Friday, 3 April 2026
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची ऐतिहासिक झेप : १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
जिल्ह्याची ऐतिहासिक झेप : १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण
धाराशिव,दि.३ एप्रिल (जिमाका ) जिल्हा उद्योग केंद्राने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या महत्त्वाकांक्षी योजनेत १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.हे यश जिल्हाधिकारी यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचे जिल्हा उद्योग केंद्राकडून सांगण्यात आले.या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत उद्योजकतेला चालना देण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेतलेल्या आढावा बैठका,नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि प्रशासनातील समन्वय यामुळे संपूर्ण यंत्रणेला नवी दिशा मिळाली.विशेषतः प्रलंबित प्रकरणांच्या जलद मंजुरीसाठी बँक अधिकाऱ्यांसमवेत घेण्यात आलेल्या बैठका आणि दिलेले स्पष्ट निर्देश यामुळे कर्जमंजुरी प्रक्रियेतील अडथळे दूर झाले.परिणामी,अनेक प्रस्तावांना वेळेत मंजुरी मिळून लाभार्थ्यांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळाले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना केवळ कर्जपुरवठ्यापुरती मर्यादित नसून,ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणारी एक प्रभावी संधी आहे.या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती वाढून आर्थिक विकासाला गती मिळत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतिशील व संवेदनशील दृष्टिकोनामुळे जिल्ह्यातील शेकडो होतकरू युवक-युवतींच्या उद्योजक होण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले असून, रोजगार निर्मिती क्षेत्रात जिल्ह्याने नवा आदर्श निर्माण केला आहे.
या यशाबद्दल जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.
****
Thursday, 2 April 2026
सुधारित वृत्त एमबीए/एमएमएस - सीईटी परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ; केंद्र परिसरात कलम १६३ लागू
सुधारित वृत्त
एमबीए/एमएमएस - सीईटी परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ; केंद्र परिसरात कलम १६३ लागू
धाराशिव दि.२ (एप्रिल) एमबीए / एमएमएस सीईटी २०२६ ही परीक्षा सोमवार दि.६ एप्रिल ते बुधवार ८ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली असून,या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतन, धाराशिव या परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे.परीक्षार्थींना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
ही परीक्षा सकाळी ९ ते ११.३० व दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे.परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात बाह्य उपद्रव टाळण्यासाठी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,पानपट्टी, टायपिंग सेंटर,एसटीडी बूथ,इंटरनेट कॅफे,कॉम्प्युटर सेंटर्स आदी सेवा परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय मोबाईल फोन,सेल्युलर फोन,फॅक्स,ईमेल व इतर प्रसार माध्यमे परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कोणत्याही वाहनांना केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना तसेच परीक्षार्थ्यांच्या नातेवाईकांनाही प्रवेश नसेल.परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.केवळ परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी,शासकीय अधिकारी, शिक्षक व परीक्षार्थी यांनाच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.
हे आदेश दि.६ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील.आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
****
सहकार खात्यातील चौकशी अधिकाऱ्यांसाठी अर्ज मागविले
सहकार खात्यातील चौकशी अधिकाऱ्यांसाठी अर्ज मागविले
धाराशिव दि.२ एप्रिल (जिमाका) विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था,लातूर विभाग,लातूर यांचेकडून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ८३ व कलम ८८ अन्वये चौकशी /प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका तयार करण्यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेल्या अधिकारी (वयाची ७० वर्षे पूर्ण न झालेल्या),निवृत्त न्यायाधीश,वकिल,सनदी लेखापाल यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था,लातूर विभाग,लातूर,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,दुसरा मजला,लातूर तसेच जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, लातूर / धाराशिव / बीड / नांदेड व संबंधित जिल्ह्यातील सर्व उपनिबंधक व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात उपलब्ध राहणार आहेत.
हे अर्ज दि.३० मे २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. इच्छुक पात्र उमेदवारांनी भरलेले व पूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह वरील कालावधीत संबंधित कार्यालयात सादर करावेत,असे आवाहन विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
*****
एमबीए/एमएमएस - सीईटी परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ; केंद्र परिसरात कलम १६३ लागू
एमबीए/एमएमएस - सीईटी परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ; केंद्र परिसरात कलम १६३ लागू
धाराशिव दि.२ (एप्रिल) एमबीए / एमएमएस सीईटी २०२६ ही परीक्षा रविवार दि.६ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली असून,या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतन,धाराशिव या परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. परीक्षार्थींना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
ही परीक्षा सकाळी ९ ते ११.३० व दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे.परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात बाह्य उपद्रव टाळण्यासाठी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,पानपट्टी, टायपिंग सेंटर,एसटीडी बूथ,इंटरनेट कॅफे,कॉम्प्युटर सेंटर्स आदी सेवा परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय मोबाईल फोन,सेल्युलर फोन,फॅक्स,ईमेल व इतर प्रसार माध्यमे परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कोणत्याही वाहनांना केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना तसेच परीक्षार्थ्यांच्या नातेवाईकांनाही प्रवेश नसेल.परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.केवळ परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी,शासकीय अधिकारी, शिक्षक व परीक्षार्थी यांनाच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.
हे आदेश दि.६ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील.आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
****
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणार – तातडीने पंचनाम्यांचे आदेश : पालकमंत्री प्रताप सरनाईक
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणार – तातडीने पंचनाम्यांचे आदेश : पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव दि.२ एप्रिल (जिमाका) अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवले आहे.तीन दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीच्या तडाख्यातून सावरायच्या आतच काल झालेल्या पावसाने तुळजापूर,लोहारा यासह अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः केळी,द्राक्ष आणि आंब्याच्या मोहोराचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.काही ठिकाणी पिके उद्ध्वस्त झाली असून,शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू आहेत.यामुळे शेतकरी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांकडे व प्रशासनासमोर मांडल्या आहेत.
दरम्यान,हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची धास्ती आणखी वाढली आहे.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्याशी सलग तीन दिवस संपर्क ठेवला आहे.
आजही पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.कोकणात ज्या पद्धतीने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, त्याच धर्तीवर पारदर्शक आणि अचूक पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी जिल्हाधिकारी श्री.पुजार यांना दिले आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे,अशी अपेक्षा व्यक्त करत,शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
****
Tuesday, 31 March 2026
कर्णबधिरतेवर मात करत आंतरराष्ट्रीय नेमबाजीत झेप – चेतन सपकाळचा प्रेरणादायी प्रवास
कर्णबधिरतेवर मात करत आंतरराष्ट्रीय नेमबाजीत झेप – चेतन सपकाळचा प्रेरणादायी प्रवास
धाराशिव दि.३१ मार्च (जिमाका) जिद्द,चिकाटी आणि आईच्या अथक परिश्रमांच्या जोरावर कर्णबधिर असलेला चेतन हणमंत सपकाळ आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील पिस्तोल नेमबाज म्हणून झळकत आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्याने मिळवलेले यश हे केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे.चेतनचे शालेय शिक्षण पुण्यातील लक्ष्मणराव आपटे प्रशाला, एकात्मिक विशेष युनिट येथे झाले.त्यानंतर मराठवाडा मित्रमंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये इयत्ता ११ वी ते एम.कॉमपर्यंत शिक्षण घेत त्याने ७३ टक्के गुणांसह ‘ए’ श्रेणीत उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली. विशेष म्हणजे,कर्णबधिर असूनही त्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण पूर्ण केले.क्रीडा क्षेत्रातील त्याचा प्रवास सुरुवातीला बॅडमिंटनपासून झाला.
शालेय स्तरावर राष्ट्रीय पातळीवर पदक जिंकणारा चेतन कोरोनाकाळात गावाकडे परतल्यानंतरही स्वस्थ बसला नाही. इंटरनेटच्या माध्यमातून त्याने पिस्तोल नेमबाजीची माहिती घेतली आणि धाराशिवमधील प्रशिक्षक अजिम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला.२०१८ साली दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्याच्या पालकांनी घरच्या मोकळ्या जागेत १० मीटरची नेमबाजी रेंज उभारली आणि तेथूनच त्याच्या यशस्वी प्रवासाची खरी सुरुवात झाली.
गेल्या आठ वर्षांत चेतनने जिल्हा, राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.सप्टेंबर २०२४ मध्ये जर्मनी येथे झालेल्या जागतिक डेफ नेमबाजी स्पर्धेत त्याने दोन कांस्य आणि एक रौप्य पदक पटकावले. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये टोकियो येथे झालेल्या २५ व्या डेफ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवत देशाचा गौरव वाढवला.आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने एकूण चार पदके जिंकली आहेत.
राष्ट्रीय पातळीवरही त्याची कामगिरी तितकीच उज्वल आहे.विविध स्पर्धांमध्ये सहा सुवर्ण,सात रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण १४ पदके त्याच्या नावावर आहेत.राज्य स्तरावरही त्याने आपली छाप सोडली आहे.याशिवाय २०१६-१७ मध्ये दिव्यांग क्रीडा पुरस्कार आणि २०२२-२३ मध्ये गुणवंत खेळाडू पुरस्कार मिळवणारा तो धाराशिव जिल्ह्यातील पहिला दिव्यांग नेमबाज ठरला आहे.
चेतनच्या यशामागे त्याची आई सौ. सविता सपकाळ यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.गेली वीस वर्षे त्यांनी त्याच्या शिक्षणापासून ते क्रीडा प्रशिक्षण,आहार आणि स्पर्धांपर्यंत प्रत्येक बाबतीत अथक परिश्रम घेतले.आर्थिक,मानसिक आणि सामाजिक आव्हानांवर मात करत त्यांनी चेतनला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले.
धाराशिवसारख्या ग्रामीण भागातून उभा राहून जागतिक स्तरावर यश मिळवणारा चेतन सपकाळ हा केवळ एक खेळाडू नाही,तर ‘मर्यादा ही मनाची असते’ हे सिद्ध करणारा प्रेरणास्त्रोत ठरत आहे.
*****
ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत पीडितांना न्याय व आधार देणे हीच प्रशासनाची प्राथमिकता जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार ॲट्रॉसिटी प्रकरणातील वारसांना शासकीय नियुक्ती आदेश आंतरराष्ट्रीय नेमबाज चेतन सपकाळचा गौरव
ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत पीडितांना न्याय व आधार देणे हीच प्रशासनाची प्राथमिकता
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
ॲट्रॉसिटी प्रकरणातील वारसांना शासकीय नियुक्ती आदेश
आंतरराष्ट्रीय नेमबाज चेतन सपकाळचा गौरव
धाराशिव दि.३१ मार्च (जिमाका)अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा (ॲट्रॉसिटी कायदा) अत्यंत महत्त्वपूर्ण असून जातीय अन्याय निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले हे प्रभावी पाऊल आहे.दर महिन्याला जिल्हा दक्षता समितीच्या नियमित बैठका घेऊन बाधितांना आर्थिक व न्यायालयीन मदत करण्यात येते. त्यामुळे या कायद्यांतर्गत अत्याचार पीडितांना तातडीने मदतीसाठी आपण प्रयत्नशील आहोत,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
आज (दि.३१ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय धाराशिव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ॲट्रॉसिटी प्रकरणांतील मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय/निमशासकीय सेवेत नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात धाराशिवचा आंतरराष्ट्रीय दिव्यांग नेमबाज चेतन सपकाळ याचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पुजार होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, राजाभाऊ ओहोळ, विद्यानंद बनसोडे,महादेव वाघमारे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुजार पुढे म्हणाले की,चेतन सपकाळ हा जिल्ह्याचा अभिमान असून त्याने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवून जिल्ह्याचा मान उंचावला आहे.अनेक खेळाडूंना तो प्रेरणादायी ठरत असून त्याच्या आदर्शातून इतरांनीही प्रगतीची दिशा घ्यावी.तसेच ॲट्रॉसिटी कायद्याबाबत जनजागृती सुरू असून नियुक्ती आदेश मिळालेल्या वारसांनी शासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर म्हणाल्या की,अशा उपक्रमांमुळे सामाजिक विकासाला गती मिळत आहे.अत्याचार पीडितांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेणे ही महत्त्वाची बाब आहे.चेतन सपकाळच्या यशामागे त्याच्या आईचे योगदान मोठे असून त्या खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहेत.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते चेतन सपकाळ याचा त्याच्या आई - वडिलांसह भारतीय संविधान उद्देशिकेची प्रत,प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.तसेच नियुक्ती आदेश प्राप्त उमेदवारांनाही भारतीय संविधान उद्देशिकेची प्रत, नियुक्ती आदेश व पुष्प देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले,संचालन समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप यांनी केले.उपस्थितांचे आभार समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने यांनी मानले.कार्यक्रमाला नियुक्ती आदेश मिळालेल्या उमेदवारांसह त्यांच्या नातेवाईकांची व समाज कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.२० नोव्हेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ (सुधारित २०१५)अंतर्गत खून अथवा अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना शासकीय किंवा निमशासकीय नोकरी देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण २६ प्रकरणांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी २० प्रकरणे अनुसूचित जाती तर ६ प्रकरणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत.
सन २०१२ पासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणांपैकी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या १८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत १५ प्रकरणे (अनुसूचित जाती १२ व अनुसूचित जमाती ३) मंजुरीसाठी सादर करण्यात आली होती.या प्रस्तावांपैकी अनुसूचित जातीच्या १२ प्रकरणांना समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी नियुक्तीसाठी मंजुरी दिली आहे.त्यामधील ३ प्रकरणांमध्ये वारसांवर गुन्हे दाखल असल्याने प्रक्रिया प्रलंबित आहे,तर एका प्रकरणात बीड येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.उर्वरित ७ पात्र वारसांना नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले.
दरम्यान,काही प्रकरणे विविध कारणांमुळे प्रलंबित आहे.२ प्रकरणे प्रतीक्षासूचीत,६ प्रकरणांत शेतजमिनीची मागणी,१ अनुकंपा तत्वावरील नियुक्ती,१ प्रकरणात कायदेशीर वारस प्रमाणपत्राचा अभाव आणि १ प्रकरणात आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ (सुधारित अधिनियम २०१५) अंतर्गत पात्र वारसांना देण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये श्री.महादेव संदिपान वाघमारे (मु.पो. पारा,ता.वाशी) यांची जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव येथे शिपाई (गट-ड) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच श्री.अक्षय गौतम गंगावणे (सिद्धार्थनगर,सांजा रोड,धाराशिव) यांची जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धाराशिव येथे शिपाई (गट-ड) पदावर नियुक्ती झाली आहे. श्री.अक्षय सहदेव मस्के (जवळगा (मेसाई), ता.तुळजापूर) यांची अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, मुरूम (ता. उमरगा) येथे शिपाई (गट-ड) पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.याचप्रमाणे श्रीमती दिपाली चंद्रकांत गायकवाड/दिपाली जयकुमार शेलार (कासारवाडी,पुणे) यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,परंडा येथे शिपाई (गट-ड) पदावर नियुक्ती झाली आहे.श्री.समाधान सहदेव कठारे (सारोळा बु.,ता.धाराशिव) यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,कळंब येथे पहारेकरी (गट-ड) पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.तसेच श्रीमती पूजा शहाजी मस्के(व्हनाळा,ता. तुळजापूर) यांची मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,तुळजापूर येथे सफाईगार (गट-ड) पदावर नियुक्ती झाली असून श्री.रुकेश बाळासाहेब सरवदे(भिकारसारोळा,ता.धाराशिव) यांची मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,उमरगा येथे पहारेकरी (गट-ड) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण वरिष्ठ निरीक्षक राहून काटकर,कपिल थोरात,अमोल काटांगळे,कार्यालय अधीक्षक श्रीमती.सुरेखा गवळी व बिभीषण शिरसाट यांनी परिश्रम घेतले.
******
Monday, 30 March 2026
८.२९ लाखांच्या विक्रीसह नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता
८.२९ लाखांच्या विक्रीसह नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता
धाराशिव दि.३० मार्च (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ,धाराशिव येथे आयोजित “नवतेजस्विनी महोत्सव २०२६” चा उत्साहात समारोप आज झाला.या महोत्सवाचे उद्घाटन २७ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.
या जिल्हास्तरीय प्रदर्शनात धाराशिव जिल्ह्यातील स्वयंसहाय्य महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे एकूण ४२ स्टॉल्स उभारण्यात आले होते.यामध्ये ज्यूस,उसाचा रस,लिंबू सरबत, गावरान तूप,अंडी,वर्मी कंपोस्ट खत, धान्य,कडधान्य,राजमा,कडक भाकरी,शेंगांची चटणी,दुग्धजन्य पदार्थ,मसाले,पापड,कुरडई,शेवया, मनुके,हस्तकला व शोभेच्या वस्तू, मूर्ती,फ्लॉवर पॉट,रेडीमेड कपडे तसेच विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता.या तिन्ही दिवसांत स्टॉलधारकांची एकूण सुमारे ८ लाख २९ हजार रुपयांची विक्री झाली असून महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महोत्सवाच्या समारोप प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विद्याचरण कडवकर,सहायक पोलीस निरीक्षक श्री.दिनेश जाधव, संरक्षण अधिकारी श्री.भुजंग भोसले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री.सुखदेव चिंचोलीकर,तालुका स्तरीय सी.एम.आर.सी.अध्यक्षा श्रीमती.निर्मला उबाळे,श्रीमती.स्मिता पाटील,श्रीमती.सुरेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनात सहभागी सर्व स्टॉलधारकांचा मान्यवरांच्या हस्ते “नवतेजस्विनी महोत्सव २०२६” सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
हा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी माविम जिल्हा कार्यालय तसेच तालुका स्तरीय सी.एम.आर.सी.यांनी विशेष प्रयत्न केले.धाराशिवकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. सुखदेव चिंचोलीकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
*****
Subscribe to:
Posts (Atom)








