Friday, 19 July 2019

गुरुपौर्णिमेच्या दिनी लघुचित्रपट जिल्हा प्रशासनाला सुपूर्द... "बालविवाह, एक अभि:शाप" लघुचित्रपट होणार लवकरच प्रदर्शित..


वृत्त क्रमांक-458                                                     दि.19 जुलै 2019
गुरुपौर्णिमेच्या दिनी लघुचित्रपट जिल्हा प्रशासनाला सुपूर्द...
"बालविवाह, एक अभि:शाप" लघुचित्रपट होणार लवकरच प्रदर्शित..

उस्मानाबाद,दि.19:- जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीच्या पुढाकाराने, जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मन पिळवटून टाकणारी बाल-विवाह ही अनिष्ट प्रथा कायमस्वरूपी नष्ट करण्याहेतू उमरगा शहरातील सोशल मीडिया महामित्र तथा बालविवाह प्रतिबंध समिती सदस्य सचिन बिद्री यांनी अथक परिश्रमातून बनविलेल्या बालविवाह, एक अभि:शाप या लघुचित्रपटाची निर्मिती करून दि. 16 जून गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित करण्यास पूर्णपणे तयार फिल्म ची सी.डी.,महिला आणि बालकल्याण विकास अधिकारी अशोक सावंत,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांना हस्तांतरित केले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
          बालविवाह होण्याची कारणे,यास बळी पडलेल्या पीडितांची दुर्दशा,बालविवाहाचे दुष्परिणाम,एक मुलगी आपल्यातील जिद्द आणि चिकाटीच्या जाेरावर किती उत्तुंग भरारी मारू शकते आणि ती आपल्या वंशाचा दिवा कशी ठरते, हे या लघुचित्रपटामध्ये  सहजगत्या  मांडले आहे.
        जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ-मुंडे यांच्या उत्स्फूर्त मार्गदर्शनाखाली,अप्पर जिल्हाधिकारी तथा बालविवाह प्रतिबंध समितीचे अध्यक्ष पराग सोमण यांच्या संकल्पनेतून या चित्रपटाची निर्मिती झाली आहे.
          या चित्रपट निर्मितीसाठी प्रेरणा व मोलाचे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत यांनी वेळोवेळी केल्याने चित्रपट अगदी सहजरित्या आणि भावनिक,हृदयस्पर्शी, वस्तुस्थितीदर्शक बनलाआहे.
     या हृदयस्पर्शी चित्रपटाचे चित्रीकरण उमरगा तालुक्यातील कुन्हाळी गावात,छत्रपती शिवाजी महाविद्यालय,जिल्हा परिषद प्रशाला,आणि अँड प्रवीण तोतला यांचे कार्यालय येथे झाले असून यातील सर्व कलाकार उमरगा शहारातीलच असून मुख्य भूमिकेत बालकलाकार म्हणून गौरी सचिन बिद्री,मुक्ताई साठे,आकांशा कांबळे,भक्ती आष्टे,प्रा.युसूफ मुल्ला,छत्रपती शिवाजी महाविद्यालय चे प्राचार्य घन:श्याम जाधव,रोटरी क्लब अध्यक्ष देवरकर,ऍड प्रवीण तोतला,अमोल पाटील,संजीव विभूते,शैलेश महामुनी,वैशाली कैलास आष्टे,अश्विनी घोडके, नाट्य कलाकार संजय कोथळीकर यांनी अभिनय केला आहे.
      कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शन सचिन बिद्री यांनी केले असून चित्रीकरण उमरगा शहरातील ड्रीम क्रिएशन यांनी साकारले आहे.डबिंग, पार्श्वसंगीत, स्पेशल इफेक्टचे कार्य ntv न्यूज मराठी वृत्तवाहिनी स्टुडिओ,अहमदनगर येथे करण्यात आले आहे.
      यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनीही वेळोवेळी सहकार्य केले.

*****








वृत्त क्रमांक-459                                                     दि.19 जुलै 2019

पुलंच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज्य शासनामार्फत
स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन

उस्मानाबाद, दि. 16 :-  महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून राज्य शासनामार्फत पुलंच्या जन्मशताब्दी निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांर्गत स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. पुल यांच्या साहित्यावर आधारित स्टँड  अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे.
    मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्ये केंद्रावर पात्र ठरणाऱ्या निवडक विजेत्यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील विनोदी कलावंतांचे टॅलेंट हंट करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने राज्य शासन करणार आहे. दि. 16 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातून जिल्हास्तरीय फेऱ्यांना सुरुवात झाली असून, प्रत्येक केंद्रावरील विजेत्याला 20,000/- आणि उपविजेत्याला 15,000/- अशी रोख स्वरुपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 आणि दुपारी 3.00 ते सायंकाळी 7.00 या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या कार्यक्रम स्थळाजवळील वेळापत्रकाप्रमाणे एक दिवस अगोदर 7506848055 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 2 मिनिटांचे सादरीकरण चित्रित करून पाठवायचे आहे. यातून निवड करण्यात आलेल्या स्पर्धकाला केंद्रावर 5 ते 8 मिनिटे सादरीकरण करावयाचे आहे. या स्पर्धेचा सोहळा येत्या 25 ऑगस्ट रोजी पुणे येथील गणेश कला क्रिडा मंच येथे रंगणार आहे.
    विनोद हा पुलंच्या साहित्याचा अविभाज्य भाग आहे. समाजातील माणसांच्या वृत्तींवर आपल्या खुमासदार शैलीत पुलं.नी कायम भाष्य केले. स्टँड अप कॉमेडी ही स्पर्धा देखिल अशाच स्वरुपाची होणार आहे. एखाद्या वृत्तीवर, माणसाच्या स्वभावावर दैनंदिन व्यवहारी जीवनात घडणाऱ्या प्रसंगांवर मिश्कील टिप्पणी करत त्यातील विनोद सर्वांसमोर आणण्याचा प्रकार अनेक स्टँड अप कॉमेडियन करतात. सध्या तरुणाईत हा प्रकार अत्यंत लोकप्रिय होत आहे याच धर्तीवर पुलंचे साहित्य अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित केली आहे. या स्पर्धेदरम्यान सर्व जिल्हा केंद्रावर पु.ल. जत्रोत्सवही आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून पुलंचे साहित्य, त्यांची भाषणे, त्यांचे कार्यक्रम अनुभवण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.
    या संपूर्ण उपक्रमाचे प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनीवरून केलेजाणार असून कलावंतांची कला महाराष्ट्रभर पोहोचावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विनोदी कलावंतांना राज्यस्तरीय व्यासपीठ देण्याच्या हेतूने ही स्पर्धा राबवण्यात येत आहे. या स्पर्धेस भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

****








वृत्त क्रमांक-460                                                     दि.19 जुलै 2019

दि.26 जुलै ला 20 वा कारगिल विजय दिवस होणार साजरा
नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 
उस्मानाबाद,दि.19:-  कारगिल युद्धात(ऑपरेशन विजय) मिळालेल्या विजयास दि. 26 जुलै  2019 रोजी 20 वर्ष पूर्ण होत असून कारगिल विजयाचा 20 वा विजय दिवस कारगिल विजय दिवस म्हणून दि. 26 जुलै 2019 रोजी साजरा करण्यासाठी सकाळी आठ ते नऊ वाजता शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी तसेच सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी जिल्‍हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते नगर परिषद  येथील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण व पुष्पांजली वाहण्यात येणार आहे.
            तरी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
****
वृत्त क्रमांक-461
प्रिती रमेश दुधंबे बेपत्ता आहे
कोणालाही दिसल्यास किंवा सापडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा

उस्मानाबाद,दि.19:- प्रिती रमेश दुधंबे, वय वर्ष 18  ही दि. 15 जुलै 2019 पासून सकाळी साडेदहाच्या सुमारास घरातून कोणासही काहीही न सांगता निघून गेली आहे. सावळा वर्ण, मराठी हिंदी भाषिक, काळी जीन्स पॅंट  व पांढरा टॉप घातलेले, काळे लांब केस,  पाच फूट उंची, उभट चेहरा, हनुवटीवर तीळ, शिक्षण बारावी, मध्यम शरीरबांधा अशा वर्णनाची मुलगी कोणालाही दिसल्यास किंवा सापडल्यास तात्काळ आनंदनगर पोलीस स्टेशन,उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
****
वृत्त क्रमांक-462

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत संबंधित
शेतकऱ्यांनी सोडतीस उपस्थित राहाण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.19:- उस्मानाबाद तालुक्यात उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत सन 2019-20 करिता विविध योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांचे जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले होते.
उस्मानाबाद तालुक्यातून प्राप्त झालेल्या अर्जांची जेष्ठता यादी तयार करण्यासाठी दि. 24 जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी ,उस्मानाबाद  या कार्यालयात सकाळी दहा वाजता सोडत काढण्यात येणार आहे.
तरी संबंधित शेतकऱ्यांनी या सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.जी. देशमुख यांनी केले आहे.
****

Thursday, 18 July 2019

जलसंधारण मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा


वृत्त क्रमांक-457                                                     दि.18 जुलै 2019

जलसंधारण मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

उस्मानाबाद,दि.18:-जलसंधारण मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा शुक्रवार दि. 19 जुलै 2019 रोजी सकाळी 7.00 वाजता जयवंत निवासस्थान कात्रज रोड पुणे येथून मोटारीने सोनारी ता परांडा जि उस्मानाबाद कडे प्रयाण. दुपारी 11.00 वाजता सोनारी ता. परांडा जि. उस्मानाबाद येथे आगमन व श्री भैरवनाथ दर्शन दुपारी 11.30 वाजता मुगाव ता. परंडा येथे ग्रामस्थांशी चर्चा दुपारी 12.00 वाजता परांडा शिवसेना कार्यालयात भेट दुपारी 1.00 वाजता कार्यकर्ता मेळावा व जाहीर नागरी सत्कार, स्थळ:- परांडा दुपारी 2.30 वाजता परांडा येथून ता. भूम कडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता भूम येथे आगमन व भूम तालुका पक्ष कार्यकर्ता मेळावा व सत्कार स्थळ:- रेपाळ मंगल कार्यालय भूम दुपारी 4.30 वाजता भूम येथून ता. वाशी कडे प्रयाण. सायंकाळी 6.00 वाजता वाशी येथे आगमन. व पक्ष कार्यकर्ता मेळावा व जाहीर सत्कार (स्थळ अन्नपूर्णा मंगल कार्यालय वाशी) सायंकाळी 7.30 वाजता भूम येथील श्री. चेतन बोराडे यांच्या स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती सायंकाळी 8.00 वाजता वालवड ता. भूम येथील शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन रात्री 9.00 वाजता भैरवनाथ शुगर फॅक्टरी सोनारी कडे प्रयाण. रात्री 09:25 वाजता सोनारी येथे आगमन व मुक्काम शनिवार दि. 20 जुलै 2019 रोजी सकाळी 9.00 वाजता सोनारी ता. परांडा येथून मोटारीने ता. वाशी कडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता वाशी येथे आगमन व पक्ष कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती दुपारी 12.00 वाजता वाशी येथून तुळजापूरकडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता तुळजापूर श्री क्षेत्र तुळजा भवानी मंदिर येथे आगमन व श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन दुपारी 1.30 वाजता तुळजापूर येथे उस्मानाबाद पक्ष कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक दुपारी 2.30 वाजता तुळजापूर येथून कळंब ता उस्मानाबाद कडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता कळंब येथे आगमन व पक्ष कार्यकर्ता आढावा बैठकीस उपस्थिती दुपारी 5.00 वाजता कळंब ता उस्मानाबाद येथून ता बार्शी जिल्हा सोलापूर कडे प्रयाण

*****