उस्मानाबाद. दि.07:- श्रीतुळजाभवानीच्या शारदीय
नवरात्र महोत्सवात देशभरातुन मोठया संख्येने भाविक देवी दर्शनासाठी येत असतात.
यात्रा कालावधी संपल्यानंतर तुळजापूर शहरातील स्वच्छतेची परिस्थिती लक्षात घेता आज
दि. 07 ऑक्टोबर 2017 रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी 08.30 ते दुपारी 04.00
या वेळेत विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
प्रारंभी
सकाळी 08.00 वाजता घाटशीळ रोड दर्शन मंडप येथे विशेष स्वच्छता मोहिमेचे उदघाटन अपर
जिल्हाधिकारी अविनाश पाठक व नगराध्यक्ष श्री. जगदाळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने
करण्यात आले.
मी घाण करणार नाही आणि
दुसऱ्याला करू देणार नाही. सर्वप्रथम स्वत:पासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या
गल्ली, वस्तीपासून, माझ्या गावापासून, कार्यस्थळांपासून स्वच्छतेच्या कामाला
सुरूवात करेल. जगातील इतर देशाप्रमाणे मीही अस्वच्छता करणार नाही. गावोगावी याबाबत
इतरांनाही प्रेरित करेल. इतर 100 व्यक्तींनाही स्वच्छतेची शपथ घ्यायला लावेल. माझे
स्वच्छतेचे एक पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करेल, याचा मला विश्वास असल्याची शपथही यावेळी
उपस्थितांना दिली.
याप्रसंगी
जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी
उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सचिन
बारवकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. माले,
जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. वडगावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चोले,
जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,
कोषागार अधिकारी विशाल पवार, तुळजापूर नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे,
उस्मानाबाद नगरपरिषद मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, तहसिलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुनिल पवार, तहसिलदार सुजीत नरहरे, अभय मस्के, राहूल पाटील,
राजकुमार माने, तुळजापूर
तहसिलदार दिनेश झांपले, मंदिर
संस्थानचे सहायक व्यवस्थापक
दिलीप नाईकवाडी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची
उपस्थिती होती.
तुळजापूर
शहर स्वच्छताकामी तुळजापूर नगरपरिषदेने शहराचे 24 झोन तयार केले होते त्यापैकी 1
ते 12 झोनची स्वच्छता तुळजापूर नगरपरिषदेमार्फत करण्यात आली. उर्वरीत 13 ते 24
झोनमध्ये निवासी नायब तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद,
उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, उपविभागीय
अधिकारी उस्मानाबाद, कळंब, उमरगा, भूम, तहसिलदार उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब,
वाशी, भूम, परंडा, लोहारा, सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षण,
उस्मानाबाद, व्यवस्थापक जिल्हा ग्रंथालय, उस्मानाबाद, व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ
इंडीया, शाखा उस्मानाबाद, जिल्हा कोषागार अधिकारी, उस्मानाबाद, अधीक्षक, भूमी
अभिलेख उस्मानाबाद व सर्व उप अधीक्षक, भूमी अभिलेख, उस्मानाबाद यांच्यासह
कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी स्वच्छता केली.
स्वच्छता
हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती आहे. स्वच्छता केवळ शासकीय कार्यालये, नगरपालिकेची
जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. महात्मा गांधीजींनी ज्या
भारताचे स्वप्न पाहिले त्यात त्यांनी राजनैतिक स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता
महत्वाची असल्याचे सांगितले. महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून
आपणाला, भारतमातेला मुक्त केले. स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपल्या देशाच्या
विकासासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी अस्वच्छतेतून मुक्ती देण्यासाठी प्रत्येकाचा
पुढाकार महत्त्वाचा आहे.
आज झालेल्या स्वच्छता अभियानातून प्रत्येकालाच
श्रमदानाचे महत्त्व कळले. शिवाय स्वच्छतेबाबत जागृतीची जबाबदारीही आपल्यावर
असल्याचे समजण्यास मदत झाली.
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
यांनी स्वत: तुळजाभवानी मंदीर परिसराची स्वच्छता, साफसफाई केली. त्यांच्या सोबत
इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी देखील स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवुन परिसराची
स्वच्छता केली. या स्वच्छतेच्या अभियानातून विकासाचा ध्यास घेऊ, असेही उपस्थितांना
स्वत:च्या कृतीतून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी संदेश दिला.
यावेळी महाविद्यालयीन, शाळा, स्काऊट गाईडचे विद्यार्थी,
राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नागरिक, लोकप्रतिनिधीही या
अभियानात हिरीरीने सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ केला. अशा प्रकारे शहरातील प्रमुख
अशा 24 झोनमध्ये जिल्हा प्रशासनातील अधिकारी –कर्मचारी यांनी अनोख्या पद्धतीचे
स्वच्छता अभियान राबवून जनतेत जागृती केली. या अभियानात मोठया संख्येने नागरिक,
युवक-युवतींनी तुळजापूर शहरासह मंदीर परिसरातील सर्व ठिकाणी स्वच्छता करुन सहभाग
नोंदवला.
