उस्मानाबाद, दि.13:-
जिल्ह्यातील सर्व केंद्र शासन, राज्य शासन, निमशासकीय कार्यालये, शासकीय अंगीकृत
उपक्रम, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व खाजगी आस्थापनांनी माहे 30
सप्टेंबर 2017 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 दि.31ऑक्टोबर 2017 पर्यंत कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे http://www.mahaswayam.in या संकेतस्थळावर
ऑनलाईन आपला युजर आयडी व पासवउर् वापरुन भरावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्रांचे सहाय्यक संचालक बालाजी मरे यांनी केले आहे.
केंद्र
शासनाने सेवायोजना कार्यालये (सक्तीने पदे अधिसुचित करण्यास भाग पाडणे) कायदा 1959
व त्याअंतर्गत नियमावली 1960 पारीत केला असून या कायदयाच्या कलम -5 अन्वये सर्व
संबंधित उद्योजकांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती दर तिमाहीस ऑनलाईन भरुन या
कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.कायदयातील नियम-6 च्या पोटनियम 3 मध्ये
निर्धारित करण्यात आलेले आहेकी, तिमाही विहितप्रपत्र ई-आर-1 च्या प्रयोजनार्थ
प्रत्येक वर्षाच्या 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर व 31 डिसेंबर या विहित तारखा
असतील व विहित प्रपत्र या विहित तारखेपासून एक महिन्याच्या आत सादर करणे अनिवार्य
आहे, असेही प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.Friday, 13 October 2017
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण
स्पर्धा परिक्षा विशेष उपक्रमासह ग्रंथालयाच्या जागेचाही प्रश्न मार्गी लावणार-जिल्हाधिकारी श्री.गमे
उस्मानाबाद, दि.13:- स्पर्धा
परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी चांगले वातावरण हवे, त्यासाठी मोकळी प्रशस्त चांगली
जागा हवी, यासाठी ही सर्वांचीच जबाबदारी आहे.प्रशासनाचा प्रमुख म्हणून विशेष लक्ष
घालून जिल्हा ग्रंथालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावणार, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी श्री.गमे
यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती. रोहीणी
कुंभार, प्रा.श्री.देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री.गमे पुढे
बोलताना म्हणाले की, आजच्या युगात मोठया प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केला
जातो.त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन विकास साधला पाहीजे.
काळानुरुप आपण आपल्यात बदल घडवून आणला पाहीजे.नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन त्यांचा
चांगल्यासाठी वापर करायला हवा, असे सांगितले.
यावेळी स्पर्धा परीक्षेचा
अभ्यास करणारा विद्यार्थी राहुल जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी
केले.
फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
उस्मानाबाद, दि.13:-
राज्यातील काही भागात पिकावर फवारणी करतांना झालेल्या विषबाधेच्या दुर्घटनेच्या अनुषंगाने
जिल्ह्यात अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये याकरीता किटकनाशके हाताळताना व फवारणी
करताना शेतकऱ्यांनी सर्वोतोपरी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात
कीटकनाशकाचा सुरक्षित वापर प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. गमे बोलत
होते. यावेळी कृषी सभापती श्रीमती. अविदा जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी
सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी श्री.चिमणशेटे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी महाविद्यालयाचे प्रा.विजय भामरे
आदीसह विविध किटकनाशक कंपनीचे प्रतिनिधी
उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पुढे
म्हणाले की, औषधाची फवारणी करताना काय करावे काय करु नये याची जनजागृती व्हावी
म्हणून शासन प्रयत्नशील आहे. विषबाधा झल्याबरोबर काय प्रथमोपचार करावेत याची
माहिती असणे आवश्यक आहे.औषधाचा उपयोग कसा करावा याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणे
व घेणे महत्त्वाचे आहे.अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न
करणे आवश्यक आहे, शेतकऱ्यांनी योग्य माहिती घेऊनच औषध फवारणी करावी.
औषधाच्या बॉक्समध्ये जे
माहिती पत्रक असते ते वाचता येण्याजोगे असावे, असे औषध विक्रेत्यांनी औषध
कंपन्यांना कळवायला हवे. औषधाची फवारणी करताना काही सुरक्षित मार्ग पर्यायाचा
अवलंब शेतकऱ्यांनी करावा. स्वत:च्या फायदयासाठी दुसऱ्याचा बळी घेणे वा विचारही न
करणे ही संस्कृती वाढीस लागत आहे, हे चिंताजनक आहे.यावर विचार करुन समाजाच्या
चांगल्याचा विचार करावा, असेही यावेळी जिल्हाधिकारी श्री.गमे म्हणाले.
यावेळी “किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी” या विषयावर प्रा. भामरे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
Thursday, 12 October 2017
Wednesday, 11 October 2017
जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करावेत -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
उस्मानाबाद,दि.11:-
जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने प्रत्येक विभागाने कामे करताना किंवा नवीन कामे
सुरु करताना जिल्हृयातील पर्यटनाला चालना कशी मिळेल यादृष्टीने सुविधा देण्याच्या
कामाला प्राधान्य दयावे, अशा सुचना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज आयोजित
बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘पर्यटन पर्व’
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा
परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय
मुळे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, निलेश श्रींगी, श्रीमती. डॉ. देशमुख,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक
सावंत, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, जिल्हा नियोजन अधिकारी
सुधाकर आडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश आघाव यांच्यासह विविध विभागाचे
विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गमे यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मोठे
उद्योग नसल्याने जिल्ह्यात असलेली पर्यटन स्थळ कसे विकसित करता येतील यासाठी
प्रत्येक विभागाने लक्ष देवून नवीन सुविधा काय करता येते यासाठी
प्राधान्य दयावे.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री.आडे
यांनी जिल्ह्यातील 22 पर्यटन स्थळाची संगणकीय प्रणालीद्वारे माहिती सादर केली. तर
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे श्री. रामदास क्षिरसागर, श्री. प्रशांत टोपे,
श्री. स्वप्नील चके यांनी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ, ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक
स्थळे, अदभुत महाराष्ट्र व पर्यटनाच्या संधी याबाबत संगणकीय प्रणालीद्वारे
सादरीकरण केले.
उस्मानाबाद जिल्हयातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी “वाचन प्रेरणा दिन”” साजरा करावा -अ.वा. सूर्यवंशी
उस्मानाबाद, दि. 11 :-
वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास व्हावा म्हणून उस्मानाबाद जिल्हयातील सर्व
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी 15 ऑक्टोबर हा दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून
साजरा करावा असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा. सूर्यवंशी यांनी केले.
भारताचे माजी राष्ट्रपती स्व.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने 15 ऑक्टोबर हा जयंती
दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सार्वजनिक
वाचनालयातील तालुकास्तरीय समन्वयकांच्या बैठकीत ते बोलत होते.
पुढे बोलताना श्री. सूर्यवंशी
म्हणाले की, 15 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयांनी वाचन
संस्कृतीसंबंधी व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, ग्रंथाचे सामूहिक वाचन
इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्रंथप्रदर्शन, निवडक कथा, कवितांचे अभिवाचन
करावे तसेच निबंध स्पर्धा किंवा एखाद्या लेखकाची प्रकट मुलाखत, एखाद्या आवडीच्या
पुस्तकावर मनोगत, सलग काही वेळ शांतपणे वाचन, वृत्तपत्रातील अग्रलेख वाचन, लेख
वाचन यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करुन या कार्यक्रमांचा छायाचित्रांसह
अहवाल dioosmanabad.dol@maharashtra.gov.in या
ई-मेल पत्त्यावर पाठविण्याचे आवाहनही केले.
यावेळी “लोकराज्य” या
शासनाच्या मुखपत्राचे नियमित वाचन करणेबाबत तसेच महाराष्ट्र वार्षिकी विशेषांक,
महामानव अंकाच्या खरेदी व वाचनाबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच “सुविद्या”
पुस्तक भांडार, तुळजापूर यांच्याकडे महाराष्ट्र वार्षिकी व महामानव विशेषांक
विक्रीस उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शासकीय ग्रंथालये व वाचनालये हे "लोकराज्यदूत"
म्हणूनही उत्साहाने काम करतील असा संकल्पही बैठकीत उपस्थित सर्वांनी केला.उस्मानाबादमध्ये पार पडला शासकीय खरेदी “ई वाटचालीचा” साक्षरता वर्ग
उस्मानाबाद, दि. 11 :- यशदा, मराठवाडा विकास
प्रबोधिनी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त
विद्यमाने आज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे एक दिवसीय शासकीय
खरेदी प्रक्रिया व “ई टेंडरिंग" चे प्रशिक्षण पार पडले.
या प्रशिक्षण वर्गास उद्घाटक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक उपस्थित
होते. यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी, चेतन गिरासे, जिल्हा शिक्षण व
प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य कलीम शेख, मराठवाडा विकास प्रबोधिनीच्या सहाय्यक
प्राध्यापिका श्रीमती चौंडेकर आणि यशदाचे मास्टर ट्रेनर श्री. डी. वाय. मुरुमकर हे
उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी श्री. पाठक यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले की, शासनाच्या
पारदर्शक कारभारासाठी ई प्रक्रियाही एक अविभाज्य घटक बनलेली आहे. यासाठी नियमित
प्रचलित आर्थिक नियमांचा अभ्यास करुन प्रत्येक विभागाने ई-टेंडर, ई-ऑक्शन आणि
ई-मार्केटिंग या बाबींना लवकरात लवकर आत्मसात करणे आवश्यक आहे.
प्रास्ताविकात श्री. शेख यांनी या प्रशिक्षण संस्थेविषयीची माहिती उपस्थितांना
सांगितली आणि श्रीमती चौंडेकर यांनी या प्रशिक्षणाच्या आयोजनाचा हेतू विशद केला.
त्यानंतर सेवानिवृत्त सहाय्यक संचालक, वित्त व लेखा श्री. डी.वाय. मुरुमकर यांनी
संगणकीय सादरीकरणातून उपस्थितांना सविस्तरपणे “खरेदी प्रक्रिया व ई-टेंडर” या
विषयावरील प्रशिक्षण दिले.
यावेळी जिल्हयातील सर्व
विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गाकरिता
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी विशेष पुढाकार घेतला आणि जिल्हा शिक्षण व
प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. शेख, सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती चौंडेकर तसेच
त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
x
Monday, 9 October 2017
किटकनाशके, तणनाशके फवारताना काळजी घ्यावी
रासायनिक औषधे शेतकरी शेतात, झाडांवर फवारताना मुख्यत:
तीन प्रकारे धेका निर्माण होवू शकतो. रासायनिक औषधांचे अत्यंत बारीक कण हवेबरोबर
श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात. फवारणी करीत असताना त्वचेच्या संपर्कामधून तथा
डोळयांद्वारे शरीरात जातात. फवारणी करतांना नकळत तोंडाद्वारे खताना, बीडी पीताना
शरीरात जाऊ शकतात.
किटकनाशके वापर
करताना सर्वसाधारपणे घ्यावयाची काळजी :
किटनाशकाच्या
प्रत्येक वेष्टनासमवेत त्या किटकनाशकाचे लेबल व माहितीपत्रक अंतर्भूत असते, या
लेबल व माहितीपत्रकामध्ये असेलेली माहिती नीट वाचावी व समजून घ्यावी. किटकनाशके
मुळ पॅकिंगमध्ये खरेदी करावीत. किटनाशके ही विषारी असल्याने त्यांची हाताळणी
करतांना सदैव जागरुक रहावे. किटकनाशके वापरण्याची साधनसामग्री जसे फवारणी पंप
नेहमी व्यवस्थित चालू ठेवावेत. गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करुन
वापरावे. किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळ्याचा वापर
करावा. तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरु
नये. किटकनाशक वापरताना संरक्षक कपडे घालावे.(उदा. गॉगल, पायात मोजे, तोंडाला
मास्क, डोक्यावर कापड, गमबुट इ.)
फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ
धुवून ठेवावेत. झिजलेली, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत. किटकनाशकाला हुंगणे
किंवा त्याचा वास घेणे टाळावे. फवारणीचे मिश्रण जेवढे लागणार आहे तेवढे एकदाच तयार
करुन हाताने न ढवळता लांब लाकडी दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा. किटकनाशक
पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्या वेळी
तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे. पाऊस येण्यापूर्वी किंवा पाऊस झाल्यानंतर
तसेच तीव्र ऊन्हात फवारणी करु नये. फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबणाने
स्वच्छ धुवून खाणे-पिणे करावे. फवारणीचे वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी
यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे. उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी
न्याहारी करावी. फवारणी करताना वापरलेली भांडी, साहित्य नदी, नाला किंवा विहिरीजवळ
धुवू नयेत.
धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने
पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावे. किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या
वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात. फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ
करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये त्यासाठी सोयीस्कर
तार, काडी किंवा टाचणी वापरावी. किटकनाशके फवारण्याचे काम करताना वापरण्याचे कपडे
स्वतंत्र ठेवावेत व वेळोवेळी स्वच्छ धुवून काढावेत. किटकनाशके अंगावर पडू नयेत
म्हणून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करुन तसेच उंच झाडावर फवारणी करताना औषध
अंगावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना
चरण्यासाठी किमान दोन आठवडे जावू देवू नये. जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातांनी न
पुसता त्यावर पाणी न टाकता ती माती/ चिखल यांच्या सहाय्याने शोषून घ्यावेत व
जमिनीत गाडून टाकावीत. डब्यांवरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
त्यानुसार सुरुवातीस हिरवा रंग कमी विषारी, निळा रंग मध्यम विषारी त्यानंतर पिवळा
रंग तीव्र विषारी व शेवटी लाल अती तीव्र विषारी चिन्ह, खून असलेली औषधे क्रमाने
वापरावे.
विषबाधाची
लक्षणे :-
अशक्तपणा व चक्कर येणे, त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे, डोळ्यांची जळजळ
होणे, पाणी येणे, अंधुक दिसणे, तोंडातून लाळ गाळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे,
मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे, डोकेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जीभ लुळी
पडणे, बेशुद्ध होणे, धाप लागणे, छातीत दुखणे, खोकला येणे.
विषबाधेची शंका
आल्यास खात्री करा:- रोग्याचा
किटकनाशकांसह संपर्क आला होता काय? नेमके कोणते किटकनाशके वापरले? आंतरप्रवाही की
स्पर्शजन्य? डॉक्टरांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहचवा.
तरी शेतकऱ्यांनी स्वत:ची काळजी
घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
विलास माळी उस्मानाबाद.
जेष्ठांच्या मार्गदर्शनानेच समाज घडतो, घडत राहील- चेतन गिरासे
उस्मानाबाद, दि. 9 :- समाज हा जेष्ठांच्या मार्गदर्शनानेच घडतो आणि
यापुढेही घडत राहील, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी आज येथे
केले. सामाजिक न्यायविभागामार्फत आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरीक दिनानिमित्त सामाजिक
न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. रविंद्र शिराळ,
सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनिता मते, समाजकल्याण अधिकारी अमित घवले, धाराशिव जेष्ठ
नागरिक संघटनेचे अध्यक्ष ॲङ देशमुख हे उपस्थित होते.
श्री. गिरासे पुढे म्हणाले की, जेष्ठांचे प्रश्न किंवा
समस्या या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीनुसार बदलत असतात. सर्वांचेच प्रश्न सारखेच
असतील असे नाही मात्र आजच्या काळात समाजाने आणि शासनाने मिळून जेष्ठ नागरिकांसाठी
गांभीर्याने प्रयत्न करणे, ही सामाजिक गरज बनली आहे. यासाठी सर्वच घटकांनी
एकमेकांसाठी दुवा म्हणून काम केल्यास दोन पिढयांमधील अंतर निश्चितच कमी होईल.
पर्यायाने जेष्ठांच्याही समस्या सुटण्यास सकारात्मक परिस्थिती तयार होईल.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना श्री. शिराळ यांनी जेष्ठांची
व्याख्या करताना सांगितले, जेष्ठ म्हणजे वयाची साठी पूर्ण केलेली आणि अनुभवाची
भरमसाठ शिदोरी असलेली व्यक्ती. “जेष्ठ नागरिकांच्या समस्या व
त्यावरील उपाय” या विषयावर बोलताना ते
म्हणाले की, जेष्ठांना तीन प्रकारच्या समस्या असतात शारिरीक, मानसिक, आर्थिक आणि
यावर मात करायची असेल तर आध्यात्म हा त्यावरील रामबाण उपाय आहे. जेष्ठ नागरिकांनी आध्यात्माची
कास धरुन अंतर्मुख व्हावे, आपली वर्तणूक जपावी, मीपणा सोडून कुठलीही अपेक्षा न
ठेवता समाजाला, कुटुंबाला जे-जे देता येईल ते-ते द्यावे, स्वावलंबी व्हावे असे
सांगून त्यांनी जेष्ठ नागरिकांसाठी ज्या संस्था काम करतात त्यांचे आभार मानले आणि
मागची पिढी व आत्ताची पिढी यात सुसंवादाची गरज असल्याचे मत शेवटी व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ नागरिकांच्या मराठवाडा
विभागीय बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते डॉ. राऊत, ॲङ राम गरड, संजय नायगावकर, डॉ.
पाईकराव यांचा प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर
अनु. जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील कु. नकुशा बनसोडे, पायल शितोळे,
भाग्यश्री राठोड, नेहा देडे, यांचा 100 मीटर रिले विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
आल्याबद्दल व त्यांची निवड राज्यस्तरावर झाल्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून गौरव
करण्यात आला. यानंतर श्रध्दा वाघमारे हिला जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत प्रथम
क्रमांकाबद्दल गौरविण्यात आले.
याचबरोबर आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनाच्या
निमित्ताने विष्णुपंत कुलकर्णी, श्रीमती सीताबाई साळुंके, खंडू कांबळे, पांडुरंग
पडवळ, परसू लमान (आडे), राजाराम पडवळ, उमाकांत नायगावकर, भास्कर नायगावकर, कमलाकर
आयाचित, रामकृष्ण कुलकर्णी, आर.जी. कुलकर्णी, व्यंकटेश डांगे, सिद्राम भोसले,
दलितमित्र शंकर खुणे, श्री. व सौ. विद्यालंकार या सर्व जेष्ठांचा शाल, श्रीफळ व
प्रशस्तीपत्र देवून यथोचित आदर सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप धाराशिव जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष
ॲङ देशमुख यांनी केले. यावेळी त्यांनी असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शासनाचे
आभार व्यक्त केले. शेवटी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे समाजकल्याण अधिकारी अमित
घवले यांनी आभार मानले.
Sunday, 8 October 2017
नागरीक सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न
उस्मानाबाद, दि.8 :- उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत
नागरीक सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन एमएसईबी कार्यालयासमोरील नगरपरिषद गाळा
क्रं. 24 मध्ये जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरीकांना
सेतू सुविधा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा सुलभरित्या ऑनलाईन
उपलब्ध व्हाव्यात यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे व जिल्हा सूचना
विज्ञान अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार नागरीक सेतू सुविधा केंद्राची सुरुवात
करण्यात आली.
यावेळी
बोलताना जिल्हाधिकारी गमे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व जिल्हयाचे संगणकीकृत
7/12 डिजिटल स्वाक्षरीसह या केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आलेले असून दररोज सकाळी
08.00 ते सायंकाळी 08.00 पर्यंत नागरिकांच्या सोईसाठी, नागरीक सेतू सुविधा केंद्र
सुरु ठेवण्यात येणार आहे, याचा जिल्हयातील सर्व शेतकरी व नागरिकांनी लाभ घ्यावा.
यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा सूचना विज्ञान केंद्राचे अधिकारी
श्री. कोंडेकर, श्री. रुकमे, सेतू सुविधा केंद्राचे श्रीशैल्य देशमुख, महेश
कुलकर्णी, ईस्माईल शेख तसेच शेतकरी व ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
तरुणांनो सैन्याधिकारी व्हा….टेरिटोरियल आर्मी अर्थात प्रादेशिक सेना
पार्ट
टाईम आर्मी...... फूल टाईम इंडियन !
टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेनेची स्थापना सप्टेंबर 1948 मध्ये पारित झालेल्या प्रादेशिक सेना अधिनियम 1948 नुसार 9 ऑक्टोबर 1949 मध्ये करण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले गर्व्हनर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी संकटकाळात देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पेलणे, आवश्यकता निर्माण झाल्यास नियमित सेनेला मदत करणे, देशातील तरुणांना नागरी जीवनाबरोबरच सैन्यदलात सेवा करुन देशसेवेची संधी देणे या उद्देशाने प्रादेशिक सेनेची स्थापना केली.
तेव्हापासून
9 ऑक्टोबर हा दिवस प्रादेशिक सेनेचा
स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात याबाबतची जाणीव जागृती
फारच कमी प्रमाणात असल्याने याविषयी अधिकाधिक तरुणांना माहिती व्हावी म्हणून हा
विशेष लेख… तर जाणून घेऊया काय आहे टेरिटोरियल आर्मी अर्थात प्रादेशिक सेना….
टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेना:-
Territorial Army म्हणजेच प्रादेशिक सेना होय, अशी सेना जी
नियमित सैन्यदलाला आवश्यकता असेल तेव्हा Second line defence म्हणून मदत करते.
यामध्ये काही महिन्यांचे प्रशिक्षण देवून सैनिक तसेच अधिकारी
घडविले जातात. या सेनेचे ब्रीदवाक्य आहे “सावधानी व शूरता” “Vigilant & Valour” यात काम करणाऱ्या जवान/ अधिकाऱ्यांना
अभिमानाने Terriers म्हटले जाते.
आत्तापर्यंत
प्रादेशिक सेनेने नियमित सैन्यदलाला भारत-चीन 1962, भारत-पाकिस्तान 1965, भारत-पाकिस्तान
1971, ऑपरेशन पवन (श्रीलंका), ऑपरेशन रक्षक (पंजाब), ऑपरेशन ऱ्हिनो (जम्मू
काश्मीर), ऑपरेशन बजरंग (उत्तर पूर्व भागातील) अशा युध्द वा लष्करी कारवायांच्या वेळी
मदत करुन महत्वाची भूमिका निभावली आहे.
कोणाला भरती होता येते ?
भारतीय नागरिकत्व असलेल्या, 18 ते 42 वर्षे वय
असलेल्या, मान्यताप्राप्त पदवीधारक, शारिरीक व मानसिक सक्षम असलेल्या आणि साधारणत:
ज्यांचे मासिक उत्पन्न व्यवस्थित आहे अशा पुरुष उमेदवारांना प्रादेशिक सेनेमध्ये अधिकारी
पदासाठी तसेच सर्वसाधारण सैनिक जवान म्हणूनही भरती होता येते.
याचप्रमाणे केंद्र शासन/ राज्य शासन/ केंद्रशासित
प्रदेश/ खाजगी क्षेत्र/ स्वत:चा व्यवसाय असणाऱ्या पुरुष उमेदवारांनाही Territorial
Army मध्ये भरती होता येते. मात्र नियमित भूसेना/ नौसेना/ वायुसेना/ पोलीस/
निमलष्करी दल यातील सदस्यांना Territorial Army मध्ये भरती होता येत नाही.
भविष्यात नियमित सैन्यदलाच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर आणि शारिरीक, मानसिक सक्षम
असल्यास अशा सदस्यांकरिता विशेष भरती असते त्यावेळी ते त्या भरतीकरिता अर्ज करणे
वा तत्सम भरती प्रक्रियेत उमेदवार म्हणून सहभागी होवू शकतात. त्यांची निवड
प्रक्रिया वेगळया पध्दतीने होते.
Territorial Army त अधिकारी कसे होता येते :-
मुख्यत: अधिकारी पदाकरिता Departmental म्हणजे
खातेनिहाय व Non-departmental म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना या भरती प्रक्रियेत
सहभागी होता येते.
अधिकारी :- For Civilians.
ही जाहिरात साधारणत: “मे” महिन्यात येते/
जून महिन्यात ऑनलाईन अर्ज भरण्यात येतो, जुलै महिन्यात परिक्षा घेतली जाते.
यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असते. परिक्षा शुल्क रु. 200/- असते. लेखी परिक्षा (Objective Type) एकूण 200 गुणांची
असते. यासाठी प्रत्येक पेपरसाठी 2 तासांचा वेळ दिला जातो. चुकीच्या उत्तराला
Negative Marking System असते.
पेपर- 1
अ) तार्किक
योग्यता ( Reasoning) – 50 गुण - 50
प्रश्न.
ब) गणित (Maths) – 50 गुण - 50 प्रश्न.
पेपर-2
अ)
सामान्य ज्ञान (General Knowledge) – 50 गुण – 50 प्रश्न.
ब)
इंग्रजी (English) - 50 गुण – 50 प्रश्न.
या लेखी
परिक्षेत प्रत्येक भागात 40% स्वतंत्र तर सर्व भाग मिळून सरासरी 50% इतके
गुण मिळविणे अनिवार्य असते, असे गुण मिळाले तरच त्या उमेदवाराला लेखी परिक्षेत
उत्तीर्ण केले जाते. त्यानंतर विविध ठिकाणी असलेल्या केंद्रांवरच मुलाखत घेतली
जाते.
ही मुलाखत “Preliminary Interview Board” यांच्यामार्फत घेतली जाते. यात उत्तीर्ण झाल्यास SSB Interview करिता
उमेदवारास पाठविले जाते. पुढे SSB मध्ये उत्तीर्ण झाल्यास वैद्यकीय चाचणी घेण्यात
येते.
त्यानंतर संबंधित उमेदवाराचे चारित्र्य पडताळणी व इतर
कायदेशीर बाबींची पूर्तता करुन त्या उमेदवारास Commissioned Officer चा दर्जा
प्रदान करण्यात येऊन त्यास लेफ्टनंट ही रँक सन्मानपूर्वक देण्यात येते. त्यानंतर
त्यांना विविध प्रकारचे आवश्यक ते लष्करी प्रशिक्षण देण्यात येते. ही झाली अधिकारी
पदासाठीची भरती प्रक्रिया.
सैनिक जवान भरती :-
प्रादेशिक सेनेत जवानांच्या भरतीसाठी संपूर्ण भारतात 1) पश्चिम हिमालयीन विभाग, 2)
पूर्व हिमालयीन विभाग, 3) पश्चिम विभाग, 4) पूर्व विभाग, 5) मध्य विभाग-
मध्यप्रदेश/गुजरात/महाराष्ट्र/दादरा-नगर हवेली/दीव-दमन/गोवा, 6) दक्षिण विभाग असे विभाग
कार्यरत आहेत.
संपूर्ण भारतात अंबाला / बंगलूर/ चैन्नई/ दानपूर/
जबलपूर/ जालंधर/ कोलकाता/ लखनौ/ पुणे/ शिलाँग/ जयपूर या केंद्रांवर प्रादेशिक
सेनेसाठी जवानांची भरती होते. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील युवकांसाठी मध्य विभाग, पुणे येथे कार्यरत आहे.
जवानांसाठी विविध प्रकारची शारिरीक क्षमता, शैक्षणिक
पात्रता पुढीलप्रमाणे आहे:-
अ) जवान
(सर्वसाधारण व ट्रेडस्मन )करिता उंची 168 सें.मी.,
छाती 77 सें.मी. वजन 50 कि.ग्रॅ. शिक्षण – 10 वी.
ब) जवान
(तांत्रिक व नर्सिंग असिस्टंट) करिता उंची 167 सें.मी., छाती 77 सें.मी., वजन 50 कि.ग्रँ. शिक्षण- पदाच्या आवश्यकतेनुसार
आवश्यक त्या ट्रेडनुसार.
क) जवान
(लिपिक व भांडारपाल) करिता उंची 162 से.मी., छाती 77 से.मी., वजन 50 कि.ग्रँ.
शिक्षण- मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेचा पदवीधर.
याशिवाय
जवानांच्या भरतीसाठी त्यांना काही शारिरीक क्षमतेच्या चाचण्यांनाही सामोरे जावे
लागते. जसे 1.6 कि.मी. अंतर कमीत-कमी 5
मि. 40 सेकंदात तर जास्तीत-जास्त 6 मि. 20 सेकंदात धावणे, 10 पुल अप्स काढणे,
झिगझॅक वर संतुलन राखून चालणे, 9 फूट उडी मारणे.
प्रादेशिक सेनेतील अधिकारी व जवानांसाठीचे प्रशिक्षण :-
प्रादेशिक सेनेत अधिकारी म्हणून निवड झालेल्या
अधिकाऱ्यांना 1 महिना संबंधित युनिटमध्ये,
1 महिना प्रादेशिक सेना प्रशिक्षण शाळा, देवळाली(नाशिक)येथे आणि 3 महिने इंडियन
मिलिटरी ॲकॅडमी, डेहरादून येथे प्रशिक्षण देण्यात येते.
प्रादेशिक सेनेत जवान म्हणून निवड झालेल्या जवानांना 1
महिना संबंधित युनिटमध्ये आणि 9 महिने संबंधित रेजिमेंटच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये
प्रशिक्षण देण्यात येते.
भरती झालेल्या अधिकाऱ्यांचे वेतन, त्यांची पदे/ प्रमोशन :-
प्रादेशिक सेनेत भरती झालेल्या जवान वा अधिकाऱ्यांना नियमित
सैन्यदलाप्रमाणेच वेतन व भत्ते तसेच इतर सर्व प्रकारच्या सोयीसवलती देण्यात येतात.
प्रादेशिक सेनेत अधिकारी म्हणून निवड
झाल्यानंतर सर्वात पहिली पोस्टींग लेफ्टनंट म्हणून देण्यात येते, तर त्यानंतर पदोन्नतीने
कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल आणि ब्रिगेडिअर या पदापर्यंत पोहोचता येते.
प्रादेशिक सेनेचे वैशिष्टय म्हणजे आपणास वर्षातून दोन महिने सैन्यात तर उर्वरीत 10
महिने आपली मूळ नोकरी, व्यवसाय करता येतो. प्रादेशिक सेनेत आवश्यकतेनुसार आपली
सेवा घेण्यासाठी सैन्याकडून आदेश काढले जातात.
प्रादेशिक सेनेची रचना व विभाग:-
सेनादलाचे प्रमुख हेच प्रादेशिक
सेनेचेही सर्वोच्च प्रमुख असतात. सध्या जनरल बिपीन रावत हे प्रादेशिक सेनेचे
सर्वोच्च प्रमुख आहेत तर प्रमुख म्हणून अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल चतुर्वेदी हे
आहेत. यांचे कार्यालय दिल्ली येथे आहे.
प्रादेशिक सेनेचे एकूण 5 विभाग आहेत, ज्याला ग्रुप
हेडक्वार्टर्स (Group Headquarters) म्हणतात. ते पुढीलप्रमाणे आहेत.
दक्षिण कमांड(Southern Command) :- पुणे (महाराष्ट्र)
पूर्व कमांड (Eastern Command) :- कोलकाता (प.बंगाल)
पश्चिम कमांड (Western Command) :- चंदीगढ (चंदीगढ)
मध्य कमांड (Central Command) :- लखनौ (उत्तरप्रदेश)
उत्तर कमांड(Northern Command) :- उधमपूर (जम्मू-काश्मिर)
नैऋत्य कमांड(South Western Command) :- जयपूर (राजस्थान)
प्रादेशिक सेनेची संख्या आज जवळपास पहिल्या फळीतील 40
हजार तर दुसऱ्या फळीत 1 लाख 60 हजार इतकी आहे.
यामध्ये Departmental Units, Non-departmental
Units, Infantry Unit तसेच Ecological (पर्यावरण) बटालियन अशी रचना आहे. Departmental
Units (खातेनिहाय युनिट) मध्ये रेल्वे (Railway), इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOC), ओ.एन.जी.सी.
(O.N.G.C.), दूरसंचार (Telecommunication) आणि सामान्य रुग्णालय(General Hospital)
या क्षेत्रातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. तर Non Departmental
Units व Ecological (पर्यावरण) बटालियनमध्ये
निवड झालेल्या नागरिकांची अधिकारी/ जवान म्हणून सेवा घेण्यात येते.
या संपूर्ण प्रादेशिक सेनेत रेल्वे(Railways) 13
युनिट., सामान्य रुग्णालय (General
Hospitals) 7 युनिट, मार्केर्टिंग (Marketing) 1 युनिट, दूरसंचार (Telecommunication) 1 युनिट, इंजिनिअर
(Engineer) 1 युनिट, रिफायनरीज आणि पाईप्स (Refineries & Pipelines) 1 युनिट,
इंजिनिअर ओ.एन.जी.सी. ( Engineer ONGC) 1 युनिट, इंन्फंट्री (Infanrty) जवळपास 42
युनिट, पर्यावरण (Ecological) बटालियन जवळपास 10 युनिट अशाप्रकारे जवळपास 77 विविध
युनिटस् कार्यरत आहेत.
आत्तापर्यंत Departmental TA Units ने लातूर येथील
भूकंप, गढवाल हिमालय मधील उत्तरकाशी येथील जलप्रलय, ओडिसा येथील वादळ अशा नैसर्गिक
आपत्तीच्या वेळी अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे. याशिवाय Ecological (पर्यावरण) बटालियनने मसुरी, बिकानेर, जैसलमेर, चंबळ येथील 20 हजार
हेक्टर जमीन क्षेत्रावर 2 कोटी 5 लक्ष वृक्ष लागवड केली आहे.
गरजेनुसार या युनिटस् चा प्रत्यक्ष युध्दातही समावेश
असतो. यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी वा जवानालाही नियमित
सैन्यदलासारखेच शौर्यचक्र, वीरचक्र देवून गौरविण्यात येते.
अलिकडे प्रादेशिक सेनेमध्ये भरती होण्यासाठी
महिलांसाठीही अंशत: प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
आपल्या भारतीय सैन्याबाबत, प्रादेशिक सेनेबाबत अधिक
माहितीसाठी आपण Indianarmy.nic.in या संकेतस्थळाला जरुर भेट द्यावी.
जय
हिंद…
श्री. मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, उस्मानाबाद.
श्री. मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, उस्मानाबाद.
Subscribe to:
Posts (Atom)






