उस्मानाबाद, दि. 16:- पाणीटंचाईच्या समस्येला आपणा सर्वांना सामोरे जावे लागत
असून अशा परिस्थितीमध्ये पाण्याचे महत्त्व समजून त्याचे योग्य नियोजन केले पाहिजे,
असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले.
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने जिल्ह्यात 16 ते
22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या
यशवंतराव चव्हाण सभागृहात या सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधीक्षक अभियंता
श्री.सु.सा.पगार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी (पाणी व स्वच्छता) मधुकर देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न व स्थापत्य अभियांत्रिकी व पाणीसाठवणूक संचय
धरणाचे तज्ञ सर डॉ.मोक्षगुड्डम विश्वेश्वरया यांच्या प्रतिमेचे पूजन व
दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. गमे
म्हणाले की, शेती ही निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे शेती शाश्वत कशी होईल व
शेतीला पाणी कसे मिळेल यासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करुन थेंब न थेंब पाण्याचा
काटकसरीने वापर केला पाहिजे.
जिल्ह्यात बारमाही वाहणारी एकही मोठी नदी नाही व
मोठे जलसाठेही नाहीत त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेततळे घेतले
पाहिजेत जेणेकरुन पावसाचा खंड पडला तर उपलब्ध पाण्याचावापर शेतीसाठी
करता येईल व उत्पादन क्षमता वाढण्यासही मदत होईल.पडणाऱ्या
पावसाच्यापाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील पावसाचे सरासरी प्रमाण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी
पिक पध्दतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. आधुनिक पध्दतीने शेती पिकाचे नियोजन केले
पाहिजे, ऊस पिक घेताना सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी दिले पाहिजे.
विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील जुने
जलसाठे दुरुस्ती करणे, केटीवेअर दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही
जिल्हाधिकारी श्री.गमे यावेळी म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यावेळी बोलताना म्हणाले
की, जिल्ह्यास सतत दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने
करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. शेतीसाठी पाण्याचा वापर करताना सुक्ष्म
सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.
शाश्वत पाणीसाठे निर्माण करणे, पाण्याची बचत करणे यासाठी
सामाजिक जनजागृती होणे गरजेचे आहे. पाण्याची बचत करुन उत्पादन क्षमता
वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पाण्याचा आराखडा तयार
करुन कमी पडणारे पाणी कसे जलसंवर्धन करता येईल, यासाठी शेवटच्या माणसापर्यंत
पाण्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. कोलते यांनी यावेळी सांगितले.
पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सु.सा. पगार
यांनी जलजागृती सप्ताहबाबत प्रास्ताविकातून सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रगतशील
शेतकरी पांडुरंग आवाड, डॉ. खजूरे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. आभार पाटबंधारे
विभागाचे उपविभागीय अभियंता श्री.पाटील यांनी मानले. यावेळी जलसंधारण विभाग,
महसूल, जिल्हा परिषद व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी जलप्रतिज्ञा सामूहिकरित्या घेण्यात आली.