Saturday, 18 March 2017

स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी 23 मार्च पर्यंत मुदतवाढ



         उस्मानाबाद.दि. 17: शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनु. जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी रोख रक्कम त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करण्याबाबतची डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत विद्यार्थ्यांकडून समक्ष / टपालाद्वारे कार्यालयाच्या ई-मेल वर अर्ज स्विकृत करण्यासाठी मुदत दिनांक 23 मार्च 2017 पर्यंत वाढविण्यात येत आहे,असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हयात 2 हजार 240 शेततळयांना मंजूरी


उस्मानाबाद,दि. 17:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्हयात "मागेल त्याला शेततळे" योजने मध्ये 2 हजार 240 शेततळयांना मंजूरी देण्यात आली आहे. जिल्हयास 3 हजार 700 शेततळयांचा लक्षांक होता.
             मागेल त्याला शेततळे योजनेसाठी जिल्हाभरातून 3 हजार 106 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 2 हजार 936 जणांना तांत्रिकदृष्टया जागा उपलब्ध झाली. आलेल्या सर्व अर्जामधून 2 हजार 240 अर्ज मंजूर करण्यात आले व कार्यारंभ आदेश देण्यात आले. 2 हजार 151 ही संख्या आखणी करून दिलेल्या शेततळयाची आहे यापैकी 296 शेततळयाची कामे चालू असून जिल्हयात 258 शेततळयाची कामे पूर्ण झालेली आहेत.

            शासन निर्णयानुसार उस्मानाबाद जिल्हयास शेततळयासाठी 375.54 लक्ष वितरीत निधी मंजूर झालेला असून अनुदान अदायगी शेततळयाची संख्या 174 आहे. आज पर्यंत शेततळयासाठी अनूदान अदायगी 69.71 लक्ष रुपये केले असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

युवक मंडळांनी तालुकास्तरीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


         उस्मानाबाद,दि. 17: केंद्र शासनाच्या युवा व क्रीडा मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या नेहरू युवा केंद्र कार्यालयाशी सलग्न असणाऱ्या सर्व युवा मंडळ, महिला मंडळांना ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत दि. 1 एप्रिल 2016 ते  28 फेब्रुवारी 2017 या कालावधीत उत्कृष्ठ कार्य करणा-या  युवक मंडळांना तालुकास्तरावर उत्कृष्ट युवक मंडळ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या मंडळाला प्रथम पुरस्कार रु. 8000/ रोख व गौरवपत्र तर  द्वितीय पुरस्कार रु. 4000/ रोख व गौरवपत्र देण्यात येणार आहे.
       पाणी पुरवठा विहीर, परिसर स्वच्छता,गाळ काढणे, खोली वाढविणे, नदीकाठ स्वच्छता मोहीम, गाजर गवत, जलपर्णी काढणे, वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, स्वच्छता व रंगरंगोटी (शाळा,अंगणवाडी, ग्रामपंचायत), ग्रामस्वच्छता, मैदान स्वच्छ करणे, पांदी स्वच्छ करणे, पाणी आडविण्यासाठी बंधारे, शोषखडे तसेच शौचालय बांधकामास प्रवृत्त करणे आदी कामे दि.1 एप्रिल 2016 ते 18 फेब्रुवारी  2017 या कालावधीत ग्रामस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवक मंडळ, महिला मंडळांनी  दिनांक 22 मार्च 2017 पूर्वी सदरील पुरस्कारासाठी अर्ज विहीत नमुन्यातील प्रस्ताव नेहरु युवा केंद्र ,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उस्मानाबाद येथे दाखल करावेत.
          अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे. पुरस्कार प्रस्तावा सोबत दि.1 एप्रिल 2016 ते 18 फेब्रुवारी  2017 या कालावधीत केलेल्या कामाचा अहवाल, फोटो, वर्तमान पत्रातील कात्रणे व ग्रामपंचायमचे काम केल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडावे, इच्छुक युवा मंडळ, महिला मंडळांनी दिनांक 22 मार्च 2017 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक श्री.काळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 

लोहारा तालुका हागंणदारीमुक्त व्हावा, नागरिकांना सहकार्याचे आवाहन


          उस्मानाबाद.दि.17 देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांनी स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) ही महत्वकांक्षी योजना सुरु केलेली असून, दि.31 मार्च 2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करावयाची घोषणा नुकतीच केलेली आहे. त्या अनुषंगाने लोहारा तालुका हागणदारीमुक्त होण्याच्या टप्प्यावर असून, दि.31 मार्च 2017 पूर्वी लोहारा तालुका हागणदारीमुक्त व्हावा असा सर्वांचाच संकल्प आहे.

          तेव्हा लोहारा तालुक्यातील सर्व नागरिकांनी लोहारा तालुका हागणदारीमुक्त होण्यासाठी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन ही मोहिम यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन  पंचायत समिती, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कक्ष, लोहारा यांनी केले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपध्यक्ष पदाची 21 मार्च 2017 रोजी निवड


उसमानाबाद,दि.17जिल्हा परिषद उस्मानाबादचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवार दि. 21 मार्च 2017 रोजी सकाळी  10 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे  विशेष  सभा आयोजित  करण्यात  आलेली  आहे.
          सदरील सभेस 55 जिल्हा परिषद सदस्य व 8 पंचायत समिती सभापती उपस्थित राहणार आहेत.

तरी  या सदस्याची  पडताळणी  करण्याकरिता  सदस्यांचे  ओळखपत्र  व  निवडनणूक निर्णय  अधिकारी  यांनी  दिलेले  निवडून  आल्याचे   प्रमाणपत्र  सोबत आणावे.

आवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संयुक्त समिती


उस्मानाबाद.दि.18:- वादळी वाऱ्यासह झालेल्या आवकाळी पावसाने व गारपिटीने उस्मानाबाद तालुक्यात शेतीपिक, फळपिकांचे नुकसान झाल्याने उस्मानाबाद तहसिलदार आयुष प्रसाद यांनी तालुक्यातील नैसर्गीक आपत्तीमुळे पिकांची नुकसान बाबतची पाहणी करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन केली आहे. ही समिती नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिके, फळपिके, अन्य नुकसानीची पाहणी करुन तसा वस्तुस्थितीचा अहवाल तहसिल कार्यालयास सादर करतील.

गाव,सज्जा व मंडळ निहाय संयुक्त समिती स्थापन केली असून या समितीचे नियंत्रण अधिकारी म्हणून नायब तहसिलदार यांची नियुक्ती केली आहे. पथक प्रमुख मंडळ अधिकारी ,कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांची नियुक्ती केली आहे, तर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे समितीचे हे सदस्य असून या समिती मार्फत आवकाळी पावसाने व गारपिटीने झालेल्या नुकसानीची नेमून देण्यात आलेल्या गावची सर्वे नंबर निहाय तसेच खातेदार निहाय पाहणी करून वस्तुस्थितीचा  पंचनामा अहवाल तहसिल कार्यालयास सादर करतील, असे परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उस्मानाबाद तहसिलदार आयुष प्रसाद  यांनी कळविले आहे.

अन्नधान्याचे माहे मार्च 2017 साठीचे मासिक नियतन मंजूर


उस्मानाबाद.दि.18:- जिल्ह्यातील माहे मार्च 2017 करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी करण्याकरिता योजनानिहाय अन्नधान्याचे मासिक नियतन मंजूर झाले असून सदरील नियतनाची योजनानिहाय लाभार्थी संख्यानिहाय अन्यधान्य  परिमाण  पुढीलप्रमाणे  निर्धारित  करण्यात  येत आहे.
 प्राधान्य  कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत गहू 3 कि.ग्रॅ. प्रतिव्यक्ती 2 रु.,तांदूळ 2 कि.ग्रॅ.प्रतिव्यक्ती 3 रु., अंत्योदय  योजनेतील लाभार्थ्यांसाठी गहू 21 कि.ग्रॅ.प्रती कार्ड 2 रु., तांदूळ 14 कि.ग्रॅ.प्रती कार्ड 3 रु., एपीएल (केसरी) शेतकरी लाभार्थ्यांसाठी गहू -3 कि.ग्रॅ . प्रतीव्यक्ती 2 रुपये, तांदूळ- 2 कि.ग्रॅ प्रतिव्‍यकी-3 रु., उर्वरीत ए. पी. एल. साठी अद्याप नियत मंजूर नाही,गहू 10 कि.ग्रॅ. प्रती कार्ड 7.20 रू.,तांदूळ 5 किलो प्रती कार्ड 9.60 रू., साखर - बी. पी. एल. 500 ग्रॅम दरडोई- 13 रुपये 50 पैसे, अंत्योदय  योजनेंतर्गत साखर 500 ग्रॅम दरडोई- 13 रुपये 50 पैसे, अन्नपूर्णा 500 ग्रॅम दरडोई -13 रुपये 50 पैसे याप्रमाणे राहील. 
         केरोसीनचा विक्रीदर दि. 1 जानेवारी 2017 पासून पुढीलप्रमाणे आहे- उस्मानाबाद तालुका  दर 18 रुपये 94 पैसे प्रति लिटर , तुळजापूर 18 रुपये 82 पैसे, उमरगा -19 रुपये 06 पैसे,लोहारा 18 रुपये 97 पैसे,कळंब -19 रुपये 21 पैसे, परंडा- 19 रुपये 16 पैसे, भूम-19 रुपये 17 पैसे व वाशी तालुक्यातील दर 19 रुपये 19  पैसे प्रति लिटर राहतील. 

उस्मानाबाद जिल्हयासाठी माहे मार्च 2017 करिता शासनाकडून अन्नधान्याचे नियतन पुढीलप्रमाणे प्राप्त झाले आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी गहू 3 हजार 55 मेट्रीक टन व तांदूळ 2 हजार 37 मेट्रीक टन तसेच अंत्योदय अन्न योजनेसाठी गहू 1 हजार 147 मेट्रीक टन, तांदूळ 236 मेट्रीक टन  एवढे  धान्य  प्राप्त  झाले आहे. सदरील  धान्याच्या वाहतुकीबाबतचे आदेश वाहतूक ठेकेदार  गोदामनिहाय  देण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी  यांनी  कळविले आहे. 

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चालू राहणार


उस्मानाबाद.दि.18:- जिल्हयातील सर्व नागरिकासाठी दि.19,25,26 व 28 मार्च 2017 रोजी शासकीय सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणी व कर वसूलीचे कामकाज सुरू राहील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  विलास कांबळे यांनी कळविले आहे.

        जिल्हयात गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनाची मोठया प्रमाणात खरेदी होत असते.  गुढीपाढव्याच्या दिवशी अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून नागरिकांना वाहनाचा ताबा मिळावा व वाहनधारकांना महसूल जमा करता यावी या दृष्टीने दि. 19,25,26 व 28 मार्च 2017 रोजी शासकीय सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाहन नोंदणीचे व त्या अनुषंगीक कर वसूलीचे कामकाज कार्यालयात सुरू ठेवण्याचे परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी आदेशित केले आहे. 

साथरोग आजाराबाबत सतर्क रहावे – आनंद रायते


उस्मानाबाद.दि.18:-सध्याच्या हवामान बदलामुळे ताप, घसादुखी, घस्याला खवखव, खोकला, नाकगळणे, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे आढळून येत आहेत. ही लक्षणे स्वाईन फ्ल्यू  , डेंग्यू, मलेरिया अशा आजाराचे असू शकतात, यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगून साथरोग आजाराबाबत सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी श्री.आनंद रायते यांनी केले आहे.
        साथरोग स्वाईन फ्ल्यू आजाराबाबत जिल्हा परिषद सभागृहात आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. या आढावा बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे उपस्थित होते.
        यावेळी मार्गदर्शन करताना श्री. रायते म्हणाले ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकीय अधिकारी, शहरी भागात वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अशा लक्षणाचे रुग्ण आढळून आल्यास त्या गावात तात्काळ भेट देवून प्रतिबंधात्मक उपचार करावेत. जिल्हास्तर, तालुकास्तर व क्षेत्रीय स्तरावर साथरोग किट ठेवण्यात यावीत अशा संबंधितांना सुचना दिल्या. साथरोगाची लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणी करुन घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

        या बैठकीस उपशिक्षणाधिकारी श्रीमती. कुंभार, जिल्हा हिवताप अधिकारी श्री. नानासाहेब बोरकर, माताबाल संगोपन अधिकारी श्री. डॉ. कुलदीप मिटकरी, विस्तार अधिकारी श्रीमती. मनिषा सुकाळे, सांख्यिकी अन्वेषक श्री. मिलिंद कांबळे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी (प्र) श्री. अर्जून लाकाळ व सर्व   तालुका आरोग्य अधिकारी  यांची यावेळी उपस्थिती होती. 

लेख - दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे रोग आणि त्यावरील उपाय

                                                                                                                  

        आपल्याला कल्पना असेलच की साथीचे आजार आणि पाणी यांचे अतिशय निकटचे नाते आहे.साथीच्या रोगांना दूषित पाण्यापासून होणारे रोग म्हटल्यास फारसे वावगे होणार नाही.  पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे.किंबहुना मनुष्यास पाण्याशिवाय जगणे कठीण आहे.मानव शरीरास आवश्यक असणारा घटक जर विविध आजाराच्या अति सूक्ष्म जीवाणू अथवा विषाणूंनी दूषित झाला तर कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, विषमज्वर, अतिसार, पोलिओ, मलेरिया इत्यादी सारख्या प्राणघातक आजाराची मोठ्या प्रमाणात लागण होऊन एकाच वेळी अनेकांचे प्राण जाऊ शकतात या प्रमुख साथीच्या रोगाची थोडक्यात माहिती.

कॉलरा :- हा रोग सूक्ष्म जीवाणूपासून होणारा रोग आहे.या रोगाचा प्रसार प्रामुख्याने दूषित पाणी, अन्न व माशा याद्वारे होतो यात रुगाला सतत जुलाब व उलट्या होतात.जुलाबाचा रंग भातावरील फऱ्याच्या रंगासारखा असतो.रुग्णाला ताप येतो.शरीरातील क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण उलट्याने डोळे खेल जातात.अशक्तपणा जाणवतो व रुग्णाला लघवी होत नाही.अशी लक्षणे दिसताच रुग्णास उपचारासाठी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात यावे.तत्पूर्वी त्याला साखर, मीठ व पाणी यांचे एकत्रित केलेले मिश्रण म्हणजेच जलसंजीवनी सतत पाजावे.अशा रुग्णाची उलटी व संडास यावर बसलेल्या माशा, दूषित झालेले अन्न पदार्थ इतरांच्या पोटात गेल्यास तोही या रोगास बळी पडतो.म्हणून अशा रुग्णाची उलटी व संडास ताबडतोब झाकून अथवा पुरुन टाकावी.

गॅस्ट्रो इंटरायटीस:- या रोगाची लक्षणे जवळपास कॉलरा रोगासारखीच आहेत.मात्र याचे जीवाणू वेगळे असल्याने कॉलराप्रमाणे संडास उलटी झपाट्याने होत नाही.यासाठी कॉलरा प्रमाणे औषध उपचार करण्यात यावा.

कावीळ:- हा रोग या रोगाच्या विषाणूनी दुषित झलेल्या पाण्यापासून उद्भवतो.या रोगाचे विषणू मुख्यत: विष्ठेने दूषित झालेल्या पाण्यात आढळतात.या रोगाची प्रमुख लक्षणे - भूक न लागणे, पाण्यात आढळतात.या रोगाची प्रमुख लक्षणे - भूक न लागणे, अशक्तपणा जाणवतो,  डोळे पिवळसर होणे, कातडीचा रंग पिवळसर होणे, उजव्या बाजूच्या बडगडीखाली असलेल्या यकृतावर सुज येणे ही आहेत.अशी लक्षणे जाणवताच रोग्याला संपूर्ण विश्रांतीचा सल्ला द्यावा.ग्लुकोज साखरयुक्त थंडपाणी सतत द्यावे.विषाणूंनी दूषित झालेल्या सार्वजनिक पाणी तात्काळ निर्जंतुक करण्याची व्यवस्था करावी.अन्यथा हा रोग झपाट्याने साथीच्या स्वरुपात गावात पसरण्याची शक्यता असते.

विषमज्वर (टायफाईड):- हा रोग दुषित पाण्यामुळे व दूषित अन्न पदार्थामुळे होतो.यात जिवाणूंचा परिणाम लहान आतड्यांवर होतो.  त्यावर सूज येणे.त्यामुळे रुग्णास अस्वस्थता वाटू लागते.अंगात तापाचे प्रमाण खुप असते.पूर्वी या रोगावर उपाय नव्हता भाग आता यावर क्लोरोमायसीटीन सहित इतर अनेक ऍ़न्टीबायोटीक्स उपलब्ध झालेली आहेत.विनाविलंब डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर निश्चित मात करता येते.

पोलिओ:- हा रोग या रोगाच्या विषाणूपासून दूषित झालेले पाणी, तसेच अन्न पदार्थ याद्वारे होतो.या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात 0 ते 6 वर्ष वयोगटात आढळून येतो.रुग्णास ताप येणे.पातळ संडास होणे, अशक्तपणा जाणवते, हात पाय दुखने इत्यादी या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत.या रोगाचे जंतू पोटातून मेंदूपर्यंत पोहचतात व तेथून मज्जातंतूवर त्याचा परिणाम होऊन हात पाय लुळा पडणे, हातापायाची शक्ती कमी होणे अशा प्रकारची प्राथमिक लक्षणे दिसू लागतात.  याचवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास अपंगत्व येणे टाळता येणे.यात शारिरीक स्वच्छता व इतर मुळापासून रोगपिडीत मुलास दूर ठेवणे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.यात प्रतिबंधक इलाज म्हणून 0 ते 5 वर्ष वयात पोलिओची लस नियमाप्रमाणे पाजून घ्यावी.

अतिसार:- हा रोग सूक्ष्म जंतूंपासून होतो.अमीबा सारखे अतिसूक्ष्म जीवाणू दूषित पाण्यातून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात आणि तेथे यांची वाढ होते.यापासून पचनक्रियेचे आजार व अतिसार हागवण या सारखे रोग निर्माण होतात.यात जंतूचा प्रवास रुग्णाच्या विष्टेपासून माशाद्वारे अन्न पदार्थ दूषित होऊन मानवी शरीरात होतो.व्यक्ती शारिरीक अस्वच्छता उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे व अशुद्ध पाणी पिण्यामुळे हा आजार होतो.शुद्ध निर्जंतूक पाणी पिण्यास वापरणे हा यातील अत्यंत महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.

मलेरिया:- हा रोग काही विशिष्ट प्रकारच्या जातीच्या डासापासून होतो.  घराच्या परिसरात साचलेल्या घाण पाण्यावर डास अंडी घालतात व त्यापासून डासाची भरमसाठ उत्पत्ती होते.हिवताप झालेल्या रुग्णांना हा डास चावतो व रुग्णाच्या शरिरातील हिवतापाचे रोगजंतू डासाच्या शरीरात जातात.डासाच्या शरीरात हिवतापाच्या रोगजंतूचे जीवनचक्र पूर्ण होते.हिवतापाने आजारी झालेला डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्या व्यक्तीस हिवतापाचा प्रादूर्भाव होतो.म्हणून घराभोवतालच्या सांडपाण्याचा योग्य वापर करण्यासाठी परसबाग करणे अथवा शोषखड्डा करणे, त्यावर उपाय आहे.डासाची वाढ थांबविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत केल्या जाणाऱ्या किटकनाशक फवारणीला सहकार्य करावे जेणे करुन डासाचा नाश होईल व त्याची उत्पत्ती थांबेल.

          साथीच्या काळात रोगावर करावयाच्या प्रथमोपचार व ग्रामस्थांनी ग्रामस्तरावर करावयाची कार्यवाही पुढीलप्रमाणे करावी.गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी, सदस्य किंवा इतर कोणत्याही ग्रामस्थांनी साथीच्या रोगाची माहिती होताच तात्काळ संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, उपकेंद्र आरोग्य कर्मचारी यांना कळवावी.गंभीर अवस्थेतील रुग्णास विनाविलंब जवळच्या रुग्णालयात औषध उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था करावी जेणे करुन संभावित रुग्ण मृत्यू होणार नाही.तीव्र जलशुष्कता होऊन रुग्णाचा मृत्यू होऊ नये म्हणून त्यास प्रथमोपचार म्हणून चिमूटभर मीठ, मूठभर साखर व एक लिटर पाण्याचे केलेले मिश्रण रुग्णास सतत पाजण्यास सल्ला द्यावा.जेणे करुन रुग्णास वैद्यकीय मदत मिळेपर्यंत मृत्यू होणार नाही.गावातील दूषित झालेला पाणीपुरवठा ब्लीचींग पावडरने निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरु करावी.वैद्यकीय मदत पथक गावात आल्यानंतर औषधोपचारासाठी लागणारी जागा उपलब्ध करणे व त्यांना थांबण्याची सोय करणे.साथीच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती पुरविणे असे सहकार्य करावे.साथरोग नियंत्रणामध्ये आणण्यासाठी वैद्यकीय मदत पथकास आवश्यक ते सहकार्य करावे.
    
                                                                           (मनोज शिवाजी सानप)
                                                                               जिल्हा माहिती अधिकारी,

                                                                                 उस्मानाबाद.

Wednesday, 15 March 2017

उस्‍मानाबादकरांना मिळणार सांस्‍कृतिक कार्यक्रमाची मेजवानी


उस्‍मानाबाद,दि.15:-स्‍थानिक लोककलावंत,महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांना आपली कला सादर करण्‍यासाठी  हक्‍काचे  व्‍यासपीठ  मिळावे  म्‍हणून  राज्‍य शासनाच्‍या  सांस्‍कृतिक संचालनायाकडून  वर्षभर  दर  शनिवारी  व  रविवारी  सायंकाळी  7.00 ते 8.30 या वेळेत  शहरात  कलांगण  कार्यक्रमाचे  आयोजन  करण्‍यात  आले आहे. 
या कार्यक्रमाच्‍या  माध्‍यमातून उस्‍मानाबादकरांना सांस्‍कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.यामध्‍ये स्‍थानिक लोककला, महाराष्‍ट्राची संस्‍कृती, देशप्रेमावर आधारीत गीत गायन, नृत्‍य,वाद्यवादन,एकपात्री अभिनय अशा विविध कला सादर करण्‍याची संधी स्‍थानिक कलावंताना देण्‍यात येणार आहे.  
कलांगण कार्यक्रम बार्शी नाका, जिजाऊ चौक, उस्‍मानाबाद या ठिकाणी दर शनिवारी व रविवारी सायं.7.00 ते 8.30 यावेळेत आयोजित केला जाणार आहे.

तरी इच्‍छुक कलावंतानी सादरीकरणासाठी जिल्‍हा समन्‍वयक श्री. सचिन मोरे मो. 9175345555 व अजय  चिलवंत  मो. नं. 8888574324 याक्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्‍यात आले आहे.  

लाऊडस्पिकर फटाके, व वाद्य वाजविण्यास बंदी


उस्मानाबाद,दि.15:-उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून सण/उत्सवाच्या वळी ध्वनी प्रदूषण हावू नये यासाठी  आपण आपल्या सोसायटीमध्ये/गावामध्ये लाऊडस्पिकर मोठ्याने अगर कर्कश आवाजात वाजवू नये तसेच सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण कायदा सन 1986 व ध्वनी प्रदूषण अधिनियमन 200 मधील तरतुदीचे सक्त  पालन करण्याबाबत  मागदर्शक  सूचना  दिलेल्या आहेत.त्या अन्वये रात्री 10.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत  लाऊडस्पिकर, फटाके  वाद्य  वाजविण्यास  सक्त  बंदी  केलेली  आहे.
  सकाळी 6.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर,फटाके वाद्य इत्यादी पुढील मर्यादेपेक्षा  जास्त  आवाजाने  वाजविण्यास  बंदी  केलेली  आहे.
        औद्योगिक क्षेत्र आवाजाची क्षमता दिवसाच्या वेळी 75 ते  रात्रीच्या वेळी 70 डेसिमल, विपणन क्षेत्र  65 ते रात्रीच्या वेळी 55 डेसिमल,रहिवाशी क्षेत्र 55 ते रात्रीच्या वेळी 45 डेसिमल,शांतता विभाग 50 ते रात्रीच्या वेळी 40 डेसिमल असावी.
        ध्वनी प्रदूषण (नियमन  व नियंत्रण)सन 2000 चे उल्लंघन केल्यास इनव्हहायमेंट (प्रोटेक्शन) ॲक्ट सन 1986 कलम 154 प्रमाणे पाच वर्षे कैदेची किंवा एक लाख रूपये किवा दोन्ही शिक्षा होवू शकते तसेच शिक्षा होवून सुध्दा असे गुन्हे चालू ठेवल्यास पुढील प्रत्येक दिवसाला पाच हजार रूपये दंडाची तरतूद आहे.तसेच कलम 15 (1) प्रमाणे शिक्षा लागल्याचे एक वर्षांपर्यतच्या काळात पुन्हा असे गुन्हे केल्यास सात वर्षांपर्यतची शिक्षा होवू शकते.
        सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन झाल्यास न्यायालयांचा अवमान केला म्हणून कारवाई होवू शकते. ध्वनी प्रदूषण संदर्भातील तक्रार असल्यास आपण  पुढील  फोन  नं. किंवा ई-मेल आयडीवर करू शकता पोलीस नियत्रंण कक्ष उस्मानाबाद फोन नं. -100, 02472-222700, 02472-222900, व्हाट्सॲप नं.07588527620, 07218804000, वेबसाइर्ट –osmanabadpolice.gov.in,ई-मेलआयआयडी-p.osmanabad@gmail.com

 तरी उस्मानाबाद जिल्हयातील नागरिकांनी या बाबात दक्षता बाळगून पोलीस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.

नगरपरिषद पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द



उस्मानाबाद,दि.15:-उस्मानाबाद नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 11 ब च्या पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी  जाहीर करण्यात आली असल्याची माहिती  नगरपरिषदेचे  मुख्य  कार्यकारी  अधिकारी  राजीव  बुबने  यांनी  एका  प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली  आाहे.  

Tuesday, 14 March 2017

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि.12 ते 18 मार्च 2017 दरम्यान जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा


उस्मानाबाद दि.14:- राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि.12 ते 18 मार्च 2017 दरम्यान जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येते असून दि.14 मार्च 2017 रोजी बाहयरुग्ण विभाग जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे काचबिंदू सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा रुग्णलयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील हे होते. नेत्रविभाचे नेत्रशल्यचिकित्सक डॉ. एम.के.पल्ला, डॉ. ज्योती कानडे, डॉ. विजय साबळे, अधिसेविका श्रीमती सरस्वती थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.         
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना जिल्हा रुग्णलयातील वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय साबळे यांनी डोळयांना होणारे विविध आजार व काचबिंदू यातील फरक समजावून सांगितला . त्यामुळे काचबिंदू झाल्यानंतर त्याचे निदान कशाप्रकारे करता येते याबाबतही डॉ. साबळे यांनी माहिती दिली.
नेत्र शल्यचिकित्सक डॉ.ज्योती कानडे यांनी उपस्थित सर्वांना काचबिंदू म्हणजे काय, काचबिंदू होण्याचे कारण, काचबिंदू होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, काचबिंदूचे समाजात वाढत चाललेले प्रमाण तसेच वय वर्षे 40 नंतर प्रत्येक व्यक्तीने व ज्या व्यक्तीला मधुमेह हा आजार आहे अशा व्यक्तींना किमान सहा महिन्यातून एकदा तज्ञ डॉक्टरांमार्फत डोळयांची तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन काचबिंदूचे लवकर निदान करुन त्यावर योग्य उपचार केल्यामुळे काचबिंदूमुळे येणारे अंधत्व नियंत्रणात ठेवता येऊ शकते याबाबत सखोल मार्गदर्शन केले. दर शुक्रवारी नेत्रचिकित्सा बाहय रुग्ण विभागामध्ये काचबिंदूची तपासणी करण्यात येणार असल्याचेही डॉ. कानडे यांनी यावेळी सांगितले.

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनजंय पाटील यांनी  उपस्थितांना सांगितले की, डोळा हा शरीरातील महत्वाचा भाग असून त्यामध्ये काचबिंदू व इतर डोळयांच्या आजारासंदर्भात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेऊन वेळेत उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन केले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरीता दिनांक 21 मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन


उस्मानाबाद.दि.14:-दिनांक 16 फेब्रुवारी 2017 रोजी  जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या असून दिनांक 21 मार्च रोजी  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरीता जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी 2.00 वाजता विशेष  बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .
यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष  यांच्या निवडीसाठी  जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील .
या बैठकीची रुपरेषा पुढीलप्रमाणे राहील- दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 10.00 ते 12.00 वाजेपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्विकारणे, दुपारी 2.00 वाजता सभेस सुरुवात करणे, दुपारी 2.00 ते 2.15 पर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी  प्राप्त  नामनिर्देशन पत्राची तपासणी करणे व  नामनिर्देशन पत्राची छाननी करणे,  दुपारी 2.15 वाजता  वैधरित्या  नामनिर्दिष्ट  उमेदवारांची नावे वाचून दाखविणे,दुपारी 2.15 ते 2.30 पर्यंत  उमेदवारी परत घेणे , दुपारी 2.35 वाजता उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविणे,दुपारी 2.40 वाजता  निवडणूक लढविणाऱ्या  उमेदवारांची नावे वाचून दाखविणे, दुपारी 2.40 ते कामकाज संपेपर्यंत आवश्यक असल्यास मतदान प्रथम अध्यक्ष पदासाठी व नंतर उपाध्यक्ष पदासाठी आणि निवडणुकीचा निकाल जाहीर करणे.

वरील  कार्यक्रमानुसार प्रथम अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल व त्यानंतर त्याच पध्दतीचा अवलंब करुन  उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येईल , असे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी  एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे .