उस्मानाबाद,दि.13:-
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हयातील एकूण 586 गावांची निवड करण्यात आली असून
तीनही टप्प्यातील कामांमुळे पाणीसाठा मोठया प्रमाणात होईल यादृष्टीने प्रयत्न
करावेत असे प्रतिपादन मृद, जलसंधारण व रोहयो सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे
केले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पराग
सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी
राजेंद्र खंदारे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
सुभाष चोले, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे श्री. कांबळे यांच्यासह उपविभागीय
अधिकारी उस्मानाबाद, उमरगा, कळंब, परंडा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची
उपस्थिती होती.
ते पुढे
म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान, रोजगार हमी योजनेची जिल्हयातील सर्वच कामे
चांगल्या दर्जाची होण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असून या सर्व
कामांतून पाणीसाठा मोठया प्रमाणात वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी आराखडा तयार करावा
व त्यानुसार कामकाजाचे योग्य नियोजन करुनच कामे करावीत.
जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती देताना
सांगितले की, सन 2015-16 ची 21 हजार 25 कामे पूर्ण करण्यात आली आहेत त्यामुळे सन
2015-16 मध्ये 25 हजार 190.68 टी.सी.एम. पाणीसाठा झाला असून 89 हजार 452.36 हेक्टर
संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होण्यास मदत झाली आहे. सन 2016-17 मधील 16 हजार 795
कामांपैकी 9 हजार 759 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे 16 हजार 163.39
टी.सी.एम. पाणीसाठा झाला असून 9 हजार 330.24 हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण
होण्यास मदत झाली आहे.
यावेळी
श्री. एकनाथ डवले यांनी सर्व विभागप्रमुखांकडून जिल्हयातील विविध कामांचा आढावा
घेतला.उपस्थित विभागप्रमुखांनी आपापल्या विभागासंबंधी कामकाजाबाबतचे
सादरीकरण यावेळी केले.
या
बैठकीस जिल्हयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.