Friday, 17 July 2026
भूजल संवर्धनाची विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाणीव ; ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात
भूजल संवर्धनाची विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाणीव ; ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात
धाराशिव,दि.१७ जुलै (जिमाका) भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त जयप्रकाश माध्यमिक विद्यालय,रुईभर येथे विद्यार्थ्यांसाठी 'भूजल जागृती कार्यक्रम' उत्साहात आयोजित करण्यात आला.भूजल संवर्धन, पावसाच्या पाण्याचे संधारण, पाणी बचत आणि भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमात वरिष्ठ भूवैज्ञानिक रविंद्र मांजरमकर यांनी विद्यार्थ्यांना भूजलाचे महत्त्व,पावसाच्या पाण्याचे संधारण,भूजल पुनर्भरण, पाणी बचतीच्या सवयी तसेच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावयाची जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जलसंपत्तीचे संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी आजपासूनच पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा,धाराशिव येथील रसायनी विजयकुमार गेंदले यांनी पाण्याची गुणवत्ता,दूषित पाण्यामुळे होणारे विविध आजार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला.विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करत सुरक्षित व स्वच्छ पाण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) चे सतीश सुर्यवंशी यांनी 'अल निनो' आणि 'ला निनो' या नैसर्गिक हवामान प्रक्रियांची माहिती देत त्यांचा भारतीय मान्सूनवर होणारा परिणाम विद्यार्थ्यांना सविस्तरपणे समजावून सांगितला.हवामानातील बदलांचा जलस्रोतांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन जलसंवर्धनाचे महत्त्व त्यांनी विशद केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाची प्रतिज्ञा घेत जलसंपत्तीचे संरक्षण करण्याचा संकल्प केला.जयप्रकाश माध्यमिक विद्यालय,रुईभर येथील पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कनिष्ठ भूवैज्ञानिक मनिषा डोंगरे,सहायक भूवैज्ञानिक चंद्रकांत सुरवसे,वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे सतीश सुर्यवंशी,विद्यालयाचे पर्यवेक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ भूवैज्ञानिक मनिषा डोंगरे यांनी केले.
*******
Thursday, 16 July 2026
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत मिनी ऑइल मिल, एक्सपेलरसाठी अनुदानाची सुवर्णसंधी महाडीबीटी पोर्टलवर २५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; महिला शेतकरी व एफपीओंना प्राधान्य
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत मिनी ऑइल मिल, एक्सपेलरसाठी अनुदानाची सुवर्णसंधी
महाडीबीटी पोर्टलवर २५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; महिला शेतकरी व एफपीओंना प्राधान्य
धाराशिव,दि.१७ जुलै (जिमाका) राज्यातील तेलबिया उत्पादनाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबिया (NMEO-OS) २०२६-२७ ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO/FPC) तसेच मूल्य साखळी भागीदार गटांना (VCP) प्रक्रिया उद्योगात आत्मनिर्भर बनविण्यासाठी ‘मिनी ऑइल मिल/एक्सपेलर’ या घटकावर आकर्षक अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत मिनी ऑइल मिल/एक्सपेलर खरेदीसाठी शासनाकडून दोन प्रकारे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. फिल्टर प्रेससह मिनी ऑइल मिल/एक्सपेलर या प्रकारासाठी शासनाने प्रति युनिट ४ लाख रुपये इतकी उच्चतम अनुदान मर्यादा निश्चित केली आहे. या घटकासाठी जिल्ह्यास ११ युनिटचा भौतिक लक्षांक प्राप्त झाला आहे. अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,अल्प व अत्यंत अल्प भूधारक शेतकरी तसेच महिला प्रवर्गातील लाभार्थ्यांना युनिटच्या एकूण किमतीच्या ५० टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना युनिटच्या किमतीच्या ४० टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेपर्यंत अनुदान मिळणार आहे.
तसेच फिल्टर प्रेसशिवाय मिनी ऑइल मिल/एक्सपेलर या प्रकारासाठी प्रति युनिट ३ लाख रुपये इतकी उच्चतम अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या घटकासाठीही जिल्ह्यास ११ युनिटचा भौतिक लक्षांक मंजूर झाला आहे.या योजनेत अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,अल्प व अत्यंत अल्प भूधारक शेतकरी आणि महिला प्रवर्गाला युनिटच्या किमतीच्या ५० टक्के किंवा उच्चतम मर्यादेपर्यंत,तर सर्वसाधारण प्रवर्गाला युनिटच्या किमतीच्या ४० टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO/FPC) आणि मूल्य साखळी भागीदार गट (VCP) घेऊ शकतात.लाभार्थी निवडीमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून, लक्षांक शिल्लक राहिल्यास वैयक्तिक लाभार्थ्यांचा विचार केला जाईल.तसेच आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त महिला शेतकऱ्यांनाही विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
ही योजना कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणार आहे.या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी २५ जुलै २०२७ पर्यंत महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जांमधून राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (NMEO-OS) अंतर्गत प्राधान्याने लाभार्थी निवड केली जाणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला शेतकरी आणि इतर पात्र घटकांनी या योजनेचा लाभ घेऊन प्रक्रिया उद्योगात पाऊल टाकावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
*****
तेलबिया उत्पादक संस्थांसाठी गोदाम बांधकामावर ५० टक्के अनुदान ; जुलैअखेरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
तेलबिया उत्पादक संस्थांसाठी गोदाम बांधकामावर ५० टक्के अनुदान ; जुलैअखेरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.१७ जुलै (जिमाका) गळीतधान्य उत्पादनाची सुरक्षित साठवणूक आणि शेतीमालाच्या मूल्यवृद्धीला चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया अंतर्गत विशेष योजना राबविण्यात येत आहे.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात गळीतधान्य पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असलेल्या, मात्र साठवणुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसलेल्या भागांमध्ये २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामांच्या बांधकामासाठी अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.जिल्ह्यास या योजनेसाठी तीन गोदाम बांधकामांचा भौतिक लक्षांक प्राप्त झाला असून,इच्छुक व पात्र संस्थांनी जुलै महिनाअखेरपर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी (FFPOs), समूह आधारित व्यवसाय संस्था (CBBOs), सहकारी संस्था तसेच सरकारी व खासगी उद्योग यांना गोदाम बांधकामासाठी सहाय्य दिले जाणार आहे.या घटकांमध्ये मदत देताना 'व्हॅल्यू चेन पार्टनर' (VCP) यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
योजनेनुसार गोदामाची क्षमता २५० मेट्रिक टन असून, बांधकामाचा मापदंड प्रति मेट्रिक टन ११ हजार ५२१ रुपये निश्चित करण्यात आला आहे.या खर्चामध्ये अंतर्गत रस्ते,PEB,विद्युतीकरण, रॉयल्टी,प्रयोगशाळा चाचणी शुल्क तसेच GST यांचा समावेश आहे. २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी एकूण प्रकल्प खर्च २८ लाख ८० हजार २५० रुपये निश्चित करण्यात आला असून, त्याच्या ५० टक्के किंवा कमाल १४.४० लाख रुपये (दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल ती) इतके अनुदान देण्यात येणार आहे.
ही योजना बँक कर्जाशी निगडित असून,अर्जदार संस्थांनी केंद्र शासनाच्या SMART किंवा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने अधिकृत केलेल्या वित्तीय संस्थेकडून IFSC कोडसह कर्ज मंजूर करून घेणे आवश्यक राहणार आहे.
योजनेच्या अटी व नियमांनुसार संबंधित बाबीसाठी यापूर्वी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा. एकाच बाबीसाठी दोन वेगवेगळ्या योजनांमधून अनुदान घेतल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.गोदामाच्या जागेची निवड,आराखडा व बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषांनुसारच करणे बंधनकारक असून,चालू आर्थिक वर्षातच बांधकाम पूर्ण करावे लागणार आहे.अपूर्ण किंवा अनधिकृत बदल केलेल्या बांधकामास अनुदान मंजूर होणार नाही.
गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषीमालाच्या साठवणुकीसाठी योग्य व माफक दरात करणे बंधनकारक असून,यासाठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज्ड हमीपत्र सादर करावे लागणार आहे.गोदामाचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल.
याशिवाय गोदामाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर जिओ टॅगिंग (Geo Tagging) करणे तसेच सर्व बांधकामांची कृषी मॅपर पोर्टल (Krishi Mapper Portal) वर नोंद करणे अनिवार्य राहणार आहे.
इच्छुक संस्थांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिलेल्या डिझाईन्स,स्पेसिफिकेशन्स आणि खर्चाच्या अंदाजपत्रकासह (Estimates) आपले अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जुलै महिनाअखेरपर्यंत सादर करावेत.
लाभार्थी निवड प्रक्रिया जुलैअखेर पूर्ण केली जाणार असून,लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची निवड सोडत (Lottery) पद्धतीने करण्यात येईल.तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या पूर्वसंमतीनंतरच कार्यारंभ आदेश (Work Order) देण्यात येतील.
अधिक माहितीसाठी तसेच अर्ज प्रक्रियेसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
******
'माय भारत' विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
'माय भारत' विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
धाराशिव,दि.१७ जुलै (जिमाका) देशातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना देण्याच्या उद्देशाने युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या 'माय भारत' (Mera Yuva Bharat) उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानाला गुरुवारी १६ जुलै रोजी प्रारंभ झाला.
१ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाद्वारे जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींना 'माय भारत' पोर्टलशी जोडून स्वयंसेवा, नेतृत्व विकास,कौशल्यविकास, अनुभवानिष्ठ शिक्षण तसेच विविध शासकीय उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी आढावा बैठक घेतली.या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
या अभियानादरम्यान जिल्ह्यातील महाविद्यालये,शाळा,युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.युवकांनी मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि आवश्यक कागदपत्रांच्या सहाय्याने 'माय भारत' पोर्टलवर विनामूल्य नोंदणी करून शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी केले.
युवकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक अथवा क्यूआर कोडच्या माध्यमातूनही 'माय भारत' पोर्टलशी सहज जोडता येणार आहे.यासंदर्भातील सविस्तर माहिती पीपीटीच्या माध्यमातून 'मेरा युवा भारत' विभागाकडून बैठकीत सादर करण्यात आली.
'माय भारत' हा केवळ नोंदणीचा उपक्रम नसून युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारा आणि समाजसेवेची संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.या माध्यमातून युवकांना स्वयंसेवा, सामाजिक बांधिलकी,नेतृत्व विकास,कौशल्यवृद्धी तसेच विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागाची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्व युवक-युवती, माय भारत,राष्ट्रीय सेवा योजना (NSS), एनसीसी (NCC), शैक्षणिक संस्था तसेच युवक संघटनांनी या विशेष नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून अधिकाधिक युवकांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन मेरा युवा भारत,धाराशिव कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
*******
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू ; विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू ; विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.१७ जुलै (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखाली कार्यरत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह,लोहारा येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व मूलभूत सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात.यामध्ये मोफत निवास,शालेय विद्यार्थ्यांना मोफत स्टेशनरी साहित्य, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्टेशनरीसाठी वार्षिक चार हजार रुपये,शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस कोडसाठी एक हजार रुपये,तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये दिले जातात.तसेच वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये निर्वाह भत्ता,सकस व पौष्टिक भोजन, सुरक्षित व शैक्षणिक वातावरण,शुद्ध पिण्याचे पाणी,वीज,स्वच्छ वसतिगृह, अध्ययन कक्ष,ग्रंथालय,संगणक व इंटरनेट सुविधा (उपतेनुसार),क्रीडा साहित्य, सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम,स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुस्तके,वर्तमानपत्रे,स्पर्धा परीक्षा विषयक मासिके तसेच शासनाच्या नियमानुसार इतर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी मोठी मदत होत आहे.
इयत्ता आठवी ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे समाज कल्याण विभागाच्या नियमानुसार पात्र विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे अचूकपणे अपलोड करावीत,असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहाचा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे बंधनकारक असून,शासकीय वसतिगृहाचा ऑनलाइन प्रवेश अर्ज न भरल्यास स्वाधार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही,याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी,असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.
*******
Wednesday, 15 July 2026
मधुमक्षिकापालन योजनेचा लाभ घ्या ; पात्र लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले ५० टक्के अनुदानासह शासनाच्या हमीभावाने मध खरेदीची सुविधा
मधुमक्षिकापालन योजनेचा लाभ घ्या ; पात्र लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले
५० टक्के अनुदानासह शासनाच्या हमीभावाने मध खरेदीची सुविधा
धाराशिव,दि.१४ जुलै (जिमाका) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधुमक्षिकापालन) ही योजना १८ जून २०१९ पासून राज्यभर राबविण्यात येत असून,या योजनेअंतर्गत पात्र व्यक्ती तसेच संस्थांकडून लाभासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. शेतकरी, युवक,युवती तसेच संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रभरून जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी के.जे.सय्यद यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण,साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणुकीच्या तत्त्वावर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाते.तसेच शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष व छंद प्रशिक्षणाची सुविधा,मधमाशांचे संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती तसेच मध व्यवसायासंदर्भातील विविध तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात येते.
वैयक्तिक मधपाळ घटकासाठी अर्जदार साक्षर असणे आवश्यक असून, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य दिले जाईल.अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे.
केंद्रचालक (प्रगतीशील मधपाळ) घटकासाठी संबंधित व्यक्ती किमान दहावी उत्तीर्ण असावी.तिचे वय २१ वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.संबंधित व्यक्तीच्या किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर किमान एक एकर शेती अथवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेती असावी.तसेच लाभार्थ्याकडे मधमाशा पालन,प्रजनन व मध उत्पादनाबाबत इतरांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आणि आवश्यक सुविधा असणे बंधनकारक आहे.
केंद्रचालक संस्था घटकासाठी संबंधित संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावावर किंवा भाडेतत्त्वावर किमान एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाची सुयोग्य इमारत उपलब्ध असावी.तसेच मधमाशा पालन, प्रजनन आणि मध उत्पादन विषयक प्रशिक्षण देण्याची क्षमता संस्थेकडे असणे आवश्यक आहे.
लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्याबाबत मंडळास बंधपत्र देणे अनिवार्य राहील.तसेच मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणेही लाभार्थ्यांसाठी बंधनकारक असेल.
योजनेविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी,महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय,धाराशिव येथे संपर्क साधावा.तसेच दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२२२३०१, शंकर चाटे (मधुक्षेत्रिक) – ९९७५४६८४३९ आणि प्रसाद वाघमारे – ९१५३५६०५६० यांच्याशी संपर्क साधता येईल.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, युवक,युवती तसेच संस्थांनी या योजनेचा लाभ घेऊन मधुमक्षिकापालन व्यवसायाद्वारे उत्पन्नवाढीची संधी साधावी,असे आवाहन प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी के.जे.सय्यद यांनी केले आहे.
*****
श्री तुळजाभवानी देवींच्या सिंहासन पूजेसाठी ऑगस्ट महिन्याचे ऑनलाइन नोंदणी वेळापत्रक जाहीर
श्री तुळजाभवानी देवींच्या सिंहासन पूजेसाठी ऑगस्ट महिन्याचे ऑनलाइन नोंदणी वेळापत्रक जाहीर
धाराशिव,दि.१४ जुलै (जिमाका) महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश,कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने तुळजापूर येथे येत असतात.कुलदेवतेचे दर्शन, कुलाचार आणि कुलधर्म पार पाडण्यासाठी भाविकांची वर्षभर मोठी गर्दी होत असते.या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२६ महिन्यातील श्री तुळजाभवानी देवींच्या सिंहासन पूजेसाठी ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, भाविकांनी त्यानुसार नोंदणी करावी, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने केले आहे.
श्री देवींची सिंहासन पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.या पूजेची नोंदणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://online.shrituljabhavani.org या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविक,महंत,पुजारी,सेवेकरी तसेच नागरिकांनी याची नोंद घ्यावी,असेही संस्थानतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑगस्ट २०२६ महिन्यातील सिंहासन पूजेसाठी ऑनलाइन नोंदणी १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून २४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.भाविकांनी अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश करून आपली नोंदणी पूर्ण करावी.
यानंतर २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन ड्रॉ पद्धतीने प्रथम सोडत काढण्यात येईल.निवड झालेल्या भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस पाठविण्यात येतील. प्रथम सोडतीतील भाविकांनी २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजतापासून ते २८ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ऑनलाइन शुल्क भरावे.
प्रथम फेरीत सिंहासनांची संख्या पूर्ण न झाल्यास २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत द्वितीय ऑनलाइन सोडत काढण्यात येईल. निवड झालेल्या भाविकांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येईल.द्वितीय सोडतीतील भाविकांनी २८ जुलै रोजी सकाळी ११ ते २९ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ऑनलाइन पेमेंट करावे.
प्रथम आणि द्वितीय फेरीतही सिंहासनांची संख्या पूर्ण न झाल्यास तृतीय ऑनलाइन सोडत काढण्यात येईल.या सोडतीसाठी २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत भाविकांना एसएमएस पाठविण्यात येतील. तृतीय सोडतीतील भाविकांनी २९ जुलै रोजी सकाळी ११ ते ३० जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ऑनलाइन पेमेंट करावे.
ऑगस्ट २०२६ महिन्यातील सिंहासन पूजेचे अंतिम बुकिंग पूर्ण झालेल्या भाविकांची यादी ३० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
भाविकांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून सिंहासन पूजेचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरचे व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.
*****
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.१४ जुलै (जिमाका) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक विद्यार्थ्यांनी २४ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत इयत्ता दहावी, बारावी,पदवी,पदव्युत्तर,वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातींतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.संबंधित विद्यार्थ्यांनी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असावेत.उपलब्ध निधीच्या अधीन राहून तसेच ज्येष्ठता व गुणक्रमानुसार पात्र विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.
अर्जासोबत स्वहस्ताक्षरातील अर्ज, मोबाईल क्रमांक,शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका,पुढील वर्षात प्रवेश घेतल्याचा पुरावा अथवा प्रवेश शुल्काची पावती,आधार कार्ड, जातीचा दाखला आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
पूर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,तळमजला,धाराशिव येथील कार्यालयात २४ जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष जमा करावीत किंवा टपालाद्वारे पाठवावीत.निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील मांग,मातंग समाज तसेच तत्सम १२ पोटजातींतील पात्र युवा व युवतींनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), धाराशिवचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
******
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी '१९५०' टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित नागरिकांनी सुविधेचा लाभ घ्यावा
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी '१९५०' टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित
नागरिकांनी सुविधेचा लाभ घ्यावा
धाराशिव,दि.१४ जुलै (जिमाका) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून,या मोहिमेदरम्यान पात्र मतदारांना निवडणूकविषयक सेवा अधिक सुलभ व प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्हास्तरावर विशेष मदत कक्ष (Help Desk) स्थापन केला आहे.तसेच मतदारांच्या अडचणी,शंका आणि तक्रारींच्या तातडीने निवारणासाठी '१९५०' हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून,जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या मदत कक्षामार्फत मतदारांना विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक,मतदार म्हणून पात्रता,नाव नोंदणी अथवा दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.तसेच मागील विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतील (२००२, २००४ व २००५) मतदार नोंदी शोधून देण्यासाठीही सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
याशिवाय,मतदारांना गणना प्रपत्र (Enumeration Form) ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने भरताना आवश्यक ते मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे.स्थलांतरित मतदारांना त्यांचा सध्याचा आणि पूर्वीचा विधानसभा मतदारसंघ ओळखून योग्य ठिकाणी नावनोंदणी करण्यासाठीही मदत करण्यात येणार आहे.
मतदारांना निवडणूक आयोगाच्या 'ECInet' या मोबाईल ॲपची माहिती देण्याबरोबरच त्यामधील 'Book a Call with BLO' या विशेष सुविधेबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.या सुविधेद्वारे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी थेट संपर्क साधून आवश्यक माहिती व सहाय्य मिळविता येणार आहे.
'१९५०' या टोल फ्री क्रमांकावर मतदारांना विनामूल्य संपर्क साधून आपल्या शंका व अडचणींचे निरसन करता येणार आहे. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू असून, या प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही अडचणीसाठी नागरिकांनी '१९५०' हेल्पलाईन तसेच जिल्हास्तरीय मदत कक्षाचा उपयोग करावा,असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.
*****
Sunday, 12 July 2026
आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार.. -परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार.
आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार..
-परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार.
पंढरपूर, दि १२ :- आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात.राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार ५०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक,पंढरपूर येथे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर,पंढरपूरच्या नगराध्यक्षा श्रीमती.प्रणिता भालके व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत.७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' अंतर्गत मोफत प्रवास,तर महिलांना 'महिला सन्मान योजना' अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी.तसेच पंढरपूरातील विविध बसस्थानकांवर थांबलेल्या बसेसची अंतर्गत व बाह्य स्वच्छता,निर्जंतुकीकरण करावे, आषाढी यात्रेसाठी विशेष बससेवा" असा दर्शनी फलक लावण्यात यावा, त्याचबरोबर चालक व वाहक यांच्या आरोग्याच्या वैद्यकीय तपासणीची बसस्थानक परिसरात व्यवस्था करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.परतीच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेवून मार्गनिहाय स्वतंत्र रांगा तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने प्रवाशांना बसेसमध्ये प्रवेश देण्यात यावा अशा सूचनाही परिवहन मंत्री श्री सरनाईक यांनी दिल्या.
मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने ५ हजार १४५ विशेष बसेस चालवून तब्बल २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती.यंदा त्याहून अधिक सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. एकादशीच्या दिवशी लाखो भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीचे ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत.तसेच वारकरी भाविकांसाठी पंढरपूर व परिसरात चंद्रभागा,भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.या स्थानकांवर पिण्याचे पाणी,सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष,मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वारी कालावधीत रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या महामंडळाच्या १३ हजार कर्मचाऱ्यांना यामध्ये चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने केली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली भीमा बसस्थानची पाहणी
आषाढी यात्रा शुद्ध एकादशी २५ जुलै २०२६ रोजी असून,आषाढी यात्रा सोहळ्यासाठी वारकरी- भाविकांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे.यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे १८ ते २० लाख वारकरी भाविक पंढरपुरात येतात.आषाढी यात्रेसाठी एस.टी ने येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.या अनुषंगाने प्रवासी भाविकांच्या सुविधेसाठी महामंडाळामार्फत पंढरपूर व पंढरपूर परिसरात चार तात्पुरते बसस्थानक निर्माण करण्यात येतात.या अनुषंगाने आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्री.विठ्ठल कारखाना, देगाव येथे तात्पुरते भीमा बसस्थानकाची पाहणी केली.
यावेळी वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या भीमा बसस्थाकावर,सुलभ शौचालय,शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,स्वच्छता,आरोग्य सुविधा, संगणकीय आरक्षण केंद्र,चौकशी कक्ष,मार्गदर्शन फलक,सीसीटीव्ही यंत्रणा तसेच सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक आदी बाबतची माहिती घेतली व संबधितांना आवश्यक सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
******
Subscribe to:
Posts (Atom)


