Friday, 1 September 2017

अवयवदान ही लोकचळवळ बनली पाहिजे -डॉ.गजानन परळीकर



उस्मानाबाद.दि.1:- अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करुन त्याबाबत असणारे  गैरसमज दूर करुन  अवयदान लोकचळवळ बनण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा अवयवदान मोहीम समन्वयक डॉ.गजानन परळीकर यांनी केले.
            जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने चिकुंद्रा तालुका तुळजापूर येथे आयोजित ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात डॉ. परळीकर बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक श्री. विलास जोंधळे, महिला हक्क संरक्षण अधिकारी दिनेश घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी बोलताना डॉ. परळीकर म्हणाले की, ज्याप्रमाणे जनजागृतीच्या माध्यमातून देशात रक्तदानाची चळवळ उभी राहिली त्याप्रमाणे अवदानाचीही चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. यासाठी या मोहिमेमध्ये सर्वांनी मिळून सामुहीक प्रयत्न करणे आवश्यक आहे. अवयवदानाविषयी असणारे गैरसमज दूर करुन जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करावे,असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
            यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक श्री. जोंधळे म्हणाले की, वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या  विविध व्यवसायावर आधारित अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरु करण्याची गरज आहे.
            यावेळी महिला हक्क संरक्षण अधिकारी दिनेश घुगे यांनी महिला विषयी शासनाच्या विविध योजना व कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
             जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ‘संवाद पर्व’ कार्यक्रम आयोजनाचा उद्देश उपस्थिताना समजावून सांगितला. तसेच महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य हे मासिक राज्य शासनातर्फे दरमहा प्रसिध्द करण्यात येते. या मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनाची माहिती मिळते, त्याचबरोबर स्पर्धापरिक्षेसाठी उपयुक्त असणारे मासिक आसल्याने लोकराज्य मासिकाचे वार्षिक  वर्गणीदार होण्याचे आवाहन करुन  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महान्यूज,  दिलखुलास, जय महाराष्ट्र उपक्रमाची माहिती दिली.
या संवाद पर्व कार्यक्रमात "मी मुख्यमंत्री बोलतोय" या कार्यक्रमाची चित्रफीत, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने केलेल्या कामाची चित्रफीत तसेच बळीराजा चेतना अभियानावरील लघुपट उपस्थितांना दाखविण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सत्यवान गायकवाड यांनी केले व आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाविषयीची माहिती दिली. कार्यक्रमास गणेश मंडळाचे पदाधिकारी  कल्याण मोटे, दिपक मोटे, प्रमोद गायकवाड, सौदागर मोटे, गणेश गायकवाड, गोविंद गायकवाड, सुधाकर गायकवाड, सहदेव जाधव, नितीन गायकवाड, गिरीधर मोटे, भैरव मोटे, श्रीकांत गायकवाड, भगिरथ गायकवाड, चांगदेव जाधव यांच्यासह ग्रामस्थांची तसेच विशेष करुन महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 

'संवाद पर्व' कार्यक्रमाद्वारे शासनाच्या विविध योजनांची/उपक्रमांची माहिती आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणार


उस्मानाबाद, दि.31:- माहिती व जनसंपर्क महासंचलनालयांतर्गत उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालयच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात शासनाच्या विविध योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी "संवाद पर्व" या कार्यक्रमाचे आयोजन उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रावरुन करण्यात येणार आहे.
            या "संवाद पर्व" कार्यक्रमात शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचावी यासाठी आकाशवाणी केंद्रावरुन विविध विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागा मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती सांगणार आहेत.
यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना "शेतकरी राजा आणि पशुधन" या विषयावर सविस्तर माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नामदेव आघाव यांनी दिली.
            सुशिक्षित बेरोजगारी सध्या एक समस्या बनल्याने युवकांनी जास्तीत जास्त स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षण ही काळाची गरज असल्याने याबाबत "कौशल्य विकास आणि उद्योजकता" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन औद्योगिक संस्थेचे डॉ.विकास जोंधळे यांनी केले.
            अवयवदानाबाबत समाजात जागरुकता वाढत असली तरी अवयवदानाबाबतीत सर्वसामान्यांच्या मनात अनेक शंका निर्माण होतात,अवयवदाना विषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. धनंजय पाटील व डॉ.गजानन परळीकर हे "रुग्ण सेवा आणि अवयवदान" या विषयावर माहिती सांगितली.
            शासनाच्या युवक व क्रीडा योजनाची माहिती व युवकासाठी शासनाचे क्रीडा धोरण व "मिशन महाराष्ट्र फूटबॉल वन मिलियन" या विषयी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक हे सविस्तर मागदर्शन करुन माहिती सांगितली.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र उपक्रमाची सविस्तर माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी विषद केली..या कार्यक्रमासाठी आकाशवाणीचे संजय बरिदे व कृष्णा शिंदे यांनी मुलाखती घेतल्या असून याचे प्रसारण रोज सकाळी 8.40 वाजता होणार आहे, तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षणाचा लाभ घेऊन तरुणांनी उद्योजक व्हावे -- प्राध्यापक जोंधळे सर


        उस्मानाबाद, दि.30:- वाढत्या बेरोजगारीचा विचार करता त्यामानाने आज रोजगार उपलब्ध होत नाहीत. त्याकरीता  आजच्या युवा पिढीने नौकरीच्या मागे न लागता औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करुन स्वत:चा व्यवसाय उभा करावा, असे असे प्रतिपादन औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक श्री. जोंधळे यांनी केले.
             माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाने गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देवून जनजागृती करण्याकरीता ‘संवाद पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने केकस्थळवाडी येथील सभागृहात ‘संवाद पर्व’ उपक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालय, आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. प्रा. श्री. जोंधळे सर, जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक श्री. जोंधळे यांनी औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, तसेच विविध व्यवसायावर आधारित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊन युवक-युवतींनी स्वयंरोजगार सुरु करण्याची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकातील सुशिक्षीत बेरोजगारांनी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार असेही यावेळी त्यांनी सांगीतले.  
            याप्रसंगी मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाची चित्रफीत, जिल्हा माहिती कार्यालय निर्मित बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने केलेल्या कामाची चित्रफीत तसेच सप्तश्रृंगी बहुउद्देशिय सामाजिक संस्था, उस्मानाबाद निर्मित बळीराजा चेतना अभियानाचा लघुपट यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ‘संवाद पर्व’ कार्यक्रम आयोजनाचा उद्देश उपस्थिताना समजावून सांगितला. तसेच महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य हे मासिक राज्य शासनातर्फे दरमहा प्रसिध्द करण्यात येते. या मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजना, मंत्रीमंडळाचे निर्णय, महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, आधुनिक तंत्रज्ञान, ज्ञान व विज्ञान,रोजगार व स्वयंरोजगार,रस्ते, पर्यटन, अशा विविध विषयांची माहिती प्रसिध्द करण्यात येते. सामान्य ज्ञानात भर घालणारी माहिती तसेच शासनाने घेतलेले निर्णय व राज्याच्या कारभाराची अधिकृत व वस्तुनिष्ठ माहिती यातून मिळते. या लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 100/- रुपये असुन वर्गणीदाराला मुंबई येथून वर्षभर अंक पोस्टाने घरपोच पाठविले जातात, शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र उपक्रमाची माहिती दिली.

            यावेळी पोपट शिंदे, गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.