Wednesday, 1 November 2017

उस्मानाबाद येथे महा रेशीम अभियानाचा शुभारंभ


उस्मानाबाद, दि.1:-  महाराष्ट्रात रेशीम उद्योगाचा विकास तळागाळातील, खेडयातील शेतकऱ्यांना माहिती व्हावा, या उद्देशाने महारेशीम अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने उस्मानाबाद येथे महा रेशीम अभियानाचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्ह्यात 250 एकर नवीन तुती लागवडीचा लक्षांक दिलेला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्ण करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत नवीन शेतकऱ्यांची निवड करणेकरिता महा रेशीम अभियान राबवून गावो गावी कार्यक्रम व ग्रामसभा घेवून शासन निर्णयानुसार योजनेंतर्गतचे देय लाभ व रेशीम उद्योगाची कार्यपध्दती तसेच या उद्योगापासून मिळणारे उत्पन्न याबाबतची माहिती आणि शेतकऱ्यांना रेशीम उद्योग करण्यास प्रवृत्त करणे, मनरेगांतर्गत 229 एकर क्षेत्रावर तुती लागवड करण्यात आली असून 18 गावामध्ये 275 लाभार्थ्यांकडे कामे चालू आहेत.
सन 2018-19 मध्ये मनरेगांतर्गत तुती लागवड करण्यासाठी नवीन लाभार्थी करिता महा रेशीम अभियान दि.1 ते 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिलह्यातील शंभर गावामध्ये कार्यक्रम घेवून शेतकऱ्यांना रेशीम उद्योगासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.   
यावेळी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार राहूल पाटील, जिल्हा रेशीम अधिकारी श्री.मुल्ला.एम.के, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, रेशीम कार्यालयाचे  उस्मानाबाद समुह प्रमख श्री. एस.ई.इप्पर, बार्टी पुणेचे प्रकल्प अधिकारी तुषार कदम, केंद्रीय रेशीम मंडळाचे सह संचालक श्री.ए.पी.बागडे आदीसह रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.   

“शेतकरी मित्र केंद्र” दिशादर्शक ठरेल - क्रीडा समीक्षक सुनंदन लेले


उस्मानाबाद, दि. 01 :-  जिल्हयातील शेती व शेतकरी वर्गांचे प्रश्न सोडवण्याकरीता शिवार संसद युवा चळवळीद्वारे सुरुवात करण्यात आलेल्या शेतकरी मित्र केंद्राच्या उदघाटनप्रसंगी शेतकरी मित्र केंद्र शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी केले.
शहरातील मार्तंड रेणुका निवास, काझी हॉस्पीटलच्या मागे, समर्थ लॉज जवळ, उस्मानाबाद या ठिकाणी क्रीडा समीक्षक सुनंदन लेले व जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते आज शेतकरी मित्र केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय महाडीक, जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार, पोलीस निरिक्षक श्रीकांत वेणुगुरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री. लेले म्हणाले की, शिवार संसद युवा चळवळ, शिवार फौंडेशन द्वारा संचलित या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या सामाजिक, आर्थिक, वैद्यकिय, शैक्षणिक, नोकरी संदर्भ, शासकीय योजना, स्वयंसेवी संस्था विषयी माहिती, सल्ला व मार्गदर्शन शासकीय प्रलंबित प्रश्नांसाठी पाठपुरावा, नाममात्र दरामध्ये शेतकऱ्यांसाठी ई-सेवा पुरवठा, विशेष त्रस्त शेतकऱ्यांसाठी समुपदेशनाद्वारे माहिती व सल्ला याचबरोबर शेतीविषयक माती परिक्षण, जोडधंदा व्यवसाय, कृषी निविष्ठा, सेंद्रीय शेती, आधुनिक शेती, झिरो बजेट शेती इत्यादी नाविन्यपूर्ण विषयाची माहिती व मदत मिळणार आहे याचा लाभ जिल्हयातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रबोधनाचे काम करत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात जे प्रश्न फक्त प्रबोधनाने  सोडविले जाऊ शकत नाहीत ते प्रश्न प्रत्येक आठवडयाच्या बैठकीत विनायक हेगाणा यांनी मांडले तर त्या प्रश्नावर प्रशासनाच्या वतीने निश्चित तोडगा काढून शेतकऱ्याचे समाधान होईल आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे शेतकरी मित्र केंद्रात आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढून अनेक शेतकऱ्यांना समाधान देण्याचा प्रयत्न होईल.   
कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना कोणत्याही समस्येविषयी सल्ला किंवा मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी 9623250838 या क्रमांकावर सपर्क साधावा किंवा शेतकरी मित्र केंद्रात प्रत्यक्ष येऊन भेटावे असे आवाहन विनायक हेगाणा यांनी केले.

या कार्यक्रमास एबीएएल कंपनी, अविनाश पावळ, निलेश दळवी, मंगेश पाठक यांचे सहकार्य लाभले. या वेळी शेतकरी व विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. 

उस्मानाबादची दिशा करियर ॲकॅडमी राज्यातील पहिले “लोकराज्य स्पर्धा परिक्षा केंद्र”


उस्मानाबाद, दि.1:- महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाची उपयुक्ता लक्षात घेऊन दिशा करियर ॲकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वार्षिक सभासदत्व स्विकारुन राज्यातील पहिले लोकराज्य स्पर्धा परिक्षा केंद्र करण्याचा बहुमान मिळविला आहे.
दिशा करियर ॲकॅडमीच्या कै. प्रा. अविनाश अवताडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त समता हॉल, उस्मानाबाद या ठिकाणी आयोजित अवयवदान व रक्तदान शिबिरात ॲकॅडमीच्या 100 टक्के विद्यार्थ्यांनी अवयवदान व रक्तदान केले याच कार्यक्रमात ॲकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वार्षिक सभासदत्व स्विकारुन राज्यातील पहिले लोकराज्य स्पर्धा परिक्षा केंद्र करण्याचा बहूमान मिळविल्यामुळे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते संचालकांचा सन्मान करण्यात आला.
          जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क विभागाचे उपक्रम, लोकराज्य मासिक महान्यूज वेबपोर्टलचे महत्व आणि उपयोगिता समजावून सांगितल्यामुळे दिशा करियर ॲकॅडमीच्या 100 टक्के विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे सभासदत्व स्विकारले असून लोकराज्य मासिकातील लेखांचे ॲकॅडमीत नियमित वाचन करण्यात येईल असे दिशा करियर ॲकॅडमीचे प्रा. बाळकृष्ण उंबरे यांनी यावेळी सांगितले.  
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा अवयवदान अभियान समन्वयक डॉ. गजानन परळीकर, नगर परिषदेचे स्वच्छता व्यवस्थापक महारुद्र गालट, दिशा करियर ॲकॅडमीचे प्रा. बाळकृष्ण उंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश क्षिरसागर यांनी केले. सुत्रसंचलन सिध्देश्वर मते यांनी केले तर आभार सुमित्रा शिंदे यांनी मानले, यावेळी अजित रणदिवे, सुरवसे, वैद्य, शिंदे, चिंगटे यांच्या सह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.     

अवयवदानाबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी-जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे



उस्मानाबाद, दि.1:- विद्यार्थ्यांनी अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करुन त्याबाबत असणारे  गैरसमज दूर करुन  अवयदान करण्याबाबत प्रभावी मोहीम राबवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
दिशा करियर ॲकॅडमीच्या कै. प्रा. अविनाश अवताडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त समता हॉल, उस्मानाबाद या ठिकाणी आयोजित अवयवदान व रक्तदान शिबिराचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले त्यावेळी बोलत होते. 
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा अवयवदान अभियान समन्वयक डॉ. गजानन परळीकर, नगर परिषदेचे स्वच्छता व्यवस्थापक महारुद्र गालट, दिशा करियर ॲकॅडमीचे प्रा. बाळकृष्ण उंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
ते पुढे बोलताना म्हणाले की, जनजागृतीच्या अभावी अवयवदान करणाऱ्यांची संख्या आज समाजात खूप कमी आहे, त्यामुळे अनेक गरजवंत उपेक्षित आहेत. त्यासाठी युवा शक्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात अवयवदानाच्या बाबतीत जनजागृती करुन अवदानाची चळवळ बनवली पाहिजे. उपस्थित विद्यार्थ्यांना अवयवदान करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक श्री एकनाथ माले म्हणाले की, मृत्यूनंतर शरीराची पारंपरिक विधीनुसार विल्हेवाट लावली जाते. परंतु मृत्यूनंतरही आपण इतरांच्या कामी येऊ शकतो ते केवळ अवयवदानाच्या माध्यमातूनच. अवयवदानातून शरीराचे विविध महत्त्वपूर्ण भाग आणि कातडी गरजूंना मिळण्यास मदत होते. अवयवदान करतानाही शासन मोठ्या प्रमाणात काळजी घेऊन कडक नियमावलीचे पालन करते. रुग्ण व नातेवाईकांच्या संमतीनेच अवयव काढून गरजू रूग्णांना वेळेत अवयवाचे प्रत्यारोपन केले जाते. त्यासाठी डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन अवघड असे हे कार्य शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडावे लागते.
यावेळी दिशा करिअर ॲकॅडमीच्या शंभर विद्यार्थ्यांनी अवयवदानाचा संकल्प करुन अवयवदानाचे संमतीपत्र भरुन दिल्यामुळे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते डोनर कार्ड वाटप करुन प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाची उपयुक्ता लक्षात घेऊन राज्यातील पहिले लोकराज्य स्पर्धा परिक्षा केंद्र करण्याचा बहूमान दिशा करियर ॲकॅडमीने मिळविल्यामुळे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते दिशा करियर ॲकॅडमीच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश क्षिरसागर यांनी केले. सुत्रसंचलन सिध्देश्वर मते यांनी केले तर आभार सुमित्रा शिंदे यांनी मानले, यावेळी अजित रणदिवे, सुरवसे, वैद्य, शिंदे, चिंगटे यांच्या सह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.    

Tuesday, 31 October 2017

*अनुसुचित जाती जमातीच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना* *शिष्यवृत्तीचे धनादेश व प्रशस्तीपत्राचे वितरण*


उस्मानाबाद, दि.31:- डॉ.आंबेडकर फौंडेशन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार नवी दिल्ली यांचेकडून अनुसुचित जाती जमातीच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे देण्यात येणारे धनादेश व प्रशस्तीपत्राचे वितरण जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात शिवम सतिश कोळी याला 50 हजार रुपयेचा धनादेश व प्रशस्तीपत्र, प्रगती राजकुमार बनसोडे हिला 40 हजार रुपयेचा धनादेश व प्रशस्तीपत्र तर उमेश शिवाजी मरपले यास 10 रुपयेचा धनादेश व प्रशस्तीपत्राचे वाटप जिल्हाधिकारी श्री.गमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तिर्थ खुर्दच्या सरपंच सौ. वर्षाराणी पवार, पत्रकार सोमनाथ बनसोडे आदींची उपस्थिती होती.

*सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन*



उस्मानाबाद, दि.31:- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान स्व.  इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 31 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथ उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे आदीसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Monday, 30 October 2017

“उस्मानाबादी शेळी” पालन प्रशिक्षणासाठी नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करणार

उस्मानाबाद, दि.30:- उस्मानाबादी शेळी पालन व संवर्धन प्रशिक्षणासाठी उस्मानाबाद येथे नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यास परिवहन, खारभूमी विकास तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते व पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्सव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालक मंत्री महादेव जानकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत संमती दिली.
 जिल्हा नियोजन समितीची  आढावा बैठक परिवहन, खारभूमी विकास तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली.
यावेळी  पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्सव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालक मंत्री महादेव जानकर,  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राहुल मोटे, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश आघाव, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विकास जगदाळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती. अर्चनाताई पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी व विविध विभागाचे विभाग प्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती. अर्चनाताई पाटील यांनी यावेळी शेतीला जोडव्यवसाय म्हणून  उस्मानाबादी शेळीपालन व संवर्धनासाठी जिल्ह्यात एखादे प्रशिक्षण केंद्र किंवा विद्यापिठ सुरु करावे अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री श्री. रावते व सहपालक मंत्री श्री. जानकर यांनी नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्याचे मान्य केली.


जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी बैठकीचे प्रस्ताविक करुन मागिल बैठकिचा अनुपालन अहवाल सादर केला.
यावेळी पालकमंत्री श्री.रावते यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नुतन सदस्यांचे अभिनंद केले.सर्व सदस्य उच्च शिक्षित असल्यामुळे याचा प्रशासकीय कामासाठी चांगला फायदा होईल,त्याचबरोबर अधिकाऱ्यांनाही कळेल की, आपणास विचारणारे कोणीतरी आहे, यातून एक चांगला संदेश दिला जाईल.यामुळे भविष्यात गावाचे, तालुक्याचे व जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठी मदत होईल. असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद जोशी, संदिप मडके, मकरंदराजे निंबाळर, सक्षणा सलगर, संयोगिता गाढवे, प्रकाश चव्हाण, श्रीमती.बोराडे, सिध्दार्थ बनसोडे आदींची विविध कामासंदर्भात प्रश्न यावेळी उपस्थित केले.

बळीराजा चेतना अभियानाचा “उस्मानाबाद पॅटर्न” राज्यभर राबविणार- पालकमंत्री दिवाकर रावते

उस्मानाबाद, दि.30:- जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला असून या अभियानांतर्गत शेतकऱ्यासाठी काय केले याचा उस्मानाबाद पॅटर्न निर्माण होणार असून हा पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबविण्यासाठी विचार केला जाईल, असे प्रतिपादन परिवहन, खारभूमी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री.रावते यांच्या अध्यक्षतेखाली बळीराजा चेतना अभियान व विविध कामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी ते बोलत होते.यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्सव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालक मंत्री महादेव जानकर, खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती. अर्चनाताई पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, माजी आमदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, सर्वश्री उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, निलेश श्रीगी, श्रीमती.डॉ.देशमुख, जिल्‍हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी थोरात, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता एस.व्ही.कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री.मलगुंडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.विजयकर आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री. रावते म्हणाले की, बळीराजा चेतना अभियानासाठी उस्मानाबाद जिल्ह्याची पथदर्शी जिल्हा म्हणुन शासनाने निवड केली आहे, या अभियानामुळे शेतकऱ्यासाठी काय केले पाहिजे याचा एक पॅटर्न निर्माण करायचा आहे, त्यामुळे अभियानांतर्गत चांगले काम केले पाहिजे,यात कृषी विभागाने पुढाकार घेतला पाहिजे. या जिल्ह्याने जे निर्माण केले ते संपूर्ण राज्यभर राबविण्याचा विचार केला जाईल.
त्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


यावेळी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचाही आढावा घेण्यात आला तसेच नरेगा मधून जास्तीत जास्त कामे जिल्हयात सुरु करावेत, यात वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे, यात शेततळयाचे काम मोठया प्रमाणात झाली पाहिजेत, महाराष्ट्रात सर्वात जास्त शेततळयाचा जिल्हा व्हावा यासाठी प्रशासनाने काम करावे, यामुळे मोठया प्रमाणात रोजगार देखील उपलब्ध होईल, यावर्षी पाऊस चांगला झाला आहे मात्र पाणी वाया जावू नये म्हणून उपाययोजना केल्या पाहिजेत त्या दृष्टीने आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री.रावते यांनी  यावेळी दिल्या.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, लोकशहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, आदी कामांचा ही आढावा यावेळी घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने चांगल्या प्रकारे काम करण्याचे आश्वासन पालकमंत्री श्री.रावते व सहपालकमंत्री श्री.जानकर यांना  दिले.