Saturday, 19 August 2017

अन्न व औषध प्रशासनच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे


उस्मानाबाद.दि.18:- सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे, त्याचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरक करणारे अन्न व्यवसायिक यांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 व त्या अंतर्गत नियम व नियमन 2011 मधील तरतुदीचे पालन करणे बंधनकारक आहे, असे सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन श्री.टी.सी.बोराळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            यासाठी प्रसाद करताना (उत्पादनाची ) जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, प्रसादासाठी लागणारा कच्चा माल/अन्न पदार्थ परवाना धारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यवसायिकांकडून खरेदी करावा.तसेच प्रसाद बनविणाऱ्या केटरर्सची माहिती अद्यावत करुन ठेवावी.प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ,आरोग्यदायी व झाकण असलेली असावी. फळांचा प्रसाद वापर करताना फळांची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या, परवानानोंदणी धारकाकडून करावी. कच्चे /सडलेले किंवा खराब फळांचा वापर करु नये.प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहील याची खात्री करावी.प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य/ पोर्टेबल असावे.प्रसाद उत्पादन करणाऱ्य स्वयंसेवकास ग्लोव्हज, टोपी (हेड गिअर) इत्यादी देण्यात यावे व प्रत्येक वेळी स्वयंसेवकाने हात स्वच्छ ठेवावेत.प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करुन घ्यावी.दुध अथवा दुग्धजन्य पदार्थ थंड राहतील असे कमी तापमानावरच साठवणूकीस ठेवावेत.खवा / माव्याची वाहतुक व साठवणूक थेड / रेफ्रीजरेटेड वाहनातूनच करावी. जुना, शिळा अनेक दिवस कोल्ड स्टोरेज मध्ये साठविलेला खवा/मावा प्रसादासाठी वापरु नये.अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून त्यास संपूर्ण सहकार्य करावे व त्याने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहिल.या व्यतिरिक्त अन्न/प्रसाद या बाबत काही संशय असल्यास आपले क्षेत्राच्या अन्न सुरक्षा अधिकारी अथवा सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. या संदर्भात माहिती/तक्रार/सुचना असल्यास एफडीए हेल्पलाईन क्र.1800222365 वर संपर्क साधावा व लोकांच्या आरोग्याचे दृष्टीने वरील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असे अन्न व औषध प्रशासन यांनी कळविले आहे.

सर्व संसर्गीतांना शासकिय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे- जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे



उस्मानाबाद.दि.18:- जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय व काळजी व आधार केंद्र यांच्याकडून  एचआयव्ही  संसर्गीत व्यक्तीचे शासकीय योजनेसाठी दाखल केलेल्या आर्जावर  संबंधित अधिकऱ्यांनी  तात्काळ कार्यवाही करुन  जिल्ह्यातील सर्व एचआयव्ही  संसर्गीत  व्यक्तीस शासकिय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी  राधाकृष्ण  गमे  यांनी   बैठकित  दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा रुग्णालयातील विविध समितींच्या बैठका पार पडल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हाआरोग्य अधिकारी  डॉ. हनुमंत वडगावे, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंचला बोडखे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी,  जिल्हा कार्यक्रम अधिकारी  गणेश काकडे, सर्व वैद्यकिय अधिक्षक, सर्व जिल्हा समन्वयक,  इतर विभागचे अधिकारी उपस्थित होते.
पीसीपीएनडिटीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री.गमे, म्हणाले की, जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर प्रमाण घसरत आहे. मुलींचे जन्मदर प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करुन योग्य ती कार्यवाही करावी, या कामी अधिकारी, कर्मचारी यांचा हलगर्जीपणा दिसून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. पुढिल बैठकीस येताना आरसीएच पोर्टलवर नोंदणी झालेल्या प्रत्येक गरोदर माचे आउटकम काय आहे याची माहिती घेऊन येण्यास सांगीतले. 
जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री. गमे म्हणाले की, जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय व काळजी व आधार केंद्र यांच्याकडून एचआयव्ही संसर्गीत व्यक्तीचे दाखल केलेल्या आर्जावर तात्काळ कार्यवाही झाली पाहीजे असे आदेश सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी व संजय गांधी योजना तहसिलदार यांना दिले. जिल्ह्यातील सर्व एचआयव्ही संसर्गीत व्यक्तीस शासकिय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी संबंधीतांकडून योग्य त्या पदधतीने अर्ज भरुन तहसील मध्ये दाखल करावेत, या मध्ये काही अडचणी आल्यास  निवासी जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र खंदारे यांच्याशी संपर्क साधावा, त्यांची निवड ही जिल्ह्यातील संसर्गीतांना सर्व शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरीता जिल्हा नोडल ऑफिसर म्हणून करण्यात आली असल्याचेही  त्यांनी  सांगीतले.
विधवा निराश्रित महिला बचत गटांकडून तयार करण्यात आलेल्या पेपर बॅगचे कौतुक करत त्यांनी संपुर्ण जिल्हा हा कॅरीबॅग मुक्त करण्याचा मानस देखिल बोलुन दाखवला. यामाध्यमातून महिलांना रोजगार मिळले व पर्यावरण स्वच्छ राखण्यास मदत होईल. सदर बचत गटाकडून सर्वांनी पेपरबॅग विकत घेण्याचे आव्हान केले.

            या बैठकिमध्ये राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ कार्यक्रम, महाराष्ट्र एमर्जेंसी मेडिकल सर्विसेस (108 गाडी )  व  महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य  जीवनदायी  योजनेचा आढावा घेण्यातआले. यावेळी बैठकिस उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस देण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी दिले.