Saturday, 16 September 2017

"स्वच्छ भारत अभियानाचा" पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आज शुभारंभ


उस्मनाबाद,दि.16:- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 वा वर्धापन दिन  मराठवाडयातील सर्व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य  परिवहन विभागात व त्यांच्या कार्यक्षेत्रातील आगारात  साजरा केला जाणार असून, या  समारंभानिमित्त राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते यांच्या हस्ते "स्वच्छ भारत अभियानाचा" शुभारंभ  एस.टी.बसस्थानक, उस्मानाबाद येथे करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती क्र.2 राज्य दपरिवहन मध्यवर्ती कार्यालय, मुंबई हे उपस्थित राहणार आहेत, असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन उस्मानाबाद श्री.राजीव साळवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

महिला लोकशाही दिनाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा -जिल्हा महिला व बालविकास अधिकारी


उस्मानाबाद,दि.16:- समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांचे हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी/ अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडुन सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.त्या अनुषंगाने सोमवार 18 सप्टेंबर 2017 रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे, या महिला लोकशाही दिनाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत यांनी कळविले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणा-या कामकाजाचा दिवस महिला लोकशाही दिन म्हणुन पाळण्याबाबतचे निर्देश आहेत. यात न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुण्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रति न जोडलेला अर्ज, सेवा विषयक,आस्थापणा विषयक बाबी, तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
तालुकास्तरावर प्राप्त प्रकरणावर कार्यवाही होऊन तक्रारीचे निराकरण न झाल्यास अशी प्रकरणे जिल्हास्तर महिला लोकशाही दिनामध्ये विचारार्थ घेतली जातात. 
उस्मानाबाद येथे दि. 18 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
 या लोकशाही दिनात महिलांचे वैयक्तीक स्वरुपाचे तक्रार/निवेदन विहित नमुन्यात स्विकारले जाणार आहेत. अर्जाचा विहित नमुना जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत गाळा नं. 10, तळमजला, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत विनामुल्य मिळतील, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बेरोजगार उमेदवारांकरिता 22 सप्टेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन


उस्मानाबाद,दि.16:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद आयोजित बारामती, पुणे, लातुर येथील खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक/कंपनी यांच्याकडील 580 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक पुरुष व स्त्री उमेदवारांच्या मुलाखती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, असमनाबाद  येथे शुक्रवार दि. 22 सप्टेंबर 2017 रोजी  घेऊन निवड करण्यात येणार आहे.
उद्योजक पद, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा पुढीलप्रमाणे
पियागो व्हेईकल प्रा.लि. बारामती येथे जॉब ट्रेनी 150 पुरुष, आयटीआय ट्रेड- फिटर, स्प्रे पेंटर,वेल्डर, टर्नर, शिट मेटल, मशिनिष्ट, मोटार, डिझेल, पंप,मेकॅनिकल, 18 ते 28 वयोमर्यादा, ओसिस टेक्नॉलीज उस्मानाबाद अंतर्गत कॉम्प्युटर हार्डवेअर इंजि. 5 पुरूष, किमान बारावी पास, हार्डवेअर डिप्लोमा, 18 ते 50 वयोमर्यादा राहील, कॉम्प्युटर ऑपरेटर 35 स्त्री-पुरुष, किमान बारावी पास आणि MS-CIT पास असावा, 18 ते 35 वयोमर्यादा राहिल, पुणे येथील एमपीटीए एज्युकेशन लि., पियागो वेहीकल प्रा.लि., भारत फोर्स लि., वारोक पालीमर्स लि., ट्रेनी  150 पुरुष, फिटर, वेल्डर,डिझेल, मोटार मेकॅनिक डिप्लोमा मेकॅनीकल, आयटीआय कोणताही, किमान इ.12 वी पास, 18 ते 26 वयोमर्यादा, पुणे येथिलच अन्य कंपनीत जॉब ट्रेनी  150 पद,(मुले-मुली) किमान 10 वी /12 वी पास बीए, बी.कॉम, बीएसस्सी पदवी पास, आयटीआय कोणताही ट्रेड, एमबीए मार्केटींग,  प्रथम शिक्षण संस्था किल्लारी जि.लातुर येथे मेसर 30 किमान पाचवी पास, वेल्डर 30 किमान 10 वी पास आयटीआय वेल्डर, बार बेन्डीग किमान सातवी पास, आयटीआय वेल्डर, 18 ते 30 वयोमर्यादा राहील.
वेतन सुरुवातीस किमान 7 हजार 500 ते 12 हजार पर्यंत पद व शैक्षणिक योग्यतेनूसार राहील. सुविधा कॅन्टीन, निवास ट्रान्सपोर्टेशन इत्यादी सुविधांबाबत संबंधित कंपनीच्या नियमानुसार, प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी कंपनीचे अधिकारी सविस्तर माहिती व मार्गदर्शन करतील, तसेच आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक/प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), अनुभव असल्यास प्रमाणपत्र, एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि 2 पासपोर्ट साईझ  फोटो  आदी  सर्व  कागदपत्रांच्या  झेरॉक्स कॉपींसह प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने हजर राहून खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधीचा जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा.

या मेळाव्यात सहभाग नोंदविण्याकरिता उमेदवारांना या कार्यालयाकडील जॉब सिकर रजिस्ट्रेशन (एम्पलॉयमेंट नोंदणी) असणे बंधनकारक आहे.नोंदणी नसल्यास उमेदवार उमेदवार www.rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर नवीन नाव नोंदणी करुन तात्काळ प्रमाणपत्र मिळवू शकतात. संपर्कासाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02472-222236 वर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक श्री. बालाजी मरे  यांनी केले आहे.

अनुसूचित जातीतील शेतक-यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत नवीन विहीर व इतर लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावेत


उस्मानाबाद,दि.16:-अनुसूचित जातीतील शेतक-यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत नवीन विहीर व इतर लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावेत.
डाँ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जाती/ नवबौध्द शेतक-यांना अर्थसहाय्य देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयासाठी चालू वर्षात 116 नवीन विहिरीचे लक्षांक प्राप्त झाले असून 350 लक्ष निधी उपलब्ध होणार आहे या योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना नवीन विहीर रु 2.5. लाख जुनी विहीर दुरुस्ती रु 50000/ इनवेल बोअरींग रु 20000/- पंपसंच रु 25000/- वीज जोडणी आकार रु 10,000/- शेततळयाचे प्लॉस्टिक अस्तरीकरण रु 100000/- ठिबक सिंचन रु 50,000/- तुषार संच रु 25000/- या प्रमाणे पॅकेज स्वरुपात निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे.
        लाभार्थी हा अनुसूचित जाती/ नवबौध्द शेतकरी असला पाहिजे.शेतक-यांकडे सक्षम प्राधिका-यांने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. शेतक-यांकडे त्याच्या स्वत:चे नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे. शेतक-यांच्या नावे जमीनधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उत्तारा असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
        द्रारिद्रय रेषेखालील  लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य. द्रारिद्रय रेषेखालील नसलेले अनुसुचित जाती/ नवबौध्द शेतक-यांचे सर्व मार्गाकने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु 15000/- पेक्षा जास्त नसेल तरच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.द्रारिद्र रेषेखालील (बीपीएल.) यादीत अतर्भूत शेतक-यांसाठी वार्षिक उत्पनाच्या मर्यादेची अट राहणार नाही. परंतू ज्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन रुपये 15000/-चे मर्यादित आहे, आशा शेतक-यांनी संबंधित तहसिदार यांचेकडून सन 2016-17 चा उत्पन्नाचा अद्यावत दाखला घेणे व अर्जा सोबत सादर करणे बंधनकारक राहील.

        अधिक माहितीसाठी पंचायत समितीस्तरावर गट विकास अधिकारी किंवा कृषि अधिकारी (विघयो) जिल्हास्तरावर जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी जिल्ळा परिषद किंवा जिल्हा कृषी अधिकारी (विघयो) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.

रब्बी हंगामासंबंधी तक्रार निवारण कक्ष स्थापित कृषी विकास अधिकारी


उस्मानाबाद, दि.16:- रब्बी हंगाम सन 2017-2018 मध्ये निविष्ठ उपलब्धता व निविष्ठांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारींचे निराकरणकरण्यासाठी खरीप हंगामात 15 सप्टेंबर ते 30 नोव्हबर या कालावधीसाठी जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी कार्यालयात व तालुकास्तरावर गट विकास अधिकारी  कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. हा तक्रार निवारण कक्ष सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत कार्यान्वित राहातील, शेतक-यांना कृषी निविष्ठा
( खते,बियाणे व किटकनाशके) विषयी असलेल्या अडचणी/ तक्रार सोडविण्यासाठी/ मार्गदर्शनासाठी या कक्षाशी संपर्क करावा. तक्रार बाबत कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांना कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्याकडूण करण्यात येत आहे.
        तक्रार निवार कक्षाचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद,02472-223794,गट विकास अधिकारी, पंचायत समिती , उस्मानाबाद02472-222157, गट विकास अधिकारी, पंचायत समिती , उमरगा 02475-252027, गट विकास अधिकारी, पंचायत समिती , लोहारा02475-266579,  गट विकास अधिकारी, पंचायत समिती ,तुळजापूर 02471-242040, गट विकास अधिकारी, पंचायत समिती ,भूम 02478-272028, गट विकास अधिकारी, पंचायत समिती ,परंडा 02477-232028, गट विकास अधिकारी, पंचायत समिती ,वाशी 02478-276900, गट विकास अधिकारी, पंचायत समिती ,कंळब 02473-262225 या दूरध्वनी क्रमाकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केले आहे.

श्री.तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाकरिता आरोग्य विभागाची आवश्यक तयारी पूर्ण

* श्रीतुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव विशेष-2017*

                     
                                                             

उस्मानाबाद, दि.16:- श्रीक्षेत्र तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी देवीची शारदीय नवरात्र महोत्सव यात्रा दिनांक 20 सप्टेबर 17 ते 5 ऑक्टोबर 2017 या कालावधीत मोठया प्रमाणात यात्रा भरणार आहे. यात्रेमध्ये यात्रेकरुना आरोग्य विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्यामार्फत खालील प्रमाणे उपचारात्मक व प्रतिबंधात्मक सेवा देण्यात येणार आहे. या कालावधीत ग्रामीण रुग्णालय तुळजापूर शहरात श्री. तुळजाभवानी देवी मंदिर, एस. टी. स्टँड समोर, शिवाजी पुतळायाजवळ, घाटशिळ, वाहनतळ, शुक्रवारपेठ इत्‍यादी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु केलेले असून या प्रथमोपचार केंद्रात पुरेशा प्रमाणात  औषधीसाठा उपलब्ध केलेला आहे.
        श्रीक्षेत्र तुळजापूर येथे पायी येणा-य यात्रेकरुंसाठी यात्रा मार्गावर वडगाव (सि) कावलदरा, पाटोदा, माकणी, तामलवाडी, माळुंब्रा, कांक्रबा, देवसिगा, बारुळ पाटी, सिंदफळ, बोरी, तीर्थ (बु), कसई पाटी  तलमोड, नळदुर्ग, जळकोट, लोहारा, येणेगुर, तुरारी, नारंगवाडी या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु केलले आहेत.
        प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी 13 बारोग्य पथके तयार केलले असून या पथकास गल्ली, वार्ड यांचे वाटप करुन या भागातील सर्व पाणीसाठयाचे/ हॉटेल/ धाबे खानावळ, येथील पाण्याचे निर्जतुकीकरण करुन पाणी शुध्दीकरण केल्याची खात्री ओ.टी. टेस्ट घेवून करण्यात येते.ओ.टी. टेस्ट निगेटिव्ह – ve आल्यास मदर सोल्यूशन किंवा मेडिक्लोर  द्वारे पाणी साठयाचे निर्जतुकीकरण करण्यात येते.

        तरी यात्रेकरुंनी वरील सेवांचा लाभ घ्यावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

   
उस्मानाबाद,दि.16:- राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे-
            शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी रात्री 09-00 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व  राखीव.
            रविवार दि. 17 सप्टेंबर  रोजी सकाळी 08.43 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम. (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद), सकाळी 09-30 वाजता स्वच्छता अभियान कार्यक्रम (स्थळ- एस.टी.बसस्थानक, उस्मानाबाद) सकाळी 10.00 वाजता उस्मानाबाद  येथून  शासकीय  मोटारीने  मुंबईकडे  प्रयाण

Friday, 15 September 2017

शारदीय नवरात्र उत्सवात भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून सर्व विभागांनी काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


         उस्मानाबाद,दि.15:- श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवास महाराष्ट्रासह  तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमधून यात्रेकरु मोठ्या संख्येने दाखल होतात. येणाऱ्या भाविकांना दर्शन सुलभरित्या व्हावे म्हणून सर्व विभागांनी काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिले.

            शारदीय नवरात्र उत्सवासंदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी तुळजापूर येथील विश्रामगृहात घेतली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी श्रीमती.शिल्पा करमरकर,चेतन गिरासे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे,आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री.गमे पुढे बोलताना म्हणाले की, शारदीय नवरात्र महोत्सवात राज्यासह परराज्यातून भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी येतात दर्शन सुलभरित्या व्हावे म्हणून सर्व विभागांनी काळजी घ्यावी, त्याचबरोबर पाण्याचे व अन्नाचे नमुने रोजच्या रोज तपासणी करावे, महाप्रसादाच्या पॅकिंग,लाह्या अन्य विक्रीचे साहित्य वजन बरोबर आहे व मूळ किंमतीला विकले जाते का ते पाहावे, कुंकवाचे तपासणी नमुने घ्यावेत व भेसळयुक्त विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, यासाठी वैधमापन व अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे काम करावे, अशा सूचना यावेळी दिल्या. घरगुती गॅस व रॉकेलचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश यावेळी श्री.गमे यानी दिल्या.
            सर्व हॉटेल व तुळजापूर मार्गावरील धाब्याचे पाणी नमुने रोजच्या रोज तपासणी करावेत व पाण्याच्या दूषित ठिकाणांना रेड लेबल लावून सिल करावे, एस. टी स्टॅन्डवर भाविकांच्या सोयींसाठी विशेष गाड्यांची सोय करुन त्याबाबतच्या सूचना ध्वनीक्षेपणाद्वारे वेळोवेळी देण्यात याव्यात, प्राथमिक उपचारकेंद्रात येणाऱ्या भाविकांना बसण्याची व पाण्याची सोय करावी, अवैध  दारु विक्री व वाहतुकीवर व गुटखा  विक्रीवर करवाई करण्याचे निर्देश ही यावेळी श्री.गमे यांनी दिले.

            नवरात्र उत्सवात श्री.तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला वाहनाने येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी असते त्यामुळे पार्किंगची व्यवस्था, एसटी महामंडळाने केलेल्या गाडयांची व्यवस्था, वीज वितरण कंपनी व अन्य विभागाने केलेल्या सोयीसुविधा व इतर व्यवस्थासंबंधी यावेळी प्रत्येक विभागप्रमुखाकडून आढावा घेण्यात आला

महाराष्ट्र फूटबॉल मिशन 1 मिलियन रॅली संपन्न



उस्मानाबाद.दि.15:- भारतामध्ये होणा-या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटबॉल  11 मिलीयन या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन 1 मिलियन हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी आयोजित फुटबॉल मिशन भव्य रॅलीस जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा क्रीडा कार्यालय परिसरातून हिरवी झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हा परिषद  उपाध्यक्षा श्रीमती अर्चनाताई पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.पंकज देशमुख यांची माध्यमिक श्री.औंदुबर उकिरडे शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री. सचिन जगताप प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथून सुमारे पाच हजार खेळाडू, प्रशिक्षक, नागरिक यांच्या रॅलीद्वारे करण्यात आले. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्हयातील विविध तालुक्यातील एकुण 1 हजार 123 शाळा पैकी अंदाजे  47 हजार 166 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. जिल्हयातील सर्व शिव छत्रपती पुरस्कारार्थी  यांच्यासमवेत जिल्हयातील प्राविण्यप्राप्त शाळा व राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा गौरव करून शिष्यवृत्तीचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमांतर्गत फुटबॉल स्पर्धा जनजागृती रॅलीची सांगता श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे करण्यात आली. शहरातील शाळा/महाविद्यालयातील मोठया संख्येने  खेळाडू उपस्थित होते. क्रीडा संघटनाचे पदाधिकारी जिल्हा फुटबॉल संघटना श्री. शेख जावेद, आर्चरी जिल्हा संघटना श्री. प्रविण गडदे,  उस्मानाबाद खो-खो असो.चे अध्यक्ष डॉ. चंद्रजित काळे, सायकलिंग असो. अध्यक्ष , श्री. नितीन काळे, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांतर्गत असलेले फुटबॉल, हॉकी, कुस्ती, मैदानी चे   खेळाडूसह या कार्यालयातील  श्री. अशोक बनसोडे,  मदनलाल गायकवाड, क्रीडा अधिकारी  एम. झेङ शेख, जरार कुरेशी, संदीप वांजळे व कार्यालयातील  सर्व कर्मचारी  सह  अनेक क्रीडाप्रेमी या  कार्यक्रमास उपस्थित होते.

Tuesday, 12 September 2017

राज्यातील पहिला “लोकराज्य पशुसंवर्धन विभाग” बनण्याचा बहुमान पटकाविला उस्मानाबादच्या जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने


उस्मानाबाद,दि.12:- महाराष्ट्र  शासनाचे मुख्यपृष्ठ  असलेल्या लोकराज्य  मासिकाची उपयुक्तता  लक्षात घेवून पहिले  लोकराज्य पशुसंवर्धन विभाग बनण्याचा बहुमान  उस्मानाबाद  जिल्ह्यातील  जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने पटकाविण्यात यश मिळविले आहे.

जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे  म्हणून जिल्हा  माहिती अधिकारी  मनोज शिवाजी सानप हे उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे  विविध  उपक्रम, प्रकाशने, फेसबुक पेज, ट्विटर हँडल, ब्लॉग  आदींची  माहिती उपस्थितांना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी राज्यातील पहिली लोकराज्य जिल्हा परिषद करण्यासाठी प्रयत्न करणार असून जिल्हा परिषदेचे एक-एक विभाग संपूर्ण लोकराज्य लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळीच  त्यांनी  राज्यातील  पहिली लोकराज्य जिल्हा परिषद बनण्याचा बहुमान आपल्या जिल्हा परिषदेस मिळू  शकतो  अशी  संकल्पना  मांडली  आणि त्यास  उपस्थित अधिकारी -कर्मचारी  यांनी  संमती दर्शविली व  त्याच अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग या कार्यालयाच्या सर्वच्या सर्व पशुवैद्यकीय दावाखान्यांनी  लोकराज्यचे  वार्षिक  सभासदत्व  स्वीकारले आणि राज्यातील  पहिला लोकराज्य  पशुसंवर्धन विभाग  बनण्याचा बहुमान  मिळविला. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांनी या  उपक्रमाकरिता पुढाकार  घेतला. त्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांचे मन:पूर्वक आभार माणण्यात आले. 

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची आढावा बैठक संपन्न


उस्मानाबाद, दि.12:- जिल्हय़ात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे  यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, महिला बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्री.बी.एच.निपाणीकर, उप विभागीय पोलिस अधिकारी अंजूम शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत,शिक्षणाधिकारी (प्रा.)सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (मा) औदुंबर उकिरडे, विधी सल्लागार श्रीमती.उमा गंगणे, विधी अधिकारी श्रीमती सोनाली पाटील आदीसह बालविकास प्रकल्प अधिकारी  उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री. गमे म्हणाले की, जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याकरिता स्त्रीभ्रूण हत्याविरोधी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच मुलींच्या जन्माविषयी नागरिकांच्या विचारात बदल होण्याकरीता जनजागृती करावी. स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कायदा, मुलींना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक व इतर सवलती याविषयी माहिती देण्यात याव्या. तसेच या अभियानातंर्गत विविध उपक्रम राबवून स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, एकात्मिक बालविकास अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांनी दर महिण्याला आढावा बैठक घ्यावी, बोगस वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याच्या सूचना ही दिल्या.

            सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निपाणीकर यांनी  बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाबाबत माहिती दिली.

Monday, 11 September 2017

महाअवयवदान अभियान व नेत्रदान जनजागरण रॅली संपन्न


उस्मानाबाद, दि.11 :- जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद अंतर्गत महाअवयवदान अभियान -2017 व राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा निमित्त अवयवदान व नेत्रदान जनजागरण रॅलीचे उद्‌घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
            यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा अवयवदान समन्वयक डॉ.गजानन परळीकर, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.एम.के.पल्ला, नेत्रचिकित्सा अधिकारी श्री.ए.एल.शेख, परिचारिका केंद्रातील सुमित्र गोरे, सुवर्णा माळी, रमा शिरसाठ, अमोल गरड, गणेश काकडे, नितिन सुरवसे, उमेश गोरे, प्रसाद गायकवाड व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

            या रॅलीत अवयवदान व नेत्रदानबाबत घोषवाक्य व माहिती देणारे फलकाद्वारा जनजागृतीचा संदेश देण्यात आला.ही रॅली जिल्हा रुग्णालयापासून सुरु होवून तुळजाभवानी स्टेडियम येथे संपन्न करण्यात आली. यावेळी जिल्हा अवयवदान समन्वयक डॉ. परळीकर  यांनी सर्व उपस्थितांना अवयवदानाबाबत माहिती दिली व अवयवदानाची शपथ दिली. ही रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

'बळीराजा चेतना अभियान' या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह


उस्मानाबाद,दि.11:- बळीराजा चेतना अभियान या योजनेंतर्गत सामूहिक विवाह ही योजना जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
            एका ठिकाणी कमीत कमी 05 सामूहिक विवाह आयोजित करण्यात यावे. या योजने अंतर्गत मुलीच्या वडीलांना, वडील हयात नसतील तर आईस व दोघेही हयात नसतील तर मुलीस तिच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या  मंगळसूत्र व इतर वस्तुची खरेदी करण्यासाठी प्रति जोडपे 15 हजार रुपये इतके अनुदान दिले जाईल.  सामूहिक विवाह हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत आयोजित होणे आवश्यक आहे. 
              अधिक माहितीसाठी  जिल्हा  महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत रुम न. 10 तळमजला, डावी बाजू, उस्मानाबाद येथे संपर्क फोन नं. 02472-222592 वर साधावा, असे आवाहन जिल्हा  महिला व बालविकास अधिकारी श्री.अशोक सावंत यांनी केले आहे.
         अर्जासोबत पुढील सत्यप्रत कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमांतर्गत भंग या दाम्पत्य/कुटुंब यांच्याकडून न झालेला नसावा याबाबतचे विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (Affdavit) सादर करणे आवश्यक आहे. (रु. 100 च्या स्टँप पेपरवर), जन्मनोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखला किंवा वैद्यकीय अधिका-याचे वयाबाबतचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याचा पुरावा, लाभार्थी हा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून संबंधित जमिनीचा सातबारा व त्या गावचे रहिवाशी असल्याबाबत त्या गावचे तलाठी,ग्रामसेवक यांचा दाखला, लाभार्थी शेतमजूर असल्याबाबतचा पुरावा म्हणून संबंधित गावचे तलाठी/ग्रामसेवक यांचा दाखला, वधूच्याआईचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र  तहसिलदार/तलाठी, विवाह नोंद प्रमाणपत्र,  वधू- वरांचा लग्नाचा फोटो, वधूच्या आईचा पासपोर्ट फोटो आदी कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे ,असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

गट शेतीस चालना योजनेंतर्गत शेतकरी गटाने प्रकल्प अहवाल सादर सादर करण्याचे आवाहन


उस्मानाबाद,दि. 11 :- "गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे" ही राज्य पुरस्कार योजना सन 2017-18 व सन 2018-19 या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यास मान्यता दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यास स्थापन करावयाचे गटांचे लक्षांक 6 आहे. शेतकरी गटांनी शेतीचे प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी अंतिम तारीख  दि. 20 सप्टेंबर 2017 पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक, आत्मा, यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा श्री. केशव मलगुंडे यांनी केले आहे. 
या योजनेसाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे राहतील. या योजनेंतर्गत किमान 20 शेतकरी समुहाच्या माध्यमातुन किमान शंभर  एकर क्षेत्रावर शेतकरी गटामार्फत विविध कृषि व कृषि पुरक उपक्रम प्रकल्प स्वरुपात राबविण्यात यावा. या योजनेंतर्गत एका समुह गटासाठी आवश्यक असलेली शभंर एकराची क्षेत्र मर्यादा ज्या ठिकाणी संरक्षित भाजीपाला, संरक्षित फुलपीके अशा पिकांचे उत्पादन घेतात. त्यांचे एका समुह गटाचे पॉलीहाऊस,शेडनेटचे एकूण क्षेत्र किमान 25 एकर असल्यास व चार उपगटाचे एकूण क्षेत्र शंभर एकर असल्यास या योजनेत लाभ घेण्यास पात्र ठरतील. समुह शेतीचा प्रयोग प्रायोगिक तत्वावर करण्यात येत असल्याने एका समुहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एका शिवारातील संलग्न भौगोलीक क्षेत्रामध्ये सामुहीकरीत्या नियोजनबद्ध शेती करणारा असावा. सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची आत्मा संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1890 अथवा कंपनी अधिनियम 1958 च्या तरतुदी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी / गट म्हणुन नोंदणीकरणे आवश्यक राहील. तसेच या योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता शेतकरी गटाच्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असणे अनिवार्य राहील. सामुहिक सिंचन सुविधा पध्दतीने यांत्रीकीकरणाद्वारे मशागत करणे शक्य असल्याने सामुहिक शेतीस प्राधान्य देण्यात येईल. गटशेती या योजनेअंतर्गत प्रकल्प स्वरुपात उपक्रम राबविण्यात येईल. या योजनेत गठीत झालेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या गटांना प्रगतीशील शेतीचे तंत्रज्ञान देण्यासाठी शेती विषयक तांत्रीक सल्लागाराची सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
शेतीपुरक जोडधंदा जसे सामुहीक गोठा, दुग्ध प्रक्रिया औजारे, मत्सपालन, मधुमक्षीका पालन, रेशीम उद्योग, कुक्कुट पालन तसेच मागेल त्याला शेततळे, जलसंपदा विभागाकडील कामे इत्यादी कार्यक्रम संबधीत कृषि संलग्न विभागाकडुन त्या विभागाच्या प्रचलित निकषा प्रमाणे समुह गटास प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येतील. बँकेत प्रकल्प आराखडा सादर केलेल्या, करणा-या गटास प्राधान्य देण्यात येईल. ज्या तालुक्यात महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (एम.ए.सी.पी.) किंवा अन्य योजना, प्रकल्प अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या नाहीत अशा तालुक्यास या योजनेत प्राधान्य देण्यात येईल.  ज्या गटाचे प्रकल्प आराखडे सर्व अटी व शर्तीची पुर्तता करतील अशा गटांना प्राधान्य देण्यात येईल. ज्या शेतकरी उत्पादक गटाने गट शेती योजनेसाठी तयार केलेल्या सविस्तर आराखडयात (DPR) लागणारा निधी बँकींग प्रणाली च्या माध्यमातून मिळणार असल्याबाबतचा करार केला असेल अथवा घाऊक विपणन कंपन्यासोबत उत्पादन व विक्री व्यवस्थेच्या मुल्य साखळी बाबतचा करार केला असेल अशा शेतकरी उत्पादक गटास  यात प्रधान्य देण्यात येईल.

इच्छुक गटाने, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी कृषि विभागाच्या तालुका कृषि अधिकारी यांचेकडे प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शनासाठी संपर्क  साधावा, प्रकल्प आराखडा तयार करुन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दि.20 सप्टेंबर 2017 पुर्वी सादर करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, प्रकल्प संचालक आत्मा, केशव मालगुंडे यांनी केले आहे. 

"महाराष्ट्र वार्षिकी 2017" माहितीपूर्ण संदर्भ ग्रंथ सर्वांसाठीच उपयुक्त--जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे





उस्मानाबाद,दि. 11 :- महाराष्ट्र वार्षिकी 2017 हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आला असून या पुस्तकामध्ये महाराष्ट्राविषयी अधिकृत, वस्तुनिष्ठ व एकत्रित माहितीचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्राची  सर्वांगीण माहिती वाचनीय स्वरुपात देणारा परिपूर्ण ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. अन्य कोणीही सामान्य जिज्ञासू, अभ्यासक, नागरिकांनी जवळ बाळगावा, असा हा ग्रंथ आहे, असे मत जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले.  

महाराष्ट्र वार्षिकी हा ग्रंथ  नुकताच प्रकाशित झाला आहे. हा ग्रंथ जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांना अवलोकनार्थ दिला असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र वार्षिकी 2017 या ग्रंथात संपुर्ण राज्याची माहिती जी सर्वस्तरातील लोकांना उपयुक्त आहे. त्यात महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भूमी आणि लोक, शासनाचे सर्व विभागांची महत्त्वपूर्ण माहिती,  गत वर्षातील राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी,  तसेच सर्व जिल्ह्यांची थोडक्यात माहिती आणि महत्त्वाची माहिती या सदरात मंत्रिमंडळ, विधासभा, विधानपरिषद, राज्यपाल, मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्रीमंडळ, महत्त्वाचे निर्णय, योजना आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह हे या पुस्तिकेचे  मुख्य संपादक आहेत.

या पुस्तकाची किंमत 300/- (तीनशे रुपये) असून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद येथे हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे.   

महाराष्ट्र वार्षिकी 2017 या पुस्तकामध्ये महाराष्ट्राविषयी अधिकृत, वस्तुनिष्ठ व एकत्रित माहितीचा समावेश आहे. महाराष्ट्राची भूमी आणि लोक, राज्याची भौतिक वैशिष्ट्ये, भौगोलिक स्थिती, इतिहास, वन्यजीवन, संस्कृती, महाराष्ट्राविषयी सांख्यिकी स्वरुपाच्या बाबी, पर्यटन, उद्योग, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, रोजगार आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सांख्यिकी माहिती, वैशिष्ट्ये, शिक्षणसंस्था, सिंचन प्रकल्प, कृषी उद्योग, पर्यटन स्थळे आदी माहितीचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागांची सविस्तर माहिती, विभागांचे उद्देश व कार्य, रचना, महत्त्वाच्या योजना, संपर्क क्रमांक व मंत्रिमंडळ निर्णय, महत्त्वाच्या शासकीय घटना, घडामोडी, उपक्रम, कार्यक्रम, पुरस्कार, महाराष्ट्राची मानचिन्हे, महाराष्ट्रातील भारतरत्न व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर, राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यपाल तसेच विधिमंडळ सदस्य आणि केंद्रीय व राज्य मंत्रीमंडळ, देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान, राज्यातील लोकसभा व राज्यसभा सदस्य याबाबतच्या माहितीचाही समावेश आहे.

महाराष्ट्र वार्षिकी 2017 हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, शासकीय-निमशासकीय कार्यालये, अभ्यासक, ग्रंथालये, पत्रकार, राजकीय नेते, सामान्यज्ञानाची आवड असणारे सर्व वयोगटातील नागरिक यांना उपयुक्त आहे.