Saturday, 14 March 2026
एलपीजी गॅस,पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय अत्यावश्यक ; साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
एलपीजी गॅस,पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय अत्यावश्यक ; साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव,दि.१४ मार्च (जिमाका) आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एलपीजी गॅस,पेट्रोल व डिझेलचा पुरवठा अखंड व सुरळीत राहावा यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आज १४ मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.या बैठकीत अत्यावश्यक सेवांशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी तसेच तेल-गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना इंधनाचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे निर्देश दिले.इंधन साठा,वाहतूक व वितरण व्यवस्थेचा आढावा घेऊन संभाव्य अडचणी वेळेत दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला.
जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल व एलपीजी पुरवठ्याबाबत सविस्तर माहिती दिली. सध्या जिल्ह्यात १४९ पेट्रोल पंप कार्यरत असून विविध कंपन्यांच्या २७ गॅस एजन्सी कार्यरत आहेत.घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी नियमित तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले.
बैठकीत पेट्रोल पंप व गॅस एजन्सीच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.जर अशा ठिकाणी गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित पोलिस निरीक्षकांशी समन्वय साधून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी,असेही सांगण्यात आले.आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
घरगुती गॅसची साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधित पोलिस निरीक्षकांनी त्या ठिकाणी धाड टाकून साठा जप्त करून नियमांनुसार कडक कारवाई करावी,असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.प्रत्येक तालुक्यात घरगुती गॅस वितरणाबाबत तसेच शिल्लक साठ्याबाबत नियमित आढावा घेण्याचेही ठरविण्यात आले.
औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसच्या मागणीची नोंद संबंधित जिल्हा गॅस एजन्सी समन्वय अधिकारी यांच्याकडे करावी,असे बैठकीत सांगण्यात आले. यासाठी शासनाच्या edlpg@bharatpetroleum.in, indanecareho@indianoil.in आणि lpg.sbu.head@hpcl.in या ई-मेल आयडीवर मागणी नोंदवता येणार असल्याची माहिती देण्यात आली.
आगामी काळात तुळजापूर व येरमाळा येथे होणाऱ्या यात्रांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व व्यावसायिकांना लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने संबंधित तहसीलदारांनी तालुक्यातील मागणीचा आढावा घेऊन ती जिल्हा गॅस एजन्सी समन्वय अधिकाऱ्यांकडे नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या.बैठकीत सर्व निरीक्षण अधिकाऱ्यांकडून त्यांच्या तालुक्यातील घरगुती गॅस वितरण व्यवस्था,उपलब्ध साठा तसेच केलेल्या तपासणी कारवाईचा आढावा घेण्यात आला.तसेच पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना गॅस वितरणाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस पोलीस अधीक्षक रितु खोखर, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,समाज कल्याण अधिकारी एस.ए.लमकाने,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे,शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी पी.एम.पांडे,निमा अध्यक्ष डॉ.पंकज शिनगारे,एमएएनजीए वे.अ.अध्यक्ष डॉ.एस.बी.बलकंडे, FOGSI धाराशिवचे सेक्रेटरी डॉ.आय.के.मुल्ला,आयएमए धाराशिवचे डॉ.सचिन देशमुख,जिल्हा गॅस एजन्सी समन्वयक रिझवान पटेल,इंडियन ऑईलचे सेल्स ऑफिसर प्रकाश राठोड तसेच एचपीसीएल ऑईलचे सेल्स ऑफिसर लिखित रेड्डी आदी उपस्थित होते.
*****
Friday, 13 March 2026
नौदल माजी सैनिक व कुटुंबीयांसाठी २५ मार्च रोजी धाराशिवमध्ये कल्याण मेळावा
नौदल माजी सैनिक व कुटुंबीयांसाठी २५ मार्च रोजी धाराशिवमध्ये कल्याण मेळावा*
धाराशिव,दि.१३ मार्च (जिमाका) भारतीय नौदल सैनिक,नौदल वीरनारी, नौदल युद्ध विधवा तसेच नौदल माजी सैनिकांच्या कल्याणासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील नौदल सैनिक,नौदल वीरनारी,नौदल युद्ध विधवा तसेच नौदल माजी सैनिकांच्या अवलंबितांच्या भेटीच्या मोहिमेंतर्गत जिल्ह्याच्या भेटीसाठी २५ मार्च २०२६ रोजी धाराशिव येथे येणार आहेत.
या भेटीदरम्यान नौदलातील माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना येणाऱ्या अडचणींचे मुद्दे जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन केले जाणार असून विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात येणार आहे.
या मेळाव्यास नौसेनेतील सर्व माजी सैनिक,माजी सैनिकांच्या पत्नी तसेच सर्व वयोवृद्ध सैनिकांनी दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह,धाराशिव येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि) यांनी केले आहे.
*************
खेळाडूंना दिलासा ! ५ टक्के आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली* घरबसल्या डिजिटल प्रमाणपत्राची सुविधा
*खेळाडूंना दिलासा ! ५ टक्के आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली*
घरबसल्या डिजिटल प्रमाणपत्राची सुविधा
धाराशिव,दि.१३ मार्च (जिमाका) राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ,पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे.
*प्रणालीची वैशिष्ट्ये आणि महत्त्व*
ब्लॉकचेन तंत्रज्ञान : ही प्रणाली ब्लॉकचेन (Blockchain) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आधारित असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करणे शक्य नाही.त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसेल.त्वरित पडताळणी : खेळाडूंनी माहिती भरल्यानंतर ती मूळ डेटाशी जुळल्यास अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो.QR कोड सुरक्षा : प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय QR कोड असेल.हा कोड स्कॅन करून संबंधित नियुक्ती प्राधिकारी (उदा. MPSC,पोलीस भरती) प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळू शकतील.
आगामी पदभरतीसाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी.
ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली आहे,त्यांनी यापुढे शासकीय व निमशासकीय भरतीसाठी अर्ज सादर करावयाचा असल्यास या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे.
या प्रणालीअंतर्गत ५ टक्के खेळाडू आरक्षणाचे संघटनेमार्फत प्राप्त अभिलेख ‘क्रीडा ई-प्रमाण’ पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात येत आहेत.या अभिलेखाद्वारे खेळाडू आपले ५ टक्के खेळाडू प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकतात.
यासाठी आवश्यक असणारा तपशील पुढीलप्रमाणे आहे :
*खेळाडूंनी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य*
ज्या खेळाडूंनी अधिकृत स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले आहे अशा सर्व खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://sports.maharashtra.gov.in/ भेट द्यावी.
संकेतस्थळावर सर्वांत खाली आमच्या सेवा (Our Services) मध्ये ५ टक्के Reservation या टॅबमध्ये जाऊन आपली एक वेळ नोंदणी पूर्ण करावी.
या नोंदणीकरिता वैयक्तिक माहिती व क्रीडा ई-प्रमाण पोर्टलवर अर्ज नोंदणीसाठी खेळाडूंनी आपल्या आधार संलग्न (Aadhaar-linked) मोबाईल क्रमांकाचा आणि आयडीचा वापर करणे आवश्यक आहे.तसेच स्वतःचा योग्य व दैनंदिन वापरातील ई-मेल आयडी,आधार कार्ड पीडीएफ आणि क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्रावीण्य प्रमाणपत्र यासह नोंदणी करणे आवश्यक आहे.
ज्या खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहेत,त्यांनी तात्काळ या प्रणालीचा लाभ घेऊन आपले डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र घरबसल्या प्राप्त करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.
**************
बालविवाहमुक्त अभियानाला धाराशिवमध्ये गती *चाइल्ड हेल्पलाईन १०९८ तर्फे विविध ठिकाणी जनजागृती उपक्रम*
बालविवाहमुक्त अभियानाला धाराशिवमध्ये गती
*चाइल्ड हेल्पलाईन १०९८ तर्फे विविध ठिकाणी जनजागृती उपक्रम*
धाराशिव,दि.१३ मार्च (जिमाका) बाल विवाह मुक्त अभियानाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चाइल्ड हेल्प लाईन कक्ष १०९८ अंतर्गत विविध ठिकाणी जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे तसेच चाइल्ड हेल्प लाईन १०९८ चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
या अंतर्गत धाराशिव येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था अध्यापक विद्यालय,धाराशिव, माविम अंतर्गत कार्यशाळेमध्ये माहिती देण्यात आली.तसेच रविकिरण स्कूल धाराशिव,रामतीर्थ तांडा तुळजापूर एन.एस.एस. कॅम्प, जि.प.प्रा.शा. तावरजखेडा,जि.प. प्रा.शा.खामसवाडी,जि.प.प्रा. शा. चिवरी,एस.एस.पी.महिला नेतृत्व विकास कार्यक्रम संवाद कार्यशाळा, जि.प.प्रा.शा.जागजी येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी बालहक्क तसेच मुलांच्या समस्या याबाबत माहिती देण्यात आली. तसेच बेटी बचाव,बेटी पढाव आणि बालविवाह या विषयांवरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बालकांसंबंधी विविध योजनांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.
चाइल्ड हेल्प लाईन कक्षाचे समुपदेशक वंदना कांबळे, सुपरवायझर अमर भोसले,पल्लवी पाटील तसेच केस वर्कर अभयसिंह काळे यांनी १०९८ चाइल्ड हेल्प लाईन कक्षाविषयी माहिती दिली.
या जनजागृती कार्यक्रमाला संबंधित प्रशाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
00000
*धाराशिवमध्ये १८ मार्च रोजी उद्योजक मेळावा ; तज्ञांचे मार्गदर्शन व गुंतवणूक संधींची माहिती*
*धाराशिवमध्ये १८ मार्च रोजी उद्योजक मेळावा ; तज्ञांचे मार्गदर्शन व गुंतवणूक संधींची माहिती*
धाराशिव,दि.१३ मार्च (जिमाका) कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग,महाराष्ट्र शासन,दे आसरा फाऊंडेशन आणि व्यवस्थापन शास्त्र विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,उपपरिसर धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्थळ – ऑडिटोरियम हॉल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर,एम.आय.डी.सी कॅम्पस,धाराशिव येथे उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या उद्योजक मेळाव्यामध्ये व्यवसायाला चालना देणे,नवीन कल्पना (Ideas) शेअर करणे आणि गुंतवणूकदारांशी जोडणे यासह भांडवल उभारणीसाठी विविध सरकारी योजनांची माहिती दिली जाणार आहे.याबाबत या क्षेत्रातील तज्ञ पल्लवी पाटील (रुरल एंटरप्राइजेस फायनान्स सपोर्ट कन्सल्टंट) यांचे मार्गदर्शन होणार आहे.तसेच उद्योजकांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही या मेळाव्यात मिळणार आहेत.
याचबरोबर धाराशिव येथील सुप्रसिद्ध उद्योजक तसेच शेती व मध उत्पादनातील तज्ञ तेजस लिमकर यांच्यासोबत खास बातचीतची संधीही उपलब्ध होणार आहे.तसेच शासनाच्या विविध विभागांकडून उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही या मेळाव्यात देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,दे आसरा फाऊंडेशन आणि व्यवस्थापनशास्त्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,उपपरिसर धाराशिव यांनी केले आहे.या उद्योजक मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२९९४३४ वर संपर्क साधावा.
*************
नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासनाची तयारी इंधन पुरवठा समस्येसाठी तालुका निहाय अधिकारी नियुक्त
नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासनाची तयारी
इंधन पुरवठा समस्येसाठी तालुका निहाय अधिकारी नियुक्त
धाराशिव दि.13 मार्च (जिमाका) : सद्यस्थितीत आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभुमीवर जिल्ह्यात घरगुती गॅसची पेट्रोल,डिझेल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांना त्वरित मदत मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने तालुका निहाय संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून संबंधित समस्याबाबत नागरिकांनी खालील संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
श्रीमती विशाखा बलकवडे,नायब तहसिलदार महसूल/ पुरवठा, धाराशिव मो. 9767587454, श्रीमती मनिषा कोळगे,निरीक्षण अधिकारी पुरवठा,तुळजापूर मो. 8888258287, सचिन बिराजदार, निरीक्षण अधिकारी पुरवठा,उमरगा मो. 9922809873,श्रीमती हर्षाली खाडे,निरीक्षण अधिकारी पुरवठा, लोहारा मो.9422615958, श्रीमती मनिषा आस्कर,निरीक्षण अधिकारी पुरवठा,भूम मो. 8805991343, गोपाल तापडिया,निरीक्षण अधिकारी पुरवठा,कळंब मो. 9527281965, मिलींद पराळे,निरीक्षण अधिकारी पुरवठा,परंडा मो.9175595212, श्रीमती विद्या राठोड,निरीक्षण अधिकारी पुरवठा,वाशी मो. 9922962461 असे आहेत.
वरील अधिकारी यांचेशी संपर्क साधण्यात काही अडचण निर्माण झाल्यास जिल्ह्याच्या टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0000
Thursday, 12 March 2026
एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर गॅस एजन्सींना प्रशासनाच्या सूचना
एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर
गॅस एजन्सींना प्रशासनाच्या सूचना
धाराशिव दि.१२ मार्च (जिमाका) जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि ग्राहकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण बैठक आज १२ मार्च रोजी घेण्यात आली.जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे,गॅस एजन्सीचे जिल्हा नोडल अधिकारी रिजवान पटेल तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीधारक उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातील गॅस स्टॉक आणि वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.तसेच एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. ग्राहकांना विहीत वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी जिल्हा नोडल अधिकाऱ्यांनी गरजेनुसार गॅस पुरवठा आणि वितरण यामध्ये समन्वय राखावा,तसेच गॅस एजन्सींनी वितरण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार ठेवावी,अशा सूचना देण्यात आल्या.
तसेच शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशांनुसारच गॅस सिलेंडरचे वाटप करावे,ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम आकारल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल,असा इशाराही बैठकीत देण्यात आला.प्रशासनाच्या या सूचनांमुळे जिल्ह्यातील एलपीजी गॅस वितरण अधिक शिस्तबद्ध व ग्राहकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.
****
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी प्रशासन सज्ज ३३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विरुद्ध कारवाईचे आदेश
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी प्रशासन सज्ज
३३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विरुद्ध कारवाईचे आदेश
धाराशिव दि.१२ मार्च (जिमाका) भारत निवडणुक आयोग,नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशातील ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision – SIR) सुरू करण्यात आला आहे.पुढील टप्प्यात महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार असल्याने त्याबाबतची पूर्वतयारी करण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली ११ मार्च २०२६ रोजी झाली.
या बैठकीस जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधी,मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच नायब तहसीलदार (निवडणूक) उपस्थित होते.बैठकीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत उपस्थितांना संक्षिप्त माहिती देण्यात आली.
यावेळी मतदान केंद्रनिहाय Booth Level Agent (BLA) यांची नियुक्ती करून मतदार यादीची पडताळणी करण्यासाठी Booth Level Officer (BLO) यांच्याशी समन्वय साधावा,तसेच SIR कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी SIR अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.सन २००२ मधील मतदार यादीतील मतदारांची सन २०२४ च्या मतदार याद्यांशी पडताळणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली.मात्र,जिल्ह्यातील एकूण ३३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी अद्याप SIR संदर्भातील कामकाज सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर संबंधित ३३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) विरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मतदार नोंदणी अधिकारी तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान,मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सन २०२४ मधील मतदारांची सन २००२ मधील मतदारांशी पडताळणी करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
*****
Wednesday, 11 March 2026
एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास ग्राहक आयोगाकडे तक्रार करा जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठक
एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास ग्राहक आयोगाकडे तक्रार करा
जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार
जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठक
धाराशिव,दि.११ मार्च (जिमाका) सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण समिती सदस्य सचिव श्रीमती स्वाती शेंडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप कुटे,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र खंदारे,ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिन कवडे,शरद वडगांवकर,रवीशंकर पिसे,संतोष केंदळे,आशिष बाबर,अजित बागडे, तसेच ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य अंकुश उबाळे, रविंद्र शिराळ,बालाजी जावळे, शहाजी चेडे,गजानन कुलकर्णी यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय सदस्य आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत मागील बैठकीतील इतिवृत्ताच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.त्यानंतर अशासकीय सदस्यांनी विविध ग्राहक संबंधित समस्या मांडल्या.यामध्ये खवामधील भेसळ,मिठाईमध्ये वापरण्यात येणाऱ्या तेलावर एक्सपायरी नसणे, रस्त्यावरील खाद्यपदार्थांची विक्री,हॉटेल्समधील अस्वच्छता, बसस्थानकांमधील स्वच्छतागृह वापरण्यासाठी महिला प्रवाशांकडून पैसे घेणे,खाजगी शिकवणी वर्गांकडून अवाजवी शुल्क आकारणे,गुटखा बंदी असतानाही पानटपऱ्यांवर सर्रास विक्री होणे, नगर परिषदेमार्फत शहरात पिण्याचे पाणी वेळेवर न येणे,नाले सफाईची कामे वेळेवर न होणे,गर्दीच्या ठिकाणी सुलभ शौचालयांची कमतरता,ग्रामीण भागात अनुदानित संस्थेमार्फत व्हॅकेशन बॅचेसच्या नावाखाली आर्थिक लूट तसेच पेट्रोल पंपावर स्वच्छतागृहांची सुविधा नसणे अशा विविध समस्या उपस्थित करण्यात आल्या.
ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या अडचणी या संयुक्तिक व गरजेच्या असून त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात,तसेच संबंधित दोषींवर दंडात्मक व सक्त कारवाई करावी,अशा सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. त्यांनी स्पष्ट केले की,एमआरपीपेक्षा जास्त दराने खाद्यपदार्थांची विक्री होत असल्यास नागरिकांनी ग्राहक आयोगाकडे तक्रार नोंदवावी.
00000
Tuesday, 10 March 2026
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत लातूर विभागात ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र २० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत लातूर विभागात ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र
२० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
धाराशिव दि.१० मार्च (जिमाका) राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लातूर विभागासाठी अॅथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.या केंद्रासाठी पात्र खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या विभागीय क्रीडा निपुणता केंद्राअंतर्गत अँथलेटिक्स व कुस्ती या खेळांसाठी प्रत्येकी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.इच्छुक व पात्र खेळाडूंनी आपले अर्ज विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा,लातूर विभाग,जिल्हा क्रीडा संकुल परिसर,औसा रोड,लातूर येथे प्रत्यक्ष सादर करावेत किंवा dyd.syslatur@rediffmail.com या ई-मेलवर दिनांक २० मार्च २०२६ पर्यंत पाठवावेत.
या निवडीसाठी अर्जदार खेळाडूंची वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२६ रोजी २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.तसेच अर्जासोबत जन्म दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र,आधार कार्ड,मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे,पासपोर्ट साईजचे तीन फोटो,शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच पालकांचे संमतीपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
अर्ज करणारा खेळाडू महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.क्रीडा कामगिरीच्या निकषानुसार राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये (SGFI,AFI, Khelo India National) सहभागी झालेले खेळाडू पात्र राहतील.मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येणार असून क्रीडा कौशल्य व शारीरिक तंदुरुस्ती (फिटनेस) चाचण्यांमध्ये पात्र ठरणे आवश्यक राहील.याशिवाय शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणेही अनिवार्य आहे.
मिशन लक्ष्यवेध या योजनेअंतर्गत निवड झालेल्या खेळाडूंना निवासी क्रीडा प्रशिक्षण,आवश्यक पायाभूत सुविधा,क्रीडा साहित्य,सराव व मूल्यमापनासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन, स्पोर्ट्स सायन्स सेंटरची सुविधा,करिअर मार्गदर्शन तसेच देशी-विदेशी संस्थांच्या सहकार्याने क्षमता विकास कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय निवास,भोजन,पूरक आहार, क्रीडा व प्रशिक्षण साहित्य,देशांतर्गत व परदेशातील प्रशिक्षण तसेच स्पर्धांमध्ये सहभागासाठीचा खर्च,वैद्यकीय तपासण्या आणि किरकोळ वैद्यकीय खर्च याची सोय विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा,लातूर विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मिशन लक्ष्यवेध या योजनेअंतर्गत प्रवेशासाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी अर्ज करावा,तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
******
‘काचबिंदू’विषयी जनजागृती अत्यावश्यक ; वेळोवेळी तपासणी केल्यास अंधत्व टाळता येते डॉ.धनंजय चाकुरकर
‘काचबिंदू’विषयी जनजागृती अत्यावश्यक ; वेळोवेळी तपासणी केल्यास अंधत्व टाळता येते
डॉ.धनंजय चाकुरकर
धाराशिव दि.९ मार्च (जिमाका) काचबिंदू या डोळ्यांच्या आजाराची लक्षणे सहसा सहज ओळखता येत नसल्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन योग्य वेळी उपचार घेतल्यास काचबिंदूमुळे होणारे अंधत्व टाळता येऊ शकते,असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांनी केले.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्या वतीने ८ मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत “Uniting for a Glaucoma-Free World – काचबिंदू मुक्त जगासाठी एकत्र येऊया” या घोषवाक्याखाली जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येत आहे.या सप्ताहानिमित्त दि.९ मार्च २०२६ रोजी नेत्र विभागात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नेत्रशल्यचिकित्सक डॉ.ज्योती कानडे यांनी काचबिंदू होण्याची कारणे,या आजारापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी आणि समाजात वाढत असलेले काचबिंदूचे प्रमाण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,वयाची ४० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांनी किमान सहा महिन्यांतून एकदा तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.त्यामुळे काचबिंदूचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार करता येतात आणि अंधत्वाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर उपस्थित होते.नेत्र विभागाचे प्रमुख नेत्रशल्यचिकित्सक डॉ.महेश पाटील,डॉ.मुस्तफा पल्ला, डॉ.पवन महाजन,डॉ.सायली कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी नेत्रचिकित्सा अधिकारी श्री.रामराजे बिडवे,श्री.बाळासाहेब घाडगे,नर्सिंग स्टाफ श्रीमती.कविता भातलंवडे, श्रीमती.पल्लवी राऊत,समुपदेशक श्री.उमेश गोरे यांच्यासह रुग्णालयीन कर्मचारी,तपासणीसाठी आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचीही उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ.महेश पाटील यांनी मानले.
*****
परंड्यात १३ मार्चला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २१० पदांसाठी उमेदवारांची निवड होणार
परंड्यात १३ मार्चला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
२१० पदांसाठी उमेदवारांची निवड होणार
धाराशिव दि.१० मार्च (जिमाका ) शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने शुक्रवार,१३ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मॉडेल करिअर सेंटर धाराशिव आणि शिक्षणमहर्षी गुरुदेव आर.जी.शिंदे महाविद्यालय अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र,परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी गुरुवर्य आर.जी.शिंदे महाविद्यालय, परंडा येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर,धाराशिव,बार्शी व परंडा येथील विविध आस्थापना सहभागी होणार असून त्या सुमारे २१० पदांसाठी उमेदवारांची निवड करणार आहेत.तसेच मेळाव्यात उपस्थित उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
तरी या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्यात जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी सहभागी व्हावे,असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२९९४३४ वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
*******
Monday, 9 March 2026
राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभारता येणार नाही
राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांसाठी मार्गदर्शक तत्वे
जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभारता येणार नाही
धाराशिव दि.९ मार्च (जिमाका) राज्यात राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्याबाबत स्पष्ट व सुसूत्र प्रक्रिया निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २ मे २०१७ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.या निर्णयानुसार राज्यातील गाव,शहर किंवा सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रपुरुष अथवा थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली असून अशा पुतळ्यांना परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
शासनाकडे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांबाबत अनेक प्रस्ताव येत असतात.मात्र या प्रस्तावांसोबत जोडलेली मान्यता पत्रे,ठराव आणि ना-हरकत प्रमाणपत्रे अनेकदा जुन्या तारखेची असल्याने निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या.तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने १८ जानेवारी २०१३ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशांचाही विचार करणे आवश्यक असते.त्यामुळे अनेक प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित राहत होते.हा विलंब टाळण्यासाठी आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासनाने मान्यता देण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीचा २ फेब्रुवारी २००५ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून नवीन मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली आहेत.
या निर्णयानुसार राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही.पुतळे हे स्थानिक लोकांच्या पुढाकारातून व लोकवर्गणीतून उभारावेत,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पुतळा उभारण्याची मागणी करणारी संस्था नोंदणीकृत असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुतळा उभारण्यासंदर्भातील प्रस्तावांची छाननी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी “पुतळा समिती” स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या समितीत जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा नगरपालिका/नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आणि निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य म्हणून काम पाहतील.
पुतळा उभारण्यासाठी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शासकीय,निमशासकीय किंवा खाजगी जागेवर पुतळा उभारू शकणार नाही.पुतळा उभारण्याची जागा वादमुक्त असणे आवश्यक असून ती अनधिकृत किंवा अतिक्रमित नसावी.जागेच्या मालकी हक्काबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.तसेच पुतळा उभारलेल्या जागेचा वापर इतर कोणत्याही प्रयोजनासाठी करता येणार नाही.
पुतळ्याच्या चबुतऱ्याचे मोजमाप, आराखडा,साईट प्लॅन,पुतळ्याची उंची,वजन,रंग आणि तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धातू किंवा साहित्याचा तपशील मुख्य वास्तुशास्त्रज्ञ,महाराष्ट्र राज्य यांना सादर करून त्यांची मान्यता घेणे आवश्यक राहील.तसेच पुतळ्याच्या क्ले मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेऊन ब्राँझ,फायबर किंवा इतर धातूपासून पुतळा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुतळा उभारल्यामुळे गाव किंवा शहराच्या सौंदर्यात बाधा येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,स्थानिक वाद किंवा जातीय तणाव वाढणार नाही याची खात्री करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक अल्पसंख्यांक व नागरिकांचा विरोध नसल्याचा स्पष्ट उल्लेखही त्या प्रमाणपत्रात असणे गरजेचे आहे.
शासकीय,निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिसरात पुतळा उभारण्यासाठी संबंधित मंत्रालयीन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.स्थानिक स्वराज्य संस्थेने पुतळा उभारण्याबाबत ठराव करून तो प्रस्तावासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.तसेच पुतळा उभारल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याबाबत पोलीस विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील.
भविष्यात रस्ते रुंदीकरण किंवा इतर विकासकामांमुळे पुतळा हलविण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास त्यास विरोध न करता स्वखर्चाने हलविण्याबाबत संबंधित संस्थेकडून शपथपत्र घेण्यात येणार आहे.तसेच पुतळ्याची देखभाल, मांगल्य आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी संबंधित संस्थेने स्वीकारणे आवश्यक राहील. पुतळ्याचा सर्व खर्च संस्था उचलेल आणि शासनाकडे निधीची मागणी करणार नाही,असे वचनपत्रही प्रस्तावासोबत देणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रस्तावाची सर्व बाजूंनी छाननी करून कारणमीमांसेसह स्पष्ट शिफारस करावी.त्यानंतर जिल्हाधिकारी पुतळा उभारण्यास मान्यता देऊ शकतील.तसेच सर्वोच्च न्यायालयाने १८ जानेवारी २०१३ रोजी दिलेल्या आदेशांचे पालन होत असल्याची खात्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मान्यता देताना आदेशामध्ये पुतळ्याचे अचूक स्थान,जागेची मालकी,सर्वे क्रमांक,रस्त्यापासूनचे अंतर,तसेच देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कोणाकडे आहे याचा संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक राहील.प्रस्तावासोबत जोडलेली ठरावे आणि ना-हरकत प्रमाणपत्रे एक वर्षापेक्षा जुनी नसावीत,अशीही अट घालण्यात आली आहे.तसेच एकाच राष्ट्रपुरुषाचा पुतळा त्या गावात किंवा शहरात दोन किलोमीटरच्या परिसरात आधीपासून नसल्याची खात्री करूनच नवीन पुतळ्यास परवानगी देण्यात येईल.
वरील मार्गदर्शक तत्वे सूचनात्मक असून स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अतिरिक्त निकष निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहेत.सर्व अटींची पूर्तता झाल्यासच पुतळा उभारण्यास परवानगी देण्यात येईल,अन्यथा प्रस्ताव नाकारण्याचे अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांकडे राहतील.
******
पत्रकारांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषद धाराशिवचा पुढाकार आरोग्य तपासणी शिबिरात ७१ जणांची तपासणी
पत्रकारांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषद धाराशिवचा पुढाकार
आरोग्य तपासणी शिबिरात ७१ जणांची तपासणी
धाराशिव,दि.९ मार्च (जिमाका)
जिल्हा परिषद धाराशिव व आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमातील प्रतिनिधींसाठी आरोग्य तपासणी शिबिर व विविध शासकीय योजनांची माहिती देणारी कार्यशाळा आज ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आली. कै.यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद धाराशिव येथे पार पडलेल्या या शिबिराला जिल्ह्यातील माध्यमांच्या प्रतिनिधींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये पत्रकारांसह अधिकारी-कर्मचारी अशा एकूण ७१ जणांची तपासणी करण्यात आली.शिबिरात बाह्यरुग्ण तपासणीअंतर्गत २६ पत्रकार व ४५ अधिकारी-कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच प्रयोगशाळा तपासणी ५० जणांची करण्यात आली.मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी ७१ जणांची करण्यात आली असून ईसीजी तपासणी ४६ जणांची करण्यात आली.याशिवाय आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नोंदणीचे कामही करण्यात आले.
आरोग्य तपासणीबरोबरच जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना व उपक्रमांची माहिती पत्रकारांना देण्यात आली. दुपारच्या सत्रात विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यामुळे पत्रकारांना शासनाच्या योजनांची अचूक माहिती मिळून ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या आरोग्य शिबिरास जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,प्रकल्प संचालक अनुप शिंगुलवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) देवदत्त गिरी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पत्रकारांनी स्वागत केले असून अशा उपक्रमांमुळे पत्रकारांना आरोग्याविषयी जागरूकता मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
******
पुतळे उभारताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार महापुरुषांचे पुतळे उभारणीबाबत बैठक
पुतळे उभारताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
महापुरुषांचे पुतळे उभारणीबाबत बैठक
धाराशिव दि.९ मार्च (जिमाका) जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात थोर पुरुषांचे पुतळे उभारण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सादर करावा.काही ठिकाणी युवावर्ग अतिउत्साहात चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी पुतळे उभारतात.हे अत्यंत चुकीचे आहे.थोर पुरुषांचे पुतळे उभारताना राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
आज ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे उभारण्याबाबतच्या बैठकीत श्री.पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती.रितू खोखर,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार,नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सह आयुक्त श्री.त्र्यंबक ढेंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.पूजार म्हणाले की,पुतळा उभारण्यास अधिकृत परवानगी असली तरच संबंधित पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी शासनाकडून निधी मिळू शकतो.चुकीच्या पद्धतीने पुतळे उभारल्यास कायमचे नुकसान आहे.ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे, त्या ठिकाणी तो उभारण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने पुतळा उभारणार्या युवा वर्गावर एकदा एफआयआर दाखल झाला तर युवा वर्गाचे भविष्य कायमचे खराब होते.त्यामुळे पुतळा उभारताना आवश्यक त्या परवानग्या घेऊनच पुतळा उभारावा असे श्री.पुजार यावेळी म्हणाले.
डॉ.श्री.घोष म्हणाले,आपण जो पुतळा उभारणार आहोत त्याच्या सर्व परवान्या घेणे आवश्यक आहे.केवळ परवानगी घेऊनच पुतळा उभारून चालणार नाही तर त्याची देखभाल करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.पुतळा उभारणार्या संस्थेने पुतळ्याच्या क्ले मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेऊनच पुतळा तयार करावा.मान्यता घेतलेल्या मॉडेल प्रमाणेच पुतळा उभारण्याची दक्षता घ्यावी. पुतळा उभारण्याचे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर पुतळा उभारण्याबाबत परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे डॉ.श्री.घोष यावेळी म्हणाले.
श्रीमती.खोखर म्हणाल्या की,ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे,तो रीतसर पद्धतीने बसवावा.आवश्यक सर्व परवानग्या घेऊनच पुतळा उभारून महापुरुषांचा सन्मान राखावा.शासनाच्या मार्गदर्शक तत्वांच्या पालनातून पुतळा उभारावा.पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे,त्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक त्या परवानग्या घेऊनच पुतळा उभारावा.विशेषता पुतळे उभारताना युवा वर्गाने दक्षता घ्यावी.ज्यांनी चुकीच्या पद्धतीने व विनापरवानगीने जिथे पुतळे उभारले आहे,त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे श्रीमती.खोखर यांनी सांगितले.
पुतळे उभारण्याबाबत प्रत्येकाने जबाबदारीने वागावे असे सांगून श्रीमती.खोखर म्हणाल्या की,जाती धर्मात तेढ निर्माण होणार नाही अशाप्रकारच्या चुकीच्या पद्धतीने पुतळे उभारण्यात येऊ नये.भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी.ज्यांनी जे पुतळे अनधिकृत पद्धतीने उभारले आहेत,त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.त्यामुळे कायदेशीर पद्धतीनेच पुतळ्याची उभारणी करावी.असे श्रीमती.खोखर यावेळी म्हणाल्या.
या बैठकीला धाराशिव पंचायत समितीच्या सभापती श्रीमती.गोकर्णा कदम,शांतता समितीचे धनंजय शिंगाडे,प्रकाश जगताप, विश्वास शिंदे,मशायक सामीयुद्दीन,धनंजय राऊत,श्री.कुरेशी,प्रवीण सूर्यवंशी,शेख अयास,जाकीर पठाण,इस्माईल काझी, सिद्धार्थ बनसोडे,ज्ञानेश्वर करवट,गोपाल कदम,आबासाहेब बर्गे,सुनील अंबडेकर, नगरपालिकांचे मुख्याधिकारी सर्वश्री लक्ष्मण कुंभार,अजिंक्य रणदिवे,श्रीमती. शैला डाके,श्रीमती.सुरेखा कांबळे,जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक आमोद भुजबळ यांची तर ऑनलाइन पद्धतीने काही पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती,नगरपालिकांचे नगराध्यक्ष, सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी,सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक उपस्थित होते. यावेळी सभागृहात उपस्थित शांतता समितीच्या काही सदस्यांनी पुतळा उभारण्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.निवासी उपजिल्हाधिकारी श्री.कडवकर यांनी प्रास्ताविकातून पुतळे उभारण्यासंबंधीच्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती यावेळी दिली व उपस्थितांचे त्यांनी आभार मानले.
******
Subscribe to:
Posts (Atom)













