Monday, 1 May 2017

उन्नत शेती, समृद्ध शेतकरी" गावपातळीवर प्रभावीपणे राबविणार
                                               -पालकमंत्री दिवाकर रावते

उस्मानाबाद,दि.1:- पालकमंत्री या नात्याने मी स्वत:आणि जिल्हाधिकारी आम्ही मिळून जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करुन उन्नत शेती,समृद्ध शेतकरी हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवू,असे प्रतिपादन परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज केले.
                         
                          महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57 वा वर्धापनदिन आज जिल्हयात सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हयात विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. येथील पोलीस संचलन मैदानावरही सकाळी 8 -00 वाजता पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.
      
       भाषणाच्या प्रारंभी श्री.रावते यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी ते स्वतऱ्‍ साक्षीदार असल्याचे सांगून आपल्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे.  देशाचा विकास असो वा धार्मिक सुधारणा, सामाजिक सुधारणा असोत यांचा इतिहास प्रेरणादायी आहे असे सांगितले.

पालकमंत्री श्री. रावते पुढे म्हणाले की, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संताच्या मांदियाळीने महाराष्ट्रीय मनाचे संवर्धन, पोषण केले.सामाजिक विचार सुदृढ करण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी अपार कष्ट घेतले.देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत असतानाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तिशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुद्धीवादी, लेखक, पत्रकार यांची मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पना मांडली.  एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, कॉ. डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेकजण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.
          याप्रसंगी श्री. रावते यांनी मराठवाड्यास निजामाच्या राजवटीतून मुक्त होवून 68 वर्षे झाली. यासाठी ज्या थोर स्वातंत्र्यसैनिकांनी आपले आयुष्य पणास लावले अशा सर्वांचे आभार मानले.
पालकमंत्री श्री.रावते यांनी हा जिल्हा जरी दुष्काळग्रस्त, मागासलेला आणि आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जात असला तरी निसर्गाची मागील वर्षी झालेली  कृपा   आणि प्रशासन व जनतेने मिळून केलेले जलयुक्त शिवारचे काम यामुळे यावर्षी आपणास दुष्काळाची निश्चितच भीती नाही.यावर्षी वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि आपण सर्व मिळून राज्यात 4 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी अभियानामध्ये सक्रिय सहभागी होवू या असे आवाहन करून या  जिल्हयाची दुष्काळग्रस्त जिल्हा ही ओळख  निश्चितच  बदलेल असा विश्वास  व्यक्त केला.
 ते पुढे म्हणाले,दुर्दैवाने शेतकरी आत्महत्याग्रस्त ही या जिल्ह्याची ओळख आहे.  मात्र राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून येत्या काही काळातच पालकमंत्री या नात्याने मी व्यक्तीश: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनातील निराशा, दु:ख दूर करण्यासाठी जातीने विशेष लक्ष देणार आहे.त्याची सुरूवातही मी कालच्याच दौऱ्यापासून केलेली आहे. या दौऱ्यात मी व्यक्तिश: अनेक शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. या जिल्हयातील शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी समजून घेवून, अभ्यासून कृषी, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रांवर विशेष भर देत आणि पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून अधिकाधिक सकारात्मक, विकासात्मक काम कसे करता येईल यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचा मी सतत पाठपुरावा करणार आहे.  शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न नेटाने केले जातील,असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री. रावते यांनी शेती क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सन 2017-18 या खरीप हंगाम वर्षा उत्पादकता वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट असून त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन, सर्वांनी शेतकऱ्यांची सेवा म्हणून काम करण्याचा संकल्पच शासनाने केला आहे,असे यावेळी सांगितले.
राज्याचा नियोजनबद्ध  कृषी आराखडा कृषी, सहकार विभागाने तयार केला आहे. गेल्या वर्षी 40 हजार कोटी रुपयांनी शेती क्षेत्रातील उत्पन्न वाढले असून यावर्षीचे कृषी उत्पादन गेल्या बारा वर्षापेक्षा अधिक झाले आहे. यावर्षी कृषी विकास दर 12.50 टक्के आहे. याबद्दल शेतकऱ्यांचे भार मानून श्री.रावते यांनी सांगितले की,यावर्षी कर्जाचे नियोजन करताना स्टेट फोकस पेपर प्रकाशित केला आहे. 30 ते 31 लाख शेतकरी हे कर्जाच्या परिघाबाहेर गेले आहेत त्यांनाही कर्जपुरवठा झाला पाहिजे यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने नियोजनबद्ध आराखडा करुन प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करुन देता येईल, असे नियोजन भविष्यात केले जाणार आहे.

मी स्वत: पालकमंत्री या नात्याने आणि जिल्हाधिकारी आम्ही मिळून आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करुन उत्पादकता वाढविणे हे उद्दिष्ट समोर ठेवून उन्नत शेती, समृद्ध शेतकरी हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवू तसेच शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांची निर्मिती करुन गाव पातळीवर समूह तयार करुन त्यांना कृषी भांडवल उपलब्ध करुन देवू,असे ते म्हणाले.

यावेळी श्री. रावते यांनी यावर्षीसुध्दा जलयुक्त शिवार, शेततळी, विहिरीची कामे मिशन मोड म्हणून युद्धपातळीवर करण्यात येतील, त्यासाठी आवश्यक तो निधीही उपलब्ध करुन देण्यात येईल. शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सर्व जिल्हावासियांना केले.

ते पुढे म्हणाले ,या वर्षामध्ये पावसाचे व हवामानाचे पूर्वानुमान, बी-बियाणे, खते व औषधी पतपुरवठा, वीज जोडणी व कृषी सिंचन, कृषी पणन, कृषी माल साठवणूक या महत्वाच्या विषयांवर आणि प्रोत्साहनपर योजनांबाबत विविध विभागांचे नियोजन मांडण्यात येते ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. राज्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून त्यामुळेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधेत वाढ झालेली आहे. समाधानकारक पाऊस  व बियाण्यांची उपलब्धता यामुळे सन 2016-17 मध्ये भरघोस उत्पादन झाले आहे. उत्पादित माल खरेदी करण्यात काही मर्यादा आलेल्या होत्या, मात्र शासनाने लक्ष ठेवून योग्य तोडगा काढलेला आहे.कालच आपण कळंब येथील तूर खरेदी केंद्राचे उदघाटनही केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

शासनाच्या सर्वच विभागाकडून  योजनांचा प्रचार प्रसार व जनतेमध्ये त्याबाबतची जागृती याकरिता विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाईल.नुकतेच जिल्हा परिषदेकडून ग्रामविकास लोक अदालतही आयोजित करण्यात आली होती.  त्यालाही जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला.  अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल जिल्हा परिषदेचेही श्री. रावते यांनी अभिनंदन केले.
          याप्रसंगी शासनाचे मुखपत्र लोकराज्य हे मासिक सर्वांनी वाचावे, लोकराज्यच्या माध्यमातून, महान्यूज या शासकीय वेबपोर्टलच्या माध्यमातून जनतेने शासनाच्या योजनांची जास्तीत जास्त माहिती अभ्यासावी, असे आवाहनही त्यांनी  सर्वांना केले.
          जिल्हयात धान्य महोत्सव,बेटी बचाओ बेटी पढाओ,निर्भया दिदी,निर्भया पथक,कडबाकुट्टी यंत्राचे विक्रमी वाटप,महाआरोग्य शिबिर,आधार ॲट बर्थ,ई ब्लड बॅंक यासारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे.जिल्हयातील सातबारा उताऱ्यांचे डिजिटायजेशनचे कामही जवळपास 95 ते 96 टक्के पूर्ण झाले आहे.जिल्हयात गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रणात ठेवल्याबद्दल श्री. रावते यांनी सर्व प्रशासनाचे विशेष कौतुक केले व त्यांनी या जिल्हयात स्व.हिंदूह्दयम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्या रत्न स्वागत योजना व मुदत ठेव प्रमाणपत्र हा उपक्रमही उत्तम प्रकारे राबविला जात असून पाथर्डी येथे झालेल्या कार्यक्रमाचा उल्लेख करून असा उपक्रम राज्यभर राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले.
आज पालकमंत्री श्री.दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण होताच पोलीस दलाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. त्यानंतर पोलीस दलाने महिला व पुरुषांचे पथक, गृहरक्षक दल, शीघ्र कृती दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक आदी पथकाच्या संचलनाची मानवंदना पालकमंत्री रावते यांनी स्वीकारली.
 संचलनात विविध विभागाचे आकर्षक चित्ररथही सहभागी झाले होते. संबंधित विभागाच्या योजनाची माहिती दर्शविणारे हे चित्ररथ लक्ष वेधून घेत होते. यात जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत मिशन कक्ष, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण, अग्निशामन, बॉम्बशोधक पथक, पोलीस विभागाचे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम पथक तसेच महिला छेडछाडविरोधी पथक आदी सहभागी झाले होते.
             पालकमंत्री श्री.रावते यांनी यावेळी समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक,लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार व नागरिकांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या.
             या कार्यक्रमाला विविध पदाधिकारी,मान्यवर, खासदार रविंद्र गायकवाड, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे प्रभारी जिल्हा प्रमुख अनिल खोचरे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी  आयुष प्रसाद,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, प्रभोदय मुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.थोरात,विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे, जिल्हा सहकारी निबंधक कैलास वाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार,उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले,तहसिलदार सुजित नरहरे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक,श्री. बनसोडे, नगरपालिका मुख्याधिकारी श्री. मनोहरे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
            
यानंतर आदर्श तलाठी  पुरस्कार  श्री. महावीर  दुरूगकर, जिल्हा उद्योग पुरस्कार 2016- प्रथम मे. माऊली मेटल इंडस्ट्रीज प्रा.लि.युनिट क्र. 11 चोराखळी, श्री.चंद्रकांत शेळके, व्दितीय मे. साईराज मिनरल वॉटर,उमरगा श्री. महादेव अप्पा पाटील, जिल्हा क्रिडा पुरस्कार  सन 2015-16  श्री. ढोबळे नितीन (खो-खो), कु.गंगासागर शिंदे, अनिल शिंदे (अट्या पाट्या), प्रशांत घाडगे(हँन्ड बॉल,कब्बडी) जिल्हा युवा पुरस्कार योगेश थोरबोले, सुहास कांदे, संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था, देवसिंगा,महात्मा गांधी राष्ट्रीय गा्रमीण रोजगार हमी योजना –एक दिवस मजूरासोबत अंतर्गत वैयक्तिक लाभाचे कामे मंजूरी आदेश वितरण परमेश्वर जाधव, मधुकर महाडिक, विकास उंडे, प्रशांत चव्हाण, सुभाष शिंदे, महेश गुरव, अनंत शिनगारे, उत्कृष्ठ कार्य करणारे पोलीस अधिकारी/ कर्मचारी  यांचा पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह पोलीस उपअधीक्षक गोपिका जहागिरदार, पोलीस निरीक्षक शौकत अल्ली सय्यद, राजाराम चिखलीकर, जलील मोहमद हनीफ, देवेंद्रनाथ राऊत,सहदेव तांदळे यांना पालकमंत्री श्री. रावते यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आले.

यावेळी  महाराष्ट्र सावकारी (नियमन ) अधिनियम 2014 प्रमाणे सावकाराने अवैध पध्दतीने खरेदी केलेल्या खरेदीखत रद्द करुन पुन्हा मूळ मालकांना जमीन परत करण्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद यांनी दिले होते, त्यानुसार 4 शेतकऱ्यांची 30 एकर जमीन परत करण्यात आली आहे. त्याचे आदेश विठ्ठल मुक्ताजी लोंढे, शंकर भैरु माटे, आवडाबाई लक्ष्मण पवार,  झाकीर हुसेन पटेल यांना पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन  हणमंत  पडवळ  यांनी  केले.
                                     
जिल्हाधिकारी कार्यालयात अविनाश पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण
          दरम्यान येथील  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक  यांच्या हस्ते सकाळी 7.15 वाजता  ध्वजारोहणाचा  कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार सुजित नरहरी यांच्यासह  महसूल विभागाचे  सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते . 

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत विभागीय वन अधिकारी सातेलीकर
यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
57 व्या वर्धापन दिनानिमित्त  येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे विभागीय वन अधिकारी  राजेश्वर  सातेलीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
या ध्वजारोहण कार्यक्रमास मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणाच्या प्रारंभी प्रथम पोलीस विभागाने सलामी दिली.
यावेळी मध्यवर्ती इमारत व परिसर स्वच्छ व सुंदर बनविण्यात ज्या सहका-यांचा हातभार लागला त्यांचा विभागीय वन अधिकारी श्री. सातेलीकर  यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. पाटोळे,श्री. लष्करे, जिल्हा माहिती कार्यालयाचे श्री. कोम्पले, माळीकाम करणारे श्री शिंदे, श्री.पवार, वन विभागाचे श्री. कोळगे, कृषी विभागाचे  श्री. वारे,सुरक्षारक्षक श्री.कांबळे,श्री. सादीक यांचा समावेश होता.