Saturday, 8 April 2017

“सामाजिक समता सप्ताह”प्रत्यक्ष कृतीतून साजरा करू या – उपायुक्त स्वाती इथापे





उस्म्नाबाद,दि.8:-.अनुसूचित जाती व सर्व प्रकारचे पीडीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून  देण्याबाबबात  राज्य सरकार  सातत्याने  प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दूर्बल घटकांच्या सर्वांगीण  विकासाचे ध्येय म्हणून  विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबवण्यिात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत,याकरीता  राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह दि.8 ते 14 एप्रिल या कालावधीत साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची आजपासून सुरूवात झाली आहे.आपण  सर्वजण  हा सामाजिक समता सप्ताह  प्रत्यक्ष  कृतीतून  साजरा करूया असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त स्वाती इथापे यांनी आज येथे केले सामाजिक न्यायभवनच्या सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहांच्या उदघाटन  समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी त्या बोलत  होत्या.
 सामाजिक न्यायभवनच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त श्रीमती एस.एस.मते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त  शंकरराव खुने, संशोधन अधिकारी संतोष खुने, आदींची उपस्थिती होती.
श्रीमती  इथापे पुढे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला,समता,स्वातंत्र्य व  बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य घटनेतही राज्य हे दुबर्लतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील  असेही नमूद केले आहे. सामाजिक परिस्थितीचा समतोल राबविणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, हे कर्तव्य बजावताना आपल्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक न्याय विभागाच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या शासकीय  वसतीगृहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,अत्याचारास बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील अर्थसहाय्य योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी रमाई आवास घरकुल योजना, मिनी ट्रक्टर योजना, शैक्षणिक योजना,कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना, विजाभज  आश्रम शाळा या  योजनांची  माहितीही  उपस्थितांना  देण्यात  आली.
प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त श्रीमती एस.एस.मते यांनी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापर्यंत चालणाऱ्या या सामाजिक समता सप्ताहाची रुपरेषा व त्याअंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रम-उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे उदघाटन सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.तसेच भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. भगवान चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. गृहपाल  श्री. बाप्पा नाईकनवरे  यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध महामंडळांचे पदाधिकारी, अधिकारी तसेच तालुका समन्वयक, समता दूत, समाज कल्याण तसेच विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आदींचीही उपस्थिती होती.

Friday, 7 April 2017

त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 व द्विवार्षिक विवरणपत्र 30 एप्रिल 2017 पर्यंत ऑनलाईन सादर करावेत -रमेश पवार


  उस्मानाबाद,दि.7:-केंद्र शासनाच्या सेवायोजना कार्यालये (सक्तीने पदे अधिसूचित करण्यास भाग पाडणे ) कायदा 1959 व त्याअंतर्गत नियमावली 1960 पारित केली असून या कायद्याच्या कलम 5 अन्वये सर्व संबं‍धित उद्योजकांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती दर तिमाहीस विहित प्रपत्र ईआर-1मध्ये या कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.
कायद्यातील नियम 6 च्या पोटनियम 3 मध्ये निर्धारित करण्यात आलेले आहे,तिमाही विहीत प्रपत्र ईआर-1 च्या प्रयोजनार्थ प्रत्येक वर्षाच्या 31 मार्च,30 जून,30 सप्टेंबर व 31 डिसेंबर या विहित तारखा असतील व विहीत प्रपत्र या विहित तारखापासून एक महिन्याच्या आत सादर करणे अनिवार्य आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्हयातील सर्व आस्थापनांनी दिनांक 31 मार्च 2017 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई.आर.-1 व केंद्र शासन,राज्य शासन,निमशासकीय कार्यालये, शासकीय अंगीकत उपक्रम,महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनांनी दि.30 सप्टेंबर 2016 अखेरचे द्विवार्षिक विवरणपत्र ई.आर.2 सह दि.30 एप्रिल 2017 पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.तथापि ज्या आस्थपनांनी अधिनियम 1959 कलम 7 (2) अन्वये विवरणपत्र न पाठविणाऱ्या आस्थापनास दोषी मानण्यात येईल व त्याविरूध्द  न्यायालयीन अभियोग दाखल केला जाईल.
          तिमाही विवरणपत्र उद्योजकांना ऑनलाईन सादर करता यावे,यासाठी विभागामार्फत या http://www.maharojgar.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले असून, या  वेबपोटलद्वारे दिनांक 31 मार्च -2017 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई.आर. -1 व द्विवार्षिक विवरणपत्र ई.आर.2 दि.30 एप्रिल 2017 पर्यंत,आपल युजर आयडी व पावर्ड वापरुन ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक श्री.रमेश  पवार यांनी केले आहे. 

जागतिक आरोग्य दिनानिमित्त कोषागार कार्यालयात मोफत आरोग्य शिबिर संपन्न


उस्मानाबाद,दि.7:- जिल्हा कोषागार कार्यालय व शासकीय आयुर्वेद रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिना निमित्त कोषागार कार्यालयात मोफत आरोग्य शिबिर घेवून 145 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले यामध्ये शासकीय कर्मचारी, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश होता, असे कोषागार अधिकारी विशाल पवार यांनी सांगितले.
          या आरोग्य शिबिरात मधुमेह, रक्तदाब, वजन तपासणी व मधुमेहाविषयी उपस्थितांना आहाराचा सल्ला देण्यात आला. तसेच आयुर्वेदिक औषधीची चित्सिका करून पंचकर्मा विषयी माहिती देण्यात आली.
          या आरोग्य शिबिर कार्यक्रमात आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक, विभाग प्रमुख, स्त्रीरोग प्रसुती तंत्र विभाग वैद्य. विणा पाटील, वैद्यकीय अधिकारी वैद्य. उमा आंधळकर, सहयोगी प्रा. निदान विभाग वैद्य. एस.के.नाम्बे, सहाय्यक प्रा. कार्यचिकित्सा विभाग वैद्य. विनायक पाचे यांनी सहभाग नोंदवला.

          या जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिर यशस्वीतेसाठी कोषागार कार्यालयातील अप्पर कोषागार अधिकारी श्री. अप्पासाहेब पवार व इतर अधिकारी तसेच  कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.  

जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न


उस्मानाबाद,दि.7:- जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय येथून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली, या रॅलीचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या हस्ते करण्यात आले.
          जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने 7 एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी  "नैराश्यावर बोलू या" हे घोषवाक्य घेवून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य दिना निमित्त जिल्हा रुग्णालयात शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित 'नैराश्यग्रस्त शेतकऱ्याची कथा' हे पथनाटय सादर केले. या पथनाटयमध्ये अरूणा सुतार, ज्योती शेटे, श्वेता पवार, धनंजिनी नागटिळक, अनुराधा माळी, स्वाती चिंचोले, सचिन रोहिणे, विवेक खंडागळे, रुपाली बगाडे, वैष्णवी धोंडे  आदींचा सहभाग होता. तर हे पथनाटय सुमित्रा गोरे यांनी तयार केले होते.
          जागतिक आरोग्य दिनानिमित्त मराठवाडयातील पहिले शासकीय रुग्णालयातील व्यसनमुक्ती केंद्राचे उदघाटन जिल्हा रुग्णालयात उपस्थित रुग्णाच्या हस्ते करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश करंजकर, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. सचिन देशमुख, व्यसनमुक्ती केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय भोसले यांची यावेळी प्रमुख्याने उपस्थिती होती.
          मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिराचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. धनंजय पाटील, मानसोपचार तज्ञ डॉ. महेश कानडे, एनसीडीचे कार्यक्रम अधिकारी डॉ. भिमाशंकर नरवडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. ऋषीकेश खरोळकर, व्यसनमुक्ती केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय भोसले यांची यावेळी प्रमुख्याने उपस्थिती होती. यावेळी 94 रुग्णांची मधुमेह, रक्तदाब, दंत व नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 3 जणांना रक्तदाब तर 15 जणांना मधुमेह असल्याचे आढळून आले. यावेळी तणावमुक्त जीवनशैलीसाठी मानसोपचार तज्ञ डॉ. महेश कानडे यांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली.

          या शिबिरासाठी आरोग्य  विभागाचे कर्मचारी व एनसीडीची टीम प्रामुख्याने उपस्थित होती.                                  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन


उस्मानाबाद,दि.7:-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दि.5 एप्रिल 2017 अन्वये संपूर्ण राज्यामध्ये दि.8 ते 14 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर  सामाजिक  समता  सप्ताह  साजरा  करण्यात येणार आहे.       
त्यानुसार  जिल्हयामध्ये  पुढीलप्रमाणे  कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात  आले आहे. दि.8 एप्रिल  रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली समता सप्ताहाचे उदघाटन करण्यात येणार आहे. दि.9 एप्रिल रोजी सर्व महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांच्या कडून महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व त्या अंतर्गत कर्जाचे वाटप लाभार्थ्यांना कशा पध्दतीने करण्यात येते याबाबतची माहिती, दि. 10 एप्रिल रोजी जिल्हयातील सर्व महाविद्यालय, शाळा, निवासी शाळा, आश्रमशाळा तसेच शासकीय अनुदानित वसतिगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाटय,प्रश्नमंजूषा,वादविवाद स्पधेंचे आयोजन, दि.11 एप्रिल रोजी आरोग्य अधिकारी व सिव्हील सर्जन यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती प्रसार कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन, दि.12 एप्रिल रोजी सर्व शासकीय कार्यालय व स्वयंसेवी  संस्थाच्या  सहाय्याने  जिल्हयातील  सर्व  महत्वाच्या  ठिकाणी  व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यामध्ये स्वच्छता अभियान,दि.13 एप्रिल रोजी सामाजिक कार्यक्षेत्रातील विचारवंत,नामवंत पत्रकार जसेच सामाजिक चळवळीतील प्रसिध्द व्यक्ती यांचे समाज प्रबोधनपर विविध विषसयाचे व्याख्याने,अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नामवंत लोककलावंत यांचे विविध सामाजिक विषयावर प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन, दि.14 एप्रिल  रोजी  जिल्हा  स्तरावरील सर्व कार्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक  समता  सप्ताह  सांगता  होणार आहे.

          तरी जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमामध्ये सहभाग घेवून कार्यक्रम यशस्वीरित्या  पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी सवलतीचे गुण वाढीसाठी प्रस्ताव सादर करावेत

शास्त्रीय कला,चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी सवलतीचे गुण वाढीसाठी प्रस्ताव सादर करावेत
        उस्मानाबाद.दि.7:- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) मार्च 2017 करिता शास्त्रीय कला,चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी सवलतीचे गुण वाढीसाठी  संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज आवश्यक त्या संस्थेच्या प्रमाणपत्रासह मुख्याध्यापकांकडे  दि.20 एप्रिल 2017 पर्यंत  विहित नमुन्यात  सादर करावेत,असे  लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव यांनी प्रसिध्दी  पत्रकाद्वारे  कळविले  आहे.
          शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र प्रमाणित करून कला प्रकाराच्या प्राविण्यानुसार अनुज्ञेय होणाऱ्या गुणांच्या शिफारशीसह संबंधित विभागीय मंडळाकडे शाळेच्या लेटरहेडवर प्रस्ताव सादर करावेत.
ज्या विद्यार्थ्यांना  या प्रकारात गुण द्यावयाचे आहेत त्या विद्यार्थ्यांची यादी, प्रमाणपत्र प्रमाणित  करून  शिफारसपत्र  व मान्यताप्राप्त  संस्थांची  यादी  त्यासोबत  सादर करावी.

          विद्यार्थ्यांनी दि. 20 एप्रिल 2017 पर्यंत तर शाळांनी दि. 30 एप्रिल 2017 पर्यंत विहित नमुन्यातील अर्जासोबत संबंधित  विभागीय  मंडळाकडे  प्रस्ताव  सादर  करावेत.

मुलींनो आपल्या हक्काबाबत जागरूक व्हा ! - जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे




        उस्मानाबाद,दि.7:-जिल्हयात मुलींचा जन्मदर वाढविण्यामध्ये  आपल्या जिल्हयाला यश मिळाले आहे, परंतु आता मुलींनो येथेच थांबून चालणार नाही,मुलींनो आपल्या हक्काबाबत जागरूक व्हा ! असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत  नारनवरे  यांनी  आज  येथे केले.
उमेद स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे 10  वी  12  वीच्या  मुलींकरिता स्पर्धा परिक्षा व्यवसाय मार्गदर्शन शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद हे उपस्थित होते.
        डॉ.नारनवरे आपल्या मागदर्शनपर भाषणात  म्हणाले की, आपल्या बाळाचे  पालकत्व  स्वीकारणे  सोपे असते  मात्र  समाजाचे  पालकत्व स्वीकारणे ही बाब खूप मोठी आहे. समाजाचे  पालकत्व स्त्री-पुरूष  दोघांनीही स्वीकारल्यास  समाजाचा  विकास  झपाट्याने  होतो.
        उस्मानाबाद जिल्हयात मुलींचा जन्मदर वाढविण्यात प्रशासनाला यश मिळाले,स्त्रीभ्रूण  हत्या  या  विषयावर  प्रशासनाने अंत्यंत  गांभीर्यांने कृतीपूर्ण निर्णय घेतले, ज्या समाजात महिलांचे प्रमाण कमी होते त्या समाजाची देशाची सामाजिक परिस्थिती धोक्यात येते, याकरिता सर्वांनी मिळून काम करायला हवे.आधी मुलींनी स्वत:ला मदत करायला शिकले  पाहिजे. तरच बाहेरचे तुम्हाला मदत करतील, संकटांना न घाबरता धैर्याने आयुष्याची वाटचाल करा,असे  सांगून  ते  पुढे म्हणाले की, माणूस म्हणून जगायला अधिकार कष्ट करून  मिळावा,आणि या उमेद स्पर्धा मार्गदर्शन केंद्रामुळे ही क्षमता तुमच्यामध्ये निर्माण  होत  आहे  त्याचा  मला  निश्चित  अभिमान आहे.
        यावेळी डॉ.नारनवरे यांनी  या मुलींना स्पर्धा परिक्षेचे ध्येय कसे निश्चित करावे, ध्येय निश्चितीनंतर अभ्यास कसा करावा आणि यशस्वी झाल्यानंतरही पुढील वाटचाल कशी करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.याबरोबरच त्यांनी विशाखा समिती तसेच मनोधैर्य योजना  याविषयीही उपस्थितांना माहिती दिली.
        यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित मुलींना आपण ग्रामीण भागातील असल्याचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने अथक प्रयत्नांनी यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच उमेदने ग्रामीण भागातील मुलींना स्वाभिमानाने उभे राहायला प्रेरीत केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यंचे अभिनंदन केले व या मुलींनी पुढच्या पीढीसाठी सावित्रीबाई फुले व्हावे असे आवाहनही केले.
        शेवटी आभार प्रदर्शन व्यक्त करताना मुख्य कार्यकारी  अधिकारी श्री. रायते यांनी उमेदची स्थापना कशी झाली,उमेदचे कार्य कसे चालते आणि भविष्यात उमेद जास्तीत जास्त मुलींसाठी उमेद निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षणाधिकारी (निरंतर) श्री. कादर शेख यांनी केले. यावेळी पल्लवी शिंदे,भग्यश्री लोंढे या विदयार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.

        या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, शिक्षणाधिकारी (मा) औदुंबर उकिरडे, शिक्षणाधिकारी (प्रा)सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (निरंतर)संजयकुमार राठोड, वरिष्ठ लेखाधिकारी रविद्र शिंदे, उपशिक्षणाधिकारी (निरंतर) कादर शेख, स्वीय सहाय्यक अनिल केसकर,मिलींद प्रयाग, विस्तार अधिकारी सोमनाथ घोलप,ग्रं थपाल श्रीमती आशा नवले,श्रीमती बिडवे, श्रीमती तब्बसम सय्यद, श्रीमती सोनवणे आणि 10 वी,12 वी, पदवी परिक्षेस  बसलेल्या  मुली  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Thursday, 6 April 2017

शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाचे मार्केटिंग केले पाहिजे -जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे




उस्मानाबाद,दि.6:-शेतकऱ्यांनी फक्त उत्पादक होवून न थांबता आपल्या शेतीमालाचे मार्केटिंग देखील केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे केले.
        कृषी व आत्मा विभाग यांच्या वतीने बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी मार्गदर्शक चर्चासत्राचे आयोजन  जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, एनसीडीइएक्स कंपनीचे श्री.राघवन व श्री. शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
        यावेळी पुढे बोलताना डॉ. नारनवरे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीकडे वळले पाहिजे,जमिनीचे संवर्धन करायचे असेल तर सुक्ष्मसिंचनाने शेतीसाठी पाण्याचा वापर केला पाहिजे तसेच शेततळे करून त्याचा शेतीसाठी फायदा घ्यायला हवा, शेतबांधावर काही अंशी फळझाडे लावून उत्पन्न घ्यावे.
        अर्थ शास्त्रीय सिध्दांत सांगताना ते म्हणाले की, शेतकऱ्याचे आर्थिक गणित का कोलमडून पडते तर शेतकरी हा केवळ शेतीवरच अवलंबून आसतो  शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय जसे शेळी पालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय केल्यास शेतकरी आर्थिक सक्षम होण्यास मदत होईल.त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे,त्यासाठी त्यांनी आपल्या शेतमालाचे प्रोसेसिंग,ब्रॅन्डींग व मार्केटिंग करून शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत स्वत:चा उदयोग तयार करावा, असे ही डॉ. नारनवरे यावेळी म्हणाले.
        यावेळी श्री. रायते म्हणाले की, मोठमोठया उदयोगात गुंतवणूक होते परंतु शेतीत गुंतवणूक होत नाही त्यामुळे शेतीचे चित्र बदलत नाही यासाठी शेतीत गुंतवणूक करून शेती आधारित प्रक्रिया उदयोग शेतकऱ्यांनी उभारावेत.
एन.सी.डी.इ.एक्स.टीमचे सदस्य तथा राम रहिम शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापक श्री.राघवन यांनी शेती उत्पादन, प्रोसेसिंग, ब्रॅन्डींग व मार्केटिंग विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शेतकरी उत्पादक कंपनीचे मार्केटिंग व्यवसायाचे सादरीकरण यावेळी त्यांनी केले व  एन.सी.डी.इ.एक्स, मंढी.कॉम वेबसाईडवर वायदे बाजार, मार्केटिंगचे फायदे शेतमालाचे दर महिन्याचे भाव पाहण्यास मिळतील असे सांगितले.यावेळी योगेश शर्मा यांनी जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपन्यानी वायदे बाजारात उतरावे, असे आवाहन केले.

        यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, डॉ. अनिल भिकाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प उपसंचालक सुभाष चोले यांनी केले. यावेळी जिल्हयातील शेतकरी गटांचे सदस्य, शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद, शेतकरी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.