Saturday, 1 August 2026
अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न
अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ
भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न
धाराशिव,दि.१ ऑगस्ट (जिमाका) परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तातडीने निपटारा व्हावा आणि शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात,या उद्देशाने भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आज शनिवारी १ ऑगस्ट रोजी रामहारी मंगल कार्यालय,नगर रोड,भूम येथे उत्साहात पार पडले.या शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला.तर विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी १४३ लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले.
कार्यक्रमास भूमच्या नगराध्यक्षा श्रीमती.संयोगीता गाढवे,भूम पंचायत समितीच्या सभापती श्रीमती.पूजा ढगे,जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती.जयश्री काळे व विजयमाला मारकड, पंचायत समिती सदस्या श्रीमती श्रीलता लोखंडे,उपविभागीय अधिकारी श्रीमती ज्योती चौहान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून शिबिरास सुरुवात झाली.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा श्रीमती.संयोगीता गाढवे म्हणाल्या, प्रशासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असल्यास शासकीय योजनांचा लाभ योग्य पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो.
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित समाधान व महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळत असून,शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रभावी उपक्रम आहे.या शिबिरातून विविध योजनांचा ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना थेट लाभ देता आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
शिबिरामध्ये नगर परिषद,आरोग्य विभाग,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,भूमी अभिलेख, वन विभाग,महिला व बाल विकास विभाग,एकात्मिक बाल विकास सेवा योजना,तालुका कृषी अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय,आरटीओ/वाहतूक शाखा,पोलीस विभाग, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ,पोस्ट कार्यालय,राज्य मार्ग परिवहन महामंडळ,स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच तहसील कार्यालय आदी विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविला.विविध शासकीय योजनांची माहिती,प्रत्यक्ष लाभ तसेच अर्ज स्वीकारण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.
शासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या दारी शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमचे तहसीलदार जयवंत पाटील यांनी केले,तर परंडा तहसीलदार निलेश काकडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
******
Friday, 31 July 2026
‘नशा मुक्त युवा – विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात विद्यालय-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
‘नशा मुक्त युवा – विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात
विद्यालय-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
धाराशिव,दि.३१ जुलै (जिमाका) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @२०४७’ या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेला साकार करण्यासाठी युवकांना व्यसनमुक्त, सुदृढ,सक्षम आणि राष्ट्राभिमानी बनविण्याच्या उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारअंतर्गत ‘मेरा युवा भारत (MY Bharat)’ मार्फत देशभर ‘नशा मुक्त युवा – विकसित भारत’ हे राष्ट्रीय अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत मेरा युवा भारत,धाराशिव आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), तुळजापूर कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार,दि.३० जुलै रोजी टीआयएसएस तुळजापूर कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन टीआयएसएस तुळजापूर कॅम्पसचे संचालक प्रा. बाळ राक्षसे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर मार्गदर्शनात त्यांनी युवकांना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की,देशाच्या इतिहासात क्रांतिकारी आणि विकासात्मक कार्य करणाऱ्या अनेक महापुरुषांनी आपल्या तारुण्यातच समाजाला दिशा दिली.स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी युवा शक्तीच्या बळावर राष्ट्रनिर्मितीचे कार्य घडविले.त्यामुळे आजच्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्राच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा.व्यसनमुक्त, चारित्र्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित युवा शक्ती हीच विकसित भारताची खरी ताकद असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
प्रास्ताविकात मेरा युवा भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी श्री.करंजकर यांनी ‘नशा मुक्त युवा – विकसित भारत’अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट केली.व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग,सामाजिक जनजागृती आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे सांगितले.
टीआयएसएस तुळजापूरचे वरिष्ठ सहाय्यक प्रा.तथा विद्यार्थी व्यवहार विभागाचे अध्यक्ष डॉ.संपत काळे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनशैली,मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून दिले.शिक्षणाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणारी युवा पिढीच समाजपरिवर्तन घडवू शकते,असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रम समन्वयक गणेश चादरे यांनी आपल्या मनोगतात ‘युवा’ या शब्दाची आगळीवेगळी व्याख्या मांडली.‘युवा’ हा शब्द उलटा वाचला तर ‘वायु’ होतो.वायु जसा जीवनदायीही असतो आणि युवकांच्या शक्तीला विधायक दिशा देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये संगीत (लोकगीत),नृत्य,पथनाट्य/मूकनाट्य,चित्रकला,वादविवाद, लघुपट/रील,घोषवाक्य लेखन आणि स्लॅम पोएट्री या आठ प्रकारांचा समावेश होता.सर्व स्पर्धांमधून विविध कला माध्यमांच्या साहाय्याने व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नरेंद्र आर्य विद्यालय व महाविद्यालयाचे प्राचार्य जयराज सूर्यवंशी तसेच श्रीमती.ललिता पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश चादरे, सतीश वड,वैभव लांडगे,रवी सुरवसे,प्रवीण माने,शंकर ठाकरे, डॉ.जेसिका घाटोडे,डॉ.अश्विनी पांढरे,जान्हवी पांढरे आणि श्री. नितीश कुमार यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार सतीश वड,समुपदेशक तथा कार्यक्रम समन्वयक यांनी मानले.व्यसनमुक्त भारताच्या संकल्पनेला युवकांनी सकारात्मक प्रतिसाद देत विविध सांस्कृतिक माध्यमांतून प्रभावी संदेश दिल्याने या जिल्हास्तरीय स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
*******
खरीप २०२६ राज्यांतर्गत पिकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन
खरीप २०२६ राज्यांतर्गत पिकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन
धाराशिव,दि.३१ जुलै (जिमाका) राज्यातील विविध भागांतील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून घेतलेल्या विक्रमी उत्पादनाला प्रोत्साहन देणे,त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि इतर शेतकऱ्यांनाही त्यातून प्रेरणा मिळावी,या उद्देशाने राज्य शासनामार्फत दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविली जाते. यंदाच्या खरीप हंगाम २०२६ पासून या स्पर्धेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून,शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरून अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.
यापूर्वी पिकस्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविली जात होती.मात्र,प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या उद्देशाने यंदापासून स्वतंत्र ऑनलाइन संगणक प्रणाली (ऑनलाइन पोर्टल) विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार कृषी विभागाने सन २०२६-२७ साठी अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांच्या राज्यस्तरीय खरीप पिकस्पर्धा जाहीर केली आहे.
या स्पर्धेत सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात.
तालुकास्तरावरील स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या आधारे राज्य,जिल्हा आणि तालुकास्तरावरील विजेत्यांची निवड केली जाणार आहे.खरीप हंगामातील भात, ज्वारी,बाजरी,मका,नाचणी (रागी), तूर,मूग,उडीद,सोयाबीन,भुईमूग आणि सूर्यफूल या एकूण ११ पिकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सहभागी लाभार्थ्याच्या शेतामध्ये भात पिकासाठी किमान २० गुंठे, तर इतर सर्व पिकांसाठी किमान ४० गुंठे सलग लागवड क्षेत्र असणे आवश्यक आहे.स्पर्धेसाठी अर्ज करताना फार्मर आयडी,प्रवेश शुल्क भरल्याचे चलन,आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र तसेच बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याच्या अंतिम तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. मूग आणि उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै २०२६ होती.ती आता १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर भात,ज्वारी,बाजरी,मका,नाचणी (रागी), तूर,सोयाबीन,भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे.स्पर्धेचे प्रवेश शुल्क पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये,तर आदिवासी गटासाठी १५० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
बक्षिसांची रक्कम तालुका,जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर देण्यात येणार आहे.
तालुकास्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. जिल्हास्तरावर अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये,तर राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये,द्वितीय क्रमांकासाठी ४० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील "पीक स्पर्धा नोंदणी" या टॅबद्वारे ऑनलाइन अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.तसेच स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
******
पराक्रम दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धा थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त १ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यभर विविध उपक्रम ; विद्यार्थी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
पराक्रम दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धा
थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त
१ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यभर विविध उपक्रम ; विद्यार्थी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
धाराशिव,दि.३१ जुलै (जिमाका) महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य,पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचा परिचय नव्या पिढीला व्हावा,या उद्देशाने यंदा १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय निबंध,वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
पराक्रम दिनाच्या आयोजनासाठी अमृत संस्थेमार्फत ‘पराक्रम दिन समिती’ स्थापन करण्यात आली असून,त्यामध्ये इतिहास अभ्यासक व तज्ज्ञ काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे,जगन्नाथ लडकत,मोहन शेटे,मंगेश खाडिलकर आणि सौ.कौमुदी परांजपे यांचा समावेश आहे.या निमित्ताने शाळा,महाविद्यालये तसेच खुल्या गटातील नागरिकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून,जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.
निबंध स्पर्धा (शालेय, महाविद्यालयीन व खुला गट)
निबंध स्पर्धेसाठी शालेय, महाविद्यालयीन आणि खुला असे तीन गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकांनी कमाल १,००० शब्दांपर्यंतचा निबंध मराठी,हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टाइप करून पीडीएफ स्वरूपात अपलोड करावा.निबंधासाठी आवश्यक संदर्भ अमृत पराक्रम दिनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील लिंक, संदर्भ पुस्तके आणि माहिती पुस्तिकेवर आधारित असावेत. बक्षीसपात्र निबंधांबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
वक्तृत्व स्पर्धा (शालेय, महाविद्यालयीन व खुला गट)
वक्तृत्व स्पर्धेतही शालेय, महाविद्यालयीन आणि खुला असे तीन गट आहेत.
स्पर्धकांनी स्वतःच्या आवाजातील जास्तीत जास्त सात मिनिटांचा मूळ व्हिडिओ सादर करणे अपेक्षित आहे.व्हिडिओ स्पष्ट आवाजातील, उत्तम दर्जाचा आणि पूर्णपणे ओरिजिनल असावा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्हिज्युअल इफेक्ट्स,साऊंड इफेक्ट्स,एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) जनरेटेड प्रतिमा किंवा तत्सम साधनांचा वापर करता येणार नाही. विषयासाठी आवश्यक संदर्भ अमृत पराक्रम दिनाच्या संकेतस्थळावरील अधिकृत साहित्यावर आधारित असावेत.नियमांचे पालन करून तयार केलेला व्हिडिओ संकेतस्थळावर अपलोड करावा. बक्षीसपात्र व्हिडिओबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
रिल्स स्पर्धा (महाविद्यालयीन व खुला गट) रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धकांनी दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर २ ते ३ मिनिटांची रिल्स किंवा शॉर्ट्स तयार करावीत. चित्रीकरणासाठी विषयाला अनुरूप ठिकाण,स्पष्ट व्हिडिओ आणि उत्तम ध्वनी गुणवत्ता असणे आवश्यक आहे.रिल्स स्वतःच्या आवाजात आणि स्वतःवर चित्रित केलेली असावी.मूळ विषयाच्या संदर्भानुसार आवश्यक असलेल्या प्रतिमा, ध्वनी किंवा एआयचा वापर करून मिक्सिंग करण्यास परवानगी असेल.
सहभागाची मुदत व संकेतस्थळ स्पर्धांसाठी प्रवेशिका स्वीकारण्याचा कालावधी १ ते १५ ऑगस्ट २०२६ असा आहे.स्पर्धेचे स्वरूप,विषय,बक्षिसे,नियमावली तसेच सहभाग नोंदणीची सविस्तर माहिती पराक्रम दिनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संदर्भ पुस्तके व ई-बुकची सुविधा
थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित शेकडो पुस्तके उपलब्ध असली तरी या स्पर्धांसाठी आवश्यक असलेली निवडक संदर्भ पुस्तके पराक्रम दिन समितीने निश्चित केली असून त्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.तसेच थोरले बाजीराव पेशवे यांचा जीवनप्रवास सोप्या आणि संक्षिप्त स्वरूपात ई-बुकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याच आधारे प्रश्नावली तयार करण्यात आली आहे.
स्पर्धांसाठी समान विषय
निबंध,वक्तृत्व आणि रिल्स या तिन्ही स्पर्धांसाठी पुढील विषय समान असतील : ‘१८व्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे’, ‘अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे’,‘थोरल्या बाजीरावांचे संघटन कौशल्य’, ‘थोरल्या बाजीरावांची युद्धनीती’, ‘थोरल्या बाजीरावांची स्वामीनिष्ठा’,‘थोरल्या बाजीरावांची दिल्ली मोहीम’,‘बुंदेलखंड व छत्रसालाचे रक्षणकर्ते थोरले बाजीराव पेशवे’ आणि ‘थोरल्या बाजीरावांचा जगप्रसिद्ध पालखेड विजय’.सर्व शाळा,महाविद्यालये तसेच इच्छुक नागरिकांनी या राज्यस्तरीय उपक्रमात उत्साहाने सहभागी होऊन थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्यपर परंपरेचा गौरव करण्याचे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.
*****
Thursday, 30 July 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अटी, लाभ व आधार प्रामाणिकरणची सविस्तर माहिती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अटी, लाभ व आधार प्रामाणिकरणची सविस्तर माहिती
धाराशिव,दि.30 जुलै (जिमाका) राज्य शासनाने दि. 02 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना जाहीर केली.या योजनेमध्ये खालीलप्रमाणे तीन घटक आहेत.
कर्जमाफी-कर्जवाटप दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025,थकबाकी दिनांक : 30 सप्टेंबर 2025, कर्जबाकी दिनांक 31 मार्च 2026, कर्जमाफी रक्कम रुपये दोन लाख.एकवेळ समझोता योजना OTS कर्जवाटप दिनांक: 01 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025, थकबाकी दिनांक 30 सप्टेंबर 2025, कर्जबाकी दिनांक 31मार्च 2026, कर्जमाफी रक्कम-रुपये दोन लाखावरील रक्कम शेतकऱ्याने बँकेत जमा केल्यानंतर कर्जमाफी रुपये दोन लाख,प्रोत्साहनपर लाभः सन 2022-23, 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षी पीक कर्जाची उचल करुन विहित मुदतीत परतफेड आवश्यक. तसेच सन 2025-26 मधील पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये दोन लाखावरील रक्कम दि.31 मार्च 2027 पर्यंत बँकेत जमा करावयाची आहे.
या योजनेमध्ये रुपये दोन लाखापेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या शेतकरी रुपये दोन लाखावरील रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत बँकेत जमा करावयाची आहे.या योजनेमध्ये 01 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचल केलेले पीक कर्ज तसेच पुनर्गठन / फेरपुनर्गठन केलेल्या पीक कर्जाचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे हे पीक कर्ज तसेच पुनर्गठित / फेरपुनर्गठित कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेरची थकबाकी 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड झालेली नाही,अशी रक्कम कर्जमाफीसाठी विचारात घेण्यात आली आहे.या योजनेची अंमलबजावणी महा-आयटी मार्फत विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे.
शासनाने दि.9 जून 2026 रोजी सर्व व्यापारी बँकांना पत्र देऊन अनुत्पादित वर्गवारीत खात्यांना विशिष्ठ प्रमाणात सवलत (Haircut) देण्याबाबत निर्देश दिले आहेत.त्याचप्रमाणे शासनाने 01 जुलै 2026 रोजी सर्व बँकांना पत्र देऊन 01 एप्रिल 2026 नंतर योजनेअतंर्गत शेतक-यांच्या कर्जखात्यावर व्याजाची आकारणी न करण्याबाबत निर्देश दिले आहेत.शासनाने अनुत्पादित कर्जखात्यांबाबत बँकांनी पुढीलप्रमाणे सवलत देण्याबाबत सूचित केले आहे.
अनुत्पादित कर्जाचा दिनांक 30 सप्टेंबर 2021 किंवा त्यापुर्वी, तडजोडीची रक्कम अनुत्पदित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 35 टक्के,अनुत्पादित कर्जाचा 01 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 तडजोडीची रक्कम अनुत्पदित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 45 टक्के, अनुत्पादित कर्जाचा दिनांक 01ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 तडजोडीची रक्कम अनुत्पदित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 55 टक्के,अनुत्पादित कर्जाचा दिनांक 01 ऑक्टोबर 2023 ते 30सप्टेंबर 2024 तडजोडीची रक्कम अनुत्पदित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 70 टक्के,अनुत्पादित कर्जाचा दिनांक 01ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 तडजोडीची रक्कम अनुत्पदित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 85 टक्के अशी राहील.
बँकेमार्फत सादर केलेल्या कर्जखात्यांचे महा-आयटी मार्फत योजननिकषांनुसार संगणकीय संस्करण तसेच वर नमूद केल्याप्रमाणे अनुत्पादीत कर्ज खात्यांना सवलत देण्यात येऊन 25 जुलै 2026 रोजी एकूण 16.96 लाख कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिध्द करण्यात आले आहे.यामध्ये मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील 7.03 लाख कर्जखाती व व्यापारी बँकांकडील 9.93 लाख कर्ज खात्यांचा समावेश आहे.
प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमध्ये रुपये दोन लाखापर्यंत थकबाकी असलेल्या कर्जखात्याचा सामावेश आहे.उर्वरित कर्जखात्याचा सामावेश त्याचप्रमाणे रुपये दोन लाखावरील कर्जखात्याचा सामावेश यानंतर प्रसिध्द होणा-या याद्यामध्ये करण्यात येणार आहे.आधार प्रमाणीकरणावेळेस शेतकऱ्यांना कर्ज खात्याचा क्रमांक तसेच कर्ज रकमेच्या अचूकतेबाबत तथा मान्यतेबाबत कार्यवाही करावयाची आहे.
आधारप्रमाणीकरणासाठी प्रसिध्द केलेली यादी योजनेच्या प्रणालीवर,बँक शाखेमध्ये तसेच जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यांचेकडे उपलब्ध असून सदरची यादी गावस्तरावर,बैंक शाखा,विकास संस्था तसेच ग्रामपंचायत यांच्या नावासमोरदिसणाऱ्या यादीमध्ये शेतकऱ्यांच्या चावडीवर प्रसिध्द करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी बँकेच्या यादीतील रक्कम त्याचप्रमाणे प्रणालीवरील रक्कम पाहून आधारप्रमाणीकरण करावयाचे आहे.गावस्तरावर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमध्ये दिसत असलेली रक्कम वर नमूद केल्याप्रमाणे अनुत्पादीत कर्ज खात्यास निर्देशीत प्रमाणात सवलत आकारुन आलेली तडजोड रक्कम आहे.शासनाच्या निर्देशाप्रमाणे बँकांकडून 01 एप्रिल 2026 नंतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर त्यामुळे याबाबत स्पष्ट करण्यात येते की,व्याजाची आकारणी होणार नाही.25 जुलै 2026 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीतील रुपये दोन लाखापर्यतची रक्कम शासनामार्फत माफ करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम बँकेत भरावी लागणार नाही.
आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्यांना द्यावयाच्या कर्जमाफीची रक्कम निश्चित होऊन ही रक्कम थेट लाभ वितरण पध्दतीने शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करुन कर्ज खाते निरंक करण्यात येणार आहे.तर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्जाची उपलब्धता होणार आहे.
000000
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी
धाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) आणि बावी येथील आपले सरकार सेवा केंद्रांना भेट देऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार यांच्यासमवेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पांडुरंग साठे तसेच धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव उपस्थित होत्या.
अधिकाऱ्यांनी केंद्रावरील आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली,कामकाजाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना कोणताही मनस्ताप होणार नाही, प्रक्रिया सुरळीत,पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण व्हावी, यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आधार प्रमाणीकरण हा महत्त्वाचा टप्पा असून,प्रशासनाकडून त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः गावात जाऊन सेवा केंद्रांच्या कामकाजाची पाहणी केल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, लाभ वितरणाची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
*******
तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत
तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत
धाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत करण्यात आले.
राज्यपाल श्री.वर्मा यांचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनीही पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचे स्वागत केले.
यानंतर जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी शासकीय विश्रामगृहात राज्यपालांचा शाल,श्रीफळ, कवड्याची माळ,पुस्तक तसेच श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.
या प्रसंगी राज्यपालांचे प्रधान सचिव डॉ.प्रशांत नारनवरे,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,अपर पोलीस अधीक्षक श्री.पांडकर,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता संजय आडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.भंडे,तहसीलदार अरविंद बोळंगे,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक श्रीमती.माया माने यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर १ ऑगस्टला भूम येथे आमदार डॉ.तानाजी सावंत उद्घाटक, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील प्रमुख पाहुण्या
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर १ ऑगस्टला भूम येथे
आमदार डॉ.तानाजी सावंत उद्घाटक, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील प्रमुख पाहुण्या
धाराशिव दि.३० जुलै (जिमाका) परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तातडीने निपटारा करण्याच्या उद्देशाने भूम- परंडा- वाशी विधानसभा मतदारसंघस्तरावरील 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' शनिवार,दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता रामहारी मंगल कार्यालय, नगर रोड,भूम येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिबिराचे उद्घाटन आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत,विधानसभा सदस्य, परंडा विधानसभा मतदारसंघ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.अर्चनाताई पाटील अध्यक्षा,जिल्हा परिषद,धाराशिव उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास लोकसभा सदस्य खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तसेच बसवराज पाटील विधान परिषद सदस्य,विक्रम काळे विधान परिषद सदस्य,सतीश चव्हाण विधान परिषद सदस्य,सौ.संयोगिता गाढवे नगराध्यक्षा,नगर परिषद भूम,कीर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी, धाराशिव,प्रियवंदा म्हाडदळकर मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव,रितू खोखर, पोलीस अधीक्षक,धाराशिव,सौ. पूजा ठोंगे,सभापती,पंचायत समिती भूम,सौ.अर्चना जाधव, सभापती,पंचायत समिती परंडा, सौ.प्रणिता गायकवाड,सभापती, पंचायत समिती वाशी,जाकीर म.इस्माईल सौदागर,नगराध्यक्ष, नगर परिषद परंडा तसेच सौ.विजयाबाई गायकवाड , नगराध्यक्षा,नगर परिषद,वाशी हे उपस्थित राहणार आहेत.
या समाधान शिबिरासाठी उपविभागीय अधिकारी भूम ज्योती चौहान,तहसीलदार भूम जयवंत पाटील,तहसीलदार परंडा निलेश काकडे आणि तहसीलदार वाशी प्रकाश म्हेत्रे यांनी नागरिकांना शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रकरणे, महसुली सेवा तसेच नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
**
हरित धाराशिव अभियान २.० मध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाचे आवाहन एकाच दिवसात १० लाखांहून अधिक वृक्षलागवडीचा विक्रम करण्याचा संकल्प ; पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
हरित धाराशिव अभियान २.० मध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाचे आवाहन
एकाच दिवसात १० लाखांहून अधिक वृक्षलागवडीचा विक्रम करण्याचा संकल्प ; पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
धाराशिव दि.३० जुलै (जिमाका) पर्यावरण संवर्धन,हवामान बदलाच्या परिणामांवर प्रभावी उपाययोजना आणि हरित धाराशिव घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन व उत्स्फूर्त लोकसहभागातून सन २०२६ च्या पावसाळ्यात हरित धाराशिव अभियान २.० हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानातून पर्यावरण संरक्षणासह भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या अभियानांतर्गत एकाच दिवशी अवघ्या १२ तासांत घनवन (Miyawaki) पद्धतीने किमान १० लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून Guinness World Records मध्ये नव्या विक्रमाची नोंद करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.मात्र हा उपक्रम केवळ विक्रम नोंदविण्यापुरता मर्यादित नसून, जिल्ह्याचे हरित क्षेत्र वाढविणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे, भूजल पातळी सुधारण्यास हातभार लावणे,कार्बन शोषण क्षमता वाढविणे आणि पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणपूरक वारसा निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख हेतू आहे.
निसर्गाशी मैत्री जपणाऱ्या या ऐतिहासिक अभियानात जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था (NGOs), सामाजिक संस्था, युवक मंडळे,पर्यावरणप्रेमी संघटना, CSR अंतर्गत कार्य करणाऱ्या संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
अभियानांतर्गत एकाच दिवशी १२ तासांत घनवन (Miyawaki) पद्धतीने वृक्षलागवड करण्यात येणाऱ्या क्षेत्रांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : सामाजिक वनीकरण विभागामार्फत स्थळांची संख्या ४, लागवडीचे क्षेत्र (हे.) १४.५ हेक्टरवर वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या रोपांची संख्या ४ लक्ष ३५ हजार,वनीकरण विभाग,प्रादेशिक,धाराशिव स्थळांची संख्या ४,लागवडीचे क्षेत्र (हे.) १४.५ हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या रोपांची संख्या ४ लक्ष २६ हजार, येडेशी अभयारण्य वन्यजीव, येडशी - स्थळांची संख्या १,लागवडीचे क्षेत्र (हे.) ५ हेक्टर, वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या रोपांची संख्या- १५ हजार अशी एकूण स्थळांची संख्या ८, लागवडीचे क्षेत्र (हे.) ३३.७ हेक्टरवर वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या रोपांची संख्या १० लक्ष ११ हजार अशी राहणार आहे.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि हरित भविष्याच्या उभारणीसाठी जिल्ह्यातील नागरिक,युवक, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी या लोकचळवळीत सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.वृक्षलागवड ही केवळ एक मोहीम नसून भावी पिढ्यांसाठी स्वच्छ हवा,समृद्ध जैवविविधता आणि सुरक्षित पर्यावरण देण्याची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना या अभियानातून अधोरेखित होत आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी करावी,असेही प्रशासनाने कळविले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाची ताकद एकवटत धाराशिव जिल्हा हरित विकासाचा नवा आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे या अभियानातून स्पष्ट होत आहे.
**
Wednesday, 29 July 2026
राज्यपाल श्री.जिष्णू देव वर्मा यांचा गुरुवारी तुळजापूर दौरा तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन मुंबईकडे प्रयाण करणार
राज्यपाल श्री.जिष्णू देव वर्मा यांचा गुरुवारी तुळजापूर दौरा
तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन मुंबईकडे प्रयाण करणार
धाराशिव,दि.२९ जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा हे गुरुवार,दि.३० जुलै रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून राज्यपाल श्री.वर्मा हे दुपारी १२.०५ वाजता शासकीय मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण करतील. दुपारी १२.४५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन.आगमन होताच त्यांना स्वागत व गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल.
त्यानंतर दुपारी १२.५० वाजता शासकीय विश्रामगृह येथून श्री.तुळजाभवानी मंदिराकडे मोटारीने प्रस्थान करून दुपारी १ वाजता मंदिरात पोहोचतील.दुपारी १ ते १.३० या वेळेत राज्यपाल श्री.जिष्णू देव वर्मा हे श्री.तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतील.त्यानंतर दुपारी १.३० वाजता मंदिरातून शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होऊन १.४० वाजता तेथे पोहोचतील. दुपारी १.४० ते २.२० या कालावधीत भोजनासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.यानंतर दुपारी २.२० वाजता राज्यपाल महामहिम श्री.वर्मा हे तुळजापूर येथून शासकीय मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण करतील.
******
दुध भेसळ प्रतिबंधक कारवाई धाराशिव दि.२९ जुलै (जिमाका) राज्यात दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने, या भेसळीमुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही.तसेच दुध भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्ता पुर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने दुध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी कृषी,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाने जिल्हास्तरीय समिती गठीत केलेली आहे.
दुध भेसळ प्रतिबंधक कारवाई
धाराशिव दि.२९ जुलै (जिमाका) राज्यात दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने, या भेसळीमुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही.तसेच दुध भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्ता पुर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने दुध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी कृषी,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाने जिल्हास्तरीय समिती गठीत केलेली आहे.
जिल्हयातील दुध भेसळ रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी,धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.अप्पर जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय दुध भेसळ समिती, धाराशिव यांनी जिल्हयात दुध भेसळ रोखण्याकरीता पोलीस प्रशासन,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,अन्न व औषध प्रशासन, वैद्यमापन शास्र तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी समन्वय साधून संयुक्तीक कार्यवाही करुन दुध भेसळ रोखण्यासंदर्भात नियोजनबध्द व गोपनीयतेने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार जिल्हास्तरीय दूध भेसळ समिती,धाराशिव यांच्यामार्फत दिनांक २२ जुलै २०२६ रोजी दुध भेसळ धडक मोहिमे अंतर्गत खालील प्रमाणे कारवाई करण्यांत आलेली आहे.
दिनांक २२ जुलै रोजी जिल्हयात धाराशिव तालुक्यातील डोडला डेअरी,शाखा वरुडा रोड,धाराशिव या केंद्रास दुध भेसळ धडक मोहिमे अंतर्गत भेट दिली असता प्रथम दर्शनी रेकॉर्ड प्रमाणे सकाळ व संध्याकाळ असे मिळून १२ हजार लिटर दूध संकलन झाले असल्याचे आढळून आले आहे.तपासणीसाठी गाय दूधाचे १ नमुना घेण्यांत आलेले आहे.धाराशिव तालुक्यातील शुअर सखी युनिक रियल इंटरप्रायजेस एम.आय. डी.सी.धाराशिव या केंद्रास दूध भेसळ धडक मोहिमे अंतर्गत भेट दिली असता सकाळ व संध्याकाळ असे मिळून गायीचे २ हजार ६०० लिटर व संध्याकाळचे म्हैस दूध ५०० लिटर दूध संकलन असल्याचे आढळून आले आहे.तपासणीसाठी केंद्रावर संकलीत होत असलेल्या गायीच्या दूधाचे १ नमुना घेण्यांत आलेले आहे,असे एकंदरीत एकूण २ नमुने सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन,धाराशिव यांच्यामार्फत तपासणीसाठी घेण्यात येऊन,हे नमुने विश्लेषणासाठी /तपासणीसाठी प्रयोगशाळेत सहाय्यक आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन, धाराशिव यांच्यामार्फत पाठविण्यांत आले आहेत.
जिल्ह्यात दुध भेसळ प्रतिबंधक समितीमार्फत दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते,खाजगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक, सहकारी व खाजगी दुध संकलन केंद्र व संस्था इत्यादी ठिकाणी दुध भेसळ तपासणीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व दूध विक्रेते,दुध संकलन केंद्र, खाजगी व सहकारी दूध उत्पादक संस्था व दुध प्रक्रिया यांनी उच्च गुणप्रतीचे भेसळ विरहीत दुध स्वीकृत व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसह विक्री करण्याबाबत तसेच त्याकरीता वापरात येणारे वजनकाटे व दुध गुणप्रत तपासणी सयंत्रे नियमित प्रमाणीत करुन अद्यावत ठेवावीत.त्याच प्रमाणे दुग्धजन्य पदार्थ व पशुखाद्य इत्यादी बाबत उत्पादन दिनांक व मुदतपुर्व वापराबाबत माहिती छापण्याविषयी सर्व विक्रेत्यांना जिल्हास्तरीय समितीने आवाहन केले आहे.तसेच दुध भेसळबाबत FSSAI टोल फ्री नं.१८०० २२ २३६५ हा उपलब्ध करुन दिलेला असून,सदर टोल फ्री नंबरवरती दुध भेसळबाबत नागरीकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
दुध भेसळ हा कायद्याने गुन्हा आहे.जिल्ह्यातील विक्रेते,खाजगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक,सहकारी व खाजगी दुध संकलन केंद्र व संस्था व नागरीकांना याबाबत सतर्क राहावे. तसेच दुधात खराब पाण्याची भेसळ केल्याने साथीच्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याने याला आळा घालण्याकरीता या पुढील काळात कठोर कारवाई करण्यांत येईल.या संदर्भात नागरिकांनी जागरुक राहावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी,धाराशिव व अप्पर पोलिस अधिक्षक,धाराशिव तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,धाराशिव व सहाय्यक आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन,धाराशिव यांच्यामार्फत तसेच समितीच्या वतीने आवाहन केले आहे.
000000
यादीतील रकमेबाबत संभ्रम नको ; आधार प्रमाणीकरणानंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रसिद्ध रक्कम योग्यच
यादीतील रकमेबाबत संभ्रम नको ; आधार प्रमाणीकरणानंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ
शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रसिद्ध रक्कम योग्यच
धाराशिव,दि.२९ जुलै (जिमाका) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या लाभार्थी यादीतील कर्जमाफीच्या रकमेबाबत शेतकऱ्यांनी संभ्रम बाळगू नये.प्रसिद्ध यादीतील रक्कम ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एन.पी.ए.(हेअरकट) धोरणानुसार दर्शविण्यात आली असून,प्रत्यक्ष आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्यांना पात्रतेनुसार संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,धाराशिव यांनी केले आहे.
शासनाने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ जाहीर केली असून,तिची अंमलबजावणी शासनस्तरावर सुरू आहे.त्यानुसार २५ जुलै २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्यातील ४७ हजार ८८६ शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.ही यादी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून, आणखी ५० ते ५१ हजार शेतकऱ्यांची यादी पुढील १५ दिवसांत प्रसिद्ध होणार आहे.
प्रसिद्ध यादीतील काही शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम कमी दिसत असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत.याबाबत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एन.पी.ए.तारखेवरील हेअरकट धोरणानुसार यादीतील रक्कम दर्शविण्यात आली आहे.त्यामुळे ती संबंधित बँकेच्या कर्जखात्यातील प्रत्यक्ष थकबाकीपेक्षा कमी दिसू शकते.
मात्र,शेतकरी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करताच पोर्टलवर ३१ जुलै २०२६ रोजी येणे बाकी असलेली संपूर्ण पात्र कर्जरक्कम दिसून येते.तसेच त्या रकमेची नोंद असलेली प्रमाणित प्रतही शेतकऱ्यांना दिली जाते.प्रसिद्ध यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणानंतर रुपये २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ प्रसिद्ध यादीतील रक्कम पाहून कोणताही निष्कर्ष काढू नये.यादीवरील विशिष्ट क्रमांक, स्वतःचा अॅग्रीस्टॅक क्रमांक आणि आधार कार्ड घेऊन ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जावे.तेथे आपल्या कर्ज खाते क्रमांकाची, कर्ज रकमेची व आधार क्रमांकाची खात्री करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून कर्जमाफीची रक्कम मंजूर होणार असून,त्यानंतर संबंधित शेतकरी पुढील कर्ज घेण्यासाठीही पात्र ठरणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,धाराशिव यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान,कर्जमुक्ती योजनेच्या यादीत नाव तपासणे,अपात्रतेची कारणे जाणून घेणे,तक्रारींचे निराकरण तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शासनाने (०२२) ४९१५०८०२ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.या हेल्पलाईनवर संपर्क साधूनही शेतकरी आपल्या शंकांचे निराकरण करून घेऊ शकतात.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,धाराशिव यांनी केले आहे.
******
Tuesday, 28 July 2026
धाराशिवमधील प्रत्येक शेतावरील पीक-पाणी परिस्थिती आता मोबाईलवर ; आय आय टी मुंबईच्या ‘वॉटर बजेट’चा अभिनव उपक्रम
धाराशिवमधील प्रत्येक शेतावरील पीक-पाणी परिस्थिती आता मोबाईलवर ; आय आय टी मुंबईच्या ‘वॉटर बजेट’चा अभिनव उपक्रम
धाराशिव,दि.२८ जुलै (जिमाका) कृषी विभाग,धाराशिव, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव आणि आय आय टी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "Geo-spatial Agriculture Planning Platform for Climate Resilient Dharashiv" हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून,त्याअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक शेतजमिनीवरील पीक व पाणी परिस्थितीची अद्ययावत माहिती आता थेट मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या प्रकल्पाची एक महत्त्वाची उपलब्धी म्हणजे शेतकऱ्यांना SMS द्वारे त्यांच्या मोबाईलवर पीक व पेरणीविषयक सल्ला पाठविण्यात येत आहे.संबंधित संदेशाचा मजकूर पुढीलप्रमाणे आहे :
"प्रिय शेतकरी,GIS तंत्राद्वारे पीक-पाणी नियोजनासाठी तुमच्या शेताची गटनिहाय माहिती पुढील लिंकवर पहा: http://1mt.in/DHRSV/qTc/enDlH — जिल्हा प्रशासन, धाराशिव."
जिल्ह्यातील Farmer ID असलेल्या आणि AgriStack मधील गटाची माहिती गावाच्या गट नकाशांशी जुळलेल्या सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना हा संदेश २४ किंवा २५ जुलै २०२६ रोजी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर जिल्हा प्रशासनाकडून पाठविण्यात आला आहे.हा संदेश कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित करू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.
संदेशातील लिंकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या वैयक्तिक शेतजमिनीनुसार दररोज मातीतील ओलावा,पिकाची सद्यस्थिती,पुढील सात दिवसांचा हवामान अंदाज तसेच त्या आधारे पेरणी, सिंचन आणि कीड-रोग व्यवस्थापनाविषयीचा सल्ला उपलब्ध होणार आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, SMS दररोज पाठविण्यात येणार नाही.मात्र,संदेशातील लिंक दररोज अद्ययावत केली जाणार असून, संपूर्ण हंगामभर शेतकरी त्याच लिंकवरून आपल्या शेताची ताजी परिस्थिती पाहू शकतील.त्यामुळे शेतकऱ्यांनी हा SMS किंवा त्यातील लिंक जतन करून ठेवावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
आय आय टी मुंबईने विकसित केलेल्या ‘वॉटर बजेट’ मॉडेल आणि स्कायमेट संस्थेच्या हवामान अंदाजाच्या आधारे तयार होणाऱ्या विश्लेषणावर आधारित हा सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून,हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाणारी अधिक शाश्वत आणि वैज्ञानिक शेती घडविण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
या सल्ला प्रणालीबाबत अधिक माहितीसाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला YouTube व्हिडिओ https://youtube.com/shorts/883euVZEkiE?si=TghX4BEUIQeSB3Un या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आला असून ते पाहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
******
शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे ; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे ; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
धाराशिव दि.२८ जुलै (जिमाका) खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.खरीप २०२६ हंगामासाठी कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत पीक विमा अर्ज सादर करावेत,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत www.pmfby.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी सुरू असून,योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी (Agristack Farmer ID) असणे तसेच ई-पीक पाहणीमध्ये विहित कालावधीत पिकांची नोंद केलेली असणे आवश्यक आहे.
खरीप २०२६ हंगामासाठी पीक विमा अर्ज भरताना मार्गदर्शक सूचनांनुसार कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मार्फत अर्ज करताना कोणतेही स्वतंत्र “पीक कर्ज घेतलेले नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र/हमीपत्र” देण्याची आवश्यकता नाही.या अटीबाबत काही प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.त्यामुळे अनेक शेतकरी अर्ज करण्यास उदासीन असल्याचे निदर्शनास आले होते.हा संभ्रम दूर करण्यासाठी कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी केंद्र शासनाकडे पत्र पाठवून संबंधित हमीपत्राची अट वगळण्याची विनंती केली आहे.तसेच जिल्हास्तरावरही ही अट रद्द करण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.
यावर्षी राज्यासह धाराशिव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही.हवामान विभागाने पुढील कालावधीतही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.
नैसर्गिक आपत्ती,अतिवृष्टी, दुष्काळ,अवकाळी पाऊस,कीड व रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक दिलासा मिळण्यासाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ३१ जुलै २०२६ पूर्वी पीक विमा अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.पीक विमा अर्ज भरण्याबाबत कोणतीही तांत्रिक अडचण अथवा अधिक माहिती आवश्यक असल्यास संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन कृषी विभागाने केले आहे.
*****
Monday, 27 July 2026
प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
धाराशिव,दि.२७ जुलै (जिमाका) जिल्ह्यातील विविध क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प धाराशिव जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आला असून, जिल्ह्याच्या विकासाचे स्पष्ट व्हिजन ठेवून काम करणारी धाराशिव जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद आहे.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णयही या व्हिजनमध्ये प्रतिबिंबित होतो.शासनाच्या प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या,तर गावे निश्चितच समृद्ध होतील,असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
जिल्हा परिषद धाराशिवच्या ‘आपला जीव – धाराशिव व्हिजन २०३०’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन आज सोमवारी २७ जुलै रोजी जि.प.कन्या प्रशाला मैदान येथे झाले.त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.गोरे बोलत होते.
यावेळी मंचावर मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती.अर्चना पाटील,आमदार विक्रम काळे,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक श्रीमती.रितू खोखर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती.उषा गायकवाड,जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती सिद्धेश्वर कोरे,कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती भाऊसाहेब खरसडे, समाजकल्याण समिती सभापती विश्वास कोकणे,महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती पूजा शिंदे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ध्यक्षा अस्मिता कांबळे व नेताजी पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी तसेच माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.गोरे म्हणाले,प्रत्येक जिल्ह्याने विकासाचा ठोस संकल्प केला,तर महाराष्ट्र अधिक वेगाने प्रगती करेल.धाराशिव जिल्हा परिषद व्हिजन ठेवून पुढे जात असून, हे व्हिजन २०३० पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार आहे.नवीन पिढीनेही या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन काम केले पाहिजे.जिल्हा परिषदेने ग्रामीण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषय या व्हिजनमध्ये समाविष्ट केले आहेत.त्यामुळे ग्रामीण भागाचे चित्र निश्चितच बदलेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले,उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटांतील महिलांना सक्षम करण्यात येत आहे.राज्यातील ५० लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या असून, एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा शासनाचा संकल्प आहे.जिल्हा परिषदेची विद्यमान इमारत १९९० मध्ये बांधण्यात आली असून,ती आता अपुरी पडत आहे. काही विभागांना आवश्यक जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले,धाराशिव जिल्हा परिषदने विकासाचे स्पष्ट उद्दिष्ट निश्चित केले आहे.हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिकारी,पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांची जबाबदारी वाढली असून, तन-मन-धनाने विकासासाठी कार्य करावे लागेल. या व्हिजनमुळे जिल्ह्याच्या कायापालटाची प्रक्रिया सुरू झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलत आहे.जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी जोमाने काम करण्याची गरज आहे.नवीन जिल्हा परिषद इमारतीसाठी पीपीपी मॉडेलचा अवलंब करण्याची आवश्यकता असून, जिल्ह्यात आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून महिलांना सक्षम केले जात असून, येत्या काळात सुमारे ३५०० महिलांना स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार विक्रम काळे म्हणाले, शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करणारी धाराशिव जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीला ३५ वर्षे पूर्ण झाली असून,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नवीन इमारतीची मागणी मंजूर करावी. तसेच आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना मोबाईल व इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदने घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले,धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा असून,पाच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती करून आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर पडण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे.दर्जेदार आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास यांवर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अर्चना पाटील म्हणाल्या,सन २०३० पर्यंत धाराशिव जिल्हा परिषद विकासाच्या दृष्टीने आदर्श बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ या उपक्रमामुळे जिल्ह्याचे चित्र बदलणार असून,या उपक्रमाची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या उपक्रमासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे,अशी अपेक्षा व्यक्त करत काही मागण्याही त्यांनी मांडल्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या रामकृष्ण माळी, प्रकाश गोडसे आणि नरहरी भागेकर यांना आधार प्रमाणीकरण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.तसेच नीट परीक्षेत यश संपादन करणारा जि.प.कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक पाटील याचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.जिल्हा परिषद अध्यक्षा.श्रीमती अर्चना पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा आई तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य,पंचायत समित्यांचे सभापती,उपसभापती,सदस्य, आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, बचत गटांतील महिला,पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप सेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार तसेच विविध विभागप्रमुखांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे आणि ऐश्वर्या हिवारे यांनी केले,तर आभार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
*****
नशामुक्त युवा फॉर विकसित भारत जिल्हास्तरीय स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे
नशामुक्त युवा फॉर विकसित भारत जिल्हास्तरीय स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे
धाराशिव दि.27जुलै (जिमाका) : माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने 'नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत' या अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यसनमुक्ती बाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, यांच्या सृजनशीलतेला वाव देणे आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या स्पर्धेमध्ये लोकगीत( सामूहिक), सामूहिक नृत्य, पथनाट्य, चित्रकला, शॉर्ट फिल्म-रील, घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री (मौखिक कविता) तसेच भाषण स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. सर्व स्पर्धा 'नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत' या विषयावर आधारित असून, व्यसनमुक्ती, निरोगी जीवनशैली, सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारत निर्मितीत युवकांची भूमिका या विषयांवर स्पर्धकांनी आपले सादरीकरण करावे.
या स्पर्धांचे आयोजन दिनांक 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), तुळजापूर येथे करण्यात आले आहे.
15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, धाराशिव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, धाराशिव यांच्याशी 7498134147/9420200649 ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अथवा mybharatdharashiv@gmail.com या ई-मेलद्वारे संपर्क साधावा.
00000
तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान व महाआरोग्य शिबिर २८ जुलै रोजी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान व महाआरोग्य शिबिर २८ जुलै रोजी
धाराशिव दि.२६ जुलै (जिमाका) महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन मंगळवार,दि.२८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता नळदुर्ग रोडवरील वंश मंगल कार्यालय, तुळजापूर येथे करण्यात आले आहे.या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन आमदार रणाजगजितसिंह पाटील (विधानसभा सदस्य,तुळजापूर) यांच्या हस्ते होणार असून,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास लोकसभा सदस्य ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तसेच विधान परिषद सदस्य बसवराज पाटील,विक्रम काळे आणि सतीश चव्हाण, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे तसेच नळदुर्ग नगर परिषदेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे,तुळजापूर पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख, यांची उपस्थिती राहणार आहे.
या समाधान व महाआरोग्य शिबिरात विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, अर्जांचा स्वीकार,तसेच आरोग्यविषयक सेवा व तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मंगळवार,दि.२८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता वंश मंगल कार्यालय,नळदुर्ग रोड,तुळजापूर येथे आयोजित या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री.ओंकार देशमुख यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Posts (Atom)





















