Wednesday, 25 January 2017

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न


          उस्मानाबाद,दि.26:-  भारतीय प्रजासत्ताक  दिनाच्या 67 व्या वर्धापन  दिनानिमित्त आज जिल्ह्यात  सर्वत्र  उत्साहाने साजरा  करण्यात आला .  यानिमित्त  विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित  करण्यात आले. येथील  पोलीस संचलन मैदानावर  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांच्या हस्ते  मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दीपाली घाटगे,अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव उपस्थित होते.
            प्रारंभी  सकाळी 9.15 वाजता  जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते  ध्वजारोहण  होताच पोलीस  दलाने  राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. त्यानंतर पोलीस दलाचे महिला व पुरुषांचे पथक, गृहरक्षक दल, शीघ्र कृती दल,जलद प्रतिसाद  पथक, श्वान पथक,दंगल नियंत्रण  पथक  आदी पथकांच्या  संचलनाची  मानवंदना  डॉ. नारनवरे यांनी स्विकारली.
            संचलनात विविध  विभागांचे  आकर्षक  चित्ररथही  सहभागी झाले होते.  संबंधित  विभागांच्या  योजनांची माहिती दर्शविणारे हे चित्ररथ  लक्ष वेधून  घेत होते. यात  जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत  मिशन कक्ष,  आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग,अग्निशमन, बॉम्बशोधक, पोलीस  विभागाचे महात्मा गांधी तंटामुक्तगाव मोहीम पथक,आपत्ती व्यवस्थापन पथक,वन विभाग,जिल्हा शासकीय रुग्णालयाची सुसज्ज रुग्णवाहिका,  महिला छेडछाडविरोधी पथक ,  होमगार्ड्स , स्काऊट गाईड्स आदी सहभागी झाले होते .
        जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी यावेळी समारंभाला उपस्थित असलेल्या स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, पत्रकार व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विविध पदाधिकारी , विविध मान्यवर,उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर,उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार सुजित नरहरी यांच्यासह विविध विभागांचे  अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे  यांच्या हस्ते नक्षलग्रस्त  विभागात  दाखविलेल्या  कठीण व  खडतर कामगिरीबद्दल सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र  आनंदराव बनसोडे, सायबर सेलच्या सहायक पोलीस  निरीक्षक श्रीमती विरयानी कदम,  येरमाळा येथील सहायक पोलीस निरीक्षक विनोद  बापुराव  चव्हाण यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स ,मुंबई राष्ट्रपती  पुरस्कार चाचणी शिबिर-2015 यासाठी निवड झालेल्या बेंबळी येथील जिजामाता कन्या प्रशालेच्या कु.पद्मजा लक्ष्मण मुळे, कु. श्वेता दत्तात्रय मुंडे आणि कु. भारती  नंदकुमार  मानाळे या विद्यार्थीनींचाही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
या समारंभाच्या शेवटी यमगरवाडी येथील  एकलव्य आदिवासी आश्रमशाळा,  ग्रीनलँड हायस्कूल व लिटलस्टार प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
****                           
जिल्हाधिकारी कार्यालयात  डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
            दरम्यान येथील  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांच्या हस्ते सकाळी 8.15 वाजता  ध्वजारोहणाचा  कार्यक्रम पार पडला . याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक , निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार सुजित नरहरी यांच्यासह  महसूल विभागाचे  सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते .  ****


मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक
यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त  येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे अप्पर  जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
या ध्वजारोहण कार्यक्रमास मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणाच्या प्रारंभी प्रथम पोलीस विभागाने सलामी दिली. या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपयांत्रिकी विभाग, उस्मानाबाद कार्यालयातील सेवक श्री .परिमल यांनी राष्ट्र भक्तीपर गीत गाऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांची मने जिंकली या  ध्वजारोहण कार्यक्रमास प्रामुख्याने जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे,विभागीय वन अधिकारी श्री. सातेलीकर, सहायक निबंधक श्री. शिंदे,उप विभागीय कृषी अधिकारी श्री.बिराजदार तसेच सहकार, वन विभाग, जलसंधारण, नेहरु युवा केंद्र व अन्य विभागाचे अधिकारी -कर्मचारीमोठया संख्येने  उपस्थित होते.













विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करावेत


उस्मानाबाद,दि.25:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस विभागाच्या https://mahaeschol.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृर्ती अर्ज ऑनलाईन प्रणालीमध्ये भरले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी दि.31 जानेवारी 2017 अखेर पर्यंत अर्ज भरावेत, विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे. 
        ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र,वय,उत्पन्न व रहिवास दाखला, मागील वर्षाचा उत्तीर्ण दाखला इत्यादी कागदपत्रे शाळा, महाविद्यालयास सादर करणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांस मिळणारी शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या  बँक खात्यावर  आणि शिक्षण फी ची रक्कम महाविद्यालयाच्या बँक खात्यावर परस्पर जमा केली जाते. अधिकृत बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यासाठी पुढील बाबीची पूर्तता विद्यार्थी, पालक यांनी त्यांच्या  शाळा, महाविद्यालयाकडे करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
         विद्यार्थ्यांचे आपल्या आधार कार्ड क्रमांकाची खात्री पटविण्यासाठी आधार कार्डची प्रत प्रस्तावासोबत जोडावी, ज्या बँकेमध्ये खाते उघडले आहे,त्या बँकेच्या खाते क्रमांकाची खात्री होण्यासाठी पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न केले असल्याबाबतचा पुरावा म्हणून बँकेकडून आधार संलग्नता केल्याबाबतची पावती सोबत जोडावी,विद्यार्थी, पालकांनी प्रस्तावासोबत आधार क्रमांक आणि बँकेशी संलग्न केल्याबाबत पुरावा जोडला आहे, अशा विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम तसेच महाविद्यालयाच्या खात्यावर शिक्षण शुल्काची रक्कम प्राधान्याने जमा केली जाईल.

            लाभार्थी विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती ही त्यांच्याच खात्यावर जमा व्हावी व त्या खात्याचा गैरवापर होऊ नये या हेतूने प्रत्येकांना आपला आधार क्रमांक हा बँकेच्या खात्याशी संलग्न करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची अनियमित्ता व बोगसगिरी करण्यास वाव राहणार नाही, जिल्हयातील सर्व विद्यार्थी, पालक व महाविद्यालयास आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपापल्या बँकेत जावून आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावेत. त्यासाठी आवश्यक तो अर्ज भरून बँकेकडे द्यावा आणि त्या पोच पावतीची प्रत आपल्या स्कॉलरशीप अर्जा बरोबर जोडावी,  ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृर्ती अर्ज ऑनलाईन प्रणालीमध्ये भरले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी दि.31 जानेवारी 2017 अखेर पर्यंत अर्ज भरावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री.शेळके यांनी केले आहे.  

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा स्वच्छतेसाठी निश्चय…!


      उस्मानाबाद,दि.25:-प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताकदिनाच्या 67 व्या वर्धापणदिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छतेची मोहिम हाती घेऊन प्रशासकीय इमारत परिसरातील  स्वच्छता करून अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून स्वच्छतेचा नवीनच पायंडा पाडला. आता इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी एक तास हे सर्व  अधिकारी व कर्मचारी स्वच्छतेकरिता श्रमदान करतील अशी प्रतिज्ञाच सर्वांनी मिळून केली आहे.
       जिल्हा माहिती  कार्यालय, उस्मानाबाद यांच्या पुढाकाराने त्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून या इमारतीमधील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी हिरारीने सहभाग नोंदवून परिसराची स्वच्छता केली.
       या स्वच्छता मोहिमेत प्रामुख्याने जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, विभागीय वन अधिकारी श्री. सातेलीकर, कार्यकारी अभियंता श्री. कांबळे, कृषी विभागाचे प्रशासकीय अधिकारी गणेश गोरे, लेखाधिकारी श्री.जोशी तसेच श्री.शहा, श्री.कुलकर्णी यांच्यासह मध्यवर्ती इमारतीतील अन्य अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन विभाग, उस्मानाबाद नगर पालिका, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम, कृषी विभाग, वन विभाग आदी विभागांनी एकत्रीत मोलाचे सहकार्य केले.

आचारसंहिता प्रमुख नियुक्त


   उस्मानाबाद,दि.25:- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यासाठी संबंधित तालुक्यातील गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांची आचारसंहिता प्रमुख म्हणून  नियुक्ती केली आहे.

          उस्मानाबाद तालुक्यासाठी गट विकास अधिकारी वर्ग–1, पंचायत समिती उस्मानाबाद, तुळजापुर तालुक्यासाठी गट विकास अधिकारी वर्ग–1, पंचायत समिती तुळजापुर, उमरगा  तालुक्यासाठी गट विकास अधिकारी वर्ग–1, पंचायत समिती  उमरगा, लोहारा  तालुक्यासाठी गट विकास अधिकारी वर्ग–1, पंचायत समिती  लोहारा, कळंब  तालुक्यासाठी गट विकास अधिकारी वर्ग–1, पंचायत समिती  कळंब, भूम तालुक्यासाठी गट विकास अधिकारी, पंचायत समिती भूम, परंडा तालुक्यासाठी गट विकास अधिकारी, पंचायत समिती परंडा, वाशी तालुक्यासाठी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, वाशी आदींची नियुक्ती तालुका आचारसंहिता प्रमुख म्हणून करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी कळविले आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी रविवारी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील


उस्मानाबाद,दि.25:- नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती सुलभ रितीने भरणे उमेदवारांना शक्य व्हावे यासाठी रविवार दि. 29 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

          राज्य निवडणूक आयोग यांनी दि.11 जानेवारी 2017 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे या कार्यक्रमात नामनिर्देशनपत्र दि.27 जानेवारी 2017 ते दि.1 फेब्रुवारी 2017 पर्यंत स्वीकारणे (दि.29 जानेवारी 2017 रविवार वगळून) बाबत सुचित केले होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती सुलभ रितीने भरणे उमेदवारांना शक्य व्हावे यासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीमध्ये सुधारणा केली असून रविवार दि. 29 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजे पर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील असे सूचित केले आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

पालकमंत्री दिवाकर रावते यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा


उस्मानाबाद,दि.25:-राज्याचे परिवहन, खारभूमी मंत्री तथा पालकमंत्री                           उस्मानाबाद  जिल्हा ना.श्री. दिवाकर रावते   हे  उस्मानाबाद  जिल्हाच्या   दौऱ्यावर  येत असून,  त्यांचा  दौरा  कार्यक्रम  पुढीलप्रमाणे  राहील-

            गुरूवार  दि. 26  जानेवारी 2017 रोजी  पहाटे 4-37 वाजता  शासकीय  विश्रामगृह  येथे  आगमन व राखीव. सकाळी 9-15 प्रजासत्ताक दिनाच्या  मुख्य  ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित. 10-15 वाजता उस्मानाबाद  येथून  मुंबईकडे प्रयाण ..

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण


उस्मानाबाद,दि.25:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवार दि.26 जानेवारी 2017 रोजी सकाळी ठीक 9 वाजून 15 मिनिटांनी मा.मंत्री, परिवहन खारभूमी विकास तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस संचलन मैदान, उस्मानाबाद येथे होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे.
 जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे  ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड.कुलदीप (धीरज) आप्पासाहेब कदम-पाटील यांच्या हस्ते सकाळी ठीक 8 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे तरी या ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) शिरीष बनसोडे यांनी केले आहे.
 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 जानेवारी 2017 रोजी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.
 नगरपरिषद प्रांगणात नगराध्यक्ष श्री. मकरंद शूरसेन राजेनिंबाळकर यांच्या हस्ते सकाळी ठीक 7 वाजून 50 मिनिटांनी  ध्वजारोहणाचा समारंभ होणार आहे.

ध्वजारोहण  समारंभास सर्वांनी समारंभ सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर राष्ट्रीय, समारंभीय पोशाखामध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे असे आवाहन जिल्हा  प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे “माहितीचा अधिकार” प्रजासत्ताक दिनापासून होणार सुरु


उस्मानाबाद, दि. 25:- मुख्‍यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाईन माहितीचा अधिकार ही सुविधा सर्व विभागीय आयुक्‍त कार्यालयात व तेथील जिल्‍हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आयुक्‍त व पोलीस अधीक्षक या कार्यालयात सुरु करण्‍यात आलेली होती .तद्नंतर दि. 26 जानेवारी 2017 पासून आता ही सुविधा उस्मानाबाद जिल्‍ह्यात देखील सुरु होत असल्‍याचे या वेबपोर्टलचे NIC चे राज्‍यसमन्‍वयक यांचेकडून कळविण्‍यात आलेले आहे. याबाबत आज जिल्हा परिषदेच्या  कै. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेस जिल्हा सूचना व विज्ञान केंद्राचे अधिकारी श्री. कोंडेकर , अतिरिक्त जिल्हा सूचना व विज्ञान केंद्राचे अधिकारी श्री. रुक्मे , अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे आणि सर्व विभागांचे  विभाग प्रमुख उपस्थित होते.
 या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना श्री. कोंडेकर म्हणाले की, ऑनलाईन माहिती अधिकार सुविधेच्‍या गतिमान अंमलबजावणीसाठी विभागात किंवा कार्यालयात प्राप्‍त होणारे ऑनलाईन अर्ज/प्रथम अपील अर्ज संबंधित जन माहिती अधिकारी, प्रथम अपिल प्राधिकारी यांना पाठविण्‍यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची समन्‍वय अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती करणे आवश्‍यक आहे, या अनुषंगाने उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा परिषद व पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नोडल ऑफीसरची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे व पुढील आवश्‍यक प्रक्रीया नोडल ऑफीसर मार्फत करण्‍यात येत आहे.
तसेच https://rtionline.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवरुन पेमेंट गेट वे च्‍या सुविधेसह, ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील सादर करता येईल. इंटरनेट बँकींग,डेबीट कार्ड,क्रेडीट कार्ड याद्वारे शुल्‍क भरणा करता येईल. या पोर्टलद्वारे केवळ भारतीय नागरीकांना महाराष्‍ट्र शासनाचे  सर्व शासकीय विभाग, सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडे माहितीचा अधिकार अर्ज, प्रथम अपील करता येईल. सद्य:स्थितीत ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज/ प्रथम अपील  करण्याबाबतची सुविधा या ऑनलाईन प्रणालीमध्ये उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी  श्री. कोंडेकर यांनी दिली आहे.
             उस्‍मानाबाद जिल्‍ह्यामध्‍ये जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा परिषद व पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी ऑनलाईन माहितीच्या अधिकाराचा वापर संबंधित शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना सुलभतेने करता यावा याकरीता जिल्‍हा सूचना विज्ञान अधिकारी व अतिरीक्‍त जिल्‍हा सूचना विज्ञान अधिकारी, राष्‍ट्रीय सुचना विज्ञान केंद्रामार्फत या तिन्‍ही कार्यालयांमध्‍ये सर्व विभागांमार्फत प्रथम अपिलीय अधिकारी/ जन माहिती अधिकारी यांना विस्‍तृत प्रकारचे तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्‍यात आले.

मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन राष्ट्रीय मतदार दिवस साजरा



          उस्मानाबाद,दि.25:- राष्ट्रीय मतदार दिवसाच्या माध्यामातून भावी मतदार असलेल्या तरूण पिढीला मतदार बनवून मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करण्याचे उदिष्ट आहे व हाच सुज्ञ भावी मतदार भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक  आहे. येथील जिल्हाधिकारी  कार्यालय व  तहसिल कार्यालयात  आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला .
                यावेळी  अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर, उपजिल्हाधिकारी सुनिल बारावकर , महाविद्यालयीन विद्यार्थी व निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
                उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यांनी आज संपूर्ण देशात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जात असल्याचे सांगून यावर्षीच्या सातव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे सक्षम करू या, युवा व भावी मतदार हे घोषवाक्य असल्याचे सांगितले. तसेच मतदार जनजागृतीसाठी निवडणूक विभागाकडून घेण्यात आलेल्या चित्रकला, रांगोळी, निबंध स्पर्धांची माहिती त्यांनी  याप्रसंगी दिली.  तसेच राष्ट्रीय मतदार दिवसाच्या आयोजनाचा उद्देश सांगून प्रत्येक नागरिकाने मतदार बनुन मतदान करण्याचे आवाहनही श्री. मुळे यांनी केले.
                राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारामध्ये जनजागृती करण्यासाठी  विविध शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांमार्फत मार्च पास करण्यात आला , नवीन मतदारांना  इपीक कार्ड , पुष्प गुच्छ देऊन यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला, परिसंवाद कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्हिडिओ व कॉम्प्युटरच्या साह्याने शिक्षित करण्यात आले, तसेच युवा मतदारांना ई.व्ही.एम. मशीनची माहिती करुन देण्यात आली  तसेच त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित  करण्यात आले , असे  उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.

                                                                                *****


Tuesday, 24 January 2017

हळदी कुंकवाचे औचित्य साधून येरमाळ्यातील महिला झाल्या “लोकराज्य” सभासद राज्यातील अशा प्रकारचा पहिला उपक्रम


उस्मानाबाद,दि.24:-  येरमाळा येथील विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन व  अन्न महोत्सवाबरोबर  या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या हळदी कुंकवाचे औचित्य साधून उपस्थित महिलांना  जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकराज्य  मासिकाचे वर्गणीदार  करुन घेण्यात आले .
विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेतील इयत्ता 4, 5 व 6 वीच्या विद्यार्थ्यांनी  अनेक वेगवेगळ्या  विषयांचे प्रदर्शन यावेळी मांडले होते. तर  इतर विद्यार्थ्यांनी  अन्न महोत्सवामध्ये वेगवेगळ्या अन्न पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते .
या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये हळदीकुंकू व तिळगूळ वाटपाबरोबरच लोकराज्य मासिकाचे अंकांचेही वाटप यावेळी करण्यात आले. तसेच श्रीमती आशा बंडगर यांनी  या कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांना  लोकराज्य मासिक देवून लोकराज्य मासिक, महान्यूज वेबपोर्टल यांचे महत्व यावेळी पटवून सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील, सूत्रसंचलन संध्या ओव्हळ यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका यू.आर.बारकुल, शिक्षिका सोनाली कुलकर्णी, संध्या काळे, उज्वला लोखंडे, जाधव, सुशिल जाधव, घोडसे, वरपे, गपाट, महामुनी सर, नितीन पाटील, संजय बांगर, किशोर कात्रे, पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे,  येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. तांबारे,  विद्यानिकेतन हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग , विद्यार्थी व त्यांचे पालक हे उपस्थित होते.

****

“बेटी बचाओ, बेटी पढाओ” कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांचा केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते सत्कार


उस्मानाबाद,दि.24:- बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या केंद्र शासनाच्या अतिशय महत्वाकांक्षी अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबाबत  देशभरातील 10 जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले. या 10 जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचाही समावेश होता. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानाचा दुसरा वर्धापन दिन तसेच ‘राष्ट्रीय बालिका दिना’चे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले. 
यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी, महिला व बाल विकास सचिव लीना नायर, रिओ पॅरा ऑलम्पिक विजेत्या दीपा मलिक, फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी, पद्मश्री गिर्यारोहक अरूनिमा सिन्हा, गिर्यारोहक रेखा चोकन या मंचावर उपस्थित होत्या. यासह दिल्लीस्थित शाळकरी विद्यार्थ्यांनी, महिला व मुलींसाठी कार्यरत गैरसरकारी संस्था, आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थांचे प्रतिनिधी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्याला कन्या भ्रूणहत्या कायदा कडक अंमलबजावणी करण्यासाठी तसेच ‘आई व शिशु नियंत्रण प्रणाली’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनात हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गंत गावातील लोक, सरपंच, आशा सेविका, एएनएम, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी यांच्या सहभागाने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलांचे शिबिर आयोजित करण्यात आले. तीन महिने गरोदर असणाऱ्या महिलांचे अंकेक्षण करण्यात आले. पुढील सहा महिन्यांपर्यंत या गरोदर महिलांना लागणाऱ्या औषधी, त्यांच्या चाचण्या शासनाच्या वतीने करण्यात आल्या. यासह गरोदर महिलांच्या कुटुंबातील सदस्यांचे मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले. यामधून जागरुकता निर्माण केली जाते. प्रसूतीनंतरचे पुढील तीन महिनेही नवजात बाळांचे अकेंक्षण केले जाते. यामध्ये नवजात बालकांना या काळात लागणारे लसीकरण केले जाते.
या संपूर्ण अभियानामध्ये जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले,तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे , प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. टी.एच.माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.जी. मुळे, , डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद गिराम ,डॉ. आर.के.गिरी,  डॉ. मंजुश्री शेळके,डॉ. चाकूरकर, डॉ. श्रीनिवास  जाधव,डॉ.संजय वाळके,डॉ. व्ही.एम. बावरे,डॉ. विवेक होळे, डॉ.विजय सूळ, तहसिलदार व्ही.जे. कडावकर, सरकारी वकील ॲड. वायबसे,ॲड. कुलकर्णी,  ॲड.पाटील,ॲड.व्ही.जी.शिंदे,ॲड.उमा गंगणे,महिला व बालविकास अधिकारी श्री.नवले, शिक्षणाधिकारी (प्राथ) सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्य) औदुंबर उकिरडे, उप शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे,डॉ. फुलारी, डॉ. पांचाळ, डॉ. मिटकरी आणि जिल्हा  कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गाडेकर  या अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.   

या अंकेक्षणाचे तीन भाग पाडण्यात आले. जास्त कन्या भ्रूणहत्या दर असणाऱ्या क्षेत्राला लाल रंग देण्यात आला आहे. त्यापेक्षा कमी कन्या भ्रूणहत्या असणाऱ्या क्षेत्राला पिवळा रंग देण्यात आला आहे आणि सर्वाधिक कमी कन्या भ्रूणहत्या असणाऱ्या क्षेत्राला हिरवा रंग देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे मुलींचा जन्मदर वाढला आहे. वर्ष 2015 मध्ये 1 हजार मुलांमागे 791 मुली होत्या हा आकडा वाढून 2016 मध्ये 904 एवढा झाला आहे.
याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील 10 कन्या भ्रूणहत्या करणाऱ्या संस्थेवर कार्यवाही करण्यात आली असून 6 लोकांना या अंतर्गंत शिक्षाही ठोठावण्यात आली  आहे.


****
*बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ* कार्यक्रम राबविण्यात *उस्मानाबाद, जळगावनं* मारली बाजी
- *मनेका गांधी* यांच्या हस्ते *दिल्लीत* पुरस्कार प्रदान 
- उस्मानाबादचे जिल्हाधिकारी *प्रशांत नारनवरे* आणि जळगावच्या जिल्हाधिकारी *रूबल अग्रवाल* यांना पुरस्कार

Monday, 23 January 2017

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


उस्मानाबाद,दि.23 :- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हयात 25 जानेवारी हा दिवस "राष्ट्रीय मतदार दिवस" दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
त्यानिमित्ताने प्रत्येक तालुक्यामध्ये 10 प्रमुख गावांमध्ये /शहर शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत रॅली काढून मतदान जागृती करून मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. शहराच्या  ठिकाणी एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांमार्फत मार्च पास करण्यात येणार आहे. जिल्हयातील शाळेमध्ये चित्रकला, रांगोळी व निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे व त्यांना मुख्याध्यापकांमार्फत प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे, नवीन मतदारांचे  इपिक कार्ड  पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात येण्यार आहे. प्रत्येक बी. एल.ओ. मार्फत नवीन मतदारांना  इपिक कार्ड वाटपाचा कार्येक्रम प्रत्येक मतदान केंद्रनिहाय घेण्यात येणार आहे, विद्यापीठस्तरावर युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मतदारांसाठी महिला वसतिगृह, अंगणवाडी, सेविका, अशा मदतनीस यांच्याकडून महिलांमध्ये मतदार नोंदणीचे  प्रमाण वाढावे  यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, स्थलांतरीत, अपंग, आदिवासी बेघर तृतीयपंथी यासारख्या विशिष्ट प्रवर्गासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याच्याकरिता नागरी सेवा संस्था शासन विभाग महामंडळ यांच्यामार्फत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आहे, यानुसार जिल्हयात सर्वत्र हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे .

तरी सर्व मतदारांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अधिकारी  प्रभोदय मुळे  यांनी  केले  आहे.

Sunday, 22 January 2017

जिल्ह्याचे पालक सचिव महेश पाठक यांनी घेतली आढावा बैठक



उस्मानाबाद.दि.22:- प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा  जिल्ह्याचे पालक सचिव  महेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेऊन  संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाच्या़ सूचना दिल्या .
या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथील पुरवठा विभागाच्या उपायुक्त श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव  यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. आढावा बैठकीत प्रारंभी  पालक सचिव महेश पाठ‍क यांनी जिल्ह्यातील खरीप 2015 मधील नुकसानीबाबत,पिक विमा योजनेत समाविष्ट असलेल्या व नसलेल्या  शेतकऱ्यांची माहिती, खरीप व रब्बी 2016 पीक कर्ज वाटप, पीक कर्ज पुनर्गठन, खरीप विमा वाटप, रब्बी हंगाम साप्ताहिक पेरणी अहवाल, हवामान व पिक परिस्थिती, जिल्ह्यातील आधार नोंदणीबाबतची सद्य:स्थिती इत्यादीबाबतची माहिती संबंधितांकडून घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. याबरोबरच जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान, पीक विमा योजना,आरोग्य पत्रिका, निश्चलनीकरण व कॅशलेस इकॉनॉमी,आधार कार्ड,सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

यानंतर पालक सचिव महेश पाठक यांनी निश्चलणीकरणामुळे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी ,  बँकेतून काढण्यात येणाऱ्या रोख रक्कमेबाबतच्या  मर्यादेत करण्यात आलेली वाढ आणि तद्नुषंगिक इतर बाबींची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निलेश विजयकर यांच्याकडून घेतली . तसेच या बैठकीनंतर पालक सचिव महेश पाठक यांनी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली.