Saturday, 6 June 2026

संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा अनधिकृत पाणी उपशावर होणार कठोर कारवाई ; तालुकास्तरीय भरारी पथकांना साप्ताहिक अहवाल बंधनकारक

संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा अनधिकृत पाणी उपशावर होणार कठोर कारवाई ; तालुकास्तरीय भरारी पथकांना साप्ताहिक अहवाल बंधनकारक धाराशिव दि.६ जून (जिमाका) संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीमुळे जिल्ह्यात भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारचा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून,या पथकांनी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दर सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली १४ मे व २ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत संभाव्य एल निनो परिस्थितीच्या अनुषंगाने पाणीटंचाई,सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा,उपयुक्त जलसाठ्याची सद्यस्थिती तसेच चारा टंचाईसारख्या विषयांचा आढावा घेण्यात आला.या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत पर्जन्यमान कमी राहिल्यास आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवू शकते,अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा जतन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.कोणत्याही प्रकल्पातून अनधिकृत पाणी उपसा होणार नाही यासाठी तालुकास्तरीय भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये प्रामुख्याने नायब तहसीलदार,संबंधित महसूल मंडळ अधिकारी,संबंधित क्षेत्रातील तलाठी, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता, महावितरण कंपनीचे संबंधित अभियंता तसेच कार्यक्षेत्रातील पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. सिंचन प्रकल्पांतील पिण्याच्या पाण्यासह इतर कोणत्याही प्रयोजनासाठी अनधिकृत पाणी उपसा होणार नाही,याची दक्षता घेण्याच्या सूचना या पथकांना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने सर्व प्रकल्पांवर भरारी पथकांमार्फत नियमित भेटी देण्याचे आदेश दिले असून,अवैध पाणी उपसा आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.नागरिकांकडून तोंडी अथवा लेखी तक्रार,निवेदन,माहिती किंवा अर्ज प्राप्त झाल्यास त्यानुसार संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनधिकृत पाणी उपशाच्या प्रकरणांमध्ये पाटबंधारे अधिनियम १९७७ व केंद्रीय विद्युत कायदा २००३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.यामध्ये मोटार संच जप्त करणे,दंड आकारणी, वीजपुरवठा खंडित करणे तसेच फौजदारी गुन्हे दाखल करणे यांसारख्या कठोर उपाययोजनांचा समावेश आहे.अशा कारवाईचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मात्र,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी तालुकास्तरीय भरारी पथकांच्या स्थापनेचे आदेश, पथकांची रचना अथवा आजपर्यंत केलेल्या तपासणी व कारवाईचे अहवाल उपलब्ध झालेले नाहीत. ही बाब प्रशासनाने अत्यंत गंभीरपणे घेतली आहे.त्यामुळे आता प्रत्येक तालुकास्तरीय भरारी पथकाने अनधिकृत पाणी उपसा प्रकरणांवर केलेल्या कारवाईचा आवश्यक अहवाल,जीआयपी (Geo/GIP Tagging) सह छायाचित्रे,पंचनामे व अन्य पूरक कागदपत्रांसह दर सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच भविष्यात या कामकाजात कोणत्याही प्रकारची दिरंगाई,टाळाटाळ अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल,असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली असून, जिल्ह्यातील उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण व योग्य व्यवस्थापन यावर भर देण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्देशांमुळे सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा सुरक्षित राहण्यास मदत होणार असून अनधिकृत पाणी उपशाला आळा बसण्यास मदत होणार आहे. ******

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद धाराशिव दि.६ जून (जिमाका) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक गावात आला. जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार हे काल दि.५ जून रोजी रात्री तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौऱ्यासाठी उपस्थित होते. या दौऱ्यात तहसीलदार,गटविकास अधिकारी तसेच तालुका प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. गावात मुक्कामी थांबून जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ औपचारिक पाहणी न करता ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी,समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या.विशेषतः वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळे,तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या संवादातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक सुस्पष्ट विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने दिशा निश्चित करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहभागातून गावाचा विकास आराखडा अधिक प्रभावी व वास्तवदर्शी करण्यावर भर देण्यात आला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते सकाळी ८.३० या वेळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यामध्ये अधिकारी,कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन गाव परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला.त्यानंतर शिवार फेरी काढून शेतांमधील स्थितीचा आढावा घेण्यात आला.तसेच “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली. जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा केवळ प्रशासकीय पाहणीपुरता मर्यादित न राहता,प्रशासन थेट जनतेच्या दारात पोहोचल्याचा प्रत्यय देणारा ठरला.गावकऱ्यांशी झालेला थेट संवाद आणि प्रत्यक्ष सहभागातून प्रशासनाबाबतचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे ग्रामस्थांनीही व्यक्त केले. ****

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर १३ पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव धाराशिव,कळंब,भूम,वाशी आणि परंडा तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर १३ पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव धाराशिव,कळंब,भूम,वाशी आणि परंडा तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाराशिव दि.६ जून (जिमाका) संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे यंदाचा पर्जन्यमान लांबण्याची शक्यता व भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव,कळंब,भूम, वाशी आणि परंडा तालुक्यातील १३ पाटबंधारे प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केले आहेत. कार्यकारी अभियंता,धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक १ यांच्या अहवालानुसार,एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून संबंधित प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठा नागरिकांच्या पिण्याच्या गरजांसाठी सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आदेशानुसार धाराशिव तालुक्यातील अंबेहोळ साठवण तलाव प्रकल्प, उपळा साठवण तलाव क्रमांक १, उपळा साठवण तलाव क्रमांक ३ आणि शेकापूर साठवण तलाव प्रकल्प,कळंब तालुक्यातील कोठेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प आणि चोराखळी साठवण तलाव प्रकल्प,भूम तालुक्यातील नांदगाव साठवण तलाव प्रकल्प, बारगाव प्रकल्प आणि जांब लघु पाटबंधारे प्रकल्प,वाशी तालुक्यातील बोरगाव बृहत लघु पाटबंधारे प्रकल्प आणि ई-याचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प, तसेच परंडा तालुक्यातील वाटेफळ साठवण तलाव प्रकल्प आणि साकत मध्यम प्रकल्प यांतील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,संबंधित प्रकल्पांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नसल्याने या जलस्रोतांमधून अवैध पाणी उपसा होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा तातडीने बंद करून उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्याच्या वापरासाठी जतन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही विचार करून संबंधित प्रकल्पांतील उपलब्ध पाणी राखीव ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.उपलब्ध जलसाठा अधिकाधिक काळ टिकून राहावा आणि नागरिकांना दीर्घकाळ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, धाराशिव,कळंब,भूम,वाशी आणि परंडा तालुक्यातील वरील १३ पाटबंधारे प्रकल्पांमधील सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्यासाठी आरक्षित राहणार असून,या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. *****

Friday, 5 June 2026

ागतिक पर्यावरण दिन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे वृक्षारोपण व निसर्ग संवर्धनाचा संदेश

जागतिक पर्यावरण दिन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे वृक्षारोपण व निसर्ग संवर्धनाचा संदेश धाराशिव दि ५ जून (जिमाका ) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या वतीने आज ५ जून,२०२६ रोजी न्यायिक अधिकारी निवासस्थान परिसर,धाराशिव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.याच परंपरेला अनुसरून या वर्षीही भव्य वृक्षारोपण मोहीम राबवून विविध झाडे लावण्यात आली.तसेच उपस्थितांना व नागरिकांना मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व आणि निसर्ग संवर्धनाची गरज याविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती.अभिश्री देव यांच्या हस्ते रोपटे लावून करण्यात आली.या प्रसंगी श्री.ए.एस.आवटे,जिल्हा न्यायाधीश श्री.आर.के.खोमणे,जिल्हा न्यायाधीश,श्री.एन.एल.येवलेकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश उस्मानाबाद,श्री.विश्वास करे, विभागीय वन अधिकारी,धाराशिव, श्रीमती.भाग्यश्री पाटील,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, उस्मानाबाद,श्री.दिपक गांधले,वन परीक्षेत्र अधिकारी,धाराशिव, श्रीमती.पी.व्ही.मेढे,मुख्य न्यायदंडाधिकारी,उस्मानाबाद, श्री.एस.एस.पाटील,सहदिवाणी न्यायाधीश व वरिष्ठ स्तर, उस्मानाबाद,तसेच श्री.एस.एस. पाटील,७ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,उस्मानाबाद यांची प्रमुख उपस्थिती होती. वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील कर्मचारी,विद्युत आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. ******

Thursday, 4 June 2026

जागतिक सायकल दिन २०२६ निमित्त ‘संडे ऑन सायकल’ अभियानांतर्गत ७ जून रोजी सायकल रॅली

जागतिक सायकल दिन २०२६ निमित्त ‘संडे ऑन सायकल’ अभियानांतर्गत ७ जून रोजी सायकल रॅली धाराशिव दि. ४ जून (जिमाका) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव, खो-खो खेलो इंडिया सेंटर व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिवस २०२६ निमित्त आयोजित “संडे ऑन सायकल” या अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन धाराशिव येथे दि.७ जून २०२६ रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.या रॅलीमध्ये खेलो इंडिया सेंटर,क्रीडा भारती,श्रीपतराव भोसले हायस्कूल,छत्रपती शिवाजी विद्यालय येथील खेळाडू व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. “संडे ऑन सायकल”अभियानांतर्गत आयोजित या सायकल रॅलीत धाराशिव शहरातील युवक,युवती,खेळाडू तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन श्रीकांत हरनाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे. सायकल रॅलीचा मार्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) येथून सुरू होऊन गरड हॉस्पिटलपासून उजवीकडे वळण घेऊन देशमुख हॉस्पिटल,एचडीएफसी बँक,महात्मा फुले चौक मार्गे श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे रॅलीचा समारोप (विसर्जन) होणार आहे. *****

Wednesday, 3 June 2026

निर्भय,नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांचे निर्देश

निर्भय,नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांचे निर्देश धाराशिव,दि.३ जून (जिमाका) उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणूक २०२६ साठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे.निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करून ही निवडणूक निर्भय,नि:पक्षपणे आणि मुक्त वातावरणात पार पडेल याची दक्षता घ्यावी,असे निर्देश निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बुधवारी (दि.३) विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, संतोष राऊत,श्रीमती.स्वाती शेंडे,श्रीमती. अरुणा गायकवाड,धाराशिव उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,पोलीस निरीक्षक अमोघ भुजबळ उपस्थित होते.तसेच ऑनलाइन पद्धतीने बीडच्या प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके,लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके,बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे सहभागी होते. बैठकीत मार्गदर्शन करताना श्री.बोरकर म्हणाले की,राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी या निवडणुकीत सूक्ष्म निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.त्यामुळे तीनही जिल्ह्यांतील सूक्ष्म निरीक्षकांच्या याद्या मागवून घ्याव्यात.मतदान साहित्य वितरण व स्वीकृती केंद्राचे काम योग्य प्रकारे पार पाडावे.मतपेट्या सुरक्षितपणे मतदान केंद्रावर पोहोचविणे तसेच मतदानानंतर सीलबंद मतपेट्यांची वाहतूक कडक सुरक्षा व्यवस्थेत करावी.या प्रक्रियेत कोणतीही उणीव राहणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.असे ते म्हणाले. मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रियेची वेळोवेळी माहिती संकलित करण्यात यावी असे सांगून श्री.बोरकर म्हणाले की, मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्यात यावे.मतदान केंद्र तहसील कार्यालयात असल्याने दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था उपलब्ध असावी,असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी.आचारसंहितेच्या अंमलबजावणीत दक्ष राहून काम करावे.प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे नि:पक्षपाती राहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे,असेही श्री.बोरकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले की,सर्व मतदान पथकांना तीनही टप्प्यांतील प्रशिक्षण व्यवस्थित व परिपूर्ण पद्धतीने देण्यात यावे.तसेच आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांनी निवडणुकीची माहिती देताना सांगितले की,या निवडणुकीत उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे ६३ व लातूर जिल्हा परिषदेचे ६९ असे एकूण १३२ मतदार आहेत.लातूर महानगरपालिकेचे ७७ मतदार,बीड जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे ३०४,लातूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे २२१ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे २५४ असे एकूण ७७९ मतदार आहेत. जिल्हा परिषद,महानगरपालिका आणि नगरपालिका/नगरपंचायतींचे मिळून एकूण ९८८ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.बीड जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली नसल्यामुळे त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य मतदार म्हणून नसल्याची माहितीही त्यांनी दिली. या बैठकीला लातूर आणि बीड जिल्ह्यांतील निवडणुकीशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. ******

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी मिलिंद बोरकर निवडणूक निरीक्षक

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी मिलिंद बोरकर निवडणूक निरीक्षक धाराशिव दि.२ जून (जिमाका) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणूक -२०२६ अंतर्गत उस्मानाबाद- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून श्री.मिलिंद बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भारत निवडणूक आयोगाच्या १ जून २०२६ पत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोग,नवी दिल्ली यांच्या दि.१८ मे २०२६ रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.त्यानुसार उस्मानाबाद- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून श्री.मिलिंद बोरकर (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारसंघाशी संबंधित बाबींकरिता त्यांच्याशी मोबाईल क्रमांक ९९३०९९८९६९ वर संपर्क साधता येणार आहे.निवडणूक निरीक्षक श्री.मिलिंद बोरकर यांच्या राहण्याची व्यवस्था धाराशिवजवळील शिंगोली येथील सर्किट हाऊसमध्ये करण्यात आली आहे. *****

जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळा संभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळा संभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश धाराशिव,दि.२ जून (जिमाका) संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सार्वजनिक व खासगी विहिरी, हातपंप तसेच रिचार्ज शाफ्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर भूगर्भात पाणीसंचयन होईल अशा पद्धतीने ‘जलतारा खड्डे’ तयार करावेत.तसेच सार्वजनिक इमारतींवरून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी भूजल पुनर्भरणासारखे उपक्रम राबवून जलस्रोत बळकट करावेत.पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करून त्याचा अपव्यय टाळावा,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी आज मंगळवारी (दि.२ जून) त्यांच्या दालनातून संभाव्य अल निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई व चारा उपलब्धतेबाबत आयोजित आढावा बैठकीत हे निर्देश दिले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात,नगरपालिका प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त त्र्यंबक ढेंगळे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.डी.एम.मुळे,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ वैज्ञानिक आर.व्ही.मांजरमकर, धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एन.मदने,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम.कटकधोंड,मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक दोन (उमरगा) चे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे,धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे,जिल्हा परिषद यांत्रिकी विभागाचे उपअभियंता एस.पी.शिंदे उपस्थित होते.तसेच सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,पुढील वर्षीही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.त्यामुळे आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.सिंचन प्रकल्प परिसरातील गावांमध्ये पाण्याची पातळी समाधानकारक असल्यास विनाकारण विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करू नयेत.तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून ज्या विहिरी पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत,त्यांची प्रत्यक्ष गरज तपासावी. ग्रामपंचायतींनी स्वतःचे जलस्रोत सक्षम करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. तसेच सिंचन प्रकल्पांतील पाणी परिसरातील गावांच्या पिण्याच्या गरजांसाठी अधिग्रहित करण्याची कार्यवाही करावी,असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी ‘जलतारा खड्डे’ हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्याचे निर्देश देत श्री.पुजार म्हणाले की,सुधारित टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात यावा. विहिरींमधील गाळ काढणे,त्यांची दुरुस्ती तसेच हातपंप दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत.शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील विहिरींजवळ व शेतात जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सार्वजनिक आणि खासगी इमारतींवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संचयन करण्यासाठी भूजल पुनर्भरणाची कामे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन करावीत.पाणीपुरवठा योजनांमधील गळती तातडीने थांबवावी. तसेच सिमेंटच्या पोत्यांत रेती भरून नदी-नाल्यांतील वाहते पाणी अडवून त्याची भूगर्भात साठवण करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून पुढाकार घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनीही पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींची तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी तसेच शेतकऱ्यांना जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे सांगितले. बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम.कटकधोंड यांनी माहिती दिली की,सध्या धाराशिव तालुक्यातील सात गावांना ११ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ५२ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.तुळजापूर तालुक्यात नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.भूम तालुक्यातील दहा गावांसाठी २२ विहिरी तसेच चार गावांसाठी पाच खासगी टँकर कार्यरत आहेत.याशिवाय १५ गावांसाठी १६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात एकूण ११ गावांना १६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ६५ गावांसाठी ९९ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी सांगितले की,धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक एक व दोन अंतर्गत एकूण २२६ प्रकल्प आहेत.त्यामध्ये एक मोठा,१७ मध्यम आणि २०८ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.या सर्व प्रकल्पांमध्ये ७२८.८० दलघमी उपयुक्त पाणीसाठा क्षमता असून २९ मे २०२६ अखेर १२०.७४२ दलघमी म्हणजेच १६.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.डी.एम.मुळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात ७ लाख ९० हजार ३९९ इतके पशुधन असून त्यासाठी दररोज ३ हजार ८९ मे.टन वैरण आवश्यक आहे. उपलब्ध व संभाव्य वैरण साठा ४ लाख ६३ हजार ३५० मे.टन असून तो ऑक्टोबर २०२६ पर्यंत पुरेल इतका आहे. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून ५० हजार किलो संकरित मका बियाण्यांचे वितरण करण्यात आले असून त्यातून सुमारे २ लाख ५० हजार मे.टन चारा उत्पादन अपेक्षित आहे.तसेच विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत ५,२२० किलो संकरित मका बियाणे ५२२ पशुपालक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले असून त्यातून २६ हजार १०० मे. टन चारा उत्पादन अपेक्षित आहे. एकूण ५५ हजार २२० किलो संकरित मका बियाणे १३ हजार २२ पशुपालकांना वितरित करण्यात आले असून त्याची लागवड १३ हजार ८०५ एकर क्षेत्रावर करण्यात येत आहे.यामधून सुमारे २ लाख ७६ हजार १०० मे.टन चारा उत्पादन होण्याची अपेक्षा असल्याची माहिती डॉ.मुळे यांनी दिली. बैठकीत ऑनलाइन सहभागी झालेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व कामांचा आढावाही सादर केला ******

उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित

उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित धाराशिव दि.३ जून (जिमाका) उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी विविध विभागांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेतील विविध कामकाजांचे समन्वय,आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी,कायदा व सुव्यवस्था, मतदान,मतमोजणी,निवडणूक साहित्य वितरण,माध्यमांचे संनियंत्रण तसेच विविध परवानग्यांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे आदर्श आचारसंहिता (एमसीसी) नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे हे निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतील.यांच्याकडे नामनिर्देशन स्वीकृती कक्ष,कायदा व सुव्यवस्था,वाहन व्यवस्था जबाबदारी सोपविण्यात आली आहे.उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख हे मतमोजणी कक्ष तयार करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून कार्यरत राहतील. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे यांच्याकडे मतदान अधिकारी व कर्मचारी व्यवस्थापन कक्षाची जबाबदारी आहे.उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अरुणा गायकवाड या अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कक्षाच्या नोडल अधिकारी म्हणून कार्य पाहतील. उपजिल्हाधिकारी (मध्यम प्रकल्प) संतोष राऊत यांच्याकडे निवडणूक साहित्य वितरण व स्ट्राँगरूम व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीणकुमार धरमकर हे मतपत्रिका छपाई व वितरणाचे कामकाज पाहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्याकडे अवैध दारू वाटप प्रतिबंध कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे हे माध्यम व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) तसेच मीडिया व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत राहतील.तसेच तहसीलदार (संगायो) दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे विविध परवानग्या व चौकशी कक्ष (एक खिडकी योजना) यांची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा वेळेत व नियमांनुसार पार पडावा,तसेच संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय राहावा यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व नोडल अधिकारी आपापल्या जबाबदाऱ्यांची प्रभावी अंमलबजावणी करणार असून निवडणूक प्रक्रिया निर्भय,निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. *****