Friday, 5 May 2017

ग्रामसंपर्क अधिकाऱ्यांनी पालक या नात्याने गावाशी नाळ जोडा –डॉ.पुरुषोत्तम भापकर









                                                                                            
उस्मानाबाद.दि.4:- ग्रामस्तरावर ग्राम संपर्क अधिकारी हा त्या गावाचा पालक अधिकारी असल्याने त्या गावातील सर्व विकासात्मक कामांची जबाबदारी त्यांच्यावर असून त्याची गावाशी नाळ जोडली गेली पाहिजे, असे डॉ. भापकर यांनी सांगितले.गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना राबवून जमिनीची पोत वाढवून  शेतीला सुपीक बनवा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी आज येथे केले.
जिल्हयातील कृषी, ग्रामीण, महसूल,सिंचन,आरोग्य,बांधकाम, शिक्षण या विभागाच्या ग्रामस्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंतच्या  विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह,नगरपरिषद उस्मानाबाद येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील,अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक,विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त डॉ.विजयकुमार फड, श्री.पारस बोथ्रा,श्री.पटवारे,श्री. कुंभार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,प्रभोदय मुळे,अरविंद लाटकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,उपविभागीय अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, सर्व कृषी सहाय्यक, सर्व ग्रामसेवक, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, सर्व मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत असे विविध विभागांचे प्रमुख व त्यांचे सहाय्यक अधिकारी आदींची उपस्थिती होती.
यावेळी  पुढे बोलताना डॉ. भापकर म्हणाले की, मनरेगा च्या योजना राबविण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य मागे आहे,त्यामुळे मनरेगा योजनेची अमंलबजावणी ग्रामस्तरावर मोठया प्रमाणात होणे गरजेचे आहे.महाराष्ट्राने मनरेगाच्या बाबतीत देशाला  दिशा देण्याचे काम केले आहे.परंतु आज खर्चाच्या बाबतीत इतर राज्याच्या मानाने आपले राज्य मागे आहे.मनरेगावर राज्यात जेवढा खर्च होतो त्यातील सर्वात जास्त मराठवाडयात होणे गरजेचे आहे, कारण या भागाची ती आवश्यकताच आहे. मनरेगा अंतर्गत महाराष्ट्र शासनाने स्वतंत्रपणे समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना सुरु केली असून ह्या अकरा कलमी कार्यक्रमांतील मागेल त्याला शेततळे, वृक्षरोपण, वृक्षसंवर्धन, जलयुक्त , कर्ज पुनर्गठन, स्वच्छता मोहीम आदि वैयक्तिक लाभाचे उपक्रम हाती घेतले असून याअंतर्गत 80 टक्के लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले.
कृषी विभागात, सामाजिक वनीकरण, वन विभाग या विभागांना रोहयोची कामे सुरु करण्याचे प्रशासकीय व तांत्रिक अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ह्या सर्व विभागांनी मोठ्या प्रमाणावर रोहयोची कामे हाती घेणे आवश्यक असल्ल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनरेगाची कामे सरपंचापासून ते उपजिल्हाधिकारीपर्यंत सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी पूर्ण करावीत.योग्य नियोजन करावे, 100 टक्के उद्दिष्ट साध्य करावे, नाहीतर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,असा सज्जड इशाराही  डॉ. भापकर यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या या आढावा बैठकीत डॉ.भापकर यांनी मागेल त्याला शेततळे,जलयुक्त शिवार अभियान,वृक्षारोपण,स्वच्छ भारत मिशन,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान,7/12 संगणकीकरण,स्वस्त धान्य दुकानाच्या ईपॉज मशिन व ईपीडीएस यासंबंधीचा तपशिलवार आढावाही घेतला.
या कार्यशाळेत उपायुक्त डॉ.विजयकुमार फड तसेच श्री. पारस बोथ्रा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हयात विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात लोहारा  तालुका  हागणदारीमुक्त  करून  जिल्हयातील  पहिला  तालुका  ठरला याबद्दल  गट विकास अधिकारी क्रांती बोरटे यांचा ,चालू महिन्यात सुमारे 400 शौचालये  बांधकाम  एकाच  वेळी  सुरू  करून जिल्हयात उत्कृष्ट  काम  करीत असल्यामुळे  गट विकास अधिकारी  श्री. चकोर यांचा ,याशिवाय लोकसहभागातून 5 हजार 222 वनराई बंधारे जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी पूर्ण करून आपलाच पूर्वीचा  जिल्हा विक्रम मोडीत काढला, त्यात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने उत्कृष्ट काम केल्याबद्दल  कार्यकारी अभियंता श्री. जगताप यांचा ,यानंतर जिल्हयातील 621 ग्रामपंचायतीपैकी 619 ग्रामपंचायतीने  लेखा  परिक्षणासाठी  वेळेवर  अभिलेखे  उपलब्ध करून  दिले व  विभागात  जिल्हा  अव्वल राहिला   याकरिता   ग्रामसेवक  संघटनेचे  श्री. तांबोळी ,जलयुक्त शिवार अभियानामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल कृषी सहाय्यक नवनाथ अलमले  यांचा समावेश होता.

कार्यशाळेच्या उदघाटनानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी प्रास्ताविक केले तर शेवटी आभार अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी मानले.

Thursday, 4 May 2017

तुळजापूर नगरपरिषदेस 'क' वर्गातून उत्कृष्ट नगरपरिषद पुरस्कार प्राप्त


उस्मानाबाद.दि.4:- नगर विकास दिनानिमित्त औरंगाबाद (मराठवाडा) विभागातून "क" वर्ग नगरपरिषदेमधून एक उत्कृष्ट नगरपरिषद म्हणून तुळजापूर नगरपरिषदेची निवड प्रथम झाली असून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मानपत्र,पुरस्कार आणि 2.5 कोटी निधीचा धनादेश तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. पंडितराव जगदाळे आणि मुख्याधिकारी श्री. राजीव बुबने यांनी स्वीकारला.   

विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन


उस्मानाबाद.दि.4:- विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.5 मे 2017 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हयातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह,नगरपरिषद उस्मानाबाद येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
          खरीप हंगामाबरोबरच राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रम व योजनांचे दि.31 मे 2017 अखेर पर्यंत नियोजन करुन प्रत्यक्ष अंमलबजावणी करणेबाबत  या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध प्रशासकीय विभागा्रच्या कामकाजाचा आढावाही घेण्यात येणार आहे.
          या कार्यशाळेत जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी,उप विभागीय कृषी अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, सर्व कृषी सहाय्यक, सर्व ग्रामसेवक, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, सर्व मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत असे विविध विभागांचे प्रमुख व त्यांचे सहाय्यक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उस्मानाबाद नगरपरिषदेला उत्कृष्ट नगरपरिषद पुरस्कार



उस्मानाबाद.दि.4:- राज्याच्या पहिल्या नगर विकास दिनानिमित्त उस्मानाबाद नगरपरिषदेला शासनाच्या नगरविकास विभागामार्फत उत्कृष्ट नगरपरिषद पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे देण्यात आला.
            मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उस्मानाबाद नगरपरिषदेला उत्कृष्ट नगरपरिषद पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी स्वीकारला.यावेळी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
            उस्मानाबाद नगरपरिषदेला 'अ'वर्ग नगरपालिकेमध्ये औरंगाबाद विभागात प्रथम पुरस्कार मिळाला असून या पुरस्काराचे स्वरूप चार कोटी रुपये व सन्मानपत्र असे आहे.                                              

            शासनाच्या नगरविकास विभागामार्फत राज्याचा पहिला नगरविकास दिन म्हणून 20 एप्रिल ला साजरा केला जात आहे, त्यानिमित्त हा पहिला पुरस्कार देण्यात आला आहे.

उमरगा तालुक्यातील जयभवानी नगरचे महसूली गावात रूपांतर


उस्मानाबाद.दि.4:- दि.7 एप्रिल 2017 पासून उस्मानाबाद जिल्हयाच्या उमरगा तालुक्यातील मुळज या महसूली गावातील सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या उस्मानाबाद जिल्हयाच्या उमरगा तालुक्यातील जय भवानी नगर नावाने ओळखण्यात येणाऱ्या महसूली गावात रूपांतर करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

        अधिसूची पुढीलप्रमाणे भूमापन क्रमांक/स.न.- 32, 33/1, 33/3, 34, 35,36,37,38/1,38/2,38/3,38/4,38/5,38/6,38/7, 38/8, 39, 40/1, 40/2,40/3,40/4,41,42/1,42/2,42/3,42/4,43/1,43/2,43/3,43/4,44,45,117/1,117/2,118/1,118/2/1,118/2/2,119/1/1,119/1/2,119/1/3,119/2,120/1/1,120/1/2,120/2,121,122/1,122/2,123,124/1,124/2,124/3,124/4,125/1,125/2,125/3,125/4,126/1,126/2,126/3,126/3,126/4,127/1,127/2,127/3,127/4,128/1,128/2,128/3,128/4,129/1/1,129/1/2,129/1/3,129/2/1,129/2/2,129/2/3,129/2/4,130/1,130/2,130/3,131/1,131/2,132,133,133/1/1,133/1/2,133/1/3,133/2,133/3,133/4,134,135/1,135/2,135/3,135/4,136/1/1,136/1/2,136/3,136/4/1,136/4/2,136/5/1,136/5/2,137/1,137/2/1,137/2/2,138/1,138/2/1,138/2/2,138/2/3,139/1/1,139/1/2. 

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी आचारसंहिता प्रमुखांची नियुक्ती


उस्मानाबाद.दि.4:- माहे जून ते सप्टेंबर 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच विभाजनामुळे अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी घोषित केलेला आहे.त्यानुसार संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी यांची आचारसंहिताप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे  जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

        संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या  अधिनस्त ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी तसेच राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी वेळोवेळी दिलेले निर्देश,आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करावी, संबंधित तहसिलदार यांना निवडणूक कामी योग्य ते सहकार्य करावे, असेही कळविण्यात आले आहे.

Wednesday, 3 May 2017

नूतन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला उस्मानाबादचा कार्यभार



उस्मानाबाद,दि.3:- उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्ण गमे यांनी बुधवार दि.३ मे 2017  रोजी  प्रभारी  जिल्हाधिकारी  श्री. अविनाश  पाठक  यांच्याकडून  पदभार स्वीकारला.

         यावेळी  जिल्हाधिकारी  कार्यालयातील  अधिकारी, कर्मचारी तसेच इतर विविध विभागांच्या कार्यालयप्रमुखांनी जिल्हाधिकारी श्री. गमे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी जिल्हयातील काही महत्त्वाच्या विषयांवर विविध विभागप्रमुखांशी  प्राथमिक चर्चाही  केली.

Tuesday, 2 May 2017

ईटकूर येथे कंर्पाटमेंट बंडिंग कामाचे पालकमंञी दिवाकर रावते यांच्या हस्ते उदघाटन


उस्मानाबाद.दि.३०:- जलयुक्त शिवार अभियानांर्तगत कामाची पाहाणी दौऱ्या दरम्यान कळंब तालुक्यातील ईटकूर येथे कंर्पाटमेंट बंडिंग कामाचे उदघाटन पालकमंञी दिवाकर रावते व ईटकूर चे सरपंच अभिमान अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले.
आपसिंगा (ता.तुळजापूर), ढोकी (ता.उस्मानाबाद), ईटकूर (ता.कळंब) आदी गावात  केलेल्या कामाची पाहणी परिवहन,खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंञी दिवाकर रावते यांनी केली, 

          यावेळी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड,माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळर,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील,प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते आदीची उपस्थिती होती.

पाथर्डी येथील एटीएम आरओ प्लँटचे लोकार्पण



उस्मानाबाद.दि.30:- कळंब तालुक्यातील पाथर्डी येथे ग्रामपंचायत मार्फत सुरु केलेल्या एटीएम आरओ प्लँटचे उदघाटन व लोकार्पण परिवहन,खारभूमी विकास मंञी तथा पालकमंञी श्री. दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले.
         यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंञी श्री.रावते यांच्या हस्ते हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कन्यारत्न स्वागत योजनेंतर्गत या वर्षी जन्मलेल्या मुलींच्या नावे  मुदत ठेव प्रमाणपत्राचे स्वप्निल पिंगळे, सुरेकांत पिंगळे, रेवननाथ काकडे, यशवंत जाधव, अंकुश पवार, बालाजी पिंगळे आदीना वाटप करण्यात आले.
       पालकमंञी श्री.रावते यावेळी म्हणाले की, हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कन्यारत्न स्वागत योजना ही मुलीच्या जन्माचे स्वागत करणारी योजना असून ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील.

        यावेळी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील,प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंनद रायते,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकणे,विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, तहसिलदार अशोक नांदलगावकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल खोचरे, उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे,सरपंच रंजनाताई पिंगळे आदी उपस्थित होते.

शटल बस सेवा राज्यात सर्वत्र सुरु करणार - परिवहन मंत्री दिवाकर रावते




उस्मानाबाद दि.३०:- शटल बस ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यात सर्वच मार्गावर दर वीस,तीस व लांब पल्ल्याच्या मार्गावर ४५ मिनिटांनी शटल बस सुरु करण्यात येतील, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा पालकमंञी दिवाकर रावते यांनी दिली.वाशी येथील बस स्थानकाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
           महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागांतर्गत येणाऱ्या वाशी येथील बस स्थानकाचे उदघाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळर ,ज्ञानेश्वर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल खोचरे,प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,एसटी महामंडळाचे औरंगाबाद विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्री.पठारे,  विभाग नियंत्रक राजीव साळवे, विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल गोंजारी आदीची प्रमुख उपस्थिती होती. 
        यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री. रावते म्हणाले की, ६६ वर्षापासून चालत आलेली एसटी ची पूर्वापार परंपरा मोडीत काढून नवीन कृती आणायची आहे, यासाठी एसटी बसचा रंग बदलला जाणार, ग्रामीण भागात शिवशाही ही वातानूकुलित बस सेवा सुरु करण्यात येणार,कर्मचाऱ्यांचा ड्रेस बदलणार असून हळूहळू परिर्वतन होणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बसस्थानकाला अत्याधुनिक रुप देण्यासाठी ५० स्थापत्यशास्त्रज्ञांची  नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगितले.

         चालक,वाहकांना आगाराच्या ठिकाणीच निवासस्थान,कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद, पुणे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अभियांत्रिकी महाविद्यालयय आदी योजना हाती घेण्यात आल्या असून कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करणार असल्याच्या त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला.

Monday, 1 May 2017

उन्नत शेती, समृद्ध शेतकरी" गावपातळीवर प्रभावीपणे राबविणार
                                               -पालकमंत्री दिवाकर रावते

उस्मानाबाद,दि.1:- पालकमंत्री या नात्याने मी स्वत:आणि जिल्हाधिकारी आम्ही मिळून जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करुन उन्नत शेती,समृद्ध शेतकरी हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवू,असे प्रतिपादन परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज केले.
                         
                          महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57 वा वर्धापनदिन आज जिल्हयात सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हयात विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. येथील पोलीस संचलन मैदानावरही सकाळी 8 -00 वाजता पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.
      
       भाषणाच्या प्रारंभी श्री.रावते यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी ते स्वतऱ्‍ साक्षीदार असल्याचे सांगून आपल्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे.  देशाचा विकास असो वा धार्मिक सुधारणा, सामाजिक सुधारणा असोत यांचा इतिहास प्रेरणादायी आहे असे सांगितले.

पालकमंत्री श्री. रावते पुढे म्हणाले की, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संताच्या मांदियाळीने महाराष्ट्रीय मनाचे संवर्धन, पोषण केले.सामाजिक विचार सुदृढ करण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी अपार कष्ट घेतले.देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत असतानाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तिशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुद्धीवादी, लेखक, पत्रकार यांची मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पना मांडली.  एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, कॉ. डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेकजण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.
          याप्रसंगी श्री. रावते यांनी मराठवाड्यास निजामाच्या राजवटीतून मुक्त होवून 68 वर्षे झाली. यासाठी ज्या थोर स्वातंत्र्यसैनिकांनी आपले आयुष्य पणास लावले अशा सर्वांचे आभार मानले.
पालकमंत्री श्री.रावते यांनी हा जिल्हा जरी दुष्काळग्रस्त, मागासलेला आणि आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जात असला तरी निसर्गाची मागील वर्षी झालेली  कृपा   आणि प्रशासन व जनतेने मिळून केलेले जलयुक्त शिवारचे काम यामुळे यावर्षी आपणास दुष्काळाची निश्चितच भीती नाही.यावर्षी वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि आपण सर्व मिळून राज्यात 4 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी अभियानामध्ये सक्रिय सहभागी होवू या असे आवाहन करून या  जिल्हयाची दुष्काळग्रस्त जिल्हा ही ओळख  निश्चितच  बदलेल असा विश्वास  व्यक्त केला.
 ते पुढे म्हणाले,दुर्दैवाने शेतकरी आत्महत्याग्रस्त ही या जिल्ह्याची ओळख आहे.  मात्र राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून येत्या काही काळातच पालकमंत्री या नात्याने मी व्यक्तीश: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनातील निराशा, दु:ख दूर करण्यासाठी जातीने विशेष लक्ष देणार आहे.त्याची सुरूवातही मी कालच्याच दौऱ्यापासून केलेली आहे. या दौऱ्यात मी व्यक्तिश: अनेक शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. या जिल्हयातील शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी समजून घेवून, अभ्यासून कृषी, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रांवर विशेष भर देत आणि पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून अधिकाधिक सकारात्मक, विकासात्मक काम कसे करता येईल यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचा मी सतत पाठपुरावा करणार आहे.  शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न नेटाने केले जातील,असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री. रावते यांनी शेती क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सन 2017-18 या खरीप हंगाम वर्षा उत्पादकता वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट असून त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन, सर्वांनी शेतकऱ्यांची सेवा म्हणून काम करण्याचा संकल्पच शासनाने केला आहे,असे यावेळी सांगितले.
राज्याचा नियोजनबद्ध  कृषी आराखडा कृषी, सहकार विभागाने तयार केला आहे. गेल्या वर्षी 40 हजार कोटी रुपयांनी शेती क्षेत्रातील उत्पन्न वाढले असून यावर्षीचे कृषी उत्पादन गेल्या बारा वर्षापेक्षा अधिक झाले आहे. यावर्षी कृषी विकास दर 12.50 टक्के आहे. याबद्दल शेतकऱ्यांचे भार मानून श्री.रावते यांनी सांगितले की,यावर्षी कर्जाचे नियोजन करताना स्टेट फोकस पेपर प्रकाशित केला आहे. 30 ते 31 लाख शेतकरी हे कर्जाच्या परिघाबाहेर गेले आहेत त्यांनाही कर्जपुरवठा झाला पाहिजे यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने नियोजनबद्ध आराखडा करुन प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करुन देता येईल, असे नियोजन भविष्यात केले जाणार आहे.

मी स्वत: पालकमंत्री या नात्याने आणि जिल्हाधिकारी आम्ही मिळून आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करुन उत्पादकता वाढविणे हे उद्दिष्ट समोर ठेवून उन्नत शेती, समृद्ध शेतकरी हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवू तसेच शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांची निर्मिती करुन गाव पातळीवर समूह तयार करुन त्यांना कृषी भांडवल उपलब्ध करुन देवू,असे ते म्हणाले.

यावेळी श्री. रावते यांनी यावर्षीसुध्दा जलयुक्त शिवार, शेततळी, विहिरीची कामे मिशन मोड म्हणून युद्धपातळीवर करण्यात येतील, त्यासाठी आवश्यक तो निधीही उपलब्ध करुन देण्यात येईल. शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सर्व जिल्हावासियांना केले.

ते पुढे म्हणाले ,या वर्षामध्ये पावसाचे व हवामानाचे पूर्वानुमान, बी-बियाणे, खते व औषधी पतपुरवठा, वीज जोडणी व कृषी सिंचन, कृषी पणन, कृषी माल साठवणूक या महत्वाच्या विषयांवर आणि प्रोत्साहनपर योजनांबाबत विविध विभागांचे नियोजन मांडण्यात येते ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. राज्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून त्यामुळेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधेत वाढ झालेली आहे. समाधानकारक पाऊस  व बियाण्यांची उपलब्धता यामुळे सन 2016-17 मध्ये भरघोस उत्पादन झाले आहे. उत्पादित माल खरेदी करण्यात काही मर्यादा आलेल्या होत्या, मात्र शासनाने लक्ष ठेवून योग्य तोडगा काढलेला आहे.कालच आपण कळंब येथील तूर खरेदी केंद्राचे उदघाटनही केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

शासनाच्या सर्वच विभागाकडून  योजनांचा प्रचार प्रसार व जनतेमध्ये त्याबाबतची जागृती याकरिता विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाईल.नुकतेच जिल्हा परिषदेकडून ग्रामविकास लोक अदालतही आयोजित करण्यात आली होती.  त्यालाही जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला.  अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल जिल्हा परिषदेचेही श्री. रावते यांनी अभिनंदन केले.
          याप्रसंगी शासनाचे मुखपत्र लोकराज्य हे मासिक सर्वांनी वाचावे, लोकराज्यच्या माध्यमातून, महान्यूज या शासकीय वेबपोर्टलच्या माध्यमातून जनतेने शासनाच्या योजनांची जास्तीत जास्त माहिती अभ्यासावी, असे आवाहनही त्यांनी  सर्वांना केले.
          जिल्हयात धान्य महोत्सव,बेटी बचाओ बेटी पढाओ,निर्भया दिदी,निर्भया पथक,कडबाकुट्टी यंत्राचे विक्रमी वाटप,महाआरोग्य शिबिर,आधार ॲट बर्थ,ई ब्लड बॅंक यासारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे.जिल्हयातील सातबारा उताऱ्यांचे डिजिटायजेशनचे कामही जवळपास 95 ते 96 टक्के पूर्ण झाले आहे.जिल्हयात गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रणात ठेवल्याबद्दल श्री. रावते यांनी सर्व प्रशासनाचे विशेष कौतुक केले व त्यांनी या जिल्हयात स्व.हिंदूह्दयम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्या रत्न स्वागत योजना व मुदत ठेव प्रमाणपत्र हा उपक्रमही उत्तम प्रकारे राबविला जात असून पाथर्डी येथे झालेल्या कार्यक्रमाचा उल्लेख करून असा उपक्रम राज्यभर राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले.
आज पालकमंत्री श्री.दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण होताच पोलीस दलाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. त्यानंतर पोलीस दलाने महिला व पुरुषांचे पथक, गृहरक्षक दल, शीघ्र कृती दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक आदी पथकाच्या संचलनाची मानवंदना पालकमंत्री रावते यांनी स्वीकारली.
 संचलनात विविध विभागाचे आकर्षक चित्ररथही सहभागी झाले होते. संबंधित विभागाच्या योजनाची माहिती दर्शविणारे हे चित्ररथ लक्ष वेधून घेत होते. यात जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत मिशन कक्ष, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण, अग्निशामन, बॉम्बशोधक पथक, पोलीस विभागाचे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम पथक तसेच महिला छेडछाडविरोधी पथक आदी सहभागी झाले होते.
             पालकमंत्री श्री.रावते यांनी यावेळी समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक,लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार व नागरिकांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या.
             या कार्यक्रमाला विविध पदाधिकारी,मान्यवर, खासदार रविंद्र गायकवाड, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे प्रभारी जिल्हा प्रमुख अनिल खोचरे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी  आयुष प्रसाद,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, प्रभोदय मुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.थोरात,विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे, जिल्हा सहकारी निबंधक कैलास वाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार,उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले,तहसिलदार सुजित नरहरे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक,श्री. बनसोडे, नगरपालिका मुख्याधिकारी श्री. मनोहरे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
            
यानंतर आदर्श तलाठी  पुरस्कार  श्री. महावीर  दुरूगकर, जिल्हा उद्योग पुरस्कार 2016- प्रथम मे. माऊली मेटल इंडस्ट्रीज प्रा.लि.युनिट क्र. 11 चोराखळी, श्री.चंद्रकांत शेळके, व्दितीय मे. साईराज मिनरल वॉटर,उमरगा श्री. महादेव अप्पा पाटील, जिल्हा क्रिडा पुरस्कार  सन 2015-16  श्री. ढोबळे नितीन (खो-खो), कु.गंगासागर शिंदे, अनिल शिंदे (अट्या पाट्या), प्रशांत घाडगे(हँन्ड बॉल,कब्बडी) जिल्हा युवा पुरस्कार योगेश थोरबोले, सुहास कांदे, संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था, देवसिंगा,महात्मा गांधी राष्ट्रीय गा्रमीण रोजगार हमी योजना –एक दिवस मजूरासोबत अंतर्गत वैयक्तिक लाभाचे कामे मंजूरी आदेश वितरण परमेश्वर जाधव, मधुकर महाडिक, विकास उंडे, प्रशांत चव्हाण, सुभाष शिंदे, महेश गुरव, अनंत शिनगारे, उत्कृष्ठ कार्य करणारे पोलीस अधिकारी/ कर्मचारी  यांचा पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह पोलीस उपअधीक्षक गोपिका जहागिरदार, पोलीस निरीक्षक शौकत अल्ली सय्यद, राजाराम चिखलीकर, जलील मोहमद हनीफ, देवेंद्रनाथ राऊत,सहदेव तांदळे यांना पालकमंत्री श्री. रावते यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आले.

यावेळी  महाराष्ट्र सावकारी (नियमन ) अधिनियम 2014 प्रमाणे सावकाराने अवैध पध्दतीने खरेदी केलेल्या खरेदीखत रद्द करुन पुन्हा मूळ मालकांना जमीन परत करण्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद यांनी दिले होते, त्यानुसार 4 शेतकऱ्यांची 30 एकर जमीन परत करण्यात आली आहे. त्याचे आदेश विठ्ठल मुक्ताजी लोंढे, शंकर भैरु माटे, आवडाबाई लक्ष्मण पवार,  झाकीर हुसेन पटेल यांना पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन  हणमंत  पडवळ  यांनी  केले.
                                     
जिल्हाधिकारी कार्यालयात अविनाश पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण
          दरम्यान येथील  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक  यांच्या हस्ते सकाळी 7.15 वाजता  ध्वजारोहणाचा  कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार सुजित नरहरी यांच्यासह  महसूल विभागाचे  सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते . 

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत विभागीय वन अधिकारी सातेलीकर
यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
57 व्या वर्धापन दिनानिमित्त  येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे विभागीय वन अधिकारी  राजेश्वर  सातेलीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
या ध्वजारोहण कार्यक्रमास मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणाच्या प्रारंभी प्रथम पोलीस विभागाने सलामी दिली.
यावेळी मध्यवर्ती इमारत व परिसर स्वच्छ व सुंदर बनविण्यात ज्या सहका-यांचा हातभार लागला त्यांचा विभागीय वन अधिकारी श्री. सातेलीकर  यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. पाटोळे,श्री. लष्करे, जिल्हा माहिती कार्यालयाचे श्री. कोम्पले, माळीकाम करणारे श्री शिंदे, श्री.पवार, वन विभागाचे श्री. कोळगे, कृषी विभागाचे  श्री. वारे,सुरक्षारक्षक श्री.कांबळे,श्री. सादीक यांचा समावेश होता.