Saturday, 8 July 2017

सहपालकमंत्री महादेव जानकर यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा



उस्मानाबाद.दि.08:-राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास,मत्सव्यवसाय मंत्री तथा सहपालकमंत्री महादेव जानकर हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे--
सोमवार दि. 10 जुलै 2017 रोजी पहाटे 4.40 वाजता उस्मानाबाद रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह उस्मानाबादकडे प्रयाण. सकाळी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सकाळी 8.40 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद कडे प्रयाण. 
सकाळी 09-00 वाजता कर्जमाफी/पिककर्ज आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद), सकाळी 10-00 वाजता उस्मानाबाद जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद) दुपारी 02-00 वाजता उस्मानाबाद येथून शासकीय मोटारीने मुंबईकडे प्रयाण.  

परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा


उस्मानाबाद, दि.08:- राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे---
            रविवार दि. 9 जुलै रोजी दुपारी 04-00 वाजता शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे आगमन व  राखीव. 05वाजता तुळजापूर येथून शासकीय मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण.06 वाजता उस्मानाबाद येथे आगमन व राखीव.

            सोमवार दि. 10 जुलै रोजी सकाळी 09-00 वाजता कर्जमाफी/पिककर्ज आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद), सकाळी 10-00 वाजता उस्मानाबाद जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद) दुपारी 02-00 वाजता उस्मानाबाद येथून  शासकीय  मोटारीने  मुंबईकडे  प्रयाण.

Thursday, 6 July 2017

वृक्ष लागवड ही सामाजिक चळवळ बनली पाहिजे -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे




उस्मानाबाद,दि.4:- पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड ही सामाजिक चळवळ बनली पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले.
                                 जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी जिल्हयातील हतलाई मंदिर परिसर, तुळजापूर खुर्द, कामेगाव,पळसप, कळंब तालुक्यातील निपाणी आदी भागात भेट देवून वृक्ष लागवडीची पाहणी केली.यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक वनीकरणाचे सहाय्यक संचालक श्री. मायकलवार, मुख्य वनरक्षक औरंगाबाद श्री. वाघ, विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार दिनेश झांपले तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
        हातलाई मंदिर परिसरात वन विभागाने केलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये सन 2001-02 मध्ये या क्षेत्रात वन विभागाने त्यावेळी 15 हेक्टर क्षेत्रात 37 हजार 500, मुख्य रस्ता ते मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, मंदीर परिसराच्या बाजूस लॉन तयार करुन, लॉनच्या चोहोबाजूस विविध रंगाच्या क्रोटॉनची लागवड, त्यामध्ये विविध पाम प्रजातींची लागवडीची पाहणी करुन तुळजापूर खुर्द येथे  वन विभागाने 20 हेक्टरवर वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम योजनेंतर्गत सन 2017 मध्ये लावलेल्या 24 हजार वृक्ष लागवडीची पाहणी केली. त्यानंतर कामेगाव येथील 10 हेक्टर क्षेत्रावर वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम योजनेंतर्गत सन 2017 मध्ये लागवड केलेल्या 12 वृक्ष लागवडीची पाहणी केली.त्यानंतर उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथे सन 2014 मध्ये निकृष्ट वनाचे पुर्नवनीकरण योजनेंतर्गत लागवड केलेल्या 37 हजार 500 वृक्ष लागवडीची  पाहणी जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी केली.यावेळी पळसप येथे लागवड केलेल्या शिसू, काशिद, प्लेटोफार्म, करंज,निम,शिरस महोगणी, बकुळ आदी वृक्षाची चांगली वाढ झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पाहणी केलेल्या सर्व ठिकाणी यावेळी जिल्हाधिकारी श्री. गमे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सर्वांनी वेळेत पूर्ण करावे -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


                                                    
उस्मानाबाद,दि.5:- जिल्हयाचे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट सर्व विभागानी दिलेल्या वेळेत  पूर्ण करावे व त्याचबरोबर उद्दिष्ठ पूर्ण केल्यानंतर लावलेले वृक्ष जिवंत राहण्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज केल्या.
                                 जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत कामाचा जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी आढावा बैठक  घेतली. यावेळी ते बोलत होते.यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक,विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,उपविभागीय अधिकारी चेतन गिराशे, उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
                                 वृक्ष लागवडीचे उद्दिष्टये पूर्ण केल्यानंतर ते जिवंत राहण्यासाठी  व त्याचे संगोपन व संरक्षण करण्यासाठी बिहार पॅटर्न राबवा, ज्यामुळे लोकांना रोजगारही मिळेल व वृक्षही जिवंत राहतील,अशा सूचनाही यावेळी  जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी केल्या.
                                 विभागीय वन अधिकारी श्री.सातेलीकर यांनी यावेळी रोपलागवड करण्यापूर्वी रोपांची पिशवी पाण्यात बुडवून लागवड करावी, जलसंजीवनी मिश्रणात (हळद,हिंग,कापूर,सिरेडॅक्सचे द्रावण करुन) रांपोची पिशवी त्यात भिजवून लागवड करण्यात यावी, काही प्रमाणात हायड्रोजेलचा वापर करावा, यामुळे थोडयाशा पावसातही अधिक काळ ओलावा टिकून राहील, असे सांगितले.
            यावेळी कृषी विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, शिक्षण विभाग,महसूल विभाग,ग्रामपंचायत, वन विभाग, सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभागाचा वृक्ष लागवडीचा आढावा घेण्यात आला.  

Monday, 3 July 2017

स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेला संयुक्त राष्ट्र संघाचा इक्वेटर-2017 पुरस्कार जाहीर


उस्मानाबाद,दि.3: मराठवाडयासारख्या दुष्काळग्रस्त प्रदेशात काम करुन अतिविषम हवामानात योग्य ते कृषीबदल करुन स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेने 20 हजार महिलांना सेंद्रीय शेतीचे कृषी प्रशिक्षण देऊन शाश्वत विकास साधल्याबद्दल संस्थेला यु.एन.डी.पी. चा इक्वेटर पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदर पुरस्कारासाठी 120 देशातील 806 नामांकनामधून जगभरातून केवळ 15 संस्थांची निवड झाली आहे. हा पुरस्कार पटकाविणारी स्वयंम शिक्षण प्रयोग ही देशातील एकमेव संस्था ठरली आहे.
इक्वेटर हा संयुक्त राष्ट्र संघाचा, जागतिक दर्जाचा पुरस्कार आहे. दरवर्षी प्रादेशीक ज्ञानाचा वापर करुन ग्रामविकास करण्यासाठी अद्यावत अभिनव कल्पना विकसित करुन पर्यावरणाचा समतोल राखण्याचा यशस्वी प्रयत्न करणा-या संस्थांना सदर पुरस्कार देण्यात येतो. ज्यामध्ये अन्न  सुरक्षा, जलसंधारण, शाश्वत विकास आणि ग्रामीण उपजीविकेची माध्यमे तसेच आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विषयांचा समावेश होतो.
सप्टेंबर महिन्यामध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसामान्या विधानसभेत स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेला सदर पुरस्कार देण्यात येईल. संस्थेने विकसित केलेले सेंद्रिय शेतीचे कृषीतंत्र केवळ कृषी विकासच नव्हे तर महिलांच्या माध्यमातून अन्न सुरक्षा, जलसंधारण, शाश्वत विकास आणि ग्रामीण उपजीविकेची माध्यमे प्रदान करेल असे प्रतिपादन संस्थेच्या कार्यकारी संचालिका, श्रीमती प्रेमा गोपालन यांनी माध्यमांशी बोलताना केले.
स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेबद्दल : व्यावसायिकतेला पाठबळ देत ग्रामीण आणि तळागाळातील महिला व युवतींना पुढे येऊन, सक्षम होऊन व्यवसाय कुशल होऊन लोकहिताचे व्यवसाय करण्यास प्रोत्सहान आणि सहाय्य करणे हे संस्थेचे प्राथमिक कार्य आहे. व्यवसाय विकासाचे/वृद्धीचे आणि यशाचे धडे या व्यवसायी महिलांनी एकमेकिंपासुनच घेऊन पुढे गेले पाहिजे यासाठी सदर संस्था व्यासपीठ देखील उपलब्ध करते. भारतातील ग्रामीण महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता विकसित करते. सन 2009 पासून संस्थेने अक्षय उर्जा, शाश्वत शेती, आरोग्य, आहार, स्वच्छता आणि सुरक्षित पाणी यासांरख्या सामाजिक प्रश्नांना उपायात बदलून तळागाळातील 60 हजार महिलांना व्यावसायिक बनवले आहे. 1000 महिलांना अक्षय उर्जा तंत्राचे प्रशिक्षण देऊन व्यावसायिक बनवले आहे.

उपक्रमातील 1 लाखांपेक्षा जास्त महिला त्यांच्या कुटुंबात आता अक्षय उर्जा साधानांचा वापर करतात. स्वयंम शिक्षण प्रयोग, समर्थ महिला व्यवसाय आणि महिलांसोबत समुदायाचा शाश्वत विकास यासाठी गेले 20 वर्षापासून कार्य करीत आहे.  4 लाख लोकांपर्यत पोहोंचत असताना सदर संस्था महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, बिहार, आसाम आणि ओरिसा या राज्यात कार्यरत आहे. 

वृक्ष लागवडीच्या नोंदीसाठी मोबाईल ॲप


उस्मानाबाद,दि.3: चार कोटी वृक्षलागवडीचा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. शासनाव्यतिरिक्त नागरीक व संस्थांना वृक्षलागवडीची नोंद करता यावी यासाठी माय प्लान्टस मोबाईल ॲप तयार करण्यात आला आहे. 01 जुलै 2017 रोजी हा ॲप कार्यान्वित होणार आहे.   
01 ते 07 जुलै, 2017 या कालावधीत सर्व जिल्हयात एकत्रित 4 कोटी वृक्षलागवड करुन ती मुलांच्या संगोपनासारखे जोपासण्याचा व जिवंत ठेवण्याचा हिरवाकच संकल्प शासनाने केला आहे. उसमानाबाद जिल्हयात हा संकल्प यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्या सूचनेनुसार काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. वृक्षलागवडीच्या या उपक्रमात शासन यंत्रणेसह सर्वसामान्य नागरीक व सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग राहणार आहे.
शासनाच्या विभागांना दिलेल्या उदीष्टानुसार करण्यात येणा-या वृक्षलागवडीची नोंद www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर करता येणार आहे. सर्वसामान्य नागरीक, सामाजिक संस्था व इतर संस्थांना वृक्षलागवडीची नोंद करण्यासाठी शासनाने My Plants हा मोबाईल ॲप तयार केला आहे. हा ॲप केवळ 01.10 एमबी चा असल्याने तो सहज डाऊनलोड करता येईल.
  
असा आहे ॲप

या ॲपमध्ये वृक्षलागवडीची माहिती कशा पध्दतीने भरावयाची हे दिले आहे. यामध्ये वृक्षलागवड करणा-यांचे नांव, मोबाईल क्रमांक, कोणत्या जिल्हयात, कोणत्या तालक्यात वृक्षलागवड करण्यात आली आहे. गाव आणि वृक्षलागवडीचे स्थळ, संख्या, कार्यक्रमात किती जणांचा सहभाग, किती रोपे लागवड केली, वृक्षलागवडीचे छायाचित्र इत्यादी माहिती भरता येणार आहे ही माहिी कशी भरावी यासाठी मार्गदर्शन म्हणून एक व्हिडीओ क्लिप तयार या ॲपमध्ये आहे. यात भरण्यात आलेल्या माहितीची दखल शासनामार्फत घेण्यात येणार असल्यामुळे वृक्षप्रेमी  नागरीक  व संस्थांसाठी हा ॲप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे वृक्षप्रेमींनी हा ॲप डाऊनलोड करुन वनमहोत्सवात म्हणजेच 01 ते 07 जुलै2017 या कालवधीत वृक्षलागवड मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राजेश्वर सातेलीकर, विभागीय वन अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे. 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत मुदतवाढ


उस्मानाबाद,दि.3: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2017 मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त णलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहेत.
दि. 19 जून 2017 ते दि. 26 जून या कालावधीत नियमित शुल्क आणि यापूर्वी निश्चित केलेली आहे परंतु काही शाळांना तांत्रिक अडचणीमुळे आवेदनपत्रे भरण्याच्या कामात या कालावधीत अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेता खास बाबत म्हणून आवेदनपत्रे नियमित शुल्काने घेण्याची मुदत शुक्रवार दि. 30 जून 2017 अखेर वाढविण्यात येत आहे. त्यामुळे दि. 30 जून 2017 पर्यंत भरण्यात येणा-या विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रांचे विलंब शुल्क आकारण्यात येऊ नये अशा सूचना मंडळ स्तरावरुन सर्व माध्यमिक  शाळांना देण्यात येत आहेत. 
त्यामुळे दि. 19 जून 2017 ते दि. 30 जून 2017 या पूर्ण कालावधीत भरलेली आवेदनपत्रे नियमित शुल्कानुसार जमा करावीत. मात्र तदनंतर आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरण्याबाबत तारखांमध्ये कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच दि. 01 जुलै 2017 पासूनची आवेदनपत्रे अतिविलंब शुल्काने घेण्यात येतील.
याबाबतची नोंद सर्व माध्यमिक शाळांनी घ्यावी, तसेच काही अडचणी असल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा असे सचिव, राज्यमंडळ, पुणे यांनी कळविले आहे.

तरुण व पात्र प्रथम मतदारांची मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम


उस्मानाबाद,दि.3: भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीमध्ये तरुण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21 वर्ष) मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 
वयोगट 18 ते 21 वर्ष पात्र व्यक्तींनी मतदार यादीमध्ये नाव नोदणी करण्यासाठी नजीकच्या मतदान केंद्रात किंवा तहसिल कार्यालयामध्ये आयोगाकडुन प्राप्त झालेले नवीन नमुना नंबर 6 मध्ये आपली परिपूर्ण माहिती व त्यास आवश्यक लागणारी कागदपत्रांची पूर्तता करुन सदर फॉर्म नजीकच्या मतदान केंद्रात अथवा तहसिल कार्यालयात जमा करावेत.
जास्तीत जास्त तरुणांनी या मोहिमेत सहभाग घेऊन आले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करुन आपला मतदानाचा अधिकार प्राप्त करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी उस्मानाबाद यांनी केले आहे.

लोकशाही दिनातील तक्रारींचा वेळेत निपटारा करा -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


                                                  
उस्मानाबाद,दि.3:- लोकशाही दिनातील  प्रलंबीत तक्रारीचा वेळेत निपटारा करावा, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज दिल्या.
                                 जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) सचिन बारवकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत)अजिंक्य पवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती  सुनिता मते, पोलीस उप अधीक्षक श्रीमती गोपिका जहागिरदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी थोरात, जिल्हा उपनिबंधक श्री जगदाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                                 लोकशाही दिनाच्या बैठकीला येताना मागील लोकशाही दिनातील तक्रारीच्या कार्यवाहीचा अहवाल घेवून अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे,अंतिम चौकशी करुन प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत व  पूर्तता अहवाल सादर करावा, अशा सूचना ही जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी यावेळी दिल्या.  
            यावेळी आयोजित लोकशाही दिनात 30 तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये महसूलच्या 10, वन विभाग 1, जिल्हा परिषद 8, वीज महावितरण कंपनी 2, पोलीस दल 3, कृषी 2, सहकार 1, नगर परिषद 3,आदी विभागाशी संदर्भात तक्रारींचा समावेश होता.