Thursday, 9 May 2019

कृषी निविष्ठा विक्रेता/वितरक/निविष्ठा साठवणूक केंद्रधारकांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा


वृत्त क्र. 264                                                       दि. 9 मे 2019

कृषी निविष्ठा विक्रेता/वितरक/निविष्ठा साठवणूक केंद्रधारकांनी
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा
                                                    --जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
          उस्मानाबाद-दि.9-  कृषी निविष्ठा विक्रेता/वितरक/निविष्ठा साठवणूक केंद्रधारकांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा,असे आवाहन खरीप हंगाम 2019 पूर्वतयारीच्या अनुषंगाने कृषी निविष्ठा विक्रेता/वितरक/निविष्ठा साठवणूक केंद्रधारक आणि गुणनियंत्रण निरीक्षक यांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी काल (दि.8मे रोजी )येथे केले.
                   यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे उस्मानाबाद जिल्हयातील कृषी निविष्ठा विक्रेते/वितरक/निविष्ठा साठवणूक केंद्रधारक आणि गुणनियंत्रण निरीक्षक यांची जिल्हास्तरीय प्रशिक्षण व आढावा बैठक संपन्न झाली,त्यावेळी त्या बोलत होत्या.
          यावेळी या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.उमेश घाटगे, कृषि विकास अधिकारी डॉ.टि.जी.चिमनशेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या, शेतकऱ्यांना निविष्ठा विक्री करत असताना विक्रेत्यांनी चांगले मार्गदर्शन करणे आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा अनावश्यक खर्च वाढणार नाही. शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार बियाणे/खते/किटकनाशके मिळायला हवे, शेतकऱ्यांना त्यांनी वापरलेल्या निविष्ठांचा लाभ व्हायला हवा,जिल्हयात कोणत्याही प्रकारचे बोगस उत्पादन येणार नाही, येत असल्यास प्रशासनास कळवावे, प्राथमिक स्तरावर निकृष्ठ/ बोगस उत्पादने थांबविणेबाबत विक्रेत्यांनी सहकार्य करावे.  तसेच शेतकऱ्यांना बोगस निविष्ठा विक्री करू नये,असे करणाऱ्याचा व्यवसाय बंद करण्यात येईल, निरीक्षकांनी सर्तक राहून गुणनियंत्रणाचे काम करावे अन्यथा कारवाई केली जाईल, मान्यता असलेले पी.जी.आर.बायोफर्टीलायझर्स विक्री करण्याचे सूचित करुन शेवटी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा,असेही श्रीमती मुधोळ- मुंडे यांनी सांगितले.        
                   मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी योग्य दर्जाच्या कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा. नियुक्ती करण्यात आलेल्या जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकाने सजगपणे नजर ठेवून बोगस, संशायास्पद कृषी निविष्ठा आढळून आल्यास संबधितावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे आवाहन केले.
          जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे  यांनी कृषी निविष्ठा / विक्रेते / वितरक तसेच निरीक्षकांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक निविष्ठा पुरवठयासाठी सर्वानीच प्रमाणिकपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे सांगितले.
          कृषी विकास अधिकारी डॉ.टि.जी.चिमनशेटे यांनी उपस्थितांना खते / बियाणे /  किटकनाशक कायदे व परवानाबाबत सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले.
          कृषी उपसंचालक श्री.सुभाष चोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय श्री.सी.जी.जाधव यांनी केले.
          या कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी –कर्मचारी, जिल्हयातील कृषी निविष्ठा विक्रेते/वितरक/निविष्ठा साठवणूक केंद्रधारक आणि गुणनियंत्रण निरीक्षक,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
******
            

Tuesday, 7 May 2019

चारा छावण्यांमधील जनावरांना 18 किलो हिरवा चारा देण्याचे शासनाचे आदेश पारित ---पालकमंत्री अर्जुन खोतकर


वृत्त क्र. 262                                                        दि.7 मे 2019










चारा छावण्यांमधील जनावरांना 18 किलो
हिरवा चारा देण्याचे शासनाचे आदेश पारित
                                                            ---पालकमंत्री अर्जुन खोतकर
शासन बळीराजा व त्याच्या पशुधनासाठी सदैव कटीबद्ध

उस्मानाबाद,दि.7- पूर्वीच्या नियमाप्रमाणे चारा छावण्यातील मोठ्या जनावरांना प्रतिदिन 15 किलो हिरवा चारा देण्याचे शासनाचे आदेश होते मात्र आता शेतकऱ्यांची गरज ओळखून शासनाने चार मे च्या शासन निर्णयानुसार चारा छावणीतील मोठ्या जनावरांना प्रतिदिन 18 किलो हिरवा चारा देण्याचे आदेश नव्याने पारित केले आहेत.
           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या काळजीपोटी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विनंती केली होती की,राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, त्यावरील उपाययोजना राबविण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी.यासाठी निवडणूक आयोगानेही  त्यास  सकारात्मक प्रतिसाद देत दुष्काळी परिस्थितीत जनतेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना राबविण्यासाठी आचारसंहिता काही अंशी शिथिल करण्यास परवानगी दिली आहे.त्यानुषंगाने पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज जिल्ह्याच्या काही भागात दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
        आज पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी सरमकुंडी,हांडोग्री,मलकापूर, खामगाव आणि ढोकी या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत येथील नर्सरी, पशुधन, चारा छावणी, बोअर अधिग्रहण, विहीर अधिग्रहण, टँकरची मागणी आदि प्रश्नांबाबत शेतकऱ्यांशी, पदाधिकाऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींशीही सविस्तरपणे गांभीर्यपूर्वक चर्चा केली.
         यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) श्री. सुरेश मारकड व सामाजिक वनीकरण चे विभागीय वन अधिकारी श्री. बेडके यांनी नरेगा अंतर्गत एकूण 688 ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू असून सामाजिक वनीकरण व तालुका कृषी अधिकारी अंतर्गत यंत्रणांची एकूण 139 कामे सुरू असल्याची माहिती पालकमंत्री श्री. खोतकर यांना दिली.याशिवाय ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर मजुरांची साप्ताहिक उपस्थिती 7 हजार 358 तर यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामांवर मजुरांची उपस्थिती 1हजार 983 असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच सिंचन विहिरींची 444, शेततळ्यांची 22 आणि घरकुलाची 195 कामे सुरू असल्याचेही त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.
       यावेळी पालकमंत्री श्री.खोतकर यांनी या ठिकाणी उपस्थित महिला मजुरांशीही संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या रोजगाराविषयी, भत्याविषयी, अडीअडचणींविषयी आस्थेवाईकपणे विचारणाही केली. चारा छावण्यांना भेट देताना तेथील शेतकर्‍यांशीही पालकमंत्री श्री. खोतकर यांनी सविस्तर चर्चा केली.जनावरांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली,त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अडचणींविषयी जाणून घेतले.काही समस्यांबाबत पालकमंत्री श्री.खोतकर यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या तात्काळ सोडवण्याविषयीचेही मोबाईलवरून आदेश दिले.यावेळी श्री.खोतकर यांनी शासनाने 4 मे रोजी पारित केलेल्या शासननिर्णयाची माहिती उपस्थित शेतकर्‍यांना दिली. त्यांनी यावेळी या शासन निर्णयातील पशुधन आहारात झालेली वाढ, दैनंदिन उपस्थितीची नोंद, बारकोड द्वारा पशुधनाची मोजणी इत्यादी बाबींविषयीची माहिती दिली. याचबरोबर पूर्वी मोठ्या जनावरांना 15 किलो हिरवा चारा व उसाचे वाडे देण्यात येत होते, ते आता या नवीन शासन निर्णयाप्रमाणे 18 किलो हिरवा चारा व उसाचे वाडे तर लहान जनावरांनाही पूर्वी साडेसात किलो पशुखाद्य दिले जात होते परंतु नव्या शासन निर्णयानुसार आता ते नऊ किलो दिले जाईल, अशीही माहिती श्री.खोतकर यांनी शेतकऱ्यांना दिली.
याशिवाय पालकमंत्री श्री.खोतकर यांनी सरमकुंडी येथील शेतकऱ्यांनी केलेल्या चारा छावणी व टँकरच्या मागणीची, हांडोग्री येथील शेतकऱ्यांनी केलेल्या चारा छावण्यांची व राहत शिबिराच्या मागणीची,भूम मधील पाथरूड येथील विहीर अधिग्रहण मागणीची, मलकापूर येथील बोअर अधिग्रहण मागणीची,खामगाव मधील चारा छावणीकरिता जनरेटरच्या मागणीची तसेच विद्युत पुरवठाच्या मागणीची,ढोकी येथील टॅंकरच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शक्य तितक्या लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा,असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांना दिले.त्याचबरोबर उपस्थित अधिकाऱ्यांनाही निर्देश दिले की,त्यांनी चारा छावण्यांची पाहणी करतानाही पशुधन व शेतकर्‍यांना नियमित सोयीसुविधा मिळण्यात अडथळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी तसेच या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करावी.
      यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश आघाव,पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील पसरटे,नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील मारकड, विभागीय वनाधिकारी (सामाजिक वनीकरण)श्री. बेडके तसेच विविध पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
                                                                                   *****

Monday, 6 May 2019

जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरोग शोध मोहिम सुरु


वृत्त क्र. 261                                                        दि.6 मे 2019
 जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरोग शोध मोहिम सुरु

उस्मानाबाद, दि 6.-  जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम दि. 6 मे  ते दि. 18 मे 2019 या कालावधीत जिल्ह्यातील क्षयरोगाच्या बाबतीत जोखमी भागात राबविण्यात येत आहे. या कालावधीत आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती घरोघर जाऊन क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णाची पाहणी करणार आहेत  व त्यामधून संशयित क्षयरोग असलेल्या रुग्णांचा बेडका नमुना तपासणीसाठी घेऊन त्यांना क्ष-किरण तपासणी साठी संदर्भित करण्यात येणार आहे.
 तरी या कालावधीत घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांच्याकडून क्षयरोगा बाबतची तपासणी करून घेऊन त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.हनुमंत वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गलांडे,जिल्हा क्षयरोग अधिकारी ए.एन.सोपल यांनी केले आहे.
******