Tuesday, 11 April 2017

छायाचित्राकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे –आमदार सुजितसिंह ठाकूर




उस्मानाबाद.दि.11:- बरेच काही बोलून व सांगून जाण्याचे काम छायाचित्रामुळे होते,त्यामुळे त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले तर त्याचा समाज मनावर चांगला परिणाम होतो, असे प्रतिपादन आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आज येथे केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय व नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद  यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि.11) रोजी सकाळी 10.30 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळमजला हॉलमध्ये "महाराष्ट्र माझा" छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन विधान परिषदेचे सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते उदघाटनपर मार्गदर्शन करताना बोलत हाते. यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, नेहरु युवा केंद्राचे लेखापाल रामचंद्र कुलकर्णी, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आमदार ठाकूर म्हणाले की, काही छायाचित्र काही बोलून व सांगून जातात त्यामुळे त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनीही सकारात्मक दृष्टीकोनातून काम केले तर शासनाच्या योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचण्यास मोठा हातभार लागेल.
आता उस्मानाबादची मागासलेपणाची  ओळख कमी होत चालली आहे, त्यामुळे यासाठी सर्वांनी कमी जास्त प्रमाणात योगदान देण्याची गरज असल्याचे आमदार श्री.ठाकूर यांनी यावेळी बोलून दाखविले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने "महाराष्ट्र माझा" छायाचित्र स्पर्धेत  निवडलेल्या 200 छायाचित्रात उस्मानाबादचे छायाचित्रकार  बाळासाहेब अणदूरकर व आरिफ शेख यांच्या छायाचित्रांची निवड झाल्याबदल त्यांचा आमदार ठाकूर यांनी  यावेळी सत्कार केला.
यावेळी आयुष प्रसाद म्हणाले की, छायाचित्र काढणे ही एक कला असून ती जोपासण्यासाठी छायाचित्रकारांनी त्या कलेबाबत इतरांनाही अवगत केले पाहिजे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नेहरु युवा केंद्राचे श्री. कुलकर्णी यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी केले. यावेळी  कृषी विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. गोरे, श्री. वारे, श्री. जाधव, लेखाधिकारी श्री. जोशी यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, छायाचित्रकार, पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
वृत्त.क्र.310                                                           
     आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन

उस्मानाबाद.दि.11:- मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पाणपोईचे उदघाटन आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, नेहरु युवा केंद्राचे लेखापाल रामचंद्र कुलकर्णी, कृषी विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. गोरे,बांधकाम विभागाचे श्री.लष्करे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Monday, 10 April 2017

"महाराष्ट्र माझा" छायाचित्र प्रदर्शनाचे 11 एप्रिल 2017 रोजी उदघाटन


  उस्मानाबाद.दि.10:-माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय व नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद  यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळमजला हॉलमध्ये "महाराष्ट्र माझा" छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन विधान परिषदेचे सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.
        या छायाचित्र प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमास प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
         माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने "महाराष्ट्र माझा" ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे उस्मानाबाद जिल्हयातील सर्वसामान्य नागरिकांना पाहता यावीत या उदेशाने येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळमजला हॉलमध्ये दि.11 ते 13 एप्रिल 2017 पर्यंत सकाळी 10ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना मोफत पाहता येणार आहे.

        या आयोजित "महाराष्ट्र माझा" छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ जिल्हयातील सर्व नागरिकांनी तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, शालेय विदयार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे. 

97 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुख्य रंगमंचाच्या उभारणीला वेग


उस्मानाबाद,दि.10:- येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या परिसरात 21 एप्रिलपासून होऊ घातलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्य रंगमंचाच्या उभारणीला वेग आला असून शहरात पहिल्यांदाच एवढा भव्य सभामंडप नाट्य संमेलनाच्या निमित्ताने उभारला जात आहे. विशेष म्हणजे क्रीडा संकुलावर एकही खड्डा न घेता आधुनिक सामग्रींचा वापर करून हा रंगमंच उभारला जात आहे. 
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या परिसरात पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पर्वणीचा योग आला आहे. त्यासाठी संयोजन समितीच्यावतीने जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. क्रीडा संकुलाच्या परिसरात  68 हजार स्क्वेअर फूट आकाराचा 30 फूट उंच भव्यदिव्य असा मुख्य सभामंडप उभारण्यात येत आहे. उस्मानाबाद शहरात पहिल्यांदाच  नाट्य संमेलनाच्या रूपाने अशा पध्दतीचा भव्य सभामंडप उभारला जात आहे. क्रीडा संकुलावर मंडपाची उभारणी करताना मैदानाला कुठल्याही प्रकारची हानी पोहचणार नाही, याची संयोजन समितीच्यावतीने दक्षता घेण्यात आली आहे. आधुनिक सामग्रीचा वापर करून उभारण्यात आलेल्या सभामंडपात एकाही ठिकाणी खड्डा खोदण्याची वेळ आली नाही. 
या व्यतिरिक्त नगरपालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य संकुल आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय या ठिकाणीही स्वतंत्र दोन रंगमंच उभारले जात आहेत. तुळजाभवानी क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या मुख्य रंगमंचालगत भव्य ग्रंथप्रदर्शनासाठी स्टॉल्सची उभारणी केली जात आहे. राज्यभरातील नामवंत प्रकाशन संस्थांनी आपली संयोजन समितीकडे तात्काळ नोंदवावी, असे आवाहन नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन.


उस्मानाबाद.दि.10:- जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडा खेळाडू, यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हयातील खेळाडूकरिता शासनातर्फे जिल्हा  क्रीडा पुरस्कार दिला जातो. यावर्षी जिल्हयातुन सन 2015-16 गुणवंत खेळाडू (1 महिला , 1 पुरुष ) यासाठी यापुर्वी प्रस्ताव मागविण्यात आलेले होते परंतु गुणवंत खेळाडू (पुरुष महिला )या गटात प्रस्ताव कमी आलेले आहेत.  तेव्हा उस्मानाबाद जिल्हयातील पुरुष गटातील खेळाडू कडून पुन्हा जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी संबंधित खेळाडूंनी यांची नोंद घेवून परिपुर्ण प्रस्ताव कार्यालयीन वेळेत या कार्यालयात सादर करावे तसेच यापुर्वी ज्या खेळाडूनी प्रस्ताव दाखल केलेले आहेत त्यांना पुन्हा प्रस्ताव दाखल करण्याची आवश्यकता नाही.

तरी संबंधित खेळाडूंनी अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयश्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 20 एप्रिल 2017 पर्यत सदर कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक यांनी केले आहे.

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे रहावे-पालकमंत्री दिवाकर रावते




            
उस्मानाबाद.दि.10:-प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे, अशा सूचना परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केल्या.
          मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पालकमंत्री श्री.रावते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, प्रकल्प उपसंचालक सुभाष चोले, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी श्री.खोत, तहसिलदार सुजित नरहरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री.रावते म्हणाले की, येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे कमतरता भासणार नाही यासाठी काळजी घ्यावी तसेच खरीप पूर्व हंगाम शेती मशागतीसाठी गावोगावी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर मेळावे घेवून शेतकऱ्यांना दिलासा दयावा.
          शेतकऱ्यांना सावकारी कायदयाबाबत माहिती व्हावी यासाठी गावात दवंडी देवून जास्तीत जास्त  जनजागृती करावी, शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्ररित्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, जेणे करून शेतकऱ्यांना सुलभतेने पिक कर्ज उपलब्ध होईल. असे ही श्री.रावते  म्हणाले.

           या आढावा बैठकीत जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी श्री.जमदाडे यांनी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे प्रस्ताविक केले तर आभार जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री.खोत यांनी मानले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  

Sunday, 9 April 2017

राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीपणे संपन्न


उस्म्नाबाद,दि.9:-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि.8 एप्रिल रोजी 2017 जिल्हयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.
सकाळी 10.30 वाजता पक्षकार,संपादन मंडळ अधिकारी,विधीज्ञ मंडळ, जिल्हा सरकारी वकील यांच्या हस्ते दीपप्रज्ज्लनाने  लोक अदालतीचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी  प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  श्री. आर . आर. देशमुख, प्राधिकरणाचे  सचिव श्री. एस. आर. पडवळ, सर्व  न्यायीक अधिकारी,उपभिागीय अधिकारी श्री. आयुष प्रसाद, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश भोसले,जिल्हा  सहाय्यक सरकारी विधीज्ञ श्री जयंत देशमुख, भूसंपादन अधिकारी,शासकीय अधिकारी,विमा कंपनी अधिकारी, बॅक अधिकारी, पक्षकार त्यांचे विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राधिकरणाचे सचिव श्री. एस.आर पडवळ यांनी पॅलननिहाय ठेवण्यात आलेल्या  प्रकरणांची  रूपरेषा  सांगितली.
जिल्हयातून मोठ्या संख्येने प्रलंबित प्रकरणे  तसेच दावापूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरिता या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती पैकी दिवाणी स्वरूपाची 449,मोटार अपघात /कामगार नुकसान भरपाई प्रकरणे 16,भूसंपादन प्रकरणे 104,फौजदारी स्वरूपाची 164,तडजोडपात्र प्रकरणे,वैवाहिक सबंधी 11 ,धनादेशाची 62 प्रकरणे,विविध बॅकेची 20 दावापूर्व 20 प्रकरणे सामोपचाराणे मिटविण्यात आली.मोटार अपघात/कामगार नुकसान भरपाई प्रकरणांमधील  पक्षकारांना रूपये 28 लाख 59 हजार 994 वसूली करून देण्यात आली. भूसंपादन प्रकरणामध्ये रूपये 11 कोटी 20 लाख 80 हजार 804 मावेजा मंजूर होवून रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली तसेच काही वसूलीच्या दरखास्तीमध्ये 52 लाख 53 हजार 332 रक्कमेची वसूली  मिटविण्यात आली. याच लोकअदालतीमध्ये 20 दावापूर्व प्रकरणांमध्ये रूपये 1 लाख्‍ 5 हजार 100 रकक्मेची तडजोड झाली.
 लोकअदालतीमध्ये पॅनलवर न्यायिक अधिकारी सर्वश्री एस. आय.पठाण,श्री आर.एन.रोकडे, श्री.एस. आर. पडवळ, श्रीमती रचना तेहरा, एस.बी. देसाई,आर. के.राजेभोसले, श्रीमती एन.पी. पवार एस.ए.जमादार, ए.सी.पारशेट्टी, श्रीमती ए.एस. बिराजदार, श्री.ए.ए.बाबर तसेच इतर पंच म्हणून विधिज्ञ  सदस्यांनी  काम  पाहिले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार नाट्यसंमेलनाचे उद्घाटन समारोप कार्यक्रमास सांस्कृतिक मंत्री तावडे यांची उपस्थिती


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार नाट्यसंमेलनाचे उद्घाटन
समारोप कार्यक्रमास सांस्कृतिक मंत्री तावडे यांची उपस्थिती
स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांची माहिती
उस्मानाबाद, दि. ९- उस्मानाबाद येथे येत्या २१ एप्रिलपासून सुरू होणार्‍या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तर नाट्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमास शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांनाही नाट्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता नाट्यदिंडीस प्रारंभ होईल. नाट्यदिंडीचे आगमन तुळजाभवानी क्रीडा संकुलातील मुख्य रंगमंचावर झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनाने नाट्य संमेलनास प्रारंभ होणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, सहपालकमंत्री तथा दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची भेट घेवून स्वागताध्यक्ष ठाकूर आणि नाट्य परिषदेचे प्रमुख कायर्र्वाह दीपक करंजीकर यांनी रितसर निमंत्रण दिले आहे. 


नाट्यसंमेलनापूर्वी व्यावसायिक नाट्यमहोत्सवाने उस्मानाबाद शहरात विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकश्रोत्यांना मिळणार आहे. २१ एप्रिल रोजी मुख्य संमेलनास प्रारंभ होवून २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता खुल्या अधिवेशनाने नाट्यसंमेलनाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर विविध पक्षांतील सन्माननीय लोकप्रतिनिधींनाही संमेलनातील उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पावणनगरीत होऊ घातलेल्या नाट्य संमेलनाचा हा उत्सव ऐतिहासिक ठरेल, असा विश्‍वासही आमदार ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. 

पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाच्या आढावा बैठका संपन्न


उस्मानाबाद,दि.9:-  जिल्हयातील धान्य साठवणूक गोदामासाठी सुरक्षा रक्षक नेमून ज्या गोदामाला कंपाऊड नाही त्या गोदामाला कंपाऊडसाठीचा अहवाल पाठवून देण्याची सूचना परिवहन, खार भूमी विकास मंत्री  तथा जिल्हयाचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केली.
 परिवहन, खार भूमी विकास तथा जिल्हयाचे पालकमंत्री श्री. रावते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विभागाच्या आढावा बैठका संपन्न झाल्या. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर,जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी सचिन बावसकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, जिल्हा माहिती अधिकरी मनोज शिवाजी सानप,विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री.रायते यांच्या हस्ते e-POS  ऑनलाईन धान्य वितरण प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला व प्राथमिक स्वरूपात यावेळी पाच लाभार्थ्यांना धान्याचे वाटप देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेंतर्गत जिल्हयातील दहा लाभार्थींना जमिन प्रदान प्रमाणपत्राचे वाटप ही पालकमंत्री श्री. रायते यांच्या हस्ते करण्यात आले.

वृक्ष लागवड आढावा बैठकीत  शहरी भागात फळझाडे लावा तर ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवड करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. 

बळीराजा चेतना अभियान समर्थपणे राबवून बळीराजाला धीर द्या -पालकमंत्री दिवाकर रावते




        उस्मानाबाद,दि.9:- बळीराजा चेतना अभियानांतर्गत असलेल्या ग्राम समितीला कार्यान्व‍ित करून त्यांच्याकडून गावचा आराखडा तयार करा व बळीराजा चेतना अभियान समर्थपणे राबवा, अशा सुचना राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा जिल्हयाचे  पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बळीराजा चेतना अभियान आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर,जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी सचिन बावसकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, जिल्हा माहिती अधिकरी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी,जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, समाज कल्याण अधिकारी मिनगिरे,  पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकणे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक सुभाष चोले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री.रावते म्हणाले की, ग्राम समितीच्या ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेवून समितीच्या कामाचा आढावा घ्या,  कर्जबाजारी शेतकऱ्यांचा तपशिल तयार करून त्याची वर्गवारी तयार करा, नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी सर्वच विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.

बळीराजा चेतना अभियानाद्वारे कृषी विभागात शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड करावी, असे ही पालकमंत्री श्री. रायते यांनी यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी यांना केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बैठकीत बळीराजा चेतना अभियानांर्तगत जिल्हयात राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती बैठकीत विषद केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी बळीराजा चेतना अभियानतून आरोग्य विभागाने केलेल्या कामाची माहिती यावेळी सांगितली.