Saturday, 14 January 2017

कै.अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार प्रदानाचा दिमाखदार सोहळा ॲड.उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत उस्मानाबादेत संपन्न



उस्मानाबाद, दि. 14:- प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे  महत्वाचे अंग आहे त्यामुळे बातमीमध्ये सत्यता असली पाहिजे  आणि बातमीचे शिर्षक हे कॅची असले पाहिजे . परंतू  पत्रकारितेतील स्पर्धा ही  वाईट असते, बातमी घेताना किंवा लिहिताना  त्या स्पर्धेतून समाजाचे  नुकसान  होऊन  नये ,असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आज केले .
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील, पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते  आज प्रदान करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी श्री. निकम हे बोलत होते.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सलग २२ वर्षापासून मराठवाड्यातील पत्रकारांना कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते . विशेषवार्ता व शोधवार्ता अशा दोन गटामध्ये स्पर्धा प्रवेशिका पत्रकारांकडून मागविल्या जातात. त्यामधून पुरस्कारासाठी निवड केली जाते़ सन २०१३-१४ मधील ७ तर २०१५-१६ या वर्षात ६ पत्रकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे तर पुरस्कार वितरण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप हेही उपस्थित होते .
या पुरस्कार वितरण सोहळ्यास  पत्रकार संघाचे सचिव संतोष जाधव, प्रांत प्रतिनिधी मोतीचंद बेदमुथा, सहसचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, संघटक प्रशांत कावरे, विनोद बाकले, अमजद सय्यद, मल्लिकार्जुन सोनवणे, लक्ष्मीकांत शिंदे, कैलास चौधरी, उपाध्यक्ष श्रीकांत कदम व अब्बास सय्यद, तालुकाध्यक्ष प्रमोद कांबळे, सुरेश घाडगे, गौतम चेडे, बालाजी वडजे, विलास मुळीक, इक्बाल मुल्ला, सुभाष कदम या मराठवाड्यातील पत्रकारांसह सर्व क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी उपस्थितांना संबोधताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की , यशस्वी लोकशाहीसाठी पत्रकारिता खूप आवश्यक आहे. लोकशाहीला बळकट करणारे  काम ज्या पत्रकारांनी केले त्या  पत्रकारांचा आज सन्मान करण्यात येत आहे .
२०१३-१४ चे पुरस्कार- उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने २०१३-१४ सालचे कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार पुढीलप्रमाणे : शोधवार्ता गट - तुषार बोडखे (औरंगाबाद) प्रथम, वामन पाठक (औसा जि.लातूर) द्वितीय, सचिन वाघमारे (पुणे) तृतीय, विशेषवार्ता गट - हरी मोकाशे (लातूर) प्रथम, रवींद्र कुलकर्णी (नांदेड) व अनिल पोरवाल (हिंगोली) द्वितीय तर सचिन वाघमारे (पुणे) यांना तृतीय पुरस्कार यावेळी ॲड. उज्वल निकम यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह , शाल श्रीफळ व रोख रक्कम देवून प्रदान करण्यात आला .
तर २०१५-१६ चे  कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार - शोधवार्ता गटात संदीप अंकलकोटे (चाकूर,जि़ लातूर) प्रथम, दै. पुण्य नगरीचे प्रतिनिधी बालाजी वडजे (उमरगा,जि़ उस्मानाबाद) द्वितीय,रमेश कदम (आखाडा बाळापूर, जि़ हिंगोली) यांना तृतीय पुस्कार जाहीर झाला आहे़ विशेषवार्ता गटात हरीहर धूतमल (लोहा,जि़ नांदेड) प्रथम, प्रदीप तरकसे (अंबाजोगाई, जि़ बीड) द्वितीय, चंद्रकांत तारू (पैठण, जि़ औरंगाबाद) तृतीय क्रमांक  यांनी पटकावला आहे . यांनाही यावेळी ॲड. उज्वल निकम यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह , शाल श्रीफळ व रोख रक्कम देवून  पुरस्कार प्रदान करण्यात आला .
यावेळी या स्पर्धेचे परीक्षक देवीदास वडगावकर आणि राजेंद्र अत्रे यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  भैरवनाथ कानडे , पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले तर  ज्येष्ठ पत्रकार राजा वैद्य यांनी  उपस्थित सर्वांचे आभार मानले . यावेळी  राज्य शासनाच्या पत्रकारिता पुरस्काराकरिता  पत्रकरांनी आपले अर्ज दि. 31 जानेवारी 2017 पर्यंत दाखल करावेत असेही  आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
****


Friday, 13 January 2017

रामकृष्ण परमहंस विद्यार्थी बँक आदर्श मॉडेल व्हावे ! -आशा बंडगर



उस्मानाबाद , दि. 13 :- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेली  विद्यार्थी बँक जिल्ह्यातच नव्हे तर  राज्यातही आदर्श मॉडेल व्हावे अशी अपेक्षा जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती सहायक  आशा बंडगर यांनी व्यक्त केली .
दिनांक 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती तसेच युवक दिनाचे औचित्य साधून  येथील  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विद्यार्थी  बँकेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या . यावेळी  प्राचार्य डॉ. युवराज भोसले हे अध्यक्षस्थानी होते. तर प्राचार्य डॉ. सपकाळ , प्रा. वाघ , महाविद्यालयातील  इतर शिक्षक व शिक्षकेतर वर्ग आणि  वाणिज्य शाखेचे   विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते . 
या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना श्रीमती आशा बंडगर म्हणाल्या की, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या या बँकेचा निर्णय खरोखरच कौतुकास्पद असून इतरांनी आदर्श घ्यावा असा आहे . या विद्यार्थी बँकेवर विद्यार्थ्यांमधूनच बँकेचे व्यवस्थापक,  सहायक व्यवस्थापक , रोखपाल या  पदांवर  विद्यार्थ्यांचीच निवड करण्यात आली असून हे विद्यार्थीच बँकेचे कामकाज हाताळणार आहेत .
या कार्यक्रमप्रसंगी  वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना  श्रीमती बंडगर म्हणाल्या की,  विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील पदवीच्या शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेचीही तयारी करावी यामुळे पदवी प्राप्त केल्यानंतर प्रशासनात जाणे सोयीचे होईल.  नोटाबंदीमुळे मानवी आर्थिक व्यवहाराच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली असून आर्थिक व्यवहारात बळकटी व सुलभता निर्माण होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी  कॅशलेस व्यवहाराकडे वळावे, विद्यार्थ्यांनी कॅशलेस व्यवहारासाठी मोबाईल ॲप, प्रिपेड कार्ड, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, ई-वॉलेट यासारख्या सुविधांबरोबर , एटीएम कार्ड स्वाईप करुन डिजिटल व्यवहार करावेत आणि बँकांच्या  या सर्व ऑनलाईन  सोयीसुविधांचा फायदा घ्यावा, असेही श्रीमती बंडगर यावेळी म्हणाल्या .

विशेष सहाय्य योजनेतंर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे



            उस्मानाबाद, दि.13:- विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्वापकाळ योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना आदी योजनेतंर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी ज्या लाभाथ्‍र्यांची खाते राष्ट्रीयकृत बॅंकेत नाहीत अशा लाभाथ्‍र्यांनी त्यांचे खाते तात्काळ नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेत काढून बॅक खाते क्रमांकाची छायांकीत प्रत व संमतीपत्र, आधार कार्ड, मोबाईल क्रमांकासह तात्काळ संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात तात्काळ दाखल करावेत, असे आवाहन तहसिलदार, तुळजापूर यांनी केले आहे.

जिल्ह्यात कलम 144 लागू


शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम-2017

उस्मानाबाद, दि.13:- भारत निवडणूक आयोगाने दि.4 जानेवारी 2017 रोजी शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम-2017 घोषित केलेला आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सद्य:परिस्थितीत एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची खात्री झाली असल्याचे  अप्पर जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे .
            त्याअर्थी अपर जिल्हाधिकारी ,उस्मानाबाद यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये त्यांना प्रधान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम  ज्या कालावधीसाठी घोषीत केलेला आहे. त्या कालावधीत सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या  परिसरात निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत, मतदार केंद्राचे परिसरात मतदान दिवशी तसेच मत मोजणी  केंद्राच्या परिसरात दि.12 जानेवारी ते दि.9 फेबु्वारी 2017 पर्यंत 100  मीटरच्या  परिसरात बंदी आदेश लागू करण्यात आले  आहेत.
            या आदेशाचा भंग केल्यास ती व्यक्ती  भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल, हे आदेश शासकीय कर्तव्ये पार पाडणाऱ्या व्यक्ती , दंडाधिकारीय शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी/ कर्मचारी, यांना वगळून लागू राहतील,

            हे आदेश उस्मानाबाद जिल्हयासाठी दि. 12 जानेवारी 2017 ते निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत अंमलात राहतील.                  **** 

Thursday, 12 January 2017

सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे ! -निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव



उस्मानाबाद, दि.12:- जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात  सर्व  राजकीय पक्ष, हॉटेल व्यावसायिक , बारचालक तसेच सर्व खातेप्रमुखांची बैठक आयोजित  करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी उपस्थित सर्वांना निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव यांनी खालीलप्रमाणे सूचना दिल्या -
सत्तेत  असलेल्या  राजकीय  पक्षाचा मतदारांवर  प्रभाव  पडेल असे नवीन प्रकल्प  किंवा  कार्यक्रम  किंवा कोणत्याही  स्वरुपातील  सवलती किंवा वित्तीय  अनुदाने घोषित  करणे अथवा  त्यांची  आश्वासने  देणे किंवा  त्यांची कोनशिला  बसविणे  इत्यादीस मनाई  असेल, निवडणुकीच्या  कामकाजाशी  संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या बदलीवर पूर्णपणे बंदी असेल,आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय  या कालावधीमध्ये  शासनामध्ये/सार्वजनिक  उपक्रमांमध्ये  कोणत्याही  नियुक्त्या किंवा पदोन्नत्या  करण्यात करण्यात येऊ नयेत,निवडणूक  प्रचार कार्यासाठी  शासकीय  वाहनांचा  वापर करता  येऊ शकणार नाही, निवडणुकीच्या काळात  दारुचे वाटप करण्यात येऊ नये तसेच कोणालाही प्रलोभने  दाखवू नयेत,ई- महा सेवा केंद्रांना अद्ययावत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या,त्याशिवाय उमेदवारांना  ऑनलाईन फॉर्म भरताना  काही अडचण आल्यास  त्यांना मार्गदर्शनासाठी  म्हणून  हेल्प बेस सुरु करण्यात येणार आहेत.
याशिवाय हॉटेल व्यावसायिक व बारचालक यांना यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मतदारांना प्रभावित  करण्यासारख्या कृती करु नयेत अशा सूचना दिल्या. खातेप्रमुखांच्या बैठकीत  सर्व खातेप्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील अधिकारी /कर्मचारी व वाहनांची  अद्ययावत  माहिती तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी,प्रत्येकाने  आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे,  निवडणुकीच्या प्रशिक्षण कार्यक्रमास  कोणीही गैरहजर राहू नये  अशा सूचना यावेळी सर्व संबंधितांना दिल्या .
या बैठकीस तहसिलदार सुजित नरहीरे, तहसिलदार अभय म्हस्के व सर्व विभागांचे प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी  उपस्थित होते .
****


एसटी महामंडळ रस्ते सुरक्षितता पंधरवडा साजरा करणार

           
उस्मानाबाद,दि.12:- एसटी महामंडळाच्या वतीने दि. 10 ते 25 जानेवारी 2017 या कालावधीत सुरक्षितता पंधरवडा साजरा केला जाणार आहे.
'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद घेऊन गेली 69 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दररोज सुमारे 65 लाख प्रवाशांची ने आण करणारे एस टी महामंडळ प्रवाशांच्या विश्वासास पात्र ठरले आहे ते केवळ दीर्घकाळ सुरक्षित प्रवासाचे अभिवचन पाळल्यामुळे, दि. 10 ते 25 जानेवारी 2017 या कालावधीत एसटी महामंडळाचा सुरक्षित पंधरवडा यासाठी कृतीशील सहभाग राहणार आहे.  एसटी महामंडळ अगदी भरतीपासून चालकाचे समुपदेशन करून सुरक्षित प्रवास, चालकाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण वैद्यकीय तपासणी, अशा विविध मार्गानी अपघात विरहित सेवा देण्यासाठी एस टी महामंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच सुरक्षित सेवा बजावणाऱ्या चालकांना प्रोत्साहित करण्यासाठी रोख  बक्षीसे, प्रमाणपत्रे, सुरक्षित सेवेचे बिल्ले देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशा प्रकारे  विविध उपक्रमाच्या माध्यमातून सुरक्षितता पंधरवडा साजरा केला जाणार आहे.

                             ****** 

माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक नियुक्तीबाबत


उस्मानाबाद,दि.12:- माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या शिक्षकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
        माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण मे, जून 2017 मध्ये देण्यात येणार आहे, या प्रशिक्षणापूर्वी तज्ञ मार्गदर्शकांसाठी दोन ते तीन दिवसाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण एप्रिल 2017 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या शिक्षकाकडून पात्रतेच्या निकषानुस वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या तज्ञ मार्गदर्शकांसाठी अर्ज http:/training.mh-hsc.ac.in या लिंकवर ऑनलाईन भरावा.
        तज्ञ मार्गदर्शक पदासाठी अर्हता/पात्रता पुढीलप्रमाणे आहे, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, विद्यापीठ स्तरावरील शिक्षक, शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील शिक्षक, माध्यमिक शाळेतील किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक.
        वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण तज्ञासाठी माध्यमिक शाळेत प्रत्यक्ष  शिकविण्याचा शैक्षणिक अनुभव किमान 12 वर्षाचा असावा, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे, वरिष्ठ महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव किमान 15 वर्षाचा असावा.
        निवडश्रेणी प्रशिक्षणतज्ञासाठी अर्हता-माध्यमिक शाळेत प्रत्यक्ष  शिकविण्याचा शैक्षणिक अनुभव किमान 24 वर्ष असावा, निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे, वरिष्ठ महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव किमान 15 वर्षाचा असावा.

        या भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत दि.31 जानेवारी 2017 च्या आत राज्यमंडळ कार्यालयास सादर करावयाचा आहे. त्यातून प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शकांची निवड करण्यात येईल.

सैन्य व पोलीस दलासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन व निवड चाचणी


            उस्मानाबाद,दि.12:- सैन्य व पोलीस दलात भरती होवू इच्छिणा-या युवकांसाठी प्रशिक्षण देवून भरती योग्य  बनविण्यासाठी  महाराष्ट्र  शासन अंगिकृत महाराष्ट्र माजी सैनिक  महामंडळाद्वारे (मेस्को) संचलित,  मेस्को करीअर कॅडमी, करंजे नाका, सातारा येथे  कार्यरत आहे.
सैन्य व पोलीस भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन व शिबिरासाठी  उमेदवारांची निवड करण्यासाठी मेस्को करीअर अॅकडमीचे प्रतिनिधी  उस्मानाबाद येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह , खाजानगर येथे  दिनांक  25 जानेवारी  2017 रोजी भेट देणार आहेत.  
            या प्रशिक्षणाचा समाजाच्या सर्व स्तरातील सर्व युवकांसाठी असून उस्मानाबाद जिल्हयातील इच्छूक व पात्र उमेदवारांनी दिनांक 25 जानेवारी 2017  रोजी सकाळी 10.00 वाजता, सैनिकी मुलांचे वसतिगृह, खाजानगर, उस्मानाबाद  येथे निवड चाचणीसाठी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रकांसह हजर राहून या  योजनेचा लाभ घ्यावा. निवड चाचणीनंतर पात्र ठरलेल्या युवकांना प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. प्रवेश दिलेल्या युवकांनी प्रवेश शुल्क रक्कम रु 200/- त्वरीत भरुन शिबिरातील आपला प्रवेश प्रवेश निश्चित करावा. 
उर्वरित मासिक शुल्क रूपये 6 हजार 300 प्रवेशाची वेळी भरावी. काही अपरिहार्य कारणामुळे जे उमेदवार निवड चाचणीसाठी हजर राहु शकत नाहीत ते मेस्को करीअर अॅकडमी, सातारा येथे येऊन थेट प्रवेश घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळात मोबाईल क्रमांक 9168986864  किंवा 7588624043  वर संपर्क साधावा, तसेच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ व मेस्कोच्या (www.mescoltd.co.in)  या संकेतस्थळास भेट दयावी असे, आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केलेले आहे.

आंबा मोहोरांवरील फुलकीडीचॆ नियंत्रण


        उस्मानाबाद,दि.12-आंबा  मोहोरावर फुलकिडीचा प्रादूर्भाव दिसून यॆत आहॆ सूक्ष्म कीड काऴजीपूर्वक निरिक्षण कॆल्यानंतर दिसून यॆतॆ. या कीडीचा पिल्लांचा रंग पिवऴसर असून आकार  निमुऴता   लांबी 1 मि.मि. असतॆ. या कीडीची पिल्लॆ मोठॆ  फूलकीडॆ  पालवी, मोहोर यावर खरवडून रस शोषण करतात तसॆच कोवऴ्या  फऴांची  साल  खरवडतात  त्यामुऴॆ  अशा फऴांची  साल  काऴपट  तांबूस  रंगाची होतॆ.

            आंबा मोहोरावरील  फूलकीडॆ  नियंत्रणासाठी  थायोमिथोक्झाम 2 (दोन) ग्रॅंम प्रती 10 लिटर पाण्यात मिसऴून फवारणी करावी.आंबा मोहोरावर भुरी रोगाचा प्रादूर्भाव दिसून यॆत असल्यास किटकनाशकाच्या  द्रावणात गंधक (80 टक्कॆ) 20 ग्रॅम किंवा  हॆक्झाकोनॅझोल (5 टक्कॆ) 5  मिली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसऴून वापरावॆ. हॆ प्रमाण साध्य़ा पंपासाठी असून पॉवर स्प्रॆअरनॆ फवारणी करताना किटकनाशकाचॆ  प्रमाण  तिप्पट  करावॆ,  अशी माहिती  उपविभागीय कृषी अधिकारी, भूम  यांनी दिली आहॆ.

जिल्हयात शस्त्र व जमावबंदी


            उस्मानाबाद,दि.12:- जिल्ह्यात 10 ते  21 जानेवारी  2017 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी  यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या कालावधीत जिल्हयात नागरिकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तू बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यास बंदी राहील.
            आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाहीत. सभ्यतेस व नीतीमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाहीत.
तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे आदेश दि.10 ते 21 जानेवारी, 2017 रोजीच्या  मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. 


परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

                  
उस्मानाबाद,दि.12:-उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 29 जानेवारी  2017 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विक्रीकर निरिक्षक पूर्व परीक्षा -2016 सकाळी 10-30 ते 12-00  या कालावधीत पुढील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे-
            तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज पहिला व दुसरा मजला पार्ट –ए, छत्रपती शिवाजी हायस्कूल,तांबरी विभाग, व्ही.जे.शिंदे कॉलेज,वरूडा रोड, रामकृष्ण परमहंस पार्ट ए व बी,जिल्हा परिषद (कन्या)प्रशाला शहर पोलीस शेजारी, विद्यामाता  हायस्कूल  सांजा नाका उस्मानाबाद.

            या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे,परीक्षार्थींना कसलाही अडथळा येऊ नये या दृष्टीने परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास पाबंद करणे, तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स,ई-मेल, रेडियो, इंटरनेट सुविधा, भ्रमणध्वनी (मोबाईल), संगणक, गणनायंत्र व अशा इतर प्रकारच्या स्वरूपातील बाबी विद्यार्थांना पुरवठा करण्यात येवू नये म्हणून  या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात दि.29 जानेवारी  2017 रोजी सकाळी 8-00 ते दुपारी 3-00 पर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी फौजदारी पक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्यवये उक्त परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

lokrajya daud FTP

“लोकराज्य युवा दौड -2017” राज्यातील उस्मानाबाद पॅटर्न-डॉ. दीपाली धाटे-घाटगे







                                                           

उस्मानाबाद, दि.12:- जिल्हा माहिती कार्यालय , नेहरु युवा केंद्र , जिल्हा क्रीडा कार्यालय , परिवहन विभाग, जिल्हा रुग्णालय, ग्रंथालय विभाग, स्वच्छता मिशन  तसेच जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लोकराज्य युवा दौड -2017 हा उपक्रम राज्यातील उस्मानाबाद पॅटर्न ठरेल असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ . दीपाली घाटगे यांनी केले .
आज उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस मुख्यालय परिसरात स्वामी विवेकानंद जयंती , माँ जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवक दिन सप्ताहानिमित्त लोकराज्य युवा दौड या कार्यक्रमाचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन प्रसंगी डॉ. घाटगे बोलत होत्या . या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , नेहरु युवा केंद्राचे  समन्वयक विनायक धेंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे , सहायक मोटार वाहन निरीक्षक  श्री. मोडक, श्री. सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरीश खेडकर , शिक्षण विभागाचे प्रतिनिधी ,शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, रमाकांत गायकवाड आणि त्यांचे सहकारी, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा तसेच इतर पत्रकार आदी उपस्थित होते.
लोकराज्य युवा दौड 2017 कार्यक्रमापूर्वी स्वच्छ भारत अंतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन लोकराज्य युवा दौड प्रारंभ करण्यात आली व लोकराज्य घरोघरी पोहचविण्याचा संकल्प केला.  या युवा दौडमध्ये प्रामुख्याने प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,नेहरु युवा केंद्राचे विकास कुलकर्णी  तसेच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेणारी कुमारी सुनिता राजेंद्र पवार,कुमारी निता विठ्ठल पवार, क्रीडा विभागाच्या नेहरु युवा केंद्राच्या विद्यार्थींनीनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून उस्मानाबादकरांची मने जिंकली . 
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.दीपाली घाटगे म्हणाल्या की, जिल्हा माहिती कार्यालय व इतर शासकीय विभागांच्या समन्वयाने आयोजित केलेली लोकराज्य युवा दौड 2017 हा कार्यक्रम स्तुत्य असून यापासून आपण सर्व काही तरी चांगले शिकत आहोत. शासनाच्या  विविध विभागांनी असेच सामूहिक कार्यक्रम घेतल्यास जनतेची कोणतीही कामे सहज होण्यास मदत होते.भविष्यात अशा कार्यक्रमात पोलीस विभागही आपल्यासोबत हिरीरीने सहभाग नोंदवेल अशी ग्वाही  त्यांनी  यावेळी दिली .
साधारणत: अडीच कि.मी.ची लोकराज्य युवा दौड 2017 ही पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानापासून ते शिवाजी चौक, आंबेडकर चौक, समता कॉलनी, सह्याद्री कॉर्नर, कोहिनूर हॉटेल ते पोलीस अधीक्षक कार्यालय मैदानावर सांगता समारंभासाठी आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी लोकराज्य युवा दौड 2017 कार्यक्रमाची रुपरेषा विशद करुन  उस्मानाबाद जिल्हा हा प्रशासनात सर्वांचा संवाद घडवून आणणारा जिल्हा म्हणून पुढे येत आहे,असे म्हणूनलोकराज्य मासिकाचे  महत्व पटवून दिले. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समयसूचकतेचे भान ठेवून अचूक  प्रसंग दाखवून निर्णय घ्यावा तसेच सर्वांनी मिळून एकत्रितपणे निर्णय घेतल्यास कोणतेही न होणारे काम सहज होते. यासाठी सर्वांनी प्रशासनात एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील म्हणाले की , जिल्हा माहिती कार्यालय व इतर सर्वच विभागांनी हा लोकराज्य युवा दौड कार्यक्रमात  तीन संदेश एकाच वेळेस देऊन साध्य केले आहे,असे विशद करुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी नेहरु युवा केंद्राचे समन्वयक विनायक धेंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक यांचे शुभेच्छापर भाषणेही झाली.
 “लोकराज्य युवा दौड 2017 या कार्यक्रमात जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांची 108 क्रमांकाची  रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश घोळवे व रुग्णवाहिकाचालक श्री.शहाजी इंगळे यांनी या रुग्णवाहिकेवरुन  विविध शासकीय विभागांची माहिती ध्वनीक्षेपकाद्वारे देण्यात आली.
 चारचाकी वाहनांनी सीट बेल्ट  लावूनच वाहने चालवावीत याबाबत जनतेमध्ये जागृती वाढावी यासाठी या मोहीमेत उस्मानाबाद येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्कूल बसनेही सहभाग नोंदविला आणि या मोहीमेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिरवी झेंडी  दाखवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी  परिवहन विभागाचे वाहने तसेच कुलकर्णी ड्रायव्हिंग स्कूल व इतर ड्रायव्हिंग स्कूल यांनीही सहभाग नोंदविला .
शेवटी जिल्हा माहिती अधिकारी श्री. सानप यांनी  जिल्ह्यातील सर्व विभागांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रम संपला असे जाहीर केले .
****


Wednesday, 11 January 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीकरिता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती


      उस्मानाबाद.दि.11:- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरिता उपजिल्हाधिकरी  व  तहसिलदार  संवर्गातील अधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत  नारनवरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी  व सहायक निवडणूक अधिकारी यांची  नेमणूक  केली आहे.
      निवडणूक निर्णय अधिकारी  निवासी  उपजिल्हाधिकारी (बीड) चद्रकांत सूर्यवंशी सहायक निवडणूक अधिकारी  तहसिलदार उस्मानाबाद राहुल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

                                            *****

गाव तिथे विवेकानंद युवा मंडळ या मोहिमेत तरुणांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे-विनायक धेंडे

 उस्मानाबाद,दि.11:- भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालय अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद मार्फत जिल्हयातील 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींना आवाहन करण्यात येते की गाव तिथे विवेकानंद युवा मंडळ या मोहिमेत सहभागी होऊन राष्ट्र उभारणीसाठी नेहरु युवा केंद्राच्या या चळवळीमधून आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सहभागी व्हावे, जसे की युवा नेतृत्व व सामाजिक विकास प्रशिक्षण, युथ पार्लमेंट, युवा मंडळ विकास कार्यक्रम, तालुकास्तर क्रीडा स्पर्धा युवतींना कौशल्य विकास अशा विविध उपक्रमात सहभाग वाढवावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे श्री.विनायक धेंडे यांनी केले आहे.                                                 ****** 

प्राथमिक जेष्ठता सूची जाहीर


उस्मानाबाद,दि.11:- महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठ विनियमन ) नियमावली 1982  अन्वये मंडळ अधिकारी  संवर्गातील दि.1 जानेवारी 1982 ते 30 डिसेंबर 2015 या कालावधीची जेष्ठता सूचीसाठी उस्मानाबाद जिल्हयातील या कालावधीची प्राथमिक जेष्ठता सूची www.osmanabad.nic.in या संकेतस्थळावर  प्रसिध्द  करण्यात  आलेली  आहे.

तरी मंडळ अधिकारी  संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नती झालेले/निलंबित/सेवानिवृत्त कर्मचारी  तसेच  मयत  कर्मचारी यांचे  वारस  यांनी या प्राथमिक  जेष्ठता  सूचीबाबत आक्षेप असतील  तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि. 23 जानेवारी 2017 पूर्वी आक्षेप सादर करावेत,असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनरे यांनी कळविले आहे.                           

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


उस्मानाबाद.दि.11- जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे सन प्राचार्य यांना कळविण्यात येते की, सन 2015-16 या शैक्षणिक वर्षातील  मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती,शिक्षण फी, परीक्षा फी व निर्वाह भत्ता या योजनेचे अर्ज भरण्याचा अंतिम दि.31 जानेवारी 2017 असून या दिनांकापूर्वी शिष्यवृतीचे अर्ज संगणक प्रणालीद्वारे भरण्यात यावेत व हे शिष्यवृतीचे प्रस्ताव या कार्यालयास मंजूरीस्तव सादर करण्यात यावेत.

            प्रस्ताव  सादर करतेवेळी त्यासोबत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न केलेला पुरावा सोबत जोडण्यात यावा. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्यास सदर विद्याथ्याचे अर्ज मंजूर होणार नाहीत याची नोंद घ्यावी, ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जास व बँक खात्यास आधार क्रमांक संलग्न केला नसल्यास त्यांनी तात्काळ आधार क्रमांक बँक खात्याशी व शिष्यवृत्ती अर्जास संलग्न करावा. या विहित कालावधीत विद्यार्थ्यांचे अर्ज सादर न केल्यास या  विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती, शिक्ष्‍ाण फी अदा करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल असे आवाहन  समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त  यांनी  केले आहे . **** 

@Rasta Suraksha Saptah FTP

रस्त्यावरची गाडी चांगली चालवायला शिकलात तर आयुष्याची गाडी चांगली चालवाल ! जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे





उस्मानाबाद, दि.11:- मुले वयात यायला लागताच, आताच्या जीवन शैलीची गरज म्हणून  बहुतांश  लोकं  दोन चाकी , चार चाकी  वाहने खरेदी करतात. मात्र  आपल्या  मुलांच्या सवयींना, हट्टांना  आपणच  आवर घातला  पाहिजे,  सोळावं वरीस धोक्याचं असते, रस्त्यावरची गाडी चांगली चालवायला शिकलात तर आयुष्याची गाडी चांगली चालीवाल , असे प्रतिपादन जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी आज येथे केले. 28 वा रस्ता  सुरक्षा सप्ताह  व राज्य रस्ता  सुरक्षा  अभियान 2017 निमित्त श्रीपतराव भोसले हायस्कूल  येथे आयोजित  जनजागृती कार्यक्रमात  ते बोलत होते .
यावेळी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, श्रीपतराव भोसले  हायस्कूलचे  संस्थापक  सरचिटणीस  के.टी. पाटील, अतिरिक्त  पोलीस  अधीक्षक डॉ. दिपाली घाटगे,  एस.टी. महामंडळाचे  विभागीय  नियंत्रक  राजीव साळवे  हे उपस्थित होते . 
डॉ. नारनवरे म्हणाले की , नियम सर्वसामान्यांच्या  हितासाठी  असतात, नागरिकांनी याची जाणीव  ठेवावी व  समजून घ्यावे , अति आत्मविश्वास  नडतो  , आपलेच नुकसान होते , सन्मानाने जगण्यासाठी नियमांचे पालन व अभ्यास हा मार्ग अवलंबिला पाहिजे . आपल्या चुकीमुळे  आपण इतरांच्या जीवाला  धोका निर्माण करु नये.तसेच आपण फक्त हेल्मेट/रस्ता सुरक्षा पुरतीच मर्यादित न राहता  चांगला  नागरिक  म्हणून  जगता आले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवनाचे मूल्य, शिक्षण  कशासाठी  हे शिकवावे,  शिक्षण घेण्याच्या संधीने आपल्या व  इतरांच्या  आयुष्याचे  सोने करावे . असेही डॉ. नारनवरे यांनी उपस्थितांना सांगितले. भारत  2025 पर्यंत  सर्वात तरुण राष्ट्र  असणार आहे व याचे आपण महत्वाचा भाग असणार आहात.जे 16 वर्षांखालील मुले  गाडी चालविताना  सापडतील  त्यांच्या  पालकांना बोलावून समज द्यावी,असे डॉ. नारनवरे यांनी वाहतूक शाखेस आवाहन केले.
यावेळी मनोगत  व्यक्त करताना  नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर  म्हणाले की , वाहतुकीची शिस्त पाळणे आवश्यक आहे,16 वर्षांखालील विद्यार्थ्यांनी कोणतेही वाहन चालवू नये,हॉर्न न वाजविण्याबाबत  विद्यार्थ्यांनी  त्यांच्या पालकांना सांगावे , तसेच  वाहन चालविताना  जीवघेणी  स्पर्धा करु नये. 
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्तेसुरक्षित  ड्रायव्हिंग मार्गदर्शिका या पुस्तिकेचे  प्रकाशनही करण्यात आले .
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते  यांनी आपल्या  मार्गदर्शनपर भाषणात  वाहतुकीची शिस्त,  हॉर्न वाजविणे , नियमांच्या  पालनाबाबतची  जनतेची  उदासीनता इत्यादी गोष्टींबाबत  खंत व्यक्त केली व  वाहतुकीच्या नियमांचे  सर्वांनी  पालन  करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, येणाऱ्या  पीढीला  रस्ते सुरक्षा नियमांचे, भविष्यातील सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याविषयी  माहिती देणारा हा उपक्रम स्तुत्य तर आहेच मात्र आवश्यकही आहे.  नियमांचे  पालन सर्वांनीच  करणे स्वत:साठी , कुटुंबासाठी  गरजेचे आहे.  लहानपणापासूनच  मुलांना या विषयाची जागृती  आवश्यक आहे. 
यानंतर प्रशासकीय अधिकारी एन.एम. हाजगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले . तसेच एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक  राजीव साळवे यांनी विद्यार्थ्यांसाठी एस.टी. महामंडळाच्या सोयी सुविधा आणि राबविण्यात येणारे उपक्रम यांविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक  महेश पाटील  यांच्या सुमधूर  आवाजातील  स्वागतगीताने झाली.यावेळी  काव्यदूत संजय आंधळे यांची  रोडपेक्षा घातक … घोडदौड … ही कविता इयत्ता  12 वी  मधील विद्यार्थीनी  नम्रता साळुंके हिने उपस्थितांसमोर सादर केली.
या कार्यक्रमास उप प्रादेशिक  परिवहन अधिकारी  विलास कांबळे , जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप , सहायक पोलीस निरीक्षक  शहर वाहतुक शाखा प्रशांत पाटील , श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य सुधीर पडवळ आदी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  सहशिक्षक  सूर्यकांत पाटील यांनी केले . तर प्रस्तावना  उप प्रादेशिक  परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले .
****


पत्रकार दिन

Tuesday, 10 January 2017

पत्रकार दिनानिमित्त तसेच “बळीराजा चेतना अभियानांतर्गत”




शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा पत्नींचा पत्रकार आणि शासकीय अधिकारी यांच्याशी सुसंवाद तसेच आरोग्य शिबिर संपन्न
उस्मानाबाद, दि.10:- काम करताना शिस्त ही महत्वाची बाब आहे . आपण ज्या संस्थेसाठी काम करतो तेथे अतिउत्कृष्ट पध्दतीने काम केले पाहिजे जेणेकरुन आपण त्या संस्थेची संपत्ती बनलो पाहिजे. शासकीय योजना या  सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे यासाठी प्रत्येक शासकीय विभाग अहोरात्र कार्यरत असते, त्यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने  कोणाला प्रेमाने सांगून,काहींना नियम दाखवून तर काहींना रागावून या  योजनांवर अंमलबजावणी  करण्यासाठी प्रवृत्त करत असतात, असे  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  आज जिल्हा‍ नियोजन समिती सभागृहात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपस्थितांना मार्गदर्शन केले .
दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकरांनी रोवली. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून  सर्वत्र साजरा केला जातो.
यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील  विधवा पत्नींना शासकीय योजनांची  माहिती व्हावी या हेतूने या महिलांचा जिल्हयातील प्रमुख शासकीय विभागांच्या विभागप्रमुख तसेच पत्रकारांसोबत सुसंवाद आणि या सुसंवादानंतर उपस्थित सर्वांची आरोग्य तपासणी हे उपक्रम जिल्हा नियोजन सभागृह,मध्यवर्ती  प्रशासकीय इमारत येथे राबविण्यात आले .
प्रथम दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली . प्रास्ताविकामध्ये जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांनी पत्रकार दिनाचे  व या  कार्यक्रमाचे महत्व उपस्थितांना सांगितले .
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे,उप जिल्हाधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर,श्रीअरविंद लाटकर,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. कोंडेकर, श्री. रुकमे ,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  श्री. शिरीष जमदाडे , जिल्हा कोषागार अधिकारी  श्री. विशाल पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  श्री. कांबळे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे, नेहरू  युवा केंद्राचे लेखाधिकारी श्री. विकास कुलकर्णी, उप शिक्षणाधिकारी (प्राथ)श्रीमती रोहिणी कुंभार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे श्री.सोमनाथ लामगुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गलांडे, डॉ. देशपांडे, वन विभागाचे (आरएफओ) श्री. म्हेत्रे , श्री.सावळे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्री. विनायक कोठारी आदी तसेच जिल्ह्यातील पत्रकार आणि सेव्ह फार्मर्स विडोज या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शिला उंबरे, संयोजिका महानंदा पहलवान आणि  जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व वारस यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
            या उपक्रमांतर्गत उपस्थित सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाची लोकोपयोगी योजनांची माहिती उपस्थितांना विस्तृत सादरीकरणाद्वारे दाखविली.यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी आणि इतर महिलांनी या अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधून  विविध शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली .
            यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात 111 जणांची बी.पी.,मधुमेह तपासणी,11जणांची एचआयव्ही तपासणी, 2 जणांची ईसीजी तर 5 जणांचे डोळे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड, अधिपारिचारिका श्रीमती कविता चाकाटे , श्रीमती नानेकर, प्रयोग शाळा तंत्रज्ञ श्री. सचदेव शिरसाठ, श्री. लक्ष्मीकांत मुंडे, समुपदेशक श्री.सुधीर कावळे यांनी तपासले .
            यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने  उपस्थितांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री, आशिष लगाडे  तर आभार  जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांनी मानले .

****