Wednesday, 18 March 2026

जिल्ह्यात गॅस पुरवठा सुरळीत अफवांवर विश्वास ठेवू नका जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यात गॅस पुरवठा सुरळीत अफवांवर विश्वास ठेवू नका जिल्हा प्रशासनाचे आवाहन धाराशिव दि.१८ मार्च (जिमाका) आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणातही जिल्ह्यात घरगुती गॅस,पेट्रोल,डिझेल व गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.तथापि,काही नागरिक गॅस एजन्सीच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. दिनांक १७ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील गॅस एजन्सीकडील वितरणाचा आढावा घेतला असता, गॅस एजन्सीकडून घरपोच करण्यात आलेले वितरण ४६०५ सिलेंडरचे होते,तर एजन्सीमधून प्रत्यक्ष केलेले वितरण केवळ १२१९ सिलेंडर एवढे होते.तसेच शिल्लक गॅस सिलेंडरचा साठा ४२५२ इतका उपलब्ध असल्याचे आढळून आले. जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडर वितरण तपशील पुढीलप्रमाणे आहे. आगांधी शिल्लक – ५४२८,आवक – ४६४८,एकूण साठा – १००७६ घरपोच वितरण – ४६०५, एजन्सीमधून केलेले वितरण – १२१९.एकूण वितरण – ५८२४, शिल्लक साठा – ४२५२ एवढा आहे.सर्व गॅस एजन्सीधारकांकडे गॅसचा पुरेसा साठा असून नियमित आवक व वितरण सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपली गॅस जोडणी असलेल्या कंपनीच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधावा किंवा व्हॉट्सअ‍ॅप/प्ले स्टोअरवरील अधिकृत अ‍ॅप्लिकेशनद्वारे ऑनलाइन बुकिंग करून घरपोच गॅस सेवेचा लाभ घ्यावा.तसेच गॅस एजन्सीच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. *****

Tuesday, 17 March 2026

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष बैठक

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष बैठक धाराशिव,दि.१७ मार्च (जिमाका) धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,१९६१ मधील कलम ८३ तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष/उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समिती (सभापती/उपसभापती) (आरक्षण व निवडणूक) नियम १९६२ मधील तरतुदीनुसार विहित मुदतीत घेणे आवश्यक आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडीसाठी दि.२७ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भात,महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,१९६१ मधील कलम ८३ तसेच संबंधित नियमांनुसार जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आदेश जारी केला आहे.या आदेशान्वये विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी होणाऱ्या विशेष बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी,धाराशिव श्री.ओंकार देशमुख यांना पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. *****

मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम १० दिवसांची मोहीम धाराशिवमध्ये कडक अंमलबजावणी

मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम १० दिवसांची मोहीम धाराशिवमध्ये कडक अंमलबजावणी धाराशिव,दि.१७ मार्च (जिमाका) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लवकरच मतदार याद्यांचे विशेष पुनरिक्षण कार्यक्रम (SIIR) राज्यात सुरू होणार आहे.त्याअनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने पूर्वतयारीचे निर्देश दिले आहेत.तसेच मुंबई येथे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेनुसार ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीतील मतदारांचे सन २००२ च्या मतदार यादीशी मॅपींग करणे,अस्पष्ट (Blur Photo) असलेल्या मतदारांचे नवीन रंगीत फोटो गोळा करून अद्यावत करणे, तसेच DSE नोंदीची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करणे,ही कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील २४०- उमरगा,२४१-तुळजापूर, २४२-उस्मानाबाद व २४३-परंडा या विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना वरील कामकाजासाठी २० मार्च २०२६ ते २९ मार्च २०२६ या कालावधीत पूर्णवेळ कार्यमुक्त करण्यात आले आहे.तसेच या कालावधीत ज्यांची दहावी व बारावी परीक्षेसाठी नियुक्ती आहे,अशा BLO व पर्यवेक्षकांनी संबंधित दिवशी परीक्षा कार्य पूर्ण करून दुसऱ्या दिवशी मतदार यादीचे कामकाज पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. दरम्यान,या कामकाजाकडे दुर्लक्ष किंवा टाळाटाळ केल्यास संबंधितांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. अन्यथा कलम १३४ अंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल,याची गांभीर्याने नोंद घ्यावी,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. *****

Monday, 16 March 2026

गॅस व पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका : अनावश्यक गर्दी टाळा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

गॅस व पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका : अनावश्यक गर्दी टाळा जिल्हाधिकारी यांचे आवाहन धाराशिव दि.१७ मार्च (जिमाका) केंद्र शासन व संबंधित कंपन्यांकडून राज्यात एलपीजी गॅस तसेच पेट्रोल -डिझेलच्या पुरवठ्यात कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सी तसेच पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा नियमितपणे सुरू असून पुरेसा साठा उपलब्ध आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी आवश्यकतेनुसारच गॅस सिलेंडर बुकिंग करावे तसेच पेट्रोल-डिझेल खरेदी करावी.गॅस एजन्सी व पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करून साठवणूक करण्याचा प्रयत्न करू नये.गॅस सिलेंडरचे वितरण नियमानुसार व बुकिंगनुसार केले जाईल.त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच पेट्रोल पंपांवर घाईगडबडीत रांगा लावणे किंवा मोठ्या प्रमाणात इंधन साठवून ठेवणे टाळावे.पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असून नागरिकांनी शांतता व शिस्त राखून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे. ******

लोक अदालतीमध्ये 7 हजार 760 प्रकरणे तडजोडीअंती निकाली

लोक अदालतीमध्ये 7 हजार 760 प्रकरणे तडजोडीअंती निकाली धाराशिव दि.16 मार्च (जिमाका) : जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन दिनांक 14 मार्च रोजी करण्यात आले होते.या लोकअदालतीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती अभिश्री देव,जिल्हा न्यायाधीश एस.जी.ठुबे,आर.के.खोमणे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील आदी यावेळी उपस्थित होते. लोक अदालतीमध्ये एकूण 12 हजार 178 प्रलंबित प्रकरणे व दावापूर्ण एकूण 18 हजार 755 प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरिता ठेवण्यात आली होती.त्यापैकी प्रलंबित एकूण 624 व दावापूर्ण एकूण 7 हजार 760 प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आलेली आहेत. या लोक अदालती मध्ये विशेष करुन तालुका विधी सेवा समिती, उमरगा येथील मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणामध्ये रक्कम रु.85 लाख, धाराशिव येथील मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणामध्ये रक्कम रु.65 लाख व रक्कम 44 लाख इतक्या रकमेचा धनादेश दावेदारास देण्यात आला. या लोक अदालतीमध्ये धनादेश प्रकरणी फिर्यादी पक्षाला रुपये 1 कोटी 26 लाख 23 हजार 156 इतक्या वसुलीची रक्कम प्राप्त झाली. प्रलंबित मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणात रक्कम 7 कोटी 96 लाख 17 हजार 932 रुपये, प्रलंबित दिवाणी स्वरुपाच्या प्रलंबित प्रकरणात रक्कम 1 कोटी 01 लाख 53 हजार 424 रुपये इतके, बँकेच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये 1 कोटी 09 लाख 55 हजार 585 रुपये, बँकेच्या वादपूर्व प्रकरणांमध्ये रक्कम 1 कोटी 28 लाख 49 हजार 631 रुपये , नगर पालिका व ग्राम पंचायतीची पाणीपट्टी व घर पट्टीच्या प्रकरणांमध्ये रक्कम 2 कोटी 87 लाख 79 हजार 219 रुपये, कामगार नुकसान भरपाई प्रकरणामध्ये रक्कम 62 लाख 70 हजार रुपये,ग्राहक मंचाची प्रकरणामध्ये रक्कम 6 लाख 26 हजार 196 इतक्या रकमेची वसुली झाली.तर गुन्हा कबुलीची प्रकरणांमध्ये रक्कम 98 हजार 250 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याचे सचिव , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, धाराशिव यांनी कळविले आहे. . 0000000

गॅस एजन्सीकडे अनावश्यक गर्दी टाळा ; घरपोच सिलेंडर सेवेचा वापर करा जिल्हा प्रशासनाचे आवाहन

गॅस एजन्सीकडे अनावश्यक गर्दी टाळा ; घरपोच सिलेंडर सेवेचा वापर करा जिल्हा प्रशासनाचे आवाहन धाराशिव दि.१६ मार्च (जिमाका) सध्याच्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शांतता व संयम राखून आवश्यक सेवांचा योग्य वापर करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून पुरेसा साठाही उपलब्ध आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी नियमितपणे गॅस बुकिंग करून घरपोच सेवा वापरावी,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असताना कोणत्याही प्रकारची घाईगडबड किंवा साठेबाजी करू नये. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भात नागरिकांनी गॅस एजन्सीकडे प्रत्यक्ष जाऊन अनावश्यक गर्दी करणे टाळावे. सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून गॅस एजन्सीकडे होणारी गर्दी कमी करण्यासाठी आपल्या घरवस्तीस जोडलेल्या गॅस कंपनीच्या अधिकृत क्रमांकावर कॉल, व्हॉट्सअ‍ॅप, प्ले स्टोअरवरील अ‍ॅप्लिकेशन तसेच अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून सिलेंडर बुकिंग करून घरपोच सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी विविध गॅस कंपन्यांचे बुकिंगसाठी उपलब्ध संपर्क पर्याय खालीलप्रमाणे आहेत : Bharat Gas Whats App : 1800 22 4344 Missed Call : 7710955555 IVRS : 7715012345 Application : Hello BPCL Web : my.ebharatgas.com Indane Gas Whats App : 7588888824 Missed Call : 8454955555 IVRS : 7718955555 Application : Indian Oil One Web : http://cx.indianoil.in HP Gas Whats App : 9222201122 Missed Call : 9493602222 IVRS : 8888823456 Application : HP Pay Web : http://myhpgas.in प्रशासनाच्या या सूचनेनुसार नागरिकांनी घरपोच सिलेंडर सेवा वापरून गॅस एजन्सीकडे अनावश्यक गर्दी टाळावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ००००००००००

आपले सरकार सेवा केंद्रांवर आता क्युआर कोडद्वारे अभिप्राय सेवा अधिक पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्याचा उपक्रम

आपले सरकार सेवा केंद्रांवर आता क्युआर कोडद्वारे अभिप्राय सेवा अधिक पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्याचा उपक्रम धाराशिव,दि.१६ मार्च (जिमाका) नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक पारदर्शक,जलद व नागरिकाभिमुख पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांवर अभिप्राय (Feedback) नोंदविण्यासाठी क्युआर कोड उपलब्ध करून देण्यात येत आहे.यानुसार प्रत्येक सेवा केंद्राच्या दर्शनी भागात हा क्युआर कोड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या क्युआर कोडच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्रांना एकूण ५ गुणांकन (रेटिंग) प्रणाली देण्यात आली आहे.नागरिकांनी क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित सेवा केंद्राविषयी आपला अभिप्राय, सूचना अथवा तक्रार थेट ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येणार आहे.या प्रणालीमुळे सेवा केंद्रांमधील कामकाजाची गुणवत्ता तपासणे तसेच नागरिकांच्या समाधानाचा आढावा घेणे अधिक सुलभ होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी संबंधित अभिप्राय क्युआर कोड केंद्राच्या दर्शनी भागात नागरिकांना स्पष्टपणे दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे.तसेच सेवा घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना क्युआर कोड स्कॅन करून अभिप्राय देण्याबाबत प्रोत्साहित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून,आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.तसेच नागरिकांनी संबंधित क्युआर कोड स्कॅन करून सेवा केंद्रांबाबत आपला अभिप्राय नोंदवावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 00000000000