Friday, 7 April 2017

जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न


उस्मानाबाद,दि.7:- जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय येथून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली, या रॅलीचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या हस्ते करण्यात आले.
          जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने 7 एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी  "नैराश्यावर बोलू या" हे घोषवाक्य घेवून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य दिना निमित्त जिल्हा रुग्णालयात शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित 'नैराश्यग्रस्त शेतकऱ्याची कथा' हे पथनाटय सादर केले. या पथनाटयमध्ये अरूणा सुतार, ज्योती शेटे, श्वेता पवार, धनंजिनी नागटिळक, अनुराधा माळी, स्वाती चिंचोले, सचिन रोहिणे, विवेक खंडागळे, रुपाली बगाडे, वैष्णवी धोंडे  आदींचा सहभाग होता. तर हे पथनाटय सुमित्रा गोरे यांनी तयार केले होते.
          जागतिक आरोग्य दिनानिमित्त मराठवाडयातील पहिले शासकीय रुग्णालयातील व्यसनमुक्ती केंद्राचे उदघाटन जिल्हा रुग्णालयात उपस्थित रुग्णाच्या हस्ते करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश करंजकर, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. सचिन देशमुख, व्यसनमुक्ती केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय भोसले यांची यावेळी प्रमुख्याने उपस्थिती होती.
          मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिराचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. धनंजय पाटील, मानसोपचार तज्ञ डॉ. महेश कानडे, एनसीडीचे कार्यक्रम अधिकारी डॉ. भिमाशंकर नरवडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. ऋषीकेश खरोळकर, व्यसनमुक्ती केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय भोसले यांची यावेळी प्रमुख्याने उपस्थिती होती. यावेळी 94 रुग्णांची मधुमेह, रक्तदाब, दंत व नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 3 जणांना रक्तदाब तर 15 जणांना मधुमेह असल्याचे आढळून आले. यावेळी तणावमुक्त जीवनशैलीसाठी मानसोपचार तज्ञ डॉ. महेश कानडे यांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली.

          या शिबिरासाठी आरोग्य  विभागाचे कर्मचारी व एनसीडीची टीम प्रामुख्याने उपस्थित होती.