उस्मानाबाद, दि.30:- वाढत्या बेरोजगारीचा विचार करता त्यामानाने आज रोजगार उपलब्ध
होत नाहीत. त्याकरीता आजच्या युवा पिढीने नौकरीच्या मागे न लागता औद्योगीक
प्रशिक्षण संस्थेतील शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करुन स्वत:चा व्यवसाय उभा करावा,
असे असे प्रतिपादन औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक श्री. जोंधळे यांनी
केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जिल्हा माहिती कार्यालय आणि
जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या
मार्गदर्शनाने गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय
योजनांची माहिती देवून जनजागृती करण्याकरीता ‘संवाद पर्व’ हा उपक्रम राबविण्यात
येत आहे. यानिमित्ताने केकस्थळवाडी येथील सभागृहात ‘संवाद पर्व’ उपक्रमाचे आयोजन
जिल्हा माहिती कार्यालय, आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
करण्यात आले होते. प्रा. श्री. जोंधळे सर, जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज
शिवाजी सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक श्री. जोंधळे यांनी
औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, तसेच विविध व्यवसायावर
आधारित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊन युवक-युवतींनी स्वयंरोजगार सुरु करण्याची गरज
आहे. आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकातील सुशिक्षीत बेरोजगारांनी स्वयंरोजगाराचे
प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार असेही यावेळी त्यांनी सांगीतले.
याप्रसंगी मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाची चित्रफीत,
जिल्हा माहिती कार्यालय निर्मित बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्हा परिषद
पशुसंवर्धन विभागाने केलेल्या कामाची चित्रफीत तसेच सप्तश्रृंगी बहुउद्देशिय
सामाजिक संस्था, उस्मानाबाद निर्मित बळीराजा चेतना अभियानाचा लघुपट यावेळी
उपस्थितांना दाखविण्यात आला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी
मनोज शिवाजी सानप यांनी ‘संवाद पर्व’ कार्यक्रम आयोजनाचा उद्देश उपस्थिताना
समजावून सांगितला. तसेच महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र “लोकराज्य” हे मासिक राज्य शासनातर्फे
दरमहा प्रसिध्द करण्यात येते. या मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय,
शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजना, मंत्रीमंडळाचे निर्णय,
महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक,
शैक्षणिक, आरोग्य, कृषी, आधुनिक तंत्रज्ञान, ज्ञान व विज्ञान,रोजगार व
स्वयंरोजगार,रस्ते, पर्यटन, अशा विविध विषयांची माहिती प्रसिध्द करण्यात येते. सामान्य ज्ञानात
भर घालणारी माहिती तसेच शासनाने घेतलेले निर्णय व राज्याच्या कारभाराची अधिकृत व
वस्तुनिष्ठ माहिती यातून मिळते. या लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 100/-
रुपये असुन वर्गणीदाराला मुंबई येथून वर्षभर अंक पोस्टाने घरपोच पाठविले जातात, शासनाच्या
विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते, माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र उपक्रमाची माहिती
दिली.
यावेळी पोपट शिंदे, गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थांची
मोठ्या संख्येने उपस्थिती होती.