Thursday, 16 July 2026
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू ; विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू ; विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.१७ जुलै (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखाली कार्यरत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह,लोहारा येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व मूलभूत सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात.यामध्ये मोफत निवास,शालेय विद्यार्थ्यांना मोफत स्टेशनरी साहित्य, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्टेशनरीसाठी वार्षिक चार हजार रुपये,शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस कोडसाठी एक हजार रुपये,तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये दिले जातात.तसेच वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये निर्वाह भत्ता,सकस व पौष्टिक भोजन, सुरक्षित व शैक्षणिक वातावरण,शुद्ध पिण्याचे पाणी,वीज,स्वच्छ वसतिगृह, अध्ययन कक्ष,ग्रंथालय,संगणक व इंटरनेट सुविधा (उपतेनुसार),क्रीडा साहित्य, सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम,स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुस्तके,वर्तमानपत्रे,स्पर्धा परीक्षा विषयक मासिके तसेच शासनाच्या नियमानुसार इतर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी मोठी मदत होत आहे.
इयत्ता आठवी ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे समाज कल्याण विभागाच्या नियमानुसार पात्र विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे अचूकपणे अपलोड करावीत,असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहाचा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे बंधनकारक असून,शासकीय वसतिगृहाचा ऑनलाइन प्रवेश अर्ज न भरल्यास स्वाधार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही,याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी,असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.
*******