Friday, 21 October 2016

पोलीस हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली





उस्मानाबाद, दि.21:- आज 57 व्या पोलीस हुतात्मा दिनानिमित्त   येथील पोलीस मुख्यालय येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा प्रमुख न्यायाधीश श्री रमेश देशमुख हे उपस्थित  होते. दि. 21 ऑक्टोबर 1959  रोजी हॉट स्प्रिंग्ज या सीमेवरील बर्फाच्छादित निर्जन ठिकाणी गस्त घालणाऱ्या भारतीय  जवानांवर चिनी सैनिकांनी अमानुष हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दहा भारतीय जवान शहीद झाले .  तेव्हापासून  दरवर्षी 21 ऑक्टोबर या दिवशी वीर शहीद शिपायांची आठवण म्हणून  या दिवशी संपूर्ण भारतात पोलीस  हुतात्मा  दिन पाळला जातो.  
सर्वप्रथम पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख यांनी  उपस्थितांना 21 ऑक्टोबर या दिनाचे महत्व सांगितले. त्यानंतर प्रमुख पाहुणे  श्री. रमेश देशमुख यांनी ज्याप्रकारे सैनिकांमुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहेत त्याप्रमाणे देशातील अंतर्गत सुरक्षा पोलिसांमुळे अबाधित आहे व पोलिसांमुळे आपण सर्वजण रात्री निश्चिंतपणे झोपू शकतो, अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मान्यवराच्या हस्ते स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच हवेत बंदुकीच्या 21 फैरी झाडून हुतात्म्यांना सलामी देण्यात आली.

या कार्यकमास अप्पर पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा सरकारी वकील  श्री.जाधवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  श्री. हरिष खेडकर यांनी केले.

Thursday, 20 October 2016

नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी घेतली पत्रकार परिषद


उस्मानाबाद, दि. 20:-नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. निवडणूक सुरळीत आणि कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहिती  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी  आज पत्रकार परिषदेत दिली.तसेच या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी ,  सहायक  निवडणुक  निर्णय अधिकारी , अतिरिक्त  निवडणूक  अधिकारी नियुक्त  करण्यात  आल्याचे माहितीही त्यांनी  यावेळी दिली.
डॉ. नारनवरे म्हणाले, 17 ऑक्टोबरपासून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर त्यांच्याकडून खर्च मागविण्यात येणार आहे. यात उमेदवाराने स्वत: केलेला खर्च, पक्षाने केलेला खर्च आणि मित्र, नातेवाईकांनी केलेला खर्च, याशिवाय  निवडणूक  प्रचाराकरिता  सोशल मिडियाच्या वापराकरिता  झालेला इंटरनेटचा  खर्चही ग्राह्य धरण्यात येणार आहे.
उमेदवारांना विविध कार्यालयात परवानगीसाठी जावे लागू नये यासाठी तहसील कार्यालयात एक खिडकी तयार करण्यात येणार असून त्या ठिकाणाहूनच सर्व परवानगी देण्यात येणार आहे. पक्षाच्या उमेदवाराला एक सूचक आणि अपक्ष उमेदवाराला पाच सूचक द्यावे लागणार आहे.  नगरपरिषदेसाठी 166  सदस्य  आरक्षणासह निवडण्यात येणार आहे. यासाठी 2 लाख 11 हजार 314 मतदार राहणार असून 80 प्रभागात ही निवडणूक घेण्यात येणार असून 278 मतदान केंद्र राहणार आहे.  दि.27 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 28 नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याचे  डॉ. नारनवरे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी   निवासी  उपजिल्हाधिकारी  श्री. सुनिल यादव ,  उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)  श्री. सचिन बारवकर , उपजिल्हाधिकारी निवडणूक श्री. प्रभोदय मुळे ,  मुख्याधिकारी श्री. राजीव बुबणे  तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकार आदि उपस्थित होते.

 

चला फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करु या !!!

दिवाळी सण मोठा... नाही आनंदाला तोटा... असे आपण म्हणतो. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देणाऱ्या या सणाची खासियत काही औरच.. दारासमोरची रांगोळी, आकाशकंदील, फराळ यामुळे दिवाळीच्या चार दिवसांमध्ये उत्साह द्विगुणीत होतो. मात्र आता या सणात फटाक्यांच्या वापरामुळे आता प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवाळी आणि फटाके हे समीकरण एकमेकांशी घट्ट असल्याने फटाक्यांशिवाय दिवाळी साजरीच होऊ शकत नाही, हे सत्य असले तरीही आता प्रदूषणाची समस्या पाहता दिवाळीत फटाक्यांचा अट्टाहास नको अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.

केवळ दिवाळीच नव्हे तर कोणतेही सण साजरे करण्यासाठी फटाक्यांचा आधार घेतला जातो. संपूर्ण देशभरात दिवाळी हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो. अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणाऱ्याचा संदेश देणाऱ्या या सणाच्या नावातच प्रसन्नता आहे. पूर्वी विकासाच्या पल्ल्याआड दडलेल्या भारतात जेव्हा वीज ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती, तेव्हापासून सर्वत्र प्रकाश यावा, या हेतूखातर सर्वत्र दिवे, आकाशकंदील लावले जात. कालांतराने प्रकाश तेजोमय दिसावा म्हणून फटाके फोडण्याची प्रथा रूढ झाली. नंतर जल्लोषाच्या नावाखातर मोठमोठ्या आवाजात फुटणारे फटाके, सुतळी बॉम्ब यांचा धुमाकूळ सुरू झाला.

गेल्या काही वर्षांपासून आवाजी फटाके कमी झाले असून आकाशात सप्तरंगाची उधळण करणाऱ्या ध्वनीविरहित फटाक्यांची मागणी वाढली आहे. पण त्या फटाक्यांमुळे कानठळ्या बसत नसल्या तरी वायुप्रदूषण मात्र होत आहे. नाक, डोळे, घसा आणि फुप्फुसांना त्याचा त्रास सोसावा लागतो. नुकतीच घरगुती शोभेची दारू तयार करताना झालेली दुर्घटना किंवा या अगोदर फटाक्यांमुळे झालेल्या दुर्घटनांमुळे झालेली जीवितहानी, वित्तहानी फटाक्यांचे दुष्परिणामच ठळकपणे अधोरेखित करतात. मुळात दिवाळीचा खरा आनंद हा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करूनच मिळवायला हवा. मोठ्या कर्कश्श आवाजाच्या फटाक्याने बहिरेपणा येऊ शकतो. माणसांप्रमाणे पशु-पक्ष्यांनाही फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचा त्रास होतो.

दिवाळीत फटाके फोडण्याची जणू स्पर्धाच लागते. यामुळे प्रदूषण होऊन आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात, हे माहीत असूनही अनेक लोक फटाके फोडतात. फटाक्‍यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका अशी मांडली की, विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शिक्षक हे गुरु असतात. आणि विद्यार्थी शिक्षकांचे ऐकतात म्हणूनच विद्यार्थ्यांनी फटाके विकत घेऊ नयेत आणि ते उडवू नयेत यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिल्या आहेत. याबरोबरच शिक्षकांनी फटाक्यांचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगावेत, असेही सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे. दिवाळीत कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांनी रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो, फटाक्यांच्या आतषबाजीनंतर मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायुप्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे फटाके फोडण्यावर कायमची बंदी घालावी किंवा सायंकाळी ७ ते रात्री ९ या दोन तासांचाच कालावधी फटाके फोडण्यासाठी ठरवून द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून याबाबत शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. राज्य सरकारनेही शिक्षकांना या कामासाठी प्रोत्साहित करावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून तातडीने जनजागृती सुरू करावी, फटाक्यांमुळे मानवी आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, याबद्दल महिती देण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आजच्या घडीला फटाक्यांमुळे होणाऱ्या वाईट परिणामांबाबत जागृती करणे नितांत गरजेचे आहे. शालेय स्तरापासून प्रदूषणाबाबत जागृती करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. वाढत्या प्रदूषणाचा विचार केला असता दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करण्याशिवाय पर्याय नाही. सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आवाजविरहित फटाके वाजवून पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज आहे.

फटाक्यांमुळे हवेत कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन-मोनॉक्साइड, फॉस्फरस यासारखे विषारी वायू पसरल्याने हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. परिणामी, श्वसन, घसा, फुप्फुस व दमा यांचे विकार वाढतात. कर्ण कर्कश्श आवाजामुळे लहान बालकांच्या कानांचे पडदे फाटून बहिरेपणा, डोळ्यांवर फटाका उडाल्यास डोळ्यांना इजा पोहोचून अंधपणा येण्याची शक्यता असते. वृद्ध व आजारी रुग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागत असून विषारी धुरामुळे मोकळा श्वास घेणे मुश्कील होत आहे. पक्षी आवाजाने घरट्यातून उडून जातील, फुलबाजांच्या तापलेल्या तारांवर पाय पडून छोट्या मुलांना इजा होण्याची शक्यता असते. रॉकेटसारखा फटाका आगीस निमंत्रण देण्याची शक्यता असल्याने वित्तहानी व जीवितहानी टाळण्यासाठी फटाक्यांचे दुष्परिणाम पाहता ते फोडणे धोकादायकच आहे. वास्तविक आनंद देण्याने वाढतो, वाढल्याने तो पसरतो. दिवाळी हा मौजमजेचा सण नसून धार्मिकता आणि संस्कृती जपण्याचा सण आहे. दिवाळीदरम्यान फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. एकंदरीतच आवाज करणाऱ्या आतषबाजीमुळे निसर्गासह मनुष्यप्राण्यालाही हानी पोहोचत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फतही दिवाळीदरम्यानच्या प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्यात येते. पर्यावरणाची हानी रोखण्यासह शांतता क्षेत्रात ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत प्रयत्न करण्यात येतात. आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांची आवश्यकता नसते. ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके हे स्वतःला तसेच इतरांनाही त्रासदायकच असतात. म्हणूनच शहरातील वाढती गर्दी व वस्त्या पाहता, आता पर्यावरणाला बाधा न आणता त्याचे रक्षण करत, शांततामय दिवाळी साजरी करणे ही काळाची गरज आहे असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे.

-वर्षा फडके,
वरिष्ठ सहायक संचालक.

शहीद पोलिसांना मानवंदना


आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी संपूर्ण भारतभर 21 ऑक्टोबर हा दिवसपोलीस स्मृतीदिनम्हणून पाळला जातो. आजपर्यंत महाराष्ट्र पोलीस दलातील 231 अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. या शहीद पोलिसांना ही मानवंदना

देशाबाहेरील शत्रुंपासून राष्ट्राचे, राष्ट्रातील नागरिक, त्यांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय संरक्षण दलाच्या लष्कर, वायु सेना आणि नौदलातर्फे अहोरात्र पार पाडण्यात येत असते. तर देशांतर्गत शत्रूपासून, समाजविघातक कंटकांपासून नागरिकांच्या जीविताचे, मालमत्तेचे, कायदा सुव्यवस्था पाळण्याचे कर्तव्य संबंधित राज्याच्या पोलीस दलांकडून करण्यात येते.
आपले कर्तव्य बजावताना काही वेळा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वीरमरणदेखील पत्करावे लागते. अशाप्रकारे कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेले   पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभरपोलीस स्मृतिदिनम्हणून पाळला जातो. त्याशिवाय भारतातील सर्व पोलीस दलांकडून कवायतींचे आयोजन करून 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट या कालावधीत कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली जाते.
21
ऑक्टोबर हा पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्याचे कारण म्हणजे 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी लडाखमधील भारतीय सीमेवरील बर्फाच्छादित निर्जन अशा हॉटस्प्रिंग याठिकाणी पोलीस दलातील 10 जवान गस्तीवर असताना दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला कडवे आव्हान देत त्या 10 जवानांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली आणि ते वीरगतीला प्राप्त झाले. त्या घटनेमुळे संपूर्ण भारतभर दु:खाची छाया पसरली होती. या वीर पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना अतिशय उच्च कोटीचे शौर्य दाखवले होते. त्यांनी दाखविलेल्या त्या शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची राष्ट्रनिष्ठेची जाण प्रत्येकाच्या मनात तेवत राहावी, म्हणून शहीद पोलिसांच्या स्मृतीप्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभरपोलीस स्मृतिदिनया नावाने पाळला जातो.
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी हे देखील वेळप्रसंगी आपल्या जिवाची बाजी लावून नागरिकांच्या जीविताचे मालमत्तेचे संरक्षण करण्यात तसूभरही कमी नाहीत. मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर,2008 रोजीच्या हल्ल्यात शहीद झालेले सहपोलीस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर, पोलीस निरीक्षक बापूराव धुरगूडे, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भोसले, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे, वाहनचालक अरुण चित्ते, पोलीस कॉन्स्टेबल सर्वश्री विजय खांडेकर, जयवंत पाटील, अंबादास पवार, योगेश पाटील आदींची शौर्यगाथा तर आपल्या मनावर कायमची कोरली गेली आहे.आपल्यासाठी शहीद झालेल्या या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कृतज्ञतापूर्ण मानवंदना.

-
देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती) (वृत्त).

Sunday, 16 October 2016

कोजागिरीनिमित्त तुळजापुरात भाविकांची मांदियाळी तुळजापूर-सोलापूर रस्ता भाविकांनी फुलला




              उस्मानाबाद,दि.16 : शारदीय नवरात्र महोत्सव व कोजागिरी पोर्णिमा निमित्त सोलापूर जिल्हा व शेजारील राज्यातून भाविक पायी चालत येत असतात. या भाविकांच्या मांदियाळीने संपूर्ण तुळजापूर-सोलापूर रस्ता फुलून गेल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. या लाखो भाविकांनी  तुळजापुरात पायी चालत येऊन श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन आनंद उत्साहच साजरा केल्याचे चित्र दिसून येत होते. भाविकांमधील उत्साह कौतूकास्पद होता आणि प्रत्येक भाविक आपण तुळजापूरात देवीच्या दर्शनासाठी पायी चालत आल्याचा आनंद प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. यावेळी प्रशासनाकडून मुख दर्शन, धर्मदर्शन आणि शिखर दर्शनाची स्वतंत्र रांगेत सोय करण्यात आल्याने भाविकांचे दर्शन सुलभ होत असल्याचे पाहायला मिळाले. सोलापूरसह विजापूर, इंडी यासह कर्नाटक राज्याच्या विविध भागातील भाविक श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुराकडे येत असल्याचे चित्र होते. युवा वर्ग, महिला याबरोबरच काही वृद्ध भाविकही पायी चालत येताना दिसत होते.
          भाविकांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे-घाटे, व्यवस्थापक (प्रशासन)  सुजित नरहरे, नगरपरिषदेचे मख्य कार्यकारी अधिकारी राजीव बुबने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
          सोमवार,दि.17 रोजी श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा,अन्नदान महाप्रसाद व रात्रौ सोलापूरच्या काठयासह छबीना होणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मीकी जयंती साजरी


उस्मानाबाद.दि.16:-महर्षी वाल्मीकी जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी कर्मचारी उपस्थित होते.