उस्मानाबाद,दि.18:-
या जिल्हयातील शेतकरी हा वेगवेगळया संकटावर मात करीत आपले जीवन जगत आहे, तरी येथील
शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेवून सर्वांनी त्यांना मदत करण्याची आणि त्यांना सक्षम
करण्याची भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्सव्यवसाय
राज्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्हयाचे
पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे
केले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात गारपीटमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती,
त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी
जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय
कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे आदी
उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.
खोतकर म्हणाले की, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याबाबत संबंधित
यंत्रणांनी वस्तुनिष्ठ पंचनामे पुढील दोन दिवसात पूर्ण करावेत. मात्र शेतकऱ्यांना
मदत करता येईल या भूमिकेतून हे पंचनामे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करुन ते
म्हणाले, या जिल्हयातील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी
कामांची गुणवत्ता, विहित कालावधी, नियमांचे पालन यांचा समन्वय साधून कामे गतीने पूर्ण
करावीत. येथील शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे,
त्यांचे प्रबोधन करणे महत्वाचे आहे, त्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे, योजनांच्या
माहितीसाठीचे मेळावे घेण्यात यावेत. बचतगटांच्या माध्यमातून उस्मानाबादी शेळी,
कडकनाथ कोंबडी याचा व्यवसाय मोठया प्रमाणात उभा करण्यासाठी, शेतकरी प्रोड्यूसर
कंपन्यांना अधिकाधिक प्रशिक्षण देवून त्यांना शेती व शेतमालाच्या व्यवसायाकरिता
प्रोत्साहित करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून ॲक्शन प्लॅन तयार करणे आवश्यक
असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री.
खोतकर म्हणाले, उस्मानबाद जिल्ह्यात रेशीम शेतीला जास्तीत-जास्त प्रोत्साहन
देण्यात येईल. जालना जिल्हयात रेशीम मार्केट सुरु होणार असून उस्मानाबाद
जिल्हयातील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्याला एक उत्तम बाजारपेठ लवकरच उपलब्ध
होईल.
या जिल्ह्यातील
प्रलंबित प्रश्नांबाबत माझी भूमिका अत्यंत गंभीर असून मी जबाबदारीने येथील लोकप्रतिनिधी,
अधिकारी, प्रसारमाध्यमे यांच्या एकत्रित सहकार्याने येथील प्रलंबित कामे, महत्वाचे
प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लावण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार असून येथील जनतेला
न्याय देणे माझे कर्तव्य आहे, असे सांगून आलेला निधी प्रत्येक अधिकाऱ्याने
जबाबदारीने योग्य पध्दतीने विहित वेळेत खर्च न केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर
प्रसंगी कठोर कारवाईही करेन, असेही ते शेवटी म्हणाले.
शेवटी निवासी
उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी आभार मानले.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी श्री. निलेश श्रींगी,
स्वप्निल पवार, चारुशीला देशमुख, तहसिलदार सुजित नरहरे, अरविंद बोळंगे, राजकुमार
माने, विभागीय वन अधिकारी श्री. सातेलीकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.
चोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गलांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अजिंक्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर
आडे यांच्यासह जिल्हयातील सर्व प्रशासनीक यंत्रणांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते.
