Friday, 25 November 2016

फळपिकांचा विमा हप्ता भरण्यासाठी दि. 26 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ


          उस्मानाबाद , दि.25:- पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत  आंबिया बहारासाठी द्राक्ष, केळी , पेरु , मोसंबी, डाळींब  या फळपिकांचा विमा हप्ता  भरण्यासाठी  दि. 26 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ  देण्यात  आली आहे . त्यानुसार  बँकांनी  कर्जदार  शेतकऱ्यांची घोषणापत्रे विमा कंपनीस सादर करण्याची  अंतिम तारीख दि.16 डिसेंबर 2016 व बँकांनी बिगर  कर्जदार शेतकऱ्यांची  घोषणापत्रे  विमा कंपनीस  सादर करण्याची  अंतिम तारीख  दि. 5 डिसेंबर 2016 राहील .
           दि. 26 नोव्हेंबर 2016 पर्यंत द्राक्ष , केळी , मोसंबी, पेरु, डाळींब या  पाच  फळपिकांकरिता  हवामान  धोक्याचा  कालावधी  कायम ठेवून विमा हप्ता  भरण्यास  मुदत वाढ  देणेबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स व बजाज अलायन्झ  या योजनेत सहभागी असलेल्या विमा कंपन्यांनी सहमती  दर्शविली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक  शिरीष जमदाडे यांनी कळविले आहे. 

बँकांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात – विजयालक्ष्मी बिद्री


          



उस्मानाबाद,दि.25:-
500 व 1000 रुपयांच्या  नोटांवर बंदी  आणि  या पार्श्वभूमीवर चलन बदल  निर्माण  झालेल्या  परिस्थितीत बँकांनी  ग्रामीण  भागातील  जनतेसाठी  विशेषत:  ज्या ग्रामीण भागात  एटीएम  मशिन्स  नाहीतच  अशा ठिकाणी  विशेष लक्ष देवून  त्या भागातील  जनतेला  जुने पैसे  बदलणे किंवा  नव्या नोटांचा  पुरवठा  कसा होईल यावर विशेष  उपाययोजना  कराव्यात , अशी सूचना  केंद्र शासनाच्या विशेष पथकाच्या सदस्या  विजयालक्ष्मी बिद्री यांनी काल येथे केली .

रुपये 500 व 1000 च्या नोटाबंदीमुळे उद्भवलेली परिस्थिती  आणि प्रत्येक  राज्याने, , जिल्ह्याने  त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या  उपाययोजना  त्याची फलश्रुती , सद्य:स्थितीत  उद्भवलेल्या  नव्या अडचणी  याबाबतचा  आढावा  घेण्यासाठी केंद्र शासनाच्या  वतीने  प्रादेशिक  संचालक स्टाफ सिलेक्शन कमिशन, कर्नाटक श्रीमती विजयालक्ष्मी बिद्री  या उस्मानाबाद  जिल्ह्यात  आल्या होत्या .  त्यावेळी  जिल्हाधिकारी  कार्यालयात  आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या .

यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  आनंद रायते , अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक ,  अप्पर पोलीस अधीक्षक  दिपाली घाटगे , निवासी  उपजिल्हाधिकारी  सुनिल यादव ,  उपजिल्हाधिकारी  प्रभोदय मुळे , शिल्पा करमरकर , जिल्हा कृषी अधीक्षक  शिरीष जमदाडे , जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप , जिल्हा उपनिबंधक  बी.ए.शिंदे हे उपस्थित होते .

श्रीमती बिद्री म्हणाल्या, केंद्र शासनाने देशातील काळा पैसा नष्ट व्हावा,अतिरेक्यांना पुरविली जाणारी आर्थिक रसद बंद पडावी, देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा याकारिता 500 व 1000 च्या नोटा बंद करुन  नवे चलन सुरु केले. सुरुवातीचे काही दिवस  जनतेला, बँक कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. मात्र शासनाने जनतेला कमीत कमी त्रास व्हावा  याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले.  यामध्ये बँकांची  भूमिका निश्चितच महत्वपूर्ण राहिली आहे.

या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना सूचना देताना त्या पुढे म्हणाल्या, बँकांनी ग्रामीण भागातील विशेषत: ज्या भागात एटीएम मशिन्स नाहीत त्या भागात आवर्जून विशेष लक्ष द्यावे, लोकांना शासनाने ठरविल्याप्रमाणे पैसे मिळतील त्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करावेत, बॅकांची खाते संख्या लक्षात घेवून लीड बँकेने तथा मुख्य बँकांनी इतर बँकांना पैसे पुरवावेत.  पैसे बदलून घेण्यासाठी वा काढण्यासाठी ज्या ठिकाणी गर्दी असेल तिथे टोकन नंबर देवून लोकांना वेळा ठरवून द्याव्यात. बँकेत पैसे बदलून घेण्यासाठी  आलेल्या  ग्राहकांच्या बोटावर  शाई किंवा परमनंट  मार्करने खूण करावी.


श्रीमती बिद्री यांनी लोकांनाही आवाहन केले आहे की, त्यांचे जास्तीत जास्त व्यवहार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने करावेत, पेटीएम ची सुविधा वापरावी , एटीएम मशिनचा जास्तीत जास्त वापर कारावा, रेशन दुकानदारानीही त्यांचे व्यवहार ऑनलाईन करावेत. जनतेने व्यवहार करताना सावध असावे, आपलाच पैसा बँकांमध्ये जमा करावा, दुसऱ्या व्यक्तीचे पैसे जमा करणे व बदलून मिळण्यासाठी जर दिले तर ते घेवू नयेत.  त्या पुढे इतर विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना म्हणाल्या की, कृषी खात्याने जिल्हा ग्रामीण बँकांशी समन्वय साधून शेतकरी कर्ज,  शेतकरी विमा यांना लक्ष घालावे. पिक विमा भरण्यासाठी  जुन्याच नोटा         वापरण्याची परवानगी मिळणेबाबत त्या वरिष्ठ पातळीवर बोलतील.प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मोटार सायकल, चारचाकी वाहने यांच्या खरेदीत वाढ झाली किंवा कसे याबाबत आढावा घेवून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल द्यावा .


बैठकीच्या  सुरुवातीस  जिल्हाधिकारी डॉ.  नारनवरे यांनी चलनबदलाच्या निर्णयामुळे  उस्मानाबाद जिल्ह्यात  निर्माण  झालेली परिस्थिती आणि  प्रशासन व  इतर यंत्रणांनी  केलेल्या  जनतेला  जास्तीत जास्त  मदत होईल यासाठी  केलेल्या उपाय योजना  याबाबतचे  सविस्तर सादरीकरण केले.


शेवटी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी श्रीमती बिद्री व उपस्थित सर्वांचे आभार मानले. या बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांसह सर्व बँकांचे व्यवस्थापक उप‍स्थित होते.
*****

Thursday, 24 November 2016

प्रत्येक गावाचा जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे


          उस्मानाबाद,दि.24:-  जिल्ह्यात  जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शासन आणि जनता यांनी मिळून  जलसंधारणाची  उल्लेखनीय  कामगिरी केली, त्याचा या पावसाळ्यात  आपल्या सर्वांना चांगला प्रत्ययही आला.  आता जिल्ह्यात  पाण्याचा मुबलक साठा  निर्माण  झाला असून  पाण्याच्या  वापराबाबतचे योग्या ते  नियोजन  करणे ही सर्वांचीच  सामाजिक  जबाबदारी  आहे . त्याकरिता  संबंधित  गावपातळीपासून ते जिल्हास्तरीय सर्व अधिकारी , स्थानिक  स्वराज्य  संस्थांचे  प्रतिनिधी  असे सर्वांनीच  मिळून  प्रत्येक  गावाचा जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा  तयार करावा , असे  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी आज येथे  सूचित केले .
          पाणी  आरक्षण , पाणी नियोजन याबाबत  अत्यंत महत्वपूर्ण  बैठक  आज जिल्हाधिकारी  कार्यालयात पार पडली  त्यावेळी  ते बोलत होते . यावेळी  जिल्हा परिषद  मुख्य कार्यकारी  अधिकारी  आनंद रायते ,  निवासी उपजिल्हाधिकारी  सुनील यादव ,  जिल्हा कृषी  अधीक्षक  शिरीष जमदाडे , जिल्हा माहिती अधिकारी  मनोज शिवाजी सानप  हे उपस्थित होते .
          जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी तलाठी व ग्रामसेवकांची बैठक घ्यावी व  संभाव्य पाणी टंचाई असणारी गावे यांचा आढावा घ्यावा , प्रकल्पात पाणी आहे परंतु विदयुत पुरवठा नसेल तर  त्याबाबत आढावा घेण्यात यावा ,  पाणी वितरणाबाबत शाश्वत आराखडा तयार करण्यात यावा , शासकीय टँकरची स्थिती कळवावी, प्रत्येक  गावाचा  जलप्रबंधनाचा शाश्वत  आराखडा  तयार करुन  आहे त्या पाण्याचा येणाऱ्या मार्च ते जुलै या कालावधीपर्यत विनियोग करावा , दि.30 नोव्हेंबर पूर्वी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत  करुन जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा तयार करावा , जलयुक्त शिवार योजनेतून किती पाणी उपलब्ध झाले याचा अहवाल सादर करणे इत्यादी सूचना सर्व संबंधितांना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.
          या बैठकीस सर्व तहसिलदार , सर्व गट विकास  अधिकारी , जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.देवकर , जलसंधारण विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते .

Monday, 21 November 2016

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय कार्यान्वित


उस्मानाबाद,दि.21:-  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाचे उदघाटन आज जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे,यावेळी उप आयुक्त तथा सदस्य,जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य अनिल शेंदारकर, जिल्हा जाती पडताळणी समितीचे सदस्य सचिव ए.के.मिनगिरे,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण एस.एस.शेळके उपस्थित होते.

          जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती उस्मानाबाद येथे कार्यालय कार्यान्वित करण्यात आलेले असून या कार्यालयामध्ये अनुसूचित जाती,विमुक्त व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्ग यांच्या शैक्षणिक/सेवा व निवडणूक विषयी दावा प्रकरणांची पडताळणी होणार आहे. जिल्हातील सर्व नागरिकांनी उपरोक्त जाती दाव्याचे पडताळणीचे अर्ज लातूर येथे सादर न करता उस्मानाबाद येथील जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी सिमिती या कार्यालयात सादर करावेत असे आवाहन सदस्य अनिल शेंदारक यांनी केले आहे. 

नागरिकांकरीता रद्द नोटा बँकेत भरणे अथवा बदलून घेणे यासाठी मदत कक्षाची स्थापना


उस्मानाबाद,दि.21:- राष्ट्रीय  विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च  न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशनानुसार केंद्र शासनाने रद्द ठरविलेल्या  रुपये 500 आणि 1000 रक्कमेच्या नोटा /  चलन शासनाचे प्रचलित नियमानुसार बँकेत भरणा करणे, नव्या चलनात बदलून घेणे इत्यादी कामानिमित्त्‍  बँकामध्ये होत असलेल्या गर्दीमध्ये सर्वसामान्य, निरक्षर व जेष्ठ नागरिक यांना मदत म्हणून त्यांची विहित नमुन्यात अर्ज भरुण देणे, बँकेच्या स्लिप भरुण देणे आणि प्रचलित नियमानुसार मार्गदर्शन करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून प्राधिकरणाचे अध्यक्ष आर.आर. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  मदत  कक्ष  स्थापन  करण्यात आला..

          जिल्हा  विधी  सेवा   प्राधिकरणाचे सचिव श्री. एस. आर. पडवळ  यांच्या  समन्वयाने दिवाणी न्यायाधीश श्री. ए. ए. बाबर,  विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री. अजित खोत, ॲड. माढेकर उस्मानाबाद स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा व्यवस्थापक श्री. कळमनुरीकर आणि कर्मचारी  यांच्या  उपस्थित  मदत  कक्षाची  स्थापना  झाली. या  मदत  कक्षात  जिल्हा विधी सेवा  प्राधिकरणाकडून प्रशिक्षित  स्वयंसेविका  कु. योगेश्वरी पाटील  आणि कु. कांचन म्हैञे यांची  नियुक्ती  करण्यात  आलेली आहे.  हे स्वंसेवक  गर्दीतील  सामान्य  नागरिक, निरक्षर आणि जेष्ठ नागरिक यांच्या वैयक्तिक  बँक  व्यवहाराकरीता मदत करतील, असे जिल्हा  विधी  सेवा  प्राधिकरणाचे सदस्य  सचिव श्री. एस. आर. पडवळ  यांनी  कळविले आहे.