Monday, 30 October 2017

बळीराजा चेतना अभियानाचा “उस्मानाबाद पॅटर्न” राज्यभर राबविणार- पालकमंत्री दिवाकर रावते

उस्मानाबाद, दि.30:- जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला असून या अभियानांतर्गत शेतकऱ्यासाठी काय केले याचा उस्मानाबाद पॅटर्न निर्माण होणार असून हा पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबविण्यासाठी विचार केला जाईल, असे प्रतिपादन परिवहन, खारभूमी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री.रावते यांच्या अध्यक्षतेखाली बळीराजा चेतना अभियान व विविध कामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी ते बोलत होते.यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्सव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालक मंत्री महादेव जानकर, खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती. अर्चनाताई पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, माजी आमदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, सर्वश्री उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, निलेश श्रीगी, श्रीमती.डॉ.देशमुख, जिल्‍हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी थोरात, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता एस.व्ही.कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री.मलगुंडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.विजयकर आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री. रावते म्हणाले की, बळीराजा चेतना अभियानासाठी उस्मानाबाद जिल्ह्याची पथदर्शी जिल्हा म्हणुन शासनाने निवड केली आहे, या अभियानामुळे शेतकऱ्यासाठी काय केले पाहिजे याचा एक पॅटर्न निर्माण करायचा आहे, त्यामुळे अभियानांतर्गत चांगले काम केले पाहिजे,यात कृषी विभागाने पुढाकार घेतला पाहिजे. या जिल्ह्याने जे निर्माण केले ते संपूर्ण राज्यभर राबविण्याचा विचार केला जाईल.
त्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


यावेळी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचाही आढावा घेण्यात आला तसेच नरेगा मधून जास्तीत जास्त कामे जिल्हयात सुरु करावेत, यात वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे, यात शेततळयाचे काम मोठया प्रमाणात झाली पाहिजेत, महाराष्ट्रात सर्वात जास्त शेततळयाचा जिल्हा व्हावा यासाठी प्रशासनाने काम करावे, यामुळे मोठया प्रमाणात रोजगार देखील उपलब्ध होईल, यावर्षी पाऊस चांगला झाला आहे मात्र पाणी वाया जावू नये म्हणून उपाययोजना केल्या पाहिजेत त्या दृष्टीने आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री.रावते यांनी  यावेळी दिल्या.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, लोकशहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, आदी कामांचा ही आढावा यावेळी घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने चांगल्या प्रकारे काम करण्याचे आश्वासन पालकमंत्री श्री.रावते व सहपालकमंत्री श्री.जानकर यांना  दिले.