्र,सारिका भागवत यांना किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शिवणकाम व्यवसाय प्रमाणपत्र,देवांशी काकडे या तृतीयपंथी व्यक्तीला समाज कल्याण विभागाचे तृतीयपंथी ओळखपत्र व विठ्ठल पवार यांना आदिवासी विकास विभागाकडून ई-रिक्षाची चावी देण्यात आली.
न्या.श्री.ब्रम्हे व अन्य मान्यवरांनी महामेळाव्यात लावण्यात आलेल्या विविध विभागाच्या स्टॉलला भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घेतली व त्यांच्या हस्ते संबंधित स्टॉलवर देखील संबंधित विभागाच्या योजनांच्या लाभाचे व प्रमाणपत्राचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.
यावेळी विविध विभागातील अधिकारी यांनी महाशिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप सिंगुलवार,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील,कळंबचे उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे व सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती.साकळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांना भेटवस्तू,पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध न्यायालयाचे न्यायिक अधिकारी,जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी, बचतगटातील महिला लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपिकांना जल अर्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. अभिश्री देव यांनी केले.संचालन न्या.सचिन पाटील यांनी केले.आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील यांनी मानले.राष्ट्रगीत व राज्यगिताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
******





