Saturday, 24 December 2016

प्रशासनामध्ये काम करताना सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांची अनमोल साथ मिळाली-जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे

वृत्त क्र. 999                                  दिनांक : 24-12-2016



उस्मानाबाद,दि.24:- एक कुशल प्रशासक, चांगले मित्र, चांगले मार्गदर्शक, एक कुटुंबप्रमुख, माणुसकी जपणारे, प्रामाणिक, मेहनती व दूरदर्शीपणा असणारे  प्रशासक अशी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची  ओळख जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. अशा या प्रशासकाचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांचा येथील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक 24 डिसेंबर 2016 रोजी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. धनंजय रणदिवे यांच्या हस्ते तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी  ज्येष्ठ पत्रकार श्री. मोतीचंद बेदमुथा , श्री. राजा वैद्य, श्री. एस.ए. सय्यद व इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  जिल्ह्यामध्ये  अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवून जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी  शेतकरी व सर्वसामान्य जनतेला विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत तर केलीच परंतू एक नैतिक पाठबळही दिले असे गौरोवोद्गार पत्रकार संघाचे अध्यक्ष  श्री. रणदिवे यांनी याप्रसंगी काढले.
या कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उपस्थित सर्व पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला .
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की , प्रशासनामध्ये काम करताना सर्व अधिकारी  व पदाधिकाऱ्यांची मला अनमोल साथ मिळाली. दुष्काळामध्ये  सामाजिक संस्थांनी  खूप मदत केली . मी या सर्वांचा आभारी आहे . जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या  जलयुक्त शिवार अभियान, कृषीक्रांती, पशुसंवर्धनासाठी जनजागृती अभियान, समूह गट शेती, आधुनिक पध्दतीने शेती व्यवस्थापन व कृषी यांत्रिकीकरण, फूल उत्पादक, विविध शेतकरी गटांची स्थापना ,  शेडनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन, महिला सक्षमीकरण, कृषी गटाचे सक्षमीकरण ,  शेतकऱ्यांच्या कंपन्या,  दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खचून न जाता त्यांचे आत्महत्येपासून मनपरिवर्तीत व्हावे यासाठी राबविण्यात आलेले बळीराजा चेतना अभियान, तुळजापूर मंदीर संस्थानचे प्रशासक या नात्याने तेथे करण्यात आलेल्या सुधारणा  व इतर अनुषंगिक बाबी  या जिल्ह्यासाठी यशस्वीपणे राबविता आल्या. याच बरोबर भूकंपामुळे बेघर झालेल्या उस्मानाबाद जिल्ह़यातील 977 जणांना 20 वर्षांनंतर हक्काच्या जागा प्राप्त झाल्या आहेत. या सर्वांना घरांचे वाटप करण्यात आले होते. मात्र त्याच्या नावावर घराच्या जागा नव्हत्या. आता कबाल्याच्या माध्यमातून त्यांच्या नावावर जागा करण्यात आल्या आहेत, नवजात अर्भकाचे जन्मत: मोफत आधार कार्ड नोंदणी उपक्रम,ई- ब्लड बँकेसारख्या उपक्रमांबाबतही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी  विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. हे उपक्रम राज्यात उस्मानाबाद पॅटर्न म्हणून प्रसिध्दीस आले . तसेच या उपक्रमांमधील काही उपक्रम हे राजस्थान व मध्यप्रदेश  या राज्यानेही स्विकारले आहेत.   ही उस्मानाबादसाठी  अभिमानाची बाब आहे .
 नुकतेच एक केंद्रीय पथक उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी  जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन एक अहवाल तयार केला असून त्या अहवालानुसार  जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबतचा उस्मानाबाद पॅटर्न हा मसूरी येथील भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थींच्या  अभ्यासक्रमामध्ये समाविष्ठ करण्यात येणार आहे .
अशाप्रकारे प्रत्येकाला सोबत  घेऊन काम करण्याच्या  त्यांच्या या  कौशल्याने  उस्मानाबाद मधील बहुतेक विभागांचे काम  हे राज्यात  अग्रेसर आहे .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. संतोष हंबीरे यांनी केले तर आभार ज्येष्ठ पत्रकार           श्री. मोतीचंद बेदमुथा  यांनी मानले.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रतिनिधी श्रीमती आशा बंडगर, पत्रकार                 श्री. मल्लिकार्जून सोनवणे,श्री.उपेंद्र कटके, श्री. देविदास पाठक, श्री.राजेंद्र जाधव,श्री. संतोष जाधव, श्री. बिभीषण लोकरे, श्री. डोंगरे, छायाचित्रकार श्री. अजिंक्य माने , श्री. राहूल कोरे , श्री. ईस्माईल सय्यद आदी उपस्थित होते.
****


MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): नाताळनिमित्त राज्यपालांचे जनतेला ‘मेरी क्रिसमस’

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): नाताळनिमित्त राज्यपालांचे जनतेला ‘मेरी क्रिसमस’: मुंबई, दि. 24 : राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला नाताळच्या तसेच आगामी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळ आ...

पाताळगंगा येथील एनआयएसएमच्या नवीन संकुलाचे उद्घाटन


बॅाण्डसच्या माध्यमातून शहरांच्या विकासासाठी निधी मिळावा
भांडवली बाजाराचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा
                                      - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
 नवी मुंबई, दि. 24 : राज्यातील किमान 10 स्मार्ट शहरे म्युनिसिपल बॅाण्डसच्या माध्यमातून विकसित व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करत वित्तीय बाजाराचा लाभ शेतकऱ्यांना देखील मिळावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
ते आज सेबीच्या राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्थान (एनआयएसएम)च्या नव्या संकुलाचे उद्घाटन करतांना बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल चे. विद्यासागर रावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटलीकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री अरुण राम मेघवाल यांची उपस्थिती होती. पाताळगंगा (रायगड) औद्योगिक वसाहतीतील एनआयएसएम नव्या संकुलाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
देशातील भांडवली ( वित्तीय) बाजाराकडून असलेल्या आपल्या अपेक्षा व्यक्त करतांना पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले कीआयपीओना चांगला प्रतिसाद मिळाला आणि ते यशस्वी झाले असे आपण ऐकतो. पण आपल्या दृष्टीने मोठी संपत्ती निर्माण व्हावी हे अपेक्षित नाही तर खऱ्या अर्थाने भांडवली उत्पादकता वाढली पाहिजे. आपल्याकडे सरकार आणि बँकावित्तीय संस्था या पायाभूत सुविधांसाठी नेहमी अर्थसहाय्य करतात मात्र हाच पैसा दीर्घकाळासाठी भांडवली बाजारातून मिळाला तर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा देशात तयार होतील. आपल्या सरकारने देशातील शहरे सुधारण्यासाठी चांगली योजना आणली आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी भांडवली बाजारातून शहरांच्या सुविधेसाठी पैसा उपलब्ध झाल्याचे आपण पाहिले नाही. देशातील किमान 10 स्मार्ट शहरांसाठी तरी असे बॉण्डस निघावेत, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
कृषी क्षेत्राला देखील या भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा लाभ मिळाला तर यात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम पार पाडता येतील आणि त्याचा फायदा शेतकरी आणि ग्रामस्थांना होईल असे सांगून पंतप्रधानांनी राष्ट्रीय कृषी मंडीचा (इनाम) उल्लेख केला. कमोडीटी मार्केटमधून शेतकऱ्यांसह देशालाही अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.  
पंतप्रधान म्हणाले कीभांडवली बाजारातून कराच्या स्वरूपात पुरेसा पैसा सरकारकडे जमा होत नाही. कदाचित हा कर प्रणालीतील काही त्रुटींचा भाग असू शकतो पण आपल्याला प्रामाणिकपरिणामकारक आणि पारदर्शी व्यवस्था निर्माण करायची आहे जेणे करून एक जागतिक दर्जाचा भांडवली बाजार निर्माण होऊन तो देशाला विकासाकडे घेऊन जाऊ शकतो.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नुकत्याच उचललेल्या पावलांचा उहापोह केला. ते म्हणाले कीवित्तीय तुट प्रचंड प्रमाणात वाढली होतीरुपयाचे देखील अवमूल्यन झाले होतेजगात देशाची आर्थिक पत घसरली होती. परकीय गुंतवणूकदार देशात गुंतवणूक करण्यास तयार नव्हते. आम्ही तीन वर्षांपेक्षाही कमी काळात वित्तीय चित्र बदलवण्यास सुरुवात केली. परकीय चलन वाढलेरुपया वधारलाचलन फुगवटा कमी झाला. सार्वजनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली. आता तर वस्तू व सेवा कर लागू करण्यातले काही अडथळे दूर करून लवकरच नवी कर प्रणालीही लागू होईल. ईज ऑफ डुईंग बिझिनेसमुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदार परत एकदा आपल्या देशाकडे वळले. विक्रमी अशी परकीय गुंतवणूक देशात व्हायला सुरुवात झाली. चलनबंदीच्या आमच्या निर्णयाची तर विरोधकांनी देखील प्रशंसा केली आहे. आम्ही कुठल्याही राजकीय लाभासाठी नव्हे तर देशासाठी दीर्घ काळ फायद्याचे ठरेल असे आर्थिक धोरण राबवीत आहोत.

देशातील युवा शक्ती ही आमची ताकद असून सेबीने एनआयएसएमच्या माध्यमातून भांडवली बाजारातील गुंतवणूक आणि संबंधित इतर प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरु केल्याबद्धल पंतप्रधानांनी सेबीचे अभिनंदन केले. ५ लाख प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना देण्याचे उद्दिष्ट ठेवून संस्थेने या तरुणांना या महत्वाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी दिली आहे असेही पंतप्रधान म्हणाले.
केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली म्हणाले कीआम्ही काही महत्वाच्या वित्तीय सुधारणा करून गुंतवणूकदाराचा विश्वास परत मिळवला आहे. आधारचा विविधांगी उपयोगवस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करणे आणि चलनबंदी ही त्यातली काही पावले आहेत.
संलग्नता मिळवून देण्यासाठी कायदा - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सेबीला त्यांच्या सर्व उपक्रमांना राज्य सरकारचे संपूर्ण सहकार्य मिळत राहील असे आश्वस्त केले. ते म्हणाले कीसेबी ही जगातली सर्वात विश्वासार्ह नियंत्रक संस्था असून हे स्थान अनेक वर्ष पुढे टिकून राहील असा मला विश्वास आहे. एनआयएसएम ला संलग्नता मिळवून देण्यासाठी येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात निश्चितपणे तशा स्वरूपाचा कायदा केला जाईल असेही आश्वासन त्यांनी दिले. सेबीचे अध्यक्ष यु. के. सिन्हा यांनी प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात या संस्थेच्या उभारणीमागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. सेबीची वाटचाल दाखविणारे दृकश्राव्य सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले. या प्रसंगी जपान,मलेशियाइराणश्रीलंकायेथील शेअर बाजार आणि नियंत्रण बोर्डांचे प्रमुख व वित्तीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अरबी समुद्रातील स्मारकस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जल आणि भूमिपूजन.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठिकाणांहून आणलेल्या माती आणि जलद्वारे केले गेले जलपूजन आणि भूमिपूजन...


पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांचे मुंबई विमानतळावर मा. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस स्वागत करताना..


Friday, 23 December 2016

उस्मानाबाद जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन


उस्मानाबाद,दि.23 :- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद आयोजित पुणे, बारामती, नागपूर येथील खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक/कंपनी यांच्याकडील 580 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छूक पुरुष व स्त्री उमेदवारांच्या दि.30 डिसेंबर 2016  रोजी उमरगा व दि.31 डिसेंबर 2016 रोजी भूम येथे सकाळी 11 वाजता   मुलाखती घेऊन निवड करण्यात येणार आहे.
उद्योजक पद, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा पुढीलप्रमाणे राहतील- एम.पी.टी. ए. एज्युकेशन लि, एरंडवणे पुणे अंतर्गत निओसीम प्रा.लि.सनसवडी, जेबील प्रा.लि. रांजणगाव,जमिल प्रा.लि. रांजणगाव, भारत फॉर्ज.बारामती, पियाजो/व्हेस्पा प्रा.लि., बारामती  येथे, जॉब ट्रेनी 200 पुरुष, आय.टी. आय. कोणताही ट्रेड 18 ते 26 वयोमर्यादा राहील.प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन अंतर्गत किल्लारी, ता.औसा.जि.लातूर येथे 350 पुरुष व मुली, वय 18 ते 30, नवभारत फर्टिलायझर, नागपूर येथे 30 पुरूष, वय 18 ते 35 राहील.
           वेतन सुरुवातीस किमान  4 हजार  ते  10  हजार रुपये दरमहा , शैक्षणिक  योग्यतेनुसार आणि सुविधा कॅन्टीन, निवास ट्रान्सपोर्टेशन इत्यादी सुविधांबाबत संबंधित कंपनीच्या नियमानुसार, प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी कंपनीचे अधिकारी सविस्तर माहिती व मार्गदर्शन करतील,तसेच आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक/प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), अनुभव असल्यास प्रमाणपत्र, एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि 2 पासपोर्ट साईझ  फोटो  इत्यादी सर्व  कागदपत्रांच्या  झेरॉक्स कॉपींसह प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने हजर राहून खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधीचा जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक श्री. रमेश पवार यांनी केले आहे.
संपर्कासाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक  (02472- 222236 ) असा आहे.  या मेळाव्यात सहभाग नोंदविण्याकरिता उमेदवारांना या कार्यालयाकडील जॉब सिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) असणे बंधनकारक आहे.एम्प्लॉयमेंट नोंदणी नसल्यास उमेदवार www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर नवीन नाव नोंदणी करुन तात्काळ प्रमाणपत्र मिळवू शकतात.
****




परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

         
उस्मानाबाद,दि.23:- उमरगा मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 25डिसेंबर 2016 रोजी पोलीस पाटील  पदाची परीक्षा पुढील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे-

            श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे, परीक्षार्थींना कसलाही अडथळा येऊ नये या दृष्टीने परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास पायबंद करणे, तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स,ई-मेल, रेडियो, इंटरनेट सुविधा, भ्रमणध्वनी (मोबाईल), संगणक, गणनायंत्र व अशा इतर प्रकारच्या स्वरूपातील बाबी विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येवू नये म्हणून या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात दि.25 डिसेंबर 2016 रोजी  उमरगा उपविभागीय दंडाधिकारी निलेश श्रींगी यांनी फौजदारी पक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये उक्त परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.***

Thursday, 22 December 2016

एकात्मिक बाल विकास सेवा योजना या कार्यालयाचा लेखापरीक्षण अहवाल पाहण्यासाठी उपलब्ध


            उस्मानाबाद , दि. 22:-  येथील एकात्मिक बाल विकास  सेवा योजना  जिल्हा परिषद  कार्यालयाचा  सन 2013-14 व 2014-15 या आर्थिक  वर्षाचा  लेखापरीक्षण  अहवाल , स्थानिक  निधी लेखा , उस्मानाबाद यांच्यांकडून प्राप्त झाला आहे . हा लेखापरीक्षण  अहवाल  तसेच मागील सर्व वर्षाचे  लेखापरीक्षण अहवाल एकात्मिक बाल विकास  सेवा योजना  जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात  सार्वजनिक  दिवस वगळता  कार्यालयीन  वेळेत  पाहण्यासाठी  उपलब्ध आहे . असे  उप मुख्य कार्यकारी  अधिकारी बाल कल्याण , जिल्हा परिषद  यांनी कळविले आहे .

****

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन


            उस्मानाबाद , दि. 22:- नेहरु युवा केंद्र  व नेहरु  युवा मंडळ  धारुर ता. जि. उस्मानाबाद  यांच्या संयुक्त विद्यमाने  खुल्या  तालुकास्तरीय  क्रीडा  स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे .  दिनांक 24 डिसेंबर  रोजी सकाळी 10.00 वाजता  भैरवनाथ  हायस्कूल धारुर , उस्मानाबाद येथे  नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक  श्री. विनायक धेंडे  यांच्या हस्ते  या स्पर्धेचा शुभारंभ  करण्यात येणार आहे .
             या स्पर्धेमध्ये  कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल , धावणे  व रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे . 15 ते 29 या वयोगटातील  सर्व मुला- मुलींना  या स्पर्धेत प्रवेश खुला असून  स्पर्धा  बाद पध्दतीने  खेळल्या जातील .  सर्व  स्पर्धेमध्ये  प्रथम , द्वितीय  व तृतीय  बक्षीस  वस्तु रुपात  देण्यात येणार असून स्पर्धेतील  सर्व सहभागींना प्रमाणपत्र  देण्यात येणार आहे .
              या स्पर्धेमध्ये  जास्तीत जास्त  युवकांनी  सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय युवा  स्वयंसेवक  प्रविण माने , नेहरु युवा मंडळाचे अध्यक्ष  बाळासाहेब भोरे आणि  जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र यांनी केले आहे .
***


नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यास उपस्थित राहावे -पालकमंत्री डॉ. दीपक सावंत


        उस्मानाबाद , दि.22:मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमीपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 रोजी होणार  आहे. या भूमीपूजन सोहळ्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री    डॉ. दीपक सावंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहा आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत  नारनवरे,  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते आदी उपस्थित होते.
                पालकमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील 15.96 हेक्टर बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील  सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे. तसेच राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय 2002 मध्ये घेतला. परतू, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने याबाबत कार्यवाही पूर्ण करुन स्मारकाच्या कामास गती दिली. अरबी समुद्रातील जागा निश्चित करुन त्या जागेवर स्मारक उभारणीस 28 फेब्रुवारी  2014 रोजी मान्यता मिळाली असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
           या स्मारकास राज्य व केंद्र शासनासह महापालिकेच्या विविध विभागाच्या परवाणग्या आवश्यक होत्या. यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दल, सागरी किनारा अधिनियम, मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालीका, बेस्ट,मुंबई पोर्ट ट्रस्ट, बी.एन.एच.एस. इंडिया, मत्सव्यवसाय विभाग,राष्ट्रीय सुरक्षा दल,दिल्ली, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अशा बारा विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे शासनास प्राप्त झाली आहेत,अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
         आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राची तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेवून प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे, यासाठी दिनांक 11 एप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करुन त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला आहे,असेही  डॉ. सावंत यांनी सांगितले.

या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2500 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा, महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकाचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षा विषयक व्यवस्था, आदि बाबींचा समावेश आहे. येत्या 3 वर्षात स्मारक पुर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांचे जीवनमुल्य प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात असेल. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ असणार आहे, असे पालकमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. ****

जन्मत: मोफत आधार कार्ड नोंदणी उपक्रमाचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते उदघाटन



राज्यातील अशा प्रकारचा पहिला अभिनव उपक्रम
उस्मानाबाद,दि.22 :- स्त्री रूग्णालय उस्मानाबाद येथे जन्मलेल्या नवजात अर्भकाचे जन्मत: मोफत आधार कार्ड नोंदणी उपक्रमाचे उदघाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री   डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
                   या नवजात अर्भकांचे जन्मत: आधार कार्ड नोंदणी कार्यक्रमास आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, शासकीय रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                  या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, हा उपक्रम उस्मानाबाद जिल्हयातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रथम असा अभिनव उपक्रम राबविण्याचा मान जिल्हा रूग्णालयाने मिळविला आहे असे गौरउदगार त्यांनी काढले. प्रारंभी पालकमंत्री यांच्या हस्ते आधार कार्ड नोंदणी उपक्रमाचे उदघाटन करुन नवजात बालकाचे आधार नोंदणी कार्ड बालकाच्या आई कडे सुपूर्द केले.
                  या कार्यक्रमाची माहिती विशद करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हयात याउपक्रमाची सुरूवात दि.23 सप्टेंबर 2016 पासून करण्यात आली आहे. त्यानुसार रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी दररोज प्रसूती मातांना व त्याच्या नातेवाईकांना जन्मत: आधार कार्ड नोंदणी करण्याबाबत समुपदेशन करत आहेत. तसेच ज्या प्रसूती माताचे आधार कार्ड नोंदणी झालेले नाही अशा प्रसूती झालेल्या माताची देखील आधार कार्ड नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
               रुग्णालयात लसिकरणासाठी आलेल्या बालकाचे आधार कार्ड नोंदणी करित असून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्हयात जास्तीत जास्त आधार कार्ड नोंदणी होण्याच्या दृष्टीने रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. दि.23 सप्टेंबर 2016 पासून आजतागायत 597 जन्मत: आधार कार्ड नोंदणी झालेली आहे, असे ही यावेळी  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी सांगितले.

             जन्मलेल्या नवजात अर्भकांचे जन्मत: आधार कार्ड नोंदणी उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे  जिल्हा सूचना व   विज्ञान अधिकारी श्री. के.बी. कोंडेकर व  सहायक जिल्हा सूचना व   विज्ञान अधिकारी  श्री. पी. एन.रुकमे , श्री. अमित चापले , श्री. लक्ष्मण  कांबळे यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते कबाले वाटप

            

उस्मानाबाद,दि.22 :- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री                             डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते गुरूवार दि. 22 डिसेंबर रोजी जिल्हा  नियोजन  समिती  सभागृह  मध्यवर्ती  प्रशासकीय  इमारत येथे झालेल्या कार्यक्रमात भूकंपग्रस्त नागरिकांना कबाले वाटप करण्यात आले.तसेच जिल्हयातील प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची संगणीकृत ऑनलाईन यादीचे उदघाटनही यावेळी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
                यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, आमदार ज्ञानराज चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, उपजिल्हाधिकारी(मदत व पुनर्वसन) अरविंद लाटकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार सुजित नरहरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

                 गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेल्या भूकंपग्रस्तांपैकी 977 कबाले धारकांना कबालेचे वाटप करण्यात येणार असून यावेळी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते तावशीगड ता. लोहारा येथील कबाले धारकांना कबाले वाटप करण्यात आले.

जिल्ह्यात रस्ते , पाणी , वीज, आरोग्य आदींबाबत चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण कराव्यात -पालकमंत्री डॉ. दीपक सावंत




उस्मानाबाद , दि. 22:- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री    डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 22 डिसेंबर 2016 रोजी  जिल्हा  नियोजन समितीची बैठक येथील जिल्हा  नियोजन समिती सभागृहात पार पडली . यावेळी  आ. मधुकर चव्हाण , आ. राणा जगजितसिंह पाटील , आ. सुजितसिंह ठाकूर , आ. ज्ञानराज चौगुले, आ. राहूल मोटे , खा. रविंद्र गायकवाड हे उपस्थित होते .  
या बैठकीमध्ये सर्वप्रथम  दिनांक 20 सप्टेंबर 2016 रोजी  झालेल्या  जिल्हा  नियोजन समिती बैठकीच्या  इतिवृत्तास  मान्यता देण्यात  आली ,  जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 मधील  सर्वसाधारण , अनुसूचित  जाती उप योजना  व आदिवासी क्षेत्रा बाहेरील  उपयोजनांचा माहे नोव्हेंबर 2016 अखेर  झालेल्या खर्चाचा आढावा पालकमंत्री डॉ. सावंत यांनी घेतला .  तसेच  जिल्हा वार्षिक  योजना सन 2016-17 मधील सर्वसाधारण , अनुसूचित  जाती उप योजना  व आदिवासी क्षेत्राबाहेरील  उपयोजनांच्या पुनर्विनियोजनाच्या एकूण 1 हजार 770 लक्ष एवढ्या निधीस मंजूरी देण्यात आली .सन 2017-18 मधील  जिल्हा वार्षिक सर्वसाधारण  , अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी  क्षेत्राबाहेरील योजनानिहाय  प्रारुप आराखड्यास यावेळी मंजूरी देण्यात आली .
जिल्हा वार्षिक योजना  सर्वसाधारण सन 2016-17 करीता एकूण 17 हजार 492 लक्ष रुपये मंजूर असून आजपर्यंत 3 हजार 116 लक्ष एवढा निधी  खर्च झाला आहे . जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना सन 2016-17 साठी  6 हजार 292 लक्ष एवढा  निधी मंजूर असून त्यापैकी 4 हजार 924 लक्ष एवढा निधी खर्च झाला आहे तर  जिल्हा वार्षिक आदिवासी उप योजना सन 2016-17 साठी 215.57 लक्ष एवढा  निधी जिल्ह्यासाठी मंजूर असून त्यापैकी 27.83 लक्ष निधी आतापर्यंत खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सुधारक आडे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे सभागृहासमोर सादर केली.
या सादरीकरणानंतर पालकमंत्री महोदयांनी सर्व विभाग प्रमुखास  मार्च 2017 पर्यंत निधी 100 टक्के खर्च  करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
 यावेळी पालकमंत्री महोदयांनी  मागील इतिवृत्ताच्या अनुषंगाने  संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना  पुढीलप्रमाणे सूचना  दिल्या --  जिल्ह्यात रस्ते , पाणी , वीज, आरोग्य  आदींबाबत चांगल्या  प्रकारच्या सुविधा निर्माण  करणे आवश्यक आहे . जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती होती . सरतेशेवटी जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन सोयाबीन  या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी  विमा कंपनीच्या  अधिकाऱ्यांशी चर्चा करुन जिल्ह्यातील  प्रत्येक नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना  पीक विम्याची  रक्कम मिळेल याबाबत तात्काळ कार्यवाही करावी . पॉली हाऊस , शेड नेट , शेततळे , कांदा चाळी याबाबत कृषी विभागाकडे प्राप्त प्रस्तावांवर तात्काळ कार्यवाही करुन सर्व संबंधित शेतकऱ्यांना निधी वितरीत करण्यात यावा.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या  कर्ज वसुलीसाठी  शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या होत्या त्या नोटीस तात्काळ  रद्द करण्यात याव्यात अशा स्पष्ट सूचना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या . याबाबत 15 दिवसांच्या आत संबंधित बँकेने  केलेली कार्यवाही अध्यक्षांना अवगत करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सूचित केले .
यावेळी सर्व आमदार व खासदारांनी अध्यक्ष महोदयांना विनंती केली की ,  शेतकऱ्यांकडील  कर्ज माफीबाबत  शासनास विनंती करावी.
ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर तात्काळ बसवून देण्यात यावे अशा सूचनाही यावेळी अधिक्षक अभियंता महावितरण यांना देण्यात आल्या .
कसबे तडवळे येथे ज्या शाळेस डॉ. आंबेडकरांनी भेट दिली  होती ,तेथे डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत समाज कल्याण विभागाशी समन्वय साधून  कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री महोदयांनी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अभियंता श्री. आनंद रायते यांना दिल्या .

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्या श्रीमती सुषमा  देशमुख ,  श्रीमती छाया सोमवंशी , श्रीमती अलका भोसले ,  श्रीमती कांचनमाला संगवे ,  श्रीमती कविता सरवदे ,  श्रीमती स्मिता ननवरे , श्रीमती पार्वतीबाई गुलाबराव ,  श्रीमती कीर्तीमाला  खटावकर ,  श्री. कैलास  शिंदे , श्री.  बाबूराव राठोड ,  श्री. दत्तात्रय  साळुंके,  श्री. मधुकर मोटे ,  श्री. महेंद्र धुरगुडे , श्री. संजय दुधगावकर , श्री. सुधाकर गुंड तसेच जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारवनरे , मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आणि सर्व विभागाचे विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते .

चला जाऊ या मुंबईला ….छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमीपूजनाला …




शनिवार,दि. 24 डिसेंबर 2016 रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  होणार  अरबी  समुद्रातील शिवस्मारकाचे भूमीपूजन…
·       भूमीपूजनासाठी  छत्रपती  शिवाजी  महाराजांच्या  पदस्पर्शाने  पावन झालेल्या  देशभरातल्या  १९  ठिकाणांवरील  माती  आणि  विविध  नद्यांचे  पाणी  वापरले  जाणार

·       मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या भूमीपूजनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशभरातल्या १९ ठिकाणांवरील माती आणि विविध नद्यांचे पाणी आणले जाणार आहे.

·       अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असलेले हे देखणे स्मारक साकारण्यासाठी तब्बल ३६०० कोटी खर्च केले जाणार आहेत.

·       आंतराष्ट्रीय दर्जाचे हे स्मारक गिरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटरवर समुद्रात असलेल्या एका पाण्याखालच्या दगडावरील १५.८६ हेक्टरवर उभारले जाणार आहे.

·       जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या हातून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा साकारला जाणार आहे. या चौथऱ्यासहीत या स्मारकाची उंची २१० मीटर उंच असून पुतळा १२६ मीटर, तर फक्त चौथऱ्याची ८४ मीटरचा असणार आहे.

·       एकूण ३६०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प साकारला जाणार असून यापैकी पहिल्या टप्प्यात २५०० कोटींचा खर्च केला जाणार आहे.

·       पहिल्या टप्प्याचे काम १९ फेब्रुवारी २०१९ ला पूर्ण करण्याचा अभियंत्याचा प्रयत्न असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ११०० कोटींचा खर्च केला जाणार आहे.

·       समुद्रातील या स्मारकासाठी तांत्रिक समितीचीही स्थापना करण्यात आली असून ईजीआयएस या फ्रान्सच्या कंपनीद्वारे स्मारकाचा आराखडा तयार केला जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत कामाला सुरूवात होईल.शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा पार पडत असून त्यासाठी महाराजांचे वास्तव्य असलेल्या शिवनेरी, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, राजगड, प्रतापगड या गडकिल्ल्यांसह शिखर शिंगणापूर, तुळजापूर, सिंदखेड राजा, कराड, जेजुरी, देहू आळंदी, रामटेक, वेरूळ, नाशिक, आग्रा, तंजावर आणि श्री शैलम या ठिकाणांवरून माती आणली जाणार आहे. यासह राज्यातील विविध नद्यांचे पाणी भूमीपूजनासाठी वापरले जाणार आहे. गुरूवारी (२२ डिसेंबर) पर्यंत या साऱ्या वस्तूंच्या कलशांचे मुंबईत आगमन होणार असून त्या कलशांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच २३ डिसेंबरला हे सर्व कलश गेट ऑफ इंडीया येथे आणण्यात येतील.

·       भूमीपूजनाच्या दिवशी मुख्यमंत्री हे कलश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती सुपूर्द करणार असून त्यांच्या हस्ते या कलशातील माती, दगड आणि पाण्याने भूमीपूजन सोहळा पार पडेल.



·       छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट असेल स्मारकाचे आकर्षण
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा अर्ध्या तासाचा लघुपट हे या स्मारकाचे आकर्षण असणार आहे.
·       थ्री डी आणि फोर डीच्या सहाय्याने शिवकालीन वातावरणाची निर्मिती करणारा एक लाईट व साऊंड शोही या ठिकाणी सादर केला जाणार आहे.
·       याशिवाय दररोज दोनशे कलाकाराच्या माध्यमातून राज्यभिषेकाचा प्रसंगही सादर केला जाणार असून स्मारकाच्या ठिकाणी दोन जेटींसह हेलीपॅडही उभारले जाणार आहे.
·       याशिवाय येणाऱ्या पर्यटकांसाठी उपहारगृह तसेच वैद्यकीय सेवेची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
  🏇🗡 स्मारकाची वैशिष्ट्ये 🗡
जलदुर्गाशी साध्यर्म असणारी दगडातील समुद्र तटबंदी.
आई तुळजाभवानी मंदीर.
कला संग्रहालय.
ग्रंथ संग्रहालय.
मत्स्यालय,
अॅम्पिथिएटर व हेलीपॅड.
ऑडीटोरीअम.
लाईट व साऊंड शो.
विस्तीर्ण बाग बगीचे.
रुग्णालय                    
सुरक्षा रक्षक निवासस्थाने.     
  आयमॅक्स सिनेमागृह.
प्रकल्प स्थळ ठिकाणी २ जेट्टी.
चौथऱ्यामध्ये      वेगवेगळ्या मजल्या वरून दृश्यावलोकनासाठी सोय.
पर्यटकांना प्रकल्प स्थळाकडे जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडीया,
नवी मुंबई व इतर ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था
स्मारक ठिकाणी शिवकालीन वातावरण निर्मिती

 जय जिजाऊ जय शिवराय ….  *****

Wednesday, 21 December 2016

पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा


उस्मानाबाद,दि.21:-राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री                           उस्मानाबाद  जिल्हा डॉ. दीपक सावंत  हे  दि. 21  डिसेंबर  2016 रोजी उस्मानाबाद  जिल्हाच्या   दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम  पुढीलप्रमाणे  राहील-

            बुधवार दि 21  डिसेंबर रोजी रात्री 8-30 वाजता शासकीय विश्रामृह शिंगोली येथे आगमन व राखीव. गुरूवार दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 9-00 ते 12-00 जिल्हा नियोजन  समिती  बैठकीस उपस्थिती (स्थळ जिल्हा  नियोजन  समिती  सभागृह  मध्यवर्ती  प्रशासकीय  इमारत, उस्मानाबाद ).दुपारी 12-00 ते 1-30 वाजता  शासकीय  विश्रामगृह  शिंगोली  जि. उस्मानाबाद  येथे  आगमन  व  राखीव.  दुपारी 1-30 वाजता  शासकीय  विश्रामगृह  शिंगोली  येथून  मोटारीने  मुंबईकडे  प्रयाण  करतील.

अपंगाच्या विशेष शाळा/कर्मशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी समिती सदस्य पदांसाठी अर्ज करावेत


उस्मानाबाद,दि.13:-स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगाच्या विशेष शाळा/कर्मशाळांचा दर्जा सुधारण्याकरीता जिल्हास्तरीय नियंत्रण समिती गठित करण्यासाठी अपंग क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबाबतचे राज्य/केंद्र शासनाकडून पुरस्कार प्राप्त केलेल्या जिल्हयातील चार अपंग व्यक्तींची  जिल्हास्तरीय नियंत्रण समितीवर सदस्य म्हणून नेमणूक करावयची आहे. काम करण्यास इच्छूक व्यक्तींनी  दिनांक 26 डिसेंबर 2016 पर्यंत अपंग क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबाबतच्या प्रमाणपत्रासह समाज कल्याण विभाग , जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस. के. मिनगिरे  यांनी केले आहे.

****

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज सादर करावेत


उस्मानाबाद.दि 21:- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, कल्टिव्हेटर , रोटाव्हेटर व ट्रेलर इत्यादींचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवाशी असावेत. एकूण सदस्यांपैकी 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे. तसेच स्वयंसहाय्यता बचत गटाचे व गटातील प्रत्येक सदस्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याचे व हे खाते सदर सदस्याच्या आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. तेव्हा या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हयातील  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी कार्यालयातील विहीत नमुन्यातील अर्ज चेकलिस्टप्रमाणे कागदपत्रांसह सादर करावेत. अर्जाची झेरॉक्स प्रत स्विकारली जाणार नाही. अर्ज सादर करण्याचा अंतिम दि. 5 जानेवारी  2017 पर्यंत असा राहील. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  या कार्यालयास संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. एस.एस. शेळके यांनी केले आहे.

                                                  *****

नाईचाकूर येथे मोफत आरोग्य तपासणी व संवाद मेळावा संपन्न




            उस्मानाबाद,दि.21:- प्राथमिक आरोग्य केंद्र नाईचाकूर ता. उमरगा येथे दि 20 डिसेंबर 2016 रोजी  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी कार्यक्रमांतर्गत शेतकरी व  त्यांचे पाल्य यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर मेळाव्याचे उद्घाटन आ. श्री. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी परिविक्षाधिन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.एकनाथ माले,  जिल्हा परिषद सदस्या श्रीमती अलकाताई भोसले, कृषी उत्पन्न बाजार समिती  सभापती              श्री नानाराव भोसले, गोविंद पवार, नाईचाकुरचे उप सरपंच  श्री शिवाजीराव पवार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. पांचाळ,डॉ.के के.मिटकरी, तालुका आरोग्य अधिकारी उमरगा  डॉ. श्रीमती बळे, डॉ. बनसोडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
           जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे  यांनी आरोग्य मेळाव्यासाठी उपस्थित लाभार्थीं, शाळकरी मुले-मुली  यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, चांगले  आरोग्य ठेवण्यासाठी  30 वर्षांपुढील प्रत्येकांनी आजार असेल किंवा नसेल तरीही आरोग्य तपासणी करून घ्यावी. प्राथमिक आरोग्य स्तरावरील सर्व शासकीय योजना व आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
परिविक्षाधिन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थितांना मार्गदर्शन करताना  म्हणाले की , शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेस समुपदेशन करण्यासाठी आरोग्य गट, शेतकरी मदत गट तयार करण्यात यावेत. या गटांनी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांची माहिती जनतेला देण्यात यावी व शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारू नये. शासनमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले.
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एकनाथ माले  यांनी यावेळी  मीच माझा डॉक्टर ही संकल्पना विशद केली. ग्रामीण भागातील जनतेने आरोग्याची काळजी घेताना परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरावे, तंबाखु,गुटखा,मावा असे तंबाखूजन्य पदार्थ  खावू  नयेत. तसेच प्रणायाम, योगा यासारखे व्यायाम करावेत.
शासना मार्फत  शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत शेतकरी व  त्यांचे पाल्य यांची प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर  तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी, संवाद मेळावे आयोजित करून शेतकत्यांना मानसिक समुपदेशन करण्यात येते. शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती व नापिकीला कंटाळून आत्महत्या करू नये, परिस्थितीचा धिराने सामना करावा, शासन व मी  स्वत: जनतेचा लोकप्रतिनीधी या नात्याने मदत करण्यास सदैव तयार आहे. असे आ. श्री ज्ञानराज चौगुले यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
           आरोग्य मेळाव्याच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना  उपक्रम व आरोग्य विषयक माहितीचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यासोबत महिला बाल कल्याण विभागामार्फत सकस आहाराबाबत माहितीचे प्रदर्शन व पदार्थ प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते. या मेळाव्यास शाळेतील मुले, मुली, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील महिला, पुरूष, स्थानिक गावकरी आरोग्य तपासणीसाठी लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बळे यांनी केले,सुत्रसंचलन श्री. शिवाजी राठोड तर आभार डॉ. अभिजीत बनसोडे यांनी मानले.                                            ******

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता मोहीम




उस्मानाबाद.दि 21:- राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व पंचायत समिती उस्मानाबाद येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील पंचायत समिती  परिसरात  स्वच्छता करून स्वच्छता अभियान राबविले.
         सर्वप्रथम पंचायत समिती सभागृहात स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .आनंद रायते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) श्री. शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो) श्री. रावसाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. शेखर जाधव, गट विकास अधिकारी श्री. चकोर, पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
              यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .रायते  म्हणाले की जिल्हयातील नागरिकांनी स्वच्छता अभियानात हिरिरीने सहभाग नोंदवून प्रत्येकाने घरी शौचालय बांधले  पाहिजे. यापुढे जिल्ह्यात माजी सैनिकांच्या सहभागातून शौचालय नसणाऱ्या कुटूंबाना स्वच्छतेचे महत्व सांगण्यात येणार आहे. शौचालय नसणाऱ्या कुटूंबातील महिलांसाठी निर्धार मेळावे आयोजित करून शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. स्मार्ट व्हिलेजसाठी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची असून गावातील स्वच्छतेची ड्रोनद्वारे पाहणी करून स्वच्छतेवर आधारित लाभार्थी निवड व गाव विकासासाठी निधी मिळणार आहे. गावामध्ये जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यात यावीत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बसण्याच्या ठिकाणीही नियमित स्वच्छता ठेवावी जेणेकरून कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. असेही श्री. रायते यांनी यावेळी सांगितले.

                                           *******

Tuesday, 20 December 2016

अतिविशेष अतिविलंब शुल्काने परीक्षेची आवेदनपत्र स्विकारण्याबाबत


        उस्मानाबाद , दि. 20 :- मंडळ विनियम 1977 नियम क्र. 46 अन्वये  मार्च 2017 मध्ये  होणाऱ्या  माध्यमिक शालान्त  प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेस  नियमित  प्रवष्ठि होणाऱ्या  विद्यार्थ्यांची  नियमित, पुनर्परीक्षार्थी  , नाव  नोंदणी प्रमाणपत्र  प्राप्त झालेले  खाजगी  विद्यार्थी , श्रेणी सुधार  योजनेंतर्गत  व तुरळक  विषयासी  परीक्षेस  प्रविष्ठ  होणाऱ्या  व विलंब  शुल्कासह  ऑनलाईन  परीक्षेची  आवेदनपत्र स्विकारण्याची  मुदत संपल्यानंतरही श्रेणी/ तोंडी / प्रात्यक्षिक  परीक्षा सुरु होण्यापूर्वी 33 दिवसांचा  कालावधी वगळून त्या अगोदर  प्रतिदिन  रु. 50/- प्रमाणे  अतिविलंब  शुल्क ,  अतिविलंब  शुल्काच्या  निर्धारित  तारखेनंतर  लेखी किंवा  प्रात्यक्षिक  परीक्षेच्या अगोदर जी परीक्षा  सुरु होणार आहे , त्यातील  सुरुवातीच्या  15 दिवसांपर्यंत  प्रती विद्यार्थी  प्रतिदिन  रु. 100/- व तद्नंतरच्या  15 दिवसांकरिता  व परीक्षेच्या आदल्या  दिवसापर्यंत  रु. 200/- प्रमाणे   अतिविशेष  अतिविलंब  शुल्क आकारुन आवेदनपत्र  स्विकारण्याच्या  तारखा पुढीलप्रमाणे  निश्चित करण्यात आल्या आहेत .
अतिविलंब शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2016 ते 15 जानेवारी 2017, विशेष अतिविलंब शुल्क भरण्यासाठी अंतिम  दिनांक 16  ते 30 जानेवारी 2017, अति‍ विशेष  अतिविलंब शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2017 असा राहील . दिनांक 13 डिसेंबर 2016 नंतर  प्राप्त होणारी  आवेदनपत्रे ही शाळांनी  स्वहस्ताक्षरात  भरुन तयावर विद्यार्थी  व मुख्याध्यापक  यांच्या स्वाक्षरीसह  मंडळास  सादर  करण्यात याव्यात. हे आवेदनपत्र  मंडळाच्या संकेतस्तळावर उपलब्ध आहे .

असे  विभागीय सचिव , लातूर विभागीय मंडळ  लातूर यांनी कळविले आहे .