Monday, 15 August 2016

सायबर लॅबमुळे जिल्हयातील आधुनिक गुन्हयांना आळा बसेल - पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर

उस्मानाबाद,दि.15:-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अदययावत  व सुसज्ज अशा उस्मानाबाद पोलीस सायबर लॅबमुळे जिल्हयातील आधुनिक गुन्हयांना आळा बसेल अशा विश्वास   राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी सायबर लॅब उदघाटन प्रसंगी  व्यक्त केला. 
 या उदघाटन कार्यक्रमास,आमदार मधुकरराव चव्हाण,विधान परिषदेचे सदस्य सुरजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते ,परिविक्षाधीन आयुष  प्रसाद, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक  राजतिलक रोशन आदि मान्यवर उपस्थित होते.
            सर्वात प्रथम मंत्रीमहोदयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अदययावत अशा पोलीस सायबर लॅबचे उदघाटन केले व पाहणी केली. त्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश वाचून दाखविला.
श्री.जानकर पुढे म्हणाले की,  महाराष्ट्रात उस्मानाबाद व यवतमाळ जिल्हयावर शासनाचे विशेष लक्ष आहे.जिल्हयातील सर्वच विभागानी उत्साहाने कामे करून जिल्हयातील सर्वसामान्यांना शासनाच्या जास्तीत जास्त  योजनांचा लाभ मिळवून द्यावा,असे सूचित केले. जिल्हा प्रशासनाच्या यशस्वी वाटचालीबदृल त्यांनी  जिल्हाधिकारी डॉ.  प्रशांत नारनवरे व पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचे जाहीर अभिनंदन केले.
             प्रास्ताविक करताना पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख यांनी  उस्मानाबाद पोलीस विभागाची व  सायबर लॅब बाबतची माहिती उपस्थितांना  विषद केली. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उस्मानाबाद जिल्हयातील पोलीस विभागाने जिल्हयात विविध कार्यक्रमांद्वारे राबविलेल्या  विविध  उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धीरज पाटील, विधान परिषदेचे सदस्य सुरजितसिंह ठाकूर यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले व  त्यानंतर कार्यक्रमाची राष्ट्रगीताने  सांगता करण्यात आली.