उस्मानाबाद, दि.15-
आपण सर्वजण संकल्प करू या एका स्वावलंबी शक्तीशाली जिल्हा निर्माणाचा… भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या
69 व्या वर्धापनदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे
पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते मुख्य
ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला ,त्यावेळी त्यांनी उस्मानाबादमधील जनतेला असे आवाहन केले.
या ध्वजारोहण सोहळयास
जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदचे मख्य
कार्यकारी अधिकारी आनंद रायते, विधान परिषदेचे आमदार सुजितसिंग ठाकूर, आमदार मधुकरराव
चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हयातील सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी,
स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, जेष्ठ नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होताच मंत्री महोदयांनी हुतात्मा स्मृतीस्तंभास
पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
प्रारंभी मंत्री
महोदयांनी मराठवाड्यातील पाच
स्वातंत्र्यसैनिकांचा महामहिम राष्ट्रपतींनी नुकताच सन्मान केला,असा हा थोर इतिहास
आणि वर्तमान असलेल्या मराठवाडा भूमीतील आपणा सर्वांना अभिवादन
करतो असे बोलून जिल्हयातील सर्व बंधू-भगिनींना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या
वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
ते पुढे म्हणाले की, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासारखा
महत्वाकांक्षी उपक्रम या जिल्हयाने इतका यशस्वी करून दाखविला की, या अभियानाची
राजस्थान शासनानेही दखल घेतली. शेतकऱ्यांच्या
आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत विविध शासन यंत्रणांमार्फत
त्या-त्या विभागांच्या योजना प्राधान्याने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्याबाबतची
अंमलबजावणीही जिल्ह्यात धडाडीने सुरु आहे,जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक हातांना काम
मिळावे यासाठी “मागेल त्याला
काम”, “कामावर चला” असे उपक्रम
राबविण्यात आले. त्यास चांगला प्रतिसादही मिळाला. या मजूरांचे मानधन वेळेवर देणे
यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जिल्हयात राबविण्यात आलेली “धान्य महोत्सव” ही संकल्पना तर संपूर्ण
राज्याने स्वीकारली आहे. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून
कामगिरीच्या बाबतीत आपल्या जिल्हयाचा आरोग्य विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे
असे सांगून ते म्हणाले की, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या आठवडयात आपण महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून महसूल आठवडा राबविला. विविध
विभागातील सर्व योजनांचा प्रचार, प्रसार व प्रसिध्दी अशा विविध उपक्रमांचे आयोजन
मोठया प्रमाणावर करण्यात आले होते. याच दरम्यान जिल्हयातील सर्व शासकीय
कार्यालयांमध्ये आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वच्छता मोहिम, व्यसनमुक्ती जनजागरण
मोहिम राबविण्यात आली.राज्यात मुलींचा जन्मदर
वाढविणे,मुलींचे शिक्षण,आरोग्याचा दर्जा सुधारणे यासाठी “माझी कन्या भाग्यश्री” ही योजना 1 एप्रिल 2016 पासून
लागू करण्यात आली आहे.
श्री. जानकर
सायबर सेलबद्दल बोलताना पुढे म्हणाले की, सायबर गुन्हयांना आळा घालण्यासाठी आज
राज्यात एकाच वेळी एकूण 44 सायबर सेल चे उद्घाटन केले जाणार आहे. यात उस्मानाबाद
पोलीस कार्यालयातील सायबर सेलचाही समावेश आहे,आधुनिक गुन्हेगारीला आळा घालण्याच्या
दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल शासनाने उचलले आहे.
शेतकऱ्यांविषयी बोलताना श्री. जानकर म्हणाले की, जिल्हयात
शेतक-यांच्या जीवनात नवी आशा व उमेद पल्लवित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी
कल्पकतेने “कृषी क्रांती” या उपक्रमाची आखणी
आणि बांधणी केली आहे. उस्मानाबाद जिल्हयातील
शेतकऱ्यांसाठी “कॉमन फार्मर्स
फोरम” स्थापित
करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठीचा नियोजित, शिस्तबध्द प्रयत्न
म्हणजेच “कॉमन फार्मर्स
फोरम”. हा उपक्रम
संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त
करून ते पुढे म्हणाले ,जिल्हयातील 100 टक्के शेतक-यांच्या 14 हजार 620 गटांची स्थापना झाली
आहे आणि या माध्यमातून तब्बल 2 लाख 88 हजार शेतकरी एकत्रित आले आहेत. याचेच पुढचे पाऊल म्हणजे
जिल्हयात सध्या अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होवून
त्यांचे विविध ब्रँडसही प्रसिध्द व लोकप्रिय होऊ लागले आहेत. या जिल्हयातील खवा
क्लस्टर, तूर क्लस्टर, कांदा क्ल्स्टर, पपई क्लस्टर, भाजीपाला क्लस्टर, रेशीम
क्लस्टर अशा विविध उत्पादनात शेतकरी गटांनी यशाची उंच भरारी घ्यायला सुरूवात केली
आहे.
श्री. जानकर यांनी “ग्रामउदय से भारत उदय” या अभियानादरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 5
लाख 49 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टपूर्ती 6 लाख 6 हजार 617 इतकी वृक्षलागवड करून
जिल्हयाने सर्वांसमोर एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे. जलयुक्त शिवार ही फक्त
मोहिम नसून एक चळवळ झाली आहे. यात आपल्या जिल्ह्याने खरोखरीच कमालीचे काम केले आहे
असे सांगून लवकरच उस्मानाबाद जिल्ह्याची दुष्काळग्रस्त जिल्हा ही ओळख निश्चितच
येत्या काळात बदललेली असेल असा विश्वास व्यक्त
केला.
ते पुढे म्हणाले की, उघडयावरील शौचविधी हद्दपार करण्यासाठी व शौचालयाचा वापर
हा सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असल्याची जाणीव निर्माण करण्यासाठी
दि.22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2016 या कालावधीत “स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटी” हे राज्यव्यापी कुटुंबस्तरावर संवाद अभियान राबविले जाणार आहे.
याप्रसंगी राज्यात सर्वात पहिले लोकराज्यग्राम बनण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल दारफळ गावाच्या
सरपंच श्रीमती बालिका सुतार,उपसरपंच ज्योती जाधव, माजी सरंपच बाळासाहेब केशव घुटे,
ग्रामसेविका श्रीमती माधवी लोखंडे, आदित्य गोरे यांचा याबरोबरच राज्यातील सर्वात
पहिली लोकराज्य वारकरी शिक्षण संस्था बनण्याचा मान मिळाल्यामुळे श्री. संत कोकणेबुवा वारकरी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, राजेंद्र इंगळे यांचा तर राज्यातील सर्वात पहिली लोकराज्य सामाजिक संस्था बनल्यामुळे जानकादेवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, अभिजित देडे यांचा आणि राज्यातील सर्वात पहिली लोकराज्य महिला सामाजिक संस्था बनण्याचा मान मिळाल्यामुळे सेव्ह फार्मर्स विडोज फाऊंउेशन या महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा, श्रीमती शीला उंबरे या सर्वांचा मंत्री महोदय श्री.महादेव जानकर यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि लोकराज्य मासिकाचा अंक देवून गौरविण्यात आले. याचबरोबर “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांनाही प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
शेवटी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनातील महसूल विभाग, निवडणूक विभाग, जिल्हा पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग विविध कामगिरींच्या बाबतीत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, याबद्दल श्री. जानकर यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सोहळयानंतर श्री. जानकर व इतर मान्यवरांच्या हस्ते बळीराजा चेतना अभियानांतर्गत निकृष्ठ चारा सकस करणे या जनजागृती वाहनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच महिलांना प्रातिनिधीक स्वरूपात धान्य वाटप आणि कडबाकुट्टी यंत्रांचेही वितरण करण्यात आले.त्यानंतर मंत्री महोदयांनी स्वातंत्र्यसैनिक,समाजातील प्रतिष्ठित नागरिक,अधिकारी,पत्रकार यांची प्रत्यक्ष भेट घेवून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.