Thursday, 22 February 2018

अंगणवाडीतील बालकांसाठी सुरु झाली ग्राम बाल विकास केंद्र




उस्मानाबाद,दि.22:-  जिल्हयातील 170 अंगणवाडयामधून 248 बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्राचा शुभारंभ आज दि. 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. मौजे तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद येथील ग्राम बाल विकास केंद्राचे उद्घाटन महिला व बाल कल्याण जिल्हा परिषदेच्या सचिव श्रीमती सखुताई पवार यांच्या हस्ते झाले.
            यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुप शेंगुलवार, तेरखेडा जिल्हा परिषद सदस्य श्री. उध्दव साळवी, पंचायत समिती सदस्या श्रीमती रुपालीताई घोलप, तेरखेडा सरपंच श्रीमती त्रिशालाबाई खामकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) श्री. निपाणीकर बी.एच. यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला व बाल कल्याण जिल्हा परिषदेच्या सचिव श्रीमती सखुताई पवार व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुप शेंगुलवार यांनी ग्राम बाल विकास केंद्राचा उद्देश व कुपोषण निर्मूलना संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने केलेली उपाययोजना याबाबतची माहिती दिली आणि 2022 पर्यंत उस्मानाबाद जिल्हा कुपोषण मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कामी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
6 वर्षाखालील कुपोषीत बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी गाव पातळीवर 4 ते 12 आठवडयाच्या कालावधीत वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या निरीक्षणाखाली आरोग्य सेवा व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत अतिरिक्त आहार देणे., प्रशिक्षणाद्वारे मातांचे बाल संगोपनासाठी सक्षमीकरण करणे, गाव पातळीवर समाज प्रबोधनाच्या प्रक्रियेतून कुपोषण मुक्तीला चालना देणे, कुपोषण निर्मुलनासाठी लोकसहभाग वाढविणे हे या ग्राम बाल विकास केंद्राचे उद्देश आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) श्री. निपाणीकर बी.एच. यांनी दिली.  
यावेळी गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी वाशी, तालुका वैद्यकीय अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, पर्यवेक्षिका तसेच माता व गावातील नागरीक उपस्थित होते.

सामुदायिक विवाह सोहळ्यातील बालविवाह रोखण्यात यश




उस्मानाबाद,दि.22:-  उस्मानाबाद जिल्हयाच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथे भैरवनाथ शुगर वर्क सोनारी या ठिकाणच्या सामुदायिक विवाह सोहळयात अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यास महिला व बाल विकास कार्यालयास यश मिळाले आहे.
            महिला व बाल विकास कार्यालयाने बालविवाह रोखल्यानंतर, अल्पवयात लग्न करणार नाही असे वचन मुलीच्या पालकांनी यावेळी पथकाला दिले.
            जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्याकडून दि. 18 फेब्रुवारी 2018 रोजी अल्पवयीन बालिकेचा बाल विवाह होणार असल्याची माहिती मिळताच, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री. अशोक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तालुक्याचे संरक्षण अधिकारी श्री. घाडगे आर.जी., बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विभावरी खुने, ग्रामसेवक कटकाळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश साबळे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती माळी एस.बी., परिवेक्षिका श्रीमती गायकवाड के.ए., विस्तार अधिकारी श्री. कावळे ए.सी., ग्रामपंचायत कर्मचारी परमेश्वर पवार, अंगणवाडी मदतनीस श्रीमती परमीन जाधव यांनी संयुक्तपणे मुलीचे माता-पिता व नातेवाईकांचे समुपदेशन करुन हा बालविवाह थांबविण्यात यश प्राप्त केले आहे.
            याकामी भैरवनाथ साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रविंद्र शेलार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, अशी माहिती  जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री. अशोक सावंत यांनी दिली आहे.

Wednesday, 21 February 2018

राज्यातील सर्वात पहिला "लोकराज्य शेतकरी गट" बनला पाडोळीचा मुख्यमंत्री मित्र रेशीम (तुती) उत्पादक शेतकरी गट




उस्मानाबाद,दि.21:-  लोकराज्याचा प्रचार आणि प्रसिध्दी उस्मानाबाद जिल्हयात मोठया प्रमाणात होत आहे." लोकराज्य " मासिकाचे महत्व उस्मानाबाद मध्ये सर्वत्र सर्वमान्य होऊ लागले आहे. या जिल्हयातील श्री. बालाजी पवार यांनी पाडोळी येथे मुख्यमंत्री मित्र रेशीम (तुती) उत्पादक शेतकरी गट सुरू केला. या गटामार्फत शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येते.  शेतकरी गटातील शेतकऱ्यांची शेतीविषयक आवड ओळखून श्री. बालाजी पवार यांनी या गटाला "लोकराज्य" या शासनाच्या मुखपत्र असलेल्या मासिकाची ओळख करून दिली. आणि त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्याशी संपर्क साधला.
शेतकऱ्यांना श्री. सानप यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती तर दिलीच परंतू शेतीपूरक व्यवसाय व शेतीविषयक ज्ञान मिळविण्यासाठी माहिती व जनसंर्पकच्या महान्युजवेबपोर्टल, लोकराज्य तसेच महाराष्ट्र अहेड, दिलखुलास आकाशवाणीवरील तर जय महाराष्ट्र हा दूरदर्शनवरील कार्यक्रमाचा कशाप्रकारे त्यांना उपयोग होऊ शकेल याची ही सविस्तर माहिती दिली. तसेच आत्तापर्यंत जिल्हयात राज्यातील पहिले शासकीय कृषी महाविद्यालय, तेर, ता. जि. उस्मानाबाद,  राज्यातील पहिले शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, उस्मानाबाद, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद (लोकराज्य कार्यालय), जि.प.कें.आदर्श प्रा. शाळा क. तडवळे (लोकराज्य शाळा), विद्यानिकेतन हायस्कूल, येरमाळा (लोकराज्य शाळा), जय हिंद माध्यमिक विद्यालय क. तडवळे (लोकराज्य शाळा), महाराष्ट्र संत विद्यालय, तेर (लोकराज्य शाळा), भाई नारायणराव लोमटे, माध्यमिक विद्यालय,भाटशिरपुरा ता. कळंब (लोकराज्य शाळा), देवधानोरा स्वतंत्र क. महाविद्यालय, देवधानोरा (लोकराज्य महाविद्यालय), जय हिंद उच्च माध्यमिक विद्यालय क. तडवळे (लोकराज्य महाविद्यालय) तसेच लोकराज्य दूत म्हणून अण्णासाहेब सातपुते, सिध्दार्थ सावंत, राहुल जगताप, भारत बळीराम लोंढे, महादेव भंडारे यांना सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.   
याच प्रेरणेतून आज श्री. बालाजी पवार यांनी श्री. सानप यांच्याकडे शेतकऱ्यांचा लोकराज्य सभासद नोंदणीकरीता धनादेशही सुपूर्द केला. अशा प्रकारे उस्मानाबादमधीलच नव्हे तर राज्यातील पहिला लोकराज्य शेतकरी गट बनण्याचा मान मुख्यमंत्री मित्र रेशीम (तुती) उत्पादक शेतकरी गट पाडोळी यांनी मिळविला आहे. याबद्दल आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते या गटातील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. बालाजी पवार व सहकारी शेतकऱ्यांनी संकल्प केला की, जिल्हयातील इतर शेतकरी गटांनाही ते लोकराज्यचे सभासद होण्यासाठी प्रोत्साहीत करतील.   
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, ॲड. अनिल काळे, ॲड. नितिन भोसले, अभिलाष लोमटे यांच्यासह उपस्थित सर्वांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.  

जागतिक महिला दिनानिमित्त 4 मार्च रोजी उस्मानाबाद मध्ये होणार महाआरोग्य शिबीर महिला व बालकांसाठीचे विशेष शिबीर




उस्मानाबाद,दि.21:-  गरजू रुग्णांचा शोध घेऊन त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याकरीता जागतिक महिला दिनानिमित्त 4 मार्च रोजी उस्मानाबाद जिल्हयातील महिला व बालकांसाठी महाआरोग्य शिबीर होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज बैठकीत दिली.
यावेळी आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांच्यासह विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, रुग्णालयांचे अधिष्ठाता, प्राध्यापक आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 04 मार्च रोजी विनामूल्य भव्य महिला व बाल महाआरोग्य शिबीर, पोलीस कवायत मैदान, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात येणार आहे. 
या शिबिरात सुमारे 1 हजार 400 तज्ञ डॉक्टर त्यामध्ये पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. भोजराज, डॉ. रणजित जगताप, डॉ. रमाकांत पांडा, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. प्रविण शिनगारे, प्रभारी आयुष संचालक डॉ. गोविंद खटी इत्यादी डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
शिबिराच्या रचनेत एकूण तीन रुग्ण नोंदणी विभाग, नव्वद बाहयरुग्ण कक्ष, विशेष मोतीबिंदु, ह्दयरोग, बालशल्यचिकित्सा, महिला कर्मरोग तपासणी, त्वचारोग, हाडांचे विकार, मासिक पाळी संबंधी आजार, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगा इत्यादी, चार सर्व सोयीसुविधायुक्त दंततपासणी वाहने, मॅमोग्राफी व कर्करोग तपासणी वाहन, दहा ॲम्ब्यूलन्स, दोन कार्डीयाक ॲम्ब्युलन्स, चार अग्नीशमन वाहने उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व गरजु रुग्णांना मोफत चष्मे, दातांची कवळी, औषधी, ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया, एम.आर.आय., सोनोग्राफी, एक्सरे, रक्त, लघवी तपासणी करावयाची आहे त्यांना सर्व सुविधा मोफत दिली जाणार आहे. तसेच सर्वांना मोफत भोजन व पाणी आयोजकांमार्फत दिले जाणार आहे.
ही शिबिरे उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, वाशी, कळंब, परंडा, भूम तालुक्यांमधील महिला व बालकांकरीता दि. 25 फेब्रुवारी ते दि. 03 मार्च रोजीपर्यंत रुग्ण पूर्व तपासणी सर्व जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी होणार आहेत.
या शिबिरांचा लाभ सर्व गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, आरोग्य दूत रामेश्वरभाऊ नाईक, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व औषधी द्रव्ये विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री. संदीप जाधव यांनी केले आहे. 

Sunday, 18 February 2018

शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेवून सर्वांनी मदतीची भूमिका घ्यावी -पालकमंत्री अर्जून खोतकर





        उस्मानाबाद,दि.18:- या जिल्हयातील शेतकरी हा वेगवेगळया संकटावर मात करीत आपले जीवन जगत आहे, तरी येथील शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेवून सर्वांनी त्यांना मदत करण्याची आणि त्यांना सक्षम करण्याची भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्सव्यवसाय राज्यमंत्री  तथा उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री  अर्जून खोतकर यांनी आज येथे केले.  
जिल्हाधिकारी कार्यालयात गारपीटमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे आदी उपस्थित होते.  
पालकमंत्री श्री. खोतकर म्हणाले की, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याबाबत संबंधित यंत्रणांनी वस्तुनिष्ठ पंचनामे पुढील दोन दिवसात पूर्ण करावेत. मात्र शेतकऱ्यांना मदत करता येईल या भूमिकेतून हे पंचनामे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करुन ते म्हणाले, या जिल्हयातील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी कामांची गुणवत्ता, विहित कालावधी, नियमांचे पालन यांचा समन्वय साधून कामे गतीने पूर्ण करावीत. येथील शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे, त्यांचे प्रबोधन करणे महत्वाचे आहे, त्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे, योजनांच्या माहितीसाठीचे मेळावे घेण्यात यावेत. बचतगटांच्या माध्यमातून उस्मानाबादी शेळी, कडकनाथ कोंबडी याचा व्यवसाय मोठया प्रमाणात उभा करण्यासाठी, शेतकरी प्रोड्यूसर कंपन्यांना अधिकाधिक प्रशिक्षण देवून त्यांना शेती व शेतमालाच्या व्यवसायाकरिता प्रोत्साहित करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून ॲक्शन प्लॅन तयार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री. खोतकर म्हणाले, उस्मानबाद जिल्ह्यात रेशीम शेतीला जास्तीत-जास्त प्रोत्साहन देण्यात येईल. जालना जिल्हयात रेशीम मार्केट सुरु होणार असून उस्मानाबाद जिल्हयातील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्याला एक उत्तम बाजारपेठ लवकरच उपलब्ध होईल.    
या जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत माझी भूमिका अत्यंत गंभीर असून मी जबाबदारीने येथील लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसारमाध्यमे यांच्या एकत्रित सहकार्याने येथील प्रलंबित कामे, महत्वाचे प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लावण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार असून येथील जनतेला न्याय देणे माझे कर्तव्य आहे, असे सांगून आलेला निधी प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने योग्य पध्दतीने विहित वेळेत खर्च न केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर प्रसंगी कठोर कारवाईही करेन, असेही ते शेवटी म्हणाले.
शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी आभार मानले.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी श्री. निलेश श्रींगी, स्वप्निल पवार, चारुशीला देशमुख, तहसिलदार सुजित नरहरे, अरविंद बोळंगे, राजकुमार माने, विभागीय वन अधिकारी श्री. सातेलीकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. चोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गलांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अजिंक्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांच्यासह जिल्हयातील सर्व प्रशासनीक यंत्रणांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते.