Saturday, 11 April 2026
सामाजिक समता सप्ताहानिमित्त धाराशिव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
सामाजिक समता सप्ताहानिमित्त धाराशिव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
धाराशिव,दि.११ एप्रिल (जिमाका) सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.त्यानुषंगाने अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी तसेच जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी दि.८ ते १४ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येतो.
या सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने आज ११ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक न्याय भवन सभागृह,धाराशिव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर,विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार व गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते डॉ. संदीप तांबारे,जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ.दत्ता भोसले,डॉ. विनोद बर्वे,डॉ.क्षितिजा बनसोडे, डॉ.विनय कुलकर्णी,डॉ.महेश काळे,डॉ.सुजित नायकल,डॉ.खन्ना तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष,सचिव व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त,सचिन कवले यांनी केले.प्रमुख व्याख्याते डॉ.संदीप तांबारे,संचालक आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र, येरमाळा यांनी ज्येष्ठ नागरिकांनी या वयात तणावमुक्त जीवन कसे जगावे याबाबत मार्गदर्शन केले.डॉ.विनोद बर्वे यांनी हाडांची काळजी घेण्याबाबत,तर डॉ.विनय कुलकर्णी यांनी आयुष्मान कार्डचे महत्त्व व ते प्राप्त करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.डॉ.दत्ता भोसले यांनी मधुमेह, शुगर व रक्तदाब यांसारख्या आजारांपासून बचाव व त्यानंतर घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव महाराज अडसुळ,जिल्हा ज्येष्ठ नागरिक महासंघ यांनी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार माधवसिंह राजपुत यांनी ज्येष्ठांनी या वयात आनंददायी जीवन कसे जगावे याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात विविध ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष,सचिव व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास महाराज अडसुळ,अच्युतराव माने, माधवसिंह राजपुत,दिलीप पाटील (अध्यक्ष,ज्येष्ठ नागरिक महासंघ), अनिल पाटील,सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार समाज कल्याण अधिकारी सनम लामकने यांनी मानले.
*****
Friday, 10 April 2026
११ एप्रिल ते २० एप्रिल एमएचटी-सीईटी परीक्षा कडेकोट बंदोबस्त ; केंद्र परिसरात कलम १६३ लागू
११ एप्रिल ते २० एप्रिल
एमएचटी-सीईटी परीक्षा
कडेकोट बंदोबस्त ; केंद्र परिसरात कलम १६३ लागू
धाराशिव,दि.१० एप्रिल (जिमाका.) एमएचटी-सीईटी २०२६ ही परीक्षा दि.११ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतन,धाराशिव तसेच तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अभियांत्रिकी महाविद्यालय,सोलापूर रोड, धाराशिव या परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे.परीक्षार्थींना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
ही परीक्षा दररोज सकाळी ७.३० ते दुपारी १२ व दुपारी १२.३० ते सायंकाळी ६.४५ या वेळेत होणार आहे.परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात बाह्य उपद्रव टाळण्यासाठी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
आदेशानुसार,परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,पानपट्टी, टायपिंग सेंटर,एसटीडी बूथ,इंटरनेट कॅफे,कॉम्प्युटर सेंटर्स आदी सेवा परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय,मोबाईल फोन,सेल्युलर फोन,फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कोणत्याही वाहनांना केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना तसेच परीक्षार्थ्यांच्या नातेवाईकांनाही प्रवेश नसेल.तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, शिक्षक व परीक्षार्थी यांनाच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.हे आदेश दि.११ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील.आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
******
धाराशिव येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा
धाराशिव येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा
धाराशिव दि.१० एप्रिल (जिमाका) धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.१२) आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध बक्षिसे व पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, रोहयो मंत्री भरत गोगावले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
धाराशिव शहरातील नगर परिषदेजवळील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी सकाळी ११ वाजता हा सोहळा पार पडणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक असणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून रोहयो व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, ‘मित्रा’ (Maharashtra Institution for Transformation) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी,माजी मंत्री आ.डॉ. तानाजीराव सावंत,आ. राणाजगजितसिंह पाटील,आ. कैलास घाडगे पाटील,आ.प्रविण स्वामी तसेच माजी आ.ज्ञानराज चौगुले उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘पुण्य पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
सहकार क्षेत्रातील कार्यासाठी धाराशिव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष हभप वसंतराव नागदे,उद्योग क्षेत्रासाठी रुपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड,वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रासाठी सह्याद्री हॉस्पिटल व अंकुर शिशुगृहाचे प्रमुख डॉ.दिग्गज दापके-देशमुख,महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अर्चना माने,शिक्षण क्षेत्रातील आदर्श कार्यासाठी कसबे तडवळे (ता. धाराशिव) येथील शिक्षक बाळासाहेब जमाले, व्यसनमुक्ती क्षेत्रासाठी येरमाळा येथील श्री येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ.संदीप तांबारे, प्रगतशील शेतीसाठी तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील शेतकरी हणमंत गवळी,पोल्ट्री व्यवसायासाठी पार्डी (ता.वाशी) येथील उद्योजक विठ्ठल चौधरी तसेच आदर्श सरपंच म्हणून जकेकुरवाडी (ता. उमरगा) येथील अमर सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
याचवेळी कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे.शोधवार्ता गटात प्रथम बालाजी पांडुरंग वडजे (उमरगा), द्वितीय अमोल भास्कर मुळे (बीड),तृतीय राजहंस तुकाराम कांबळे (उदगीर,जि.लातूर) व रोशन मुल्ला (उदगीर,जि.लातूर) यांना सन्मानित करण्यात येईल.विशेष वार्ता गटात प्रथम माधव आटकोटे (नांदेड),द्वितीय रमेश अर्जुन कदम (हिंगोली),तृतीय दीपक लिंबराज बारकुल (येरमाळा, जि. धाराशिव) तसेच डॉ.रविंद्र भताने (चापोली, जि. लातूर) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक ‘पुण्य नगरी’चे जिल्हा वृत्त संपादक धनंजय रणदिवे,सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे,उपाध्यक्ष अब्बास सय्यद (भूम) व श्रीकांत कदम (तुळजापूर) यांनी केले आहे.
****
हँड्स ऑन ट्रेनिंग’मुळे खरीपासाठी सज्ज कृषी यंत्रणा नैसर्गिक शेतीवर तज्ज्ञांचा भर विशेष खरीप कार्यशाळा
हँड्स ऑन ट्रेनिंग’मुळे खरीपासाठी सज्ज कृषी यंत्रणा
नैसर्गिक शेतीवर तज्ज्ञांचा भर
विशेष खरीप कार्यशाळा
धाराशिव दि.१० एप्रिल (जिमाका) खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे.आज,१० एप्रिल २०२६ रोजी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय,धाराशिव आणि कृषी विज्ञान केंद्र,तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष खरीप कार्यशाळेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यशाळेत बीजप्रक्रिया,बियाणे उगवण क्षमता तपासणी,एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि नैसर्गिक शेती या विषयांवर क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपविभागीय कृषी अधिकारी श्री. महादेव आसलकर यांनी प्रास्ताविक करत खरीप हंगामाचे नियोजन आणि कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले.‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ (Hands-on Training) वर विशेष भर देताना त्यांनी सांगितले की,केवळ तात्विक माहिती न घेता प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण घेतल्यास अधिकारी ते ज्ञान अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतात.
तांत्रिक सत्रात कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ श्रीमती.कसबे आणि श्री. झगडे यांनी मार्गदर्शन केले.यामध्ये बीजप्रक्रिया,बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी याबाबत माहिती देत प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) अंतर्गत पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयावर जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवत उत्पादकता वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नैसर्गिक शेती तज्ञ श्री.विकास गोडसे यांनी उपस्थितांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.त्यांनी बिजामृत, जीवामृत,घन जीवामृत तसेच कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, निमार्क,अग्न्यास्त्र,ब्रम्हास्त्र आणि निमास्त्र तयार करण्याच्या पद्धतींचे सविस्तर मार्गदर्शन केले.विशेषतः त्यांनी मांडलेली ‘दहा ड्रम थेअरी’ ही उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.
या कार्यशाळेस उपविभागातील विविध अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये श्री.आबासाहेब देशमुख (तालुका कृषी अधिकारी),श्री. ज्ञानेश्वर रितापुरे,श्री.महेश देवकते, श्री.राहुल दिवाने यांच्यासह सर्व मंडळ कृषी अधिकारी,उपकृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यशाळेमुळे आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार असून,नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.
*****
सामाजिक समता सप्ताहाअंतर्गत ११ एप्रिल रोजी ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर लाभ घेण्याचे समाज कल्याणचे आवाहन
सामाजिक समता सप्ताहाअंतर्गत ११ एप्रिल रोजी ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर
लाभ घेण्याचे समाज कल्याणचे आवाहन
धाराशिव,दि.१० एप्रिल (जिमाका) सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित-दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी तसेच समाजात व्यापक जनजागृती निर्माण व्हावी,या उद्देशाने दरवर्षी ८ ते १४ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येतो.
या पार्श्वभूमीवर ११ एप्रिल २०२६ रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यासोबतच विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा तसेच ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या बिगर शासकीय संस्थांचा सत्कार व गौरवही करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम ११ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे होणार असून,जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
****
महिलांनी विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ राहणे ही काळाची गरज जि.प.अध्यक्षा अर्चना पाटील सामाजिक समता सप्ताह
महिलांनी विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ राहणे ही काळाची गरज
जि.प.अध्यक्षा अर्चना पाटील
सामाजिक समता सप्ताह
धाराशिव,दि.१० एप्रिल (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे १५० वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ ८ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान साजरा करण्यात येत आहे.या कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी,आज १० एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन, धाराशिव येथील सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती.अर्चना पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर, धाराशिव नगर परिषद नगराध्यक्षा श्रीमती. नेहा काकडे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले,महिला व आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलकर,जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती.अर्चना नरवाडे,जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अमोल बळे, व्याख्याते महेंद्र चंदनशिवे,प्रा.राजा जगताप,श्रीमती वनिता डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला मेळाव्यात जिल्हाभरातील महिला व बचत गटांच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील म्हणाल्या की,भारतीय संविधानाने महिलांना समानतेचा हक्क दिला असून आर्थिक अडचणींना खचून न जाता शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन स्वयंरोजगार निर्माण करणे आवश्यक आहे.महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करून जिल्ह्याचे नाव सर्वदूर पोहोचवावे,असे आवाहन त्यांनी केले.ग्रामीण भागातील महिलांनी अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणे ही आजची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,भारतीय संविधानातून मिळालेल्या लोकशाही,समता व समानतेच्या हक्कांमुळे महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून त्यातून नारीशक्ती अधिक सक्षम होत आहे.शिक्षणामुळे महिलांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडत असून त्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.असे त्या म्हणाल्या.
महिला व आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुखदेव चिंचोळकर यांनी सांगितले की,माविमच्या माध्यमातून २००७ पासून महिला बचत गटांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जात आहे.बचत गटांनी तयार केलेली उत्पादने ॲमेझॉनसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.सेंद्रीय शेती,महिला आरोग्य, स्त्री-पुरुष समानता आणि जीवामृत या विषयांवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ज्ञानदीप लोकसंचलित साधन केंद्र (उमरगा),समता लोकसंचलित साधन केंद्र (परंडा) आणि नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र (कळंब) या कार्यालयांना ‘नवतेजस्विनी’ प्रकल्पांतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.या पारितोषिकांचे धनादेश अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.याच कार्यक्रमात २०२५-२६ या वर्षात महिला व आर्थिक विकास महामंडळ,धाराशिव यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्याख्याते महेंद्र चंदनशिवे, प्रा.राजा जगताप,जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती.अर्चना नरवाडे, नगराध्यक्षा श्रीमती.नेहा काकडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अमोल बळे तसेच श्रीमती वनिता डोंगरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास बचत गटांच्या महिला, नागरिक,विद्यार्थी,पत्रकार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले.
******
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत धाराशिव अव्वल ठरणार जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा निर्धार
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत धाराशिव अव्वल ठरणार
जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा निर्धार
धाराशिव,दि.10 एप्रिल (जि.मा.का.) छत्रपती संभाजीनगर येथील मंथन सभागृह,एम.आय.टी.इंजिनीअरिंग कॉलेज येथे ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ या विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यशाळेत तेरा जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होते.
कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,उपमहापौर राजेंद्र जंजाळ, धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपाध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्यासह सरपंच,पंचायत समिती सभापती व विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की,“‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे केवळ अभियान नसून लोकसहभागातून उभी राहणारी व्यापक आरोग्य चळवळ आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा घरपोच उपलब्ध होतील. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे हे या अभियानाचे वैशिष्ट्य आहे. गावागावांत जनजागृती करून तपासण्यांची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे,असे सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी धाराशिव जिल्हा पूर्णपणे ‘आरोग्य संपन्न’ करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. त्या म्हणाल्या,आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शासनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण कायापालट करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. असे त्या म्हणाल्या.
या अभियानात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासोबतच ग्रामविकास, महिला व बालकल्याण, शिक्षण तसेच इतर सर्व विभागांचा समन्वय साधला जाणार असून लोकसहभागातून ही चळवळ प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
उपाध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करताना ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या माध्यमातून लसीकरण, माता-बाल संगोपन व स्वच्छता मोहिमेला अधिक गती देण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर,जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वरिष्ठ अधिकारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
ग्रामपातळीवर आरोग्य क्रांतीचा संकल्प :
कार्यशाळेत पुढील प्रमुख मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला -स्वच्छता व पाणी व्यवस्थापन, शुद्ध पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे साथीच्या आजारांना प्रतिबंध. लोकसहभाग- ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे. शंभर टक्के लसीकरण- प्रत्येक बालक व गरोदर मातेचे वेळेत लसीकरण पूर्ण करणे,कुपोषण निर्मूलन - अंगणवाडी व आरोग्य विभागाच्या समन्वयातून कुपोषणमुक्त जिल्हा घडविणे.या सकारात्मक उपक्रमामुळे धाराशिव जिल्हा ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानात आरोग्य क्षेत्रात आदर्श निर्माण करेल,असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी व्यक्त केला आहे.
****
Thursday, 9 April 2026
अमृत परिवार सर्वेक्षण अभियानाला सुरुवात : आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत योजनांचा थेट लाभ
अमृत परिवार सर्वेक्षण अभियानाला सुरुवात : आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत योजनांचा थेट लाभ
धाराशिव,दि.८ एप्रिल (जिमाका) महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचावा,यासाठी राज्यभर व्यापक स्तरावर “अमृत परिवार सर्वेक्षण अभियान” हाती घेण्यात आले आहे.
या अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात ८ एप्रिल ते २५ या कालावधीत सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे.खुल्या प्रवर्गातील ज्या समाजघटकांना इतर कोणत्याही संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही,तसेच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या उपक्रमातून विशेष प्राधान्य देण्यात येत आहे.
अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात ब्राह्मण,सिंधी,हिंदू मारवाडी, गुजराती,पटेल,राजपूत, राजपुरोहित,हिंदू नेपाळी,बनिया, कम्मा,कायस्थ,अय्यंगार,नायर, नायडू,पाटीदार,बंगाली,भूमिहार, येलमार, ठाकूर,त्यागी,सेनगुनथर, जाट,कानबी,कोमटी/वैश्य आदी समाजघटकांचा समावेश आहे.या घटकांतील विद्यार्थी,तरुण,महिला, व्यावसायिक व शेतकरी यांच्यासाठी संस्थेमार्फत विविध विकासाभिमुख योजना उपलब्ध आहेत.
सर्वेक्षणाच्या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्ष्यित कुटुंबांशी थेट संपर्क साधून माहिती संकलित करणार आहेत.तसेच विविध सामाजिक संस्था,संघटना व मंडळांकडूनही आवश्यक माहिती घेण्यात येणार आहे. संबंधित घटकांतील व्यक्ती,संस्था व संघटनांनी या कालावधीत अमृत प्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या कुटुंबाची तसेच समाजाची माहिती नोंदवावी आणि उपलब्ध योजनांची सविस्तर माहिती घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाची नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन अमृत संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : चिन्मय कुलकर्णी,जिल्हा व्यवस्थापक, अमृत,धाराशिव मो. 7391065469 यांचेशी संपर्क साधावा.
गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय सचिव भाग्यश्री पाटील सामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण
गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय
सचिव भाग्यश्री पाटील
सामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण
धाराशिव,दि.9 एप्रिल (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे 150 वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान करण्यात आले आहे.या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” अंतर्गत शासकीय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम, शिबिरे व विविध विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी आज 9 एप्रिल रोजी येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विधी व सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले,समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख हे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील पायल अतुल नन्नावरे, आदित्य दीपक कदम, स्वप्नील माने, वैष्णवी बीडबाग, निशा खुडे आणि सुमीत सावंत या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत तसेच भारत सरकारच्या इतर शिष्यवृत्ती योजनांद्वारे प्रत्येकी 45 हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. हे धनादेश श्रीमती. भाग्यश्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी विधी सेवा प्राधिकरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या लोकअदालत, मध्यस्थी केंद्र, बालस्नेही योजना, चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 व 15100 तसेच इतर विविध विधी सेवा योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच मोफत विधी सेवा सहाय हेल्पलाईन क्रमांक 15100 संदर्भातील जनजागृती करणाऱ्या भित्तीपत्रिकेचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच आदिवासी विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, राजर्षी शाहू गुणवत्ता पुरस्कार योजना, महाडीबीटी प्रणाली, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, स्वाधार योजना, स्वयंम योजना, सैनिकी शाळा शिष्यवृत्ती योजना इत्यादींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पत्रकार बांधव तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप, अतुल मुक्ते तसेच लिपिक संकेत जगताप व संकेत भोसले यांनी व परिश्रम घेतले.
*****
Wednesday, 8 April 2026
सामाजिक समता सप्ताहाची दमदार सुरुवात महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सामाजिक समता सप्ताहाची दमदार सुरुवात
महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
धाराशिव दि.८ एप्रिल (जिमाका) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाचे आज ८ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बलभीम शिंदे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने,इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अमोल ताकभाते यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपणे व पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यांनी भारतीय संविधान निर्मितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान आणि मूलभूत हक्कांविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच डॉ.आंबेडकर यांनी केलेल्या विविध चळवळी व सत्याग्रहांची माहिती देत सामाजिक समता सप्ताहाचे महत्त्व पटवून दिले.
या सामाजिक समता सप्ताहामध्ये ‘स्वाधार योजना व इतर शासकीय योजनांचे लाभ’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन दिले जाणार आहे.तसेच स्वच्छता अभियान राबवून समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.यासोबतच रक्तदान शिबिर,जयंती उत्सव,विविध स्पर्धा, सामाजिक समता रथाद्वारे प्रबोधन आणि विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांनीही सामाजिक समता सप्ताहानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी आकांक्षा कोकाटे,दीक्षा भालशंकर,मोनिका गवळी व वैष्णवी माने या विद्यार्थिनींना जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त शंकर काशिनाथ खुने, विजयकुमार गायकवाड,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त सुधाकर सगट,कैलास पवार आणि संत रोहीदास चर्मकार समाज भुषण पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे यांचा संविधानाची फ्रेम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले यांनी केले. सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
व्याख्याते व साहित्यिक भैरवनाथ कानडे आणि महेंद्र चंदनशिवे यांनी “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक भारत” या विषयावर व्याख्यान दिले.या कार्यक्रमास विद्यार्थी,विविध संघटनांचे पदाधिकारी,पत्रकार बांधव तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000
Tuesday, 7 April 2026
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह : विविध उपक्रम
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह : विविध उपक्रम
धाराशिव दि.7 एप्रिल (जिमाका) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
7 एप्रिल रोजी सामाजिक समता सप्ताहाचे नियोजन व तयारी करण्यात येणार असून,8 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे.या वेळी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक भारत याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
09 एप्रिल रोजी आर.पी. महाविद्यालय,धाराशिव येथे ‘स्वाधार योजना व इतर शासकीय योजनांचे लाभ’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.10 एप्रिल रोजी महिला मेळाव्याचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता करण्यात येणार असून, महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार आहे.
11 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन दिले जाईल. 12 एप्रिल रोजी निवासी शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, समाजातील स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.
13 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. तर 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात जयंती उत्सव,विविध स्पर्धा, सामाजिक समता रथाचे प्रबोधन तसेच विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून, सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे.
संपूर्ण सप्ताहात जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून,सामाजिक समता व बंधुता यांचा संदेश सर्वत्र पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमांतून करण्यात येणार आहे.
****
Subscribe to:
Posts (Atom)
























