Thursday, 1 September 2016

हे शासन अवैध सावकारी मोडून काढणार - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

    










उस्मानाबाद,दि.1:- या शासन काळात गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, हे शासन अवैध सावकारी मोडून काढणारचं असे मी उस्मानबादमधील जनतेला आश्वासित करतो,असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
          उस्मानाबाद जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्या पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आज पालकमंत्री डॉ. दीपक सावंत आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत, त्यावेळी ते बोलत होते.
          कळंब तालुक्यातील भाट शिरपूरा या गावातील श्रीमती वनमाला गायकवाड या महिलेने तसेच याच तालुक्यातील मोहा गावातील अनिल मुटकुळे या तरूण शेतकऱ्याने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
          या कुटुंबियांच्या सांत्वनभेटीच्या वेळी दोन्ही मंत्रीमहोदयांनी या कुटुंबाला धीर दिला, शासन आपल्या दु:खात आपल्या सोबत असून शासनाकडून आपल्याला शक्य तेवढी मदत केली जाईल तसेच गुन्हेगारांचा लवकर शोध घेतला जाईल आणि त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होईल असे आश्वासन दिले.
          यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे,मुख्य  कार्यकारी अधिकारी आनंद रायते ,जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, विभागीय कृषी अधिकारी श्री. बिराजदार, प्रांताधिकारी सचिन बारावकर, तहसिलदार एस. डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

          या दुष्काळी परिस्थिती पाहणी दौऱ्याच्या दरम्यान मंत्री महोदयांनी शिंगोली, तेरणा, ढोकी येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली व जलपूजन केले तर जहागिरदारवाडी, भडाची वाडी येथील पिकांची पाहणी केली. त्याचप्रमाणे ढोकी येथील पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय येथेही भेट दिली. याच दरम्यान कसबे तडवळे येथील जुन्या पोलीस ठाण्याच्या जागेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, असे निवेदनही कसबे तडवळे ग्रामस्थांकडून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले.

Wednesday, 31 August 2016

अवयवदान महारॅलीला जिल्हयात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद








उस्मानाबाद, दि.30:-वैद्यकीय शिक्षण विभाग, रोटो साटो आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती महाराष्ट्र व जिल्हा शासकीय रूग्णालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रूग्णालय ते तुळजाभवानी स्टेडिअमपर्यंत अवयवदान महारॅलीचे उत्सफूर्तपणे आयोजन करण्यात आले.
            या अवयवदान महारॅलीस पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, निवासी उपजिल्हाधिकारी उध्दव घुगे, उस्मानाबाद नगरपरिषदेचे अध्यक्ष संपतराव डोके यांनी हिरवा  झेंडा दाखवून व हवेत फुगे सोडून रॅलीला सुरूवात केली .यावेळी डॉ. एच.व्ही. वडगावे, डॉ. धनंजय पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत सोपल व डॉ. शिवाजी फुलारींसह जिल्हयातील वैद्यकीय अधिकारी, शाळा महाविद्यालयीन/ विद्यार्थी/ विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
            अवयवदान श्रेष्ठ दान आहे, मरावे परी कीर्तीरूपी उरावे….जगताचे उपकार अवयवदानाने फेडावेत…. चला अवयवदान करूया ….आदी घोषणा देत शहरातून अवयवदान जनजागृती महारॅली काढण्यात आली. या रॅलीला उस्मानाबाद शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले म्हणाले की, जिवंतपणी अथवा मृत्य झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान होय. अवयवदान करण्यासाठी जिल्हयातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे यावे असे आवाहन केले.

            या अवयवदान महारॅलीस उस्मानाबाद शहरातील नामांकित श्रीपतराव भोसले हायस्कूलसह शहरातील अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 

जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न


उस्मानाबाद,दि.30:-सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, मंत्रालय मुंबई यांचे संकल्पनेतून इयत्ता 10 वी मधील 85 टक्केपेक्षा जास्त गुण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी  करिअर मार्गदर्शन शिबिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक भवन येथे आय.ए. एस. प्रशिक्षणार्थी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या मार्गदर्शन शिबिरासाठी जिल्हयातील मागासवर्गीय विद्यार्थी/ विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.या करिअर शिबिरासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण एस.एस. शेळके , समाज कल्याण अधिकारी अमोल घवले व कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
            मार्गदर्शन करतांना आयुष प्रसाद म्हणाले की, इयत्ता 10 वी नंतर भारतामध्ये उपलब्ध असलेल्या संधीबाबत बहुमोल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच एम. पी. एस. सी. व यु. पी. एस. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना  येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विविध उपाय यावेळी सुचविले.
             कार्यक्रमाच्या शेवटी सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री. एस. एस. शेळके यांनी आयुष प्रसाद यांच्या बहुमोल मार्गदर्शनाबाबत व या करिअर मार्गदर्शन शिबिरास उपस्थित असलेल्या सर्वांचे त्याबद्दल आभार व्यक्त केले.