Saturday, 23 September 2017

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा









         उस्मानाबाद,दि.23:- तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज तिसरी माळ.
        शनिवारी पहाटे 6 ते सकाळी 11 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 24 पासून सुरुवात होणार आहे. यात, दि.24  रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 25 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.26 रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि.27 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.28 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.
        तत्पूर्वी, काल (शुक्रवारी) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.

भाविकांना आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे  व पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा घेत आहेत.

Friday, 22 September 2017

महिला लोकशाही दिनी अर्ज करण्याचे आवाहन


उस्मानाबाद. दि.22:- भूम तालुक्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 25 सप्टेंबर 2017 रोजी तहसिल कार्यालय, भूम येथे आयोजित तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना भूम यांनी केले आहे.  
दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 25 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11 वा. तहसिलदार भूम यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात महिला लोकशाही दिन होणार आहे. या लाकेशाही दिनात आलेल्या महिलांच्या तक्रारी, अडचणी, समस्या यांची शासकीय यंत्रणेकडून प्रभावीपणे सोडवणुक करण्यात येणार आहे.तसेच पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचा अन्याय ग्रस्त व समस्याग्रस्त पिडीत महिलांनी या महिला लोकशाही दिनी उपस्थित राहुन अर्जाद्वारे आपल्या समस्या मांडून न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री.एन.एफ.राठोड यांनी केले आहे. 

केंद्रीय सैनिक बोर्डाकडे पंतप्रधान शिष्यवृतीचे अर्ज सादर करावेत

        
उस्मानाबाद. दि.22:- शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये इयता 12 वी उत्तीर्ण होऊन 2017-18 मध्ये इंजिनियरींग व मेडीकल व तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या माजी सैनिक/विधवा/अवलंबीत यांच्या पाल्यांनी केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडे पंतप्रधान शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज दि. 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत पाठविण्यात यावेत, असे  आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सु.मो. गोडबोले यांनी केले.
   या योजनेंतर्गत माजी सैनिकांच्या मुलाला रु.24 हजार व मुलीला रु.27 हजार इतकी वार्षिक शिष्यवृत्ती  देण्यात येते.
तरी शैक्षणिक वर्ष 2017-18 साठीचे पंतप्रधान शिष्यवृतीचे फॉर्म www:ksd.gov.in या संकेस्थळावरुन ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सादर करावेत. या संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करुन ईमेल आयडीवर पासवर्ड व लिंक प्राप्त झाल्यावर लॉग इन करावे, लॉग ईन करण्यासाठी फोटो, ओळखपत्र, डिस्चार्ज बुककॉलेजचे बोनाफाइड प्राचार्याचे स्वाक्षरी झालेले, बँकेचे प्रमाणपत्र-बँक मॅनेजरने स्वाक्षरी केलेले, मूळ मार्कशीट(इ.10 व 12 वी) व बँक पास बुक, लिंक केले आधारकार्ड, पी.पी.ओ, तसेच सेवानिवृत्तीनंतरचे अपत्याचे प्रमाणपत्र व शपथपत्र इत्यादी जेपीजी करुन अपलोड करावे, पंतप्रधान शिष्यवृत्तीचा फॉर्म भरुन सर्व कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड केल्यानंतर सेव्ह आणि फॉरवर्ड केल्यानंतर तो फॉर्म जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्याकडे तपासणीसाठी येईल.त्यानंतर आपण भरलेल्या फॉर्मची हार्डकॉपी काढून संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावी.फॉर्म भरण्यास अडचण आल्यास ऑनलाईन फॅार्म भरण्यासाठीचे युजर मॅन्युअल पाहण्यासाठी सर्व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध आहे. पंतप्रधान शिष्यवृत्तीबाबतची विस्तारीत माहिती www.ksb.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

तरी दि.15 नोव्हेंबर 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. माजी सैनिक/विधवा/अवलंबित यांच्या  पात्र विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. 

नवरात्र महोत्सवात प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र मीडीया कक्ष स्थापित






उस्मानाबाद, दि. 22: श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे मंगळवारी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते प्रसारमाध्यमांच्या व्हॉटसप ग्रुपवर बातमी व फोटो पाठवून मिडीया कक्षाचे उदघाटन करण्यात आले. श्रीतुळजाभवानी मंदिरातील सर्व विधी व कार्यक्रमाचे प्रसारण तात्काळ करता यावे, याकरीता अद्ययावत सुविधांसह मिडीया कक्षाची स्थापना करण्यात आली असून वेळोवेळी पत्रकारांना मंदिरातील कार्यक्रम व विधीची माहिती कक्षाद्वारे पुरविण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी हा नवरात्र महोत्सव आपल्या उस्मानाबादचीच नव्हे तर संपूर्ण राज्याची शान आहे, म्हणून प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या महोत्सवाला अधिकाधिक सकारात्मक प्रसिध्दी देऊन सहकार्य करावे, जर व्यवस्थेमध्ये काही त्रुटी आढळल्या तर अगदी हक्काने त्या त्रुटी मला निदर्शनास आणून द्याव्यात असे आवाहन उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींना केले.
या कार्यक्रमास दूरदर्शनचे कार्यक्रम निर्माता मलकराज पंचभाई, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, मंदिर संस्थानचे तहसीलदार सुनिल पवार, नगरपालिका प्रशासन अधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्यासह मोठया संख्येने पत्रकार बांधवांची तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांची  उपस्थिती होती.

प्रारंभी  जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी मीडीया कक्षाचे महत्व व त्याची उपयोगिता उपस्थितांना प्रस्तावनेतून सांगितली व शेवटी सर्व उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे आभार मानले. 

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने प्रशासन अहोरात्र सज्ज

शारदीय नवरात्र महोत्सव -2017

         उस्मानाबाद,दि.22:- श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवास महाराष्ट्रासह  तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमधून यात्रेकरु मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. या भाविकांना तत्पर सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच मंदिर संस्थानासह विविध यंत्रणा अहोरात्र काम करीत असल्याचे चित्र तुळजापूरनगरीत पाहायला मिळत आहे.
          श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांना यावर्षी बायोमॅट्रीक पध्दतीने प्रवेश दिला जात असून  भाविक आनंदाने आणि उत्साहाने शिस्तबद्धरित्या दर्शन घेत असल्याचे दृश्य दिसत आहे. राजे शहाजी महाद्वार येथून दर्शनरांग बंद करण्यात आली असली तरी धर्मदर्शन आणि मुखदर्शनासाठी स्वतंत्र दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनरांगांतील बदल भाविकांना समजण्यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत.
मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीवर जवळपास 2 हजारच्या आसपास अधिकारी-कर्मचारी वर्ग जागोजागी थांबून नियंत्रण ठेवत आहेत. मंदिर व आसपासच्या परिसराची सीसीटीवीद्वारे पाहणी केली जात असून प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
भाविकांना आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे  व पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा घेत आहेत.
 आरोग्य विभागामार्फत उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रांचा चांगल्या प्रकारे लाभ भाविक घेत आहेत. यासाठी जवळपास वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, 108 क्रमांकाच्या विशेष सुसज्ज रुग्णवाहिका तुळजापूर येथे तैनात आहेत. 
शहरामध्ये येणाऱ्या वाहनांसाठी नगरपालिकेने वेगवेगळया ठिकाणी वाहनतळ उभारल्यामुळे वाहनांच्या होणाऱ्या त्रासापासून चालणाऱ्या भाविकांची सुटका झाली आहे , एस. टी स्टॅन्डवर भाविकांच्या सोयींसाठी विशेष गाड्यांची सोय, त्याबाबतच्या सूचना ध्वनीक्षेपणाद्वारे वेळोवेळी देणे, त्यांच्यासाठी लॉकर्स, रुम्सची व्यवस्था या बाबींची व्यवस्था करण्यात  आली आहे.
          बाहेरुन येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेची, वाहतूक मार्गात केलेल्या बदलाची माहिती मिळावी,यासाठी जागोजागी विविध भाषांमधील फलकांद्वारे माहिती दिली जात आहे. मंदिर परिसर आणि शहरातही अधिकाधिक स्वच्छता राहावी, यासाठी नगरपालिका यंत्रणा अहोरात्र काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील साफसफाई करण्यासाठी तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने कर्मचारी कार्यरत असून शनिवारी महाद्वार चौक, आर्य चौक, कमानसेवा यासह अंतर्गत रस्त्यांची तसेच नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. याशिवाय उस्मानाबाद रोड वाहनतळ ते नळदूर्ग रोडवरील गोलाई तसेच लातूररोड ते धारीवाला,शिवाजी पुतळा ते हेलीपॅड आदी ठिकाणचे गवत व झुडपे काढण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. मुख्याधिकारी विजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी तुळजापूर शहर आणि मंदिर परिसर  येथे सतत लक्ष ठेवून आहेत.
          गुरुवार दिनांक 21 सप्टेबर रोजी रात्री श्री. राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत श्री तुळजाभवानी मंदिरात छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्षाळ पूजा झाली. यावेळी   अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, प्रांताधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुनिल पवार,  तुळजापूरचे तहसिलदार  दिनेश झांपले, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गोंधळी व भाविक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ. सकाळपासूनच विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ.

तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ. सकाळपासूनच विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले

Thursday, 21 September 2017

घटस्थापनेने श्रीतुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आणि शक्तिदेवता श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे मंगळवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या  यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी  करण्यात आले.












श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव -शासनाच्या विविध विभागांनी केलेली तयारी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि शक्तीदेवता श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे गुरुवारपासून धार्मिक वातावरणात प्रारंभ होत आहे. वेगवेगळया गावातूनही अनेक युवक भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी तुळजापूरकडे येत आहेत. नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर संस्थान, शासनाच्या विविध विभागांनी केलेली तयारी










श्री.तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सव

Sunday, 17 September 2017

“स्वच्छता हीच सेवा” अभियानाचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते उदघाटन संपन्न


उस्मानाबाद,दि.17: जिल्हा परिषद, उस्मानाबाद स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत "स्वच्छता हीच सेवा" हे अभियान दि. 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2017 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या प्रसंगी आयोजित स्वच्छता रॅलीला  पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचे उदघाटन आज येथे झाले.  
          यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, परिवहन विभागाचे उपमहाव्यवस्थापक मधुकर पटारे, प्रादेशिक अभियंता श्री. राठोड, विभाग नियंत्रक राजीव साळवे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण, नगरपरिषद मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, व्यवस्थापक महारुद्र गालट, तहसिलदार सुजीत नरहरे, अनिल खोचरे, दिलीप जावळे, यंत्र अभियंता श्री. बाशा, विभागीय वाहतूक अधिकारी श्री. गोंजारी, उपयंत्र अभियंता श्री. नगराळे, कामगार अधिकारी श्री. चंद्रकांत घाटगे, विभागीय अभियंता श्री. राजगिरे, श्री. पवार यांची उपस्थिती होती.  
          याप्रसंगी पालकमंत्री श्री. रावते यांच्यासह उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील परिसराची स्वच्छता केली. स्वच्छतेचे महत्व सांगून प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, असे आवाहनही श्री . रावते यांनी यावेळी  केले.  

          त्यानंतर  श्री. रावते यांनी मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी करुन बसस्थानकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तसेच काही सूचनाही केल्या. 

“महाराष्ट्र वार्षिकी 2017” चे प्रकाशन पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते संपन्न


उस्मानाबाद,दि.17:- "महाराष्ट्र वार्षिकी 2017" हा संदर्भग्रंथ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आला असून या पुस्तकामध्ये महाराष्ट्राविषयी अधिकृत, वस्तुनिष्ठ व एकत्रित माहितीचा समावेश आहे. या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दिवाकर रावते व अन्य मान्यवरांच्या हस्ते आज संपन्न झाले.
यावेळी  जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. माले, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. वडगावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चोले, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, कोषागार अधिकारी विशाल पवार, नगरपरिषद मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, तहसिलदार सुजीत नरहरे तसेच इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
या पुस्तकाबाबत बोलताना पालकमंत्री रावते यांनी हे पुस्तक नागरिकांना,विद्यार्थ्यांना,शासकीय अधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींनाही अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
या ग्रंथात महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भूमी आणि लोक, शासनाचे सर्व विभागांची महत्त्वपूर्ण माहिती,  गत वर्षातील राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी,  तसेच सर्व जिल्ह्यांची थोडक्यात माहिती आणि महत्त्वाची माहिती या सदरात मंत्रिमंडळ, विधासभा, विधानपरिषद, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीमंडळ, महत्त्वाचे निर्णय, योजना आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह हे या पुस्तकाचे  मुख्य संपादक आहेत.
राज्य शासनाच्या विविध विभागांची सविस्तर माहिती, विभागांचे उद्देश व कार्य, रचना, महत्त्वाच्या योजना, संपर्क क्रमांक व मंत्रिमंडळ निर्णय, महत्त्वाच्या शासकीय घटना, घडामोडी, उपक्रम, कार्यक्रम, पुरस्कार, महाराष्ट्राची मानचिन्हे, महाराष्ट्रातील भारतरत्न व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर, राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यपाल तसेच विधिमंडळ सदस्य आणि केंद्रीय व राज्य मंत्रीमंडळ, देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान, राज्यातील लोकसभा व राज्यसभा सदस्य याबाबतच्या माहितीचाही समावेश आहे. 

थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेतूनच मराठवाडयाचा विकास पालकमंत्री दिवाकर रावते


उस्मानाबाद,दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामात  सहभागी झालेले  उस्मानाबाद जिल्हयातील स्वातंत्र्यसैनिक  आयुष्यभर  क्रियाशील  राहिले  आणि आजही  क्रियाशील आहेत. ज्यांनी या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, आपले प्राणार्पण केले अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची  आम्हाला  सदैव जाणीव राहील. मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेमुळे मराठवाड्याचा विकास झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री. दिवाकर रावते यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या  वर्धापनादिनाच्या मुख्य  ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी केले
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी श्री. दिवाकर रावते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. माले, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. वडगावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चोले, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, कोषागार अधिकारी विशाल पवार, नगरपरिषद मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, तहसिलदार सुजीत नरहरे, अभय मस्के, राहूल पाटील, राजकुमार माने, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, विद्यार्थी, विविध विभागाचे प्रमुख, पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तीलढ्यात अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले, अनेक स्वातंत्र्य सैनिकांना निजामाचा तुरूंगवास भोगावा लागला, मात्र, हा मुक्तीदिन केवळ मराठवाड्यातच साजरा होतो. संपूर्ण महाराष्ट्राने या मुक्तीलढ्याचा सन्मान करावा, त्यासाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाप्रमाणेच 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्तीदिनी संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुटी देण्यात यावी, अशी मागणी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली असून या मुक्ती लढ्याचा शालेय पाठ्यपुस्तकांमध्येही समावेश करावा, अशीही मागणी केल्याचे श्री. रावते यांनी सांगितले.         
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान पथदर्शी उपक्रम जिल्हयात राबविला जात आहे त्याचबरोबर राज्य शासनाने आपत्ती जोखीम व्यवस्थापनासह विकास कार्यक्रम या प्रकल्पासाठी उस्मानाबाद जिल्हयाची पथदर्शी जिल्हा म्हणून निवड केली असल्यामुळे संभाव्य आपत्तीचे धोके कमी करुन विकासास चालना देण्यास मोठी मदत होणार आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.       
            प्रारंभी पोलीस पथकाकडून हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभ येथे हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री श्री. दिवाकर रावते, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख यांच्या हस्ते स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण  करण्यात आले. त्यानंतर पोलीस शस्त्र दलाने हवेत तीनवेळा बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना शस्त्र सलामी दिली.
           यावेळी श्री. रावते यांनी उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि नागरीक बंधु-भगिनींची सदिच्छा भेट घेवून त्यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चोले यांच्या हस्ते ध्वजारोहण


उस्मानाबाद,दि.17: येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.आर.चोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते