उस्मानाबाद.दि.18:- सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे,
त्याचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरक करणारे अन्न व्यवसायिक यांनी अन्न
सुरक्षा व मानके अधिनियम 2006 व त्या अंतर्गत नियम व नियमन 2011 मधील तरतुदीचे
पालन करणे बंधनकारक आहे, असे सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन
श्री.टी.सी.बोराळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
यासाठी
प्रसाद करताना (उत्पादनाची ) जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, प्रसादासाठी लागणारा
कच्चा माल/अन्न पदार्थ परवाना धारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यवसायिकांकडून खरेदी
करावा.तसेच प्रसाद बनविणाऱ्या केटरर्सची माहिती अद्यावत करुन ठेवावी.प्रसादासाठी
लागणारी भांडी स्वच्छ,आरोग्यदायी व झाकण असलेली असावी. फळांचा प्रसाद वापर करताना
फळांची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या, परवानानोंदणी धारकाकडून करावी. कच्चे /सडलेले
किंवा खराब फळांचा वापर करु नये.प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित
राहील याची खात्री करावी.प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य/ पोर्टेबल
असावे.प्रसाद उत्पादन करणाऱ्य स्वयंसेवकास ग्लोव्हज, टोपी (हेड गिअर) इत्यादी
देण्यात यावे व प्रत्येक वेळी स्वयंसेवकाने हात स्वच्छ ठेवावेत.प्रसाद उत्पादन व
वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री
करुन घ्यावी.दुध अथवा दुग्धजन्य पदार्थ थंड राहतील असे कमी तापमानावरच साठवणूकीस
ठेवावेत.खवा / माव्याची वाहतुक व साठवणूक थेड / रेफ्रीजरेटेड वाहनातूनच करावी.
जुना, शिळा अनेक दिवस कोल्ड स्टोरेज मध्ये साठविलेला खवा/मावा प्रसादासाठी वापरु
नये.अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून त्यास संपूर्ण सहकार्य
करावे व त्याने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहिल.या व्यतिरिक्त
अन्न/प्रसाद या बाबत काही संशय असल्यास आपले क्षेत्राच्या अन्न सुरक्षा अधिकारी
अथवा सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी यांचेशी प्रत्यक्ष संपर्क
साधावा. या संदर्भात माहिती/तक्रार/सुचना असल्यास एफडीए हेल्पलाईन क्र.1800222365
वर संपर्क साधावा व लोकांच्या आरोग्याचे दृष्टीने वरील मार्गदर्शक सूचनांचे पालन
करुन सहकार्य करावे, असे अन्न व औषध प्रशासन यांनी कळविले आहे.