Saturday, 14 February 2026

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२५ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२५ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन मुंबई, दि. १४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,उत्कृष्ट लेखन,उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे.या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी, २०२५ ते ३१ डिसेंबर,२०२५ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च,२०२६ असा आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी,माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक,मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत.अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

'हिंद-दी-चादर’ च्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबांचा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न-हरजितसिंग बेदी

'हिंद-दी-चादर’ च्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबांचा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न-हरजितसिंग बेदी पुणे, दि. १४ फेब्रुवारी: श्री गुरु तेग बहादुर साहिबांच्या शिकवणी आणि त्यांचे हौतात्म्याची भावना भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हिंद-दी-चादर' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कॅम्प येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे वरिष्ठ विश्वस्त हरजितसिंग बेदी यांनी दिली. श्री. बेदी म्हणाले, साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त त्यांची शहीदी संपूर्ण मानवजातीच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि सत्यासाठी होते. खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी ऐतिहासिक ‘हिंद-दी-चादर' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता प्रशासन आणि सिख, सिकलीगर, लबाना, बंजारा, मोहयाल, सिंधी आणि गुरुनानक नाम लेवा संगत-समुदाय एकत्रितपणे जय्यत तयारी करीत आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजीचे त्याग, शौर्य व मानवतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करीत असल्याबद्दल श्री. बेदी यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'महा पशुधन एक्स्पो’२०२६ ला मुख्यमंत्र्यांची भेट मंत्री पंकजा मुंडेंची 'उद्योजक' योजनेची घोषणा

पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'महा पशुधन एक्स्पो’२०२६ ला मुख्यमंत्र्यांची भेट मंत्री पंकजा मुंडेंची 'उद्योजक' योजनेची घोषणा परळी वैजनाथ (दि. १४): "आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. ज्याप्रमाणे शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहे, त्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करत आहोत. तंत्रज्ञानाच्या जोडणीतून हे क्षेत्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावर दुग्ध उत्पादनात अग्रेसर करेल," असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. परळीतील अंबेजोगाई रस्ता लगत असलेल्या ओपळे मैदानावर पशुसंवर्धन विभाग आयोजित तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार रत्नाकर गुट्टे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन, आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठम कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, खासगी सचिव मंदार वैद्य, अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाठकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त, बहुसंख्येने पशुपालक उपस्थित होते. शेतीला 'क्लायमेट रिस्क' मधून वाचवणार मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "हे प्रदर्शन केवळ एक सोहळा नसून कोरडवाहू शेतीतील हवामान जोखीम (Climate Risk) कमी करण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल आहे. पिकांचे नुकसान झाले तर पशुधन हेच शेतकऱ्यासाठी आधार म्हणून काम करते. त्यामुळेच आम्ही गाईला केवळ धार्मिक महत्त्व न देता तिचे आर्थिक योगदान लक्षात घेऊन ‘राज्यमाता’ दर्जा दिला आहे." तंत्रज्ञानाची कास: AI आणि एम्ब्रियो ट्रान्सप्लांट दुग्ध व्यवसायातील तफावत मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, "पंजाबमध्ये गाय १०-१५ लिटर दूध देते, तर आपल्याकडे २.५ लिटर ही तफावत भरून काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. पशुधन संवर्धन, आरोग्य व अचूक निरीक्षण आणि उत्पादकता वाढविण्यासाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मिशन' चा वापर करण्यात येईल. एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आणि सेक्स-सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञानाद्वारे उच्च दर्जाच्या कालवडींची पैदास वाढवून दुग्धोत्पादन वाढवले जाईल. यासाठी विदर्भ- मराठवाड्यात 'मदर्स डेअरी' सोबत करार देखील करण्यात आला आहे. अफवांवर विश्वास नको "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राला जागतिक स्पर्धेपासून सुरक्षित ठेवले आहे. भारत- अमेरिका करारात सोयाबीन किंवा कापूस आयातीचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे बाहेरील माल येऊन भाव पडतील, या अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये," असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. याउलट भारतीय शेतकऱ्यांना अमेरिकेची मोठी बाजारपेठ आता खुली झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गावातला तरुण होईल 'पशुधन उद्योजक': पंकजा मुंडे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, "केवळ नोकरीच्या मागे न लागता गावातील तरुणांनी मालक बनावे, यासाठी आम्ही लवकरच 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना' आणत आहोत. महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी शासनाकडून शून्य टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून देत आहे." तसेच पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. हा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे मंत्री मुंडे यांनी आभार मानले. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनीही परळीच्या विकासासाठी मुख्यमंत्री महोदय यांच्या समोर मागण्या मांडल्या. तसेच बीड व परळीचे विकासासाठी कायम निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांचे आभार मानले. विजेत्यांचा गौरव अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी पालन योजनेतील विजेत्यांना आणि गोपाळ रत्न पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पशुसंवर्धन विभागाच्या 'महापशुधन वार्ता' या मासिकाच्या 10व्या अंकाचे प्रकाशन व विभागाच्या 'दिनदर्शिका 2026'चे अनावरण केले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी ‘महापशुधन एक्स्पो 2026’मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत पात्र महिला बचत गटांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वितरण केले. जिरेवाडी, ता. परळी येथील तुळजाई महिला स्वयंसहायता समूहास ₹15,00,000 इतक्या कर्जाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)च्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत बर्दापूर येथील ‘उमेद सखी – महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ला शासन अनुदानाच्या ₹12,27,500 या प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले. सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक हस्तांतरण विदर्भ मराठवाडा दुग्धोत्पादन प्रकल्प आणि पशुधन विकास महामंडळ नागपूर यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक हस्तांतरण यावेळी करण्यात आले. पशुधन विकास मंडळ नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शितल मुकणे आणि मुख्य शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोमनाथ माने त्यासोबतच डॉ. दिनकर बोर्डे उपायुक्त पशुसंवर्धन जिल्हा परिषद सातारा व विदर्भ मराठवाडा उत्पादन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गोराडे यांना यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते कराराच्या प्रति हस्तांतरित करण्यात आल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली, स्मृती दालनाचे उदघाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनामध्ये असलेल्या विविध पशुधनाची पाहणी केली. पाहणीत त्यांनी पशु पालकांचे कौतुक केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार स्मृती दालनाचे उदघाटनही त्यांनी केले. मुख्य कार्यक्रम ठिकाणी सुरुवातीला राष्ट्रगीत, राज्यगीत झाल्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. परळी नगर परिषदेच्या स्व. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या “राष्ट्रीय गोपाल रत्न – 2025” पुरस्कार घोषणा करण्यात आली असून राज्यातील दोन पशुपालकांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रगतीशील पशुपालक श्रीमती श्रद्धा ढवण यांची निवड झाली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते श्रीमती ढवण सत्कार करण्यात आला. तसेच लाल कंधारी व देवणी गट पशु पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सायली संजीव यांनी केले. आभार सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी मानले. या सोहळ्याला परळीतील नागरिक आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी अलोट गर्दी केली होती. मुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे * उदगीर प्रकल्प: उदगीरचे दूध भुकटी केंद्र १०० कोटी खर्चून पुन्हा सुरू करणार. * नैसर्गिक शेती: रासायनिक खतांमुळे बिघडलेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गोमूत्र व शेणापासून तयार होणाऱ्या 'जीवामृता'ला प्रोत्साहन. *आरोग्य सेवा: राज्यातील २८४१ पशु दवाखान्यांचे आधुनिकीकरण आणि फिरत्या पशु ॲम्ब्युलन्स सेवेचे जाळे. *विकास दर: पशुसंवर्धन क्षेत्राचा विकास दर सध्याच्या ४-८% वरून २५% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट. *राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ३६६ प्रकल्पांना मंजुरी

ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वाढायला पाहिजे – श्री.गजानन गाडेकर * धाराशिव ग्रंथोत्सव २०२५ चे थाटात उद्घाटन * ग्रंथ दिंडी ठरली मुख्य आकर्षण

ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वाढायला पाहिजे – श्री.गजानन गाडेकर * धाराशिव ग्रंथोत्सव २०२५ चे थाटात उद्घाटन * ग्रंथ दिंडी ठरली मुख्य आकर्षण धाराशिव,दि. १४ (जिमाका) आपणाला सर्व प्रकारचे ज्ञान मिळण्याचे ग्रंथ व साहित्य हे मुख्य साधन आहेत. ग्रामीण भाग हा वाचनाच्या चळवळीत पहिल्यापासूनच सक्रिय आहे.त्यांची सक्रियता अधिक तीव्र करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ जोमाने वाढायला पाहिजे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर यांनी आज १४ फेब्रुवारी रोजी केले. वाशी शहरात आयोजित धाराशिव ग्रंथोत्सव – २०२५ अंतर्गत बाल वारकऱ्यांची ग्रंथ दिंडी काढण्यात आली.या दिंडीत विठ्ठल -रुक्मिणी, संत तुकाराम,संत मिराबाई यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ,महात्मा गांधी,महात्मा ज्योतिबा फुले,माता सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदी महापुरुषांच्या वेशभूषेत साकारलेली मिरवणूक हे ग्रंथोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव व तालुका ग्रंथालय संघ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ. गजानन कोटेवार,वाशी नगर पंचायतच्या नगराध्यक्ष विद्याताई गायकवाड,छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे,मराठवाडा विभागाचे प्रमुख कार्यवाहक राम मेकले,पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विनोद गायकवाड, अजिंक्य विद्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष एस.एल.पवार,जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे, निरीक्षक शिवशंकर कटाळे, सुधाकर बुकन आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना अशोक गाडेकर म्हणाले की,सोशल मीडियामुळे तरुण पिढीचा वाचनाकडे कल कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुकास्तरावर ग्रंथोत्सव साजरे करून सर्व प्रकारची पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचे आणि वाढविण्याचे काम समाजाच्या हितासाठी व्हावे,असे त्यांनी आवाहन केले. अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी यांनी ग्रंथालयांमध्ये सर्व प्रकारची पुस्तके,विशेषतः स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली.वाचक चोखंदळ असावा आणि वाचकसंख्या वाढावी यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत,असे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी सोशल मीडियाचे दुष्परिणाम तरुण पिढीसमोर मांडण्याची गरज व्यक्त केली. वाचनाच्या माध्यमातून पिढी घडते, तर सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती लोप पावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रा.डॉ.गजानन कोटेवार म्हणाले की, मी महात्मा गांधी यांना प्रत्यक्ष पाहिले नाही;मात्र ग्रंथांच्या माध्यमातून त्यांना आत्मसात केले.तरुणांना वाचनाच्या प्रवाहात आणण्यासाठी गावोगावी ग्रंथालय चळवळ जोमाने उभी राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच शासनाच्या अभ्यासिकांप्रमाणे वाचनालयांमध्येही अभ्यासिका सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी वाशी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून बाल वारकरी विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला.ढोल,हलगी,मृदुंग व टाळांच्या गजरात आणि जनजागृतीपर गीतांच्या निनादात ही दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक,पारा चौक मार्गे कार्यक्रम स्थळी दाखल झाली.विद्यार्थ्यांनी लेझीम,टिपऱ्या, अभंग व इतर सादरीकरणातून वातावरणात चैतन्य निर्माण केले. ग्रंथोत्सव स्थळी दीपप्रज्वलन करून महामानवांना पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि धाराशिव ग्रंथोत्सव – २०२५ चे थाटात उद्घाटन झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी केले.सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार लक्ष्मीकांत पवार यांनी मानले.कार्यक्रमास ग्रंथालय चळवळीतील पदाधिकारी,कार्यकर्ते, विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

Friday, 13 February 2026

बौद्ध संस्थांसाठी पायाभूत सुविधांकरिता १० लाखांपर्यंत अनुदान : २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

बौद्ध संस्थांसाठी पायाभूत सुविधांकरिता १० लाखांपर्यंत अनुदान : २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले धाराशिव दि.१३ फेब्रुवारी (जिमाका) धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या तसेच संस्थेमध्ये ५१ टक्केपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सन २०२५-२६ या वर्षाकरिता अनुदान योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील इच्छुक बौद्ध संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे. अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक २७/०१/२०२६ मधील तरतुदीनुसार अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत,याची संबंधित संस्थांनी नोंद घ्यावी. तसेच अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन शासन निर्णय ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी अन्वये या योजनेअंतर्गत पायाभूत सोयी-सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा रु.२.०० लाखांवरून वाढवून रु.१०.०० लाख करण्यात आली आहे. सदर शासन निर्णय,अर्जाचा नमुना तसेच आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र संस्थांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी केले आहे. ******

युवक-युवतींसाठी ‘किमान कौशल्य विकास कार्यक्रम : १७ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करा

युवक-युवतींसाठी ‘किमान कौशल्य विकास कार्यक्रम : १७ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करा धाराशिव दि.१३ फेब्रुवारी (जिमाका) जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य वृद्धीची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली असून प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियान अंतर्गत “किमान कौशल्य विकास कार्यक्रम” सन २०२५ -२६ साठी राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे.सन २०२५ -२६ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,अँप्रेल मिडीया ॲन्ड एन्टरटेनमेंट, हेल्थकेअर,टुरिझम ॲन्ड हॉस्पीटॅलिटी,जेम्स अँड ज्वेलरी, ऑटोमॅटिव,रिटेल तसेच ग्रीन एनर्जी या सेक्टरमधील विविध कोर्सेसचा समावेश आहे.या सर्व कोर्सेससाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची वयोमर्यादा १५ ते ४५ वर्षे अशी राहील.इच्छुक उमेदवार हा जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक असून त्याने यापूर्वी कोणतेही कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेले नसावे,अशी अट नमूद करण्यात आली आहे. १५ ते ४५ वयोगटातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत खालील गुगल फॉर्म लिंकद्वारे आपली इच्छुकता नोंदविणे आवश्यक आहे : https://forms.gle/N6wJ7152hEyApT8M7 अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२९९४३४ वर संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,प्रशासकीय इमारत,धाराशिव यांनी केले आहे. ******

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई भरती प्रक्रियेला वेग; निवड व प्रतीक्षा याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई भरती प्रक्रियेला वेग; निवड व प्रतीक्षा याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध धाराशिव दि.१३ फेब्रुवारी (जिमाका) नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड संवर्ग) पदांच्या भरती प्रक्रियेला वेग आला असून संबंधित उमेदवारांनी अधिक माहितीसाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित पाठपुरावा करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट-ड संवर्गातील 284 पदे भरण्यासाठी आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत माहे जुलै 2025 मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेचा निकाल दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता.निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून सामाजिक व समांतर आरक्षण तसेच गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणीअंती तयार करण्यात आलेल्या निवड यादी, प्रतीक्षा यादी,निवडीस नकार दिलेल्या उमेदवारांची यादी,अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या अनुषंगाने समुपदेशनासाठी बोलाविण्यात येणार असून समुपदेशनाचे ठिकाण व दिनांक लवकरच विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.तरी सर्व संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत माहिती तपासावी,असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी कळविले आहे. 00000

‘हिंद-की-चादर’ ३५० वा शहीदी समागम जिल्ह्यात विविध उपक्रमांतून जनजागृती करा -अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे

‘हिंद-की-चादर’ ३५० वा शहीदी समागम जिल्ह्यात विविध उपक्रमांतून जनजागृती करा -अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (जिमाका) : शिख धर्माचे नववे गुरू ‘हिंद-की-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्यभर विविध गौरवशाली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक वर्षानिमित्त त्यांचा त्याग, शौर्य व मानवतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम, स्पर्धा व प्रचार-प्रसिद्धी उपक्रम राबविण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, शिक्षणाधिकारी कविता शिंपी, तहसिलदार चैताली सावंत आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्हास्तरावर जनजागृतीसाठी निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील उपक्रम तसेच माहितीपर प्रदर्शनांचे आयोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानातून मिळणारा धार्मिक सहिष्णुता, मानवता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजात अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना व विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवून या ऐतिहासिक वर्षानिमित्त व्यापक जनजागृती घडवून आणावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी केले. ००० ०००

िंद दी चादर' समागमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या नियोजनबद्ध प्रवासासाठी सहकार्य करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे व्यापक जनजागृतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

हिंद दी चादर' समागमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या नियोजनबद्ध प्रवासासाठी सहकार्य करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे व्यापक जनजागृतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापूर, दि. १२ : नवी मुंबईतील खारघर येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजित 'हिंद दी चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर, सर्व समाजघटकांतील भाविकांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि त्यांना अनुषंगिक सर्व सहकार्य मिळावे, या दृष्टीने यंत्रणांनी चोख नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. या ऐतिहासिक कार्यक्रमास देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधी, शीख, सिकलगीर यांसह नऊ विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, माहिती उपसंचालक प्रवीण टाके, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास आणि त्यांचे बलिदान नव्या पिढीला ज्ञात व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित गीतगायन, चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धा आणि प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी या उपक्रमांच्या व्यापक प्रसिद्धीसाठी दररोजची छायाचित्रे संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश दिले असून, शैक्षणिक संस्थांमध्ये सतिंदर सरताज यांचे गाणे व माहितीपट दाखवून जनजागृती करावी, असेही स्पष्ट केले. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करून सामाजिक संघटनांशी सातत्याने समन्वय राखण्यावर त्यांनी भर दिला. या शताब्दी वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने खुली व महाविद्यालयीन अशा दोन गटांत निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपले साहित्य २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत hinddichadarkolhapur@gmail.com या ई-मेलवर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले असून जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे प्रशासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. ०००००

Thursday, 12 February 2026

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी धाराशिव दि.१२ फेब्रुवारी (जिमाका) सन २०२५ मधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नंतरच्या गरजांचे मूल्यांकन (PDNA) करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक केंद्रीय पथक प्रमुख श्री.सी.पी.मोहन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आज दाखल झाले.या पथकाने बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी व ग्रामस्थांच्या वेदना जाणून घेतल्या व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी केली. भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) गावाजवळ श्री.सी.पी.मोहन यांनी भारत मोरे,चंद्रकांत मोरे व अमरसिंह ढगे यांच्या शेतीची पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पिके, शेतीजमीन आणि बांधबंदिस्तीचे झालेले नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बाधित शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी श्री.मोहन यांना दिली. यावेळी भूम उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे,तहसीलदार जयवंत पाटील, तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे, मंडळ अधिकारी प्रवीण पारखे व ग्राम महसूल अधिकारी श्रीमती एस.के.खोत प्रामुख्याने उपस्थित होत्या. चिंचपूर येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे तसेच वालवड येथील पाझर तलावाचे पुरामुळे झालेले नुकसानही पथकाने पाहिले.पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मदने यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली. बेलगाव येथील विश्वनाथ दातखिळे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या १८ गाई पुरात मृत्युमुखी पडल्या,तर २० बकऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.जनावरांचा चारा,दूध काढण्याची मशीन,गोठा,शेणखत व कडबा कटरही पुरामुळे वाहून गेल्याची व्यथा श्री.दातखिळे यांनी पथकासमोर मांडली.या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबावर कोसळलेले दु:ख आणि उपजीविकेवर आलेले संकट प्रकर्षाने समोर आले. परंडा तालुक्यातील आवार पिंपरी गावालाही केंद्रीय पथकातील सदस्य श्रीमती आशा राणी व श्री.मिकी मेकॉन डलबेरा यांनी भेट दिली.गावाजवळून वाहणाऱ्या उल्फा नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या शाळा,अंगणवाडी इमारत व ग्रामपंचायतीच्या आरओ प्लांटची पाहणी करून त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक शहाजी गावटे,अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.यावेळी तहसीलदार नीलेश काकडे,गटविकास अधिकारी विनोद जाधव,प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री.हाके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री.मोहन यांनी परंडा विश्रामगृह येथे तलावातून मासेमारी करणाऱ्या मासेमारी बांधवांशी चर्चा करून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. दरम्यान,आज सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके,शेतीजमीन,पशुधन,रस्ते, सार्वजनिक मालमत्ता तसेच खाजगी मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे पथकास दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्यासह विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. हे तज्ज्ञ पथक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नुकसानीचा सखोल आढावा घेऊन सविस्तर PDNA अहवाल तयार करणार असून तो केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना त्यामुळे दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. *****

Wednesday, 11 February 2026

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २ १३ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांसाठी वेबिनार

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २ १३ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांसाठी वेबिनार धाराशिव,दि.11 फेब्रुवारी (जिमाका ) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (टप्पा २) अंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प,मुंबई स्तरावरून दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या टप्पा २ अंतर्गत वैयक्तिक व सामुदायिक लाभाचे विविध घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.वैयक्तिक लाभामध्ये वृक्ष लागवड,बांबू लागवड,फळबाग लागवड,ठिबक सिंचन संच,तुषार सिंचन,शेततळे,शेततळे अस्तरीकरण,शेडनेटगृह व हरितगृहामधील लागवड साहित्य, गांडूळ खत व पुनर्भरण,पाईप व पंप संच (अनुसूचित जाती व जमातीतील लाभार्थ्यांसाठी), बीजोत्पादन,रेशीम उद्योग,गोड्या पाण्यातील मत्स्यपालन,शेळीपालन तसेच भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्ता व घटस्फोटीत महिलांसाठी विशेष लाभांचा समावेश आहे. सामुदायिक लाभांतर्गत एफपीओ, एफपीसी व एफएसजी यांच्यासाठी ६० टक्के अनुदानावर गोडाऊन उभारणीची सुविधा देण्यात येणार आहे.तसेच उमेद,महिला व आर्थिक विकास महामंडळ पुरस्कृत महिला बचत गट व गावसंघ तसेच एमएसआरएलएम यांच्यासाठी ६० टक्के अनुदानावर औजारे बँक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वेबिनारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती व ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. ******

प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक माहिती सादर करावी

प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक माहिती सादर करावी धाराशिव,दि.11 फेब्रुवारी (जिमाका ) राज्यातील शेती क्षेत्रात तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनामार्फत अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेची आखणी करण्यात येत आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागविली असून,त्यानुसार विहीत नमुना प्रपत्र ‘अ’ व ‘ब’ मध्ये माहिती संकलनाचे काम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था तसेच धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावर थकीत कर्जदार सभासदांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.सेवा सहकारी संस्थांच्या पातळीवर थकीत सभासदांच्या कर्ज खात्यांबाबत तसेच इतर अनुषंगिक माहिती गोळा केली जात आहे. मात्र,सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्ज असलेल्या बहुतांश सभासदांनी अद्याप संबंधित संस्थेच्या सचिवांशी संपर्क साधून त्यांचे आधार कार्ड, फार्मर आयडी तसेच इतर आवश्यक माहिती उपलब्ध करून दिलेली नसल्याने माहिती संकलनात अडथळे येत आहेत.परिणामी,संस्था पातळीवर आवश्यक माहिती पूर्णपणे संकलित करता आलेली नाही. जिल्ह्यातील ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी अद्यापही त्यांचे आधार कार्ड,फार्मर आयडी व अन्य आवश्यक माहिती संबंधित सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेला उपलब्ध करून दिलेली नाही,त्यांनी तातडीने संबंधित संस्थेचे सचिव किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे वसुली अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर करावी,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, धाराशिव यांनी केले आहे. *****

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात अशासकीय अधिक्षक पदासाठी माजी सैनिकांना संधी

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात अशासकीय अधिक्षक पदासाठी माजी सैनिकांना संधी धाराशिव,दि.11 फेब्रुवारी (जिमाका) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सैनिकी मुलांच्या वसतीगृहात अशासकीय वसतिगृह अधिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.हे पद निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात असून एकत्रिक मानधनावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक माजी सैनिक (JCOs) यांनी स्वतःची मूळ कागदपत्रे,डिस्चार्ज बुक,पी.पी.ओ.,माजी सैनिक ओळखपत्र तसेच आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे अर्ज सादर करावेत. कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी 11 वाजता पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02472-222557 किंवा 7588527554 वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे. ****

Tuesday, 10 February 2026

“स्मार्ट टेक,सुरक्षित पर्याय” — सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

“स्मार्ट टेक,सुरक्षित पर्याय” — सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम धाराशिव,दि.१० फेब्रुवारी (जिमाका) जगभरात साजरा होणाऱ्या सुरक्षित इंटरनेट दिन २०२६ निमित्त धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले.या कार्यक्रमात जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री.अंकित सिंह यांनी इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदार वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना श्री.सिंह यांनी इंटरनेट म्हणजे काय,त्याचा उपयोग कोणकोणत्या बाबींमध्ये केला जातो,डिजिटल पेमेंटसाठी इंटरनेटचा वापर कसा होतो याची माहिती दिली.तसेच इंटरनेटचा अतिवापर केल्यास होणारे दुष्परिणाम व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबतही त्यांनी उपस्थितांना जागरूक केले. सायबर गुन्हेगारी,सायबर फसवणूक कशी घडते,अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने होणारे धोके,मजबूत (Strong) पासवर्ड कसा तयार करावा व तो सुरक्षित कसा ठेवावा,यासह कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा जबाबदारीने वापर कसा करावा, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहावे,असे आवाहन त्यांनी केले. युरोपीय नेटवर्क ऑफ इंटरनेट सेफ्टी सेंटर्स (Insafe Network) यांच्या पुढाकाराने दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो.“स्मार्ट टेक,सुरक्षित पर्याय – आजचा सुरक्षित आणि जबाबदार वापर” या संकल्पनेवर आधारित या दिनाचा उद्देश इंटरनेट सुरक्षितता,डिजिटल साक्षरता व सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे हा आहे.सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाने डिजिटल व्यवहार करताना दक्ष राहून वैयक्तिक माहितीचे संरक्षण करावे व इंटरनेटचा सुज्ञ,सुरक्षित आणि जबाबदार वापर करावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखेचे अधिकारी - कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात,जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हे जिल्हा परिषद सभागृहातून तर विविध विभागाचे अधिकारी -कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. ******

परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६’ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण

परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६’ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण धाराशिव,दि.१० फेब्रुवारी (जिमाका) महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत परळी वैजनाथ (जिल्हा बीड) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो, २०२६’ या प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याधरण कडवकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.पुंडलिक गोडसे,जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ.धनंजय महाजन तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. वैभव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोगो अनावरणानंतर संवाद साधताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की,पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे.परळी वैजनाथ येथे होणारे हे महाप्रदर्शन देशातील जातीवंतy पशुधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना दुग्धव्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान एका छताखाली पाहण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट देऊन आपले ज्ञान व उत्पन्न वाढवावे. प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ.धनंजय महाजन यांनी सांगितले की,या महा एक्स्पोमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातीवंत गायी,म्हशी,शेळ्या-मेंढ्या तसेच विविध पक्षी प्रजातींचे दर्शन घडणार आहे. यासोबतच आधुनिक डेअरी फार्मिंग,चारा व्यवस्थापन,प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स,पशुधन आरोग्य,लसीकरण व वैज्ञानिक संगोपनावर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. लोगो अनावरणानंतर संपूर्ण जिल्ह्यात या प्रदर्शनाची व्यापक प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येणार असून,सर्व पशुवैद्यकीय संस्था,पंचायत समित्या व सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून घरपोच माहिती देण्याचेही नियोजन विभागाने केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालक,शेतकरी व उद्योजकांनी ‘महा पशुधन एक्स्पो २०२६’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ******

Sunday, 8 February 2026

जि.प व पं.स.सार्वत्रिक निवडणूक २०२६ ५५ जि.प गट व ११० निर्वाचक गणासाठी मतदान

जि.प व पं.स.सार्वत्रिक निवडणूक २०२६ ५५ जि.प गट व ११० निर्वाचक गणासाठी मतदान निवडणुकीत ६५.२२ टक्के मतदान ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क * सर्वाधिक मतदान भूम तालुक्यात * सर्वात कमी मतदान लोहारा तालुक्यात धाराशिव दि ८ फेब्रुवारी (जिमाका) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान मतदान झाले.सायंकाळी ५.३० वाजता नंतरही काही मतदान केंद्रात प्रवेश मिळालेले मतदार मतदानासाठी रांगेत उभे होते. जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषद गट आणि ११० निर्वाचक गण अर्थात पंचायत समिती गणासाठी १३०८ मतदान केंद्रावर मतदान झाले.या निवडणुकीसाठी ११ लक्ष ४५ हजार ८८८ मतदार होते.यामध्ये ६ लक्ष ५ हजार ८४३ पुरुष,५ लक्ष ४० हजार ३७ स्त्री आणि ८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदानाच्या दिवशी ३ लक्ष ९९ हजार ६४९ पुरुष,३ लक्ष ४७ हजार ७१८ स्त्री आणि ४ तृतीयपंथी अशा एकूण ७ लक्ष ४३ हजार ३७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची ही टक्केवारी ६५.२२ टक्के इतकी आहे.सर्वाधिक मतदान या निवडणुकीत भूम तालुक्यात झाले असून मतदानाची तेथील टक्केवारी ७१.६६टक्के इतकी आहे.सर्वात कमी मतदान लोहारा तालुक्यात ५७.३२टक्के झाले. भूम तालुक्यातील पाच जि.प.गट आणि दहा निर्वाचक गणासाठी ३९ हजार २३४ पुरुष व ३३ हजार ९५६ स्त्री अशा एकूण ७३ हजार १९० मतदारांनी मतदान केले.या मतदानाची टक्केवारी ७१.६६ टक्के आहे. वाशी तालुका - तीन जि.प.गट व सहा निर्वाचक गणासाठी २४ हजार ७७१ पुरुष,२१ हजार ५९४ स्त्री व दोन तृतीयपंथी अशा एकूण ४६ हजार ३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६९.६० टक्के आहे. कळंब तालुका - ८ जि.प.गट व १६ निर्वाचक गणासाठी ५८ हजार २६३ पुरुष, ५० हजार ४४९ स्त्री.एकूण १ लक्ष ८ हजार ७१२ मतदारांनी मतदान केले.मतदानाची टक्केवारी ६६.६९ टक्के इतकी आहे.धाराशिव तालुका - बारा जि.प.गट व २४ निर्वाचक गणासाठी ८५ हजार ६५० पुरुष व ७३ हजार ६०८ स्त्री अशा एकूण १ लक्ष ५९ हजार २५८ मतदारांनी मतदान केले.या मतदानाची टक्केवारी ६३.७३ टक्के इतकी आहे. परंडा तालुका - पाच जि.प. गट व दहा निर्वाचक गणासाठी ४१ हजार ६१५ पुरुष, ३५ हजार १९७ स्त्री अशा एकूण ७६ हजार ८१२ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७१.६२ टक्के इतकी आहे.तुळजापूर तालुका - ९ जि.प गट व १८ निर्वाचक गडासाठी ६७ हजार ३४० पुरुष व ५८ हजार ७९७ स्त्री मतदार अशा एकूण १ लक्ष २६ हजार १३७ मतदारांनी मतदान केले. टक्केवारी ६४.७२ टक्के आहे. लोहारा तालुक्यातील ४ जि.प गट आणि ८ पंचायत समिती गणासाठी २७ हजार २१७ पुरुष व २४ हजार २२ स्त्री अशा एकूण ५१ हजार २३९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची ही टक्केवारी ५७.३२ टक्के आहे. उमरगा तालुका - ९ जि.प.गट आणि १८ पंचायत समिती गणासाठी ५५ हजार ५५९ पुरुष,५० हजार ९४ स्त्री व दोन तृतीयपंथी व्यक्तींनी मतदान केले.एकूण १ लक्ष ५ हजार ६५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी ६१.१८ टक्के इतकी आहे . *****