Friday, 4 September 2026

गणेश मंडळांना विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे यंत्रणांना निर्देश जलसंवर्धन,लोककला आणि पर्यावरणपूरक विसर्जनावर भर

गणेश मंडळांना विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे यंत्रणांना निर्देश जलसंवर्धन,लोककला आणि पर्यावरणपूरक विसर्जनावर भर धाराशिव,दि.४ सप्टेंबर (जिमाका) राज्य सरकारने यंदापासून गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, गणेशोत्सवाची परंपरा आणि संस्कृती जपण्याबरोबरच हा उत्सव व्यापक स्वरूपात साजरा व्हावा. जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन राज्यस्तरापर्यंत पोहोचावे,यासाठी संबंधित यंत्रणांनी मंडळांना प्रोत्साहित करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देणे तसेच विविध उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत जिल्हाधिकारी पुजार बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, स्वाती शेंडे,अरुणा गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख व गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पुजार म्हणाले, ‘‘गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करावी. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात शांतता समित्यांच्या बैठका घ्याव्यात.या बैठकांमध्ये गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती गणेश मंडळे आणि संबंधितांना द्यावी.’’ जिल्ह्यात चांगले आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी गणेशोत्सव मंडळे राज्यस्तरावरील स्पर्धेत पोहोचली पाहिजेत. त्यासाठी विविध यंत्रणांनी त्यांना आवश्यक प्रोत्साहन द्यावे. पारंपरिक लोककला लोप पावत असताना गणेशोत्सवासारख्या व्यापक लोकसहभागाच्या उत्सवाच्या माध्यमातून या लोककलांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.गणेश मंडळांनी आपल्या उपक्रमांमधून पारंपरिक लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर प्रभावी जनजागृती करता येते.त्यामुळे विशेषतः गणेश मंडळांनी जलसंवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी केले.जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम राबविण्यात यावेत. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी गणेश मंडळांना सहभागी करून घेत त्यांना प्रोत्साहन द्यावे,असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलस्रोत दूषित होणार नाहीत,याची दक्षता घ्यावी. गावांमध्ये आणि शहरांमध्ये योग्य ठिकाणी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम टँक तयार करावेत,असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकूण १ हजार ६८० गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी २५६ ठिकाणी ‘एक गाव,एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.धाराशिव येथील गणेश विसर्जन मार्ग निश्चित करण्यात आला आहे,असेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी यंदापासून राज्य सरकारने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्याची माहिती दिली.तसेच गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासंदर्भातील शासन निर्णयाची सविस्तर माहिती त्यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. या बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,सर्व तहसीलदार तसेच सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. ******

तुळजापुर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे रविवारी उद्घाटन

तुळजापुर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे रविवारी उद्घाटन धाराशिव दि.४ सप्टेंबर (जिमाका) तुळजापुर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे उद्घाटन रविवार,६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या शुभहस्ते या न्यायालयाचे उद्घाटन होणार असून, उस्मानाबादच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती.अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे.या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन तुळजापुरचे जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.राजेश खोमणे आणि विधीज्ञ मंडळ अध्यक्ष, ॲड.जयवंत इंगळे यांनी केले आहे. *******

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले शासकीय वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले शासकीय वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी धाराशिव दि.४ सप्टेंबर (जिमाका) अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये,यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नूतनीकरण अर्जांची प्रक्रिया सुरू झाली आहे.पात्र विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी ऑनलाइन अर्ज करून त्याची हार्डकॉपी आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे जमा करावी,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या,तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज करूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. इयत्ता अकरावी,बारावी तसेच व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे,या उद्देशाने या योजनेअंतर्गत भोजन भत्ता,निवास भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २६ डिसेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणाचे अर्ज (Renewal Applications) स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह नाही,अशा तालुक्यातील विद्यार्थ्यांचे थेट स्वाधार योजनेचे अर्जही स्वीकारण्यात येत आहेत. या योजनेसाठी https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर १ ऑगस्ट २०२६ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून,नूतनीकरण अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२६ आहे. त्यामुळे सन २०२६-२७ करिता नूतनीकरण अर्ज असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी https://hmasnew.mahait.org या ऑनलाइन संकेतस्थळावर अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची हार्डकॉपी म्हणजे ऑनलाइन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे जमा करणे आवश्यक आहे.पात्र विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सचिन कवले,सहायक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे. *******

२९ सप्टेंबरला जिल्ह्यात दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र’ बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराची संधी ; आस्थापना व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

२९ सप्टेंबरला जिल्ह्यात दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र’ बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराची संधी ; आस्थापना व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन धाराशिव,दि. ४ सप्टेंबर (जिमाका) राज्यातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता,कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार,२९ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्यात दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र’ (पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा) आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार महाकुंभात जिल्ह्यातील जास्तीत जास्त आस्थापना आणि उद्योजकांनी सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांची माहिती नोंदवावी,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.देशातील युवकांना रोजगार,स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यभर एकाच दिवशी ५०० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्ह्यात अथवा परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच शासन,उद्योग-आस्थापना आणि रोजगार इच्छुक युवक यांना एका सामायिक व्यासपीठावर आणणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता,कौशल्य व क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येत आहे.या कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व आस्थापना आणि उद्योगांनी त्यांना आवश्यक असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांच्या रिक्त पदांची माहिती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव कार्यालयामार्फत पात्रताधारक बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ घेण्यात येणार आहे. या खालील दहा ठिकाणी होणार रोजगार महाकुंभ भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव,शिक्षणमहर्षी रा.ना.आलुरे गुरुजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुळजापूर,संतश्रेष्ठ गोराबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कळंब,आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,भूम शासकीय तंत्रनिकेतन,धाराशिव, शिक्षणमहर्षी गुरुवर्य आर.जी.शिंदे महाविद्यालय,परंडा,श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालय,उमरगा, भानुदासराव चव्हाण महाविद्यालय,लोहारा,आर्ट, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय, नळदुर्ग आणि पवनराजे निंबाळकर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गोवर्धनवाडी, ता. व जि.धाराशिव येथे होणार आहे. रिक्त पदांची माहिती https://forms.gle/Mrz८Gc३ofqq३७wwr६ या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा जिल्ह्यातील आस्थापना, उद्योग समूह आणि व्यावसायिकांनी त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांच्या माहिती भरावी.या नोंदणीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२४७२- २९९४३४ वर संपर्क साधावा. जिल्ह्यात होणाऱ्या या ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ (पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा) उपक्रमात जास्तीत जास्त आस्थापना आणि उद्योजकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे. *******

नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; विद्यार्थी,शिक्षकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग

नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; विद्यार्थी,शिक्षकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग धाराशिव,दि.४ सप्टेंबर (जिमाका) नेत्रदानातून गरजूंच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश निर्माण होऊ शकतो,’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी आज ४ सप्टेंबर रोजी धाराशिव शहरातून नेत्रदान जनजागरण रॅली काढण्यात आली. घोषवाक्ये आणि जनजागृतीपर फलकांच्या माध्यमातून नेत्रदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ४१ वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.त्यानिमित्त या नेत्रदान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीच्या प्रारंभी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांनी हिरवा झेंडा दाखविला.जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,धाराशिव येथून रॅलीला सुरुवात झाली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर,मारवाडी गल्ली,काळा मारुती चौक, सावरकर चौक आणि त्रिशरण चौकमार्गे रॅली पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात पोहोचली.तेथे रॅलीची सांगता करण्यात आली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,रोटरी सेवा ट्रस्टचे सचिव रोटेरियन प्रवीण काळे,जे.एफ. अजमेरा रोटरी नेत्ररुग्णालयाचे अतुल देशमुख, शिवरुद्र इसाके,जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक डॉ.महेश पाटील,डॉ.एम.के.पल्ला, नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ.ज्योती कानडे, परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवी सुरवसे तसेच रुग्णालयातील कर्मचारी प्रदीप तटाळे आणि श्रीनिवास निर्मळ यांची प्रमुख उपस्थिती होती.रॅलीमध्ये धाराशिव शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्र,के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग आणि सह्याद्री नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विद्यार्थ्यांच्या हातातील नेत्रदानविषयी संदेश देणारे फलक आणि घोषवाक्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या माध्यमातून नेत्रदानाविषयी समाजात व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेत्रदानाबाबत जनजागृतीचा जागर रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील कर्मचारी प्रदीप तटाळे,श्रीनिवास निर्मळ,उमेश गोरे,रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय, धाराशिव यांच्या वतीने या नेत्रदान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. ******

गणरायाचा उत्सव... लोकजागृतीपासून पर्यावरण संवर्धनापर्यंत !

विशेष लेख गणरायाचा उत्सव... लोकजागृतीपासून पर्यावरण संवर्धनापर्यंत ! घराघरांतील श्रद्धेपासून सार्वजनिक लोकचळवळीपर्यंतचा गणेशोत्सवाचा प्रवास;‘राज्य महोत्सवामुळे आता कला, संस्कृती,सामाजिक समता आणि पर्यावरण संवर्धनाला नवा आयाम मिळणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया!’चा जयघोष कानावर पडू लागला की अवघा महाराष्ट्र एका वेगळ्याच चैतन्याने भारून जातो. घरातील गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून सार्वजनिक मंडळांच्या देखण्या मंडपांपर्यंत, आरतीच्या मंगल स्वरांपासून ढोल-ताशांच्या गजरापर्यंत आणि भक्तिभावाने ओथंबलेल्या विसर्जनापर्यंत गणेशोत्सव महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी इतका एकरूप झाला आहे की तो केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही. श्रद्धा,संस्कृती,कला,सामाजिक समता, लोकजागृती आणि समाजसेवेचा तो एक व्यापक उत्सव बनला आहे.राज्यात १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. आता गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत असल्याने महाराष्ट्राच्या या समृद्ध परंपरेला नवा आयाम मिळाला आहे.बदलत्या काळानुसार उत्सवाचे स्वरूप बदलले,त्यात आधुनिकतेची भर पडली.मात्र लोकांना जोडणारा त्याचा सामाजिक धागा आजही तितकाच मजबूत आहे.किंबहुना पर्यावरण संवर्धन,सामाजिक बांधिलकी आणि विधायक लोकसहभागाच्या माध्यमातून हा धागा आणखी बळकट करण्याची संधी आता निर्माण झाली आहे. घराघरांतील गणरायापासून सार्वजनिक उत्सवापर्यंत... महाराष्ट्रातील गणेशभक्तीची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. पेशव्यांच्या काळात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.त्या काळात गणेशपूजनासोबत कथा,कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम होत असत.घराघरांत गणरायाची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने उत्सव साजरा करण्याची ही परंपरा पुढेही कायम राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मात्र या उत्सवाने घराचा उंबरठा ओलांडला आणि त्याला सार्वजनिक स्वरूप येऊ लागले. पुण्यामध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्याच्या ऐतिहासिक नोंदी आणि दावे आढळतात.त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवामागील लोकशक्ती ओळखली.१८९३ नंतर या उत्सवाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले. ब्रिटिश राजवटीत लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे सहज शक्य नव्हते.अशा काळात सार्वजनिक गणेशोत्सव समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणू लागला.लोकमान्य टिळकांनी याच व्यासपीठाचा उपयोग लोकजागृती, राष्ट्रीय अस्मिता,सामाजिक संघटन आणि स्वराज्याच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी केला. गणरायाच्या आराधनेसोबत देशभक्ती आणि समाजजागृतीचे विचारही घराघरांत पोहोचू लागले. आरतीच्या स्वरांत मिसळले प्रबोधनाचे सूर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या काळात गणेशपूजन आणि आरतीपुरता उत्सव मर्यादित राहिला नाही.कीर्तन,प्रवचने, व्याख्याने,पोवाडे,भावगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम,स्वदेशी, सामाजिक प्रश्न आणि एकात्मतेचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचू लागला. जात,पंथ,आर्थिक स्थिती आणि सामाजिक स्तराच्या भिंती ओलांडून नागरिकांना एका सार्वजनिक व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वाचे काम गणेशोत्सवाने केले.सामान्य माणसाला विचार ऐकण्याची, सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवण्याची आणि सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी मिळाली.त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय भावना जागविणारा गणेशोत्सव स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला.काळ पुढे सरकला तसा गणेशोत्सवही बदलला. भजन,कीर्तन आणि पोवाड्यांच्या जोडीला नाटक,संगीत,लोककला, आकर्षक देखावे आणि सामाजिक संदेश देणाऱ्या आरासी आल्या. रक्तदान शिबिरे,आरोग्य तपासणी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम, जलसंवर्धन,महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती आणि रस्ते सुरक्षेसारख्या विषयांवरील उपक्रमांमधून अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी समाजसेवेची परंपराही समृद्ध केली. ‘राज्य महोत्सव’... नव्या पर्वाची सुरुवात यावर्षापासून गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होत असल्याने या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेला आणखी व्यापक अधिष्ठान मिळाले आहे. संस्कृतीचे जतन व संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक उत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कलांचे जतन व संवर्धन,महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन, निसर्ग व सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण,सामाजिक कार्य आणि विधायक उपक्रमांना चालना मिळणार आहे.पर्यावरणपूरक गणेशमूर्ती,ध्वनी,वायू व जलप्रदूषणमुक्त परिसर तसेच ‘एक गाव,एक गणपती’सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या सामाजिक आशयाला आणखी व्यापकता मिळत आहे. गणरायाच्या स्वागतासोबत निसर्गाचाही सन्मान हवामान बदल,जलप्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि वाढते ध्वनिप्रदूषण ही आजची गंभीर आव्हाने आहेत.त्यामुळे उत्सवाचा आनंद कायम ठेवतानाच गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणस्नेही करण्याची जबाबदारीही समाजाची आहे. त्यासाठी विविध गणेश उत्सव मंडळे पुढाकार घेताना दिसत आहे.गणेशमूर्तीसाठी शाडू माती किंवा पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर,नैसर्गिक रंगांना प्राधान्य, प्लास्टिक व थर्माकोलमुक्त सजावट आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा कल्पक उपयोग हा त्याचा पहिला टप्पा ठरू शकतो. कापड,कागद,बांबू,फुले,पाने आणि पारंपरिक वस्तूंच्या साहाय्याने आकर्षक आरास करता येते आणि त्याचवेळी पर्यावरणाची हानीही टाळता येते.विद्युत रोषणाईमध्ये ऊर्जाबचतीला प्राधान्य,मंडप आणि परिसराची स्वच्छता,ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण,एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार आणि प्रसादासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर अशा छोट्या वाटणाऱ्या कृतीदेखील मोठा बदल घडवू शकतात. पूजेनंतरचे हार,फुले,पाने आणि अन्य निर्माल्य नदी,तलाव अथवा विहिरीत टाकण्याऐवजी त्याचे स्वतंत्र संकलन करून कंपोस्ट किंवा सेंद्रिय खत तयार करता येऊ शकते.उपलब्धतेनुसार कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर केल्यास नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.विसर्जन मिरवणुकीत अनावश्यक ध्वनिप्रदूषण टाळणे, निर्धारित नियमांचे पालन करणे, रस्त्यांवर कचरा न टाकणे आणि मिरवणुकीनंतर परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील गणरायाच्या भक्तीचीच पर्यावरणपूरक अभिव्यक्ती आहे.गणरायाची भक्ती आणि निसर्गाचे रक्षण या परस्परविरोधी गोष्टी नाहीत.उलट निसर्ग संवर्धन हाच आजच्या काळातील उत्सवाचा सर्वांत विधायक संस्कार ठरू शकतो. ‘एक गाव, एक गणपती’... उत्सव एकोप्याचा गणेशोत्सवाचे खरे सामर्थ्य त्याच्या सामूहिकतेत आहे.‘एक गाव,एक गणपती’ ही संकल्पना त्याचेच सुंदर रूप आहे. गावातील सर्व समाजघटकांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत गणेशोत्सव साजरा केला,तर सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो. अनावश्यक स्पर्धा आणि खर्च कमी होतो.त्यातून वाचणारी ऊर्जा, वेळ आणि साधने गावाच्या विकासासाठी उपयोगात आणण्याची संधीही मिळते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी समाजकार्य केवळ उत्सवाच्या दहा दिवसांपुरते मर्यादित न ठेवता वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले,तर गणेशोत्सवातून निर्माण होणारी लोकशक्ती खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाची शक्ती बनू शकते. कलेला व्यासपीठ ; संस्कृतीचा वारसा नव्या पिढीकडे गणेशोत्सवाने महाराष्ट्रातील असंख्य कलाकारांना हक्काचे व्यासपीठ दिले आहे.मूर्तिकाराच्या हातातील कलाकुसर असो, ढोल-ताशांचा जोशपूर्ण नाद असो, लोककलावंतांचे सादरीकरण असो किंवा एखाद्या ज्वलंत सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा देखावा असो गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या कलावैभवाचे दर्शन घडते. हीच परंपरा नव्या पिढीशी जोडण्याची गरज आहे.महाराष्ट्राचा इतिहास,छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा,संत आणि समाजसुधारकांचे विचार, स्वातंत्र्यलढा, संविधानिक मूल्ये,सामाजिक समता, लोककला आणि पारंपरिक संस्कृतीची ओळख मुलांना व युवकांना करून देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव हे प्रभावी लोकशिक्षणाचे व्यासपीठ ठरू शकते. काळ बदलला ; सामाजिक धागा मात्र कायम पेशवाईच्या काळातील धार्मिक उत्सवापासून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सार्वजनिक स्वरूपाकडे,तेथून स्वातंत्र्यलढ्यातील लोकजागृतीच्या व्यासपीठापर्यंत आणि स्वातंत्र्यानंतर कला-संस्कृतीच्या उत्सवापासून आजच्या सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीच्या पर्वापर्यंतचा महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा प्रवास विलक्षण आहे. आज ‘राज्य महोत्सव’ म्हणून गणेशोत्सव साजरा होत असताना प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापुढे या ऐतिहासिक परंपरेला नवा विधायक अर्थ देण्याची संधी आहे.उत्सवाची भव्यता केवळ मूर्तीची उंची,रोषणाईचा झगमगाट किंवा सजावटीच्या खर्चात मोजली जाऊ नये.किती माणसे जोडली, किती कला जपल्या,किती सामाजिक प्रश्नांवर जागृती केली, किती पर्यावरण वाचविले आणि समाजासाठी किती चांगले काम उभे राहिले,यावरही उत्सवाचे यश मोजले जाणार आहे.त्यासाठी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.लोकमान्य टिळकांच्या काळात गणेशोत्सवाने माणसांना एकत्र आणले.स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय अस्मितेला बळ दिले. स्वातंत्र्यानंतर कला आणि संस्कृतीला व्यापक व्यासपीठ दिले.आता पर्यावरण संवर्धन, सामाजिक समता आणि समाजहिताच्या विधायक कार्यातून त्याच परंपरेला पुढे नेण्याची वेळ आहे. गणरायाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना निसर्गही हसला पाहिजे, समाजातील माणसे आणखी जवळ आली पाहिजेत,कलाकारांच्या कलेला नवे बळ मिळाले पाहिजे आणि उत्सवानंतरही समाजहिताची एखादी चांगली गोष्ट मागे उरली पाहिजे.तेव्हाच सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा अधिक अर्थपूर्ण ठरेल. श्रद्धेतून संस्कार,इतिहासातून प्रेरणा, उत्सवातून प्रबोधन,कलेतून संस्कृतीचे संवर्धन,कृतीतून पर्यावरणाचे रक्षण आणि लोकसहभागातून समाजहित हीच महाराष्ट्राच्या या राज्य महोत्सवाची नवी ओळख ठरणार आहे ! संकलन जिल्हा माहिती कार्यालय, धाराशिव

Thursday, 3 September 2026

महसुली वाद मिटविण्याची संधी : ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ शेतकरी,नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार

महसुली वाद मिटविण्याची संधी : ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ शेतकरी,नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार धाराशिव दि.३ सप्टेंबर (जिमाका) वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या महसुली दावे आणि अपिलांच्या फेऱ्यांत अडकलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आता आपापसातील तडजोड आणि सहमतीने वाद कायमस्वरूपी मिटविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.महसूल विभागाकडील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यभर ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यास मान्यता दिली आहे.१ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झालेले हे अभियान ३१ मार्च २०२७ पर्यंत सात महिने राबविण्यात येणार आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा महसुली दावे व अपिलांसाठी खर्च होणारा वेळ आणि पैसा वाचविणे,तसेच महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोड व सहमतीने जलदगतीने निकाली काढणे,हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.जिल्ह्यात मंडळ अधिकारी,नायब तहसीलदार,तहसीलदार,उपविभागीय अधिकारी,उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दावे आणि अपिलांसंदर्भात हे अभियान राबविण्यात येणार आहे. ७ ऑक्टोबर,९ डिसेंबरला लोकअदालत जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर ७ ऑक्टोबर २०२६ आणि ९ डिसेंबर २०२६ रोजी महसूल लोकअदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यासाठी प्रशासनाने निश्चित कार्यपद्धती आखली आहे. दोन्ही पक्षकारांना संयुक्त अर्ज करता येणार ज्या न्यायालयात किंवा कार्यालयात महसुली दावा प्रलंबित आहे,तेथे संबंधित दोन्ही पक्षकार किंवा त्यांचे वकील संयुक्तपणे विहित ‘प्रपत्र-अ’ मधील नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज करू शकतील.‘प्रपत्र-अ’ संबंधित कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.प्राप्त झालेल्या अर्जांची संबंधित यंत्रणेकडून छाननी केली जाईल.दोन्ही पक्षांची तडजोडीसाठी संमती असल्याची खात्री करण्यात येईल.त्यानंतर त्यांच्याकडून कायदेशीर तडजोडनामा (Consent Terms) लिहून घेतला जाईल. तडजोडीनंतर अंतिम आदेश निश्चित केलेल्या लोकअदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षकारांच्या उपस्थितीत तडजोडीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर अंतिम आदेश पारित करून संबंधित प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढण्यात येणार आहे.त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित महसुली वाद परस्पर सहमतीने सोडविण्यासाठी नागरिकांना या अभियानाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कार्यालयीन वेळेत अर्ज करण्याचे आवाहन महसुली दावे आणि अपिले तडजोडीने निकाली काढू इच्छिणाऱ्या नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा.त्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत संबंधित अधिकाऱ्यांकडे त्वरित अर्ज दाखल करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी केले आहे. ******

घरात, मंदिरात जुनी हस्तलिखिते असेल तर ‘ज्ञान भारतम्’मध्ये करा नोंद ; मालकी हक्क राहणार अबाधित

घरात, मंदिरात जुनी हस्तलिखिते असेल तर ‘ज्ञान भारतम्’मध्ये करा नोंद ; मालकी हक्क राहणार अबाधित धाराशिव दि.३ सप्टेंबर (जिमाका) घरातील जुन्या संदुकीत,देवघरात किंवा पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या संग्रहात एखादा प्राचीन हस्तलिखित ग्रंथ असेल,तर तो केवळ एका कुटुंबाचा ठेवा नसून देशाच्या ज्ञानपरंपरेतील महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. अशा विखुरलेल्या अमूल्य हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंद,जतन आणि संवर्धन करण्यासाठी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत ‘ज्ञान भारतम् मिशन’ हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे. भारताच्या समृद्ध हस्तलिखित वारशाचा शोध,सर्वेक्षण,दस्तऐवजीकरण,जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करणे हा ‘ज्ञान भारतम् मिशन’चा प्रमुख उद्देश आहे.देशात तत्त्वज्ञान,विज्ञान, वैद्यकशास्त्र,गणित,खगोलशास्त्र, साहित्य,कला,प्रशासन तसेच विविध पारंपरिक ज्ञानप्रणालींशी संबंधित असंख्य प्राचीन हस्तलिखिते उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेक हस्तलिखिते आजही खासगी कुटुंबे,मंदिरे,मठ,ग्रंथालये, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संस्थांकडे जतन करून ठेवण्यात आली आहेत. या अमूल्य ज्ञानवारशाचा शोध घेऊन त्याचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ज्ञान भारतम् राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण’ सुरू केले आहे.या सर्वेक्षणाद्वारे देशभरात उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांची तसेच ती कोणत्या ठिकाणी आहेत,याची माहिती संकलित केली जाणार आहे. त्याआधारे राष्ट्रीय स्तरावर सर्वसमावेशक माहिती प्रणाली तयार करण्यात येणार असून, त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. कोणताही नागरिक होऊ शकतो सहभागी ‘ज्ञान भारतम्’ उपक्रमात कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो.आपल्या कुटुंबाकडे, गावात,मंदिरात,मठात, ग्रंथालयात,शैक्षणिक संस्थेत किंवा परिसरात जुनी हस्तलिखिते उपलब्ध असतील अथवा अशा हस्तलिखितांविषयी माहिती असेल, तर ती या राष्ट्रीय उपक्रमासाठी नोंदविता येणार आहे. हस्तलिखितांविषयी उपलब्ध असलेली प्राथमिक माहिती ‘Gyan Bharatam Mobile Application’ तसेच अधिकृत डिजिटल माध्यमातून नोंदविता येईल. नोंदणी करताना उपलब्धतेनुसार हस्तलिखित असलेले ठिकाण, हस्तलिखितांची अंदाजे संख्या,मालकी किंवा जतनकर्त्यांची माहिती, हस्तलिखिताविषयी उपलब्ध प्राथमिक माहिती आणि आवश्यकतेनुसार हस्तलिखिताचे छायाचित्र अशी माहिती देता येणार आहे. मालकी हक्कावर कोणताही परिणाम नाही या सर्वेक्षणातील सहभाग पूर्णपणे स्वेच्छेचा आणि गैर-हस्तक्षेपी स्वरूपाचा आहे.हस्तलिखिताची माहिती दिल्यामुळे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेच्या मालकी हक्कावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच केवळ सर्वेक्षणात सहभाग नोंदविला म्हणून संबंधित हस्तलिखित हस्तांतरित करणेही आवश्यक नाही.संकलित माहितीच्या आधारे संबंधित हस्तलिखितांची ओळख आणि पडताळणी केली जाईल.त्यानंतर तपशीलवार दस्तऐवजीकरण तसेच आवश्यकतेनुसार हस्तलिखितांचे संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. हस्तलिखित कार्यालयात जमा करण्याची गरज नाही नागरिकांकडे असलेली हस्तलिखिते डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.संबंधित हस्तलिखित ‘ज्ञान भारतम्’ मोबाईल अॅपच्या माध्यमातून अपलोड केल्यानंतर ते कोणत्याही कार्यालयात जमा किंवा ठेवण्याची आवश्यकता नाही.मूळ हस्तलिखित नागरिकांनी स्वतःकडेच सुरक्षितपणे जपून ठेवायचे आहे. आपल्याकडे एखादे हस्तलिखित उपलब्ध असल्यास किंवा आपल्या परिसरातील हस्तलिखितांविषयी माहिती असल्यास ‘ज्ञान भारतम्’ मोबाईल अॅपच्या माध्यमातून अथवा ज्ञान भारतम् या अधिकृत संकेतस्थळावरून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होता येणार आहे. ‘ज्ञान भारतम्’ उपक्रमातून भारताच्या अमूल्य हस्तलिखित वारशाचे भावी पिढ्यांसाठी जतन करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा वारसा संशोधन आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.त्यामुळे नागरिक,विद्यार्थी, संशोधक,विद्वान,ग्रंथालये, शैक्षणिक संस्था,मंदिरे,मठ तसेच हस्तलिखितांचे खासगी जतनकर्ते यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी नागरिकांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), संबंधित तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.भारताच्या अमूल्य ज्ञानवारशाच्या शोध,नोंदणी आणि जतनासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी,धाराशिव यांनी केले आहे. एका नजरेत ‘ज्ञान भारतम्’ प्राचीन हस्तलिखितांचा शोध आणि सर्वेक्षण हस्तलिखितांचे दस्तऐवजीकरण, जतन व संवर्धन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन नागरिक,विद्यार्थी, संशोधक,संस्था,मंदिरे व मठांना सहभागी होता येणार आहे. हस्तलिखिताची माहिती दिल्याने मालकी हक्कावर कोणताही परिणाम होणार नाही. हस्तलिखित कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता नाही; मूळ हस्तलिखित संबंधित नागरिकाकडेच राहणार आहे. *****

Wednesday, 2 September 2026

वाद मिटवा सामोपचाराने ; १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत आयोजन

वाद मिटवा सामोपचाराने ; १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत आयोजन धाराशिव,दि.२ सप्टेंबर (जिमाका) वर्षानुवर्षे सुरू असलेला न्यायालयीन वाद म्हणजे वेळ,पैसा आणि मानसिक ताणही.अशा प्रलंबित वादांना सामोपचाराने पूर्णविराम देण्याची संधी नागरिकांना राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून मिळणार आहे.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार,१२ सप्टेंबर २०२६ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे,वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे, दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.यासोबतच बँका आणि वीज वितरण कंपन्यांची दाखलपूर्व प्रकरणेही लोकअदालतीमध्ये विचारात घेतली जाणार आहेत. कौटुंबिक व ग्राहक मंचातील प्रकरणांचाही समावेश कौटुंबिक न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणेदेखील या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.त्यामुळे विविध स्वरूपाच्या न्यायालयीन तसेच दाखलपूर्व वादांमध्ये परस्पर सहमतीने तोडगा काढण्यासाठी पक्षकारांना एकाच दिवशी महत्त्वाची संधी उपलब्ध होणार आहे. लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यास संबंधित पक्षकाराने भरलेली न्यायालयीन फी परत मिळते.त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत खर्च झालेला वेळ आणि पैसा वाचण्याबरोबरच दीर्घकाळ चालणाऱ्या वादामुळे निर्माण होणारा मानसिक ताण कमी करण्यासाठीही लोकअदालत उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांनी आपापसातील वाद सामोपचाराने मिटवून वेळ,पैसा आणि मानसिक ताण-तणाव वाचवावा तसेच राष्ट्रीय लोकअदालतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती.अभिश्री देव आणि सचिव श्रीमती.भाग्यश्री पाटील यांनी केले आहे. आपली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा.तसेच प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी पक्षकारांनी आपल्या वकिलांशीही संपर्क साधावा,असे कळविण्यात आले आहे.राष्ट्रीय लोकअदालतीबाबत अधिक माहितीसाठी ८५९१९०३६२५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dlsaosd25@gmail.com या इमेल वर संपर्क साधता येईल असेही कळविण्यात आले आहे. ******

भूमचे आरटीओ शिबिर आता २२ सप्टेंबरला नागरिकांनी सुधारित तारखेची नोंद घेण्याचे आवाहन

भूमचे आरटीओ शिबिर आता २२ सप्टेंबरला नागरिकांनी सुधारित तारखेची नोंद घेण्याचे आवाहन धाराशिव,दि.२ सप्टेंबर (जिमाका) वाहनविषयक विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासू नये आणि त्यांच्या वेळेसह प्रवासाचा त्रास वाचावा,यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्यामार्फत दरमहा तालुकास्तरीय शिबिर कार्यालयांचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार भूम येथे १७ सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित असलेले शिबिर आता प्रशासकीय कारणास्तव मंगळवार,२२ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने १७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने भूम येथील नियोजित शिबिर कार्यालयाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.आता हे शिबिर २२ सप्टेंबर रोजी नियोजित ठिकाणी भूम येथे आयोजित करण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित कामांसाठी तालुकास्तरीय शिबिराची वाट पाहणाऱ्या नागरिकांनी पूर्वीच्या १७ सप्टेंबर या तारखेऐवजी २२ सप्टेंबर ही सुधारित तारीख लक्षात घ्यावी.गैरसोय टाळण्यासाठी सर्व संबंधित नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे. ******

टपालाच्या तक्रारींसाठी आता दरमहा ‘डाक अदालत’

टपालाच्या तक्रारींसाठी आता दरमहा ‘डाक अदालत’ सप्टेंबरपासून उपक्रम ; तक्रारींचे १४ दिवसांत निराकरण,व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही सहभागाची सुविधा धाराशिव,दि.२ सप्टेंबर (जिमाका) टपाल सेवा घेताना येणाऱ्या अडचणी,प्रलंबित तक्रारी आणि ग्राहकांच्या गाऱ्हाण्यांची अधिक प्रभावी व वेळेत सोडवणूक व्हावी, यासाठी भारतीय डाक विभागाने सप्टेंबर २०२६ पासून दरमहा ‘डाक अदालत’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबरोबरच आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) या अदालतीत सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे,डाक अदालतीत प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींचे १४ दिवसांच्या आत निराकरण करण्यात येणार आहे. ग्राहकांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी डाक अदालत विभागीय, प्रादेशिक आणि मंडळ (सर्कल) स्तरावर अनुक्रमे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात आयोजित केली जाणार आहे.त्यामुळे टपाल विभागाशी संबंधित तक्रारी आणि समस्या मांडण्यासाठी ग्राहकांना आता दरमहा स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.टपाल,प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे तक्रार ग्राहकांना आपली तक्रार अथवा गाऱ्हाणी टपालाद्वारे,प्रत्यक्ष किंवा sposmd.mah@gmail.com या ई-मेल पत्त्यावर सादर करता येतील.प्राप्त झालेल्या तक्रारींची संबंधित कार्यालयाकडून सविस्तर तपासणी करण्यात येईल.शक्य असल्यास डाक अदालतीच्या वेळीच तक्रारीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तथापि,डाक अदालतीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे १४ दिवसांच्या आत निराकरण करण्यात येईल. धाराशिव विभागातील विभागीय स्तरावरील डाक अदालत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी असल्यास त्यानंतरच्या पुढील कामकाजाच्या दिवशी डाक अदालत होईल.ही अदालत डाकघर अधीक्षक कार्यालय,धाराशिव विभाग,लेन्सकार्ट दुकानाच्या वर,भानूनगर,धाराशिव येथे आयोजित करण्यात येणार आहे. डाक अदालतीच्या दिवशी ग्राहकांना आवश्यक सहकार्य मिळावे तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या कार्यवाहीचा समन्वय साधता यावा, यासाठी धाराशिव मुख्य डाकघरात जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे प्रत्यक्ष डाक अदालतीच्या ठिकाणी पोहोचणे शक्य नसलेल्या ग्राहकांनाही आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपली समस्या मांडण्याची सुविधा मिळणार आहे. टपाल सेवा ही नागरिकांच्या दैनंदिन व्यवहाराशी जोडलेली असल्याने त्यासंबंधीच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होणे महत्त्वाचे आहे.दरमहा होणाऱ्या डाक अदालतीच्या माध्यमातून ग्राहकांना आपले म्हणणे थेट विभागासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या तक्रारी व गाऱ्हाणी डाक अदालतीमार्फत मांडावीत,असे आवाहन धाराशिव विभागाचे डाक अधीक्षक आर. एस.बोटलावार यांनी केले आहे. ******

१२ सप्टेंबरला जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत ; पक्षकारांसाठी आरोग्य योजनेच्या लाभाची विशेष सुविधा

१२ सप्टेंबरला जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत ; पक्षकारांसाठी आरोग्य योजनेच्या लाभाची विशेष सुविधा धाराशिव,दि. २ सप्टेंबर(जिमाका) न्यायालयीन प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यासाठी येणाऱ्या पक्षकारांना आता शासनाच्या आरोग्य योजनेचाही थेट लाभ मिळणार आहे.जिल्हा न्यायालय,उस्मानाबाद येथे १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित ‘राष्ट्रीय लोक अदालती’चे औचित्य साधून उपस्थित पक्षकारांना ‘आयुष्मान भारत कार्ड’चे वाटप करण्यात येणार आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद आणि जिल्हा शासकीय रुग्णालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती. अभिश्री देव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालत आणि आयुष्मान भारत कार्ड वाटप करण्यात येणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये उपस्थित राहणाऱ्या पक्षकारांना त्यांच्या प्रलंबित तसेच वादपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी मिळणार आहे.त्याचबरोबर त्यांना शासनाच्या आरोग्य योजनेचा थेट लाभ मिळावा,या उद्देशाने आयुष्मान भारत कार्ड वाटपाचा उपक्रम लोक अदालतीशी जोडण्यात आला आहे.त्यामुळे न्यायालयीन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी येणाऱ्या पात्र पक्षकारांना एकाच ठिकाणी आरोग्य योजनेशी जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. न्यायालयीन वाद मिटविण्याबरोबरच नागरिकांना आरोग्य सुरक्षेच्या योजनेचा लाभ मिळवून देणारा हा संयुक्त उपक्रम असल्याने संबंधित पक्षकारांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांच्या निपटाऱ्याची संधी साधावी तसेच आयुष्मान भारत कार्ड वाटप उपक्रमाचाही लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती. भाग्यश्री पाटील आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी केले आहे. ******

तापाचा वाढता धोका ; जिल्ह्यात ‘आरोग्य अलर्ट’

तापाचा वाढता धोका ; जिल्ह्यात ‘आरोग्य अलर्ट’ धाराशिव,दि.२ सप्टेंबर (जिमाका) जिल्ह्यात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.वाढत्या तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासह अन्य कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक,शाळा- महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांसाठी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.घर आणि परिसरात डासांची पैदास होणार नाही याची खबरदारी घेण्याबरोबरच ताप दोन दिवसांपेक्षा अधिक काळ राहिल्यास तातडीने शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तापाकडे केवळ ऋतुबदलाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणे महत्त्वाचे आहे.घरातील एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास त्याची योग्य काळजी घेण्याबरोबरच घरापासून शाळा,महाविद्यालय आणि कार्यालयापर्यंत स्वच्छता राखल्यास आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होऊ शकते. यासाठी आरोग्य विभागाने विविध स्तरांवर घ्यावयाच्या खबरदारीची सविस्तर रूपरेषा दिली आहे. आठवड्यातून एक दिवस पाण्याची भांडी पूर्ण कोरडी करा नागरिकांनी सर्वप्रथम डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करण्यावर भर द्यावा.घराभोवती कुठेही पाणी साचू देऊ नये.कुलर, पाण्याच्या टाक्या आणि कुंड्यांखालील ट्रे आठवड्यातून एकदा पूर्ण रिकामे करून वाळवावेत.अशा पद्धतीने नियमित ‘कोरडा दिवस’ पाळावा.डासांच्या चाव्यापासून वैयक्तिक संरक्षणासाठी अंग पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे वापरावेत.रात्री तसेच सकाळच्या वेळी डास प्रतिबंधक क्रीम किंवा मलम लावावे अथवा मच्छरदाणीचा वापर करावा.पिण्यासाठी स्वच्छ, गाळलेले आणि उकळलेले पाणी वापरावे.शिळे तसेच उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन-सीयुक्त आहार,फळे आणि पाणी, नारळपाणी,लिंबूपाणी यांसारखे भरपूर द्रवपदार्थ घ्यावेत.पुरेशी विश्रांतीही घ्यावी. दोन दिवसांपेक्षा अधिक ताप- तपासणी करा ताप आल्यानंतर स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळावे.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ‘पॅरासिटामॉल’ व्यतिरिक्त अस्पिरिन, आयब्युप्रोफेनसारख्या वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत. दोन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप कायम असल्यास तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. आवश्यकतेनुसार डेंग्यू,मलेरिया अथवा विषाणुजन्य आजाराच्या निदानासाठी रक्ताची तपासणी करावी.अंगावर पुरळ येणे,सतत उलट्या होणे,हिरड्यांमधून रक्त येणे किंवा अत्यंत अशक्तपणा जाणवणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसल्यास विलंब न करता रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे. शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.शाळा,महाविद्यालये आणि अन्य शिक्षण संस्थांनी परिसर,मैदान आणि छतावर पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.पाण्याच्या टाक्यांची झाकणे घट्ट बंद ठेवावीत.अंधाऱ्या आणि दमट जागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश राहील याची काळजी घ्यावी. डासांच्या चाव्यापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि लांब पँट घालण्याबाबत सूचना कराव्यात. वर्गशिक्षकांनी दररोज सकाळच्या परिपाठाच्या वेळी ताप असलेल्या किंवा आजारी दिसणाऱ्या विद्यार्थ्यांची पाहणी करावी आणि गरज असल्यास त्यांना उपचारासाठी संदर्भित करावे. ताप किंवा संसर्गाची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याबाबत पालकांनाही सूचित करावे.शाळेत प्रथमोपचार पेटी आणि थर्मामीटर सज्ज ठेवावा.विद्यार्थी अचानक आजारी पडल्यास पालकांना बोलावून त्याला वैद्यकीय उपचारासाठी पाठवावे.विद्यार्थ्याला ताप असल्यास योग्य विश्रांती घेण्याबाबत सूचना द्याव्यात. परिपाठ अथवा तासिकेदरम्यान विद्यार्थ्यांना नियमित हात धुणे, वैयक्तिक आणि परिसर स्वच्छता राखणे तसेच डास प्रतिबंधाचे महत्त्व समजावून सांगून आरोग्यविषयक जनजागृती करावी. आठ दिवसांनी पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता शाळांमधील पाण्याच्या टाक्यांची दर आठ दिवसांनी स्वच्छता करावी. पिण्यासाठी आरओ किंवा उकळलेल्या पाण्याची व्यवस्था करावी आणि सर्व पाणीसाठे योग्य प्रकारे झाकून ठेवावेत. स्वच्छतागृहांमध्ये साबण आणि पाण्याचा पुरेसा पुरवठा असल्याची खात्री करावी.दररोज फिनाईल किंवा ब्लिचिंगसारख्या जंतुनाशकांचा वापर करून स्वच्छता राखावी.तालुका आरोग्य अधिकारी अथवा नगरपालिकेशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार शाळेच्या परिसरात कीटकनाशक फवारणी आणि धुरीकरण (फॉगिंग) करून घ्यावे.सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगावे.दररोज आंघोळ करणे, वारंवार हात धुणे आदी सवयी अंगीकारण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे.विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व पटवून द्यावे. मुलांच्या आहारामध्ये किमान एक फळ आणि संतुलित आहाराचा समावेश करण्यावर भर द्यावा. वर्गखोल्यांच्या खिडक्यांना डासप्रतिरोधक जाळ्या बसवाव्यात.पाण्याच्या पाईपलाही जाळी बसवावी.प्रत्येक वर्गखोलीत पुरेसा सूर्यप्रकाश अथवा कृत्रिम प्रकाश राहील आणि हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. सरकारी कार्यालयांत दर शुक्रवारी ‘कोरडा दिवस’ शासकीय कार्यालयांसाठीही स्वतंत्र सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक सरकारी कार्यालयात दर शुक्रवारी ‘कोरडा दिवस’ पाळावा. कार्यालयाच्या छतावर,गॅलरीत किंवा आवारात पडलेले जुने टायर, फुटके प्लास्टिक,कुंड्यांचे ट्रे आणि अन्य टाकाऊ वस्तूंची तात्काळ विल्हेवाट लावावी.पिण्याच्या पाण्याच्या टाक्या,कुलर आणि सिमेंटच्या टाक्या आठवड्यातून एकदा पूर्ण रिकाम्या करून वाळवाव्यात.कार्यालय परिसरातील सांडपाण्याच्या गटारी तसेच साचलेल्या पाण्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत म्हणजे नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीमार्फत अळीनाशक औषधाची किंवा आवश्यकतेनुसार जळलेल्या ऑइलची फवारणी करावी.डासांचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या ठिकाणी सायंकाळच्या वेळी धुरीकरण (फॉगिंग) करून घ्यावे. कर्मचारी-अभ्यागतांना शुद्ध पाणी द्या कार्यालयातील कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी स्वच्छ,उकळलेले किंवा शुद्ध आरओ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. स्वच्छतागृहांमध्ये दररोज फिनाईल किंवा ब्लिचिंगसारख्या जंतुनाशक द्रव्यांचा वापर करून स्वच्छता राखावी.हात धुण्यासाठी साबण किंवा हँडवॉश उपलब्ध करून द्यावा.शासकीय कार्यालयाच्या आवारातील उपहारगृहांमध्ये अन्नपदार्थ योग्यप्रकारे झाकून ठेवले आहेत की नाही,याची संबंधित कार्यालयप्रमुखांनी तपासणी करावी. कार्यालयांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश अथवा कृत्रिम प्रकाश राहील आणि हवा खेळती राहील अशी व्यवस्था करावी.एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरी क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजाराने ग्रस्त व्यक्ती असल्यास संबंधित कर्मचाऱ्यानेही आवश्यक वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. कार्यालयामध्ये शक्यतो कुलर अथवा एसीचा वापर टाळावा. वापरात असलेल्या कुलरमधील पाणी नियमितपणे बदलावे.जुने व वापरण्यायोग्य नसलेले कुलर असल्यास त्यांचे नियमानुसार निर्लेखन करावे. ताप असलेल्या कर्मचाऱ्यांना विश्रांती द्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात असताना शक्यतो पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत आणि डास प्रतिबंधक मलम किंवा क्रीमचा वापर करावा.पिण्यासाठी शक्यतो स्वतःची पाण्याची बाटली घरून आणावी.कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याला ताप, सर्दी,खोकला किंवा अंगावर पुरळ येण्यासारखी लक्षणे दिसल्यास त्याला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवावे.ताप असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे संभाव्य संसर्गाचा प्रसार होऊ नये आणि संबंधित कर्मचाऱ्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ मिळावा,यासाठी त्याला आवश्यक विश्रांती घेण्याची परवानगी द्यावी. घरातील पाण्याच्या एका छोट्याशा साठ्यापासून शाळेच्या मैदानापर्यंत आणि कार्यालयाच्या परिसरापर्यंत प्रत्येक ठिकाणी घेतलेली साधी खबरदारी डासांची पैदास रोखण्यास उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता स्वच्छता,प्रतिबंध आणि वेळेवर उपचार ही त्रिसूत्री नागरिकांनी अंगीकारावी,असे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमधून स्पष्ट करण्यात आले आहे. ******

विषाणुजन्य तापाचा वाढता प्रादुर्भाव : जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण मोहीम

विषाणुजन्य तापाचा वाढता प्रादुर्भाव : जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण मोहीम तीन दिवसांत ७३७ गावांसह शहरी भाग पिंजून काढणार : रुग्ण वाढलेल्या भागात ‘फिव्हर क्लिनिक ; डेंग्यू- चिकनगुनियाच्या संशयितांचे नमुने तपासणार धाराशिव,दि.२ सप्टेंबर (जिमाका) मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात विषाणुजन्य तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत जलद ताप सर्वेक्षण,कीटकशास्त्रीय सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.यानंतर पुढील तीन महिने प्रत्येक महिन्याच्या २ आणि १७ तारखेला नियमित ताप सर्वेक्षणासोबत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या तीन दिवसांच्या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ७३७ गावांसह शहरी भागात आशा कार्यकर्त्या, आरोग्य सेविका,आरोग्य सेवक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत जलद ताप सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर ज्या गावांमध्ये तापाच्या रुग्णसंख्येत वाढ तसेच डासांच्या अळ्यांची घनता अधिक असल्याचे आढळून येईल,त्या ठिकाणी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. ताप वाढलेल्या भागात ‘फिव्हर क्लिनिक’ ज्या भागात तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास येईल, तेथे वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ‘फिव्हर क्लिनिक’द्वारे प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक कार्यवाही केली जाणार आहे.आरोग्य पथके प्रत्यक्ष भेटी देऊन तापाच्या रुग्णांना उपचार देतील.तसेच डेंग्यू आणि चिकनगुनियाची लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आशा कार्यकर्त्यांमार्फत गावांतील दूषित पाणीसाठ्यांमध्ये अबेट टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांमध्ये ‘कोरडा दिवस’ पाळण्याबरोबरच नागरिकांमध्ये ताप आणि डासजन्य आजारांच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य संस्थांमध्ये औषधांचा मुबलक साठा जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रे,प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांच्या स्तरावर आरोग्य विभागाने औषधांचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र,तालुका आणि जिल्हास्तरावरून या संपूर्ण मोहिमेचे सनियंत्रण करण्यात येत आहे.डास नियंत्रणासाठी ग्रामपंचायत विभागाकडे ७३ फॉगिंग मशीन उपलब्ध आहेत. घराभोवती पाणी साचू देऊ नका आरोग्य विभागाने नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी आपल्या घरासह परिसराची स्वच्छता राखावी, डासांची उत्पत्ती होऊ शकणारी ठिकाणे नष्ट करावीत,घर व परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी आणि मच्छरदाणीचा वापर करावा. विशेषतः तापाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.ताप आल्यास अंगावर न काढता त्वरित नजीकच्या आरोग्य संस्थेत जाऊन उपचार घ्यावेत. ताप सर्वेक्षणासाठी घरोघरी येणाऱ्या आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे.ताप किंवा डासजन्य आजारांसंदर्भात कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास जिल्हा आरोग्य विभागाच्या कॉल सेंटरशी तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा बांगर आणि प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनशील कुलकर्णी यांनी केले आहे. ******

Tuesday, 1 September 2026

‘महिला लोककला महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागर

‘महिला लोककला महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागर ५ व ६ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे विविध महिला लोककलांचे सादरीकरण धाराशिव,दि.२ सप्टेंबर (जिमाका) महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला व लोकपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या वतीने ‘महिला लोककला महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.हा महोत्सव दि.५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आणि दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता स्वयंवर मंगल कार्यालय,बार्शी नाका,धाराशिव येथे होणार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि पारंपरिक सांस्कृतिक जीवनात महिलांनी जपलेल्या लोककला, लोकपरंपरा आणि लोकसंगीताला विशेष महत्त्व आहे.या परंपरांचे दर्शन व्यापक स्तरावर घडवून आणण्यासाठी तसेच महिला कलाकारांना आपल्या पारंपरिक कलांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मंगळागौर,आराधी नृत्य,लावणी, एकतारी भजन, भारूड,भोंडला,भुलाबाई गाणी, शाहिरी आणि मैदानी खेळ अशा विविध लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकजीवन,परंपरा,श्रद्धा,उत्सव आणि सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब या लोककलांमधून अनुभवता येणार आहे. महिलांनी पिढ्यान्‌पिढ्या जतन केलेल्या पारंपरिक कलांचे संवर्धन करून त्यांना आधुनिक काळातही प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे,हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.लोककलेच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच महिला लोककलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य,इलेक्ट्रॉनिक्स,माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाच्या जतन,संवर्धन व प्रसारासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘महिला लोककला महोत्सवा’साठी प्रवेश विनामूल्य असून,धाराशिव तसेच परिसरातील नागरिक, कलारसिक आणि लोककला प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. *******

प्रारूप मतदार यादीत नाव तपासा ; नसल्यास ‘फॉर्म-६’ भरा

प्रारूप मतदार यादीत नाव तपासा ; नसल्यास ‘फॉर्म-६’ भरा धाराशिव दि.१ सप्टेंबर (जिमाका) मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR) अंतर्गत धाराशिव तालुक्यातील मतदान केंद्रनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी या यादीत स्वतःसह कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांची नावे समाविष्ट असल्याची खात्री करावी.नाव नसल्यास फॉर्म क्रमांक ६ द्वारे नवीन मतदार नोंदणी करता येणार असून,मतदार यादीतील तपशिलात बदल करावयाचा असल्यास फॉर्म क्रमांक ८ भरता येणार आहे,असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ सध्या धाराशिव तालुक्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित बीएलओंना नेमून दिलेल्या मतदार यादी भागातील मतदारांकडून गणनापत्रक अर्थात Enumeration Form (EF) भरून घेण्यात आले आहेत. मतदान केंद्रनिहाय प्रारूप यादी प्रसिद्ध भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनांनुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी २४१-तुळजापूर विधानसभा आणि २४२- उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या धाराशिव तालुक्यातील मतदान केंद्रनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही प्रारूप मतदार यादी नागरिकांना पाहण्यासाठी निवडणूक शाखा, तहसील कार्यालय,धाराशिव येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्याचबरोबर संबंधित मतदार यादी भागाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडेही यादी उपलब्ध आहे.नागरिकांना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरही ही प्रारूप मतदार यादी पाहता येणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे तपासा प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये नागरिकांनी स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.ज्या पात्र मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट नाही,अशा मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या Voters’ Service Portal (voters.eci.gov.in) या संकेतस्थळावर किंवा ECINET Mobile App वर फॉर्म क्रमांक ६ भरून आवश्यक कागदपत्रांसह नवीन मतदार नोंदणी करता येणार आहे. तपशिलातील बदलासाठी फॉर्म-८ ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे.मात्र त्यामधील तपशिलात काही बदल किंवा दुरुस्ती करावयाची आहे,अशा मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म क्रमांक ८ भरावा. मतदारांनी प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील आपले नाव आणि तपशील तपासून घेणे महत्त्वाचे असून,आवश्यक असल्यास निर्धारित प्रक्रियेनुसार अर्ज करून मतदार नोंदणी अथवा तपशिलातील दुरुस्ती करून घ्यावी.याबाबत २४१-तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,धाराशिव आणि २४२-उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,कळंब यांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. ही माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार,धाराशिव यांच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,धाराशिव येथील निवडणूक शाखेशी संपर्क साधता येईल. ******

आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासात माध्यमांची भूमिका महत्त्वाची जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासात माध्यमांची भूमिका महत्त्वाची जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार पीआयबीच्या ‘वार्तालाप’ माध्यम परिषदेत शाश्वत शेतीवर मंथन,अणुतंत्रज्ञानापासून मधुमक्षिकापालनापर्यंत विविध पर्यायांची माहिती धाराशिव,दि.१ सप्टेंबर शेतीसोबत कुक्कुट,शेळीपालन, मधुमक्षिकापालनासारख्या पूरक व्यवसायांची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.त्यासाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक कृषी पद्धतींचा स्वीकार करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आणि यशस्वी प्रयोगांची माहिती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.सकारात्मक आणि विकास पत्रकारितेतून अशा यशकथा समाजासमोर आल्यास शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.त्यामुळे धाराशिवसारख्या आकांक्षित जिल्ह्यांच्या विकास प्रक्रियेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत पत्र सूचना कार्यालय (PIB), मुंबई यांच्या वतीने आज मंगळवारी १ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे पत्रकारांसाठी आयोजित ‘वार्तालाप’ माध्यम परिषदेत ते बोलत होते‘आकांक्षित जिल्ह्यांसाठी शाश्वत शेतीचे सुलभीकरण’ या प्रमुख संकल्पनेवर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पीआयबीचे माहिती व संचार अधिकारी हर्षल आकुडे,माहिती सहायक एडगर कोएल्हो आदी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘शेतीला पूरक व्यवसायांची जोड आवश्यक’ अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी पुजार यांनी ‘वार्तालाप’ कार्यशाळेच्या आयोजनाचे कौतुक केले.स्थानिक शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक कृषी पद्धती अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीसोबत कुक्कुटपालन,शेळीपालन आणि मधुमक्षिकापालन यांसारख्या शेतीपूरक व्यवसायांची जोड दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग,तंत्रज्ञान आणि उपयुक्त माहिती माध्यमांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. सकारात्मक आणि विकासाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून शेतीतील यशकथा समाजापर्यंत पोहोचल्यास शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल,असे श्री.पुजार यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले.धाराशिव हा केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या यादीतील आकांक्षित जिल्हा असून,शाश्वत आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. अणुऊर्जा विभागाचे कृषी क्षेत्रातील योगदान कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या (DAE) तज्ज्ञांनी कृषी आणि अन्न तंत्रज्ञान क्षेत्रात आधुनिक अणुतंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती दिली. न्यूक्लियर ॲग्रीकल्चर अँड बायोटेक्नॉलॉजी डिव्हिजनचे सायंटिफिक ऑफिसर ‘जी’ डॉ.विनोद ढोले यांनी पिकांच्या सुधारित आणि रोगप्रतिकारक वाणांची निर्मिती तसेच कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी अणुतंत्रज्ञानाचा कशाप्रकारे उपयोग केला जातो,याची सविस्तर माहिती दिली.अन्न तंत्रज्ञान विभागाचे सचिन हजारे यांनी रेडिएशन तंत्रज्ञानाच्या वापरावर प्रकाश टाकला.या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अन्नधान्य आणि फळांची साठवणूक क्षमता वाढविणे, अन्नसुरक्षा अधिक सक्षम करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत ‘केव्हीके’चा दुवा कृषी विज्ञान केंद्राचे (KVK) शास्त्रज्ञ डॉ.सचिन सूर्यवंशी यांनी ‘कृषी विस्तार सेवांच्या प्रसारात कृषी विज्ञान केंद्राची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रयोगशाळेतील वैज्ञानिक संशोधन आणि प्रत्यक्ष शेतकरी यांच्यातील अंतर कमी करून आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि पीकपद्धती थेट शेतापर्यंत पोहोचविण्यात कृषी विज्ञान केंद्र महत्त्वाचा दुवा आहे. संस्थेच्या क्षमता निर्मिती उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना विविध कार्यक्रमांचा कशाप्रकारे लाभ दिला जातो,याची माहितीही त्यांनी दिली. मधुमक्षिकापालनातून उत्पन्नवाढीचा मार्ग केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे (CBRTI) प्रशिक्षण समन्वयक राहुल काळे यांनी शास्त्रीय पद्धतीने बॉक्स मधमाशीपालन आणि फुलोरा व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले.प्रशिक्षण आणि सूक्ष्मदर्शकीय परागकण विश्लेषणाच्या माध्यमातून शुद्ध मधाचे उत्पादन घेणे शक्य होते. त्याचबरोबर मधातील भेसळीवर नियंत्रण मिळविता येते.त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादनासह उत्पन्नवाढीची संधी उपलब्ध होते,असे काळे यांनी सांगितले. याच सत्रात लातूर येथील मधपाळ ज्ञानेश्वर मलिले यांनी आपला अनुभव मांडला. CBRTIच्या सहकार्याने त्यांनी ‘लातूर मधुशाळा’ तसेच ‘भगीरथ मधु केंद्र’ उभारले असून,या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार आणि जनतेतील माहितीचा दुवा ‘पीआयबी’ पीआयबी पुणे येथील माध्यम व संचार अधिकारी हर्षल आकुडे यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात पीआयबीची भूमिका तसेच पत्रकारांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा आणि योजनांची त्यांनी सविस्तर माहिती दिली. लाभार्थ्यांनी सांगितली बदलाची कहाणी कार्यशाळेत केवळ योजनांची माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शनच नव्हे,तर प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या अनुभवांनाही स्थान देण्यात आले.जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी रघुनाथ जाधव तसेच ‘लखपती दीदी’ अनिता देवकडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.शासनाच्या योजनांचा मिळालेला लाभ आणि त्यातून झालेल्या बदलांविषयी अनुभव सांगत त्यांनी योजनांबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अखेरीस पीआयबी मुंबईचे माहिती सहायक एडगर कोएल्हो यांनी उपस्थित मान्यवर,तज्ज्ञ वक्ते आणि माध्यम प्रतिनिधींचे आभार मानले. कार्यशाळेला जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे व प्रादेशिक व स्थानिक शासनमान्य वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. *******

‘खेलेगा भारत,जितेगा भारत’चा धाराशिवमध्ये जागर

‘खेलेगा भारत,जितेगा भारत’चा धाराशिवमध्ये जागर राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव मेजर ध्यानचंद यांना आदरांजली धाराशिव दि.१ सप्टेंबर (जिमाका) मैदानावर घाम गाळत ध्येयाचा पाठलाग करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देतानाच नव्या पिढीत खेळाची आवड निर्माण करण्याचा संदेश धाराशिवमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देण्यात आला.महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करत ‘खेलेगा भारत,जितेगा भारत’ या संकल्पनेतून तीन दिवस विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.यानिमित्त आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला,तर जिम्नॅस्टिक्स आणि तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव आणि जिल्हा एकविध क्रीडा संघटना,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताचा समृद्ध क्रीडा वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो.सन २०२६ मधील राष्ट्रीय क्रीडा दिनाची संकल्पना ‘खेलेगा भारत,जितेगा भारत’ अशी होती. आदर,खेळ आणि हालचाल (Tribute, Play and Move) या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम,क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘२९ आव्हाने’मधून खेळाडूंनी दाखविले कौशल्य राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या उपक्रमांना २८ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली अर्पण करून सुरुवात करण्यात आली.त्यानंतर ‘२९ आव्हाने’ (29 Challenges) या उपक्रमांतर्गत खेळाडूंनी आपापल्या खेळातील कौशल्याचे २९ वेळा आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पुश-अप्स,सिट-अप्स,शटल रन आदींची प्रात्यक्षिके खेळाडूंनी सादर केली.त्याचबरोबर ‘पास द बॉल चॅलेंज’ अंतर्गत मैदान आणि विविध क्रीडा अकादमींमधील खेळाडूंनी एकमेकांकडे चेंडू पास करण्याचे आव्हान पूर्ण केले.या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच सांघिक भावना आणि खेळातील सहभागाचा संदेश देण्यात आला. मेजर ध्यानचंद,खाशाबा जाधव यांना अभिवादन २९ ऑगस्ट रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त श्रीमती.रोहिणी आवारे,आर्चरी संघटनेचे सचिव प्रवीण गडदे,तलवारबाजी संघटनेचे सचिव श्रीकांत गरड,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती.सुप्रिया गाढवे,डॉ.देडे,अविनाश थोरबोले,यशोदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद आणि भारताचे ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘खेळातून आयुष्यात अनेक संधी’ शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रोहिणी आवारे यांनी खेळाडूंशी संवाद साधताना मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कार्याची माहिती दिली.त्याचबरोबर जीवनातील खेळाचे महत्त्व आणि क्रीडा क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींविषयी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यामागील उद्देश आणि त्याचे महत्त्व विशद केले.खेळ आणि शारीरिक सक्रियता दैनंदिन जीवनाचा भाग होण्याचे महत्त्वही यानिमित्त अधोरेखित करण्यात आले. जिम्नॅस्टिक्स अन् तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष कार्यक्रमात जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील जिम्नॅस्टिक्स खेळाडूंनी श्रीमती.डिंपल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टिक्सची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली.तसेच श्रीधर सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.खेळाडूंचे कौशल्य,वेग आणि तंत्र यामुळे या प्रात्यक्षिकांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुणवंत खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांनी केले,तर क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार यांनी उपस्थितांचे आभार मानले. ******

अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ‘पीएमएफएमई’चा लाभ घ्या

अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ‘पीएमएफएमई’चा लाभ घ्या उद्योगासाठी ३५ टक्के अनुदान ; बेरोजगारांसह शेतकरी,बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही संधी धाराशिव दि.१ सप्टेंबर (जिमाका) शेतात पिकणाऱ्या कच्च्या मालाची थेट विक्री करण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून बाजारात आणल्यास त्याचे मूल्य वाढते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही भर पडू शकते.त्याचबरोबर ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.याच उद्देशाने केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीतून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) जिल्ह्यात रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी महत्त्वाची ठरत आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात ५३७ जणांचे प्रस्ताव मंजूर झाले असून, त्यापैकी ४५० अन्नप्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या सातत्याने जाणवत असून अनेक शिक्षित युवकांच्या हातांना रोजगार उपलब्ध होत नाही. स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याची इच्छा असूनही पुरेशा भांडवलाअभावी अनेकांना उद्योग उभारणे शक्य होत नाही.अशा युवकांसह शेतकरी आणि विविध समूहांना आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र शासनाकडून जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत आहे.या योजनेमुळे कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करता येत असल्याने उत्पादकांना अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होत आहे.विशेष म्हणजे योजनेत एकूण पात्र प्रकल्प खर्चावर ३५ टक्के अनुदान उपलब्ध असल्याने उद्योग उभारणीसाठी आर्थिक आधार मिळतो. खवा,गूळ,डाळीपासून मसाला- पापडापर्यंत उद्योग PMFME योजनेअंतर्गत २०२०-२१ पासून चालू वर्षापर्यंत धाराशिव जिल्ह्यात ५३७ जणांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.त्यापैकी ४५० उद्योग प्रत्यक्ष सुरू झाले आहेत.यामध्ये खवा उद्योग,गूळ उद्योग,डाळ उद्योग,बेदाणा प्रक्रिया,मसाला आणि पापड उद्योग यांचा समावेश आहे.स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे.असंघटित व अनोंदणीकृत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना बळकटी देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारता येतात.अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही आर्थिक उन्नती साधण्याची संधी आहे.शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन केल्यास कच्चा माल थेट विकण्याच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळविण्याची शक्यता निर्माण होते. योजनेचा लाभ केवळ वैयक्तिक उद्योजकांपुरता मर्यादित नाही. वैयक्तिक लाभार्थी, बचत गट, शेतकरी गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच ॲग्रो कंपनी यापैकी पात्र घटकांना अर्ज करता येतो.विशेष म्हणजे,योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या नावावर सातबारा असणे आवश्यक नाही. त्यामुळे स्वतःची जमीन नसतानाही पात्र व्यक्तींना अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे. योजनेचा प्रस्ताव तयार करताना किंवा अर्ज प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी शासनाकडून मदत केली जात आहे.प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मानधन तत्त्वावर एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.अर्जदारांना प्रस्ताव दाखल करण्यापासून त्याच्या मंजुरीपर्यंत मोफत मार्गदर्शन करण्यात येते.उद्योग मंजूर झाल्यानंतर तो व्यवस्थित चालविण्यासाठी शासनाकडून योजनेच्या निकषांनुसार ३५ टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांचीही मदत घेता येईल. जिल्ह्यात विविध प्रकारचा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.मात्र त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने बाजारात विकणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे.त्यामुळे जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग वाढल्यास स्थानिक शेतमालाला बाजारपेठ मिळण्याबरोबरच नवउद्योजकांनाही उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो.शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासोबतच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व्यक्ती,शेतकरी,बचत गट,शेतकरी गट,संस्था आणि कंपन्यांनी योजनेसाठी अर्ज करून लाभ घ्यावा,असे आवाहन कृषी विभाग,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे. अर्ज कुठे करायचा-अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी योजनेची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला (pmfme.mofpi.gov.in) भेट द्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, धाराशिव येथे संपर्क साधता येईल.तसेच गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडूनही योजनेबाबत मार्गदर्शन घेता येईल. ******

अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ‘पीएमएफएमई’चा लाभ घ्या

अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ‘पीएमएफएमई’चा लाभ घ्या उद्योगासाठी ३५ टक्के अनुदान ; बेरोजगारांसह शेतकरी,बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही संधी धाराशिव दि.१ सप्टेंबर (जिमाका) शेतात पिकणाऱ्या कच्च्या मालाची थेट विक्री करण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून बाजारात आणल्यास त्याचे मूल्य वाढते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही भर पडू शकते. त्याचबरोबर ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. याच उद्देशाने केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीतून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) जिल्ह्यात रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी महत्त्वाची ठरत आहे.योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात ५३७ जणांचे प्रस्ताव मंजूर झाले असून,त्यापैकी ४५० अन्नप्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या सातत्याने जाणवत असून अनेक शिक्षित युवकांच्या हातांना रोजगार उपलब्ध होत नाही.स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याची इच्छा असूनही पुरेशा भांडवलाअभावी अनेकांना उद्योग उभारणे शक्य होत नाही.अशा युवकांसह शेतकरी आणि विविध समूहांना आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र शासनाकडून जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करता येत असल्याने उत्पादकांना अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे योजनेत एकूण पात्र प्रकल्प खर्चावर ३५ टक्के अनुदान उपलब्ध असल्याने उद्योग उभारणीसाठी आर्थिक आधार मिळतो. खवा, गूळ, डाळीपासून मसाला-पापडापर्यंत उद्योग PMFME योजनेअंतर्गत २०२०-२१ पासून चालू वर्षापर्यंत धाराशिव जिल्ह्यात ५३७ जणांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.त्यापैकी ४५० उद्योग प्रत्यक्ष सुरू झाले आहेत.यामध्ये खवा उद्योग,गूळ उद्योग,डाळ उद्योग,बेदाणा प्रक्रिया,मसाला आणि पापड उद्योग यांचा समावेश आहे.स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे.असंघटित व अनोंदणीकृत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना बळकटी देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारता येतात. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही आर्थिक उन्नती साधण्याची संधी आहे.शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन केल्यास कच्चा माल थेट विकण्याच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळविण्याची शक्यता निर्माण होते. योजनेचा लाभ केवळ वैयक्तिक उद्योजकांपुरता मर्यादित नाही. वैयक्तिक लाभार्थी, बचत गट, शेतकरी गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच ॲग्रो कंपनी यापैकी पात्र घटकांना अर्ज करता येतो.विशेष म्हणजे,योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या नावावर सातबारा असणे आवश्यक नाही. त्यामुळे स्वतःची जमीन नसतानाही पात्र व्यक्तींना अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे. प्रस्तावापासून मंजुरीपर्यंत मोफत मार्गदर्शन योजनेचा प्रस्ताव तयार करताना किंवा अर्ज प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी शासनाकडून मदत केली जात आहे.प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मानधन तत्त्वावर एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.अर्जदारांना प्रस्ताव दाखल करण्यापासून त्याच्या मंजुरीपर्यंत मोफत मार्गदर्शन करण्यात येते.उद्योग मंजूर झाल्यानंतर तो व्यवस्थित चालविण्यासाठी शासनाकडून योजनेच्या निकषांनुसार ३५ टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांचीही मदत घेता येईल. जिल्ह्यात विविध प्रकारचा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.मात्र त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने बाजारात विकणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे.त्यामुळे जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग वाढल्यास स्थानिक शेतमालाला बाजारपेठ मिळण्याबरोबरच नवउद्योजकांनाही उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो.शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासोबतच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व्यक्ती,शेतकरी,बचत गट,शेतकरी गट,संस्था आणि कंपन्यांनी योजनेसाठी अर्ज करून लाभ घ्यावा,असे आवाहन कृषी विभाग,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे. अर्ज कुठे करायचा- अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी योजनेची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला (pmfme.mofpi.gov.in) भेट द्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय,धाराशिव येथे संपर्क साधता येईल.तसेच गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडूनही योजनेबाबत मार्गदर्शन घेता येईल. ******

माजी सैनिकांसह गुणवंत पाल्यांना विशेष गौरवाची संधी

माजी सैनिकांसह गुणवंत पाल्यांना विशेष गौरवाची संधी दहावी-बारावीतील गुणवंतांसह विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीचा होणार सन्मान १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन धाराशिव दि.९ सप्टेंबर(जिमाका) देशसेवेत योगदान देणाऱ्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाला प्रोत्साहन देण्याबरोबरच क्रीडा, समाजसेवा,कला,सांस्कृतिक,शेती आणि व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत धाराशिव जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’ आणि ‘माजी सैनिक गुणवंत पाल्य सत्कार योजना २०२५-२६’ राबविण्यात येत आहे.पात्र लाभार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत.या योजनेंतर्गत सन २०२५-२६ मध्ये इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक आणि बारावीमध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शैक्षणिक गौरव पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहेत. विविध क्षेत्रांतील कामगिरीचाही गौरव योजना केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरती मर्यादित नसून विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीचाही सन्मान करण्यात येणार आहे.क्रीडा,समाजसेवा, कला,सांस्कृतिक,शेती,व्यवसाय आदी क्षेत्रांत राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणारे माजी सैनिक,त्यांच्या पत्नी तसेच पाल्य विशेष गौरवासाठी पात्र ठरणार आहेत.माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध क्षेत्रांत मिळविलेल्या यशाला शासनस्तरावर प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली जावी,हा या योजनेमागील उद्देश आहे. प्रत्येक बोर्डातील दहा गुणवंतांची निवड शैक्षणिक गौरवासाठी प्रत्येक शैक्षणिक बोर्डातील इयत्ता दहावी व बारावीच्या प्रत्येकी प्रथम १० गुणवंत पाल्यांची निवड करण्यात येणार आहे.त्यामुळे निर्धारित गुणांची पात्रता पूर्ण करणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत ही कागदपत्रे आवश्यक पात्र लाभार्थ्यांनी अर्जासोबत माजी सैनिक ओळखपत्र,संबंधित विद्यार्थ्याची गुणपत्रिका,पुरस्कार अथवा प्रमाणपत्र आणि आधार कार्डाची प्रत जोडणे आवश्यक आहे.अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण असणे गरजेचे आहे. १५ सप्टेंबर अर्जाची अंतिम मुदत पात्र माजी सैनिक,त्यांच्या पत्नी व पाल्यांनी आपले परिपूर्ण अर्ज १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे जमा करावेत.१५ सप्टेंबरनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत,याची संबंधितांनी नोंद घ्यावी.प्राप्त अर्जांची जिल्हास्तरावर छाननी करण्यात येईल.त्यानंतर पात्र ठरलेले अर्ज अंतिम मंजुरीसाठी सैनिक कल्याण विभाग,पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत. *****

अखेर प्रतीक्षा संपली... दत्तक प्रक्रियेतून पालकत्वाच्या इच्छेला मिळाले कायदेशीर बळ

अखेर प्रतीक्षा संपली... दत्तक प्रक्रियेतून पालकत्वाच्या इच्छेला मिळाले कायदेशीर बळ नात्याअंतर्गत दत्तक प्रकरणात अंतिम आदेश ; जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने प्रक्रिया पूर्ण CARA मार्गदर्शिकेनुसार गृहचौकशी,कागदपत्रांची पडताळणी आणि सुनावणीनंतर आदेश पारित धाराशिव दि.१ सप्टेंबर (जिमाका) आई होण्याची इच्छा... बाबा होण्याचे स्वप्न... मनात जपलेल्या पालकांची प्रतीक्षा अखेर सोमवारी संपली.नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रियेतून एका बालकाला कायदेशीररीत्या स्वीकारण्याच्या त्यांच्या इच्छेला अंतिम आदेशामुळे बळ मिळाले.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मान्यतेने नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रियेतील एका प्रकरणात आज सोमवारी १ सप्टेंबर रोजी अंतिम आदेश पारित करण्यात आला.या प्रक्रियेत नात्याअंतर्गत दत्तक प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरली.दत्तक प्रक्रिया ही केवळ बालक स्वीकारण्याची प्रक्रिया नसून त्याला कायदेशीर मान्यता मिळणेही तितकेच महत्त्वाचे असते. यामुळे निर्धारित नियम, कागदपत्रांची पडताळणी, गृहचौकशी,संबंधित यंत्रणांची मान्यता आणि सुनावणीचे टप्पे पूर्ण करून या प्रकरणात अंतिम आदेश देण्यात आला. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने हलविली सूत्रे या प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांनी प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तक प्रक्रियेच्या कामकाजाची सूत्रे हलविली.प्रथमदर्शनी दत्तक प्रणालीच्या मार्गदर्शिकेनुसार संबंधित पालकांना केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या (CARA) संकेतस्थळावर नोंदणी करण्यास सांगण्यात आले.त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत गृहचौकशी करण्यात आली. या प्रक्रियेत बाल संरक्षण अधिकारी श्रीमती.विभावरी खुने यांनी दत्तक इच्छुक पालकांकडून आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेतली.तसेच दत्तक घेणारे, दत्तक देणारे आणि साक्षीदार यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.बाल कल्याण समितीच्या मान्यतेनंतर पुढील प्रक्रिया संबंधितांना बाल कल्याण समिती,धाराशिवचे अध्यक्ष विजयकुमार माने आणि समितीच्या इतर सदस्यांसमक्ष हजर करण्यात आले.बाल कल्याण समितीच्या मान्यतेनंतर पुढील दत्तक प्रक्रिया करण्यात आली. त्यानुषंगाने CARA मार्गदर्शिका- २०२२ नुसार या एका प्रकरणासाठी CARA मार्फत आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात सुनावणी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम आदेशासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या कक्षात प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली.सुनावणी आणि आवश्यक प्रक्रियेनंतर या दत्तक प्रकरणात अंतिम आदेश पारित करण्यात आला.या दत्तक विधानाची प्रक्रिया विधी व परिविक्षा अधिकारी श्रीमती.जयश्री भाले यांच्या कायद्यांतर्गत मार्गदर्शनातून पार पडली. दत्तक प्रक्रियेतील विविध टप्प्यांची काटेकोर पूर्तता झाल्यामुळे पालकत्वाची इच्छा मनाशी बाळगून असलेल्या संबंधित पालकांसाठी हा दिवस विशेष ठरला.त्याचबरोबर कायदेशीर प्रक्रियेतून दत्तक घेण्याचे महत्त्वही या प्रकरणामुळे अधोरेखित झाले. दत्तक घ्यायचे असेल तर कायदेशीर प्रक्रियाच अवलंबा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने नागरिकांना दत्तक प्रक्रियेबाबत महत्त्वाचे आवाहन केले आहे.नात्याअंतर्गत दत्तक,सावत्र दत्तक प्रकरण तसेच नियमित दत्तक ग्रहणासाठी बालक दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी मिशन वात्सल्य पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दत्तक घेण्याची प्रक्रिया अधिकृत यंत्रणेमार्फत आणि कायदेशीर पद्धतीने पूर्ण केल्याने बालकाच्या हक्कांचे संरक्षण होते तसेच दत्तक पालकांनाही कायदेशीर मान्यता आणि संरक्षण प्राप्त होते,त्यामुळे इच्छुक पालकांनी निर्धारित दत्तक प्रक्रियेचाच अवलंब करावा,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, धाराशिव यांनी केले आहे. ******

विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध जिल्ह्यात १२ लाख ३२ हजार ३१९ मतदार ; १ लाख ८१ हजार ५४५ मतदार ‘Uncollectable’ दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत; नोटीस मिळालेल्या मतदारांनी सुनावणीला पुराव्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन धाराशिव,दि.१ सप्टेंबर (जिमाका) भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR) अंतर्गत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीनुसार जिल्ह्यातील १ हजार ५२० मतदान केंद्रांवर एकूण १२ लाख ३२ हजार ३१९ मतदार आहेत. दरम्यान,गणक प्रपत्र प्राप्त न झाल्याने १ लाख ८१ हजार ५४५ मतदारांना ‘Uncollectable’ म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.प्रारूप यादीतील मतदारांनी आपले नाव व तपशील तपासून आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत दावा,हरकत अथवा दुरुस्तीसाठी अर्ज करावा,असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.भारत निवडणूक आयोग,नवी दिल्ली यांच्या १४ मे २०२६ रोजीच्या पत्रानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR) घोषित करण्यात आला आहे.या कार्यक्रमांतर्गत सोमवार, दि.३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या अनुषंगाने आज मंगळवारी १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट) जिल्हाध्यक्ष अशोक खंडागळे, भारतीय जनता पार्टीचे ॲड.नितीन भोसले,बहुजन समाज पार्टीचे प्रवीण जगताप,नॅशनल काँग्रेस पार्टी (श.प.) चे जिल्हाध्यक्ष सुरज वडवले,बसपाचे प्रा.महादेव वाघमारे,शिवसेना (उबाठा) चे समाधान दहीभाते,राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी (शरद पवार गट) चे पंकज भोसले,जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्फराज काझी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे अशोक सोने,शिवसेना (शिंदे गट) रोहिदास अजित रतन तसेच राजेद्र शेरखाने व सुरेश जगताप आदी उपस्थित होते. जिल्ह्यात १२ लाख ३२ हजार ३१९ मतदार बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी ऑनलाइन पीपीटी सादरीकरणाद्वारे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिली.जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी मतदार नोंदणी नियम,१९६० नुसार तयार करण्यात आली आहे.प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण १ हजार ५२० मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात ६ लाख ५२ हजार ४३३ पुरुष मतदार,५ लाख ७९ हजार ८६० स्त्री मतदार आणि २६ इतर मतदार,असे एकूण १२ लाख ३२ हजार ३१९ मतदार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. १ लाख ८१ हजार ५४५ मतदार ‘Uncollectable’ SIR कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांचे गणक प्रपत्र प्राप्त झालेले नाही,अशा मतदारांच्या गणक प्रपत्रांना ‘Uncollectable’ म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.यामध्ये मयत ५२ हजार ९३१,गैरहजर २० हजार ३१२, स्थलांतरित ८२ हजार ५६०, इतर ४४८ आणि इतर ठिकाणी नोंदणीकृत असलेले २५ हजार २९४,असे एकूण १ लाख ८१ हजार ५४५ मतदार ‘Uncollectable’ म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहेत. ३२ हजार ९३ मतदारांचे ‘No Mapping’ प्रारूप मतदार यादीमध्ये ‘No Mapping’ असलेले ३२ हजार ९३ मतदार आढळून आले आहेत. त्याचबरोबर वय,नाव आणि नातेसंबंध यामध्ये विसंगती (Anomalies) असलेले ८० हजार १४४ मतदार संपूर्ण जिल्ह्यात आढळले आहेत.संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून अशा मतदारांना ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुनावणीच्या नोटिसा निर्गमित करण्यात येणार आहेत.त्यानंतर १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुनावणी घेऊन संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. नोटीस आल्यास आवश्यक पुरावे सादर करणे महत्त्वाचे ज्या मतदारांना सुनावणीच्या नोटिसा प्राप्त होतील,त्यांनी नोटिशीत नमूद केलेल्या दिनांक व ठिकाणी सुनावणीस उपस्थित राहून संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे अथवा पुरावे सादर करावेत.१ जुलै १९८७ पूर्वी भारतात जन्म झालेल्या मतदारांनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे कोणतेही एक कागदपत्र सादर करावे.१ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान भारतात जन्म झालेल्या मतदारांनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे स्वतःचे तसेच आई किंवा वडिलांचे कोणतेही एक कागदपत्र सादर करावे. २ डिसेंबर २००४ नंतर भारतात जन्म झालेल्या मतदारांनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे स्वतःचे तसेच आई आणि वडील यांचे प्रत्येकी कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.पालकांपैकी कोणीही भारतीय नागरिक नसल्यास मतदाराच्या जन्माच्या वेळी संबंधित व्यक्तीचा वैध पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत सादर करावी.भारताबाहेर जन्म झालेल्या मतदारांनी विदेशस्थित भारतीय दूतावासाने जारी केलेल्या जन्म नोंदणीच्या पुराव्याची प्रत सादर करावी. नोंदणीकरण किंवा नागरिकीकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले असल्यास नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे.संबंधित मतदाराने सुनावणीच्या वेळी ही आवश्यक कागदपत्रे अथवा पुरावे सादर न केल्यास त्याचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट होणार नाही,असे स्पष्ट करण्यात आले आहे. १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना फॉर्म-६ द्वारे नोंदणी मतदार यादी तयार करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे.या अर्हता दिनांकापर्यंत १८ वर्षे वय पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना फॉर्म-६ भरून मतदार यादीत नवीन नाव नोंदविता येणार आहे. मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी फॉर्म-७,तर मतदाराच्या माहितीमध्ये दुरुस्ती करणे अथवा स्थलांतरासाठी फॉर्म-८ संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करता येणार आहे. ऑनलाइनही करता येणार अर्ज मतदारांना दावा किंवा आक्षेप सादर करावयाचा असल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकारी,सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत अर्ज सादर करता येईल.याशिवाय भारत निवडणूक आयोगाच्या Voters’ Service Portal (voters.eci.gov.in) वरही ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. निर्णयाविरोधात १५ दिवसांत अपील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दावा किंवा हरकतीवर दिलेल्या निर्णयाशी मतदार अथवा नागरिक असहमत असल्यास संबंधित आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे अपील दाखल करता येणार आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी धाराशिव जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (dharashiv.maharashtra.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीतील आपले नाव आणि इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावा,हरकत किंवा दुरुस्तीसाठी अर्ज करावा,असे जिल्हा निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे. 0000000

शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदर्शन महत्त्वाचे माध्यम जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदर्शन महत्त्वाचे माध्यम जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार धाराशिवमध्ये दोन दिवसीय मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात शासकीय योजनांपासून आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीपर्यंत माहिती ; पोषण आहार,भरडधान्यांसाठी विशेष दालन धाराशिव,दि.१ सप्टेंबर (जिमाका) केंद्र आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना,विकासाचे उपक्रम आणि त्यातून होत असलेले परिवर्तन सामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी समजून घेता यावे,यासाठी मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन हे महत्त्वाचे माध्यम आहे.त्यामुळे अशा माहितीपूर्ण प्रदर्शनांचे आयोजन नागरिक आणि शासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने धाराशिव येथील मध्यवर्ती बस स्थानकात आयोजित दोन दिवसीय मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनाला आज मंगळवारी १ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर,पत्र सूचना अधिकारी हर्षल आकुडे,केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रसिद्धी प्रमुख सुमित दोडल,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अजय पाटील,आगार प्रमुख प्रविण भोंडवे,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके आदी मान्यवर उपस्थित होते. ‘विश्वास, विकास आणि जनकल्याणा’ची वाटचाल प्रदर्शनातून केंद्र सरकारच्या सेवेची १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने केंद्रीय संचार ब्यूरो,माहिती व प्रसारण मंत्रालय,भारत सरकारच्या क्षेत्रीय कार्यालय सोलापूर आणि जिल्हा प्रशासन,धाराशिव यांच्या सहकार्याने मध्यवर्ती बस स्थानकात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘१२ वर्षे विश्वासाची,विकासाची, जनकल्याणाची – विकसित भारत जी राम जी विधेयक-२०२५, राष्ट्रीय पोषण अभियान’ या संकल्पनेवर हे मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन आधारित आहे. प्रदर्शनामध्ये ग्रामीण रोजगाराशी संबंधित ‘विकसित भारत गॅरंटी रोजगार मिशन-२०२५ (व्ही.बी.जीराम जी कायदा-२०२५)’ या विषयाची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. राष्ट्रीय पोषण माहनिमित्त विशेष दालन सप्टेंबर महिना ‘राष्ट्रीय पोषण माह’ म्हणून साजरा करण्यात येतो.त्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनात पोषण आहाराबाबत स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे.यामध्ये पोषण आहाराच्या पाककृती आणि भरडधान्यांचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यासाठी विशेष माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्यपूर्ण जीवनासाठी योग्य आणि संतुलित आहाराचे महत्त्व,दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश आणि भरडधान्यांचे आहारातील स्थान याबाबत या दालनातून जनजागृती करण्यात येत आहे. एका छताखाली विविध योजनांची माहिती प्रदर्शनामध्ये केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांसह त्यांच्या उद्दिष्टपूर्तीची माहिती छायाचित्रे आणि एलईडी वॉलच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडण्यात आली आहे.यामध्ये पीएम विश्वकर्मा योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आणि यूपीआय व्यवहार,प्रधानमंत्री कुसुम योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्टार्टअप योजना,प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, उजाला योजना तसेच सौरऊर्जेशी संबंधित योजना अशा विविध योजनांची माहिती नागरिकांना प्रदर्शनातून मिळत आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक क्षेत्र,कृषी, संरक्षण,आरोग्य,वाहननिर्मिती आणि विमान क्षेत्रात आत्मनिर्भर भारताने केलेली वाटचाल तसेच विविध क्षेत्रांतील विकास आणि ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. ‘हरित धाराशिव’चा संदेश ; देशी रोपांचे मोफत वितरण प्रदर्शनाला पर्यावरण संवर्धनाचीही जोड देण्यात आली आहे.धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्स्फूर्त लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव’ उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या वतीने प्रदर्शनस्थळी मोफत वृक्ष वितरण स्टॉल उभारण्यात आला आहे.या स्टॉलवर चिंच,पेरू,जांभूळ,खजूर आदी देशी प्रजातींच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात मोफत वितरण करण्यात आले.नागरिकांनीही या उपक्रमाला प्रतिसाद दिला. दरम्यान,परिवर्तन सेवाभावी संस्था,लातूर यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.मनोरंजनासोबतच विविध विषयांवरील जनजागृतीचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.मध्यवर्ती बस स्थानकात आयोजित हे दोन दिवसीय मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांसाठी मोफत खुले राहणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, विकसित आणि आत्मनिर्भर भारताची वाटचाल,पोषण अभियान तसेच विविध विकास उपक्रमांची माहिती एकाच ठिकाणी जाणून घेण्याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध झाली आहे. विद्यार्थी,युवक,महिला,शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन विविध शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. *******

लिंग गुणोत्तराच्या समतोलासाठी तुळजापूर येथे होणार मंथन PCPNDT कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ८ सप्टेंबरला जिल्हास्तरीय कार्यशाळा

लिंग गुणोत्तराच्या समतोलासाठी तुळजापूर येथे होणार मंथन PCPNDT कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ८ सप्टेंबरला जिल्हास्तरीय कार्यशाळा * स्त्रीरोगतज्ज्ञ,रेडिओलॉजिस्टसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग * गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम, * “वैद्यकीय गर्भपात अधिनियम” * सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) अधिनियम, २०२१” — कायद्यांवर होणार मार्गदर्शन धाराशिव दि.१ सप्टेंबर (जिमाका) मुलगा असो की मुलगी,दोघांनाही जन्म घेण्याचा समान अधिकार आहे.मात्र गर्भलिंग निदानातून होणाऱ्या स्त्रीभ्रूणहत्येमुळे समाजातील स्त्री-पुरुष प्रमाणाचा समतोल बिघडण्याची गंभीर सामाजिक समस्या निर्माण होऊ शकते.म्हणूनच गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्राचा गैरवापर रोखण्याबरोबरच मुलींच्या जन्माविषयी समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम (PCPNDT) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी,वैद्यकीय गर्भपात अधिनियम” ( MTP) आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) अधिनियम, २०२१” (ART)कायद्याबाबत अद्ययावत ज्ञान आणि जनजागृती या विषयांवर मंथन करण्यासाठी ८ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन तुळजापूर येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), अपशिंगा रोड येथे होणार आहे. धाराशिव जिल्हा हा नीती आयोगाने आकांक्षित (Aspirational) जिल्हा म्हणून घोषित केला आहे.त्यामुळे जिल्ह्याच्या विविध विकास निर्देशांकांकडे नीती आयोगाचे विशेष लक्ष आहे.त्यामध्ये लिंग गुणोत्तराचा समतोल राखणे हा महत्त्वाचा निर्देशांक आहे.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमातही धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात होणारे बदल ही केवळ आकडेवारीची बाब न राहता सामाजिक समतोलाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरत आहे. लिंग गुणोत्तराचा प्रश्न म्हणजे समाजाच्या भविष्याचा प्रश्न जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सातत्याने कमी होत गेल्यास भविष्यात समाजामध्ये मुला-मुलींच्या संख्येत असमतोल निर्माण होऊ शकतो.त्याचे दूरगामी सामाजिक परिणाम होण्याची शक्यता असते.त्यामुळे मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासोबतच गर्भलिंग निदानाला प्रतिबंध करणे आणि त्यासाठी असलेल्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याच दृष्टिकोनातून आरोग्य विभागामार्फत PCPNDT आणि MTP कायद्याची कडक अंमलबजावणी तसेच व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करतानाच वैद्यकीय क्षेत्रातील संबंधित घटकांना कायद्यातील तरतुदींची अद्ययावत माहिती असणे आवश्यक असल्याने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. काय आहे गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम, (PCPNDT) कायदा PCPNDT म्हणजे Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques (Prohibition of Sex Selection) Act अर्थात गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा.गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भावस्थेत लिंग निवड आणि गर्भलिंग निदानाला प्रतिबंध करणे तसेच प्रसवपूर्व निदान तंत्राचा गैरवापर रोखणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे.वैद्यकीय कारणांसाठी सोनोग्राफीसारख्या निदान तंत्रांचा वापर महत्त्वाचा असला,तरी त्यांचा वापर गर्भाचे लिंग निश्चित करण्यासाठी अथवा सांगण्यासाठी करता येत नाही. त्यामुळे निदान केंद्रे,सोनोग्राफी केंद्रे आणि संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कायद्यानुसार विविध नियम आणि नोंदींचे पालन करणे आवश्यक आहे.कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. PCPNDT कायद्याचा हेतू केवळ कारवाई किंवा शिक्षा करणे एवढाच मर्यादित नाही.मुलगी म्हणून जन्म घेण्याचा तिचा हक्क सुरक्षित ठेवणे आणि स्त्री-पुरुष समानतेवर आधारित समाजव्यवस्था मजबूत करणे,हा त्यामागील व्यापक सामाजिक उद्देश आहे. PCPNDT, MTP आणि ART कायद्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समुचित प्राधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व स्त्रीरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट,कार्डिओलॉजिस्ट आणि भिषक हे सहभागी होणार आहेत.या जिल्हास्तरीय कार्यशाळेत PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी,MTP कायदा आणि ART कायदा आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.संबंधित कायद्यांबाबत वैद्यकीय व्यावसायिक आणि अंमलबजावणी यंत्रणांचे ज्ञान अद्ययावत व्हावे,कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी आणि प्रत्यक्ष कामकाजातील विविध बाबींबाबत स्पष्टता निर्माण व्हावी यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.लिंग गुणोत्तरातील असमतोल हा केवळ आरोग्य विभागाचा प्रश्न नसून संपूर्ण समाजाच्या भविष्याशी निगडित विषय आहे.त्यामुळे कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसोबतच ‘मुलगीही तितकीच हवी’ ही मानसिकता समाजात अधिक दृढ करणे,स्त्रीभ्रूणहत्येला प्रतिबंध करणे आणि प्रत्येक मुलीचा जन्म सन्मानाने स्वीकारला जावा यासाठी जनजागृती वाढविणे हा या प्रयत्नांचा केंद्रबिंदू राहणार आहे. ******