Friday, 7 August 2026

कमी पाण्यातही लाखोंचे उत्पन्न ; धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती ठरतेय आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग मराठवाड्यात कोष उत्पादनात धाराशिवचा दुसरा क्रमांक; एकरी दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न, ‘धाराशिव सिल्क क्लस्टर’ला मंजुरी

कमी पाण्यातही लाखोंचे उत्पन्न ; धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती ठरतेय आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग मराठवाड्यात कोष उत्पादनात धाराशिवचा दुसरा क्रमांक; एकरी दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न, ‘धाराशिव सिल्क क्लस्टर’ला मंजुरी धाराशिव दि.७ ऑगस्ट (जिमाका) अनिश्चित पाऊस,दुष्काळी परिस्थिती आणि पारंपरिक पिकांतील वाढते उत्पादनखर्च यामुळे अनेक शेतकरी पर्यायी शेतीकडे वळत आहेत.अशा परिस्थितीत रेशीम शेती हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत असून,कमी पाण्यात,कमी कालावधीत आणि हमखास उत्पन्न देणारा हा उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देत आहे.तुती लागवडीपासून रेशीम धागा आणि कापड निर्मितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर रोजगार निर्माण करणारा हा शेतीपूरक उद्योग जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. धाराशिव जिल्ह्याचे हवामान आणि भौगोलिक परिस्थिती रेशीम उद्योगासाठी अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति एकर वार्षिक दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत.मराठवाडा विभागात रेशीम उद्योग आणि कोष उत्पादनात धाराशिवने दुसरे स्थान मिळविले असून,१०० टक्के शेतकरी रेशीम अळ्यांची ‘चॉकी’ घेणारा आणि १०० अंडीपुंजामागे उत्कृष्ट कोष उत्पादन करणारा अग्रगण्य जिल्हा म्हणून धाराशिवची ओळख निर्माण झाली आहे. राज्य शासनाने मार्च २०१६ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) तुती लागवडीला मान्यता दिल्यानंतर या उद्योगाला मोठी चालना मिळाली.जिल्ह्यात सध्या १४ रेशीम किटक चॉकी पुरवठा केंद्रे कार्यरत आहेत.या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना एका पिकासाठी केवळ २० ते २२ दिवसांचा कालावधी लागतो आणि वर्षभरात किमान चार ते पाच पिके घेणे शक्य होते.एका पिकातून सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत,तर चार पिकांतून सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याने हा उद्योग शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. रेशीम उद्योगाचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने सन २०१७ पासून ‘महारेशीम अभियान’ सुरू केले.चालू वर्षापासून रेशीम विभागासोबतच कृषी विभाग आणि पंचायत समित्यांमार्फतही ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यात रेशीम उद्योगाच्या विस्ताराला अधिक गती मिळणार आहे. धाराशिवसारख्या अल्प पर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यातही रेशीम शेती यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. अवेळी पावसाचा फटका बसत असतानाही इतर पिकांच्या तुलनेत कमी पाण्यावर चांगले उत्पादन मिळत असल्याने अनेक शेतकरी या उद्योगाकडे वळत आहेत. किमान आठ महिने पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनाही रेशीम शेती करता येते.विशेष म्हणजे,एकदा तुतीची लागवड केल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत त्यातून उत्पन्न मिळू शकते,ही या उद्योगाची मोठी जमेची बाजू आहे. मनरेगा अंतर्गत एक एकर तुती लागवडीसाठी अकुशल आणि कुशल कामांसाठी मिळून ४.३२ लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध होत आहे.त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनाही या उद्योगात उतरायला प्रोत्साहन मिळत आहे. सध्या जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत १,३८० कामे सुरू असून,१,५६० शेतकरी रेशीम उद्योगाशी जोडले गेले आहेत.जिल्ह्यात १,५८५ एकरांवर तुतीची लागवड करण्यात आली आहे.आतापर्यंत ८.७६ लाख अंडीपुंजांचा पुरवठा करण्यात आला असून,त्यातून ५२३ टन रेशीम कोषांचे उत्पादन झाले आहे. रेशीम कोष उत्पादनापुरताच हा उद्योग मर्यादित नसून,कोषापासून धागा निर्मिती (रीलिंग),ट्विस्टिंग युनिट्स आणि इतर मूल्यवर्धित उद्योगांसाठीही मोठ्या संधी उपलब्ध आहेत.जिल्ह्यात कळंब तालुक्यातील देवधानोरा,भूम तालुक्यातील माणकेश्वर आणि वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथे रेशीम शेती गट कार्यरत आहेत.उत्पादित रेशीम कोषांना बेंगळुरूसह जालना,बीड आणि सोलापूर येथील बाजारपेठ उपलब्ध आहे. याशिवाय,आकांक्षीत जिल्हा धाराशिवसाठी ‘धाराशिव सिल्क क्लस्टर’ प्रकल्पालाही मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे भविष्यात रेशीम उद्योगाची संपूर्ण मूल्यसाखळी जिल्ह्यात विकसित होण्यास चालना मिळणार असून, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. रेशीम शेती ही केवळ पर्यायी शेती नसून,शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा,ग्रामीण रोजगाराचा आणि शाश्वत कृषी विकासाचा प्रभावी मार्ग ठरत आहे.कमी पाण्यात अधिक उत्पन्न आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देणारा हा उद्योग धाराशिवच्या ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. *****

Thursday, 6 August 2026

गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार योजनेतील १५५ कामांची पडताळणी पूर्ण ; अनियमितता आढळली नाही

गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार योजनेतील १५५ कामांची पडताळणी पूर्ण ; अनियमितता आढळली नाही धाराशिव,दि.६ ऑगस्ट (जिमाका) जलसंधारणाला चालना देत जलसाठ्यांची क्षमता वाढविणे, धरणे व तलावांतील गाळ काढून त्याचा शेतीसाठी सुपीक माती म्हणून उपयोग करणे आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करून शेतीची उत्पादकता वाढविणे,हा 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' योजनेचा मुख्य उद्देश आहे. जलसंधारणासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीस हातभार लावणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सन २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये मंजूर झालेल्या १५५ कामांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये कोणतीही अनियमितता आढळून आलेली नसल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाने दिली आहे. २८ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार "गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार" तसेच "नालाबांधणीकरण व रुंदीकरण" योजनेंतर्गत सन २०२४-२५ व २०२५-२६ मधील एकूण १५५ कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये जलसंपदा विभागाची ४५ तर मृद व जलसंधारण विभागाची ११० कामे समाविष्ट आहेत.पूर्ण झालेली कामे ५० अशासकीय संस्था आणि ५ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविण्यात आली असून,त्यात धरणांतील गाळ काढणे तसेच नालाबांधणीकरण व रुंदीकरणाच्या कामांचा समावेश आहे. या कामांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले होते.त्यानुसार सर्व १५५ कामांची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोणत्याही कामात अनियमितता आढळून आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान,या कामांबाबत कोणत्याही शेतकऱ्याला काही तक्रार किंवा समस्या असल्यास त्यांनी मृद व जलसंधारण विभाग,धाराशिवचे जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयात पुढील तीन दिवसांच्या आत लेखी स्वरूपात आपली तक्रार सादर करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारींचे निराकरण केल्यानंतरच संबंधित निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी दिली. *******

Wednesday, 5 August 2026

किशोरवयीन मुला-मुलींना 'मैत्री' क्लिनिकचा विश्वासार्ह आधार शारीरिक,मानसिक व भावनिक आरोग्याबाबत मोफत समुपदेशन; जिल्ह्यात तीन वर्षांत ३८ हजारांहून अधिकांनी घेतला लाभ

किशोरवयीन मुला-मुलींना 'मैत्री' क्लिनिकचा विश्वासार्ह आधार शारीरिक,मानसिक व भावनिक आरोग्याबाबत मोफत समुपदेशन; जिल्ह्यात तीन वर्षांत ३८ हजारांहून अधिकांनी घेतला लाभ धाराशिव,दि.५ जुलै (जिमाका) किशोरावस्था हा बालपणातून तारुण्याकडे वाटचाल करण्याचा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा आहे.या काळात मुला-मुलींमध्ये शारीरिक, मानसिक,भावनिक,लैंगिक, वैचारिक तसेच वर्तणुकीत अनेक बदल घडत असतात.साधारणतः १० ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि विश्वासार्ह माहितीची गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय किशोरवयीन आरोग्य कार्यक्रम (आरकेएसके) अंतर्गत 'मैत्री (AFHC) क्लिनिक' सुरू करण्यात आले असून,धाराशिव जिल्ह्यात या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव,तसेच उपजिल्हा रुग्णालय उमरगा, परंडा, तुळजापूर आणि कळंब येथे मैत्री क्लिनिक कार्यरत आहेत. अनेकदा किशोरवयीन मुला -मुलींना शारीरिक,मानसिक किंवा भावनिक समस्यांविषयी आई- वडील,पालक,नातेवाईक अथवा शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधणे कठीण जाते.त्यामुळे त्यांच्या मनातील अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.अशा वेळी योग्य व शास्त्रीय माहिती न मिळाल्याने ते चित्रपट,दूरदर्शन, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून मिळणाऱ्या अपुऱ्या अथवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्याची शक्यता वाढते.यामुळे गैरसमज,चुकीचे निर्णय, व्यसनाधीनता किंवा धोकादायक वर्तन निर्माण होण्याचा धोका असतो. याच पार्श्वभूमीवर मैत्री क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि समुपदेशकांकडून किशोरवयीन मुला-मुलींना शारीरिक,मानसिक, भावनिक व लैंगिक आरोग्याविषयी मार्गदर्शन,पौष्टिक आहाराबाबत माहिती,वैयक्तिक समुपदेशन, विवाहपूर्व मार्गदर्शन,कुटुंब नियोजन साधनांविषयी माहिती तसेच संपूर्ण गोपनीयतेसह आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. किशोरवयीन मुला- मुलींच्या मनातील प्रश्नांना शास्त्रीय, विश्वासार्ह आणि गोपनीय पद्धतीने उत्तरे देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या क्लिनिकमधून केले जात आहे. या सेवांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून,सन २०२४-२५ मध्ये १५ हजार २७९, सन २०२५-२६ मध्ये १७ हजार १७१, तर सन २०२६-२७ मध्ये जुलै २०२६ अखेर ५ हजार ६२८ किशोरवयीन मुला-मुलींनी मैत्री क्लिनिकच्या सेवांचा लाभ घेतला आहे. दरम्यान,आरकेएसके कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये नियमितपणे आरोग्य जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.अधिकाधिक किशोरवयीन मुला-मुलींनी मैत्री क्लिनिकला भेट देऊन आपल्या आरोग्यविषयक समस्या मोकळेपणाने मांडाव्यात आणि योग्य,शास्त्रीय माहितीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी केले आहे. ******

जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठ्याची नवी दिशा ३४६ योजना पूर्ण; ९१.६६ टक्के घरांना नळजोडणी, २९७ गावे 'हर घर जल' घोषित

जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठ्याची नवी दिशा ३४६ योजना पूर्ण; ९१.६६ टक्के घरांना नळजोडणी, २९७ गावे 'हर घर जल' घोषित धाराशिव,दि.५ जुलै (जिमाका) ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील कामांना वेग आला आहे.जिल्ह्यात एकूण ५९४ पाणीपुरवठा योजना मंजूर असून, त्यापैकी ५९३ योजनांना कार्यारंभ देण्यात आला आहे.यापैकी ३४६ योजना पूर्ण झाल्या असून,६० योजना ० ते ५० टक्के,तर १८७ योजना ५० ते ९९ टक्के प्रगतीपथावर आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा (एफएचटीसी) करण्यासाठी जिल्ह्यास २ लाख ८८ हजार ५५९ नळजोडण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.त्यापैकी २ लाख ६४ हजार ४८० नळजोडण्या पूर्ण झाल्या असून,हे प्रमाण ९१.६६ टक्के इतके आहे.तसेच ५३३ गावे 'हर घर जल' नोंदीत आली असून, त्यापैकी २९७ गावे 'हर घर जल' म्हणून घोषित करण्यात आली आहेत. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १९९ योजनांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.त्यापैकी १२० योजनांना शासनाची मान्यता मिळाली असून,५० प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.उर्वरित २९ प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आवश्यक ते बदल करून प्रस्ताव अंतिम करण्यात येत आहेत.याशिवाय संभाव्य १४ व्या एसएलएससी बैठकीसाठी ७५ योजनांचे आराखडे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले असून, शासनाची परवानगी मिळताच ते सादर करण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायतींकडून नव्याने ३९ गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत ५९४ योजनांसाठी ३८३.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यापैकी आजपर्यंत १८८.३७ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून,प्राप्त झालेला संपूर्ण निधी योजनांच्या अंमलबजावणीवर खर्च करण्यात आला आहे. पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी जलतारा उपक्रमांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ८०६ जलतारे,तर पंचायत समित्यांमार्फत लोकसहभागातून ४ हजार ६२१ जलतारे उभारण्यात आले आहेत. दरम्यान,सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ६ गावांना ८ टँकरद्वारे,तर ७१ गावांसाठी १३५ विंधन विहिरींचे अधिग्रहण करून पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील आहे. ******

बालकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता आणि समन्वय अधिक बळकट व्हावा ॲड.संजय पुराणिक

बालकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता आणि समन्वय अधिक बळकट व्हावा ॲड.संजय पुराणिक बाल हक्क संरक्षण आयोगाची धाराशिवमध्ये सुनावणी व आढावा बैठक बालविवाह,बालसुरक्षा,शिक्षण आणि बालहक्कांबाबत विविध सूचना धाराशिव,दि.४ ऑगस्ट (जिमाका) जिल्ह्यात बालकांविषयीची संवेदनशीलता समाधानकारक असून आयोगाकडे केवळ पाच प्रकरणे दाखल झाली आहेत.ही बाब संबंधित विभागांनी वेळेत दखल घेऊन प्रश्न सोडविण्याची प्रभावी कार्यपद्धती आणि जिल्ह्यातील बालकांविषयीची जागरूकता दर्शविते.मात्र,बालकांच्या प्रश्नांवर काम करताना विविध विभागांमध्ये अधिक प्रभावी समन्वय,संवाद आणि गुणवत्तापूर्ण कार्यपद्धती विकसित होणे आवश्यक आहे. बालकांच्या विविध प्रश्नांबाबत यंत्रणा आणि नागरिकांनी अधिक संवेदनशील व जागरूक राहावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड.संजय पुराणिक यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज मंगळवारी ४ जुलै रोजी आयोजित महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सुनावणीनंतर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आयोगाचे सदस्य अतुल देसाई,प्रवीण भुजाडे,श्रीमती.गीतांजली बुटी,श्रीमती शुभांगी तांबट,श्रीमती.मिलन जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,आयोगाच्या सचिव वंदना जैन,प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवदत्त गिरी,पोलीस उपअधीक्षक सुरेश राऊत,सरकारी कामगार अधिकारी यांचे प्रतिनिधी,बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने,बाल न्याय मंडळाच्या सदस्या वैशाली धवणे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर तसेच महिला व बाल विकास विभागातील अधिकारी- कर्मचारी, बालगृहांचे अधीक्षक आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ॲड.पुराणिक म्हणाले की,बालकल्याण समिती,बाल न्याय मंडळ,चाइल्ड हेल्पलाइन,महिला व बाल विकास विभाग,पोलीस,शिक्षण विभाग तसेच इतर संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम केल्यास अनेक प्रकरणे आयोगापर्यंत येण्यापूर्वीच निकाली निघू शकतात. बालकांच्या हक्कांबाबत प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. बालकांविषयीची संवेदनशीलता वाढल्यास त्यांच्याशी संबंधित प्रकरणांचे प्रमाणही कमी होईल.आयोगाकडे प्रकरणे तेव्हाच येतात,जेव्हा संबंधित विभागांकडून वेळेत दखल घेतली जात नाही किंवा तक्रारदारांना न्याय मिळत नाही.त्यामुळे आयोगाकडे कमी प्रकरणे येणे ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धाराशिव जिल्ह्यातील पाच प्रकरणांपैकी तीन शिक्षण विभागाशी तर दोन महिला व बाल विकास विभागाशी संबंधित असल्याची माहिती त्यांनी दिली.प्रत्येक प्रकरणात गुन्हा दाखल करणे हाच एकमेव पर्याय नसतो.अनेक प्रश्न समुपदेशन,संवाद आणि पालकांच्या योग्य प्रबोधनातून प्रभावीपणे सोडविता येतात. बालविवाह,बालकामगार,बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कायद्याशी संबंधित बाबींसह बाल संरक्षणाच्या प्रत्येक विषयात संबंधित यंत्रणांनी तात्काळ दखल घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बालविवाह रोखण्यासाठी व्यापक समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता असून प्रत्येकामध्ये बालकांविषयी संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे. विशेष बाल पोलीस पथक स्थापन करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचे सांगत त्यांनी बालकांचे प्रश्न पोलीस विभागाने अत्यंत गांभीर्याने हाताळावेत,असे निर्देश दिले. स्थलांतरित बालकांच्या शिक्षणाकडे शिक्षण विभागाने विशेष लक्ष द्यावे.भाषा वेगळी असल्यामुळे शाळाबाह्य मुलांचे प्रमाण वाढते का,याची खातरजमा करून शाळाबाह्य मुलांची कारणे शोधावीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. ज्या शाळांमध्ये संरक्षण भिंत नाही,तेथे आवश्यक उपाययोजना कराव्यात. मुलींसाठी सर्व शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व ‘पिंक रूम’ची सुविधा उपलब्ध करून द्यावी.वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची व्यवस्था शाळा,निवासी शाळा आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व शाळांमध्ये तक्रार पेट्या बसवून त्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नियमित दखल घ्यावी.‘बालस्नेही गाव’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवावी.विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या शाळा बस व व्हॅन सुरक्षित आहेत का,त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत का,तसेच वाहनचालकांकडे चारित्र्य प्रमाणपत्र आहे का,याची खात्री करावी.बालकामगारमुक्त जिल्हा करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी आयोगाच्या सदस्यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले.भविष्यात आयोगाकडे प्रकरणांची संख्या वाढली तरी त्याकडे केवळ नकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज नाही.बालहक्कांविषयी वाढलेली जनजागृती,प्रचार-प्रसार आणि नागरिकांची वाढलेली जागरूकता यामुळेही तक्रारींची संख्या वाढू शकते. त्यामुळे प्रत्येक आकडेवारीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असल्याचे ॲड.श्री.पुराणिक यांनी सांगितले. "शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालके स्वतः त्यांच्या हक्कांसाठी लढू शकत नाहीत.त्यामुळे त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही शासन, प्रशासन,समाज आणि प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,असे सांगत त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्व विभागांनी बालकांविषयीची संवेदनशीलता कायम राखून परस्पर समन्वय अधिक बळकट करावा आणि आयोगाच्या सहकार्याने बालहक्क संरक्षणाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.तसेच बालकांच्या हितासाठी समर्पितपणे कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छाही दिल्या. ******

Tuesday, 4 August 2026

प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटच्या वापरावर ३० ऑगस्टपर्यंत निर्बंध

प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटच्या वापरावर ३० ऑगस्टपर्यंत निर्बंध धाराशिव,दि. ४ ऑगस्ट (जिमाका) जिल्ह्यात १ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसेच २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद साजरी होत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाभर विविध पक्ष,संघटना व मंडळांकडून मिरवणुका,रॅली आणि शोभायात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.या मिरवणुकांदरम्यान प्लाझ्मा, बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये संपूर्ण जिल्ह्यात १ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत अशा प्रकाशयंत्रांच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मिरवणुका,रॅली व शोभायात्रांमध्ये प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे सहभागी नागरिक तसेच मिरवणूक पाहण्यासाठी आलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या डोळ्यांना इजा होऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.तसेच या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात किंवा अनुचित प्रकार घडण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ (१) मध्ये नागरिकांच्या जीवितास किंवा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याची तरतूद आहे.त्यानुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व ईद-ए-मिलाद निमित्त होणाऱ्या मिरवणुका,रॅली व शोभायात्रा शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांच्या डोळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर कटाक्षाने टाळणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ च्या कलम १६३ अन्वये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व ईद-ए-मिलाद निमित्त १ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व मिरवणुका,रॅली आणि शोभायात्रांमध्ये प्लाझ्मा, बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर करण्यास निर्बंध लागू करण्यात आले असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली. ********

ाराशिवच्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही

धाराशिवच्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही धाराशिव,दि. ४ ऑगस्ट (जिमाका) जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण,सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आरोग्य क्षेत्रातील आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही,अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आज ४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या स्थापना व उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,तसेच वैद्यकीय अधिकारी,विविध विभागांचे अधिकारी,आरोग्य कर्मचारी तसेच समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक म्हणाले की,जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची स्थापना हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम,समन्वयपूर्ण आणि लोकाभिमुख बनविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी,विभागांमधील समन्वय आणि नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आयुष्मान आरोग्य मंदिर,प्राथमिक आरोग्य केंद्रे,ग्रामीण रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालये,जिल्हा रुग्णालये,महिला रुग्णालये तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांसारख्या योजनांद्वारे आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगत त्यांनी या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. सरनाईक यांनी आरोग्य संस्थांमधील सेवा अधिक परिणामकारक करणे, नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींचे तातडीने निराकरण करणे,राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, विविध विभागांतील समन्वय वाढविणे आणि लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करणे ही समितीची प्रमुख जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यात दवाखान्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाईल. तसेच रुग्णवाहिका आणि शववाहिका सेवा नागरिकांना वेळेत व कार्यक्षमतेने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. प्रतिबंधात्मक आरोग्य,माता-बाल आरोग्य, पोषण,स्वच्छता,पाणीपुरवठा,संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवरील नियंत्रण, जनजागृती आणि समुदाय सहभाग या क्षेत्रांना या समितीच्या माध्यमातून अधिक बळ मिळेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी समितीतील सर्व सदस्य,अधिकारी आणि संबंधित विभागांनी समन्वय,पारदर्शकता आणि जबाबदारीच्या भावनेतून कार्य करून धाराशिव जिल्ह्याला आरोग्य सेवांच्या क्षेत्रात राज्यातील आदर्श जिल्हा बनविण्याचे आवाहन केले.तसेच समितीच्या स्थापनेसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून समितीच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Monday, 3 August 2026

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी ; खडकी येथे १० ते १२ ऑगस्टदरम्यान भरती

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी ; खडकी येथे १० ते १२ ऑगस्टदरम्यान भरती धाराशिव,दि.३ ऑगस्ट (जिमाका) माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटर, खडकी (पुणे) येथे युनिट हेडक्वार्टर कोट्याअंतर्गत अग्निवीर सैन्य भरती आयोजित करण्यात आली असून,ही भरती दि.१० ऑगस्ट २०२६ ते दि.१२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे माजी सैनिकांच्या पाल्यांना भारतीय सैन्यात दाखल होऊन देशसेवेचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांच्या पाल्यांनी या अग्निवीर सैन्य भरती (युनिट हेडक्वार्टर कोटा) या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. ******

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी; राष्ट्रसेवेचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी; राष्ट्रसेवेचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन धाराशिव,दि.३ ऑगस्ट (जिमाका) देशसेवेची परंपरा पुढे नेण्याची संधी माजी सैनिकांच्या पाल्यांना उपलब्ध झाली असून,१ ई.एम.ई. सेंटर,सिकंदराबाद (तेलंगणा) येथे युनिट हेडक्वार्टर कोट्याअंतर्गत अग्निवीर सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे.ही भरती दि.२९ ऑगस्ट २०२६ ते दि.११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे. देशाच्या संरक्षणासाठी योगदान देण्याची इच्छा असलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी ही भरती एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.भारतीय सैन्याची गौरवशाली परंपरा पुढे नेत राष्ट्रसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी पात्र युवकांनी या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पाल्यांनी या अग्निवीर सैन्य भरती (युनिट हेडक्वार्टर कोटा) या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. *******

माजी सैनिकांच्या पत्नी,विधवा पत्नी व महिला पाल्यांसाठी महिला सुरक्षा रक्षक भरतीची सुवर्णसंधी

माजी सैनिकांच्या पत्नी,विधवा पत्नी व महिला पाल्यांसाठी महिला सुरक्षा रक्षक भरतीची सुवर्णसंधी धाराशिव,दि.३ जुलै (जिमाका) माजी सैनिकांच्या पत्नी,माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्य यांच्यासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को),पुणे यांच्या वतीने महिला सुरक्षा रक्षक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. मेस्को,धाराशिव येथे होणाऱ्या या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक वेतनासह दर सहा महिन्यांनी वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार आहे.तसेच कामगार कायद्यानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.),कर्मचारी राज्य विमा योजना (ई.एस.आय.),ग्रॅज्युएटी आदी सुविधांचाही लाभ मिळणार आहे. या भरतीसाठी इच्छुक माजी सैनिक पत्नी,माजी सैनिक विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्य यांनी अधिक माहितीसाठी खालील दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच सर्व इच्छुकांनी आपल्या सर्व मूळ कागदपत्रांसह दि.५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिव येथे उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव,दूरध्वनी : ०२४७२ -२२२५५७,भ्रमणध्वनी : ७५८८५२७५५४, श्री.गंगाधर गायकवाड : (९४२२३०७५९३) श्री. बबन कोळी (८०११४१४३६०) यांचेशी संपर्क साधावा. *******