Saturday, 24 January 2026
नांदेड भक्तिमय; हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात पहिल्याच दिवशी लाखो भाविक नतमस्तक
नांदेड भक्तिमय; हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात पहिल्याच दिवशी लाखो भाविक नतमस्तक
नांदेड,दि.24 (जिमाका )हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्यावतीने नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमात या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी गुरुचरणी माथा टेकवत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण केले.विविध राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमुळे नांदेड शहर भक्तिमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान,महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावत दर्शन घेतले.
गुरु गोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने राज्यस्तरीय समागम समितीच्या सहाय्याने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या जवळपास एक महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी प्रशासन आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या माध्यमातून सुरू होती. यासाठी मोदी मैदानाच्या 52 एकर परिसरात गुरुद्वाराची प्रतिकृती असलेला मंडप उभारण्यात आला असून लंगर सेवेसाठी आठ मंडप, आरोग्य शिबिर, चित्र प्रदर्शनासाठी स्वतंत्र दालने उभारण्यात आली आहेत. प्रशस्त पार्किंग,स्वच्छतेच्या उपाययोजना,पिण्याचे पाणी यासह सर्व आवश्यक सुविधांची उभारणी या मैदानावर करण्यात आली आहे.
भाविकांचा जनसागर: पारंपारिक वेशभूषा आणि बोलीभाषेतील गीतांतून जागविला भक्तिभाव
याठिकाणी उभारण्यात आलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी दरबार या मुख्य मंडपात गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला. अबालवृद्ध भक्तांनी अतिशय शिस्तबद्धपणे गुरुचरणी माथा टेकत गुरुनाम स्मरण केले.या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतलेल्या शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजातील भाविकांचा यामध्ये समावेश होता. आंध्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, तेलंगणासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.यापैकी काही महिलांनी कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या मंडपात आपापल्या बोली भाषेतील भक्तिगीते सादर करत अनोख्या पद्धतीने भक्तिभाव जागविला.
प्रशासनाचे चोख नियोजन; भाविकांची स्वयंशिस्त आणि परिसराची स्वच्छता अबाधित
52 एकराच्या विस्तीर्ण परिसरात होत असलेल्या या भव्य कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावूनही परिसराची स्वच्छता कायम होती. इतक्या मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि राज्य समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अशासकीय सदस्यांच्या मदतीने जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छतेसाठी चोख नियोजन केले होते. यासोबतच याठिकाणी येणाऱ्या भाविकांनी दाखविलेल्या स्वयंशिस्तीमुळे स्वच्छता कायम राहण्यास मदत झाली.
******
नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक: मुख्यमंत्री भगवंत मान
नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक: मुख्यमंत्री भगवंत मान
नांदेड, दि. 24 : सचखंड श्री हजूर साहिब ही श्रद्धा आणि त्यागाची पवित्र भूमी आहे. या भूमीवर होणारा शहीदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. विविध समाजातील लोक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या संयुक्त विद्यमाने मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री श्री. मान यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या.
सेवा हाच खरा धर्म आहे. या सोहळ्यातून समता, बंधुता आणि करुणेचा संदेश देशभर पोहोचत आहे. हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यांचे कार्य, त्याग व विचार येणाऱ्या पिढीसमोर असणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्री. मान यांनी सांगितले. नांदेड येथील पंजाब भवनचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुढाकार : राज्य समन्वयक रामेश्वर नाईक
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास घराघरात पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील शाळा, महाविद्यालयात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनावरील माहितीपट, गीत दाखविण्यात येत असून यामाध्यमातून त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचला आहे. नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत होत असलेल्या या कार्यक्रमात विविध राज्यातून भाविक दाखल होत आहेत. हा कार्यक्रम सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा ठरणार आहे, असे राज्य समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार डॉ. तुषार राठोड, संत ज्ञानी हरनाम सिंग, पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज, संत बाबा बलविंदर सिंग, महंत रघु मुनी यांच्यासह संत, महंत यावेळी उपस्थित होते.
सेवाभाव, समता आणि बंधुतेचा संदेश देणारी ‘लंगर सेवा’ ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचे वैशिष्ट्य, लाखो भाविकांनी घेतला सेवेचा लाभ
सेवाभाव, समता आणि बंधुतेचा संदेश देणारी ‘लंगर सेवा’ ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचे वैशिष्ट्य, लाखो भाविकांनी घेतला सेवेचा लाभ
नांदेड दि.24:‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमात लंगर सेवेच्या माध्यमातून सेवाभाव, समता व मानवतेचे अनोखे दर्शन घडत आहे. धर्म, जात, भाषा, प्रांत यांचा कोणताही भेद न करता हजारो भाविकांना एकत्र बसवून भोजन देणारी ही लंगर परंपरा या कार्यक्रमाची खरी आत्मा ठरते आहे.
हिंद-दी-चादर कार्यक्रमासाठी विविध राज्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातून भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या भाविकांना मुख्य मंडपालगत उभारण्यात आलेल्या ८ मंडपाच्या माध्यमातून लंगर सेवा दिली जात आहे. लंगर सेवा ही केवळ भोजन व्यवस्था नसून मानवी समानतेचा आणि नि:स्वार्थ सेवेचा संदेश देणारी गौरवशाली परंपरा आहे. ‘सर्व मानव समान आहेत’ या तत्त्वावर आधारित ही सेवा हिंद-दी-चादर कार्यक्रमात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून, लाखो भाविक, साधुसंत, नागरिक, स्वयंसेवक आणि पाहुण्यांना भोजन देण्यात येत आहे.
स्वयंसेवकांचा सेवायज्ञ
या लंगर सेवेत शीख बांधवांसह विविध सामाजिक संस्था, युवक-युवती, महिला, स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. भाजी कापणे, पोळ्या तयार करणे, अन्न शिजवणे, स्वच्छता राखणे, पंगतीत सेवा करणे ही कामे प्रत्येक कामात ‘सेवा हीच साधना’ या भावनेतून स्वयंसेवक करीत आहेत. अनेक जण तर पहाटेपासून उशिरा रात्रीपर्यंत न थकता सेवा देत आहेत.
समतेचे प्रत्यक्ष दर्शन
लंगरमध्ये श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, वृद्ध-लहान असा कोणताही भेद नाही. सर्वजण एकाच पंगतीत, जमिनीवर बसून भोजन ग्रहण करतात. यामुळे सामाजिक समतेचे प्रत्यक्ष दर्शन भाविकांना घडत आहे.
नेटके व्यवस्थापन
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून लंगर सेवेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, शुद्ध पाणी, आरोग्य तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
000000
शीख समाजाचा इतिहास उलगडणारे 'विरासत-ए-सीख' प्रदर्शन ठरतंय भाविकांचे आकर्षण
शीख समाजाचा इतिहास उलगडणारे 'विरासत-ए-सीख' प्रदर्शन ठरतंय भाविकांचे आकर्षण
▪️शीख योद्ध्यांनी वापरलेले शस्त्रात्रे पाहण्याची संधी; प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस
▪️शीख समाजासह नऊ समाजातील महापुरुषांच्या इतिहासाची सरल आणि सोप्या भाषेत सचित्र मांडणी
नांदेड, दि. 24 : शहरातील मोदी मैदानाच्या भव्य 52 एकर परिसरात सुरू असलेल्या हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त शीख समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारे 'विरासत-ए-सीख' हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन भाविकांसाठी आकर्षण ठरत असून या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले भाविक आवर्जून प्रदर्शनाला भेट देत आहेत.
शीख धर्माच्या स्थापनेपासून ते गुरू गोविंद सिंग यांच्यापर्यंतच्या सर्व गुरूंचा इतिहास, त्यांनी दिलेले योगदान सचित्र स्वरूपात मांडण्यात आला आहे. विशेषतः हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबत शीख योद्ध्यांनी वापरलेली विविध शस्त्रास्त्रे या प्रदर्शन दालनात ठेवण्यात आली आहेत. शीख धर्माचे पहिले गुरु श्री गुरु नानक जी ते शेवटचे गुरु गोविंद सिंगजी यांचा इतिहास व श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे कार्य तसेच शीख धर्मासोबतच सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजातील महापुरुषांचाही इतिहास या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला आहे.
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले भाविक आवर्जून 'विरासत-ए-सीख' या प्रदर्शनाला भेट देत आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाचे दालन भाविकांनी तुडुंब भरल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले. आज, 25 जानेवारी 2026 रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.
**
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा चरणी नतमस्तक
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा चरणी नतमस्तक
नांदेड, दिनांक 24 (जिमाका) :
'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास आज (दि. २४) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नांदेड येथे हजेरी लावली. त्यांनी ऐतिहासिक तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा येथे अत्यंत श्रद्धाभावाने दर्शन घेतले.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दुपारी सचखंड गुरुद्वारा येथे पोहोचले. गुरुद्वारा परिसरात प्रवेश करताच त्यांनी 'बोले सो निहाल'च्या जयघोषात पवित्र गुरु ग्रंथ साहिबजी समोर माथा टेकला आणि आशीर्वाद घेतले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (से.नि.भाप्रसे) यांची उपस्थिती होती.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वाराचे घेतले दर्शन
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वाराचे घेतले दर्शन
नांदेड, दिनांक 24 (जिमाका) :
'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास आज (दि. २४) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा येथे दर्शन घेतले. पवित्र गुरु ग्रंथ साहिबजी समोर माथा टेकला आणि आशीर्वाद घेतले.
हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी” मान्यवरांसह हजारो भाविकांची हजेरी
हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”
मान्यवरांसह हजारो भाविकांची हजेरी
श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनाने भक्तीचा महासंगम
नांदेड, दि. २४ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, पोहरादेवीचे, महंत, सुनील महाराज,बाबुसिंग महाराज, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोड यांच्यासह हजारो भाविकांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.
सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. सर्व जिल्ह्यातून व नांदेड शहरातून आलेल्या हजारो भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश पोहोचत आहे.
००००००
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत
नांदेड दि.२४ (जिमाका) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आज नांदेड येथील गुरु गोविंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले. आगमन प्रसंगी त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
मुख्यमंत्री श्री.मान हे विमानतळ येथून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित " हिंद दी चादर " श्री.गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.
*****
श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त निघालेल्या भव्य नगर कीर्तनात अभूतपूर्व उत्साह! 'बोले सो निहाल'चा जयघोष, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त निघालेल्या भव्य नगर कीर्तनात अभूतपूर्व उत्साह!
'बोले सो निहाल'चा जयघोष, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
नांदेड, दिनांक २४ (जिमाका) : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम सोहळ्यानिमित्त आज नांदेड नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. 'बोले सो निहाल... सत श्री अकाल'चा गगनभेदी जयघोष, आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी आणि या सोहळ्यात संत, भाविक, लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात आज भव्य 'नगर कीर्तन' सोहळा पार पडला.
या ऐतिहासिक नगर कीर्तनाला आज (दि. २४) सकाळी ८ वाजता तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी येथून प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुद्वारामध्ये विधिवत अरदास करण्यात आली. यानंतर गुरुद्वाराच्या गेट क्रमांक १ जवळ श्री गुरु ग्रंथ साहिबजींची पालखी येताच नांदेड पोलीस दलाच्या वतीने (Guard of Honor) विधिवत 'मानवंदना' देण्यात आली. या सोहळ्याचे सर्वात विलोभनीय दृश्य म्हणजे हेलिकॉप्टरने गुरुद्वारावर केलेली पुष्पवृष्टी.
भव्य नगर कीर्तन मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी, भाई जोतिनदर सिंघ जी, मुख्य ग्रंथी भाई कश्मीर सिंघ जी, भाई रामसिंघ जी, भाई गुरुमीत सिंघ जी या पंच प्यारे साहिबान यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काढण्यात आले.
सुशोभित आणि भव्य रथामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान होते. या पवित्र पालखीमध्ये भाई कश्मीर सिंघ जी यांनी पवित्र सेवा अत्यंत भक्तीभावाने केली.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण, शहीदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक आदींसह लोकप्रतिनिधी यांनी विशेष उपस्थिती लावून गुरुचरणी नतमस्तक होत कीर्तनात सहभाग नोंदवला.
तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार (भा.पो.से.) आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकाचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग (से .नि. भाप्रसे), त्यांचे सहकारी जसविंत सिंघ (बॉबी) आणि अधीक्षक हरजितसिंग कडेवाले यांनीही उपस्थित राहून नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.
या नगर कीर्तनात शीख धर्माची परंपरा आणि महाराष्ट्राची लोकधारा यांचा संगम पाहायला मिळाला. मिरवणुकीच्या अग्रभागी शीख तरुणांची थरारक 'गतका' प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होती, तर हजारो शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेले 'लेझिम' नृत्य आणि ढोल-ताशांचा गजर वातावरणात उत्साह भरत होता. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हातात 'मानवता की सच्ची मिसाल' आणि 'हिंद दी चादर' असे फलक घेऊन सामाजिक संदेश दिला.
नगर कीर्तन गुरुद्वारा गेट क्रमांक १ वरून गुरुद्वारा चौक, महावीर चौक, वजिराबाद, तिरंगा चौक, रामसेतू, रवी नगर, नागार्जुन स्कूल मार्गे मुख्य कार्यक्रमस्थळी म्हणजेच 'मोदी मैदान' येथे पोहोचले.
शालेय विद्यार्थ्यांकडून स्वागत
गेट क्रमांक १ ते मोदी मैदान या अंदाजे चार किलोमीटरच्या मार्गावर एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी रांगा लावून शिस्तीत उभे राहत रथाचे भव्य स्वागत केले आणि गुरु ग्रंथ साहिबजींचे दर्शन घेतले. विद्यार्थ्यांनी केलेली फुलांची उधळण आणि त्यांचा उत्साह पाहून उपस्थित भारावून गेले. या संपूर्ण मार्गावर नांदेडकरांनी आपल्या घरांसमोर सडा-रांगोळी काढून नगर कीर्तनाचे जंगी स्वागत केले.
भक्तीमय वातावरणात श्री गुरुग्रंथ साहिबांचे विधीवत विराजमान
भक्तीमय वातावरणात श्री गुरुग्रंथ साहिबांचे विधीवत विराजमान
नांदेड, दि. २४ जानेवारी:- असर्जन परिसरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात आज श्री गुरुग्रंथ साहिबांचे अत्यंत भक्तीमय व मंगल वातावरणात विधीवत विराजमान झाले.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडला.
विराजमान प्रसंगी गुरुबाणीचे मंगल पठण, अरदास व कीर्तन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गुरुबाणीच्या मधुर स्वरांनी संपूर्ण परिसर आध्यात्मिकतेने भारावून गेला. भाविकांनी सर्व मर्यादांचे पालन करीत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत गुरुग्रंथ साहिबांना नमन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पाणी व सुरक्षा यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
०००००
Friday, 23 January 2026
शौर्य आणि साधनेचा अद्भुत संगम म्हणजे श्री गुरु तेग बहाद्दूर यांचे जीवनकार्य भैरवनाथ कानडे
शौर्य आणि साधनेचा अद्भुत संगम म्हणजे श्री गुरु तेग बहाद्दूर यांचे जीवनकार्य
भैरवनाथ कानडे
धाराशिव दि.२४ जानेवारी (जिमाका) तलवार हातात असूनही मन ध्यानात रमलेले असणे, हेच खरे शौर्य आहे.धर्मासाठी उभे राहताना द्वेष नव्हे तर करुणा ठेवणे, हीच श्री गुरु तेग बहादुर साहेबांची महान शिकवण आहे.धर्मस्वातंत्र्य,मानवी मूल्ये आणि निर्भयतेसाठी दिलेले त्यांचे बलिदान आजच्या समाजासाठी दीपस्तंभ ठरत असून, श्री गुरु तेग बहादुर साहेबांचे योगदान म्हणजे शौर्य आणि साधना यांचा अद्भुत संगम आहे,असे प्रतिपादन जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य भैरवनाथ कानडे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग व सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण विभाग,धाराशिव यांच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम तसेच श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्या ३५० व्या गुरुतागदी शताब्दी समागम वर्षानिमित्त आयोजित व्याख्यान व बक्षीस वितरण कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात “श्री गुरु तेग बहादुर साहेब यांचे जीवनकार्य” या विषयावर प्रमुख व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री.कानडे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक श्री.अमोल ताकभाते हे होते,प्रमुख पाहुणे म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभाग, लातूर येथील प्रादेशिक उपसंचालक डॉ.तेजस माळवदकर तर प्रमुख वक्ते म्हणून शिक्षक भैरवनाथ कानडे उपस्थित होते.
याच कार्यक्रमात आश्रम शाळा क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या मैदानी सांघिक तसेच विविध वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना प्रादेशिक उपसंचालक,इतर मागास बहुजन कल्याण विभाग,लातूर डॉ.तेजस माळवदकर तसेच श्री.भैरवनाथ कानडे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या वेळी बोलताना डॉ.माळवदकर यांनी सांगितले की,क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित होतात आणि अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण विभाग,श्री.अमोल ताकभाते यांनी अध्यक्षीय भाषणात, “गुरु तेग बहादुर साहेबांचे बलिदान केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले होते.अशा महापुरुषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर सचिन नटवे,विकास राठोड,संदेश घुगे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन श्री.दयानंद राठोड यांनी केले. ‘हिंद-दी-चादर’ या कार्यक्रमातून श्री गुरु तेग बहादुर साहेबांच्या शौर्य, साधना व मानवतेच्या विचारांचा जागर झाला असून उपस्थितांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी व दिशादर्शक ठरला.
******
‘हिंद-दी-चादर’ ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जिल्हास्तरीय शैक्षणिक स्पर्धांचा उत्साहपूर्ण समारोप
‘हिंद-दी-चादर’ ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त
जिल्हास्तरीय शैक्षणिक स्पर्धांचा उत्साहपूर्ण समारोप
धाराशिव दि.२४ जानेवारी (जिमाका) “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या त्यागशील जीवनकार्याचा,तत्त्वज्ञानाचा व सामाजिक योगदानाचा प्रसार विद्यार्थ्यांमध्ये व्हावा,या उदात्त उद्देशाने अल्पसंख्यांक विभाग तसेच राज्यस्तरीय समागम समिती, महाराष्ट्र राज्य शासन व जिल्हा परिषद धाराशिव (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुधा साळुंखे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. नागेश मापारी यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आल्या.जिल्हा परिषद कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला,धाराशिव येथे या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धांचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुधा साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना श्रीमती. साळुंके म्हणाल्या की,“श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांचे जीवन हे त्याग,सत्य आणि मानवतेचे तेजस्वी प्रतीक आहे.त्यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना धैर्य,मूल्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळते.अशा उपक्रमांमुळे इतिहास जिवंत राहतो आणि नव्या पिढीला योग्य दिशा मिळते.”
या प्रसंगी स्पर्धा प्रमुख विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रीमती रंजना मैंदर्गी,महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे, केंद्रप्रमुख निलेश नागले,लक्ष्मण पाटील,समीर जाधव,बी.एम. आडगळे,समीर सय्यद,सुहास लोमटे, राजाभाऊ गिरी,श्री.विनोद जानराव, मुख्याध्यापिका सुनीता इंगळे तसेच राजेंद्र अत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये वक्तृत्व, गायन,चित्रकला व निबंध लेखन अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या शौर्य,बलिदान, धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान तसेच सर्वधर्मसमभाव व मानवतेचा संदेश प्रभावीपणे मांडला.वक्तृत्व स्पर्धेत ओघवत्या भाषेत विचारांची प्रभावी मांडणी करण्यात आली, गायन स्पर्धेतून भक्ती व देशप्रेमाची भावना व्यक्त झाली,चित्रकलेतून त्याग व शौर्याचे दृश्यरूप साकारले गेले,निबंध लेखनातून विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण व चिंतनशील दृष्टी अधोरेखित झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी श्रीमती रंजना मैंदर्गी यांनी, सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार समीर जाधव यांनी मानले.
****
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त व्याख्यान व आश्रमशाळा क्रीडा बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात
‘हिंद-द
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त
व्याख्यान व आश्रमशाळा क्रीडा बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात
धाराशिव,दि.२३ जानेवारी (जिमाका) इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त व्याख्यान तसेच आश्रमशाळा क्रीडा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या अनुषंगाने इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे आज २३ जानेवारी २०२६ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.तेजस माळवदकर,प्रादेशिक उपसंचालक,इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग,लातूर हे उपस्थित होते.कार्यक्रमात व्याख्याते म्हणून श्री.भैरवनाथ कानडे यांनी सहभाग घेतला,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.अमोल ताकभाते, सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण,धाराशिव यांनी अध्यक्षस्थान भूषविले.कार्यक्रमास जिल्ह्यातील आश्रमशाळातील सुमारे २०० ते २५० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.तेजस माळवदकर व व्याख्याते श्री. भैरवनाथ कानडे यांनी “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकत,त्यांच्या त्याग, शौर्य व धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेल्या प्रयत्नांना बलिदानाची प्रेरणादायी माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांतील यशाबद्दल क्रीडा बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण,धाराशिव कार्यालयातील निरीक्षक श्री.युवराज भोसले,श्री.संदेश घुगे,वरिष्ठ लिपिक श्री.विकास राठोड तसेच इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
*****
धाराशिव येथे सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
धाराशिव येथे सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
धाराशिव,दि.२३ जानेवारी (जिमाका) आज २३ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस छत्रपती शिवाजी हायस्कूल,धाराशिव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेताजी सुभाषचंद्र बोस,वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच शेतकरी नेते उद्धवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व उपस्थितांनी मतदार म्हणून सामूहिक शपथ घेतली.या कार्यक्रमासाठी मतदार जनजागरण समिती,धाराशिव यांना आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
मतदार दिनानिमित्त प्रा.रवि सुरवसे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की,“तुम्ही उद्याचे मतदार आहात. चित्रपटातील हिरो पैसे कमावतात; मात्र देशासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे महापुरुष हे खरे सुपरहिरो आहेत.त्यांच्या जीवनकार्याचे वाचन व विचार आत्मसात केल्यास जीवनात यशस्वी होता येते.त्यांनी अतिशय सोप्या भाषेत संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
प्रस्तावनेत शिक्षण विस्तार अधिकारी भारत देवगुडे यांनी राष्ट्रीय मतदार दिवस व भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे महत्त्व स्पष्ट केले.मतदार हा राज्यघटनेने दिलेला मौलिक अधिकार असून एका मताची किंमत अनमोल असल्याचे त्यांनी नमूद केले.संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्कांचा योग्य वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात गट शिक्षणाधिकारी असरार पठाण यांनी विद्यार्थ्यांना मतदार दिनाचे महत्त्व पटवून देत लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्त्व विशद केले.यानंतर मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.गट शिक्षणाधिकारी असरार पठाण व एम.डी.देशमुख यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.
या कार्यक्रमास मतदार जनजागरण समितीचे एम.डी.देशमुख,अब्दुल लतीफ, गणेश रानबा वाघमारे,शेख रौफ,संजय गजधने,बाबासाहेब गुळीग,सचिन चौधरी, बलभीम कांबळे,युसुफ सय्यद,श्रीकांत गायकवाड,उपप्राचार्य कुंभार,शिक्षकवर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद विर यांनी केले तर आभार प्राचार्य पाटील यांनी मानले.
*****
हिंद दी चादर': त्याग आणि सर्वोच्च बलिदानाचा जिवंत अनुभव
'हिंद दी चादर': त्याग आणि सर्वोच्च बलिदानाचा जिवंत अनुभव
पवित्र तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी नांदेड गुरुद्वाराच्या पवित्र परिसरात भाविकांची मांदियाळी आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेले भाविक केवळ नतमस्तक होत नाहीत, तर तिथे सुरू असलेल्या एका विशेष माहितीपटासमोर थबकतही आहेत. हिंद दी चादर गुरू तेग बहादूर साहिब जींच्या जीवनावरील हा माहितीपट पाहताना अनेकांची पावले तिथेच रेंगाळतायत.
संध्याकाळची वेळ... गोदावरीच्या तीरावर वसलेले सचखंड गुरुद्वारा विद्युत रोषणाईने लख्ख उजळून निघाले आहे. गुरुद्वाराच्या सुवर्ण कळसाचे प्रतिबिंब आणि रोषणाईचा प्रकाश यामुळे परिसर न्हाऊन निघाला आहे. हवेत लंगरचा आणि कडा प्रसादाचा तोच परिचित, पवित्र आणि मनाला तृप्त करणारा सुवास दरवळत आहे.
एकीकडे गुरुजींच्या गुरबानीचे मंगल सूर कानावर पडत आहेत, तर दुसरीकडे समोरच्या भव्य पडद्यावर श्री गुरू तेग बहादूर साहिब जींचा इतिहास जिवंत होत आहे. एरवी भाविकांच्या गजबजाटाने भरलेल्या या परिसरात आज एक वेगळीच, एकाग्रतेची शांतता आहे. तो भव्य डिजिटल पडदा केवळ प्रकाश फेकत नाहीये, तर त्या प्रकाशात ४०० वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडत आहे. अंधारात चमकणारा तो पडदा आणि त्यावरचे प्रसंग पाहून, उपस्थित प्रत्येक जण सध्याच्या काळाचा विसर पडून त्या ऐतिहासिक कालखंडात हरवून गेला आहे.
या वातावरणात भारावून गेलेले भाविक जागचे हलत नाहीत. विशेषतः तरुण पिढीसाठी हा चित्रपट एक अनमोल ठेवा ठरत आहे. पडद्यावर जेव्हा श्री गुरु तेग बहादूर साहिब जींच्या सर्वोच्च बलिदानाचा प्रसंग येतो, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावतात आणि आपसूकच हात जोडले जातात. भक्तीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली की काय होते, याचा हा साक्षात पुरावा आहे.
काळ बदलला, माध्यमं बदलली, पण श्री गुरू तेग बहादूर साहिब जींच्या त्यागाचा संदेश आजही शाश्वत आहे. हे दृश्य आणि हा अनुभव शब्दांत मांडण्यापलीकडचा आहे.
पवित्र तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी नांदेड गुरुद्वारा, नांदेड वाघाळा येथील मैदानावर दोन दिवस चालणाऱ्या श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी आणि श्री गुरू गोबिंद सिंघ जी ३५० व्या गुरता गद्दी शताब्दी समागम या ऐतिहासिक पर्वास आपणही सहकुटुंब एकदा नक्की भेट द्या.
🔗 पाहायला हवाच असा माहितीपट: https://www.youtube.com/watch?v=w_kI87w6NzA&t=1s
-डॉ. श्याम टरके , सहायक संचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, लातूर
शीख धर्माचा महाराष्ट्राशी अनुबंध"
शीख धर्माचा महाराष्ट्राशी अनुबंध"
महाराष्ट्र आणि शीख धर्म यांचा अनुबंध हा दोन महान संस्कृतींच्या आत्मिक एकात्मतेचा प्रवास आहे. दक्षिणेतील नांदेड हे शांत शहर गुरु गोविंद सिंगजींच्या पदस्पर्शाने पावन झाले आणि 'हजूर साहिब' या नावाने खालसा पंथाच्या पाच तख्तांपैकी एक प्रमुख धार्मिक केंद्र बनले.गुरु गोविंद सिंगजींनी याच मातीत 'गुरु ग्रंथ साहिब' या पवित्र ग्रंथाला 'अंतिम आणि जिवंत गुरु' म्हणून घोषित केले. मात्र, या ऐतिहासिक क्षणाचे बीजारोपण कित्येक शतकांपूर्वी महाराष्ट्राच्या संतांनी आणि शीख गुरूंनी एकमेकांशी साधलेल्या संवादातून झाले होते.
संत नामदेव: पंजाबच्या भूमीत पेरलेले भागवत धर्माचे बीज
महाराष्ट्र आणि पंजाब या दोन टोकांच्या राज्यांना जोडणारा पहिला आणि सर्वात भक्कम दुवा म्हणजे 'संत नामदेव'. १३ व्या शतकात जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती, तेव्हा विठ्ठल भक्त नामदेवांनी महाराष्ट्रातील भागवत धर्माची पताका थेट पंजाबपर्यंत नेली. संत नामदेवांनी आपल्या आयुष्यातील शेवटची सुमारे २० वर्षे पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यापाशी असलेल्या 'घुमान' येथे व्यतीत केली. तेथे त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांची भाषा आत्मसात केली आणि भक्तीचे आंदोलन उभे केले.
संत नामदेवांच्या अध्यात्मिक उंचीचा आदर करून पाचवे गुरु श्री गुरु अर्जन देवजी यांनी 'गुरु ग्रंथ साहिब' या पवित्र ग्रंथामध्ये संत नामदेवांच्या ६१ पदांचा अंतर्भाव केला. आजही पंजाबच्या भूमीत 'भगत नामदेव' या नावाने ते तितकेच पूजनीय आहेत जितके ते महाराष्ट्रात आहेत. नामदेवांनी केवळ भक्तीच शिकवली नाही, तर समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले.त्यांच्या अभंगांमधून व्यक्त होणारा समतेचा विचार हाच पुढे शीख धर्माच्या पायाभरणीचा एक महत्त्वाचा भाग बनला.
गुरु हरगोविंद सिंग आणि समर्थ रामदास भेट
शीख इतिहासातील सहावे गुरु,श्री गुरु हरगोविंद सिंगजी आणि महाराष्ट्राचे संत समर्थ रामदास स्वामी यांची काश्मीरमधील श्रीनगर येथे झालेली भेट हा एक अत्यंत दिशादर्शक प्रसंग आहे.ही भेट 'भक्ती' आणि 'शक्ती' यांच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण मानली जाते.
समर्थ रामदास स्वामींनी जेव्हा गुरुजींना पाहिले,तेव्हा गुरुजींनी कमरेला दोन तलवारी (मिरी आणि पिरी) बांधल्या होत्या आणि ते सैनिकांच्या वेषात घोड्यावर स्वार होते. एक संत अशा लष्करी थाटात पाहून समर्थांनी कुतूहलाने विचारले, "तुम्ही एका महान आध्यात्मिक गादीचे उत्तराधिकारी आहात,मग संत असून शस्त्रे का बाळगता?". गुरु हरगोविंद सिंगजींनी समर्थांच्या डोळ्यांत पाहून उत्तर दिले, "महाराज, अंतर्यामी मी केवळ 'बाबा नानकांचा' सेवक आहे आणि एक संतच आहे. पण ही शस्त्रे गरिबांच्या रक्षणासाठी आणि जुलमी सत्तेचा नायनाट करण्यासाठी आहेत". हे उत्तर ऐकताच समर्थ रामदास स्वामी भारावून गेले. त्यांना जाणीव झाली की केवळ जपमाळ ओढून धर्म टिकणार नाही, तर धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र असणेही तितकेच गरजेचे आहे.
नांदेडचे 'हुजूर साहिब' सामायिक श्रद्धेचे अधिष्ठान
गुरु गोविंद सिंगजींचे नांदेडमधील आगमन हे या अनुबंधाचे सर्वोच्च शिखर ठरले. नांदेडच्या याच भूमीत गुरूजींनी देहधारी गुरूची परंपरा संपवून शब्दरूपी 'गुरु ग्रंथ साहिब' यांना अंतिम गुरु मानण्याचा आदेश दिला. दक्षिणेतील हे शांत शहर गुरूंच्या पदस्पर्शाने पावन झाले आणि जगातील कोट्यवधी शीख बांधवांसाठी काशी-पंढरीप्रमाणे पवित्र बनले. हे स्थान केवळ शीखांचे नाही, तर महाराष्ट्राच्या समतेच्या परंपरेचे एक जिवंत प्रतीक आहे.
'दख्खनी' शीख: मातीशी एकरूप झालेला गौरवशाली वारसा
महाराष्ट्रातील शीख समुदायातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणजे 'दख्खनी' शीख. या समूहाचा इतिहास थेट गुरु गोविंद सिंगजींच्या १७०८ मधील दक्षिण प्रवासाशी जोडलेला आहे. हे समुदाय प्रामुख्याने त्या सैनिकांचे आणि कारागिरांचे वंशज आहेत जे गुरूंसोबत दक्षिणेत आले आणि नंतर याच मातीचे होऊन राहिले.
शिकलकार समुदाय: हे मूळचे शस्त्रे आणि धारदार उपकरणे बनवणारे अत्यंत कुशल कारागीर होते. गुरूंच्या लष्करी गरजा पूर्ण करण्यात या समुदायाचा मोठा वाटा होता.
बंजारा आणि लोभाणा: १६ व्या शतकापासूनच बंजारा समुदायाची नाळ शीख धर्माशी जोडलेली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हे समूह व्यापार आणि वाहतुकीच्या व्यवसायात अग्रेसर होते आणि त्यांनी गुरूंच्या चळवळीला मोठी रसद पुरवली.
सांस्कृतिक समन्वय: अनेक शतकांपासून महाराष्ट्रात राहिल्यामुळे या दख्खनी शीखांनी स्थानिक मराठी संस्कृती, भाषा आणि चालीरीती आपलेसे केले आहेत. त्यांची पंजाबी ओळख काहीशी बदलली असली, तरी गुरूंप्रति असलेली त्यांची निष्ठा आजही अभंग आहे.
महानगर किर्तन दरम्यान घरासमोर रंगीबेरंगी फुलं, रांगोळींनी सजावट करून सहभाग नोंदवावा
महानगर किर्तन दरम्यान घरासमोर रंगीबेरंगी फुलं,
रांगोळींनी सजावट करून सहभाग नोंदवावा
नांदेड, दि. 23 जानेवारी :- हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहाद्दूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमीत्त श्री गुरूग्रंथ साहीब नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महानगर किर्तनास शनिवार 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वा. गुरूव्दारा गेट नं 1 पासून गुरूव्दारा चौक-महाविर चौक- वजिराबाद मार्केट येथून वजिराबाद चौक-तिरंगा चौक-रामसेतू दादरा-रविनगर-नागार्जून पब्लिक स्कूल-मामा चौक या मार्गाने मोदी मैदान मुख्य कार्यक्रम स्थळी पोहचणार आहे.
या मार्गातील सर्व रहिवाशी यांनी या महानगर किर्तनादरम्यान आपण आपल्या घरासमोर, दुकानासमोर रंगीबेरंगी फुलांनी अथवा रांगोळीनी संपूर्ण रस्त्याच्या बाजूने सजावट करावी. तसेच आपल्या घरावर, दुकानावर विद्युत रोशनाई तसेच दिवे लावून पालखीचे स्वागत करून भव्य महा नगर किर्तनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक
हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक
शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांना संपूर्ण भारतात "हिंद दी चादर" (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे आहे. ते केवळ एक धार्मिक नेते नव्हते, तर मानवी सन्मान, श्रद्धा स्वातंत्र्याचे सर्वोच्च रक्षक होते. त्यांचे जीवन आणि कृती आपल्याला स्वतःच्या धर्मापलीकडे जाऊन मानवतेची मूल्ये कशी जपावीत, याबाबत शिकवते.
श्री गुरू तेग बहादूरजी असे योद्धे होते, की वयाच्या 14 व्या वर्षी मोगलांबरोबरच्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. तलवारीने शत्रूस कंठस्नान घातले. म्हणून त्यांचे नाव तेग बहादूर ठेवले गेले. तरीही पुढे अध्यात्मिक साधनेमुळे ते पूर्णपणे स्थिरमती बनले. सुख, दु:ख, हर्ष, खेद यापासून मुक्त, असे मुक्तामा बनले. त्यांना ठार मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यासही त्यांनी क्षमा केली, केवढे हे त्यांचे औदार्य आणि मनाची ताकद.
श्री गुरू तेग बहादूरजी यांचे पुत्र शीख धर्मियांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरू श्री गुरू गोबिंद सिंग जी. त्यांनी नांदेड येथे देह त्यागण्यापूर्वी त्यांच्यानंतर देहधारी गुरू असणार नाही, असे घोषित केले. पवित्र गुरू ग्रंथ साहिब यांना गुरूपद बहाल केले. या पवित्र गुरू ग्रंथ साहिबमध्ये श्री गुरू तेगबहादूर जी यांच्या 59 पद्यांचा व 57 श्लोकांचा अशा एकूण 116 रचनांचा समावेश आहे.
पवित्र ग्रंथ श्री गुरू ग्रंथ साहिबचा प्रारंभ श्री गुरू नानकदेवांच्या जपुजी साहिब वाणीने झाला. तर हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या श्लोकांनी समारोप. पवित्र गुरू ग्रंथ साहिब एक हजार 430 पानांचा आहे. पान क्रमांक एक हजार 425 ते एक हजार 428 यावर श्री गुरू तेगबहादूरजी यांचे मनाचे श्लोक अंकित आहेत. श्री गुरू तेगबहादूरजी (गुरूजी) यांच्या श्लोकांमध्ये साधकास परमेश्वर प्राप्तीसाठी मनाची कोणती अवस्था प्राप्त केली पाहिजे, याचे विवेचन आहे.
प्रस्तुत लेखात काही निवडक श्लोकांमधून मनास उपदेश, मोह, मायेपासून दूर जाणे, संस्कारित मन असणे अत्यावश्यक असल्याचे ज्ञान होते. आदर्श जीवन जगण्याची पद्धत समजते. गुरूजींच्या श्लोकांमधील विचार प्रत्येकाने आचरणात आणायलाच हवेत. त्यातून मानवाचे कल्याणच होणार. तसेच गुरूजींच्या वाणीतून जगाचे खरे स्वरूप, शाश्वत सत्य समजते.
माया किंवा मोह आपल्याला बांधून ठेवते, यावर श्री गुरू तेग बहादूरजींनी भाष्य केले आहे. त्यांच्या मते, जग आणि त्यातील सुख-दुःखे क्षणभंगुर आहेत.
जग रचना सभ झूठ है, जानि लेहु रे मीत ॥
कहि नानक थिरु ना रहे, जिउ बालू की भीत ॥ 49॥
अर्थ : गुरू नानक म्हणतात, "मित्रा, हे जग नश्वर आणि अस्थिर आहे. ज्याप्रमाणे वाळूची भिंत टिकत नाही, तसेच हे जगही टिकणारे नाही."
जेव्हा आपल्याला हे सत्य समजते, तेव्हा आपण भौतिक मोहातून मुक्त होतो. ही समज आपल्याला सेवा आणि निःस्वार्थ कामाकडे वळवते.
श्री गुरू तेग बहादूरजींनी मानवी दुःखाची कारणे शोधली, त्यावर मात करण्याचा मार्ग दाखवला. त्यांची शिकवण संपूर्ण मनुष्य जीवनाचे कल्याण करणारी आहे.
1. मोह आणि अहंकारावर विजय
माणसाचा स्वार्थ, अहंकार त्याला सत्यापासून दूर नेतो. यावर विजय मिळवणारा माणूस स्वतःसोबत इतरांनाही तारतो.
जो प्राणी ममता तजै, लोभ मोह अहंकार ॥
कहु नानक आपन तरै, अउरन लेत उधार ॥22॥
अर्थ : गुरू नानक म्हणतात, जो माणूस लोभ, मोह, माया, ममता आणि अहंकार या विकारांचा त्याग केला तो स्वत: तर भवसागर तरून जातोच, एवढेच नव्हे तर इतरांचाही तो उद्धार करतो.
2. लोभ, क्रोधाचा त्याग
लोभ आणि राग नातेसंबंधांना तडा देतात. ज्याला सुख-दुःखाचा स्पर्श होत नाही, तो साक्षात ईश्वराचे रूप असतो.
सुख दुखु जिह परसै नही, लोभु मोहु अभिमानु ॥
कहु नानक सुनु रे मना, सो मुरति भगवान ॥13॥
अर्थ : गुरू नानक म्हणतात, ज्याला सुख-दुःख स्पर्शही करू शकत नाही, जो लोभ, मोह, अभिमान आदी विकारांपासून मुक्त आहे, तो जीव साक्षात ईश्वर स्वरूप आहे.
3. सुख-दुःखात स्थिर मन
आयुष्यात चढ-उतार येणारच. पण जो शत्रू आणि मित्र दोघांना समान मानतो आणि दुःखात खचत नाही, तोच खरा ज्ञानी.
हरखु सोगु जा कै नही, बैरी मीत समानि ॥
कहु नानक सुनि रे मना, मुकति ताहि तै जानि ॥15॥
अर्थ : गुरू नानक सांगतात, ज्याला हर्ष, शोक वेगळे वाटत नाहीत, जो शत्रू मित्र यांना समान मानतो, जो जीव मुक्त झाला आहे, असे समज.
4. भक्ती आणि नामस्मरण
सर्व संकटांतून मुक्त होण्यासाठी गुरूजींनी ईश्वराच्या नावाचे स्मरण करण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे.
राम नामु उरि मैं गहिओ, जा कै सम नहि कोइ ॥
जिह सिमरत संकट मिटै, दरसु तुहारो होइ ॥57॥
अर्थ : अंत समयी गुरू नानकजी म्हणतात "अरे मित्रा ! नामस्मरणमात्रे संकटे नष्ट होतात, आणि परमेश्वराचे- दर्शन होते ते रामनाम हृद्यात धारण कर. त्याच्या तोडीचे जगात अन्य काहीही नाही."
हिंद-दी-चादर श्री. गुरू तेग बहादूरजींनी त्यांच्या कृती आणि आचरणातून सर्वांना अनमोल विचार दिला. त्यांचा विचार अंगीकारणे, आचरणात आणणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहेच. ‘कहु नानक सुन रे मना’ या वाक्यांद्वारे गुरूजी मनाला वारंवार अनेक दुष्कार्यापासून आपणास परावृत करून सत्कार्याशी जोडण्याचा संदेश देतात. असे गोड अमृत सर्व मानवाने चाखावे.
काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, मत्सर यापासून मुक्तता म्हणजेच आत्मशुद्धी, सत्संग प्रधानता, जीवननिष्ठेत विधायकतेबरोबर अनाग्रही निवृत्ती, प्रपंच आणि परमार्थ, नामस्मरण यांचा सुमेळ ही गुरूजींच्या वाणीतील वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे विचार एका समाजापुरते नाहीत. तर ते सर्व मानव कल्याणाचे आहेत. मनाला संस्कारित करणारे आहेत. गुरूजींची वाणी सर्वांपर्यंत पोहोचावी. आजच्या काळात त्यांच्या विचारांचे, शिकवणीचे अनुकरण ही काळाची गरज आहे. ते अमृत प्रत्येकाने चाखल्यास जीवनाचे नक्की सार्थक होईल.
- डॉ. श्याम टरके, सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर
संदर्भ
गुरू नानकांची वाणी जपुजी साहिब. (2006).मध्ये त. ग. विनायक लिमये. पुणे: तारासिंह गोरोवाडा, सिख धर्मप्रचार कमिटी, पुणे. 01 16, 2026 प्राप्त
ऐक रे मना ! ( तिसरी आ.). (2013). (त. ग. विनायक लिमये, अनु.) पुणे: तारासिंह गोरोवाडा, सिख धर्मप्रचार कमिटी, पुणे. 01 16, 2026 प्राप्त
***
*असाक्षर मुक्त गावाचा संकल्प घेऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे आवाहन*
*असाक्षर मुक्त गावाचा संकल्प घेऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे आवाहन*
नवभारत साक्षरता कार्यक्रमाला गती
धाराशिव,दि.२३ जानेवारी (जिमाका) देशाला साक्षरतेच्या दिशेने अधिक सक्षम बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत असून, राज्यात हा कार्यक्रम शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलात आणण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनानिमित्त असाक्षर मुक्त गावाची शपथ घेऊन हा राष्ट्रीय सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत देशातील १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील असाक्षर व अल्पसाक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देण्यात येत आहे.
या कार्यक्रमामध्ये केवळ अक्षरओळख मर्यादित न ठेवता, जीवनोपयोगी कौशल्यांच्या विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे.यामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता,डिजिटल साक्षरता,आपत्ती व्यवस्थापन कौशल्य,आरोग्याची काळजी व जनजागृती,बालसंगोपन व शिक्षण, कुटुंब कल्याण,व्यवसाय व उपजीविकेची कौशल्ये,तसेच कला, विज्ञान,तंत्रज्ञान,संस्कृती,क्रीडा, मनोरंजन आणि स्थानिक नागरिकांना आवड असलेल्या विषयांचा समावेश आहे.
“नवभारत साक्षरता कार्यक्रम” ही योजना दिनांक १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येत असून,ही योजना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये प्रभावीपणे अंमलात आणली जात आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२७ पर्यंत संपूर्ण गाव, कुटुंब व परिसर साक्षर करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.
“मी अशी शपथ घेतो/घेते की,माझे संपूर्ण कुटुंब व गाव २६ जानेवारी २०२७ पर्यंत साक्षर करीन.मी स्वतः असाक्षर राहणार नाही व इतरांनाही असाक्षर राहू देणार नाही,” अशी साक्षरतेची शपथ सर्व संबंधितांना देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना),जिल्हा परिषद यांनी दिली आहे.
२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने साक्षरतेचा हा संकल्प नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरेल,तसेच असाक्षर मुक्त गाव हे ध्येय साकार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
*************
*पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण*
*पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण*
७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभ
धाराशिव,दि.२३ जानेवारी(जिमाका)
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊन भारत एक प्रजासत्ताक देश बनला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस देशभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.यावर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा समारंभ धाराशिव जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री तथा परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस मुख्यालय मैदान क्र.२ येथे सोमवार, दि.२६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता होणार आहे.
सकाळी ९.३५ ते ९.५० या वेळेत पोलीस परेड व चित्ररथ संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.५० ते १०.१० या कालावधीत जिल्हास्तरावर व तालुकास्तरावरून सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गीतांवर आधारित एकत्रित सामूहिक कवायत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यानंतर सकाळी १०.१० ते १०.२५ या वेळेत पालकमंत्री श्री. सरनाईक हे स्वातंत्र्य सैनिकांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा देणार आहेत.
**************
लोकशाहीच् सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
लोकशाहीच्या
लोकशाहीच् सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
धाराशिव,दि.२३ जानेवारी (जिमाका) २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस.लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथील सभागृहात आज उत्साहात साजरा करण्यात आला.आयोजन जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिकांनी लोकशाहीची मूल्ये जपण्याची,संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचा जबाबदारीने वापर करण्याची आणि निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची सामूहिक मतदार शपथ घेतली.
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुष्पहार अर्पण केला. उपस्थितांनी देखील अभिवादन करून पुष्प वाहिली.
राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये मतदार म्हणून असलेल्या हक्कांची व कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे हा आहे. मतदार नोंदणी करणे,मतदान करणे व स्वच्छ,पारदर्शक आणि निर्भय निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे हे लोकशाहीच्या सुदृढतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक मताचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे नमूद करण्यात आले. मतदान हे केवळ अधिकार नसून एक सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी असल्याची जाणीव नागरिकांनी ठेवावी,असे आवाहन करण्यात आले.विशेषतः युवकांनी मतदार नोंदणी करून पहिल्यांदाच मतदान करताना उत्साहाने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांमध्ये जागरूकता वाढविणे, मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि लोकशाही प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.या उपक्रमामुळे मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून लोकशाही अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. ढाकणे,नायब तहसीलदार सचिन पाटील,संतोष पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
****
दानपेटीतील अंगठी प्रकरणी वस्तुस्थिती स्पष्ट : मंदिर संस्थानची भूमिका मांडली
दानपेटीतील अंगठी प्रकरणी वस्तुस्थिती स्पष्ट : मंदिर संस्थानची भूमिका मांडली
धाराशिव दि.२३ जानेवारी (जिमाका) दानपेटीमध्ये चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तूंविषयी गेल्या दोन दिवसांपासून काही प्रसारमाध्यमांमध्ये वस्तुस्थिती न तपासता अपूर्ण व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी अधिकृत खुलासा प्रसिद्ध केला आहे.
पुण्यातील भोसरी येथील भाविक सुरज कृष्णा टिंगरे हे दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४:१५ ते ४:३० या वेळेत श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते.दर्शनावेळी त्यांनी दानपेटी क्रमांक १२ मध्ये दान स्वरूपात काही रक्कम टाकत असताना त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी चुकून दानपेटीत पडल्याचा दावा केला आहे.सदर अंगठी परत मिळावी यासाठी त्यांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयाकडे लेखी विनंती अर्ज सादर केला होता.
या अर्जाच्या अनुषंगाने,दिनांक ३ ऑगस्ट २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील ठरावाचा संदर्भ मंदिर संस्थानने दिला आहे.या ठरावानुसार,श्री तुळजाभवानी देवींच्या दानपेटीत भाविकांकडून नजर चुकीने पडलेल्या मौल्यवान वस्तू या दान स्वरूपात समजण्यात येतील व त्या परत देण्यात येणार नाहीत,असा स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला आहे.
या निर्णयानुसार,सुरज कृष्णा टिंगरे यांना मंदिर संस्थानच्या वतीने दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत पत्राद्वारे सदर बाब कळविण्यात आली आहे.मात्र,या प्रकरणाबाबत काही प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थिती न तपासता बातम्या प्रसिद्ध केल्याने भाविकांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचे मंदिर संस्थानने नमूद केले आहे.
मंदिर संस्थानने स्पष्ट केले आहे की, यापूर्वी अशा प्रकारच्या घटनांचा गैरफायदा घेण्याचे प्रकार समोर आलेले आहेत.काही अपप्रवृत्तीचे लोक “चुकून दानपेटीत मौल्यवान वस्तू पडली”असा दावा करून दानपेटीतून मौल्यवान वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करत होते. अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी तसेच दानपेटीतील पारदर्शकता व सुरक्षितता राखण्यासाठीच हा नियम करण्यात आलेला आहे.हे विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे की,असा नियम करणारे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे एकमेव संस्थान नाही,तर देशातील अनेक देवस्थानांनीदेखील याच धर्तीवर असे नियम अमलात आणलेले आहेत.
तरी,प्रसारमाध्यमानी वस्तुनिष्ठता, अधिकृत कागदपत्रे व मंदिर संस्थानची भूमिका समजून घेऊनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात,असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच,भाविक भक्तांनी दानपेटीमध्ये दान करताना दागिने व मौल्यवान वस्तूंबाबत विशेष दक्षता घ्यावी,असे नम्र आवाहनही श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी केले आहे
*******
Thursday, 22 January 2026
तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी
तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी
- हिंद दी चादर गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम
नांदेड, दिनांक २२ (जिमाका):
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून, आज पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथे एका भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेले श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 'शब्द गुरबानी'चे गायन, ज्याने उपस्थित संगतांना मंत्रमुग्ध केले.
पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा कार्यक्रम आज पार पडला. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे ३५० व्या शहीदी समागम वर्ष निमित्ताने, ३५० विद्यार्थ्यांनी त्यांना ही अनोखी स्वरांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (से. नि.भाप्रसे), हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, जसवंत सिंग बॉबी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजीत सिंघ जी कडेवाले आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या गुरबानीच्या पवित्र स्वरांनी संपूर्ण तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब परिसर आणि वातावरण भक्तिमय झाले होते. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी (संगत) मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शालेय मुलांच्या या शिस्तबद्ध आणि भावपूर्ण सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले.
**
ांदेड येथील ‘हिंद-दी-चादर’च्या ३५० व्या बलिदान पर्वासाठी धाराशिवहून लंगर साहित्याचा ट्रक रवाना
नांदेड येथील ‘हिंद-दी-चादर’च्या ३५० व्या बलिदान पर्वासाठी धाराशिवहून लंगर साहित्याचा ट्रक रवाना
धाराशिव,दि.२३ जानेवारी (जिमाका) नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या बलिदान पर्वानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी लंगर सेवेसाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तू व साहित्याचा पुरवठा करणारा ट्रक धाराशिव येथून काल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केला.या प्रसंगी जिल्हाधिकारी किरण पुजार यांनी,गुरुदेव श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या बलिदानातून मानवतेची,धर्मस्वातंत्र्याची व सामाजिक सलोख्याची प्रेरणा मिळते,असे प्रतिपादन केले.
नांदेड येथे होणाऱ्या या समारंभात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असून, त्यांच्या सेवेसाठी लंगर ही परंपरा सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
धाराशिव जिल्ह्यातील समाजबांधवांच्या सहकार्याने लंगरसाठी आवश्यक साहित्य वेळेत पोहोचावे,यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.
या ट्रकद्वारे लंगरसाठी लागणारे धान्य, स्वयंपाक साहित्य व इतर आवश्यक वस्तू नांदेडकडे पाठविण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन,स्वयंसेवी संस्था व समाजबांधव यांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,तहसीलदार (महसूल) प्रकाश व्हटकर,नायब तहसीलदार संतोष पाटील यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत कार्यक्रमाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.
नांदेड येथे होणारा हा दोन दिवसीय कार्यक्रम ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्वाचा असून,देशभरातून व राज्यातून भाविकांची उपस्थिती आहे.या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातून लंगरसाठी पाठविण्यात आलेले साहित्य हे सेवाभाव आणि सामाजिक एकात्मतेचे उत्तम उदाहरण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
******
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा;
भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
नांदेड दि.२२ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम असर्जन परिसरातील मोदी मैदानावर संपन्न होणार आहे.
या पावन शहीदी समागमास नांदेड शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, त्यांच्या सोयीसाठी नांदेड शहर व परिसरातील विविध गावे व ठिकाणांहून कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी २०० पैक्षा अधिक वाहनांची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. यात स्कुलबस व इतर वाहनांचा समावेश आहे.
या मोफत वाहतूक सुविधेमुळे भाविकांना सुरक्षित, सुलभ व वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचता येणार असून, ज्येष्ठ नागरिक, महिला व कुटुंबीयांसाठी ही व्यवस्था विशेष लाभदायक ठरणार आहे.
तरी सर्व भाविक व नागरिकांनी या मोफत वाहतूक सुविधेचा लाभ घ्यावा व धर्म, मानवता आणि बलिदानाच्या या ऐतिहासिक शहीदी समागम कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले आहे.
००००००
दिव्यांगतेवर मात करत कलागुणांचा उत्सव; नांदेडमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक
दिव्यांगतेवर मात करत कलागुणांचा उत्सव; नांदेडमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक
नांदेड, दि. 20 जानेवारी :- दिव्यांग कल्याण आयुक्तालय, जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात भव्य व प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सुमारे ५८ मुकबधीर, अंध, मतिमंद व अपंग विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सशक्त दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महान समाजसुधारिका हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, सहाय्यक संचालक दिनकर नाठे, अधिक्षक बळीराम येरपूलवार, माजी प्राचार्य पंजाबराव अंभोरे, डॉ. सान्वी जेठवाणी, भार्गवी देशमुख, सुधीर फुसांडे, रमेश वडगावकर, सीएम फेलो भार्गवी मुंढे, अर्थव मुळक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड, शुभम तेलेवार, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, साईचरण मुगावे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांगतेवर मात करत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण प्रेक्षागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. ‘गाडी झुमक्याची’, ‘शेतकरी नृत्य’, ‘चला जेजुरीला जाऊ’, ‘राधे-राधे’, ‘मल्हारी मिक्स’, ‘दैवत छत्रपती’, ‘दोनच राजे इथे गाजले’, ‘काठी न घोंगड घेऊद्या की’, ‘राणू मुंबई की राणू’, ‘आदिवासी ठेमसा’, ‘आया रे तुफान-छावा’, ‘रिमिक्स जलवा’, ‘माऊली-माऊली’ तसेच गरीब मुलांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षावर आधारित सादरीकरण, भावगीत, लावणी व गीतगायन अशा विविध सादरीकरणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, जिद्द व कलागुणांचे विशेष कौतुक करत दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाजासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केल्याचे प्रतिपादन केले.
याच कार्यक्रमात नांदेड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद दी चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त होणाऱ्या भव्य विशेष कार्यक्रमाबाबत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. या संदर्भातील माहिती देऊन संबंधित गीत विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मुरलीधर गोडबोले यांनी केले, तर निखिल किरवले व सारिका सावळे यांनी दुभाष्य म्हणून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.
**
Subscribe to:
Posts (Atom)


















































